व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बदल करण्यास तयार असल्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं

बदल करण्यास तयार असल्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं

बदल करण्यास तयार असल्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं

जेम्स ए. थॉम्पसन यांच्याद्वारे कथित

माझा जन्म १९२८ साली अमेरिकेच्या दक्षिण भागात झाला होता. त्या वेळी, श्‍वेतवर्णियांचं आणि कृष्णवर्णियांचं कायद्यानं विलग्नीकरण केलं जायचं. जो कोणी या कायद्याचा भंग करेल त्याची तुरुंगात रवानगी केली जायची किंवा त्याला त्याहूनही कडक शिक्षा केली जायची.

त्यावेळी, अमेरिकेच्या काही भागांत, श्‍वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यहोवाच्या साक्षीदारांच्या वेगळ्या मंडळ्या, विभाग व प्रांत असणे बंधनकारक होते. सन १९३७ मध्ये माझे वडील टेनिसी राज्यातील, चॅटनूगा येथील कृष्णवर्णीय मंडळीचे कंपनी सर्वन्ट (आज ज्यांना वडील वर्गाचे संयोजक म्हटले जाते) बनले. हेन्री निकोल्स हे श्‍वेतवर्णीय मंडळीचे कंपनी सर्वन्ट होते.

माझ्या लहानपणच्या अनेक चांगल्या आठवणी माझ्याजवळ आहेत. मी लहान असताना, माझे वडील व बंधू निकोल्स रात्रीच्या वेळी आमच्या घराच्या मागच्या व्हरांड्यात बसून गप्पागोष्टी करायचे तेव्हा मी त्यांच्यात बसून त्यांच्या गप्पा ऐकायचो. ते दोघे काय बोलायचे त्यातलं सगळंच मला समजत नसलं, तरी वर्णभेद असलेल्या त्या काळात प्रचाराचं कार्य आणखी चांगल्या प्रकारे कसं करता येईल याविषयी ते चर्चा करायचे तेव्हा वडिलांच्या शेजारी बसून त्यांच्या गप्पा ऐकायला मला फार आवडायचं.

सन १९३० च्या सुरुवातीला आमच्या कुटुंबावर एक मोठं संकट कोसळलं. माझी आई, जी केवळ २० वर्षांची होती ती वारली. त्या वेळी माझी बहीण डॉरिस ही चार वर्षांची होती आणि मी अवघ्या दोन वर्षांचा होतो. आई वारल्यानंतर, आम्हा मुलांना सांभाळण्याची जबाबदारी एकट्या वडिलांवर पडली. वडिलांचा नुकताच बाप्तिस्मा झाला होता, तरीसुद्धा त्यांनी उत्तम आध्यात्मिक प्रगती केली.

माझ्या जीवनाला आकार देणारी उदाहरणं

सन १९३३ मध्ये वडिलांना एक खूप चांगली ख्रिस्ती बहीण भेटली. तिचं नाव लिली मे ग्वेन्डोलिन थॉमस. त्यांची भेट झाल्यानंतर लवकरच त्यांनी लग्न केलं. यहोवाची सेवा एकनिष्ठेनं करण्याच्या बाबतीत आईवडील दोघांनी आम्हा मुलांसमोर उत्तम उदाहरण मांडलं.

सन १९३८ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व मंडळ्यांना एका ठरावाचं समर्थन करण्यास सांगण्यात आलं. त्या ठरावानुसार, स्थानिक मंडळीतील वडिलांना आता स्थानिक मंडळी निवडणार नव्हती; तर ब्रुकलिन, न्यू यॉर्कमध्ये असलेल्या आपल्या मुख्यालयातून त्यांची नेमणूक केली जाणार होती. चॅटनूगा मंडळीतील काही जण हा बदल स्वीकारण्यास तयार नव्हते. पण, माझ्या वडिलांनी या संघटनात्मक बदलाला बिनशर्त पाठिंबा दिला. एकनिष्ठेच्या बाबतीत त्यांचं उदाहरण व माझ्या आईनं त्यांना मनापासून केलेलं सहकार्य या गोष्टींनी आजपर्यंत मला मदत केली आहे.

