व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या दुष्ट जगात आपण “प्रवासी” आहोत

या दुष्ट जगात आपण “प्रवासी” आहोत

या दुष्ट जगात आपण “प्रवासी” आहोत

‘हे सर्व जण विश्‍वासात टिकून मेले; आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे त्यांनी पत्करले.’—इब्री ११:१३.

१. या जगासंबंधी आपल्या अनुयायांची भूमिका कशी असेल असे येशूने म्हटले?

 “ते जगात आहेत” असे येशूने आपल्या शिष्यांविषयी म्हटले. पण, त्याने पुढे असेही म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहा. १७:११, १४) यावरून, या दुष्ट जगासंबंधी—ज्याचा देव सैतान आहे—आपल्या अनुयायांची भूमिका काय असली पाहिजे हे येशूने स्पष्ट केले. (२ करिंथ. ४:४) ख्रिस्ताचे अनुयायी या दुष्ट जगात राहत असले, तरी ते या जगाचा भाग नाहीत. या जगातील त्यांची स्थिती “प्रवासी व परदेशवासी” यांसारखी आहे.—१ पेत्र २:११.

ते ‘प्रवाशांसारखे’ जगले

२, ३. हनोख, नोहा, अब्राहाम व सारा हे ‘परक्यांसारखे व प्रवाशांसारखे’ जगले असे का म्हणता येईल?

अगदी प्राचीन काळापासून, यहोवाचे विश्‍वासू सेवक ज्या दुष्ट जगात राहत होते त्या जगातील लोकांपेक्षा ते वेगळे होते. उदाहरणार्थ जलप्रलयापूर्वी, हनोख व नोहा हे दोघेही ‘देवाबरोबर चालले.’ (उत्प. ५:२२-२४; ६:९) त्या दोघांनी, सैतानाच्या दुष्ट जगावर यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश निर्भीडपणे घोषित केला. (२ पेत्र २:५; यहूदा १४, १५ वाचा.) एका अभक्‍त जगात राहत असूनसुद्धा ते देवाबरोबर चालले; त्यामुळे हनोखाविषयी म्हटले आहे की “तो देवाला संतोषवीत असे,” आणि नोहाविषयी म्हटले आहे, की तो “आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता.”—इब्री ११:५; उत्प. ६:९.

देवाच्या सांगण्यावरून अब्राहाम व सारा, खास्द्यांच्या ऊर शहरातील ऐशआरामाचे जीवन सोडून एका परक्या देशात भटक्यांसारखे खडतर जीवन जगण्यास तयार झाले. (उत्प. ११:२७, २८; १२:१) प्रेषित पौलाने लिहिले: “अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्‍वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताहि तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्‍वासाने जाऊन राहिला; त्याच वचनाचे सहभागी वारीस इसहाक व याकोब ह्‍यांच्याबरोबर डेऱ्‍यात त्याची वस्ती होती.” (इब्री ११:८, ९) यहोवाच्या अशा विश्‍वासू सेवकांविषयी पौलाने म्हटले: “हे सर्व जण विश्‍वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ति झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले.”—इब्री ११:१३.

इस्राएल लोकांना इशारा

४. देवाने दिलेल्या देशात राहायला जाण्यापूर्वी इस्राएल लोकांना कोणता इशारा देण्यात आला होता?

अब्राहामाचे वंशज असलेल्या इस्राएल लोकांची संख्या झपाट्याने वाढू लागली तेव्हा यहोवाने त्यांचे एक राष्ट्र तयार केले. त्याने त्यांना नियमशास्त्र दिले व राहण्यासाठी जमीन दिली. (उत्प. ४८:४; अनु. ६:१) या जमिनीचा खरा मालक यहोवा आहे ही गोष्ट इस्राएल लोकांनी केव्हाही विसरायची नव्हती. (लेवी. २५:२३) इस्राएल लोक त्या जमिनीवर भाडेकरू म्हणून राहत असल्यामुळे जमिनीच्या मालकाच्या सर्व अपेक्षांचे पालन करण्यास ते बाध्य होते. शिवाय, “मनुष्य केवळ भाकरीने” जगत नाही ही गोष्टदेखील त्यांनी लक्षात ठेवायची होती. भौतिक समृद्धीमुळे त्यांनी यहोवाला विसरून जायचे नव्हते. (अनु. ८:१-३) यहोवाने त्यांना जो देश राहायला दिला होता, तेथे राहायला जाण्यापूर्वी त्याने त्यांना असा इशारा दिला: “तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने तुझ्या पूर्वजांस म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्‍यांस जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत, तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुन वृक्ष हे सर्व तो तुला देईल; आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. ज्या परमेश्‍वराने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून, बाहेर काढिले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप.”—अनु. ६:१०-१२.

