व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित—पहिल्या शतकात आणि आज

देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित—पहिल्या शतकात आणि आज

देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित—पहिल्या शतकात आणि आज

“ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करितो.”—१ करिंथ. १२:११.

१. या लेखात आपण कोणत्या गोष्टींची चर्चा करणार आहोत?

 पेन्टेकॉस्ट. हा एक शब्द त्या दिवशी घडलेल्या रोमांचक घटनांची आपल्याला आठवण करून देतो. (प्रे. कृत्ये २:१-४) पहिल्या शतकात त्या प्रसंगी पवित्र आत्म्याचा वर्षाव करण्यात आला आणि तेव्हापासून देव आपल्या लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी एका नवीन मार्गाने आपल्या पवित्र आत्म्याचा उपयोग करू लागला. देवाच्या आत्म्याने प्राचीन काळातील विश्‍वासू जनांना कठीण नेमणुका हाताळण्यास कोणत्या काही मार्गांनी मदत केली हे आपण आधीच्या लेखात पाहिले होते. पण, देवाच्या आत्म्याने ख्रिस्तपूर्व काळात ज्याप्रमाणे कार्य केले व पहिल्या शतकात ज्याप्रमाणे कार्य केले त्यात काय फरक आहे? आणि आज देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालल्याने ख्रिश्‍चनांना काय लाभ होतो? याची आपण चर्चा करू या.

“पाहा मी प्रभूची दासी”

२. मरीयेने पवित्र आत्म्याचे कोणते अद्‌भुत कार्य पाहिले होते?

येशूने शिष्यांना वचन दिल्याप्रमाणे, पवित्र आत्म्याचा वर्षाव करण्यात आला तेव्हा मरीया जेरूसलेममध्ये त्या माडीवरच्या खोलीत उपस्थित होती. (प्रे. कृत्ये १:१३, १४) पण, या घटनेच्या तीसपेक्षा अधिक वर्षांआधी, मरीयेने यहोवाच्या आत्म्याचे अद्‌भुत कार्य पाहिले होते. यहोवाने आपल्या पुत्राचे जीवन स्वर्गातून पृथ्वीवर कुमारी मरीयेच्या गर्भात स्थलांतरित केले होते. तिच्या पोटी जो गर्भ होता तो “पवित्र आत्म्यापासून” होता.—मत्त. १:२०.

३, ४. मरीयेने कशी मनोवृत्ती दाखवली आणि आपण तिचे अनुकरण कसे करू शकतो?

यहोवाने मरीयेला का निवडले? मरीयेबद्दल यहोवाची इच्छा काय आहे हे देवदूताने तिला स्पष्ट केल्यावर, ती म्हणाली: “पाहा मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” (लूक १:३८) या शब्दांवरून तिची मनोवृत्ती दिसून आली जी देवाने आधीच पाहिली होती. तिने लगेच दिलेल्या उत्तरावरून, तिच्याबद्दल असलेली यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास ती तयार होती हे दिसून येते. आपण कुमारी असून गरोदर आहोत हे समजल्यावर समाजातील लोक काय विचार करतील किंवा याचा आपल्या होणाऱ्‍या पतीसोबतच्या नातेसंबंधावर काय परिणाम होईल याविषयी तिने कोणतेही प्रश्‍न विचारले नाही. मरीयेने स्वतःला दासी मानले आणि असे करण्याद्वारे तिने दाखवून दिले की आपला धनी यहोवा याच्यावर तिचा पूर्ण भरवसा आहे.

देवाच्या सेवेतील जबाबदाऱ्‍या कठीण असून आपण त्या पेलू शकत नाही असे कधी तुम्हाला वाटले आहे का? प्रत्येकाने स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘यहोवा त्याच्या इच्छेनुसार एखादी गोष्ट करतो यावर माझा पूर्ण भरवसा आहे का? यहोवा माझ्याकडून ज्या कामाची अपेक्षा करतो ते करण्यास मी खरोखर तयार असतो का?’ तुम्ही ही खातरी बाळगू शकता की जे देवावर भरवसा ठेवतात व सार्वभौम सत्ताधारी म्हणून त्याच्या आज्ञा पाळतात अशांना तो आपला आत्मा देतो.—प्रे. कृत्ये ५:३२.

