व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करा’

‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करा’

‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करा’

‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी परमेश्‍वराने मला अभिषेक केला आहे.’—यश. ६१:१, २.

१. येशूने शोकग्रस्तांसाठी काय केले, आणि का?

 येशू ख्रिस्ताने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहा. ४:३४) येशूला देवाकडून जी कामगिरी मिळाली होती ती पूर्ण करत असताना त्याने आपल्या पित्याचे उत्कृष्ट गुण प्रतिबिंबित केले. त्यांपैकी एक गुण आहे लोकांबद्दल यहोवाला असलेले अपार प्रेम. (१ योहा. ४:७-१०) आपले हे प्रेम यहोवा अनेक मार्गांनी प्रदर्शित करतो. त्यांपैकी एका मार्गाचा प्रेषित पौलाने उल्लेख केला. त्याने देवाचे वर्णन, “सर्व सांत्वनदाता देव” असे केले. (२ करिंथ. १:३) येशूने यशयाच्या भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे केले तेव्हा त्यानेदेखील अशाच प्रकारचे प्रेम प्रदर्शित केले. (यशया ६१:१, २ वाचा.) त्याने नासरेथच्या सभास्थानात त्या भविष्यवाणीतील काही भाग वाचला व त्यातील शब्द स्वतःला लागू केले. (लूक ४:१६-२१) येशूने आपल्या सबंध सेवाकार्यादरम्यान प्रेमळपणे शोकग्रस्तांचे सांत्वन केले आणि यामुळे त्यांना उत्तेजन व मनःशांती मिळाली.

२, ३. इतरांचे सांत्वन करण्याच्या बाबतीत ख्रिस्ताच्या अनुयायांनी त्याचे अनुकरण का केले पाहिजे?

येशूच्या सर्व अनुयायांनी, दुःखितांचे सांत्वन करण्याद्वारे त्याचे अनुकरण केले पाहिजे. (१ करिंथ. ११:१) पौलाने म्हटले: “तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्‍नति करा.” (१ थेस्सलनी. ५:११) इतरांचे सांत्वन करणे आज विशेष गरजेचे आहे, कारण मानवजात सध्या ‘कठीण दिवसांचा’ सामना करत आहे. (२ तीम. ३:१) इतरांच्या कटू शब्दांचे किंवा वाईट वागणुकीचे शिकार झाल्यामुळे दुःखी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

बायबलमध्ये भाकीत केल्याप्रमाणे, या दुष्ट जगाच्या शेवटल्या काळात, अनेक जण ‘स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारे, उपकार न स्मरणारे, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारे, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेले, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारे’ आहेत. पूर्वी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात आज ही लक्षणे पाहायला मिळतात, याचे कारण आज ‘दुष्ट व भोंदू माणसे दुष्टपणात अधिक सरसावत’ आहेत.—२ तीम. ३:२-४, १३.

४. आज जगाच्या परिस्थितीविषयी काय म्हणता येईल?

पण, याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. कारण, देवाचे वचन स्पष्टपणे सांगते, की “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहा. ५:१९) “सगळे जग” असे जे म्हटले आहे त्यात राजनैतिक, धार्मिक व व्यापारी घटकांचा, तसेच सैतान आपले विचार प्रसारित करण्यासाठी उपयोग करत असलेल्या माध्यमांचा समावेश होतो. म्हणूनच, दियाबल सैतानाला उचितपणे “जगाचा अधिकारी” व ‘या युगाचे दैवत’ असे म्हटले आहे. (योहा. १४:३०; २ करिंथ. ४:४) यहोवा लवकरच सैतानाचा खातमा करणार आहे हे त्याला माहीत असल्यामुळे तो त्वेषाने पेटून उठला आहे. आणि त्यामुळे आज जगाची परिस्थिती सातत्याने ढासळत आहे. (प्रकटी. १२:१२) देव सैतानाला व त्याच्या दुष्ट जगाला जास्त काळ खपवून घेणार नाही हे जाणून, तसेच सैतानाने यहोवाच्या सार्वभौमत्वाविषयी उपस्थित केलेला वादविषय कायमचा मिटवला जाईल हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो!—उत्प., अध्या. ३; ईयो., अध्या. २.

