जागृत राहण्याविषयी येशूच्या प्रेषितांकडून शिका
जागृत राहण्याविषयी येशूच्या प्रेषितांकडून शिका
“माझ्याबरोबर जागे राहा.”—मत्त. २६:३८.
तुम्ही पुढील बाबतीत काय शिकू शकता:
कोठे प्रचार करायचा याविषयीच्या मार्गदर्शनासंबंधी?
प्रार्थना करण्याच्या बाबतीत जागृत राहण्यासंबंधी?
अडथळे असूनही साक्ष देण्याच्या बाबतीत?
१-३. येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री त्याचे प्रेषित कशा प्रकारे जागृत राहण्यास चुकले, आणि त्यांनी आपल्या चुकीपासून धडा घेतल्याचे कशावरून दिसते?
येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्रीच्या दृश्याची कल्पना करा. येशू आपल्या एका आवडत्या ठिकाणी, म्हणजे जेरूसलेमच्या पूर्वेला असलेल्या गेथशेमानेच्या बागेत आला आहे. तो आपल्या विश्वासू प्रेषितांसोबत येथे आला आहे. त्याच्या मनावर व हृदयावर खूप ताण असल्यामुळे, प्रार्थना करण्यासाठी त्याला एकांताची गरज आहे.—मत्त. २६:३६; योहा. १८:१, २.
२ येशूच्या प्रेषितांपैकी तिघे जण, म्हणजे पेत्र, याकोब आणि योहान त्या बागेत खूप आतमध्ये असलेल्या एका ठिकाणी त्याच्यासोबत जातात. येशू त्यांना “येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा” असे सांगतो व तो प्रार्थना करण्यासाठी आणखी पुढे जातो. तो परत येतो तेव्हा त्याला त्याचे मित्र झोपलेले आढळतात. तो त्यांना पुन्हा असे आर्जवतो: “जागृत राहा.” तरीसुद्धा, ते आणखी दोन वेळा झोपी जातात! नंतर, त्याच रात्री त्याचे सर्व प्रेषित आध्यात्मिक रीत्या जागृत राहण्यास चुकतात. इतकेच नव्हे, तर ते येशूला सोडून पळूनही जातात!—मत्त. २६:३८, ४१, ५६.
३ जागृत न राहिल्याबद्दल प्रेषितांना नक्कीच पस्तावा झाला. त्या विश्वासू पुरुषांनी आपल्या चुकीपासून लगेच धडा घेतला. जागृत राहण्याविषयी त्यांनी पुढे एक उल्लेखनीय उदाहरण मांडल्याचे प्रेषितांची कृत्ये पुस्तक दाखवते. त्यांच्या विश्वासू जीवनक्रमाचा त्यांच्या बंधुभगिनींवर नक्कीच प्रभाव पडला असेल व त्यांना त्यांच्याप्रमाणे जागृत राहण्याची प्रेरणा मिळाली असेल. पूर्वी कधी नव्हे इतकी आज आपल्याला जागृत राहण्याची गरज आहे. (मत्त. २४:४२) तर मग, जागृत राहण्याविषयी प्रेषितांची कृत्ये पुस्तकातून जे तीन धडे आपण शिकतो त्यांची आपण चर्चा करू या.
प्रचार कोठे करावा याविषयीच्या मार्गदर्शनासाठी जागृत
४, ५. पौलाने व त्याच्या प्रवासी सहकाऱ्यांनी कशा प्रकारे पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन अनुभवले?
४ सर्वात पहिले म्हणजे, प्रचार कोठे करावा याविषयीच्या मार्गदर्शनासाठी येशूचे प्रेषित जागृत होते. एका असाधारण दौऱ्यादरम्यान प्रेषित पौलाचे व त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी येशूने यहोवाकडून त्याला मिळालेल्या पवित्र आत्म्याचा उपयोग कसा केला याविषयी एका अहवालात आपल्याला शिकायला मिळते. (प्रे. कृत्ये २:३३) आपण त्या दौऱ्याचे परीक्षण करू या.—प्रेषितांची कृत्ये १६:६-१०.
