व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन व शांती मिळवण्यासाठी, आत्म्यानुसार चाला

जीवन व शांती मिळवण्यासाठी, आत्म्यानुसार चाला

जीवन व शांती मिळवण्यासाठी, आत्म्यानुसार चाला

‘देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चाला.’—रोम. ८:४.

१, २. (क) वाहन चालवताना विकर्षित झाल्यामुळे कोणती गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे? (ख) आध्यात्मिक रीत्या विकर्षित झाल्यास कोणता धोका निर्माण होऊ शकतो?

 “वाहन चालवताना विकर्षित होणे ही समस्या एका साथीच्या रोगाप्रमाणे असून, ही समस्या दरवर्षी अधिकाधिक वाढत आहे,” असे अमेरिकेच्या वाहतूक विभागाच्या सचिवाने म्हटले. उदाहरणार्थ, गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर केल्याने चालकाचे लक्ष विचलित होऊ शकते. समोरून येणारा वाहनचालक मोबाईलचा वापर करत असल्यामुळे आपला अपघात झाला किंवा आपण अपघातातून थोडक्यात वाचलो, असे अनेकांनी एका सर्वेक्षणात म्हटले. गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्याने आपला बराच वेळ वाचतो असे एखाद्याला वाटत असले, तरी त्याचे परिणाम भयंकर असू शकतात.

आपल्या आध्यात्मिकतेच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. ज्याप्रमाणे, विकर्षित झालेला वाहनचालक सहसा धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष करतो, त्याचप्रमाणे आध्यात्मिक रीत्या विकर्षित झाल्यामुळे एक व्यक्‍ती सहजासहजी धोक्यात येऊ शकते. आपण आपल्या ख्रिस्ती जीवनक्रमापासून आणि आपल्या ईश्‍वरशासित जबाबदाऱ्‍यांपासून वाहवत गेलो, तर आपल्या विश्‍वासाचे तारू फुटू शकते. (१ तीम. १:१८, १९) प्रेषित पौलाने रोममधील आपल्या ख्रिस्ती बांधवांना सावधगिरीचा सल्ला दिला तेव्हा त्याने त्यांना या धोक्याविषयी इशारा दिला: “देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.” (रोम. ८:६) पौलाने असे म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? आणि आपण “देहस्वभावाचे चिंतन” करण्याचे कसे टाळू शकतो व “आत्म्याचे चिंतन” कसे करू शकतो?

त्यांना “दंडाज्ञा नाहीच”

३, ४. (क) पौलाने कोणत्या वैयक्‍तिक संघर्षाविषयी लिहिले? (ख) पौलाच्या स्थितीबद्दल आपल्याला आस्था का असली पाहिजे?

पौलाने रोमकरांना जे पत्र लिहिले त्यात त्याने, स्वतः अनुभवलेल्या एका संघर्षाविषयी अर्थात देह व मन यांच्यातील संघर्षाविषयी लिहिले. (रोमकर ७:२१-२३ वाचा.) पौलाने हे लिहिले तेव्हा तो आपल्या कृत्यांची सफाई देण्याचा प्रयत्न करत नव्हता किंवा स्वतःची कीवही करत नव्हता. जीवनात योग्य ते करणे त्याला अगदी अशक्य आहे असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. कारण, तो एक प्रौढ व आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिस्ती होता आणि त्याला “परराष्ट्रीयांचा प्रेषित” होण्यासाठी निवडण्यात आले होते. (रोम. १:१; ११:१३) तर मग, पौलाने आपल्या वैयक्‍तिक संघर्षाविषयी का लिहिले?

