व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्राचीन काळातील विश्‍वासू जन देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालले

प्राचीन काळातील विश्‍वासू जन देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालले

प्राचीन काळातील विश्‍वासू जन देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालले

“प्रभू यहोवाने आणि त्याच्या आत्म्याने मला पाठवले आहे.”—यश. ४८:१६, पं.र.भा.

१, २. विश्‍वास प्रदर्शित करण्यासाठी कशाची गरज आहे, आणि प्राचीन काळातील विश्‍वासू जनांचा विचार केल्याने आपल्याला कशा प्रकारे उत्तेजन मिळेल?

 हाबेलाच्या काळापासून अनेकांनी विश्‍वास प्रदर्शित केला असला, तरी “सर्वांच्या ठायी विश्‍वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनी. ३:२) तर मग, एका व्यक्‍तीमध्ये हा गुण का असतो, आणि कोणती गोष्ट तिला विश्‍वासू राहण्यास मदत करते? विश्‍वास हा बऱ्‍याच प्रमाणात, देवाच्या वचनातील वार्ता ऐकल्याने निर्माण होतो. (रोम. १०:१७) तो देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२, २३) तेव्हा, विश्‍वास बाळगण्यासाठी व तो प्रदर्शित करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे.

विश्‍वासू स्त्री-पुरुष जन्मतःच किंवा स्वभावतःच विश्‍वासू असतात असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. बायबलमध्ये आपण देवाच्या ज्या आदर्श सेवकांविषयी वाचतो तेसुद्धा ‘आपल्यासारखा स्वभाव’ असलेले लोक होते. (याको. ५:१७) त्यांच्यामध्येही असुरक्षिततेची भावना, दुर्बलता व शंका होत्या; पण, जीवनातील आव्हानांचा सामना करण्यास देवाच्या आत्म्यामुळे ते “सबळ झाले.” (इब्री ११:३४) यहोवाच्या आत्म्याने कशा प्रकारे त्यांच्यावर कार्य केले याचा विचार केल्याने आज आपल्याला विश्‍वासूपणे देवाची सेवा करत राहण्याचे उत्तेजन मिळेल. अशा उत्तेजनाची आपल्याला विशेष गरज आहे कारण आज आपल्या विश्‍वासावर चहूबाजूंनी हल्ला होत आहे.

देवाच्या आत्म्याने मोशेला सामर्थ्यवान केले

३-५. (क) पवित्र आत्म्याने मोशेला त्याची जबाबदारी हाताळण्यास मदत केली असे आपण का म्हणू शकतो? (ख) यहोवा आपल्याला त्याचा आत्मा देतो याविषयी मोशेच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

मोशे हा इ.स.पू. १५१३ मध्ये हयात असलेल्या “सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गण. १२:३) देवाच्या या नम्र सेवकावर इस्राएल राष्ट्रात प्रचंड मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. देवाच्या आत्म्याने मोशेला भविष्यवाद व न्याय करण्यास, शास्त्रवचनांचे लिखाण करण्यास, इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्यास आणि अनेक चमत्कार करण्यास सामर्थ्यवान केले होते. (यशया ६३:११-१४ वाचा.) असे असले, तरी एके प्रसंगी मोशेने दुःखाने म्हटले, की त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी खूप जड आहे. (गण. ११:१४, १५) त्यामुळे, मोशेला त्याचा कार्यभार वाहण्यास मदत करण्यासाठी यहोवाने मोशेवर “असणाऱ्‍या आत्म्यातून काही घेऊन” तो ७० पुरुषांवर ठेवला. (गण. ११:१६, १७) मोशेवर सोपवण्यात आलेली जबाबदारी खूप जड आहे असे त्याला वाटत असले, तरी वस्तुस्थिती ही होती की तो एकटाच ती जबाबदारी पेलत नव्हता; तसेच, त्याला मदत करण्यासाठी नियुक्‍त केलेले ७० जणदेखील एकटेच ही जबाबदारी पेलणार नव्हते.

