व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका’

‘आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका’

‘आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका’

“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.”—नीति. ३:५.

१, २. (क) आपल्यासमोर कोणते प्रसंग येऊ शकतात? (ख) दुःखाचा सामना करताना, एखादा निर्णय घेताना किंवा प्रलोभनाचा प्रतिकार करताना आपण कोणावर अवलंबून राहिले पाहिजे, आणि का?

 सिंथीयाच्या * मालकाने आपल्या कंपनीचे काही विभाग केव्हाच बंद केले आहेत व कितीतरी कामगारांना कामावरून काढले आहे. आता आपलीच वेळ आहे असे सिंथीयाला वाटते. तिची नोकरी गेली तर ती काय करेल? ती आपला घरखर्च कसा चालवेल? पॅमेला नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीला राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवाकार्य करायची इच्छा आहे; तिने तेथे जावे का? विशीत असलेल्या सॅम्यूएल नावाच्या एका तरुणाची समस्या वेगळीच आहे. अगदी कोवळ्या वयात त्याला पोर्नोग्राफी (अश्‍लील साहित्य) पाहण्याची सवय लागली होती. त्याची ही सवय मोडली असली, तरी आतासुद्धा त्याला अश्‍लील साहित्य पाहण्याचा अनावर मोह होतो. तो या मोहाचा प्रतिकार कसा करू शकतो?

दुःखद परिस्थितीचा सामना करताना, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना किंवा प्रलोभनांचा प्रतिकार करताना तुम्ही कोणावर विसंबून राहता? तुम्ही सर्वस्वी स्वतःवर विसंबून राहता का, की ‘आपला भार परमेश्‍वरावर टाकता?’ (स्तो. ५५:२२) बायबल म्हणते: “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.” (स्तो. ३४:१५) तेव्हा, आपल्याच बुद्धीवर अवलंबून न राहता, पूर्ण मनाने यहोवावर भरवसा ठेवणे किती महत्त्वाचे आहे!—नीति. ३:५.

३. (क) यहोवावर भरवसा ठेवणे याचा काय अर्थ होतो? (ख) काही जण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्यास का प्रवृत्त होऊ शकतात?

पूर्ण मनाने यहोवावर भरवसा ठेवणे याचा अर्थ त्याच्या इच्छेनुसार सर्वकाही करणे. असे करण्यासाठी, नियमितपणे त्याला प्रार्थना करणे व त्याच्या मार्गदर्शनासाठी मनापासून विनंत्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण, अनेकांना यहोवावर पूर्णपणे विसंबून राहणे कठीण वाटते. उदाहरणार्थ, लिन नावाची एक ख्रिस्ती बहीण म्हणते, “यहोवावर पूर्ण भरवसा ठेवणं हा माझ्यासाठी एक संघर्षच आहे.” का? ती म्हणते: “माझ्या वडिलांशी माझा काहीएक संबंध नाही, आणि माझ्या आईनं भावनिक किंवा शारीरिक रीतीनं कधीच माझी काळजी घेतली नाही. त्यामुळे अगदी लहानपणापासून मी स्वतःची काळजी घ्यायला शिकले.” लिनच्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीमुळे तिला कोणावरही पूर्ण भरवसा ठेवणे कठीण जाते. काही जण, त्यांच्या क्षमतांमुळे व यशामुळे, देवावर विसंबून राहण्याऐवजी स्वतःवर विसंबून राहण्यास प्रवृत्त होतात. उदाहरणार्थ, मंडळीची कार्ये पार पाडताना एक अनुभवी ख्रिस्ती वडील देवाला मदत मागण्याऐवजी कदाचित स्वतःच्या अनुभवावर जास्त विसंबून राहू शकतो.

४. या लेखात कशाची चर्चा केली जाईल?

