व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तो तुमच्याकरता चांगले उदाहरण आहे की वाईट?

तो तुमच्याकरता चांगले उदाहरण आहे की वाईट?

तो तुमच्याकरता चांगले उदाहरण आहे की वाईट?

‘याकोबाचा देव आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.’—यश. २:३.

१, २. बायबलमध्ये असलेल्या उदाहरणांपासून तुम्हाला कोणत्या मार्गांनी फायदा होऊ शकतो?

 बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींपासून तुम्हाला फायदा होऊ शकतो ही गोष्ट तुम्ही मान्य करणार नाही का? त्यात तुम्हाला अनेक विश्‍वासू स्त्री-पुरुषांची उदाहरणे सापडतील, ज्यांच्या जीवनक्रमाचे व गुणांचे अनुकरण करायला तुम्हाला आवडेल. (इब्री ११:३२-३४) पण, बायबलमध्ये असलेल्या अशाही काही स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांकडे तुम्ही लक्ष दिले असेल, ज्यांच्या कृत्यांचे व मनोवृत्तीचे अनुकरण करण्याचे तुम्ही आवर्जून टाळले पाहिजे.

खरेतर, बायबलमध्ये उल्लेख केलेल्या काही व्यक्‍तींनी चांगले व वाईट दोन्ही उदाहरण मांडले. आपण त्यांच्या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे व त्यांच्या वाईट उदाहरणाचे अनुकरण करण्याचे टाळले पाहिजे. दाविदाचाच विचार करा, जो एक नम्र मेंढपाळ होता व नंतर शक्‍तिशाली राजा बनला. सत्यावर प्रेम करण्याच्या बाबतीत व यहोवावर भरवसा ठेवण्याच्या बाबतीत त्याने चांगले उदाहरण मांडले. तरीसुद्धा, बथशेबा व उरीया यांच्या बाबतीत, तसेच इस्राएल लोकांची गणना करण्याच्या बाबतीत त्याने गंभीर पाप केले. पण, आपण त्याचा पुत्र शलमोन याच्यावर आपले लक्ष केंद्रित करू या; तो एक राजा होता व बायबल लिहिणाऱ्‍यांपैकी एक होता. त्याने कोणत्या दोन मार्गांनी चांगले उदाहरण मांडले त्याकडे आधी आपण लक्ष देऊ या.

शलमोनाची बुद्धी

३. शलमोनाने आपल्याकरता एक चांगले उदाहरण मांडले असे आपण का म्हणू शकतो?

थोर शलमोन अर्थात येशू ख्रिस्त, शलमोन राजाविषयी सकारात्मक रीतीने बोलला व त्याने त्याचे चांगले उदाहरण आपल्यासमोर सादर केले. येशूने शंका घेणाऱ्‍या काही यहुद्यांना असे म्हटले: “दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्‍या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकावयास पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.” (मत्त. १२:४२) होय, शलमोन आपल्या बुद्धीसाठी नावाजलेला होता आणि आपण बुद्धी प्राप्त करावी म्हणून त्याने आपल्याला आर्जव केला.

४, ५. शलमोनाला बुद्धी कोठून मिळाली, पण आपण कशा प्रकारे बुद्धी प्राप्त करू शकतो?

शलमोन राजाच्या शासनकाळाच्या सुरुवातीला देवाने त्याला स्वप्नात दर्शन दिले व त्याला एक वर मागण्यास सांगितले. आपल्याला कमी अनुभव आहे याची जाणीव बाळगून शलमोनाने देवाकडे बुद्धीसाठी विनंती केली. (१ राजे ३:५-९ वाचा.) शलमोनाने धनसंपत्ती व वैभव न मागता बुद्धीसाठी विनंती केली यावर देव खूश झाला आणि त्याने शलमोनाला “बुद्धिमान व विवेकी चित्त” दिले व सोबतच त्याला समृद्ध केले. (१ राजे ३:१०-१४) येशूने उल्लेख केल्याप्रमाणे, शलमोनाची बुद्धी इतकी उल्लेखनीय होती की शबाच्या राणीने त्याच्या बुद्धीविषयी ऐकले व स्वतः त्याच्या बुद्धीचा अनुभव घेण्यासाठी तिने खूप लांबचा प्रवास केला.—१ राजे १०:१, ४-९.

