व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येहू खऱ्‍या उपासनेचा समर्थक

येहू खऱ्‍या उपासनेचा समर्थक

येहू खऱ्‍या उपासनेचा समर्थक

येहू खऱ्‍या उपासनेचा समर्थक होता. त्याने आपली भूमिका अतिशय उत्साहाने, त्वरित, अखंडपणे, आवेशाने व धैर्याने पार पाडली. येहूने दाखवलेल्या या गुणांचे आपणही अनुकरण करू शकतो.

इस्राएल राष्ट्राची आध्यात्मिक स्थिती अतिशय बिकट होती. आणि त्याच वेळेला येहूला यहोवाकडून एक कामगिरी मिळाली. देशभरात ईजबेल राणीचा दुष्ट प्रभाव होता. ईजबेल ही मरण पावलेल्या अहाब राजाची बायको होती आणि त्या वेळी राज्य करत असलेल्या योरामाची आई होती. यहोवाची उपासना करण्याऐवजी बआल दैवताची उपासना करा, असा ती लोकांवर दबाव आणत होती. शिवाय, तिने देवाच्या संदेष्ट्यांना ठार मारले होते आणि तिच्या ‘व्यभिचाराद्वारा व चेटक्यांद्वारा’ तिने लोकांना भ्रष्ट केले होते. (२ राजे ९:२२, पं.र.भा.; १ राजे १८:४, १३) त्यामुळे यहोवाने अहाब राजाच्या घराण्याचा तसेच योराम व ईजबेल यांचाही नाश करण्याचा हुकूम दिला. आणि या कामात नेतृत्व करण्यासाठी यहोवाने येहूला नियुक्‍त केले.

इस्राएली सैनिक रामोथ-गिलाद येथे अरामाच्या सैन्याबरोबर युद्ध लढत असताना, येहू सैन्याच्या सरदारांबरोबर बोलत बसला आहे, हा त्याच्याबद्दलचा सर्व प्रथम उल्लेख बायबलमध्ये आढळतो. येहूसुद्धा एक मोठा पदाधिकारी, कदाचित इस्राएली सैन्यात सेनापती असावा. संदेष्टा अलीशा याने संदेष्ट्यांच्या एका पुत्राला येहूकडे त्याचा राजा म्हणून अभिषेक करण्यासाठी व अहाब राजाच्या धर्मत्यागी घराण्यातील प्रत्येक पुरुषाची कत्तल करण्याच्या सूचना देण्यासाठी पाठवले.—२ राजे ८:२८; ९:१-१०.

येहूबरोबर असलेल्या अधिकाऱ्‍यांनी त्याला त्याच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा तो जरासा कचरला. पण या अधिकाऱ्‍यांनी जेव्हा त्याला खोदून खोदून विचारले तेव्हा येहूने त्यांना सत्य सांगितले आणि मग त्या सर्वांनी मिळून योरामाविरुद्ध कट रचला. (२ राजे ९:११-१४) नाहीतरी, राज्य करणाऱ्‍या कुटुंबाविरुद्ध आणि ईजबेलीच्या प्रभावाविरुद्ध लोकांच्या मनात राग खदखदत होताच; त्यांचा याला प्रतिकार होता. काहीही असो, येहूने मात्र त्याला सोपवलेली कामगिरी सुरळीतपणे पार पाडता यावी म्हणून चहूकडून माहिती मिळवली आणि बराच विचारही केला.

राजा योराम युद्धात घायाळ झाला होता आणि बरे होण्यासाठी तो इज्रेल या शहरात लपला होता. येहूला माहीत होते, की त्याच्या योजनेची खबर इज्रेलात पोहचली की त्याची योजना फसेल. म्हणून त्याने हुकूम दिला: “या नगरातून कोणालाहि इज्रेलास हे कळविण्यासाठी निसटून जाऊ देऊ नका.” (२ राजे ९:१४, १५) योरामाच्या बाजूने असलेले सैन्यदल कदाचित आपला काही प्रतिकार करतील हे त्याला माहीत असावे. म्हणूनच तो त्याच्या कार्यात कोणतेही विघ्न येणार नाही याची खबरदारी घेत होता.

कानात वारे शिरल्याप्रमाणे रथ हाकणे!