आपण यहोवाला एखाद्या गोष्टीविषयी प्रार्थना करतो तेव्हा आपण स्वतःदेखील प्रामाणिक प्रयत्न करावे व असे करताना त्याचे मार्गदर्शन स्वीकारावे अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. तर मग, एखादी कठीण समस्या केव्हा पूर्णपणे यहोवावर सोपवून द्यावी व केव्हा ती सोडवण्यासाठी स्वतःदेखील प्रयत्न करावे हे आपल्याला कसे ठरवता येईल? निर्णय घेण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा आपण कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? प्रलोभनांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताना प्रार्थना करणे महत्त्वाचे का आहे? या प्रश्‍नांची उत्तरे आपण बायबलमधील काही उदाहरणांवरून पाहू या.

दुःखाचा सामना करताना

५, ६. अश्‍शूरच्या राजाने हिज्कीयाला धमकावले तेव्हा हिज्कीयाने कशी प्रतिक्रिया दाखवली?

यहूदाचा राजा हिज्कीया याच्याविषयी बायबल म्हणते: “तो परमेश्‍वराला धरून राहिला; त्याला अनुसरण्याचे त्याने सोडिले नाही; परमेश्‍वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळिल्या.” होय, “इस्राएलाचा देव परमेश्‍वर याजवर त्याचा भाव” होता. (२ राजे १८:५, ६) अश्‍शूरचा राजा सन्हेरीब याने रब-शाकेसहित आपल्या इतर काही प्रतिनिधींना बलाढ्य सेना घेऊन जेरूसलेमला पाठवले, तेव्हा हिज्कीयाने कशी प्रतिक्रिया दाखवली? या शक्‍तीशाली अश्‍शूरी सैन्याने यापूर्वी यहूदाची अनेक तटबंदी नगरे हस्तगत केली होती आणि आता सन्हेरिबाचा डोळा जेरूसलेमवर होता. हिज्कीया यहोवाच्या मंदिरात गेला व प्रार्थना करू लागला: “परमेश्‍वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हाला सोडीव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच कायतो परमेश्‍वर देव आहेस.”—२ राजे १९:१४-१९.

हिज्कीयाने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि सोबतच स्वतःदेखील प्रयत्न केले. उदाहरणार्थ, यहोवाच्या मंदिरात जाण्याआधी त्याने आपल्या लोकांना सूचना दिली की त्यांनी रब-शाकेच्या अपमानकारक बोलण्याकडे मुळीच लक्ष देऊ नये. तसेच, या बाबतीत यशया संदेष्ट्याचा सल्ला घेण्यासाठी हिज्कीयाने एक प्रतिनिधी मंडळही त्याच्याकडे पाठवले. (२ राजे १८:३६; १९:१, २) हिज्कीयाने यहोवाच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली. या प्रसंगी, आपल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्याने इजिप्तची किंवा शेजारच्या राष्ट्रांची मदत घेतली नाही; कारण असे करणे यहोवाच्या इच्छेविरुद्ध आहे हे त्याला माहीत होते. हिज्कीया स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला नाही, तर त्याने यहोवावर भरवसा ठेवला. यहोवाच्या दूताने सन्हेरिबाच्या १,८५,००० सैनिकांना ठार मारले तेव्हा सन्हेरीब “तळ उठवून” निनवेला परत गेला.—२ राजे १९:३५, ३६.

७. हन्‍ना व योना यांच्या प्रार्थनांतून आपल्याला कोणता दिलासा मिळू शकतो?

एलकाना नावाच्या एका लेव्याची पत्नी हन्‍ना हिला मूल होत नसल्यामुळे ती खूप दुःखी होती. पण, ती यहोवावर विसंबून राहिली. (१ शमु. १:९-११, १८) तसेच, योना संदेष्ट्याने एका मोठ्या माशाच्या पोटातून यहोवाला प्रार्थना केली तेव्हा यहोवाने त्याला वाचवले. योनाने अशी प्रार्थना केली: “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्‍वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली: तेव्हा तू माझा शब्द ऐकला.” (योना २:१, २, १०) आपली परिस्थिती कितीही बिकट असो, आपण यहोवाला आपल्यावर कृपा करण्याची ‘विनंती’ करू शकतो ही किती दिलासादायक गोष्ट आहे!स्तोत्र ५५:१, १६ वाचा.