आपल्याला चमत्कारिक रीत्या बुद्धी मिळावी अशी अपेक्षा आपण करत नाही. शलमोनाने म्हटले की “ज्ञान [“बुद्धी,” NW] परमेश्‍वर देतो,” पण त्याने असेही लिहिले की देवाकडून हा गुण प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्याने लिहिले: ‘आपला कान ज्ञानाकडे दे, आणि आपले मन सुज्ञानाकडे दे.’ बुद्धी प्राप्त करण्याच्या संदर्भात त्याने, ‘हाक मार,’ ‘शोध कर’ व ‘उमगून काढ’ असे शब्द वापरले. (नीति. २:१-६) यावरून स्पष्ट होते की आपण बुद्धी प्राप्त करू शकतो.

६. बुद्धी प्राप्त करण्याच्या बाबतीत शलमोनाच्या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण केल्याचा आपल्याला फायदा होत आहे हे आपण कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?

तर मग, आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे की ‘शलमोनाप्रमाणे मीदेखील देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीला अनमोल समजतो का?’ जगातील आर्थिक स्थिती अनिश्‍चित असल्यामुळे काही जण आपल्या नोकरीवर व आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त झाले आहेत. तसेच, कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे व किती प्रमाणात घ्यावे हेदेखील लोक जगाची आर्थिक स्थिती पाहून ठरवतात. तुमच्याबद्दल व तुमच्या कुटुंबाबद्दल काय म्हणता येईल? तुम्ही जे निर्णय घेता त्यावरून तुम्ही देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीला खूप मौल्यवान समजता हे दिसून येते का? पैशाविषयी व शिक्षणाविषयी तुम्ही जो विचार करता त्यात फेरबदल केल्याने तुम्हाला आणखी बुद्धी प्राप्त करता येईल का? खरोखर, बुद्धी प्राप्त केल्याने व जीवनात बुद्धीचा वापर केल्याने तुम्हाला कायमचा फायदा होईल. शलमोनाने लिहिले: “धर्म, नीति व सात्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल.”—नीति. २:९.

खऱ्‍या उपासनेला उंचावल्याने शांती प्रस्थापित झाली

७. कशा प्रकारे देवासाठी एक भव्य मंदिर बांधण्यात आले?

शलमोनाने आपल्या शासनकाळाच्या सुरुवातीला, मोशेच्या दिवसांपासून वापरात असलेल्या निवासमंडपाच्या ठिकाणी एक भव्य मंदिर बांधण्यासाठी पावले उचलली. (१ राजे ६:१) आपण त्या मंदिराला शलमोनाचे मंदिर म्हणत असलो, तरी मंदिर बांधण्याची कल्पना ही मुळात त्याची नव्हती किंवा एक शिल्पकार म्हणून ख्याती प्राप्त करण्यासाठी अथवा आपण किती उदार आहोत हे दाखवण्यासाठी त्याने ते बांधले नव्हते. खरेतर, मंदिर बांधण्याची इच्छा सर्वात प्रथम दाविदाने व्यक्‍त केली होती. त्यावर, देवाने मंदिर बांधण्याविषयी व त्यातील सजावटीविषयी सर्व तपशील दाविदाला दिले. आणि मंदिराच्या बांधकामासाठी दाविदाने मोठ्या प्रमाणात दान दिले. (२ शमु. ७:२, १२, १३; १ इति. २२:१४-१६) असे असले, तरी मंदिर बांधण्याची जबाबदारी शलमोनावर आली आणि मंदिराच्या बांधकामासाठी साडेसात वर्षे लागली.—१ राजे ६:३७, ३८; ७:५१.