रामोथ-गिलाद आणि इज्रेलमधले ७२ किलोमीटरचे अंतर येहूने रथाने पार करण्याची त्वरा केली. तो शहराच्या दिशेने वेगाने येत असताना, एका बुरुजावर टेहळणी करत बसलेल्या एका पहारेकऱ्‍याला ‘येहूच्या सैन्यांची टोळी’ दिसली. (२ राजे ९:१७) असे दिसते, की येहूने आपल्यासोबत बऱ्‍याच सैनिकांना नेले होते जेणेकरून त्याचा उद्देश शंभर टक्के सफल होईल.

सुसाट्याने धावणाऱ्‍या एका रथात येहू आहे, हे त्या पहारेकऱ्‍याने पाहिले तेव्हा तो म्हणाला: “तो मोठ्या सपाट्याने रथ हाकीत आहे.” (२ राजे ९:२०) येहू जर नेहमीच इतक्या वेगाने रथ हाकत होता, तर मग, या प्रसंगी तो किती बेफामपणे रथ हाकत असावा!

तो जेव्हा शहरात पोहचला तेव्हा त्याच्या येण्याचे कारण विचारण्याकरता दोन दूतांना पुढे पाठवण्यात आले. पण त्याने त्यांना उत्तर देण्यास नकार दिला. येहू सरळ राजा योराम आणि योरामाचा मित्र यहुदाचा राजा अहज्या यांना भेटला. ते दोघेही आपापल्या रथात होते. योरामाने येहूला विचारले: “येहू, सर्व काही ठीक आहे ना?” त्यावर येहूने त्याला उत्तर दिले: “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार व गारुडे [“चेटके,” पं.र.भा.] यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार?” हे ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढला. पण येहूने त्याला गाठले. येहूने धनुष्य ओढून असा बाण मारला की तो त्याच्या छातीतून आर-पार झाला आणि योराम आपल्या रथातच कलंडून मरण पावला. हे सर्व होत असताना अहज्या कसा-बसा निसटला, पण येहूने त्यालाही शोधून काढून ठार मारले.—२ राजे ९:२२-२४, २७.

अहाबाच्या घराण्यातली दुष्ट राणी ईजबेल हिला आता ठार मारणे बाकी होते. येहूने तिला “शापित” असे जे संबोधले ते अगदी उचित होते. येहू जेव्हा इज्रेलमध्ये येत होता तेव्हा त्याने तिला तिच्या महालाच्या खिडकीतून खाली पाहत असल्याचे पाहिले. येहूने लगेचच, ईजबेलीला खिडकीतून खाली फेकण्याचा आदेश अधिकाऱ्‍यांना दिला. तिला त्यांनी खाली फेकल्यावर, इस्राएलला भ्रष्ट करणाऱ्‍या या स्त्रीचे शरीर येहूच्या घोड्यांनी तुडवले. यानंतर मग येहू दुष्ट राजा अहाब याच्या घराण्यातल्या इतर अनेक सदस्यांचे उच्चाटन करण्यास निघाला.—२ राजे ९:३०-३४; १०:१-१४.

आपल्याला रक्‍तपाताचा विचारही करायला आवडत नसला, तरी यहोवाने त्या काळी आपले न्यायदंड बजावण्यासाठी आपल्या सेवकांचा उपयोग केला हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. बायबलमध्ये म्हटले आहे: “अहज्याचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगति धरिली होती; अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्‍वराने येहू बिन निम्शी यास अभिषिक्‍त केले होते; त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन यहोरामाबरोबर निघाला होता.” (२ इति. २२:७) मेलेल्या योरामाला जेव्हा येहूने त्याच्या रथातून उचलून बाहेर फेकले तेव्हा त्याला, नाबोथाचा वध केल्याबद्दल अहाबाला शिक्षा मिळेल, असे यहोवाने जे वचन दिले होते ते पूर्ण झाल्याचे आठवले. शिवाय, ईजबेलीने ठार मारलेल्या ‘[देवाच्या] सेवकांचा सूड घेण्याची’ आज्ञा येहूला देण्यात आली होती.—२ राजे ९:७, २५, २६; १ राजे २१:१७-१९.