बाप्तिस्मा आणि पूर्ण-वेळची सेवा

सन १९४० मध्ये आमच्या मंडळीतील अनेकांनी डिट्रॉइट, मिशिगन इथं भरलेल्या अधिवेशनाला बसनं प्रवास केला. आमच्या बसमधील काही जणांनी त्या अधिवेशनात बाप्तिस्मा घेतला. मी पाच वर्षांचा होतो तेव्हापासून प्रचार कार्य करत होतो आणि सेवाकार्यात खूप आवेशी होतो. त्यामुळे काहींनी मला विचारलं, ‘तू बाप्तिस्मा का घेतला नाही?’

त्यांनी मला असं विचारलं तेव्हा मी म्हणालो, “बाप्तिस्मा नेमका काय आहे याची मला पूर्ण माहिती नाही.” माझ्या वडिलांनी हे ऐकलं तेव्हा ते चकित झाले. तेव्हापासून, त्यांनी मला बाप्तिस्मा म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय हे समजावून सांगण्यासाठी अधिक प्रयत्न केला. चार महिन्यांनंतर एका कडाक्याच्या थंडीच्या दिवशी म्हणजे १ ऑक्टोबर १९४० रोजी चॅटनूगा नगराच्या बाहेर एका तळ्यात माझा बाप्तिस्मा झाला.

वयाच्या १४ व्या वर्षापासून, मी दर वर्षी शाळेच्या उन्हाळ्याच्या सुटीत पायनियर सेवा करू लागलो. मी टेनिसीतील लहान नगरांत व शेजारच्या जॉर्जिया राज्यात प्रचार कार्य करायचो. मी रोज सकाळी लवकर उठायचो व दुपारचं जेवण सोबत घेऊन सकाळी सहाच्या ट्रेननं किंवा बसनं क्षेत्रात जायचो आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी यायचो. दुपारसाठी घेतलेलं जेवण सहसा दुपारच्या आधीच संपायचं. माझ्याजवळ पैसे असले, तरी कृष्णवर्णीय असल्यामुळे मी स्थानिक दुकानातून काहीही विकत घेऊ शकत नव्हतो. एकदा मी आईस्क्रीम विकत घेण्यासाठी एका दुकानात शिरलो, पण मला बाहेर घालवण्यात आलं. पण, एका प्रेमळ श्‍वेतवर्णीय स्त्रीनं मला आईस्क्रीम बाहेर आणून दिलं.

मी उच्च माध्यमिक शाळेत गेलो तेव्हा दक्षिणेकडे नागरी हक्कांची चळवळ वेग धरत होती. एनएएसीपी (नॅशनल असोसिएशन फॉर द ॲडवान्समेंट ऑफ कलर्ड पिपल) यांसारख्या संघटना विद्यार्थ्यांना समान हक्कांसाठी लढण्याचं प्रोत्साहन देत होत्या. आम्हालासुद्धा सभासद बनण्यास आर्जवण्यात आलं. माझ्या शाळेचं व इतर अनेक कृष्णवर्णीय शाळांचं केवळ एकच लक्ष्य होतं. ते म्हणजे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला चळवळीत भाग घेण्याचं प्रोत्साहन देणं. मी “आपल्या वंशाला पाठिंबा” दिला पाहिजे असं सांगून त्यांनी माझ्यावरसुद्धा हा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण, मी साफ नकार दिला. मी त्यांना म्हणालो, की देव पक्षपाती नाही आणि तो कोणत्याही एका वंशाला दुसऱ्‍या वंशापेक्षा श्रेष्ठ समजत नाही. त्यामुळे, अशा अन्यायाचा अंत देवच करेल असा माझा विश्‍वास आहे.—योहा. १७:१४; प्रे. कृत्ये १०:३४, ३५.

उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण संपल्याच्या काही काळानंतर मी न्यू यॉर्क सिटीत स्थलांतर करण्याचं ठरवलं. पण, वाटेत मी फिलाडेल्फिया, पेन्सिल्वेनिया इथं काही मित्रांना भेटण्यासाठी थांबलो; यांना मी एका अधिवेशनात भेटलो होतो. या मंडळीत श्‍वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय असे दोन्ही बंधुभगिनी होते. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एका संमिश्र मंडळीत उपस्थित राहिलो होतो. त्या वेळी प्रवासी पर्यवेक्षकांची भेट चालू होती; आणि ‘पुढच्या सभेत तुला एक भाग नेमून दिला आहे’ असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे तिथं राहण्याचा निर्णय घेणं मला सोपं झालं.

फिलाडेल्फियामध्ये असताना मला जेरल्डीन व्हाईट नावाची एक तरुण बहीण भेटली. मी तिला जेरी म्हणायचो. तिला बायबलचं चांगलं ज्ञान होतं आणि घरोघरच्या सेवाकार्यात घरमालकांशी संभाषण साधण्यात ती तरबेज होती. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याप्रमाणेच तिलासुद्धा एक पायनियर व्हायचं होतं. २३ एप्रिल १९४९ रोजी आम्ही लग्न केलं.

गिलियडचं आमंत्रण

सुरुवातीपासून आमचं एकच ध्येय होतं; ते म्हणजे गिलियड प्रशालेला उपस्थित राहणं व मिशनरी म्हणून परदेशात सेवा करणं. पण, दरम्यान गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्यासही आम्ही तयार होतो, कारण त्यामुळे गिलियडसाठी तयारी करण्यास आम्हाला मदत मिळणार होती. काही काळानंतर, आम्हाला न्यू जर्झीतील लॉनसाईडमध्ये सेवा करण्यासाठी पाठवण्यात आलं; त्यानंतर पेन्सिल्वेनियातील चेस्टर शहरात, आणि शेवटी न्यू जर्झीतील ॲटलान्टिक सिटीमध्ये पाठवण्यात आलं. ॲटलान्टिक सिटीमध्ये असताना आमच्या लग्नाला दोन वर्षं पूर्ण झाली होती. त्यामुळे आम्ही गिलियडसाठी अर्ज करू शकत होतो. पण, एक समस्या होती.

सन १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला, अनेक तरुणांची सक्‍तीनं लष्करात भरती केली जात होती आणि त्यांना कोरियाविरुद्धच्या लढाईत पाठवलं जात होतं. पण, यहोवाचे साक्षीदार या बाबतीत तटस्थ भूमिका घेत असल्यामुळे फिलाडेल्फियातील लष्करभरती मंडळ कदाचित यहोवाच्या साक्षीदारांच्या विरुद्ध होते. पण शेवटी, एका न्यायाधीशानं मला सांगितलं की एफबीआयनं (फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन) माझी तपासणी केली होती आणि तटस्थ राहण्याचा माझा दावा खरा असल्याचं सिद्ध झालं होतं. मी एक धार्मिक सेवक असल्यामुळे ११ जानेवारी १९५२ रोजी अध्यक्षीय अपील मंडळानं (प्रेसिडेंशियल अपील बोर्ड) मला लष्करी सेवेतून सूट दिली.

त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात मला व जेरीला गिलियडच्या २० व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. हा वर्ग सप्टेंबर महिन्यात सुरू झाला. माझी बहीण डॉरिस गिलियडच्या १३ व्या वर्गातून पदवीधर झाली होती आणि ती ब्राझीलमध्ये सेवा करत होती. त्यामुळे गिलियड प्रशालेचा अभ्यास करत असताना आम्ही अपेक्षा केली होती, की सेवा करण्यासाठी आम्हाला परदेशात पाठवलं जाईल. पण, आम्हाला विभागीय कार्याची म्हणजे अमेरिकेच्या दक्षिणेतील ॲलाबॅमा राज्यातील कृष्णवर्णीय मंडळ्यांना भेटी देण्याची नेमणूक मिळाली तेव्हा आम्हाला खूप आश्‍चर्य वाटलं. त्यामुळे आम्ही काहीसे निराश झालो, कारण आम्हा दोघांचीही परदेशात सेवा करण्याची इच्छा होती.