मोशेवर असलेली ही प्रचंड मोठी जबाबदारी हाताळण्यासाठी देवाने त्याला पुरेसा पवित्र आत्मा दिला होता. देवाने त्याच्यावर असलेला काही आत्मा घेऊन तो इतर ७० जणांवर ठेवला त्यामुळे मोशेजवळ खूप कमी आत्मा राहिला का, व त्या ७० पुरुषांना खूप जास्त आत्मा मिळाला का? नाही. उलट, मोशेजवळ अजूनही त्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्‍यक असलेला आत्मा होता. त्याचप्रमाणे, आज यहोवा आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार आवश्‍यक असलेला आत्मा देतो. यहोवा आपल्याला ‘मोजून मापून आत्मा देत नाही,’ तर “त्याच्या पूर्णतेतून” देतो.—योहा. १:१६; ३:३४.

तुम्ही परीक्षांचा सामना करत आहात का? तुमच्या जबाबदाऱ्‍या वाढत असून तुमचा जास्तीत जास्त वेळ त्यांतच खर्च होत आहे का? वाढत्या महागाईचा किंवा आरोग्य समस्यांचा सामना करत असतानाच तुमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक व भौतिक गरजा भागवण्यासाठी तुम्ही जिवापाड प्रयत्न करत आहात का? ख्रिस्ती मंडळीत तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्‍या आहेत का? असे असल्यास, जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास आवश्‍यक असलेले बळ यहोवा देव त्याच्या आत्म्याद्वारे तुम्हाला देऊ शकतो याची खातरी तुम्ही बाळगू शकता.—रोम. १५:१३.

पवित्र आत्म्याने बसालेलला कार्यक्षम केले

६-८. (क) देवाच्या आत्म्याने बसालेल व अहलियाब यांना काय करण्यास सक्षम केले? (ख) देवाच्या आत्म्याने बसालेल व अहलियाब यांचे मार्गदर्शन केले हे कशावरून दिसून येते? (ग) बसालेलचा अनुभव विशेष प्रोत्साहनदायक का आहे?

देवाचा आत्मा कशा प्रकारे कार्य करू शकतो हे मोशेचा समकालीन बसालेल याच्या अनुभवावरून स्पष्टपणे दिसून येते. (निर्गम ३५:३०-३५ वाचा.) निवासमंडपासाठी आवश्‍यक असलेल्या वस्तू बनवण्यात पुढाकार घेण्यासाठी बसालेलला नियुक्‍त करण्यात आले होते. हा भव्य प्रकल्प हाती घेण्याआधी त्याला कारागिरीचे ज्ञान होते का? कदाचित असेलही. पण, याआधी त्याने इजिप्तमध्ये कदाचित विटा बनवण्याचे काम केले होते. (निर्ग. १:१३, १४) तर मग, ही कठीण कामगिरी तो कशी पूर्ण करणार होता? ‘देवाने त्याला कलाकुसरीची कामे व सर्व प्रकारच्या कारागिरीची कामे करण्यासाठी आपल्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धि, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले.’ बसालेलजवळ जे काही नैसर्गिक कौशल्य असेल ते पवित्र आत्म्याद्वारे आणखी वाढवण्यात आले. अहलियाब याच्या बाबतीतही असेच घडले. बसालेल व अहलियाब यांनी ही कामे चांगल्या प्रकारे शिकून घेतली असावी असे म्हणता येईल कारण त्यांनी केवळ त्यांच्यावर सोपवलेली कामेच पूर्ण केली नाही, तर ही कामे कशी करावी हे त्यांनी इतरांनाही शिकवले. होय, देवाने त्यांच्या अंतःकरणात शिकवण्याची कला रुजवली.

देवाच्या आत्म्याने बसालेल व अहलियाब यांचे मार्गदर्शन केले याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचा विलक्षण टिकाऊपणा. त्यांनी बनवलेल्या वस्तू सुमारे ५०० वर्षांनंतरही वापरात होत्या. (२ इति. १:२-६) आधुनिक काळातील उत्पादक आपल्या वस्तूंवर आपले निशाण किंवा व्यापार-चिन्ह लावतात, त्याप्रमाणे बसालेल व अहलियाब यांनी केले नाही. त्यांनी केलेल्या कामाचे सर्व श्रेय यहोवाला गेले.—निर्ग. ३६:१, २.