८, ९. हिज्कीया, हन्‍ना व योना यांनी आपल्या प्रार्थनांमध्ये कोणत्या चिंता व्यक्‍त केल्या, आणि त्यावरून आपण काय शिकतो?

आपण दुःखात असताना यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा आपण कोणती महत्त्वाची गोष्ट विसरू नये हे हिज्कीया, हन्‍ना आणि योना यांच्या उदाहरणावरून आपण शिकतो. हे तिघे जण आपापल्या समस्येमुळे अत्यंत दुःखी होते. पण, तरीसुद्धा त्यांच्या प्रार्थनांवरून दिसून येते, की त्यांनी केवळ स्वतःची व स्वतःच्या समस्यांचीच चिंता केली नाही; तर त्यांनी देवाचे नाव, त्याची उपासना व त्याची इच्छा पूर्ण करणे या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व दिले. उदाहरणार्थ, यहोवाच्या नावाला काळिमा फासला जात होता त्यामुळे हिज्कीया दुःखी होता. हन्‍नाने ज्या पुत्रासाठी कळकळून यहोवाला प्रार्थना केली होती, त्याच पुत्राला तिने शिलोतील निवासमंडपात यहोवाची सेवा करण्यासाठी देण्याचे वचन दिले. आणि योनाने म्हटले: “मी केलेले नवस फेडीन.”—योना २:९.

एखाद्या दुःखद परिस्थितीचा सामना करताना आपण मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा त्यामागे आपले हेतू काय आहेत याचे परीक्षण करणे सुज्ञतेचे आहे. आपल्याला केवळ आपल्याच समस्यांची चिंता आहे का, की आपण यहोवाचा व त्याच्या उद्देशाचा विचार करतो? दुःखाचा सामना करताना आपण स्वतःच्याच समस्यांमध्ये इतके गुरफटले जाऊ शकतो की आध्यात्मिक गोष्टी आपल्याला कमी महत्त्वाच्या वाटतात. तेव्हा, मदतीसाठी देवाला प्रार्थना करताना आपण आपले मन यहोवावर, त्याच्या नावाचे पवित्रीकरण करण्यावर व त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्यावर केंद्रित करू या. असे केल्यास, आपल्या समस्येवर आपल्याला हवा असलेला तोडगा जरी निघाला नाही, तरी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास आपल्याला मदत मिळेल. देवाच्या मदतीने आपण आपली समस्या धीराने सहन करावी हेच कदाचित आपल्या प्रार्थनेचे उत्तर असेल.यशया ४०:२९; फिलिप्पैकर ४:१३ वाचा.

निर्णय घेताना

१०, ११. यहोशाफाट राजासमोर एक कठीण प्रसंग आला तेव्हा त्याने काय केले?

१० तुम्ही जीवनात महत्त्वाचे निर्णय कसे घेता? तुम्ही आधी निर्णय घेता का आणि तो निर्णय यशस्वी व्हावा म्हणून नंतर यहोवाला प्रार्थना करता का? मवाबी व अम्मोनी सैन्यांनी एकत्र येऊन यहूदाचा राजा यहोशाफाट याच्यावर चढाई केली तेव्हा त्याने काय केले याचा विचार करा. मवाबी व अम्मोनी सैन्यांपुढे यहूदाचा टिकाव लागणे मुळीच शक्य नव्हते. मग, यहोशाफाटाने काय केले?