पौलाने आपल्या वैयक्‍तिक संघर्षाविषयी लिहिले तेव्हा तो प्रामाणिकपणे हे कबूल करत होता की त्याला जितक्या प्रमाणात देवाच्या इच्छेप्रमाणे करायचे होते ते तो स्वतःच्या बळावर करण्यास समर्थ नव्हता. तो का समर्थ नव्हता? त्याने म्हटले: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोम. ३:२३) पौल आदामाच्या वंशजांपैकी एक असल्यामुळे, तो अपरिपूर्ण होता आणि त्याच्यामध्येसुद्धा पापी प्रवृत्ती होती. आपण सर्व जण अपरिपूर्ण असल्यामुळे व आपल्यालाही दररोज अशाच संघर्षांचा सामना करावा लागत असल्यामुळे आपण पौलाची स्थिती समजू शकतो. शिवाय, आपले लक्ष विचलित करणारी व ‘जीवनाकडे जाणाऱ्‍या संकोचित मार्गावरून’ आपल्याला दूर नेणारी अनेक विकर्षणे आहेत. (मत्त. ७:१४) पण, पौलाची स्थिती आशाहीन नव्हती, आणि आज आपलीही स्थिती आशाहीन नाही.

५. पौलाला मदत व सुटका कोठून मिळाली?

पौलाने लिहिले: “मला . . . कोण सोडवील? आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोम. ७:२४, २५) नंतर, त्याने “ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना,” अर्थात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना उद्देशून लिहिले. (रोमकर ८:१, २ वाचा.) यहोवा या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आपल्या पवित्र आत्म्याद्वारे आपले पुत्र म्हणून दत्तक घेतो आणि त्यांना “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” बनवतो. (रोम. ८:१४-१७) देवाच्या आत्म्यामुळे व ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावरील त्यांच्या विश्‍वासामुळे, पौलाने वर्णन केलेल्या संघर्षात ते विजयी होतात. आणि त्यामुळे त्यांच्यावर “दंडाज्ञा” होत नाही. त्यांना “पाप व मरण ह्‍यांच्या नियमापासून” मुक्‍त करण्यात येते.

६. देवाच्या सर्व सेवकांनी पौलाच्या शब्दांकडे का लक्ष दिले पाहिजे?

पौलाने जे लिहिले ते अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना उद्देशून लिहिले होते. तरीसुद्धा, देवाच्या आत्म्याविषयी व ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाविषयी त्याने जे म्हटले त्याचा यहोवाच्या सर्व सेवकांना फायदा होऊ शकतो, मग त्यांना स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील जीवनाची. देवाने हा सल्ला अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना देण्यासाठी पौलाला प्रेरित केले असले, तरी त्याने जे लिहिले ते देवाच्या सर्व सेवकांनी समजून घेणे आणि त्यापासून फायदा घेण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

देवाने कशा प्रकारे “देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविली”?

७, ८. (क) कोणत्या अर्थी नियमशास्त्र “देहस्वभावामुळे दुर्बळ” होते? (ख) देवाने आपल्या आत्म्याद्वारे व आपल्या पुत्राच्या खंडणी बलिदानाद्वारे काय साध्य केले आहे?

रोमकरांस पत्राच्या ७ व्या अध्यायात पौलाने मान्य केले की अपरिपूर्ण मानव पापाच्या प्रभावाखाली आहेत. ८ व्या अध्यायात तो पवित्र आत्म्याच्या प्रभावाविषयी बोलला. ख्रिश्‍चनांना यहोवाच्या इच्छेनुसार जीवन जगता यावे व त्याची कृपापसंती प्राप्त करता यावी म्हणून पापाच्या प्रभावाविरुद्ध संघर्ष करण्यास देवाचा आत्मा कशा प्रकारे त्यांना मदत करू शकतो हे प्रेषित पौलाने स्पष्ट केले. पौलाने हे दाखवून दिले, की देवाने आपल्या आत्म्याद्वारे व आपल्या पुत्राच्या खंडणी बलिदानाद्वारे असे काहीतरी साध्य केले, जे मोशेचे नियमशास्त्र साध्य करू शकले नाही.

