व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार का चालावे?

देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार का चालावे?

देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार का चालावे?

“तू माझा देव आहेस; तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो.”—स्तो. १४३:१०.

१. एक अदृश्‍य शक्‍ती एका व्यक्‍तीला मार्ग कसा दाखवू शकते याचे उदाहरण द्या.

 मार्ग शोधण्यासाठी तुम्ही कधी कंपासचा (होकायंत्र) वापर केला आहे का? कंपास हे दिशा दाखवणारे एक साधे उपकरण आहे. त्यात एक चुंबकीय सुई असते जी नेहमी उत्तर दिशा दाखवते. ही सुई, चुंबकत्व म्हटल्या जाणाऱ्‍या एका अदृश्‍य शक्‍तीमुळे हलते. शतकानुशतके, लोकांनी जमिनीवरून व समुद्रावरून प्रवास करताना आपला मार्ग शोधण्यासाठी कंपासचा वापर केला आहे.

२, ३. (क) यहोवाने असंख्य युगांपूर्वी कोणत्या सामर्थ्यशाली शक्‍तीचा उपयोग केला? (ख) देवाची क्रियाशील शक्‍ती आज आपले मार्गदर्शन करू शकते असे आपण का म्हणू शकतो?

आपले मार्गदर्शन करण्यासाठी याहून महत्त्वाची आणखी एक अदृश्‍य शक्‍ती आहे. ती कोणती शक्‍ती आहे? बायबलच्या सुरुवातीच्या वचनांत तिचे वर्णन केले आहे. यहोवाने असंख्य युगांपूर्वी जे साध्य केले त्याविषयी उत्पत्तिच्या पुस्तकात असे लिहिले आहे: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” असे करत असताना, त्याने त्याची सामर्थ्यशाली शक्‍ती पाठवली. निर्मितीचा वृत्तान्त पुढे असे म्हणतो, “देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.” (उत्प. १:१, २) देव कोणत्या शक्‍तीचा उपयोग करत होता? त्याच्या पवित्र आत्म्याचा, जी त्याची क्रियाशील शक्‍ती आहे. यहोवाने सर्व काही निर्माण करण्यासाठी व आपल्याला जीवन देण्यासाठी आपल्या पवित्र आत्म्याचा उपयोग केला याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!—ईयो. ३३:४; स्तो. १०४:३०.

यहोवाने आपल्याला निर्माण करण्यासाठी त्याच्या पवित्र आत्म्याचा उपयोग केला हे आपल्याला माहीत आहे. पण, देवाची ही क्रियाशील शक्‍ती आपल्या जीवनावर आणखीनही प्रभाव पाडू शकते का? होय पाडू शकते. खुद्द देवाच्या पुत्राने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “आत्मा . . . तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.” (योहा. १६:१३) हा आत्मा काय आहे हे आपल्याला कसे समजेल आणि आपण या आत्म्यानुसार का चालले पाहिजे?

पवित्र आत्मा काय आहे?

४, ५. (क) त्रैक्यावर विश्‍वास करणारे लोक पवित्र आत्म्याविषयी कोणता चुकीचा विचार करतात? (ख) पवित्र आत्मा खरोखर काय आहे हे तुम्ही कसे स्पष्ट कराल?

सेवाकार्यात आपल्याला असे काही लोक भेटतात जे पवित्र आत्म्याविषयी अशास्त्रीय दृष्टिकोन बाळगतात. त्रैक्यावर विश्‍वास करणारे लोक असा चुकीचा विचार करतात की पवित्र आत्मा एक आत्मिक व्यक्‍ती असून तो देव पित्याच्या बरोबरीचा आहे. (१ करिंथ. ८:६) पण, खरेतर त्रैक्याची शिकवण ही बायबलवर आधारित नाही.