११ बायबल म्हणते: “यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्‍वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला.” सर्व यहूदाने उपास करावा असा फर्मान त्याने काढला व ‘परमेश्‍वराचा धावा करण्यासाठी’ त्याने यहूदी लोकांना एकत्र केले. तो यहूदा व यरुशलेमच्या जमावामध्ये उभा राहिला आणि त्याने प्रार्थना केली. त्याने केलेल्या प्रार्थनेचे काही शब्द असे आहेत: “हे आमच्या देवा; तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही; पण आमचे डोळे तुजकडे लागले आहेत.” यहोवाने यहोशाफाटाची प्रार्थना ऐकली आणि त्याला व त्याच्या लोकांना चमत्कारिक रीत्या शत्रूंच्या हातून वाचवले. (२ इति. २०:३-१२, १७) तर मग, निर्णय घेताना आणि खासकरून आपल्या आध्यात्मिकतेवर परिणाम करतील असे निर्णय घेताना, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहण्याऐवजी आपण यहोवावर अवलंबून राहू नये का?

१२, १३. निर्णय घेण्याच्या बाबतीत दावीद राजाने कोणते उदाहरण मांडले?

१२ काही वेळा, आपल्यासमोर अशा काही समस्या येऊ शकतात ज्या सोडवणे आपल्याला सहज शक्य आहे असे आपल्याला वाटू शकते. आपल्या पूर्व अनुभवामुळे आपण या समस्या चुटकीसरशी सोडवू शकतो असे कदाचित आपल्याला वाटेल. अशा समस्या आपल्यासमोर येतात तेव्हा आपण काय करावे? अशा वेळी काय करावे हे दावीद राजाविषयी असलेल्या एका वृत्तान्तावरून आपण समजू शकतो. अमालेकी लोकांनी सिक्लाग शहरावर स्वारी केली तेव्हा त्यांनी दाविदाच्या व त्याच्या माणसांच्या बायकामुलांना कैद करून नेले. तेव्हा दाविदाने यहोवाला विचारले: “मी या टोळीचा पाठलाग करू काय?” त्यावर यहोवाने उत्तर दिले: “त्यांचा पाठलाग कर, तू खात्रीने त्यांस गाठिशील व सर्वांना सोडवून आणिशील.” दाविदाने यहोवाच्या म्हणण्याप्रमाणे केले आणि “अमालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांस दाविदाने सोडविले.”—१ शमु. ३०:७-९, १८-२०.

१३ या घटनेच्या काही काळानंतर, पलिष्टी लोक इस्राएलविरुद्ध लढाई करण्यास आले. दाविदाने पुन्हा एकदा यहोवाला प्रश्‍न विचारला आणि यहोवाने त्याला स्पष्ट उत्तर दिले: “चढाई कर; मी खात्रीने पलिष्ट्यांस तुझ्या हाती देतो.” (२ शमु. ५:१८, १९) याच्या थोड्याच काळानंतर, पलिष्टी लोक पुन्हा एकदा दाविदावर चालून आले. या वेळी दाविदाने काय केले? तो असा तर्क करू शकला असता: ‘याआधी दोन वेळा मी अशाच प्रसंगांचा सामना केला आहे. तेव्हा, आतासुद्धा मी देवाच्या शत्रूंवर चढाई करू शकतो.’ दाविदाने असे केले का, की त्याने यहोवाकडे मार्गदर्शन मागितले? तो आपल्या पूर्व अनुभवावर अवलंबून राहिला नाही. त्याने पुन्हा एकदा मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना केली. दाविदाने मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना केली हे किती बरे झाले! कारण, या वेळी यहोवाकडून त्याला मिळालेल्या सूचना अगदी वेगळ्या होत्या. (२ शमु. ५:२२, २३) असा एखादा प्रसंग किंवा समस्या आपल्यासमोर येते तेव्हा आपणसुद्धा केवळ आपल्या पूर्व अनुभवावर विसंबून न राहण्याची सावधगिरी बाळगली पाहिजे.यिर्मया १०:२३ वाचा.