आज, यहोवाचा कोणताही सेवक खऱ्‍या उपासनेचा विरोध करणाऱ्‍यांविरुद्ध शारीरिक बळाचा उपयोग करत नाही. कारण देवाने म्हटले आहे: “सूड घेणे मजकडे आहे.” (इब्री १०:३०) पण, ख्रिस्ती मंडळीला दूषित करू शकणाऱ्‍या भ्रष्ट लोकांविरुद्ध मंडळीतल्या ख्रिस्ती वडिलांना येहूसारखे धैर्य दाखवून कार्य करावे लागेल. (१ करिंथ. ५:९-१३) आणि मंडळीतल्या सर्व सदस्यांनी, बहिष्कृत केलेल्या लोकांबरोबर सर्व प्रकारचा संबंध तोडण्याचा निश्‍चय केला पाहिजे.—२ योहा. ९-११.

येहूने यहोवाच्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला खपवून घेतले नाही

येहू हे सर्व का करत होता त्याचे कारण आपल्याला, विश्‍वासू योनादाब याला त्याने जे म्हटले त्यावरून कळते. तो त्याला म्हणाला: “मजबरोबर चल; परमेश्‍वराप्रीत्यर्थ मला किती उत्कट आस्था आहे ती पाहा.” दुसऱ्‍या शब्दांत, येहू त्याला म्हणत होता, की यहोवाच्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला मी खपवून घेणार नाही. योनादाबाने येहूचा हात धरला आणि तो त्याच्या रथात चढला व ते दोघेही शोमरोनात गेले. तेथे येहूने “बआलमूर्तींच्या सर्व उपासकांचा संहार करावा म्हणून” अतिशय चलाखीने एक युक्‍ती योजिली.—२ राजे १०:१५-१७, १९.

“बआलाप्रीत्यर्थ मला महायज्ञ करावयाचा आहे,” असे येहूने घोषित केले. (२ राजे १०:१८, १९) एका विद्वानाने या वचनावर भाष्य करताना म्हटले: “येहूने येथे, एक धूर्त शक्कल लढवली. त्याने वापरलेल्या ‘महायज्ञ’ या शब्दाचा अर्थ सहसा ‘अर्पण’ असा होत असला तरी, तो धर्मत्यागी लोकांची ‘कत्तल’ यालादेखील हा शब्द लागू होतो.” एकही बआल उपासक वाचू नये म्हणून येहूने त्या सर्वांना, बआलाच्या मंदिरात जमा केले आणि त्यांना विशिष्ट प्रकारचे वस्त्र परिधान करण्यास सांगितले. ‘होमबली अर्पिण्याचे संपल्या संपल्या’ येहूने ८० शस्त्रधारी सैनिकांना या बआल उपासकांची कत्तल करण्यास सांगितले. त्यानंतर बआलाचे ते मंदिर त्यांनी मोडून त्याचा पायखाना बनवला जेणेकरून कोणी ते पुन्हा उपासनेकरता वापरणार नाही.—२ राजे १०:२०-२७.

येहूने खरोखरच खूप लोकांची कत्तल केली. तरीपण, बायबलमध्ये त्याचे वर्णन, ईजबेल आणि तिचे कुटुंब यांच्या जुलूमी हुकूमशाहीपासून इस्राएल लोकांची मुक्‍तता करणारा धैर्यवान मनुष्य असे केले आहे. इस्राएलमध्ये जर कोणा नेत्याला खऱ्‍या उपासनेसाठी असे पाऊल उचलायचे होते तर त्याने धैर्यवान, निश्‍चयी आणि आवेशी असणे महत्त्वाचे होते. “हे काम अतिशय कठीण स्वरूपाचे होते. ते करण्यासाठी एखाद्याला पूर्णपणे निश्‍चयी असणे आवश्‍यक होते. याबाबतीत जर मवाळपणा दाखवण्यात आला असता तर इस्राएलमधून बआल उपासनेचे उच्चाटन कधीही झाले नसते,” असे एका बायबल शब्दकोशात म्हटले आहे.

आजही, खऱ्‍या ख्रिश्‍चनांसमोर येणाऱ्‍या परिस्थितींमध्ये त्यांना येहूसारखेच गुण दाखवणे आवश्‍यक आहे. जसे की, यहोवा निषेध करत असलेल्या कार्यात भाग घेण्याचा मोह आपल्याला होतो तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे? आपण, त्वरित आणि अगदी आवेशाने व धैर्याने कार्य केले पाहिजे. यहोवाची भक्‍ती करत असताना आपण यहोवाच्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला खपवून घेऊ नये.