५ पौल, सीला आणि तीमथ्य हे दक्षिण गलतियातील लुस्त्र या शहरातून प्रवासाला निघाले. अनेक दिवसांनंतर ते एका रोमी महामार्गावर पोहचले. हा मार्ग पश्चिमेकडे आशिया प्रांतातील दाट लोकवस्तीच्या प्रदेशाकडे जाणारा होता. त्या प्रदेशातील हजारो लोकांना ख्रिस्ताविषयी ऐकण्याची गरज होती. त्यामुळे, या मार्गाने त्या शहरांकडे जाण्याची पौलाची व त्याच्या सोबत्यांची इच्छा होती. पण, कोणत्यातरी गोष्टीने त्यांना अडवले. ६ वे वचन म्हणते: “आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतांमधून गेले.” पवित्र आत्म्याने कोणत्यातरी मार्गाने त्या प्रवाशांना आशिया प्रांतात प्रचार करण्यास मना केले. बहुधा येशू, देवाच्या आत्म्याच्या द्वारे, पौलाला व त्याच्या सोबत्यांना एका वेगळ्या दिशेने जाण्यास मार्गदर्शित करू इच्छित होता.
६, ७. (क) पौल आणि इतर प्रवासी बिथुनियाजवळ आले तेव्हा काय झाले? (ख) शिष्यांनी कोणता निर्णय घेतला, आणि त्याचा परिणाम काय झाला?
६ तर मग, हे उत्सुक प्रवासी कोठे गेले? ७ वे वचन म्हणते: “आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही.” आशियामध्ये प्रचार करण्यास मना केल्यामुळे, पौल व त्याचे सोबती, बिथुनियातील शहरांत प्रचार करण्याच्या उद्देशाने उत्तरेकडे वळले. पण, ते बिथुनियाजवळ पोहचले, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी येशूने पुन्हा पवित्र आत्म्याचा उपयोग केला. आता हे पुरुष नक्कीच बुचकळ्यात पडले असतील. काय प्रचार करायचा व कसा प्रचार करायचा हे त्यांना माहीत होते, पण कोठे प्रचार करायचा हे त्यांना माहीत नव्हते. आपण असे म्हणू शकतो, की त्यांनी आशियाचे दार ठोठावले होते, पण ते व्यर्थ ठरले. त्यांनी बिथुनियाचे दार ठोठावले होते, पण तेही व्यर्थ ठरले. तर मग, त्यांनी प्रयत्न करण्याचे सोडून दिले का? नाही, या आवेशी प्रचारकांनी मुळीच असे केले नाही!
७ या क्षणी, त्या पुरुषांनी असा एक निर्णय घेतला जो काहीसा विचित्र वाटला असावा. ८ वे वचन म्हणते: “ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसाला खाली गेले.” ते प्रवासी पश्चिमेकडे वळले आणि अनेक शहरे मागे टाकून ५६३ किलोमीटरचा रस्ता चालून त्रोवसाला पोहचले जेथून मासेदोनियात प्रवेश करणे सोपे होते. तेथे पौलाने व त्याच्या सोबत्यांनी तिसऱ्यांदा एक दार ठोठावले; आणि या वेळी मात्र त्यांच्याकरता दार उघडले गेले! पुढे काय घडले त्याविषयी ९ व्या वचनात सांगितले आहे: “तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की, मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर.” सरतेशेवटी, कोठे प्रचार करायचा हे पौलाला माहीत झाले. तेव्हा, विलंब न करता ते पुरुष जहाजाने मासेदोनियाला गेले.
८, ९. पौलाच्या प्रवासाविषयी असलेल्या अहवालापासून आपण काय शिकू शकतो?
८ या अहवालापासून आपण काय शिकू शकतो? याकडे लक्ष द्या की पौल आशियाला जाण्यास निघाला, त्यानंतरच देवाच्या आत्म्याने हस्तक्षेप केला. मग, पौल बिथुनियाजवळ पोहचला, त्यानंतरच येशूने त्याला अडवले. आणि शेवटी, पौल त्रोवसाला पोहचला, त्यानंतरच येशूने त्याला मासेदोनियात जाण्यास मार्गदर्शित केले. मंडळीचे मस्तक या नात्याने, येशू आपल्यालाही अशाच प्रकारे मार्गदर्शित करू शकतो. (कलस्सै. १:१८) उदाहरणार्थ, तुम्ही कदाचित पायनियर सेवा करण्याचा किंवा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल. पण, तुम्ही आपले ध्येय गाठण्यासाठी पावले उचलता, त्यानंतरच कदाचित येशू, देवाच्या आत्म्याच्या द्वारे तुम्हाला मार्गदर्शन देईल. उदाहरणार्थ, एक वाहनचालक आपले वाहन डावीकडे किंवा उजवीकडे तेव्हाच वळवू शकतो, जेव्हा वाहन पुढे जात असते. त्याच प्रकारे, आपण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले, तरच येशू आपल्याला आपले प्रचार कार्य वाढवण्यासाठी मार्गदर्शित करू शकतो.