मोशेच्या नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे पालन करणे लोकांना शक्य नसल्यामुळे, नियमशास्त्राने पापी लोकांना दंडास पात्र ठरवले. शिवाय, नियमशास्त्राधीन सेवा करणारे इस्राएलचे महायाजक अपरिपूर्ण होते आणि त्यामुळे मानवजातीच्या पापाचे क्षालन करण्यासाठी ते बलिदान देऊ शकत नव्हते. त्याअर्थी, नियमशास्त्र “देहस्वभावामुळे दुर्बळ” होते. पण, ‘देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने पाठवण्याद्वारे’ व त्याचे खंडणी बलिदान देण्याद्वारे “देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविली.” अशा प्रकारे, ‘नियमशास्त्राला जे असाध्य’ होते ते देवाने साध्य केले. परिणामस्वरूप, येशूच्या खंडणी बलिदानावरील विश्‍वासाच्या आधारावर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना नीतिमान गणण्यात येते. त्यांना ‘देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालण्याचा’ आर्जव करण्यात आला आहे. (रोमकर ८:३, ४ वाचा.) पण, “जीवनाचा मुगूट” प्राप्त करण्यासाठी त्यांनी पृथ्वीवरील आपल्या जीवनक्रमाच्या अखेरपर्यंत विश्‍वासूपणे आत्म्यानुसार चालत राहिले पाहिजे.—प्रकटी. २:१०.

९. रोमकर ८:२ मध्ये वापरलेल्या “नियम” या शब्दाचा अर्थ काय आहे?

पौलाने ‘नियमशास्त्राचा’ उल्लेख केला तेव्हा त्याने ‘आत्म्याच्या नियमाचा’ आणि ‘पाप व मरण यांच्या नियमाचाही’ उल्लेख केला. (रोम. ८:२) हे नियम काय आहेत? या वचनातील “नियम” या शब्दासाठी असलेला ग्रीक शब्द, मोशेच्या नियमशास्त्रातील नियमांप्रमाणे विशिष्ट नियमांना सूचित करत नाही. तर, एका संदर्भग्रंथानुसार तो शब्द, लोक ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी करतात आणि ज्या गोष्टी एका कायद्याप्रमाणे त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात त्यास सूचित करतो. तसेच, लोक ज्या तत्त्वांनुसार जीवन जगण्याची निवड करतात त्यांसदेखील हा शब्द सूचित करू शकतो.

१०. आपण कशा प्रकारे पापाच्या व मृत्यूच्या नियमाधीन आहोत?

१० प्रेषित पौलाने लिहिले: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोम. ५:१२) आपण सर्व जण आदामाचे वंशज असल्यामुळे, आपण पापाच्या व मृत्यूच्या नियमाधीन आहोत. आपले पापी शरीर आपल्याला सतत, देवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी करण्यास प्रवृत्त करते आणि यामुळे शेवटी आपल्यावर मृत्यू ओढवतो. पौलाने गलतीकरांना लिहिलेल्या पत्रात अशा गोष्टींना व गुणलक्षणांना “देहाची कर्मे” म्हटले. त्याने पुढे म्हटले: “अशी कर्मे करणाऱ्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (गलती. ५:१९-२१) अशी कर्मे करणारे लोक देहस्वभावाप्रमाणे चालतात. (रोम. ८:४) ते आपल्या अपरिपूर्ण शरीराच्या इच्छेप्रमाणे करतात. पण, जारकर्म, मूर्तिपूजा किंवा भूतविद्या यांसारखे गंभीर पाप करणारे लोकच देहस्वभावाप्रमाणे चालतात का? नाही. कारण ईर्ष्या, राग, कलह आणि हेवा यांसारख्या गोष्टी केवळ व्यक्‍तिमत्त्वातील दोष आहेत असे काहींना वाटत असले, तरी त्यांचादेखील देहाच्या कर्मांमध्ये समावेश होतो. तेव्हा, आपल्या अपरिपूर्ण शरीराविरुद्ध आपल्याला संघर्ष करण्याची गरज नाही असा कधीच आपण विचार करू नये.