तर मग, पवित्र आत्मा खरोखर काय आहे? न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—विथ रेफरेन्सेस या इंग्रजी बायबल भाषांतरात, उत्पत्ति १:२ या वचनाच्या तळटिपेत असे म्हटले आहे: “बायबलमध्ये, रूआख [हा इब्री शब्द] केवळ ‘आत्मा’ यासाठीच नव्हे, तर ‘वारा’ यासाठी व अशा अर्थाच्या इतर शब्दांसाठीदेखील वापरण्यात आला आहे, ज्यांचा अर्थ अदृश्‍य क्रियाशील शक्‍ती असा होतो.” (उत्प. १:२; ३:८; ८:१) ज्याप्रमाणे वारा अदृश्‍य असला, तरी त्याचे परिणाम दिसून येतात, त्याचप्रमाणे पवित्र आत्मासुद्धा अदृश्‍य असला, तरी तो परिणाम घडवून आणू शकतो. पण, पवित्र आत्मा ही व्यक्‍ती नाही; तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकांवर किंवा वस्तूंवर प्रक्षेपित केलेली किंवा कार्य करणारी देवाची शक्‍ती आहे. या अद्‌भुत शक्‍तीचा स्रोत सर्वशक्‍तिमान देव आहे यावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे का? मुळीच नाही!—यशया ४०:१२, १३ वाचा.

६. दाविदाने यहोवाला कोणती खास विनंती केली?

जीवनात आपले मार्गदर्शन करण्यासाठी आजही यहोवा त्याच्या आत्म्याचा उपयोग करतो का? यहोवाने स्तोत्रकर्त्या दाविदाला असे अभिवचन दिले: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन.” (स्तो. ३२:८) पवित्र आत्म्याच्या या मार्गदर्शनाची दाविदाला गरज होती का? नक्कीच होती, कारण त्याने यहोवाला अशी विनंती केली: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस; तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो.” (स्तो. १४३:१०) दाविदाप्रमाणे, आपल्यालासुद्धा देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्याची इच्छा असली पाहिजे व ते मार्गदर्शन स्वीकारण्यास आपण तयार असले पाहिजे. का? याच्या चार कारणांची आपण चर्चा करू या.

आपण स्वतःचे मार्गदर्शन करू शकत नाही

७, ८. (क) आपण देवाच्या मदतीशिवाय स्वतःचे मार्गदर्शन का करू शकत नाही? (ख) या दुष्ट जगात आपण स्वतःचे मार्गदर्शन करण्याचे धाडस का करू नये याचे उदाहरण द्या?

देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्यास आपण का इच्छुक असले पाहिजे याचे पहिले कारण म्हणजे आपल्यामध्ये स्वतःचे मार्गदर्शन करण्याची क्षमता नाही. “मार्गदर्शन करणे” म्हणजे एखाद्याला “दिशा किंवा वाट दाखवणे.” परंतु, यहोवाने आपल्याला आपले स्वतःचे मार्गदर्शन करण्याची क्षमता दिली नाही. आणि अपरिपूर्ण असल्यामुळे आपण स्वतःचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडून अनेक चुका होतात. यहोवाचा संदेष्टा यिर्मया याने असे लिहिले: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्म. १०:२३) का नाही? स्वतःचे मार्गदर्शन करण्यात आपण कमी का पडतो याबद्दल देवाने दिलेले स्पष्टीकरण यिर्मयाने ऐकले. यहोवाने म्हटले: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?”—यिर्म. १७:९; मत्त. १५:१९.

अनुभव नसलेल्या एका व्यक्‍तीने, कुशल गाईडची मदत न घेता व सगळ्यात मुख्य म्हणजे सोबत कंपास न घेता एका अनोळखी, घनदाट जंगलात एकट्याने भटकंती करायला जाणे अविचारीपणाचे ठरणार नाही का? जंगलातील खडतर परिस्थितींचा सामना कसा करावा याची माहिती नसल्यामुळे व इच्छित स्थळी सुखरूप पोचण्याचा मार्ग माहीत नसल्यामुळे त्या व्यक्‍तीचे जीवन धोक्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे, या दुष्ट जगात आपण देवाच्या मदतीशिवाय स्वतःचे मार्गदर्शन करू शकतो असा विचार करणारी व्यक्‍तीदेखील आपले जीवन मोठ्या धोक्यात घालते. या दुष्ट जगात यशस्वी रीत्या वाटचाल करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दाविदाप्रमाणे यहोवाला प्रार्थनापूर्वक विनंती करणे. त्याने अशी विनंती केली: “माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत.” (स्तो. १७:५; २३:३) अशा प्रकारचे मार्गदर्शन मिळवणे कसे शक्य आहे?

९. पृष्ठ १७ वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे, देवाचा आत्मा आपले मार्गदर्शन कसे करू शकतो?