आज आपल्याला अशी काही कामे करावी लागू शकतात ज्यांसाठी खास कौशल्याची गरज असते. उदाहरणार्थ, बांधकाम, छपाई, अधिवेशनांचे आयोजन, संकटकालीन मदतकार्याची व्यवस्था, तसेच रक्‍ताच्या वापरासंबंधी डॉक्टरांना व हॉस्पिटल कर्मचाऱ्‍यांना आपली शास्त्रवचनीय भूमिका स्पष्ट करणे यांसारखी कामे करावी लागू शकतात. काही वेळा, ही कामे खास कौशल्य असलेले बांधव हाताळतात. पण बरेचदा ही कामे, विशिष्ट क्षेत्राचे फारसे ज्ञान नसलेल्या स्वयंसेवकांद्वारे पार पाडली जातात. अशा वेळी, देवाच्या आत्म्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येते. यहोवाच्या सेवेतील एखादी नेमणूक हाताळण्यास इतर जण आपल्यापेक्षा अधिक कार्यक्षम आहेत असे वाटून तुम्ही ती नेमणूक स्वीकारण्यास कधी कचरलात का? हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवा तुम्हाला जी काही नेमणूक देतो ती पार पाडण्यासाठी तो त्याच्या आत्म्याद्वारे तुमचे ज्ञान व क्षमता वाढवू शकतो.

देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने यहोशवा यशस्वी झाला

९. इस्राएल लोक इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासमोर कोणता प्रसंग आला, आणि कोणता प्रश्‍न निर्माण झाला?

देवाच्या आत्म्याने मोशे व बसालेल यांच्या काळातील आणखी एका व्यक्‍तीचेही मार्गदर्शन केले. इस्राएल लोक इजिप्तमधून बाहेर पडले तेव्हा अमालेकी लोकांनी विनाकारण त्यांच्यावर हल्ला केला. इस्राएल लोकांना युद्धाचा काहीएक अनुभव नव्हता. पण, हा हल्ला परतावून लावण्यासाठी त्यांना आपले पहिले युद्ध लढावे लागणार होते. (निर्ग. १३:१७; १७:८) युद्धात त्यांचे नेतृत्व करण्यासाठी एका व्यक्‍तीची गरज होती. ती व्यक्‍ती कोण असणार होती?

१०. यहोशवाच्या नेतृत्वाखाली इस्राएल राष्ट्र युद्ध का जिंकू शकले?

१० युद्धात इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी यहोशवाची निवड करण्यात आली. पण, ही कामगिरी हाताळण्यासाठी, त्याला आपल्या कामाचा पूर्वानुभव सांगावा लागला असता तर त्याने काय उत्तर दिले असते? गुलाम मजूर? गवत-मातीचा गारा बनवणारा? की मान्‍ना गोळा करणारा? हे खरे आहे, की यहोशवाचा आजोबा अलीशामा हा एफ्राइम वंशाचा सरदार होता आणि त्याने १,०८,१०० सैनिकांचे नेतृत्व केले होते. (गण. २:१८, २४; १ इति. ७:२६, २७) पण, यहोवाने मोशेला सांगितले की शत्रूंचा पराभव करण्यासाठी इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व अलीशामा किंवा त्याचा पुत्र नून नव्हे, तर यहोशवा करेल. हे युद्ध जवळजवळ दिवसभर चालले. यहोशवाने देवाच्या आज्ञांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे व देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची मनस्वी कदर केल्यामुळे इस्राएल राष्ट्राने युद्ध जिंकले.—निर्ग. १७:९-१३.

११. यहोशवाप्रमाणे आपण आपल्या ख्रिस्ती सेवेत यशस्वी कसे होऊ शकतो?

११ पुढे यहोशवा, “ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला” आणि मोशेनंतर त्याने इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व केले. (अनु. ३४:९) पवित्र आत्म्याने मोशेमध्ये जशी भविष्यवाद करण्याची व चमत्कार करण्याची क्षमता उत्पन्‍न केली होती, तशी क्षमता यहोशवामध्ये उत्पन्‍न केली नाही. पण, कनान देश हस्तगत करण्यासाठी इस्राएल लोकांना जी अनेक युद्धे लढावी लागली त्यात त्यांचे नेतृत्व करण्यासाठी देवाने त्याला समर्थ केले. आज आपल्याला वाटू शकते, की आपल्या ख्रिस्ती सेवेतील काही कार्ये पार पाडण्याचा आपल्याला अनुभव नाही किंवा आपण मुळीच समर्थ नाही. पण, आपण देवाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले, तर यहोवाने यहोशवाला यशस्वी होण्यास साहाय्य केले त्याप्रमाणे तो आपल्यालाही साहाय्य करेल याची खातरी आपण बाळगू शकतो.—यहो. १:७-९.