११, १२. आपण पापाच्या व मृत्यूच्या नियमातून मुक्‍त व्हावे म्हणून यहोवाने कोणती तरतूद केली आहे, आणि देवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

११ आपण पापाच्या व मृत्यूच्या नियमातून मुक्‍त व्हावे म्हणून यहोवाने जी तरतूद केली त्याबद्दल आपण किती आनंदी आहोत! येशूने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” देवावर आपले प्रेम आहे हे आपल्या जीवनक्रमावरून दाखवण्याद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवण्याद्वारे, पापामुळे मिळणाऱ्‍या दंडातून आपण मुक्‍त होऊ शकतो. (योहा. ३:१६-१८) त्यामुळे, आपणसुद्धा पौलाप्रमाणे म्हणण्यास प्रवृत्त होतो. त्याने म्हटले: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.”

१२ आपली परिस्थिती एका गंभीर आजारातून बरे होण्यासारखी आहे. आपल्याला जर आजारातून पूर्णपणे बरे व्हायचे असेल, तर आपण डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे केले पाहिजे. खंडणी बलिदानावर विश्‍वास प्रदर्शित केल्याने आपण पापाच्या व मृत्यूच्या नियमातून मुक्‍त होऊ शकत असलो, तरी आपण अजूनही अपरिपूर्ण व पापी आहोत. चांगले आध्यात्मिक आरोग्य प्राप्त करण्यासाठी आणि देवाची कृपापसंती व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणखीही काही करणे गरजेचे आहे. आपल्याला जर अपरिपूर्णतेच्या आजारातून बरे व्हायचे असेल, तर पौलाने म्हटल्याप्रमाणे आपण आत्म्यानुसार चालले पाहिजे.

आत्म्यानुसार चालणे—कसे?

१३. आत्म्यानुसार चालणे याचा काय अर्थ होतो?

१३ आपण चालत असतो, तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी पोहचण्यासाठी किंवा आपले ध्येय गाठण्यासाठी आपण त्या दिशेने वाटचाल करत असतो. त्याच प्रकारे, आत्म्यानुसार चालण्यासाठी आपण सतत आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे. (१ तीम. ४:१५) प्रगती करत असताना काही वेळा आपल्याकडून चुका झाल्या, तरी दररोज आत्म्यानुसार चालत राहण्याकरता आपण आपल्या परीने शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे. ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालल्याने’ आपण देवाची कृपापसंती प्राप्त करू शकतो.—गलती. ५:१६.

१४. जे “देहस्वभावाचे आहेत” त्यांच्या मनाचा कल कसा असतो?

१४ रोमकरांना लिहिलेल्या पत्रात, पौल नंतर दोन वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या लोकांविषयी बोलला. (रोमकर ८:५ वाचा.) या वचनात “दैहिक” असे जे म्हटले आहे ते आपल्या पापी स्वभावाला व अपरिपूर्णतेला सूचित करते. या स्वभावामुळे शरीर व मन यांच्यात संघर्ष होतो, ज्याचा याआधी पौलाने उल्लेख केला होता. पौलाने आपल्या देहस्वभावाविरुद्ध किंवा शारीरिक अपरिपूर्णतेविरुद्ध संघर्ष केला; पण जे “देहस्वभावाचे आहेत” ते हा संघर्ष करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत. देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो याचा विचार करण्याऐवजी आणि त्याने जी मदत पुरवली आहे ती स्वीकारण्याऐवजी, ते “दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात.” ते सहसा आपल्या शारीरिक किंवा भौतिक इच्छा पूर्ण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करतात. याच्या अगदी उलट, जे “आध्यात्मिक मार्गानुसारी” आहेत, ते आपले मन ‘आध्यात्मिक गोष्टींवर,’ म्हणजे यहोवाने केलेल्या तरतुदींवर व आपल्या ख्रिस्ती कार्यांवर केंद्रित करतात.

१५, १६. (क) एखाद्या गोष्टीवर चित्त लावल्यामुळे एका व्यक्‍तीच्या मनोवृत्तीवर कसा प्रभाव पडतो? (ख) आज बहुतेक लोकांच्या मनोवृत्तीबद्दल काय म्हणता येईल?