आपण नम्र असलो व यहोवावर अवलंबून राहण्यास तयार असलो, तर आपले मार्गदर्शन करण्यासाठी तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देईल. ही क्रियाशील शक्‍ती आपल्याला कशी मदत करू शकेल? याचे स्पष्टीकरण येशूने आपल्या शिष्यांना दिले. त्याने म्हटले: “ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल.” (योहा. १४:२६) आपण नियमितपणे व प्रार्थनापूर्वक देवाच्या वचनाचा व त्यासोबतच ख्रिस्ताच्या सर्व शिकवणींचा अभ्यास केला तर देवाच्या गहन बुद्धीची अधिक समज प्राप्त करण्यास व देवाच्या आज्ञांचे पालन करण्यास पवित्र आत्मा आपल्याला साहाय्य करेल. (१ करिंथ. २:१०) इतकेच नव्हे, तर जीवनात काही अनपेक्षित गोष्टी घडल्या तर काय करावे हे समजण्यासही पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल. अशा वेळी, आपण जी बायबल तत्त्वे शिकलो त्याची आठवण करून देण्यास आणि उत्तम निर्णय घेण्यासाठी आपण ही तत्त्वे कशी लागू करू शकतो हे समजण्यास पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल.

येशू आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालला

१०, ११. पवित्र आत्म्यासंबंधी देवाच्या एकुलत्या एका पुत्राची काय अपेक्षा होती, आणि त्याने काय अनुभवले?

१० देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्यास आपण का इच्छुक असले पाहिजे याचे दुसरे कारण म्हणजे देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राचे पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन केले. पृथ्वीवर येण्याआधी देवाच्या एकुलत्या एका पुत्राला पुढील भविष्यवाणी माहीत होती: “परमेश्‍वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्‍वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील.” (यश. ११:२) येशूचे पृथ्वीवरील जीवन खूप खडतर असणार होते. त्यामुळे, देवाच्या आत्म्याची मदत मिळवण्यास येशू किती उत्सुक होता याची कल्पना करा!

११ यहोवाचे शब्द खरे ठरले. येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेच काय घडले याविषयी शुभवर्तमानातील अहवाल म्हणतो: “येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले.” (लूक ४:१) येशू रानात उपवास, प्रार्थना व मनन करत असताना यहोवाने बहुधा त्याला मार्गदर्शक सूचना दिल्या असाव्यात व पुढे जे काही घडणार होते त्यासाठी त्याच्या मनाची तयारी केली असावी. देवाची क्रियाशील शक्‍ती येशूच्या मनावर व हृदयावर कार्य करत होती; तसेच त्याच्या विचारसरणीचे व निर्णयांचे मार्गदर्शन करत होती. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत काय करावे हे येशूला माहीत होते आणि त्याच्याविषयी त्याच्या पित्याची जी इच्छा होती ती त्याने तंतोतंत पूर्ण केली.

१२. देवाच्या आत्म्याने आपले मार्गदर्शन करावे म्हणून प्रार्थना करणे का आवश्‍यक आहे?

१२ देवाचा आत्मा किती परिणामकारक आहे हे येशूने स्वतः आपल्या जीवनात अनुभवले होते. त्यामुळे त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्मा मागण्याचे व त्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचे प्रोत्साहन दिले. (लूक ११:९-१३ वाचा.) असे करणे आज इतके महत्त्वाचे का आहे? कारण पवित्र आत्मा आपली विचारसरणी बदलण्यास व ख्रिस्ताचे मन धारण करण्यास आपल्याला मदत करू शकतो. (रोम. १२:२; १ करिंथ. २:१६) देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगल्याने आपण ख्रिस्ताप्रमाणे विचार करू शकतो व त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो.—१ पेत्र २:२१.

जगाचा आत्मा आपल्याला बहकवू शकतो

१३. या जगाचा आत्मा काय आहे आणि हा आत्मा काय उत्पन्‍न करतो?