“परमेश्‍वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला”

१२-१४. (क) केवळ ३०० इस्राएली सैनिक मिद्यान्यांच्या एका अफाट सैन्यावर विजय मिळवू शकले यावरून काय दिसून येते? (ख) यहोवाने कशा प्रकारे गिदोनाला आश्‍वासन दिले? (ग) आज देवाकडून आपल्याला कोणते आश्‍वासन मिळते?

१२ यहोशवाच्या मृत्यूनंतरही यहोवाने आपल्या विश्‍वासू सेवकांना बळ देण्यासाठी आपल्या आत्म्याचा उपयोग केला. बायबलमधील शास्ते पुस्तकात अशा अनेक मानवांची उदाहरणे आहेत जे देवाच्या आत्म्याच्या मदतीने “दुर्बळांचे सबळ झाले.” (इब्री ११:३४) देवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे गिदोनाला इस्राएल लोकांच्या वतीने लढण्यास प्रवृत्त केले. (शास्ते ६:३४) पण, गिदोनाने जे सैन्य गोळा केले होते ते मिद्यानी सैन्यापेक्षा खूपच कमी होते, म्हणजे प्रत्येक ४ मिद्यानी सैनिकांमागे १ इस्राएली सैनिक. असे असले, तरी यहोवाच्या नजरेत इस्राएलची ही छोटीशी सेनादेखील फार मोठी होती. त्यामुळे त्याने दोन वेळा गिदोनाला आपले सैन्यबळ कमी करण्यास सांगितले. शेवटी, प्रत्येक ४५० मिद्यानी सैनिकांमागे १ इस्राएली सैनिक असे प्रमाण झाले. (शास्ते ७:२-८; ८:१०) मानवी दृष्टिकोनातून ही संख्या अतिशय कमी वाटत असली, तरी यहोवाला ती मान्य होती; कारण, युद्धात इस्राएल लोकांना दणदणीत विजय मिळाला असता, तर हा विजय मानवी प्रयत्नांमुळे किंवा मानवी बुद्धीमुळे मिळाला असे कोणीही म्हणू शकले नसते.

१३ गिदोन व त्याचे सैनिक युद्ध लढण्यास अगदी सज्ज होते. तुम्ही जर त्या छोट्याशा सैन्यात असता, तर आपल्यातील घाबरलेल्या व बेसावध सैनिकांना घरी पाठवल्यामुळे आपले सैन्यबळ आता कमी झाले आहे या विचाराने तुम्हाला सुरक्षित वाटले असते का? की युद्धाचा अंतिम परिणाम काय असेल या विचाराने तुमचा थरकाप उडाला असता? या क्षणी गिदोनाला कसे वाटले याविषयी आपण अंदाज बांधण्याची मुळीच गरज नाही. यहोवाने त्याला जे सांगितले होते अगदी तसेच त्याने केले! (शास्ते ७:९-१४ वाचा.) युद्धात यहोवा आपल्या पाठीशी असेल याचा पुरावा म्हणून गिदोनाने यहोवाकडे एक चिन्ह मागितले तेव्हा यहोवा त्याच्यावर रागावला नाही. (शास्ते ६:३६-४०) उलट, यहोवाने गिदोनाचा विश्‍वास आणखी दृढ केला.

१४ यहोवाजवळ आपल्या लोकांचे रक्षण करण्याचे अमर्याद सामर्थ्य आहे. त्यामुळे तो कोणत्याही बिकट परिस्थितीतून आपल्या लोकांना वाचवू शकतो आणि असे करण्यासाठी तो अगदी दुर्बळ व असहाय वाटणाऱ्‍या व्यक्‍तींचादेखील उपयोग करू शकतो. काही वेळा, आपले विरोधक आपल्यापेक्षा खूप सामर्थ्यशाली आहेत किंवा आपली परिस्थिती अतिशय बिकट आहे असे आपल्याला वाटू शकते. यहोवाने गिदोनाला चमत्कारिक रीत्या आपल्या पाठबळाचा पुरावा दिला तसे यहोवाने आपल्या बाबतीत करावे अशी अपेक्षा आपण करत नाही. पण, देवाच्या वचनातून व आत्म्याने निर्देशित असलेल्या ख्रिस्ती मंडळीतून आपण भरपूर मार्गदर्शन व आश्‍वासन मिळवू शकतो. (रोम. ८:३१, ३२) यहोवाची प्रेमळ अभिवचने आपला विश्‍वास आणखी दृढ करतात आणि यहोवा खरोखर आपला साहाय्यकर्ता आहे याची आपल्याला खातरी देतात.

