व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

येशू ख्रिस्ताला दिवसाच्या नेमक्या कोणत्या वेळी वधस्तंभावर खिळले होते हे ठरवणे शक्य आहे का?

येशूच्या मृत्युबद्दल मार्क व प्रेषित योहानाने जे प्रेरित अहवाल लिहिले आहेत, त्यांत विसंगती आहे असे भासत असल्यामुळे हा प्रश्‍न उद्‌भवतो. मार्कने लिहिले: “त्यांनी [शिपायांनी] त्याला वधस्तंभावर खिळिले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता.” (मार्क १५:२५) योहानाच्या वृत्तान्तानुसार, पिलाताने येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी यहुद्यांना सोपवले तेव्हा “सुमारे सहावा तास होता.” (योहा. १९:१४-१६) या दोन अहवालांमध्ये वाटणाऱ्‍या विसंगतीचे कारण समजावण्यासाठी बायबल टीकाकारांनी निरनिराळी स्पष्टीकरणे देण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही तफावत का आहे हे स्पष्ट करण्यासाठी बायबलमध्ये पुरेशी माहिती उपलब्ध नाही. तरीही, त्या काळात लोक वेळ कसा मोजायचे हे पाहिल्यास आपल्याला मदत मिळू शकते.

इसवी सनाच्या पहिल्या शतकात यहुदी लोक सूर्योदयापासून, दिवसाची १२ तासांत विभागणी करत होते. (योहा. ११:९) त्यामुळे ‘तिसरा तास’ सकाळच्या ८ वाजेपासून ९ वाजेपर्यंत असायचा आणि ‘सहावा तास’ दुपारी १२ च्या सुमारास संपायचा. अर्थात, वर्षभरात सूर्योदय व सूर्यास्त होण्याच्या वेळा बदलत असल्यामुळे ऋतुनुसार दिवसाची लांबीही बदलायची. शिवाय, त्या काळी लोक आकाशात सूर्य कोठे आहे हे पाहून वेळ ठरवायचे. त्यामुळे शास्त्रवचनांत उल्लेख केलेल्या वेळा अंदाजे होत्या. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत सर्वसामान्यपणे तिसऱ्‍या, सहाव्या, किंवा नवव्या तासाला घडलेल्या घटनांचा उल्लेख आढळतो; यांचा अर्थ सहसा, त्या वेळेच्या सुमारास असा होतो. (मत्त. २०:३, ५; प्रे. कृत्ये १०:३, ९, ३०) पण, एखादी घटना नेमकी कोणत्या वेळी घडली हे दाखवण्यासाठी त्या वेळेचा विशिष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे जसे की “सातव्या ताशी.”—योहा. ४:५२.

पृथ्वीवर येशूच्या शेवटल्या दिवशी घडलेल्या घटनांच्या वेळांबद्दल शुभवर्तमानांतील अहवालात सुसंगतता आहे. चारही अहवाल हे दाखवतात की सूर्योदय झाल्यावर याजक आणि वडीलजन एकत्र जमले आणि त्यांनी येशूला रोमी सुभेदार पंतय पिलात याच्याकडे नेले. (मत्त. २७:१; मार्क १५:१; लूक २२:६६; योहा. १८:२८) मत्तय, मार्क आणि लूक या सर्वांनी आपल्या अहवालात सांगितले की सहाव्या तासापासून—एव्हाना येशू वधस्तंभावर होता—“नवव्या तासापर्यंत” देशभरात अंधार पडला.—मत्त. २७:४५, ४६; मार्क १५:३३, ३४; लूक २३:४४.

येशूला वधस्तंभावर खिळण्याची वेळ ठरवताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, फटके मारणेदेखील वधस्तंभावर खिळण्याच्या प्रक्रियेचा एक भाग समजला जायचा. कधीकधी फटके मारण्याची शिक्षा इतकी भयंकर असायची की त्यातच माणसाचा मृत्यू व्हायचा. येशूच्या बाबतीतही ही शिक्षा अतिशय भयंकर असावी, कारण येशूने त्याचा वधस्तंभ काही अंतरापर्यंत उचलून नेल्यावर दुसऱ्‍या एका माणसाला तो उचलावा लागला. (लूक २३:२६; योहा. १९:१७) जर फटके मारण्याला वधस्तंभावर खिळण्याच्या प्रक्रियेची सुरुवात मानली जात असेल, तर मग तेव्हापासून वधस्तंभावर खिळेपर्यंत मधे काही वेळ गेला असेल. त्यामुळे, कदाचित एका लेखकाने फटके मारण्याच्या वेळेची तर दुसऱ्‍याने येशूला वधस्तंभावर खिळण्याच्या वेळेची नोंद घेतली असावी. यावरून, लेखकांनी येशूला वधस्तंभावर खिळण्याच्या वेगवेगळ्या वेळा का सांगितल्या हे स्पष्ट होऊ शकेल.

प्रेषित योहानाने हा अहवाल, इतर शुभवर्तमान लेखकांनी लिहिल्याच्या अनेक शतकांनतर लिहिला. त्यामुळे योहानाकडे इतरांचे अहवालदेखील संदर्भासाठी उपलब्ध होते. हे खरे आहे की योहानाने उल्लेख केलेली वेळ मार्कने सांगितलेल्या वेळेपेक्षा वेगळी भासते. पण हे दाखवून देते की योहानाने मार्कच्या अहवालाची नुसतीच नक्कल केली नाही. मार्क आणि योहान या दोघांनाही यहोवाकडून प्रेरणा मिळाली होती. या दोघांच्या अहवालांत विसंगती का आहे याबद्दल आपल्याकडे पुरेशी शास्त्रवचनीय माहिती उपलब्ध नसली, तरी आपण या अहवालांवर भरवसा ठेवू शकतो.