१३ देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्यास आपण का इच्छुक असले पाहिजे याचे तिसरे कारण म्हणजे आज पुष्कळ लोकांत जो अपवित्र आत्मा काम करत आहे तो आपल्याला बहकवू शकतो. या जगाचा आत्मा शक्‍तीशाली व प्रभावशाली असून आपल्यात पवित्र आत्मा जे उत्पन्‍न करतो त्याच्याविरुद्ध कार्य करण्यास तो आपल्या प्रवृत्त करतो. ख्रिस्ताचे मन जोपासण्याचे उत्तेजन देण्याऐवजी, या जगाचा आत्मा, लोकांच्या विचारसरणीवर आणि त्यांच्या कृत्यांवर प्रभाव पाडून त्यांना या युगाचा अधिपती सैतान याच्यासारखे बनवतो. (इफिसकर २:१-३; तीत ३:३ वाचा.) एक व्यक्‍ती जगाच्या आत्म्याच्या आहारी जाते व देहाची कर्मे करते, तेव्हा याचा परिणाम फार वाईट होतो. अशा व्यक्‍तीला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.—गलती. ५:१९-२१.

१४, १५. आपण या दुष्ट जगाच्या आत्म्याचा यशस्वी रीत्या प्रतिकार कसा करू शकतो?

१४ जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाने आपल्याला सुसज्ज केले आहे. प्रेषित पौलाने असे म्हटले: ‘तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.’ (इफिस. ६:१०, १३) सैतान आपल्याला बहकवण्याचा प्रयत्न करतो; पण, त्याचा विरोध करण्यास यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला शक्‍ती देतो. (प्रकटी. १२:९) या जगाचा आत्मा शक्‍तीशाली असल्यामुळे आपण तो पूर्णपणे टाळू शकत नाही. पण, आपण नक्कीच त्याचा प्रतिकार करू शकतो. कारण, पवित्र आत्मा जगाच्या आत्म्यापेक्षा खूप शक्‍तीशाली आहे आणि तो आपली मदत करेल.

१५ पहिल्या शतकात ज्यांनी ख्रिस्ती धर्माचा त्याग केला त्यांच्याविषयी प्रेषित पेत्राने असे लिहिले: “ते सरळ मार्ग सोडून बहकले.” (२ पेत्र २:१५) “आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे,” याबद्दल आपण किती आभारी असले पाहिजे! (१ करिंथ. २:१२) या आत्म्याच्या मदतीने व आपण आध्यात्मिकदृष्ट्या योग्य मार्गावर राहावे म्हणून यहोवाने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा पूर्ण फायदा घेतल्याने आपण सैतानाच्या दुष्ट जगाच्या आत्म्याचा यशस्वी रीत्या प्रतिकार करू शकतो.—गलती. ५:१६.

पवित्र आत्मा आपल्यात चांगले फळ उत्पन्‍न करतो

१६. पवित्र आत्मा आपल्यात कोणते फळ उत्पन्‍न करू शकतो?

१६ देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्यास आपण का इच्छुक असले पाहिजे याचे चौथे कारण म्हणजे हा आत्मा आपल्यात उत्कृष्ट फळ उत्पन्‍न करतो. (गलतीकर ५:२२, २३ वाचा.) आपल्यापैकी कोणाला अधिक प्रेमळ, आनंदी आणि शांतीपूर्ण बनण्याची इच्छा नाही? आपल्यापैकी कोणाला मोठ्या प्रमाणात सहनशीलता, ममता आणि चांगुलपणा विकसित करायला आवडणार नाही? आपल्यापैकी कोणाला अधिक विश्‍वास, सौम्यता आणि इंद्रियदमन विकसित केल्याचा फायदा होणार नाही? देवाचा आत्मा आपल्यात असे चांगले गुण उत्पन्‍न करतो ज्यांमुळे आपल्याला, आपल्या कौटुंबिक सदस्यांना व आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींना फायदा होतो. आपल्याला आत्म्याच्या फळाची किती गरज आहे व आपण ते किती प्रमाणात उत्पन्‍न करावे याला मर्यादा नसल्यामुळे आत्म्याचे फळ विकसित करण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे.

१७. जीवनात आत्म्याचे फळ प्रदर्शित करण्यासाठी आपण अधिक प्रयत्न कसे करू शकतो?