“मग इफ्ताहावर परमेश्‍वराचा आत्मा उतरला”

१५, १६. इफ्ताहाच्या मुलीमध्ये एक चांगली मनोवृत्ती कशी निर्माण झाली, आणि पालकांकरता हे कशा प्रकारे प्रोत्साहनदायक आहे?

१५ आणखी एक उदाहरण विचारात घ्या. इस्राएल लोकांना अम्मोनी लोकांशी युद्ध करायचे होते, तेव्हा यहोवाचा आत्मा ‘इफ्ताहावर उतरला.’ युद्धात विजय मिळावा व यहोवाच्या नावाची स्तुती व्हावी म्हणून इफ्ताहाने देवाला एक वचन दिले. हे वचन पूर्ण करण्यासाठी त्याला फार मोठी किंमत मोजावी लागणार होती. त्याने देवाला वचन दिले, की देवाने अम्मोनी लोकांना त्याच्या हाती दिले, तर त्याच्या घरातून जो कोणी प्रथम त्याला भेटायला येईल त्यास तो यहोवाला अर्पण करेल. अम्मोनी लोकांचा पराभव करून इफ्ताह परतला तेव्हा सगळ्यात प्रथम त्याची मुलगीच त्याला भेटायला आली. (शास्ते ११:२९-३१, ३४) याचे इफ्ताहाला आश्‍चर्य वाटले का? बहुधा नाही, कारण त्याला केवळ एकच मूल होते. त्याने देवाला जे वचन दिले होते ते त्याने पूर्ण केले. त्याने आपल्या मुलीला शिलोतील यहोवाच्या निवासमंडपात सेवा करण्यासाठी पूर्णपणे वाहून दिले. इफ्ताहाची मुलगी यहोवाची एकनिष्ठ उपासक होती. त्यामुळे तिला हे चांगल्या प्रकारे माहीत होते, की आपल्या पित्याने देवाला जे वचन दिले आहे ते त्याने पूर्ण केलेच पाहिजे. (शास्ते ११:३६ वाचा.) असे करण्यासाठी यहोवाच्या आत्म्याने त्या दोघांना आवश्‍यक ते बळ दिले.

१६ इफ्ताहाच्या मुलीने ही निःस्वार्थ मनोवृत्ती कशी विकसित केली होती? खऱ्‍या उपासनेबद्दल आपल्या पित्याचा आवेश व देवावरील निष्ठा पाहून तिचा विश्‍वास दृढ झाला असेल यात काहीच शंका नाही. पालकांनो, हे नेहमी लक्षात असू द्या की तुमची मुले तुमच्या उदाहरणाचे निरीक्षण करत असतात. जीवनात तुम्ही जे निर्णय घेता त्यांवरून तुम्ही जे बोलता त्यावर तुमचा विश्‍वास असल्याचे त्यांना दिसून येते. तुमची मुले तुमच्या कळकळीच्या प्रार्थना ऐकतात, तुमच्या शिकवण्याच्या कलेचे निरीक्षण करतात व तुम्ही पूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्यासाठी जे प्रयत्न करता ते पाहतात. यामुळे यहोवाची सेवा करण्यासाठी स्वतःला वाहून देण्याची प्रबळ इच्छा तुमच्या मुलांच्या मनातही निर्माण होण्याची शक्यता आहे. ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.

शमशोनावर ‘परमेश्‍वराच्या आत्म्याने एकाएकी झडप घातली’

१७. शमशोनाने देवाच्या आत्म्याद्वारे काय केले?