जगभरात सुवार्तेचा प्रचार केला जात आहे

५. प्रचार कार्यासंबंधीची भविष्यवाणी या शेवटल्या दिवसांत कशा प्रकारे पूर्ण होत आहे?

मानव इतिहासाच्या या खडतर काळात, येशूने जे भाकीत केले होते त्याची पूर्णता होत आहे. त्याने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्त. २४:१४) सबंध जगभरात देवाच्या राज्याविषयी साक्ष दिली जात आहे आणि हे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे. आज, जगभरातील १,०७,००० पेक्षा अधिक मंडळ्यांमधील ७५,००,००० पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याचा प्रचार करत आहेत. पृथ्वीवर असताना येशूने देवाच्या राज्याचा प्रचार केला व लोकांना त्या राज्याविषयी शिकवले. आज यहोवाचे साक्षीदारही तेच करत आहेत. (मत्त. ४:१७) जगभरात केल्या जाणाऱ्‍या आपल्या प्रचार कार्यामुळे आज शोकग्रस्तांना खूप सांत्वन मिळत आहे. याचा पुरावा म्हणजे, अलीकडील दोन वर्षांत एकूण ५,७०,६०१ व्यक्‍तींनी बाप्तिस्मा घेतला व ते यहोवाचे साक्षीदार बनले!

६. आपल्या प्रचार कार्याच्या व्यापकतेविषयी तुम्हाला काय वाटते?

सध्या यहोवाचे साक्षीदार ५०० हून अधिक भाषांमध्ये बायबल साहित्याचे भाषांतर व वितरण करत आहेत. यावरून हे प्रचाराचे कार्य किती व्यापक आहे हे दिसून येते. मानव इतिहासात असे कधीच घडले नाही! यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाचे अस्तित्व, कार्य व वाढ खरोखर विलक्षण आहे. सैतानाच्या वर्चस्वाखाली असलेल्या या जगात, देवाच्या शक्‍तीशाली पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय असे घडणे मुळीच शक्य झाले नसते. आज संपूर्ण जगभरात सुवार्तेचा प्रचार होत असल्यामुळे, केवळ आपल्या बंधुभगिनींनाच नव्हे, तर राज्याच्या संदेशाला प्रतिसाद देणाऱ्‍या सर्व शोकग्रस्तांनाही शास्त्रवचनांतून खूप सांत्वन मिळत आहे.

आपल्या बंधुभगिनींचे सांत्वन करा

७. (क) आपण सध्या तोंड देत असलेल्या दुःखाच्या कारणांचे यहोवाने उच्चाटन करावे अशी अपेक्षा आपण का करू शकत नाही? (ख) छळ-संकटाचा सामना करणे आपल्याला शक्य आहे असे आपण का म्हणू शकतो?

दुष्टाईने व दुःखाने भरलेल्या या जगात, आपल्या वाट्याला काही दुःखाचे प्रसंग नक्कीच येतील. देव लवकरच या दुष्ट जगाचा अंत करणार आहे; पण, त्याआधी त्याने आपल्या दुःखाच्या सर्व कारणांचे उच्चाटन करावे अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. उलट, या दुष्ट जगाच्या अंताची वाट पाहत असताना, बायबलमध्ये भाकीत केल्याप्रमाणे, आपल्याला छळाचा सामना करावा लागेल व यहोवाच्या सौर्वभौमत्वाचे समर्थक या नात्याने आपल्या एकनिष्ठेची परीक्षा होईल. (२ तीम. ३:१२) पण, प्राचीन थेस्सलनीकामधील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांप्रमाणेच आपणसुद्धा आपल्या स्वर्गीय पित्याकडून मिळणाऱ्‍या साहाय्यामुळे व सांत्वनामुळे धीराने आणि विश्‍वासाने छळ-संकटांचा सामना करू शकतो.२ थेस्सलनीकाकर १:३-५ वाचा.

