आजारपणामुळे आपला आनंद गमावू नका
आजारपणामुळे आपला आनंद गमावू नका
आजचा दिवस उगवण्यापूर्वीच संपावा, अशा विचाराने तुम्ही सकाळी उठता अशी कल्पना करा. तुम्हाला आणखी एक दिवस शारीरिक व भावनिक त्रास सहन करावा लागणार आहे. तुम्हाला कदाचित ईयोबासारखेदेखील वाटत असेल. त्याने म्हटले: “माझ्या या अस्थिपंजरापेक्षा मला मरण पुरवेल.” (ईयो. ७:१५) तुमचा त्रास कमी न होता वर्षानुवर्षे तसाच राहिला तर काय?
दाविदाचा मित्र असलेल्या योनाथानाचा मुलगा मफीबोशेथ याची स्थिती अशीच होती. तो पाच वर्षांचा होता तेव्हा तो “खाली पडून लंगडा झाला” होता. (२ शमु. ४:४) पुढे राजाचा विश्वासघात केल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला व त्याला त्याच्या संपत्तीस मुकावे लागले तेव्हा त्याला भावनिक त्रास झाला. त्यामुळे त्याला आपल्या शारीरिक दुर्बलतेचे दुःख सहन करणे आणखी कठीण झाले असेल. तरीसुद्धा, त्याने दुर्बलता, निंदा, आणि निराशा यांचा धीराने सामना केला व असे करत असताना त्याने आपला आनंद गमावला नाही आणि अशा प्रकारे त्याने एक उत्तम उदाहरण मांडले.—२ शमु. ९:६-१०; १६:१-४; १९:२४-३०.
या बाबतीत आणखी एक उदाहरण आहे पौलाचे. त्याने एकदा ‘शरीरातील एका काट्याविषयी’ लिहिले ज्याचा त्याला सामना करावा लागत होता. (२ करिंथ. १२:७) त्याने ज्या काट्याचा उल्लेख केला तो काटा कदाचित एखादी शारीरिक दुर्बलता असेल ज्याचा त्याला दीर्घकाळापासून त्रास होत होता, किंवा हा काटा कदाचित ते लोक असतील ज्यांनी त्याच्या प्रेषितपणाला आव्हान केले होते. ते काहीही असो, त्याची ही समस्या कायम राहिली व त्यामुळे होणाऱ्या शारीरिक व भावनिक दुःखाचा त्याला सामना करावा लागला.—२ करिंथ. १२:९, १०.
आज देवाच्या काही सेवकांना, कमजोर करणाऱ्या जुनाट आजारांचा किंवा भावनिक तणावाचा सामना करावा लागतो. वयाच्या १८ व्या वर्षी माग्डालेना नावाच्या एका बहिणीला सिस्टेमिक ल्यूपस एरिथीमाटोसस हा आजार असल्याचे निदान करण्यात आले. हा असा आजार आहे ज्यात शरीराची रोगप्रतिकार शक्तीच जणू शरीरातील अवयवांवर हल्ला करते. माग्डालेना म्हणते: “मला खूप भीती वाटली. माझी स्थिती दिवसेंदिवस बिघडत गेली आणि पचनक्रियेशी संबंधित विकारांमुळे, तोंडात फोड आल्यामुळे व थायरॉइडच्या समस्यांमुळे माझी स्थिती आणखीनच वाईट झाली.” दुसरीकडे, इझाबेला नावाच्या बहिणीला अशा एका आजाराशी झुंजावे लागते, ज्याची लक्षणे वरवर पाहिल्यास दिसत नाहीत. ती सांगते: “मला लहानपणापासूनच नैराश्याचा त्रास आहे. यामुळे मला एकाएकी खूप भीती वाटते, श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होतो आणि पोटात कळा येतात. यामुळे मी सहसा खूप थकून जाते.”
वास्तवाचा सामना करणे
आजारपणामुळे व अशक्तपणामुळे तुमचे जीवन पार बदलून जाऊ शकते. असे होते तेव्हा शांतपणे व प्रामाणिकपणे तुम्ही आपल्या स्थितीचा विचार केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या मर्यादा स्वीकारणे कदाचित सोपे नसेल. माग्डालेना म्हणते: “मला जो आजार आहे तो दिवसेंदिवस अधिक तीव्र होणारा आजार आहे. त्यामुळे मी बऱ्याचदा इतकी थकून जाते की मला बिछान्यातून उठावसंही वाटत नाही. माझ्या आजाराबद्दल आधीपासूनच काही सांगता येत नसल्यामुळे, पुढच्या योजना करणं खूप कठीण आहे. मी आधी यहोवाच्या सेवेत जितकं करायचे तितकं आता मला जमत नाही याचं मला सर्वात जास्त दुःख वाटतं.”