आम्ही सर्वात प्रथम हंट्‌सविलमधील मंडळीला भेट दिली. तिथं पोहचल्यानंतर, आम्ही ज्या ख्रिस्ती बहिणीच्या घरी राहणार होतो तिच्या घरी गेलो. आम्ही आमचं सामान उतरवत होतो तेव्हा आम्ही तिला फोनवर, “मुलं पोहचली आहेत” असं म्हणताना ऐकलं. आम्ही केवळ २४ वर्षांचे होतो आणि त्याहून लहान दिसत होतो. त्या बहिणीनं आम्हाला “मुलं” असं जे नाव दिलं होतं त्याच नावानं त्या विभागातील सगळे आम्हाला बोलवायचे.

अमेरिकेच्या दक्षिण भागाला सहसा बायबल-बेल्ट म्हणजे बायबलचा प्रदेश म्हटलं जायचं, कारण तिथल्या बहुतेक लोकांना बायबलविषयी खूप आदर होता. त्यामुळे तिथल्या लोकांशी संभाषण सुरू करण्यासाठी आम्ही सहसा पुढील तीन मुद्द्‌यांची प्रस्तावना वापरायचो:

(१) जगाच्या परिस्थितीवर एक संक्षिप्त टिपणी.

(२) त्यावर बायबलमध्ये सांगितलेला उपाय.

(३) बायबलनुसार आपण काय केले पाहिजे.

मग बायबलचा अभ्यास करण्यासाठी आम्ही उचित साहित्य सादर करत असू. ही प्रस्तावना इतकी यशस्वी ठरली की १९५३ साली न्यू यॉर्कमध्ये झालेल्या नवीन जगातील समाज या संमेलनात मला एक भाग नेमण्यात आला. त्यात मी त्या तीन मुद्द्‌यांच्या प्रस्तावनेचं प्रात्यक्षिक दाखवलं.

त्यानंतर १९५३ च्या उन्हाळ्यात मला दक्षिणेकडील कृष्णवर्णियांच्या विभागात प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्यास नेमण्यात आलं. आमचं क्षेत्र व्हर्जिनियापासून ते फ्लॉरिडापर्यंत आणि दूर पश्‍चिमेकडील ॲलाबॅमापासून ते टेनिसीपर्यंत खूप मोठं होतं. साहजिकच, प्रवासी पर्यवेक्षकांना निरनिराळ्या परिस्थितीशी जुळवून घेणं गरजेचं होतं. उदाहरणार्थ, आम्ही बरेचदा अशा घरांत राहिलो जिथं स्नानगृह नसायचं. त्यामुळे आम्ही स्वयंपाकघराच्या मागं पत्र्याच्या टबमध्ये अंघोळ करायचो. पण, स्वयंपाकघराच्या मागची ही जागा सगळ्यात उबदार असायची.

वांशिक विलग्नीकरणाचं आव्हान

अमेरिकेच्या दक्षिण भागात सेवा करताना आमची कामं करून घेण्यासाठी आम्हाला चातुर्यानं व विचारपूर्वक वागावं लागायचं. कृष्णवर्णियांना सार्वजनिक धुलाई गृहांमध्ये आपले कपडे देण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे जेरी तिथं जायची आणि म्हणायची की हे कपडे “मिसेस थॉम्पसन” यांचे आहेत. अनेकांना वाटायचं की जेरी एक मोलकरीण आहे आणि “मिसेस थॉम्पसन” ही घरमालकीण आहे. जेव्हा प्रांतीय पर्यवेक्षक द न्यू वर्ल्ड सोसायटी इन ॲक्शन हा चलचित्रपट दाखवत होते तेव्हा मी दुकानात फोन करून “मिस्टर थॉम्पसन” यांच्या नावानं एक मोठा पडदा आरक्षित करायचो. नंतर, मी दुकानात जाऊन तो घेऊन यायचो. आम्ही नेहमी सभ्यपणे वागायचो आणि त्यामुळे सहसा कोणत्याही अडचणीविना आम्हाला आमचं सेवाकार्य पूर्ण करणं शक्य व्हायचं.