५. यहोवाने इस्राएल राष्ट्राला का नाकारले, आणि कोणत्या नवीन राष्ट्राला त्याने कृपापसंती दाखवली?

देवाने इस्राएल लोकांना जो इशारा दिला त्यामागे सबळ कारण होते. इस्राएल लोकांनी प्रतिज्ञात देशाचा ताबा घेतल्यानंतर काय घडले त्याविषयी नहेम्याच्या काळात, लेव्यांच्या एक गटाने खेदाने आठवून सांगितले. इस्राएल लोकांना राहायला आरामदायी घरे मिळाली व भरपूर अन्‍नधान्य मिळाले तेव्हा “ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले.” त्यांनी देवाविरुद्ध बंड केले, आणि त्यांना इशारा देण्यासाठी देवाने जे संदेष्टे पाठवले होते त्यांनाही त्यांनी जिवे मारले. त्यामुळे यहोवाने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले. (नहेम्या ९:२५-२७ वाचा; होशे. १३:६-९) पुढे रोमी वर्चस्वाखाली, अविश्‍वासू यहुद्यांनी प्रतिज्ञात मशिहाला जिवे मारण्याइतपत मजल मारली! त्यामुळे यहोवाने त्यांना नाकारले आणि त्यांच्याऐवजी एका नवीन राष्ट्राला अर्थात आध्यात्मिक इस्राएलला कृपापसंती दाखवली.—मत्त. २१:४३; प्रे. कृत्ये ७:५१, ५२; गलती. ६:१६.

“जगाचे नाही”

६, ७. (क) या जगासंबंधी आपल्या अनुयायांची भूमिका कशी असेल याविषयी येशूने जे म्हटले ते तुम्ही कसे स्पष्ट कराल? (ख) खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी सैतानाच्या जगाचे भाग का व्हायचे नव्हते?

या लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, ख्रिस्ती मंडळीचे मस्तक, येशू ख्रिस्त याने स्पष्टपणे सांगितले, की त्याचे अनुयायी सैतानाच्या दुष्ट जगापासून वेगळे असतील. येशूने आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी आपल्या शिष्यांना सांगितले: “तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते.”—योहा. १५:१९.

पुढे ख्रिस्ती धर्माचा विस्तार होत गेला, तेव्हा ख्रिश्‍चनांनी सैतानाच्या दुष्ट जगाशी स्वतःला जुळवून घ्यायचे होते का? दुसऱ्‍या शब्दांत, त्यांनी या जगाच्या चालीरीती स्वीकारून जगाचा भाग व्हायचे होते का? नाही. खरे ख्रिस्ती जगात कोठेही राहत असले, तरी त्यांनी स्वतःला सैतानाच्या जगापासून अलिप्त ठेवायचे होते. ख्रिस्ताच्या मृत्यूच्या काही ३० वर्षांनंतर प्रेषित पेत्राने रोमी जगताच्या निरनिराळ्या भागांत राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना असे लिहिले: “प्रियजनहो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहा त्या तुम्हास मी विनंती करितो की, जिवात्म्याबरोबर लढणाऱ्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा; परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा.”—१ पेत्र १:१, २; २:११, १२.

८. सैतानाच्या जगासंबंधी सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांची भूमिका काय होती याचे वर्णन एका इतिहासकाराने कसे केले आहे?