झ्बिगन्येव नावाचे बंधू सांगतात: “मला संधिवात असल्यामुळे, जसजशी वर्षे सरत जातात तसतशी माझ्यातील उर्जा कमी होत जाते आणि एकापाठोपाठ एक सांधे निकामी होतात. कधीकधी, सांधे इतके दुखतात की मी लहानसहान कामंदेखील करू शकत नाही. यामुळे मला हताश वाटतं.”
बार्बरा नावाच्या बहिणीच्या मेंदूत सतत वाढणारी गाठ असल्याचे काही वर्षांपूर्वी निदान करण्यात आले. ती म्हणते: “माझ्या शरीरात अचानक अनेक बदल झाले. मला उत्साही वाटत नाही, वारंवार माझं डोकं दुखतं आणि मी माझं मन एकाग्र करू शकत नाही. या नवीन समस्यांमुळे, मला सगळ्याच गोष्टींचा फेरविचार करावा लागला.”
हे सर्व जण यहोवाचे समर्पित सेवक आहेत. यहोवाच्या सेवेला ते जीवनात पहिले स्थान देतात. ते देवावर पूर्णपणे भरवसा ठेवतात आणि त्यांना त्याच्या आधाराचा फायदा होतो.—नीति. ३:५, ६.
यहोवा मदत करतो—कशी?
देव आपल्यावर खूश नाही त्यामुळेच आपल्याला त्रास होतो असा विचार करण्याचे आपण टाळले पाहिजे. (विलाप. ३:३३) ईयोब “सात्विक, सरळ” होता, तरी त्याला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला याचा विचार करा. (ईयो. १:८) वाईट गोष्टींद्वारे देव कोणाचीही परीक्षा घेत नाही. (याको. १:१३) आपल्याला होणारे सर्व आजार, मग ते जुनाट असोत अथवा भावनिक, आपल्या पहिल्या पालकांपासून म्हणजे आदाम आणि हव्वा यांच्यापासून आपल्याला वारशाने मिळाले आहेत.—रोम. ५:१२.
पण, जे नीतिमान आहेत त्यांना यहोवा व येशू निराधार सोडणार नाहीत. (स्तो. ३४:१५) खासकरून, जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा देव ‘आपला आश्रय, आपला दुर्ग’ आहे याची आपल्याला प्रचिती येते. (स्तो. ९१:२) तर मग, ज्या समस्येवर कोणताही सोपा उपाय नाही अशा समस्येचा सामना करत असताना कोणती गोष्ट तुम्हाला तुमचा आनंद टिकवून ठेवण्यासाठी मदत करू शकते?
प्रार्थना: प्राचीन काळातील देवाच्या सेवकांप्रमाणेच तुम्हीदेखील प्रार्थनेत आपला भार आपल्या स्वर्गातील पित्यावर टाकू शकता. (स्तो. ५५:२२) असे केल्याने, “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति” तुम्ही अनुभवू शकता. त्या आंतरिक शांतीमुळे ‘तुमच्या अंतःकरणाचे व तुमच्या विचारांचे’ रक्षण होईल. (फिलि. ४:६, ७) प्रार्थनेद्वारे देवावर भरवसा ठेवल्याने, दुर्बल करणाऱ्या आपल्या आजाराचा सामना करणे माग्डालेनाला शक्य होते. ती म्हणते: “यहोवाजवळ आपलं मन मोकळं केल्यानं मला बरं वाटतं व मला पुन्हा आनंदी वाटतं. दररोज देवावर भरवसा ठेवण्याचा खरोखर काय अर्थ होतो हे आता मला समजतं.”—२ करिंथ. १:३, ४.
तुम्ही यहोवाला प्रार्थना करता तेव्हा तो त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे आणि ख्रिस्ती बंधुभगिनींद्वारे तुम्हाला बळ देऊ शकतो. देवाने चमत्कारिक रीत्या तुमचे दुखणे दूर करावे अशी अपेक्षा तुम्ही करत नसला, तरी प्रत्येक समस्येचा सामना करण्यासाठी हवी असलेली बुद्धी व बळ तो तुम्हाला देईल असा भरवसा तुम्ही बाळगू शकता. (याको. १:५) देव तुम्हाला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देऊन तुम्हाला सबळ करू शकतो.—२ करिंथ. ४:७.