८. यहोवा आपल्या सेवकांचे सांत्वन करतो याचा कोणता शास्त्रवचनीय पुरावा आहे?

यहोवा आपल्या सेवकांना आवश्‍यक असलेले सांत्वन देतो यात काहीच शंका नाही. उदाहरणार्थ, दुष्ट ईजबेल राणीकडून एलीया संदेष्ट्याच्या जिवाला धोका होता, तेव्हा त्याचे धैर्य खचले व तो जीव मुठीत घेऊन पळून गेला. आपल्याला मरण यावे असेही त्याने म्हटले. पण, याबद्दल यहोवाने एलीयाचे ताडन केले नाही. उलट, यहोवाने त्याचे सांत्वन केले आणि संदेष्टा या नात्याने कार्य करत राहण्याचे धैर्य त्याला दिले. (१ राजे १९:१-२१) यहोवा आपल्या लोकांचे सांत्वन करतो ही गोष्ट पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीच्या अनुभवावरूनसुद्धा दिसून येते. उदाहरणार्थ, आपण अशा एका काळाविषयी वाचतो जेव्हा “सर्व यहूदीया, गालील व शोमरोन ह्‍या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्‍नति होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात [“सांत्वनात,” NW] चालत असता वाढत गेली.” (प्रे. कृत्ये ९:३१) आज आपल्यालासुद्धा ‘पवित्र आत्म्याचे सांत्वन’ मिळते याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!

९. येशूविषयी शिकल्याने आपल्याला सांत्वन का मिळू शकते?

ख्रिस्ती या नात्याने, येशू ख्रिस्ताबद्दल शिकण्याद्वारे व त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याद्वारे आपल्याला सांत्वन मिळते. येशूने म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्त. ११:२८-३०) होय, येशू लोकांशी दयाळूपणे व प्रेमळपणे वागला. तो लोकांशी ज्याप्रमाणे वागला त्याबद्दल शिकल्याने व त्याच्या सकारात्मक उदाहरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्यानेसुद्धा बऱ्‍याच प्रमाणात आपले दुःख हलके होऊ शकते.

१०, ११. मंडळीत कोण इतरांना सांत्वन देऊ शकतात?

१० आपल्याला आपल्या बंधुभगिनींकडूनसुद्धा सांत्वन मिळू शकते. उदाहरणार्थ, ख्रिस्ती मंडळीत वडीलजन दुःखितांचे सांत्वन कसे करतात त्याचा विचार करा. शिष्य याकोबाने लिहिले: “तुम्हांपैकी कोणी [आध्यात्मिक रीतीने] दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी.” याचा परिणाम काय होईल? “विश्‍वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.” (याको. ५:१४, १५) पण, केवळ ख्रिस्ती वडीलच नव्हे, तर मंडळीतील इतर सदस्यदेखील दुःखितांचे सांत्वन करू शकतात.

११ स्त्रियांना सहसा इतर स्त्रियांजवळ आपल्या समस्यांबद्दल बोलायला आवडते. खासकरून, मंडळीतील वयस्कर व अधिक अनुभवी बहिणी, तरुण बहिणींना उत्तम मार्गदर्शन देऊ शकतात. या वयस्कर ख्रिस्ती स्त्रियांनी आपल्या जीवनकाळात अशा अनेक समस्यांचा सामना केला असेल. त्यांच्या सहानुभूतीमुळे व कोमल गुणांमुळे मंडळीतील तरुण बहिणींना बरीच मदत मिळू शकते. (तीत २:३-५ वाचा.) अर्थात, ख्रिस्ती वडील व मंडळीतील इतर जणसुद्धा आपल्यातील ‘जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर देऊ’ शकतात, किंबहुना त्यांनी तो दिलाच पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:१४, १५) शिवाय, आपण हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे, की देव ‘आपल्यावरील सर्व संकटांत आपले सांत्वन करितो, असे की ज्या सांत्वनाने आपल्या स्वतःला देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आपण, जे कोणी कोणत्याही संकटांत आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे.’—२ करिंथ. १:४.