सुरुवातीचे ख्रिस्ती, रोमी जगतात “प्रवासी व परदेशवासी” म्हणून राहिले याची पुष्टी देताना इतिहासकार केनेथ स्कॉट लाटूरेट यांनी लिहिले: ‘ख्रिस्ती धर्माच्या पहिल्या तीन शतकांत, ख्रिश्‍चनांचा सातत्याने व अनेकदा क्रूरपणे छळ केला गेला हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्यावर निरनिराळ्या प्रकारचे आरोप लावण्यात आले. ख्रिस्ती लोक, मूर्तिपूजक विधींमध्ये सहभाग घेत नसल्यामुळे त्यांना नास्तिक म्हटले जायचे. ते सामाजिक जीवनातील बऱ्‍याचशा गोष्टींपासून म्हणजे मूर्तिपूजक विश्‍वासांनी, प्रथांनी व अनैतिक गोष्टींनी बरबटलेल्या मूर्तिपूजक सणांपासून व सार्वजनिक मनोरंजनापासून अलिप्त राहत असल्यामुळे मानवजातीचे वैरी म्हणून त्यांचा तिरस्कार केला जायचा.’

जगाचा उपयोग पूर्णपणे न करणे

९. खरे ख्रिस्ती या नात्याने आपण कसे दाखवून देतो, की आपण ‘मानवजातीचे वैरी’ नाहीत?

आज आपल्या काळाबद्दल काय म्हणता येईल? सध्याच्या दुष्ट जगासंबंधी आपलीही भूमिका सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांसारखीच आहे. (गलती. १:४) त्यामुळे, अनेक जण आपल्याबद्दल गैरसमज बाळगतात व काही जण आपला द्वेषही करतात. पण, आपण नक्कीच ‘मानवजातीचे वैरी’ नाहीत. उलट, सहमानवांवरील प्रेमापोटी आपण घरोघर जातो व प्रत्येक घरमालकाला देवाच्या ‘राज्याची सुवार्ता’ सांगण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. (मत्त. २२:३९; २४:१४) आपण असे का करतो? कारण आपल्याला खातरी आहे, की यहोवाचे राज्य—ज्याचा राजा ख्रिस्त आहे—लवकरच सर्व अपरिपूर्ण मानवी शासनांचा अंत करून एका नीतिमान नवीन जगाची स्थापना करेल.—दानी. २:४४; २ पेत्र ३:१३.

१०, ११. (क) आपण कशा प्रकारे या जगाचा मर्यादित उपयोग करतो? (ख) आध्यात्मिक रीत्या जागरूक असलेले ख्रिस्ती या जगाचा पूर्णपणे उपयोग करण्याचे कशा प्रकारे टाळतात?

१० या दुष्ट जगाचा अंत अगदी जवळ असल्यामुळे, यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला माहीत आहे की नाशाच्या मार्गावर असलेल्या या जगात एक स्थिरस्थावर जीवन जगण्याची ही वेळ नाही. उलट, आपण प्रेषित पौलाच्या शब्दांचे पालन करतो, ज्याने म्हटले: “बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्‍यासाठी की, . . . जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे; आणि जे ह्‍या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे; कारण ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे.” (१ करिंथ. ७:२९-३१) पण, आधुनिक काळातील ख्रिस्ती कशा प्रकारे जगाचा उपयोग करतात? सबंध जगभरात शेकडो भाषांमध्ये बायबलचे ज्ञान प्रसारित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व दळणवळण माध्यमांचा उपयोग करण्याद्वारे ते असे करतात. तसेच, आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी ते या जगाचा मर्यादित उपयोग करतात. ते जगात उपलब्ध असलेल्या जीवनावश्‍यक वस्तू विकत घेतात व सेवांचा फायदा घेतात. पण, असे करत असताना ते जगाचा पूर्णपणे उपयोग करत नाहीत, म्हणजे जीवनात ते भौतिक गोष्टींना व नोकरी-व्यवसायाला सर्वाधिक महत्त्व देत नाहीत.१ तीमथ्य ६:९, १० वाचा.