कुटुंब: घरात प्रेमळ व सहानुभूतिशील वातावरण असल्यास, आजाराचा धीराने सामना करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. पण त्याच वेळी हेही लक्षात ठेवा की तुमच्याप्रमाणेच तुमचे प्रियजनदेखील दुःखी असतात. तुम्हाला जसे असहाय वाटते, तसे त्यांनादेखील वाटू शकते. तरीसुद्धा, दुःखाच्या काळात तुमच्या मदतीसाठी ते तुमच्याजवळ असतात. तुम्ही सोबत मिळून प्रार्थना केल्यास, मन शांत ठेवण्यास तुम्हाला मदत मिळेल.—नीति. १४:३०.
बार्बरा आपल्या मुलीबद्दल व मंडळीतील इतर तरुण बहिणींबद्दल असे म्हणते: “त्या सेवाकार्यात मला मदत करतात. त्यांचा उत्साह पाहून मला खूप आनंद होतो.” झ्बिगन्येव यांना त्यांच्या पत्नीची मदत अनमोल वाटते. ते म्हणतात: “ती घरातील जवळजवळ सर्वच कामं करते. तसंच, ख्रिस्ती सभांना व सेवाकार्यात जाण्यासाठी तयार व्हायला ती मला मदत करते व माझी बॅगही तीच घेते.”
मंडळीतील बंधुभगिनी: आपण जेव्हा आपल्या बंधुभगिनींच्या सहवासात असतो, तेव्हा आपल्याला प्रोत्साहन व सांत्वन मिळते. पण, तुमच्या आजारामुळे तुम्हाला सभांना उपस्थित होता येत नसेल, तर काय? माग्डालेना म्हणते: “मला सभांचा फायदा व्हावा म्हणून मंडळी माझ्यासाठी सभांचा कार्यक्रम ध्वनिमुद्रित करते. मला मदत करण्यासाठी आणखी काय करता येईल याची विचारपूस करण्यासाठी माझे सहउपासक मला बरेचदा फोन करतात. ते मला प्रोत्साहनदायक पत्रदेखील लिहितात. ते माझी आठवण करतात आणि त्यांना माझ्या भल्याची काळजी आहे या विचारानं मला माझ्या आजाराचा सामना करण्यास मदत मिळते.”
नैराश्याचा सामना करत असलेली इझाबेला सांगते: “ख्रिस्ती मंडळीत मला अनेक ‘आया’ व ‘वडील’ आहेत, जे माझ्याबद्दल आस्था दाखवतात व मला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्यासाठी मंडळी एका कुटुंबाप्रमाणे आहे, जिथं मी शांती व आनंद अनुभवते.”
निरनिराळ्या परीक्षांचा सामना करणाऱ्यांनी इतरांपासून नीति. १८:१) यामुळे इतरांना खूप प्रोत्साहन मिळते. सुरुवातीला कदाचित इतरांना आपल्या गरजांविषयी सांगणे तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. पण, तुम्ही आपल्या गरजांबद्दल त्यांना मोकळेपणाने सांगितले तर त्यांना आनंद होईल. यामुळे त्यांना ‘निर्दंभ बंधुप्रेम’ दाखवण्याची संधी मिळेल. (१ पेत्र १:२२) तुम्हाला जर सभेला जाण्यासाठी मदतीची गरज असेल, कोणासोबत सेवाकार्यात जायचे असेल, किंवा कोणाजवळ आपले मन मोकळे करायचे असेल, तर तसे तुम्ही त्यांना सांगू शकता. अर्थात, त्यांनी तुम्हाला मदत केलीच पाहिजे अशी अपेक्षा करण्याऐवजी, ते करत असलेल्या मदतीची कदर करा.
कधीच ‘फटकून राहू’ नये. त्याऐवजी, त्यांनी मंडळीसोबतच्या आपल्या सहवासाला मौल्यवान समजले पाहिजे. (सकारात्मक दृष्टिकोन बाळगा: एखाद्या जुनाट आजाराशी झुंजत असताना, आपला आनंद टिकवून ठेवणे हे सहसा तुमच्याच हातात असते. उदास मनोवृत्तीचा व नाउमेदीच्या भावनांचा परिणाम नकारात्मक विचारसरणीत होऊ शकतो. बायबल म्हणते: “मनुष्याचे चित्त आपली व्याधि सहन करिते; पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल?”—नीति १८:१४.