१७ आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालत आहोत व आत्म्याचे फळ उत्पन्‍न करत आहोत हे आपल्या शब्दांवरून व कार्यांवरून दिसते का याचे परीक्षण करणे सुज्ञपणाचे आहे. (२ करिंथ. १३:५क; गलती. ५:२५) आपल्याला आत्म्याच्या फळाचा एखादा पैलू विकसित करण्याची गरज आहे असे वाटत असल्यास, असे गुण उत्पन्‍न करण्यासाठी आपण पवित्र आत्म्यासोबत अधिक मोठ्या प्रमाणात सहकार्य करू शकतो. बायबलचा व आपल्या ख्रिस्ती प्रकाशनांचा उपयोग करून प्रत्येक पैलूचा अभ्यास करण्याद्वारे आपण असे करू शकतो. असे केल्यामुळे आपण आपल्या रोजच्या जीवनात आत्म्याचे फळ कसे दाखवू शकतो हे आपल्याला समजेल. त्यानंतर आत्म्याचे फळ अधिक मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचा आपण सतत प्रयत्न करू शकतो. * पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालल्यामुळे आपल्या व आपल्या बंधुभगिनींच्या जीवनात जे चांगले परिणाम घडले ते आपण पाहतो तेव्हा आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची किती गरज आहे हे आपल्याला समजते.

तुम्ही देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारता का?

१८. देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारण्याच्या बाबतीत येशूने उत्तम उदाहरण कसे मांडले?

१८ भौतिक विश्‍वाची निर्मिती करण्यात येशूने देवाचा “कुशल कारागीर” या नात्याने कार्य केले होते. त्यामुळे, लोकांना प्रवास करताना पृथ्वीचे जे चुंबकीय क्षेत्र उपयुक्‍त ठरते त्याविषयी येशूला सर्वकाही माहीत होते. (नीति. ८:३०; योहा. १:३) पण, पृथ्वीवर असताना आपला मार्ग शोधण्यासाठी येशूने या शक्‍तीचा उपयोग केला असे बायबलमध्ये सांगितलेले नाही. पण बायबल हे नक्कीच सांगते की येशू मनुष्य या नात्याने पृथ्वीवर होता तेव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने त्याच्या जीवनावर जबरदस्त प्रभाव पाडला. आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्यास तो इच्छुक होता. आत्म्याने त्याला एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त केले तेव्हा त्याने आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारून त्यानुसार कार्य केले. (मार्क १:१२, १३; लूक ४:१४) येशूप्रमाणे तुम्हीसुद्धा देवाच्या आत्म्याला तुमचे मार्गदर्शन करू देता का?

१९. पवित्र आत्म्याने आपले मार्गदर्शन करावे म्हणून आपण काय केले पाहिजे?

१९ जे देवाचे मार्गदर्शन स्वीकारण्यास इच्छुक आहेत अशांना प्रवृत्त करण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी देवाची क्रियाशील शक्‍ती आजही त्यांच्या मनावर आणि हृदयावर कार्य करते. त्या शक्‍तीने तुमचे मार्गदर्शन करावे असे वाटत असल्यास तुम्ही काय केले पाहिजे? यहोवाने तुम्हाला त्याचा आत्मा द्यावा व तुम्ही आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारावे म्हणून सतत यहोवाला प्रार्थना करा. (इफिसकर ३:१४-१६ वाचा.) आपल्या प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करा. असे करण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेल्या देवाच्या वचनाचा अर्थात बायबलचा अभ्यास करा. (२ तीम. ३:१६, १७) त्यात दिलेल्या सुज्ञ सल्ल्याचे पालन करा आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला उत्सुकतेने प्रतिसाद द्या. या दुष्ट जगात, यहोवा आपले योग्य मार्गदर्शन करू शकतो यावर विश्‍वास ठेवून कार्य करा.

[तळटीप]

^ प्रत्येक पैलूच्या अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज, १ ऑगस्ट २००७, पृष्ठे १६-१९ आणि १५ एप्रिल २०११, पृष्ठे १८-२७ पाहा.

तुम्हाला मुख्य मुद्दे समजले का?

• पवित्र आत्मा आपल्या जीवनावर प्रभाव कसा पाडू शकतो?

• कोणत्या चार कारणांमुळे आपण देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्यास इच्छुक असले पाहिजे?

• पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

देवाच्या आत्म्याने येशूच्या जीवनावर जबरदस्त प्रभाव पाडला

[१७ पानांवरील चित्र]

लोकांना प्रवृत्त करण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी देवाचा आत्मा त्यांच्या मनावर आणि हृदयावर कार्य करतो