यहोवाच्या नियमांनुसार चालत राहण्याची काळजी घ्या

या कथेच्या शेवटी जे घडते त्यावरून आपल्याला एक इशारा मिळतो. “बेथेल व दान येथे असलेली सोन्याची वासरे यांचा नाद येहूने सोडिला नाही.” (२ राजे १०:२९) एकेकाळी खऱ्‍या उपासनेसाठी तडफदार असलेला मनुष्य, मूर्तिपूजा कशी काय खपवून घेऊ लागला?

यहुदापासून स्वतंत्र झालेल्या इस्राएल राज्याने धार्मिक बाबतीतही वेगळे राहिले पाहिजे असे कदाचित येहूला वाटत असावे. म्हणूनच, इस्राएलमधील आधीच्या इतर राजांप्रमाणे त्यानेही वासराच्या उपासनेची सुरुवात करून लोकांना वेगळे ठेवले. पण यावरून, ज्याने त्याला राजा बनवले होते त्या यहोवा देवावर त्याचा अविश्‍वास असल्याचे दिसून येणार होते.

यहोवाने येहूची प्रशंसा केली कारण येहूने ‘परमेश्‍वराच्या दृष्टीने जे बरे ते केले.’ पण, “येहूने इस्राएलाचा देव परमेश्‍वर याच्या धर्मशास्त्राप्रमाणे चालण्याची पूर्ण मनाने खबरदारी घेतली नाही.” (२ राजे १०:३०, ३१) येहूने आधी ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्यांचा विचार केल्यावर आता तो कसा काय बदलला हे वाचून तुम्हाला कदाचित आश्‍चर्य आणि वाईटही वाटेल. पण यामध्ये आपल्यासाठी एक धडा आहे. यहोवाबरोबर माझा नातेसंबंध आहे, तेव्हा मला काही होणार नाही, असा आपण विचार करू शकत नाही. हा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आपण दररोज, त्याच्या वचनाचा अभ्यास, वाचलेल्या गोष्टींवर मनन व आपल्या स्वर्गीय पित्याला मनापासून प्रार्थना करून आपण त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यास्तव, पूर्ण मनाने यहोवाच्या नियमांनुसार चालण्याची आपण अतिशय खबरदारी घेतली पाहिजे.—१ करिंथ. १०:१२.

[४ पानांवरील चौकट]

ऐतिहासिक अहवालांमध्ये येहूचा उल्लेख

बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या व्यक्‍ती खरोखरच अस्तित्वात होत्या का यावर टीकाकार नेहमीच आक्षेप घेत आले आहेत. मग येहूबद्दल बायबलव्यतिरिक्‍त इतर पुरावे उपलब्ध आहेत का?

प्राचीन अश्‍शूरच्या निदान तीन दस्तऐवजांमध्ये इस्राएलच्या या राजाचा नावाने उल्लेख आढळतो. यांपैकी एका दस्तऐवजात, येहू किंवा त्याचा एखादा प्रतिनिधी अश्‍शूरी राजा शालमनेझ्झर तिसरा याला मुजरा करून नजराणा पेश करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. आणि त्या चित्राशेजारी जे लिहिले आहे ते असे आहे: “ओम्रीचा (हु-उम-री) पुत्र, येहू (आ-उ-आ) याच्याकडून नजराणा; मला त्याच्याकडून चांदी, सोने, एक सोन्याची साप्लू-वाटी, टोकदार तळ असलेली सोन्याची फुलदाणी, सोन्याचे पेले, सोन्याच्या बादल्या, भांडे, राजासाठी काठी, (आणि) लाकडी पुरुहटू [याचा अर्थ माहीत नाही] मिळाले.” येहू हा “ओम्रीचा पुत्र” नव्हता. पण, ओम्रीची कीर्ती व इस्राएलची राजधानी शोमरोन याचे त्याने बांधकाम केले होते हे दर्शवण्यासाठी, एका पाठोपाठ एक झालेल्या इस्राएलच्या राजांकरता या वाक्यांशाचा उपयोग करण्यात आला.

अश्‍शूरी राजाला येहूने नजराणा दिला होता, हे सिद्ध करता येत नाही. तरीपण हा राजा तीन वेळा येहूचा उल्लेख करतो—एका शिलालेखात, शालमनेझ्झरच्या पुतळ्यावर आणि अश्‍शूरी राजसी वर्षवृत्तात. हे सर्व पुरावे बघता, बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेली येहू नावाची व्यक्‍ती अस्तित्वात होती याबद्दल आपल्या मनात जराही शंका उरत नाही.