१२. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे का महत्त्वाचे आहे?

१२ सांत्वन मिळवण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणजे ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे. कारण सभांमध्ये, आपल्याला उत्तेजन देण्यासाठी बायबलवर आधारित भाषणे दिली जातात. बायबलमध्ये आपण असे वाचतो, की ‘यहूदा व सीला यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.’ (प्रे. कृत्ये १५:३२) सभांच्या आधी व नंतर मंडळीतील सदस्य एकमेकांसोबत उभारणीकारक संभाषण करतात. तेव्हा, काही वैयक्‍तिक समस्येमुळे आपण दुःखी असलो, तरी आपण इतरांपासून फटकून राहू नये. फटकून राहिल्याने आपली समस्या आणखी बिकट होऊ शकते. (नीति. १८:१) या उलट, आपण प्रेषित पौलाच्या देवप्रेरित सल्ल्याचे पालन करावे, ज्याने म्हटले: “[आपण] प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.”—इब्री १०:२४, २५.

देवाच्या वचनातून सांत्वन मिळवा

१३, १४. शास्त्रवचने कशा प्रकारे आपले सांत्वन करू शकतात ते सांगा.

१३ आपण बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती असोत अथवा नुकतीच देवाविषयी व त्याच्या उद्देशांविषयी शिकण्यास सुरुवात केली असो, आपण देवाच्या लिखित वचनातून खूप सांत्वन मिळवू शकतो. पौलाने म्हटले: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या [“सांत्वनाच्या,” NW] योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रांत पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोम. १५:४) पवित्र शास्त्र आपले सांत्वन करू शकते व आपल्याला “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” करू शकते. (२ तीम. ३:१६, १७) देवाच्या उद्देशांविषयी जाणून घेतल्यामुळे व भविष्याबद्दल एक खरी आशा मिळाल्यामुळे आपल्याला नक्कीच खूप सांत्वन मिळेल. तेव्हा, आपल्याला सांत्वन देणाऱ्‍या व अनेक मार्गांनी आपल्याला लाभदायक ठरणाऱ्‍या देवाच्या वचनाचा व बायबलवर आधारित प्रकाशनांचा आपण पुरेपूर लाभ घेऊ या.

१४ येशूने लोकांना शिकवण्यासाठी व त्यांचे सांत्वन करण्यासाठी शास्त्रवचनांचा उपयोग करून आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडले. उदाहरणार्थ, त्याचे पुनरुत्थान झाल्यानंतर एके प्रसंगी तो दोन शिष्यांना दिसला, तेव्हा त्याने ‘शास्त्राचा उलगडा केला.’ तो त्यांच्याशी बोलत असताना त्याचे शब्द त्यांच्या हृदयाला भिडले. (लूक २४:३२) येशूचे सर्वोत्तम उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून प्रेषित पौलानेदेखील “शास्त्रावरून वादविवाद [“युक्‍तिवाद,” NW] केला.” बिरुयातील त्याच्या श्रोत्यांनी “मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रांत दररोज शोध करीत गेले.” (प्रे. कृत्ये १७:२, १०, ११) तेव्हा, सांत्वन मिळवण्यासाठी दररोज बायबलचे वाचन करणे, तसेच या खडतर काळात आपल्याला सांत्वन व आशा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपल्या इतर प्रकाशनांचे वाचन करणे किती उचित आहे!

इतरांचे सांत्वन करण्याचे आणखी काही मार्ग

१५, १६. आपल्या बंधुभगिनींचे सांत्वन करण्यासाठी आपण कोणत्या काही गोष्टी करू शकतो?