११ जे ख्रिस्ती आध्यात्मिक रीत्या जागरूक असतात ते उच्च शिक्षणाच्या बाबतीतही या जगाचा पूर्णपणे उपयोग करत नाहीत. जीवनात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व समृद्ध जीवन जगण्यासाठी उच्च शिक्षण अत्यावश्‍यक आहे असे जगातील अनेक लोकांचे मत आहे. पण, आपण या जगात प्रवासी म्हणून जीवन जगतो व वेगळी ध्येये गाठण्याचा प्रयत्न करतो. आपण ‘मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवत’ नाही. (रोम. १२:१६; यिर्म. ४५:५) येशूचे अनुयायी या नात्याने आपण त्याच्या पुढील इशाऱ्‍याचे पालन करतो: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) म्हणूनच, ख्रिस्ती तरुणांना आध्यात्मिक ध्येये गाठण्याचे प्रोत्साहन दिले जाते. आपल्या मूलभूत गरजा तृप्त करता येतील इतकेच शिक्षण घेत असताना त्यांनी “संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्‍तीने व संपूर्ण बुद्धीने” यहोवाची सेवा करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. (लूक १०:२७) असे केल्यास, ते “देवविषयक बाबतीत धनवान” होऊ शकतात.—लूक १२:२१; मत्तय ६:१९-२१ वाचा.

जीवनातील चिंतांमुळे खचून जाऊ नका

१२, १३. मत्तय ६:३१-३३ मधील येशूच्या शब्दांचे पालन केल्याने आपण जगातील लोकांपेक्षा वेगळे कसे दिसून येतो?

१२ भौतिक गोष्टींच्या बाबतीत, यहोवाच्या सेवकांची मनोवृत्ती जगातील लोकांपेक्षा वेगळी आहे. या बाबतीत येशूने आपल्या अनुयायांना सांगितले: “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्त. ६:३१-३३) आपला स्वर्गीय पिता, आपल्याला आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवतो हे आपल्या अनेक बंधुभगिनींनी व्यक्‍तिशः अनुभवले आहे.

१३ “चित्तसमाधानासह भक्‍ती हा तर मोठाच लाभ आहे.” (१ तीम. ६:६) हा दृष्टिकोन, जगातील लोकांच्या दृष्टिकोनापेक्षा अगदी वेगळा आहे. उदाहरणार्थ, तरुणांचे लग्न होते तेव्हा त्यांना सर्वकाही म्हणजे सर्व सुखसोयी असलेले घर किंवा फ्लॅट, एक छानशी कार आणि बाजारात आलेले सगळ्यात नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरण, अशा सर्व गोष्टी झटपट हव्या असतात. पण, या जगात प्रवासी म्हणून जीवन जगणारे ख्रिस्ती मात्र आपल्या इच्छांवर ताबा ठेवतात व आपल्या ऐपतीप्रमाणे जीवन जगतात. अनेक जण, राज्याचे आवेशी प्रचारक या नात्याने यहोवाच्या सेवेतील आपला सहभाग वाढवण्यासाठी ऐशआरामाच्या गोष्टींचा त्याग करतात ही खरोखर प्रशंसनीय गोष्ट आहे. इतर काही जण पायनियर सेवा करतात, बेथेलमध्ये सेवा करतात, प्रवासी कार्य करतात किंवा मिशनरी म्हणून सेवा करतात. आपले हे सहउपासक, मनापासून यहोवाची सेवा करतात याबद्दल आपल्याला त्यांची कदर वाटत नाही का?

१४. येशूने बी पेरणाऱ्‍याचा जो दाखला दिला त्यातून आपण कोणता धडा शिकू शकतो?

१४ येशूने बी पेरणाऱ्‍याचा जो दाखला दिला त्यात त्याने असे म्हटले, की “संसाराची चिंता व द्रव्याचा मोह” यांमुळे आपल्या अंतःकरणात पेरलेल्या देवाच्या वचनाची वाढ खुंटू शकते व आपण निष्फळ होऊ शकतो. (मत्त. १३:२२) पण, आपण जर या जगात प्रवाशांसारखे समाधानी जीवन जगलो, तर आपण या पाशात पडणार नाही. उलट, समाधानी जीवन जगल्यामुळे आपल्याला आपला डोळा “निर्दोष” ठेवण्यास म्हणजे देवाच्या राज्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास व राज्याशी संबंधित कार्यांना जीवनात प्राधान्य देण्यास मदत मिळेल.—मत्त. ६:२२.