त्या ठिकाणी आणखी एक प्रकारचा भेदभाव होता. हा भेदभाव प्रादेशिक स्वरूपाचा असून तो अमेरिकेच्या उत्तर भागातील लोकांबद्दल होता. एका स्थानिक वृत्तपत्रानं एकदा अशी बातमी छापली की न्यू यॉर्कच्या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे जेम्स ए. थॉम्पसन, ज्युनियर, संमेलनात भाषण देणार आहेत. ही बातमी वाचल्यानंतर काहींना असं वाटलं की मी न्यू यॉर्कचा आहे आणि त्यामुळे संमेलनासाठी आरक्षित केलेलं एका शाळेचं सभागृह रद्द करण्यात आलं. मग मी त्या शाळेच्या मंडळाला जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझं शिक्षण चॅटनूगामध्ये झालं आहे. त्यानंतर आम्हाला त्या सभागृहात आमचं विभागीय संमेलन भरवण्याची परवानगी मिळाली.

सन १९५० च्या दशकाच्या मध्यात वांशिक तणाव खदखदत होता आणि त्यामुळे काही वेळा हिंसक कृत्यंही घडायची. १९५४ मध्ये अनेक प्रांतीय संमेलनांत भाषण देणाऱ्‍यांमध्ये एकही कृष्णवर्णीय बांधव नसल्यामुळे काही साक्षीदारांच्या भावना दुखावल्या. पण, आम्ही आमच्या कृष्णवर्णीय बांधवांना धीर धरण्यास सांगितलं. त्याच्या पुढच्याच उन्हाळ्यात भाषण देण्यासाठी मला नेमण्यात आलं. त्यानंतर, अमेरिकेच्या दक्षिण भागातील अधिकाधिक बांधवांना संमेलन कार्यक्रमांत भाग मिळू लागले.

कालांतरानं, अमेरिकेच्या दक्षिण भागातील वांशिक हिंसाचार कमी झाला आणि श्‍वेतवर्णीय व कृष्णवर्णीय बांधवांच्या सभा एकत्र होऊ लागल्या. त्यामुळे, प्रचारकांना वेगवेगळ्या मंडळ्यांमध्ये नेमणं आणि मंडळीचं क्षेत्र बदलणं गरजेचं होतं. तसंच, मंडळीतील पर्यवेक्षकांना नवीन जबाबदाऱ्‍या हाताळणंही गरजेचं होतं. काही श्‍वेतवर्णीय व कृष्णवर्णीय बांधवांना मात्र ही नवीन व्यवस्था आवडली नाही. पण, बहुतेक बांधव आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणे निःपक्षपाती होते. किंबहुना, अनेक जण वेगळ्या वंशाचे असूनही एकमेकांचे जिवाभावाचे मित्र होते. याचा अनुभव आमच्या कुटुंबानं १९३० च्या व १९४० च्या दशकांत मी लहानाचा मोठा होत असताना घेतला होता.

एक नवीन नेमणूक

सन १९६९ च्या जानेवारी महिन्यात मला आणि जेरीला दक्षिण अमेरिकेतील गायाना या ठिकाणी जाण्याचं आमंत्रण मिळालं आणि आम्ही ते आमंत्रण मोठ्या आनंदानं स्वीकारलं. आम्ही आधी ब्रुकलिन, न्यू यॉर्कमध्ये गेलो. तिथं मला गायानातील प्रचार कार्याचं पर्यवेक्षण करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. मग, १९६९ च्या जुलै महिन्यात आम्ही गायानामध्ये पोहचलो. १६ वर्षं प्रवासी कार्य केल्यानंतर एका ठिकाणी स्थायिक होणं हा आमच्यासाठी खूप मोठा बदल होता. जेरी आपला बहुतेक वेळ मिशनरी म्हणून क्षेत्र सेवेत खर्च करायची आणि मी शाखा कार्यालयात काम करायचो.