८, ९. (क) शलमोनाने आपल्यासाठी कोणते उत्तम उदाहरण मांडले? (ख) शलमोनाने खऱ्‍या उपासनेला उंचावल्यामुळे कोणते परिणाम घडून आले?

होय, चिकाटीने चांगली कार्ये करण्याच्या बाबतीत, तसेच सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीला प्राधान्य देण्याच्या बाबतीत शलमोनाने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडले. मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन कराराचा कोश त्यात ठेवण्यात आला तेव्हा शलमोनाने सर्व लोकसमुदायासमोर यहोवाला प्रार्थना केली. त्याने केलेल्या प्रार्थनेतील काही शब्द असे आहेत: “ज्या स्थानाविषयी तू म्हटले की माझे नाव तेथे राहील, त्या स्थानाकडे, म्हणजे त्या ह्‍या घराकडे तुझे डोळे रात्रंदिवस उघडे असावे; जी प्रार्थना तुझा सेवक या स्थानाकडे वळून करील ती ऐक.” (१ राजे ८:६, २९, पं.र.भा.) जे मंदिर देवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी बांधण्यात आले होते त्याकडे तोंड करून इस्राएल लोक व विदेशी लोक प्रार्थना करू शकत होते.—१ राजे ८:३०, ४१-४३, ६०.

शलमोनाने खऱ्‍या उपासनेला उंचावल्यामुळे कोणते परिणाम घडून आले? मंदिराच्या उद्‌घाटनाचा समारंभ संपल्यानंतर, ‘परमेश्‍वराने आपला सेवक दावीद व आपले लोक इस्राएल याजवर जो प्रसाद केला त्यामुळे लोकांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरित झाली.’ (१ राजे ८:६५, ६६) खरेतर, शलमोनाच्या ४० वर्षांच्या राजवटीत लोकांनी उल्लेखनीय शांती व समृद्धी अनुभवली. (१ राजे ४:२०, २१, २५ वाचा.) याचे रेखाटन ७२ व्या स्तोत्रात करण्यात आले आहे आणि थोर शलमोनाच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या शासनाखाली आपल्याला जे आशीर्वाद मिळतील त्याची पूर्वझलक या स्तोत्रातून मिळते.—स्तो. ७२:६-८, १६.

शलमोनाचे इशारेवजा उदाहरण

१०. शलमोनाने केलेल्या कोणत्या वाईट गोष्टीचा आपण सहसा विचार करतो?

१० पण, चांगल्या उदाहरणासोबतच शलमोन आपल्यासाठी एक इशारेवजा उदाहरण आहे असे आपण का म्हणू शकतो? तुम्ही सर्वात प्रथम कदाचित त्याच्या विदेशी पत्नींचा व उपपत्नींचा विचार कराल. बायबलमध्ये आपण असे वाचतो: “शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले; त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्‍वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.” (१ राजे ११:१-६) तुम्ही शलमोनाच्या निर्बुद्ध जीवनक्रमाचे अनुकरण न करण्याचा निर्धार केला आहे यात शंका नाही. पण, त्याच्या जीवनक्रमातून आपण हाच एक धडा घेऊ शकतो का? त्याच्या जीवनात अशाही काही गोष्टी घडल्या ज्यांकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्यातून तुम्ही कोणता धडा शिकू शकता ते पाहा.

११. शलमोनाच्या पहिल्या लग्नावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो?