९ पण, तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे फळ लगेच तुम्हाला मिळत नाही तेव्हा काय? देवाचा आत्मा तुम्हाला मार्गदर्शित करत नाही असा विचार करून तुम्ही प्रयत्न करण्याचे सोडून दिले पाहिजे का? हे लक्षात असू द्या, की पौलाच्या प्रयत्नांनादेखील लगेच यश आले नाही. तरीसुद्धा, जोपर्यंत प्रचार कार्यासाठी एक दार उघडले गेले नाही, तोपर्यंत तो शोधत व ठोठावत राहिला. त्याच प्रकारे, एक “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” शोधण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केल्यास तुम्हालाही प्रतिफळ मिळू शकते.—१ करिंथ. १६:९.
प्रार्थना करण्याच्या बाबतीत जागृत
१०. जागृत राहण्यासाठी निरंतर प्रार्थना करणे अत्यावश्यक आहे हे कशावरून दिसून येते?
१० जागृत राहण्याविषयी, आपण पहिल्या शतकातील आपल्या ख्रिस्ती बांधवांकडून जो दुसरा धडा घेऊ शकतो त्याचा आता विचार करा. तो धडा म्हणजे, प्रार्थना करण्याच्या बाबतीत ते जागृत होते. (१ पेत्र ४:७) जागृत राहण्यासाठी निरंतर प्रार्थना करणे अत्यावश्यक आहे. येशूला गेथशेमानेच्या बागेत अटक करण्यात आली त्याआधी त्याने आपल्या तीन प्रेषितांना काय सांगितले होते, ते आठवा. त्याने म्हटले: “जागृत राहा व प्रार्थना करा.”—मत्त. २६:४१.
११, १२. हेरोदाने पेत्रासहित इतर ख्रिश्चनांचा का व कशा प्रकारे छळ केला?
११ येशूने गेथशेमाने बागेत प्रार्थना करण्याचा सल्ला दिला त्या वेळी पेत्रही तेथे होता. कळकळीने केलेल्या प्रार्थनांमध्ये किती सामर्थ्य असते हे पेत्राने नंतर स्वतः अनुभवले. (प्रेषितांची कृत्ये १२:१-६ वाचा.) प्रेषितांची कृत्ये १२ व्या अध्यायाच्या सुरुवातीला, आपल्याला दिसून येते की हेरोदाने यहुद्यांची पसंती मिळवण्यासाठी ख्रिश्चनांचा छळ केला. त्याला बहुधा हे माहीत होते की याकोब एक प्रेषित होता व येशूसोबत त्याचा अगदी जवळचा नातेसंबंध होता. म्हणून, हेरोदाने याकोबाला “तरवारीने” जिवे मारले. (वचन २) अशा प्रकारे, मंडळीने एका प्रिय प्रेषिताला गमावले. बांधवांसाठी ही किती मोठी परीक्षा होती!
१२ हेरोदाने नंतर काय केले? तिसऱ्या वचनात असे सांगितले आहे: “ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाहि धरण्यास पुढे सरसावला.” पण, याआधी काही प्रेषितांना चमत्कारिक रीत्या तुरुंगातून बाहेर काढण्यात आले होते, ज्यांपैकी पेत्रदेखील एक होता. (प्रे. कृत्ये ५:१७-२०) याविषयी हेरोदाला कदाचित माहीत होते. म्हणून, या धूर्त राजकारण्याने कोणतीही जोखीम घेतली नाही. त्याने पेत्राला “तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता.” (वचन ४) विचार करा! हेरोदाने पेत्राला दोन शिपायांच्या मध्ये साखळ्यांनी बांधले आणि तो निसटून जाऊ नये म्हणून १६ शिपाई रात्रंदिवस पाळ्यांमध्ये त्याची रखवाली करत होते. यहुद्यांना खूश करण्यासाठी पेत्राला वल्हांडण सणानंतर लोकांपुढे उपस्थित करून त्याला मारून टाकण्याचा हेरोदाचा हेतू होता. अशा बिकट परिस्थितीत, पेत्राचे सहविश्वासू बांधव काय करणार होते?