१५ आपल्या बंधुभगिनींना मदत करण्याद्वारे आपण अनेक व्यावहारिक मार्गांनी त्यांचे सांत्वन करू शकतो. उदाहरणार्थ, आपण वयोवृद्धांसाठी किंवा आजारी असलेल्या बंधुभगिनींसाठी किराणा मालाची खरेदी करू शकतो; घरातील काही कामे करण्याद्वारे आपण त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवू शकतो. (फिलिप्पै. २:४) तसेच प्रेम, धैर्य व विश्‍वास यांसारख्या चांगल्या गुणांबद्दल आपण आपल्या बंधुभगिनींची प्रशंसा करू शकतो.

१६ वयोवृद्धांचे सांत्वन करण्यासाठी आपण त्यांना भेटायला जाऊ शकतो. ते आपल्या पूर्वीच्या अनुभवांविषयी व यहोवाच्या सेवेत त्यांना मिळालेल्या आशीर्वादांविषयी आपल्याला सांगतात तेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकू शकतो. कदाचित, यामुळे आपल्यालाच उत्तेजन व सांत्वन मिळेल! आपण ज्यांना भेटायला जातो त्यांच्यासाठी आपण बायबलमधील किंवा बायबलवर आधारित असलेल्या आपल्या प्रकाशनांतील काही माहिती वाचू शकतो; त्यांच्यासोबत त्या आठवड्याच्या टेहळणी बुरूज अभ्यास लेखाची किंवा मंडळीच्या बायबल अभ्यासाची चर्चा करू शकतो; बायबलच्या विषयावर आधारित एखादी डीव्हीडी पाहू शकतो. तसेच, आपल्या प्रकाशनांतील काही उत्तेजनपर अनुभव त्यांना सांगू शकतो किंवा वाचून दाखवू शकतो.

१७, १८. यहोवा आपल्या निष्ठावंत सेवकांना आधार देईल व त्यांचे सांत्वन करेल अशी खातरी आपण का बाळगू शकतो?

१७ आपल्या एखाद्या बंधू किंवा बहिणीला सांत्वनाची गरज असल्याचे आपल्याला जाणवते, तेव्हा आपण आपल्या वैयक्‍तिक प्रार्थनेत त्या बंधूचा किंवा बहिणीचा उल्लेख करू शकतो. (रोम. १५:३०; कलस्सै. ४:१२) जीवनातील समस्यांशी झुंजत असताना, तसेच इतरांचे सांत्वन करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असताना आपणही स्तोत्रकर्त्यासारखाच विश्‍वास व भरवसा बाळगू शकतो. त्याने म्हटले: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तो. ५५:२२) होय, आपण यहोवाचे निष्ठावंत सेवक असल्यामुळे आपले सांत्वन करण्यासाठी व आपल्याला आधार देण्यासाठी तो सदैव तयार असेल.

१८ देवाने प्राचीन काळातील आपल्या उपासकांना म्हटले: “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे.” (यश. ५१:१२) यहोवाने ज्याप्रमाणे त्यांचे सांत्वन केले होते त्याचप्रमाणे तो आपलेही सांत्वन करेल आणि शोकग्रस्तांचे सांत्वन करण्याचे आपले प्रामाणिक प्रयत्न आशीर्वादित करेल. आपल्याला स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील जीवनाची, पौलाने आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या आपल्या बंधुभगिनींना जे म्हटले त्यापासून आपल्यापैकी प्रत्येकाला सांत्वन मिळू शकते. त्याने म्हटले: “आपला प्रभु येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्‍तीत तुम्हास स्थिर करो.”—२ थेस्सलनी. २:१६, १७.

तुम्हाला आठवते का?

• शोकग्रस्तांचे सांत्वन करण्याचे आपले कार्य किती व्यापक आहे?

• इतरांचे सांत्वन करण्यासाठी आपण कोणत्या काही गोष्टी करू शकतो?

• यहोवा आपल्या लोकांचे सांत्वन करतो याचा कोणता शास्त्रवचनीय पुरावा आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्र]

तुम्ही शोकग्रस्तांचे सांत्वन करता का?

[३० पानांवरील चित्र]

लहानमोठे सर्व जण इतरांना उत्तेजन देऊ शकतात