११ शलमोनाने ४० वर्षे राज्य केले. (२ इति. ९:३०) तर मग, १ राजे १४:२१ (वाचा.) या वचनावरून तुम्ही कोणत्या निष्कर्षावर पोहचू शकता? या वचनानुसार, शलमोनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र रहबाम वयाच्या ४१ व्या वर्षी राजा बनला. ‘त्याच्या आईचे नाव नामा असून ती अम्मोनीण होती.’ याचा अर्थ, शलमोनाने राजा बनण्याआधी, मूर्तिपूजक शत्रू राष्ट्रातील एका विदेशी स्त्रीशी लग्न केले होते. (शास्ते १०:६; २ शमु. १०:६) ती स्त्री मूर्तिपूजक होती का? तिने जरी एके काळी मूर्तींची उपासना केली असली, तरी राहाब व रूथ यांच्याप्रमाणे तिने कदाचित मूर्तिपूजा करण्याचे सोडून दिले असेल व ती कदाचित यहोवाची उपासक बनली असेल. (रूथ १:१६; ४:१३-१७; मत्त. १:५, ६) असे असले, तरी त्या स्त्रीशी लग्न केल्यामुळे शलमोनाचे बहुधा अम्मोनी सासू-सासरे व इतर नातेवाईक होते जे यहोवाचे उपासक नव्हते.

१२, १३. शलमोनाने आपल्या शासनकाळाच्या सुरुवातीला कोणता चुकीचा निर्णय घेतला, आणि त्याने कसा तर्क केला असावा?

१२ शलमोन राजा बनला तेव्हा घटनांनी नक्कीच वाईट वळण घेतले. शलमोनाने “मिसर देशाचा राजा फारो याशी सोयरसंबंध केला; त्याने त्याच्या मुलीशी लग्न करून तिला दावीदपुरास आणिले.” (१ राजे ३:१) या इजिप्शियन स्त्रीने रूथप्रमाणे खरी उपासना स्वीकारली का? तिने असे केले याचा काहीच पुरावा नाही. उलट, शलमोनाने तिच्याकरता (आणि कदाचित तिच्या इजिप्शियन दासींकरता) दावीदपुराच्या बाहेर एक घर बांधले. का? कारण खोट्या दैवतांची उपासना करणारी व्यक्‍ती कराराच्या कोशाजवळ राहणे योग्य नाही असे बायबल म्हणते.—२ इति. ८:११.

१३ इजिप्तच्या राजकन्येशी लग्न केल्यामुळे आपल्याला राजनैतिकदृष्ट्या फायदा होईल असा कदाचित शलमोनाने विचार केला असेल. पण असे कारण सांगणे योग्य होते का? याच्या कितीतरी काळाआधी, देवाने इस्राएल लोकांना मूर्तिपूजक कनानी लोकांशी लग्न करण्यापासून मना केले होते, आणि त्याने काही राष्ट्रांची यादीही त्यांना दिली होती. (निर्ग. ३४:११-१६) या यादीत इजिप्तचे नाव नाही असा तर्क शलमोनाने केला असावा का? त्याने जरी तसा विचार केला असता, तरी तसा तर्क करणे योग्य ठरले असते का? यहोवाने इस्राएल लोकांना सांगितले होते की त्यांनी मूर्तिपूजक लोकांशी लग्न केल्यास ते त्यांना खऱ्‍या उपासनेपासून परावृत्त करतील. यहोवाने सांगितलेल्या या स्पष्ट धोक्याकडे शलमोनाने दुर्लक्ष केले.—अनुवाद ७:१-४ वाचा.

१४. शलमोनाच्या इशारेवजा उदाहरणाकडे लक्ष दिल्याने आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

१४ शलमोनाच्या या वाईट उदाहरणावरून आपण धडा घेऊ का? एक बहीण कदाचित, “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याविषयी देवाने दिलेल्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून सत्यात नसलेल्या व्यक्‍तीशी प्रेमसंबंध जोडेल आणि आपण असे का केले याविषयी कारणे सांगण्याचा प्रयत्न करेल. (१ करिंथ. ७:३९) अशीच कारणे सांगून, एखादा विद्यार्थी शाळेतील खेळांत भाग घेईल किंवा शाळेतील क्लबचा सदस्य बनेल; किंवा एखादी व्यक्‍ती कर चुकवण्यासाठी आपल्या मिळकतीविषयी खोटी माहिती देईल; किंवा एखाद्या लज्जास्पद कृत्याविषयी विचारल्यास एक व्यक्‍ती कदाचित खोटे बोलेल. सांगायचा मुद्दा हा आहे, की शलमोनाने देवाची आज्ञा न मानण्याची कारणे सांगितली, आणि तोच धोका आज आपल्यासमोरही आहे.