१५ रोमकर ८:६ वाचा. एखादी गोष्ट करण्यासाठी, मग ती गोष्ट चांगली असो अथवा वाईट, एका व्यक्‍तीला त्या गोष्टीवर चित्त किंवा मन लावावे लागते. जे लोक सतत दैहिक गोष्टींवर आपले चित्त लावतात, ते लवकरच अशी मनोवृत्ती विकसित करतात जी सर्वस्वी दैहिक गोष्टींवर केंद्रित असते. त्यांचे विचार, त्यांच्या भावना सहसा अशाच गोष्टींवर केंद्रित असतात.

१६ आज बहुतेक लोक कोणत्या गोष्टी करण्यात गुंतलेले आहेत? प्रेषित योहानाने लिहिले: “जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.” (१ योहा. २:१६) या ठिकाणी वासना असे जे म्हटले आहे त्यात स्वैराचार, प्रतिष्ठा, धनदौलत यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. अशा गोष्टींविषयीची भरमसाठ माहिती पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे, चित्रपट, टीव्हीवरील कार्यक्रम यांत, तसेच इंटरनेटवर दिली जाते. कारण, अशाच गोष्टींवर बहुतांश लोक आपले चित्त लावतात आणि अशाच गोष्टी त्यांना आवडतात. पण, “देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे,” म्हणजे आपण दैहिक गोष्टींवर आपले चित्त लावल्यास, आज आध्यात्मिक रीत्या आणि भविष्यात खऱ्‍या अर्थाने आपल्याला मरण येऊ शकते. का? “कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्‍न करिता येत नाही.”—रोम. ८:७, ८.

१७, १८. आपण आत्म्याचे चिंतन कसे करू शकतो, आणि असे केल्याने आपल्याला कोणते परिणाम मिळतील?

१७ याच्या अगदी उलट, “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे,” म्हणजे भविष्यात आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि आता आपण आंतरिक शांती अनुभवू शकतो व देवासोबत शांतीचा नातेसंबंध प्रस्थापित करू शकतो. तर मग, आपण “आत्म्याचे चिंतन” कसे करू शकतो? आत्म्याशी संबंधित गोष्टींवर नियमितपणे चित्त लावण्याद्वारे आणि स्वतःमध्ये आध्यात्मिक मनोवृत्ती विकसित करण्याद्वारे आपण आत्म्याचे चिंतन करू शकतो. आपण असे करतो, तेव्हा आपली चित्तवृत्ती “देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन” आणि देवाच्या विचारांशी सुसंगत असते. आपल्याला एखादी वाईट गोष्ट करण्याचा मोह होतो, तेव्हा काय करावे याबद्दल आपल्या मनात मुळीच शंका नसेल. आपल्याला आत्म्यानुसार योग्य ते करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.

१८ म्हणून, आपले मन आत्म्यानुसार असलेल्या गोष्टींवर लावणे अत्यंत आवश्‍यक आहे. हे आपण ‘आपली मनरूपी कंबर बांधण्याद्वारे,’ म्हणजे जीवनात आध्यात्मिक गोष्टींना पहिले स्थान देण्याद्वारे करतो. यात नियमितपणे प्रार्थना करणे, बायबलचे वाचन व अभ्यास करणे, सभांमध्ये उपस्थित राहणे आणि ख्रिस्ती सेवाकार्य करणे या गोष्टींचा समावेश होतो. (१ पेत्र १:१३) तेव्हा, दैहिक गोष्टींमुळे विकर्षित होण्याऐवजी, आपण आत्म्यानुसार असलेल्या गोष्टींवर आपले मन लावू या. असे करण्याद्वारे, आपण आत्म्यानुसार चालत राहू. यामुळे, आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील; कारण, आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.—गलती. ६:७, ८.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• नियमशास्त्राला काय ‘असाध्य’ होते, आणि देवाने त्यावर कशी मात केली?

• ‘पाप व मरण यांचा नियम’ काय आहे, आणि आपण त्यापासून कशा प्रकारे मुक्‍त होऊ शकतो?

• ‘आत्म्याचे चिंतन’ करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२, १३ पानांवरील चित्रे]

तुम्ही देहस्वभावानुसार चालता की आत्म्यानुसार चालता?