माग्डालेना म्हणते: “मी माझं लक्ष माझ्या समस्यांवर केंद्रित न करण्याचा खूप प्रयत्न करते. मला ज्या दिवशी बरं वाटतं त्या दिवशी मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. अनेक वर्षं आजाराचा सामना करूनही देवाला विश्वासू राहिलेल्या लोकांच्या जीवनकथा वाचल्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं.” यहोवाचे आपल्यावर प्रेम आहे व तो आपली कदर करतो या विचाराने इझाबेलाला बळ मिळते. ती म्हणते: “यहोवाला मी हवी आहे असं मला वाटतं आणि मला त्याच्यासाठी जगावसं वाटतं. मला भविष्याबद्दल एक अद्भुत आशादेखील आहे.”
झ्बिगन्येव म्हणतात: “माझ्या आजारानं मला कठीण परिस्थितीत नम्र व आज्ञाधारक राहायला शिकवलं आहे. माझ्या आजारानं मला सुज्ञता व चांगली निर्णयशक्ती दाखवण्यास, तसंच इतरांना मनापासून क्षमा करायला शिकवलं. स्वतःची कीव न करता यहोवाची सेवा आनंदानं करण्यास मी शिकलो आहे. खरंतर, मला आध्यात्मिक प्रगती करत राहण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
हे लक्षात असू द्या की तुम्ही धीराने आपल्या आजाराचा सामना करत आहात याची यहोवा दखल घेतो. तुम्ही जे काही सहन करत आहात त्याबद्दल त्याला सहानुभूती वाटते आणि तो तुमची काळजी करतो. तो कधीही ‘तुमचे कार्य व तुम्ही त्याच्यावर दाखविलेली प्रीती विसरून जाणार’ नाही. (इब्री ६:१०) यहोवाचे भय बाळगणाऱ्यांना तो जे अभिवचन देतो त्यापासून तुम्ही प्रोत्साहन मिळवू शकता. तो म्हणतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्री १३:५.
तुम्हाला जर काही प्रसंगी निराश वाटले, तर नवीन जगात सदासर्वकाळ जीवन जगण्याच्या अद्भुत आशेवर आपले लक्ष केंद्रित करा. लवकरच ती वेळ येत आहे, जेव्हा तुम्ही पृथ्वीवर स्वतः आपल्या डोळ्यांनी देवाच्या राज्याचे आशीर्वाद पाहाल!
[२८, २९ पानांवरील चौकट/चित्रे]
जुनाट आजार असूनही ते प्रचार करत राहतात
“मला दिसत नसल्यामुळे मी एकटा कुठंही जाऊ शकत नाही, त्यामुळे माझी पत्नी किंवा इतर बंधुभगिनी माझ्यासोबत सेवाकार्यात जातात. मी काही सादरीकरणे व बायबलमधील वचनं तोंडपाठ करतो.”—येझी, अंधत्व आलेले एक बंधू.
“टेलिफोनद्वारे साक्षकार्य करण्यासोबतच मी पत्रही लिहिते व बायबलमध्ये आवड असलेल्या काही जणांशी नियमितपणे संपर्क साधते. मी इस्पितळात असते तेव्हा मी नेहमी माझ्या बिछान्याजवळ बायबल व बायबलवर आधारित इतर प्रकाशनं ठेवते. यामुळे, कितीतरी जणांसोबत चांगली चर्चा सुरू करण्यात मला मदत मिळाली आहे.”—माग्डालेना, जिला सिस्टेमिक ल्यूपस एरिथीमाटोसस हा आजार आहे.
“मला घरोघरच्या सेवाकार्यात भाग घ्यायला आवडतं, पण जेव्हा मला बरं वाटत नाही, तेव्हा मी टेलिफोनद्वारे साक्षकार्य करते.”—इझाबेला, जी नैराश्याने ग्रस्त आहे.
“मला पुनर्भेटी करायला व इतरांसोबत बायबल अभ्यासाला जायला आवडतं. ज्या दिवशी मला बरं वाटतं, त्या दिवशी मी घरोघरच्या साक्षकार्यात भाग घेते.”—बार्बरा, जिच्या मेंदूत गाठ आहे.
“मी नियतकालिकांची एक हलकी बॅग सोबत नेतो. माझे दुखणारे सांधे मला साथ देतात तोपर्यंत मी सेवाकार्य करतो.”—झ्बिगन्येव, संधिवाताचा रुग्ण.
[३० पानांवरील चित्र]
लहानमोठे सर्व जण इतरांना प्रोत्साहन देऊ शकतात