पवित्र आत्म्याने पेत्राला मदत केली

५. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या आधी पेत्राने कोणत्या मार्गांनी पवित्र आत्म्याचे कार्य स्वतः अनुभवले होते?

मरीयेप्रमाणेच प्रेषित पेत्रालासुद्धा इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या आधी देवाच्या पवित्र आत्म्याच्या शक्‍तिशाली कार्याचा वैयक्‍तिक अनुभव आला होता. येशूने त्याला व इतर प्रेषितांना भुते काढण्याचा अधिकार दिला होता. (मार्क ३:१४-१६) याविषयीचे अनेक तपशील शास्त्रवचनांत दिले नसले, तरी पेत्राने या अधिकाराचा वापर केल्याची शक्यता आहे. येशूने पेत्राला गालील समुद्रावर आपल्या दिशेने चालत येण्याचे आमंत्रण दिल्यावर पेत्र पाण्यावरून चालू लागला तेव्हादेखील देवाची शक्‍ती दिसून आली. (मत्तय १४:२५-२९ वाचा.) यावरून स्पष्टपणे दिसून येते की महत्कृत्ये करण्यासाठी पेत्र देवाच्या पवित्र आत्म्यावर विसंबून राहिला. लवकरच हा आत्मा पेत्रावर व इतर अनुयायांवर नवीन मार्गांनी कार्य करणार हाता.

६. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या आधी व नंतर पेत्र देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने काय करू शकला?

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या सणाच्या वेळी, जेरूसलेममध्ये आलेल्या प्रवाशांसोबत त्यांच्या भाषेत बोलण्याची क्षमता पेत्राला व इतरांना चमत्कारिक रीत्या देण्यात आली. त्यानंतर, पेत्राने पुढाकार घेऊन जमावापुढे भाषण दिले. (प्रे. कृत्ये २:१४-३६) होय पवित्र आत्म्याने, एके काळी उतावीळ व भित्रा असलेल्या पेत्राला, धमक्यांना व छळाला न जुमानता धैर्याने साक्ष देण्यास मदत केली. (प्रे. कृत्ये ४:१८-२०, ३१) देवाने आपल्या आत्म्याद्वारे पेत्राला खास ज्ञान दिले. (प्रे. कृत्ये ५:८, ९) तसेच, पुनरुत्थान करण्याची शक्‍तीही त्याला देण्यात आली.—प्रे. कृत्ये ९:४०.

७. येशूच्या कोणत्या शिकवणी केवळ अभिषिक्‍त झाल्यानंतरच पेत्राला समजल्या?

पेत्राला पेन्टेकॉस्टच्याही आधी, येशूने शिकवलेली अनेक सत्ये समजली होती. (मत्त. १६:१६, १७; योहा. ६:६८) पण, येशूच्या शिकवणींतील काही बाबी पेन्टेकॉस्टच्या आधी पेत्राला समजल्या नव्हत्या. उदाहरणार्थ, ख्रिस्ताचे तिसऱ्‍या दिवशी आत्मिक प्राणी म्हणून पुनरुत्थान करण्यात येईल, तसेच त्याचे राज्य स्वर्गात असेल हे पेत्राला समजले नव्हते. (योहा. २०:६-१०; प्रे. कृत्ये १:६) मानव हे आत्मिक प्राणी होऊ शकतात आणि स्वर्गात राज्य करू शकतात ही कल्पना पेत्रासाठी नवीन होती. पण, पवित्र आत्म्याने त्याचा बाप्तिस्मा झाला व त्याला स्वर्गीय आशा देण्यात आली तेव्हाच तो या विषयांवरील येशूच्या शिकवणींचा अर्थ समजू शकला.

८. अभिषिक्‍त जन आणि “दुसरी मेंढरे” यांना कोणते ज्ञान उपलब्ध आहे?

येशूच्या शिष्यांना पूर्वी ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या पवित्र आत्म्याचा वर्षाव झाल्यानंतर त्यांना समजू लागल्या. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या लेखकांनी यहोवाच्या उद्देशाबद्दलची अनेक अद्‌भुत सत्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपल्या फायद्यासाठी लिहिली आहेत. (इफिस. ३:८-११, १८) आज, आत्म्याने अभिषिक्‍त जन व “दुसरी मेंढरे” एकत्र या सत्यांचा अभ्यास करू शकतात व ती समजू शकतात. (योहा. १०:१६) देवाचा आत्मा तुम्हाला देवाच्या वचनाचे ज्ञान व समज प्राप्त करण्यास जी मदत करतो त्याची तुम्ही कदर करता का?