‘जग नाहीसे होत आहे’

१५. या जगासंबंधी खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन काय असला पाहिजे असे प्रेषित योहानाने म्हटले?

१५ खरे ख्रिस्ती या नात्याने आपण या जगात “प्रवासी व परदेशवासी” आहोत असे आपण मानतो. याचे एक मूलभूत कारण म्हणजे सैतानाच्या जगाचा अंत अगदी जवळ आहे याबद्दल असलेला आपला विश्‍वास. (१ पेत्र २:११; २ पेत्र ३:७) आपल्या एकंदरित जीवनावरून म्हणजे जीवनातील आपले निर्णय, आपल्या आवडीनिवडी व आपली ध्येये यांवरून आपला हा विश्‍वास दिसून येतो. प्रेषित योहानाने आपल्या सहउपासकांना सल्ला दिला, की त्यांनी जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करू नये, कारण “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहा. २:१५-१७.

१६. आपण कसे दाखवू शकतो, की यहोवाने आपल्याला जगापासून वेगळे केले आहे?

१६ इस्राएल लोकांनी यहोवाच्या आज्ञा पाळल्या तर ते ‘सर्व लोकांपेक्षा त्याचे खास निधी’ बनतील असे त्याने त्यांना सांगितले होते. (निर्ग. १९:५) इस्राएल लोक देवाला विश्‍वासू होते तेव्हा त्यांची उपासना व जीवनशैली सभोवतालच्या राष्ट्रांपेक्षा वेगळी होती. त्याचप्रमाणे, आजसुद्धा यहोवाने स्वतःकरता लोक वेगळे केले आहेत, जे सैतानाच्या जगातील लोकांपेक्षा फार वेगळे आहेत. बायबल म्हणते: “धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्‍तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्‍तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्‍यासाठी की, त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्‍त करावे आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.” (तीत २:११-१४) येथे “लोक” असे जे म्हटले आहे ते अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आणि त्यांना साहाय्य करणाऱ्‍या व पाठबळ देणाऱ्‍या येशूच्या लक्षावधी ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ सूचित करते.—योहा. १०:१६.

१७. या दुष्ट जगात आपण प्रवासी म्हणून राहिलो याचा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना व त्यांच्या साथीदारांना कधीच पस्तावा का होणार नाही?

१७ स्वर्गात ख्रिस्तासोबत राज्य करणे ही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची ‘धन्य आशा’ आहे. (प्रकटी. ५:१०) दुसऱ्‍या मेंढरांना पृथ्वीवर अनंतकालिक जीवन मिळेल तेव्हा ते या दुष्ट जगात प्रवासी म्हणून राहणार नाहीत. त्यांना राहायला सुंदर घरे असतील व पृथ्वीवर भरपूर अन्‍नधान्य असेल. (स्तो. ३७:१०, ११; यश. २५:६; ६५:२१, २२) इस्राएल लोक देवाला विसरले त्याप्रमाणे ते देवाला विसरणार नाहीत; तर आपल्याजवळ जे सर्व काही आहे ते आपल्याला “सर्व पृथ्वीचा देव” यहोवा याच्याकडून मिळाले आहे हे ते कायम आठवणीत ठेवतील. (यश. ५४:५) या दुष्ट जगात आपण प्रवासी म्हणून राहिलो याचा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना व दुसऱ्‍या मेंढरांना कधीच पस्तावा होणार नाही.

तुमचे उत्तर काय असेल?

• प्राचीन काळातील देवाचे विश्‍वासू सेवक कशा प्रकारे प्रवाशांसारखे जगले?

• या दुष्ट जगासंबंधी सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन काय होता?

• खरे ख्रिस्ती कशा प्रकारे या जगाचा मर्यादित उपयोग करतात?

• आपण या दुष्ट जगात प्रवासी म्हणून राहिलो याचा आपल्याला कधीच पस्तावा का होणार नाही?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

सुरुवातीचे ख्रिस्ती त्यांच्या काळातील हिंसक व अनैतिक मनोरंजनापासून दूर राहिले