१५. यहोवाने शलमोनाशी व्यवहार करताना कशा प्रकारे दया दाखवली, पण आपण त्याविषयी काय लक्षात ठेवले पाहिजे?

१५ लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे शलमोनाने त्या विदेशी राजकन्येशी लग्न केल्याचा उल्लेख केल्यावर बायबल सांगते की शलमोनाने देवाकडे बुद्धीसाठी केलेली विनंती देवाने मान्य केली आणि त्यासोबतच त्याला धनसंपत्तीही दिली. (१ राजे ३:१०-१३) शलमोनाने देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले होते, तरी यहोवाने लगेच त्याला राजा म्हणून नाकारल्याचे किंवा त्याला ताडन केल्याचे बायबलमध्ये सांगितलेले नाही. याचे कारण, अपरिपूर्ण मानव मातीपासून बनलेले आहेत याची देवाला जाणीव आहे. (स्तो. १०३:१०, १३, १४) पण ही गोष्ट लक्षात ठेवा: आपल्या कृत्यांचे आता किंवा भविष्यात वाईट परिणाम होऊ शकतात.

इतक्या साऱ्‍या पत्नी!

१६. अनेक स्त्रियांशी लग्न करण्याद्वारे शलमोन कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होता?

१६ शलमोन राजाने गीतरत्न यात एका कुमारिकेची प्रशंसा करत म्हटले की ती ६० राण्यांपेक्षा आणि ८० उपपत्नींपेक्षा सुंदर आहे. (गीत. ६:१, ८-१०) शलमोनाने असे म्हटले त्या वेळी कदाचित त्याच्या इतक्या पत्नी व उपपत्नी असाव्यात. त्यांच्यापैकी बहुतेक किंवा सगळ्याच यहोवाची उपासना करणाऱ्‍या असल्या, तरी देवाने मोशेच्या द्वारे अशी आज्ञा दिली होती की इस्राएलच्या राजाने “पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे.” (अनु. १७:१७) पण, या वेळीसुद्धा यहोवाने शलमोनाला लगेच नाकारले नाही. खरेतर, बायबलमधील गीतरत्न या पुस्तकाची रचना करण्यासाठी देवाने शलमोनाचा उपयोग केला आणि अशा प्रकारे त्याला आशीर्वाद दिले.

१७. आपण कोणत्या वास्तविकतेकडे दुर्लक्ष करू नये?

१७ तर मग, यातून असे सूचित होते का की शलमोन देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करू शकत होता व त्याबद्दल त्याला कोणताही दंड मिळणार नव्हता? आणि आपणही तसेच करू शकतो का? नाही. उलट, यातून सूचित होते की काही काळाकरता देव वाईट गोष्टी सहन करतो. पण, एखाद्या व्यक्‍तीने देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले व त्याचे दुष्परिणाम तिला लगेच भोगावे लागले नाही, तर याचा अर्थ भविष्यात तिला कोणतेच वाईट परिणाम भोगावे लागणार नाहीत असा होत नाही. शलमोनाने काय लिहिले होते ते आठवा: “दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.” त्याने पुढे म्हटले: “माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल.”—उप. ८:११, १२.

१८. गलतीकर ६:७ मध्ये जे सांगितले आहे ते खरे असल्याचे शलमोनाच्या उदाहरणावरून कसे दिसून येते?