पौल “पवित्र आत्म्याने पूर्ण” झाला

९. पवित्र आत्म्याद्वारे पौल काय साध्य करू शकला?

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या सुमारे एक वर्षानंतर, शौल जो नंतर पौल या नावाने ओळखला गेला तोसुद्धा आत्म्याने अभिषिक्‍त झाला. पवित्र आत्म्याने त्याच्यावर ज्या मार्गांनी कार्य केले त्यामुळे आज आपल्याला फायदा होतो. प्रेषित पौलाने आत्म्याने प्रेरित होऊन बायबलमधील १४ पुस्तके लिहिली. आत्म्याने ज्या प्रकारे पेत्राला मदत केली, त्याच प्रकारे पौलालादेखील स्वर्गातील अमर आणि अविनाशी आशेची समज प्राप्त करण्यास व त्याविषयी स्पष्टपणे लिहिण्यास आत्म्याने मदत केली. पौलाने पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आजारी लोकांना बरे केले, भुते घालवली आणि मेलेल्यांनासुद्धा जिवंत केले. पण, याहूनही महत्त्वाचे कार्य करण्याचे सामर्थ्य पौलाला पवित्र आत्म्याद्वारे मिळाले होते. आज तेच कार्य करण्याचे सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या सेवकांनाही मिळते; पण, ते त्यांना चमत्कारिक रीत्या मिळत नाही.

१०. पवित्र आत्म्याने पौलाच्या बोलण्याच्या क्षमतेवर कसा प्रभाव पाडला?

१० पौल “पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन” एका जादूगाराविरुद्ध धैर्याने बोलला. हे पूर्ण संभाषण ऐकणाऱ्‍या कुप्रच्या मुख्य अधिकाऱ्‍यावर किती जबरदस्त प्रभाव पडला! त्या सुभेदाराने, “प्रभूच्या शिक्षणावरून आश्‍चर्य करून” सत्य स्वीकारले. (प्रे. कृत्ये १३:८-१२) यावरून हे स्पष्ट होते की सत्य सांगण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा किती महत्त्वाचा आहे याची पौलाला जाणीव होती. (मत्त. १०:२०) आपल्याला बोलण्याची क्षमता मिळावी म्हणून त्याने नंतर इफिस येथील मंडळीला त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.—इफिस. ६:१८-२०.

११. देवाच्या आत्म्याने पौलाला कसे मार्गदर्शित केले?

११ पवित्र आत्म्याने पौलाला केवळ बोलण्यासच समर्थ केले नाही, तर काही वेळा विशिष्ट ठिकाणी न बोलण्यासही मना केले. पवित्र आत्म्याने पौलाला त्याच्या मिशनरी दौऱ्‍यांच्या वेळी मार्गदर्शित केले. (प्रे. कृत्ये १३:२; प्रेषितांची कृत्ये १६:६-१० वाचा.) आजसुद्धा यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे प्रचार कार्य मार्गदर्शित करतो. पौलाप्रमाणेच यहोवाचे सर्व आज्ञाधारक सेवक सत्याचा प्रचार धैर्याने व आवेशाने करण्यास जिवापाड मेहनत करतात. पौलाचे मार्गदर्शन करण्यासाठी देवाने ज्या प्रकारे पवित्र आत्म्याचा उपयोग केला त्याप्रमाणे तो आज करत नसला, तरी आपण याची खातरी बाळगू शकतो की यहोवा आजही त्याच्या आत्म्याद्वारे प्रामाणिक लोकांना सत्याकडे आकर्षित करतो.—योहा. ६:४४.

“कार्यांचे निरनिराळे प्रकार”

१२-१४. देवाचा आत्मा त्याच्या सर्व सेवकांवर एकाच मार्गाने कार्य करतो का? स्पष्ट करा.