शाखा कार्यालयात असताना, गवत कापण्यापासून ते २८ मंडळ्यांना साहित्य पाठवण्यापर्यंत मी अनेक कामं केली. तसंच, मी ब्रुकलिनमधील मुख्यालयाशी पत्रव्यवहारही करायचो. मी दररोज १४ ते १५ तास काम करायचो. आमच्यासाठी हे कष्टाचं काम असलं, तरी आम्ही आमच्या नेमणुकीत खूश होतो. आम्ही पहिल्यांदा गायानामध्ये आलो तेव्हा तिथं ९५० प्रचारक होते; आज तिथं २,५०० हून अधिक प्रचारक आहेत.

गायानाचं हवामान आणि तिथल्या विदेशी फळ-भाज्या आम्हाला आवडत असल्या, तरी बायबलचं सत्य जाणून घेण्यास आसुसलेले नम्र लोक देवाच्या राज्याविषयी शिकत होते ही आमच्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट होती. जेरी सहसा दर आठवडी २० बायबल अभ्यास चालवायची आणि आम्ही ज्यांच्यासोबत अभ्यास केला त्यांपैकी बहुतेकांनी प्रगती करून बाप्तिस्मा घेतला. काही काळानंतर, यांच्यापैकी काही जण पायनियर सेवा करू लागले, काही जण ख्रिस्ती वडील बनले व काही जण मिशनरी बनण्यासाठी गिलियडलाही गेले.

आव्हानं, खासकरून आरोग्यासंबंधी

सन १९८३ मध्ये अमेरिकेत राहणाऱ्‍या माझ्या आईवडिलांना मदतीची गरज होती. याविषयी चर्चा करण्यासाठी मी, जेरी व डॉरिस आम्ही तिघं एकत्र आलो. डॉरिसनं ब्राझीलमध्ये मिशनरी म्हणून ३५ वर्षं सेवा केली होती. पण, आता आईवडिलांना सांभाळण्यासाठी ती घरी जाण्यास तयार झाली. ती म्हणाली, ‘जर एका व्यक्‍तीनं काम भागत असेल, तर दोन मिशनऱ्‍यांना आपली सेवा सोडण्याची काय गरज?’ आमच्या आईवडिलांचा मृत्यू झाला तेव्हापासून डॉरिस चॅटनूगामध्ये राहून खास पायनियर सेवा करत आहे.

सन १९९५ मध्ये मला प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग असल्याचं निदान करण्यात आलं आणि आम्हाला अमेरिकेला परत जावं लागलं. आम्ही उत्तर कॅरोलाइना राज्यातील गोल्ड्‌सबरोमध्ये स्थायिक झालो, कारण हे ठिकाण टेनिसीतील माझ्या कुटुंबाच्या व पेन्सिल्वेनियातील जेरीच्या कुटुंबाच्या मधे होतं. सध्या माझा कर्करोग नियंत्रणात आहे आणि आम्ही गोल्ड्‌सबरो मंडळीत दुर्बल खास पायनियर म्हणून सेवा करत आहोत.

मी पूर्ण-वेळच्या सेवेत ६५ हून अधिक वर्षं खर्च केली आहेत. यहोवाची सेवा करण्यासाठी मी व जेरी जीवनात बदल करण्यास तयार होतो. आणि त्यामुळे यहोवानं आमचं जीवन समृद्ध केलं. याबद्दल मी मनापासून यहोवाचे आभार मानतो. दाविदाचे शब्द किती खरे आहेत ज्यानं म्हटलं: ‘निष्ठावंतांशी [यहोवा] निष्ठेने वागतो.’—२ शमु. २२:२६, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.

[३ पानांवरील चित्रे]

माझे वडील व बंधू निकोल्स यांनी माझ्यासमोर उत्तम उदाहरण मांडलं

[४ पानांवरील चित्रे]

सन १९५२ मध्ये, जेरीसोबत गिलियडला जाताना

[५ पानांवरील चित्रे]

गिलियडला उपस्थित राहिल्यानंतर आम्हाला दक्षिण भागात प्रवासी कार्य करण्यास नेमण्यात आलं

[६ पानांवरील चित्र]

सन १९६६ मध्ये, प्रवासी पर्यवेक्षक व त्यांच्या पत्नी संमिश्र प्रांतीय अधिवेशनाची तयारी करत असताना

[७ पानांवरील चित्र]

गायानामध्ये आनंदानं मिशनरी सेवा करताना