१८ या गोष्टीकडे शलमोनाने सतत लक्ष दिले असते तर किती बरे झाले असते! त्याने अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या व देवाने त्याला अनेक आशीर्वाद दिले होते. पण कालांतराने, त्याने एकापाठोपाठ एक चुकीची पावले उचलली. अशा प्रकारे, यहोवाच्या आज्ञा न मानण्याची त्याला सवय लागली. प्रेषित पौलाने नंतर देवाच्या प्रेरणेने जे लिहिले ते किती खरे आहे: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलती. ६:७) कालांतराने, शलमोनाला देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करण्याचे दुःखद परिणाम भोगावे लागले. बायबल म्हणते: “शलमोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी व हित्ती राष्ट्रांतल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला; व त्यांतल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले.” (१ राजे ११:१) यांच्यापैकी अनेक स्त्रिया बहुधा खोट्या दैवतांची उपासना करत राहिल्या, आणि याचा शलमोनावरदेखील परिणाम झाला. तो देवापासून दूर गेला आणि त्याने आपल्या सहनशील देवाची कृपापसंती गमावली.—१ राजे ११:४-८ वाचा.

त्याच्या चांगल्या व वाईट उदाहरणावरून शिका

१९. बायबलमध्ये अनेक चांगली उदाहरणे आहेत असे तुम्ही का म्हणू शकता?

१९ यहोवाने पौलाला असे लिहिण्याची प्रेरणा दिली: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रांत पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोम. १५:४) देवाच्या वचनात, उल्लेखनीय विश्‍वास दाखवलेल्या अनेक स्त्री-पुरुषांची चांगली उदाहरणे आहेत. म्हणूनच, पौल म्हणू शकला: “आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे, ह्‍यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्‍वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरले, अभिवचने मिळविली, . . . ते दुर्बळांचे सबळ झाले.” (इब्री ११:३२-३४) शास्त्रवचनांत असलेल्या चांगल्या उदाहरणांपासून आपण बरेच काही शिकू शकतो व त्यांचे अनुकरण करू शकतो; किंबहुना आपण तसे केलेच पाहिजे.

२०, २१. देवाच्या वचनात असलेल्या इशारेवजा उदाहरणांपासून बोध घेण्याचा दृढनिश्‍चय तुम्ही का केला आहे?

२० पण, बायबलच्या काही वृत्तान्तांत इशारेवजा उदाहरणेदेखील आहेत. यांपैकी काही उदाहरणे अशा स्त्री-पुरुषांची आहेत ज्यांना एके काळी यहोवाची मान्यता होती व ज्यांचा यहोवाने उपयोग केला होता. आपण बायबल वाचतो, तेव्हा देवाचे काही लोक केव्हा व कशा प्रकारे देवापासून दूर गेले आणि त्यांनी कशा प्रकारे वाईट उदाहरण मांडले या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ शकतो. आपल्या लक्षात येईल की काहींनी हळूहळू चुकीची मनोवृत्ती विकसित केली, ज्यामुळे कालांतराने त्यांना दुःखद परिणाम भोगावे लागले. अशा वृत्तान्तांतून आपण बोध कसा घेऊ शकतो? आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘त्या व्यक्‍तीमध्ये ही मनोवृत्ती कशी विकसित झाली? तशी मनोवृत्ती माझ्यामध्येसुद्धा निर्माण होऊ शकते का? असे माझ्यासोबत होऊ नये म्हणून मी काय करू शकतो आणि या उदाहरणापासून मी कोणता धडा शिकू शकतो?’

२१ बायबलमधील या उदाहरणांचा आपण नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे, कारण पौलाने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “ह्‍या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.”—१ करिंथ. १०:११.

तुम्ही काय शिकलात?

• बायबलमध्ये चांगली व वाईट अशी दोन्ही उदाहरणे का आढळतात?

• शलमोनाला देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करण्याची वाईट सवय कशी लागली?

• शलमोनाच्या वाईट उदाहरणावरून तुम्ही बोध कसा घेऊ शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

शलमोनाने देवाकडून मिळालेल्या बुद्धीचा उपयोग केला

[१२ पानांवरील चित्रे]

शलमोनाच्या इशारेवजा उदाहरणापासून तुम्ही बोध घेत आहात का?