१२ पहिल्या शतकातील अभिषिक्‍त जनांच्या मंडळीवर यहोवाचा आशीर्वाद होता याबद्दलचे अहवाल वाचल्यावर आज देवाच्या समर्पित सेवकांना विशेष प्रोत्साहन मिळते का? नक्कीच मिळते. पौलाने त्याच्या दिवसातील आत्म्याच्या चमत्कारिक दानांबद्दल करिंथ येथील मंडळीला देवाच्या प्रेरणेने काय लिहिले त्याकडे लक्ष द्या. त्याने लिहिले: “कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभु एकच आहे; आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे.” (१ करिंथ. १२:४-६, ११) होय, एखादा उद्देश साध्य करण्यासाठी पवित्र आत्मा देवाच्या निरनिराळ्या सेवकांवर निरनिराळ्या मार्गांनी कार्य करू शकतो. ख्रिस्ताचा ‘लहान कळप’ व त्याची “दुसरी मेंढरे” या दोघांनाही देवाचा पवित्र आत्मा उपलब्ध आहे. (लूक १२:३२; योहा. १०:१६) असे असले, तरी मंडळीतील प्रत्येक सदस्यावर तो नेहमी एकाच मार्गाने कार्य करत नाही.

१३ उदाहरणार्थ, मंडळीत वडिलांना पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केले जाते. (प्रे. कृत्ये २०:२८) पण, आत्म्याने अभिषिक्‍त असलेले सर्वच जण मंडळीत वडील म्हणून सेवा करतात असे नाही. यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? हाच, की देवाचा आत्मा मंडळीतील सदस्यांवर निरनिराळ्या मार्गांनी कार्य करतो.

१४ यहोवाने ज्या आत्म्याद्वारे आपल्या एकुलत्या एका पुत्राचे स्वर्गातील अमर जीवनासाठी मेलेल्यांतून पुनरुत्थान केले, तोच आत्मा अभिषिक्‍त जनांमध्ये “दत्तकपणाचा आत्मा” रुजवतो, म्हणजे आपण देवाचे पुत्र आहोत ही भावना रुजवतो. (रोमकर ८:११, १५ वाचा.) त्याच आत्म्याद्वारे यहोवाने संपूर्ण विश्‍व निर्माण केले. (उत्प. १:१-३) त्याच पवित्र आत्म्याद्वारे यहोवाने बसालेलला निवासमंडपाशी संबंधित खास कार्य करण्यासाठी कार्यक्षम केले, शमशोनाला अतिशय शक्‍तिशाली कार्य करण्यास सामर्थ्यवान केले आणि पेत्राला पाण्यावर चालण्यास समर्थ केले. तेव्हा, देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित होणे आणि देवाच्या आत्म्याने अभिषिक्‍त होणे हे एकच आहे असे आपण समजू नये. पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त होणे हे आत्म्याच्या अनेक कार्यांपैकी एक खास कार्य आहे. कोणाला आत्म्याने अभिषिक्‍त करायचे हे स्वतः देव ठरवतो.

१५. पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा होणे सदासर्वकाळ चालू राहील का? स्पष्ट करा.

१५ देवाचा पवित्र आत्मा नेहमीच त्याच्या विश्‍वासू सेवकांवर निरनिराळ्या मार्गांनी कार्य करत आला आहे. देवाने लोकांना आत्म्याने अभिषिक्‍त करण्यास सुरुवात केली त्याच्या हजारो वर्षांपूर्वीपासून हा आत्मा त्यांच्यावर कार्य करत होता. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून पवित्र आत्म्याद्वारे लोकांना अभिषिक्‍त करण्यास सुरुवात झाली, पण देव सदासर्वकाळ लोकांना पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करत राहणार नाही. आत्म्याद्वारे अभिषिक्‍त केले जाणे हे संपुष्टात येणार असले, तरी पवित्र आत्मा देवाच्या लोकांवर कार्य करत राहील, जेणेकरून त्यांना सदासर्वकाळ देवाची इच्छा करत राहणे शक्य होईल.

१६. आज देवाचे सेवक त्याच्या आत्म्याच्या साहाय्याने काय करत आहेत?