१४. यहोशवाने व इस्राएलच्या वडील जनांनी गिबोनी लोकांशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

१४ आपण सर्व अपरिपूर्ण आहोत; त्यामुळे निर्णय घेताना आपण सर्वांनीच, अगदी अनुभवी ख्रिस्ती वडिलांनीसुद्धा, यहोवाचे मार्गदर्शन घेण्याचे कधीच विसरू नये. चतुर गिबोनी लोकांनी आपली खरी ओळख लपवली व आपण एका दूरच्या देशातून आलो आहोत असे सांगितले, तेव्हा मोशेचा उत्तराधिकारी यहोशवा याने व इस्राएलच्या वडील जनांनी कशी प्रतिक्रिया दाखवली त्याचा विचार करा. त्यांनी यहोवाचे मार्गदर्शन न घेता गिबोनी लोकांसोबत शांतीचा करार केला. यहोवाने जरी सरतेशेवटी या कराराला मान्यता दिली असली, तरी यहोशवाने व इस्राएलच्या वडील जनांनी या बाबतीत आपले मार्गदर्शन घेतले नाही याचा अहवाल त्याने आज आपल्या फायद्यासाठी शास्त्रवचनांत नमूद केला आहे.—यहो. ९:३-६, १४, १५.

प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी संघर्ष करताना

१५. प्रलोभनाचा प्रतिकार करताना प्रार्थना करणे का महत्त्वाचे आहे?

१५ आपल्यामध्ये ‘पापाचा नियम’ असल्यामुळे, आपल्या पापपूर्ण प्रवृत्तींचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला जोरदार संघर्ष करण्याची गरज आहे. (रोम. ७:२१-२५) या संघर्षात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. कसे? प्रलोभनाचा प्रतिकार करण्यासाठी देवाला प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे येशूने आपल्या अनुयायांना सांगितले. (लूक २२:४० वाचा.) पण, देवाला प्रार्थना केल्यानंतरसुद्धा आपल्या मनात चुकीचे विचार किंवा भावना घोळत असतील, तर त्या परीक्षेवर मात करण्यासाठी आपण देवाजवळ बुद्धी ‘मागत राहावी, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो’ असे आश्‍वासन आपल्याला देण्यात आले आहे. (याको. १:५ NW) याकोब असेही म्हणतो: “तुम्हापैकी कोणी [आध्यात्मिक रीत्या] दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्‍वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील.”—याको. ५:१४, १५.

१६, १७. प्रलोभनाचा प्रतिकार करताना मदतीसाठी केव्हा प्रार्थना करणे सगळ्यात योग्य आहे?

१६ प्रलोभनाचा प्रतिकार करताना प्रार्थना करणे आवश्‍यक असले, तरी योग्य वेळी प्रार्थना करण्याचे भान आपण राखले पाहिजे. नीतिसूत्रे ७:६-२३ मध्ये उल्लेखिलेल्या तरुणाचे उदाहरण विचारात घ्या. ज्या रस्त्यावर एक अनैतिक स्त्री राहत असल्याचे अनेकांना माहीत आहे त्याच रस्त्याने दिवस मावळत असताना तो तरुण जाऊ लागतो. त्या स्त्रीच्या चातुर्याने व गोड बोलण्याने भाळला जाऊन, बैल कापला जाण्यासाठी जातो त्याप्रमाणे तो तिच्या मागे जातो. तो तरुण तेथे का गेला होता? कारण तो “बुद्धीहीन” म्हणजे अननुभवी होता; तो कदाचित चुकीच्या इच्छांशी झुंजत असावा. (नीति. ७:६-२३) तर मग, या प्रलोभनाचा प्रतिकार करण्यासाठी त्याने केव्हा प्रार्थना केली असती तर त्याला सर्वाधिक फायदा झाला असता? अर्थात, त्या स्त्रीशी बोलताना, त्याने केव्हाही प्रार्थना केली असती तर त्याला फायदा झाला असता. पण, त्याला पहिल्यांदा त्या रस्त्यावरून जाण्याचा मोह झाला त्याच वेळी त्याने प्रार्थना केली असती तर त्याला सर्वाधिक फायदा झाला असता.