१७ आणखी एक उदाहरण विचारात घ्या. पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांना अंकित केले, तेव्हा त्यांच्यापासून इस्राएल लोकांना सोडवण्यासाठी देवाचा आत्मा शमशोनाला ‘प्रेरणा’ देऊ लागला. (शास्ते १३:२४, २५) देवाच्या आत्म्याने शमशोनाला अतिशय विस्मयकारक व अतुलनीय कार्ये करण्यास सामर्थ्यवान केले. शमशोनाला पकडण्यासाठी पलिष्ट्यांनी इतर इस्राएल लोकांचे मन वळवले, तेव्हा “परमेश्‍वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीने जळलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली.” (शास्ते १५:१४) पुढे शमशोनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे तो शारीरिक रीत्या दुबळा झाला तेव्हादेखील “विश्‍वासाच्या द्वारे” तो सामर्थ्यवान झाला. (इब्री ११:३२-३४; शास्ते १६:१८-२१, २८-३०) त्या असामान्य परिस्थितीत देवाच्या आत्म्याने एका खास मार्गाने शमशोनावर कार्य केले. आज यहोवा तसे करत नाही. पण, या ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेतल्याने आपल्याला खूप उत्तेजन मिळते. ते कसे?

१८, १९. (क) शमशोनाच्या अनुभवावरून आपल्याला कोणते आश्‍वासन मिळते? (ख) या लेखात उल्लेखिलेल्या विश्‍वासू जनांच्या उदाहरणांची चर्चा केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा झाला आहे?

१८ सामर्थ्य मिळवण्यासाठी शमशोन ज्या पवित्र आत्म्यावर विसंबून होता त्याच आत्म्यावर आपणही विसंबून राहतो. येशूने आपल्या अनुयायांना ‘उपदेश करण्याचे व साक्ष देण्याचे’ जे कार्य करायला सांगितले ते करत असताना आपण देवाच्या आत्म्यावर विसंबून राहतो. (प्रे. कृत्ये १०:४२) हे कार्य करण्यासाठी ज्या कौशल्यांची गरज आहे ती जन्मतःच आपल्यामध्ये नसतात. तेव्हा, आपल्यावर सोपवण्यात आलेली विविध ख्रिस्ती कार्ये पार पाडण्यासाठी यहोवाचा आत्मा आपल्याला समर्थ करतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! त्यामुळे, हे कार्य करत असताना आपणही यशया संदेष्ट्याप्रमाणे असे म्हणू शकतो: “प्रभू यहोवाने आणि त्याच्या आत्म्याने मला पाठवले आहे.” (यश. ४८:१६) होय, आपल्याला देवाच्या आत्म्याने पाठवले आहे! यहोवाने मोशे, बसालेल व यहोशवा यांना कार्यक्षम केले त्याप्रमाणे तो आपल्यालाही कार्यक्षम करेल या आश्‍वासनाने आपण स्वतःला पूर्णपणे या कार्यात झोकून देतो. देवाने गिदोन, इफ्ताह व शमशोन यांना सामर्थ्यवान केले त्याप्रमाणे तो आपल्यालाही सामर्थ्यवान करेल या खातरीने आपण “आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन” हाती घेतो. (इफिस. ६:१७, १८) अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपण यहोवाच्या मदतीवर विसंबून राहिलो, तर ज्याप्रमाणे शमशोन शारीरिक रीत्या सामर्थ्यवान झाला त्याप्रमाणे आपण आध्यात्मिक रीत्या सामर्थ्यवान होऊ शकतो.

१९ स्पष्टच आहे, की जे खऱ्‍या उपासनेसाठी खंबीर भूमिका घेतात अशांना यहोवा आशीर्वादित करतो. आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देतो, तेव्हा आपला विश्‍वास आणखी दृढ होतो. त्यामुळे, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत नमूद केलेल्या काही रोमांचक घटनांचे परीक्षण करणेही नक्कीच आनंददायक ठरेल. या परीक्षणामुळे, यहोवाच्या आत्म्याने इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या आधी व नंतर पहिल्या शतकातील देवाच्या विश्‍वासू सेवकांवर कशा प्रकारे कार्य केले हे दिसून येईल. या वृत्तान्तांची चर्चा पुढील लेखात केली जाईल.

पवित्र आत्म्याने देवाच्या या सेवकांना ज्या प्रकारे साहाय्य केले ते जाणून तुम्हाला उत्तेजन का मिळते?

• मोशे

• बसालेल

• यहोशवा

• गिदोन

• इफ्ताह

• शमशोन

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाच्या आत्म्याने शमशोनाला शारीरिक रीत्या सामर्थ्यवान केले त्याप्रमाणे तो आपल्याला आध्यात्मिक रीत्या सामर्थ्यवान करू शकतो

[२१ पानांवरील चित्र]

पालकांनो, तुमचे आवेशी उदाहरण तुमच्या मुलांमध्ये प्रतिबिंबित होते