१६ आज यहोवाचे सेवक त्याच्या आत्म्याद्वारे काय करत आहेत? प्रकटीकरण २२:१७ याचे उत्तर देते: “आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराहि म्हणो, ये. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” ज्यांना जीवनाचे पाणी हवे आहे अशांना आज खरे ख्रिस्ती पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आमंत्रण देतात. हे आमंत्रण इतरांना देण्यात आत्म्याने अभिषिक्‍त असलेले ख्रिस्ती पुढाकार घेत आहेत. असे असले, तरी दुसऱ्‍या मेंढरांतील सदस्यदेखील लोकांना हे आमंत्रण देण्यात भाग घेतात. हे कार्य साध्य करण्यासाठी दोन्ही वर्ग पवित्र आत्म्याशी सहकार्य करतात. या दोन्ही वर्गातील सदस्यांनी यहोवाला आपले जीवन समर्पित केले आहे व त्यांनी “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा घेतला आहे. (मत्त. २८:१९) आणि ते सर्व जण आपल्या जीवनात देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारतात व आत्म्याचे फळ उत्पन्‍न करतात. (गलती. ५:२२, २३) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांप्रमाणेच दुसरी मेंढरेदेखील देवाच्या आत्म्याची मदत स्वीकारतात. आत्म्याच्या मदतीने ते देवाला स्वीकृत असलेले शुद्ध जीवन जगण्याचा कसोशीने प्रयत्न करतात.—२ करिंथ. ७:१; प्रकटी. ७:९, १४.

पवित्र आत्मा मागत राहा

१७. आपल्याजवळ देवाचा आत्मा आहे हे आपण कसे दाखवून देऊ शकतो?

१७ तर मग, तुम्हाला स्वर्गातील सार्वकालिक जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची, तुमची एकनिष्ठा टिकवून ठेवण्यास व तुमचे बक्षीस मिळवण्यास यहोवा तुम्हाला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देऊ शकतो. (२ करिंथ. ४:७) तुम्ही राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत असल्यामुळे लोक तुमची थट्टा करतील. पण हे आठवणीत असू द्या: “ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे.”—१ पेत्र ४:१४.

१८, १९. यहोवा तुम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे मदत कसा करेल आणि या बाबतीत तुम्ही काय दृढनिश्‍चय केला आहे?

१८ पवित्र आत्मा देवाची एक देणगी असून जे प्रामाणिकपणे मागतात त्यांना तो ही देणगी देतो. आत्म्याच्या या देणगीमुळे तुम्ही अधिक कार्यक्षम व्हाल व देवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करण्याची तुमची इच्छा अधिक प्रबळ होईल. बायबल म्हणते: “इच्छा करणे व कृति करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे.” पवित्र आत्म्याच्या या अमूल्य देणगीमुळे व ‘जीवनाच्या वचनावर’ घट्ट पकड ठेवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तुम्हाला ‘भीत व कापत आपले तारण साधणे’ शक्य होईल.—फिलिप्पै. २:१२, १३, १५.

१९ तर मग, देवाच्या आत्म्यावर पूर्ण विश्‍वास ठेवून प्रत्येक नेमणूक मन लावून पूर्ण करा, तुम्हाला जी नेमणूक दिली आहे त्यात कुशल व्हा आणि यहोवाला मदत मागा. (याको. १:५) तो तुम्हाला त्याचे वचन समजण्यास, जीवनातील समस्यांचा सामना करण्यास आणि सुवार्तेचा प्रचार करण्यास आवश्‍यक ती मदत करेल. बायबल म्हणते: “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल.” यात पवित्र आत्मा मागत राहण्याचाही समावेश होतो. (लूक ११:९, १३) तेव्हा, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चाललेल्या प्राचीन व आधुनिक काळातील देवाच्या विश्‍वासू सेवकांप्रमाणे बनण्यासाठी यहोवाला सतत प्रार्थना करत राहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• आपण मरीयेप्रमाणे कोणती मनोवृत्ती प्रदर्शित करू शकतो ज्यामुळे आपल्याला आशीर्वाद मिळतील?

• पौल कोणत्या अर्थाने देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित होता?

• आज देवाचे सेवक कशा प्रकारे त्याच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्र]

देवाच्या आत्म्याने पौलाला दुरात्म्यांच्या प्रभावावर मात करण्यास मदत केली

[२६ पानांवरील चित्र]

पवित्र आत्मा आज ख्रिश्‍चनांना मदत करतो, मग त्यांना कोणतीही आशा असो