१७ आज, एक व्यक्‍ती पोर्नोग्राफी पाहण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यासाठी कदाचित जिवापाड प्रयत्न करत असेल. पण, अमुक एका इंटरनेट साईटवर अश्‍लील चित्रे किंवा व्हीडिओ असल्याचे तिला माहीत असूनही ती त्या साईटवर गेली तर काय? असे करणे हे नीतिसूत्रे पुस्तकाच्या ७ व्या अध्यायात उल्लेखिलेल्या तरुणाने केले त्यासारखेच नाही का? असा मार्ग पत्करणे किती धोकेदायक ठरेल! तेव्हा, एका व्यक्‍तीला पोर्नोग्राफी पाहण्याच्या मोहाचा प्रतिकार करायचा असेल, तर तिने अशा इंटरनेट साईटवर गेल्यानंतर नव्हे, तर त्या साईटवर जाण्याचा तिला मोह होतो त्याच क्षणी देवाला प्रार्थना केली पाहिजे.

१८, १९. (क) प्रलोभनाचा प्रतिकार करणे कठीण का असू शकते, पण त्यावर तुम्ही यशस्वी रीत्या कशी मात करू शकता? (ख) तुम्ही काय करण्याचा दृढनिश्‍चय केला आहे?

१८ प्रलोभनांचा प्रतिकार करणे किंवा वाईट सवयी मोडणे सोपे नाही. प्रेषित पौलाने म्हटले: “देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे.” त्यामुळे, ‘जे काही आपण इच्छितो ते आपल्या हातून घडत नाही.’ (गलती. ५:१७) या आव्हानावर मात करण्यासाठी, आपल्या मनात पहिल्यांदा चुकीचे विचार येतात किंवा आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्याचा पहिल्यांदा मोह होतो तेव्हाच आपण देवाला कळकळून प्रार्थना केली पाहिजे, आणि मग त्या प्रार्थनेनुसार कार्य केले पाहिजे. हे आठवणीत ठेवा, की “मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही;” आणि यहोवाच्या मदतीने आपण त्याला विश्‍वासू राहू शकतो.—१ करिंथ. १०:१३.

१९ आपण एखाद्या कठीण प्रसंगाचा सामना करत असू, एखादा महत्त्वाचा निर्णय घेत असू किंवा प्रलोभनाचा प्रतिकार करत असू, आपली मदत करण्यासाठी यहोवाने आपल्याला एक अद्‌भुत देणगी दिली आहे; ती म्हणजे, प्रार्थना करण्याची अनमोल तरतूद. आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा आपण दाखवतो, की आपण त्याच्यावर विसंबून आहोत. तसेच, आपले मार्गदर्शन करण्यासाठी व आपल्याला बळ देण्यासाठी आपण देवाजवळ त्याचा पवित्र आत्माही मागत राहिले पाहिजे. (लूक ११:९-१३) तर मग, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहण्याऐवजी आपण यहोवावर भरवसा ठेवू या.

[तळटीप]

^ नावे बदलण्यात आली आहेत.

तुम्हाला आठवते का?

• यहोवावर भरवसा ठेवण्याच्या बाबतीत हिज्कीया, हन्‍ना व योना यांच्या उदाहरणांवरून तुम्ही काय शिकलात?

• निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे हे दावीद व यहोशवा यांच्या उदाहरणावरून कसे दिसून येते?

• प्रलोभनांचा प्रतिकार करताना आपण खासकरून केव्हा प्रार्थना केली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

प्रलोभनाचा प्रतिकार करताना केव्हा प्रार्थना करणे सगळ्यात फायदेकारक ठरेल?