१३, १४. (क) पेत्राला तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा मंडळीची प्रतिक्रिया काय होती? (ख) प्रार्थनेच्या बाबतीत पेत्राच्या सहविश्वासू बांधवांनी जे उदाहरण मांडले त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१३ अशा वेळी नेमके काय करायचे हे मंडळीला माहीत होते. ५ व्या वचनात असे म्हटले आहे: “ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता; परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.” होय, आपल्या प्रिय बंधूसाठी ते कळकळीने, मनापासून प्रार्थना करत होते. याकोबाच्या मृत्यूमुळे ते निराश झाले नव्हते; आणि प्रार्थनेचा काहीही परिणाम होणार नाही असाही दृष्टिकोन त्यांनी बाळगला नाही. त्या उलट, विश्वासू उपासकांच्या प्रार्थना यहोवा खूप मोलाच्या समजतो हे त्यांना माहीत होते. अशा प्रार्थना त्याच्या इच्छेनुसार असल्यास, तो त्या प्रार्थनांचे उत्तर देतो.—इब्री १३:१८, १९; याको. ५:१६.
१४ पेत्राच्या सहविश्वासू बांधवांनी जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण काय शिकू शकतो? हेच, की जागृत राहण्यासाठी आपण केवळ स्वतःसाठीच प्रार्थना करू नये, तर आपल्या बंधुभगिनींसाठीदेखील प्रार्थना करावी. (इफिस. ६:१८) परीक्षांचा सामना करत असलेला एखादा बंधू किंवा भगिनी तुम्हाला माहीत आहे का? काही जण कदाचित छळाचा, सरकारी बंदीचा, किंवा नैसर्गिक संकटांचा सामना करत असतील. अशा बंधुभगिनींसाठी तुम्हाला प्रार्थना करता येईल का? तुम्ही कदाचित अशाही काही बंधुभगिनींना ओळखत असाल ज्यांच्या समस्या लगेच लक्षात येत नाहीत. ते कदाचित कौटुंबिक समस्यांचा, निराशेचा, किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असतील. तुम्ही प्रार्थनेद्वारे यहोवाशी, म्हणजे ‘जो प्रार्थना ऐकतो’ त्याच्याशी संवाद साधता तेव्हा तुम्ही अशा विशिष्ट व्यक्तींचा त्यांच्या नावाने उल्लेख करू शकता का?—स्तो. ६५:२.
१५, १६. (क) यहोवाच्या देवदूताने कशा प्रकारे पेत्राला तुरुंगातून सोडवले त्याचे वर्णन करा. (खालील चित्र पाहा.) (ख) यहोवाने ज्या प्रकारे पेत्राची सुटका केली त्याचा विचार केल्याने आपल्याला दिलासा का मिळतो?
१५ पण, पेत्राच्या बाबतीत घटनांनी कोणते वळण घेतले? पेत्र आपल्या तुरुंगवासाच्या शेवटल्या रात्री दोन शिपायांच्या मध्ये गाढ झोपला होता, तेव्हा त्याने एकापाठोपाठ एक अनेक अद्भुत घटना अनुभवल्या. (प्रेषितांची कृत्ये १२:७-११ वाचा.) जे घडले त्याचे चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे करा: पेत्र ज्या खोलीत आहे ती खोली अचानक लख्ख प्रकाशाने भरून जाते. एक देवदूत तेथे प्रकट होतो, पण शिपाई बहुधा त्याला पाहू शकत नाहीत. तो देवदूत लगबगीने पेत्राला जागे करतो. पेत्राच्या हातांत असलेल्या साखळ्या सहज गळून पडतात! नंतर देवदूत पेत्राला खोलीच्या बाहेर पहारा देत असलेल्या शिपायांच्या समोरून आणि “आपोआप” उघडलेल्या एका मोठ्या लोखंडी दरवाजातून बाहेर घेऊन जातो. तुरुंगाच्या बाहेर पोहचल्यावर देवदूत अदृश्य होतो. आता पेत्र मोकळा आहे!
१६ यहोवाजवळ आपल्या सेवकांची सुटका करण्याचे किती सामर्थ्य आहे याचा विचार केल्याने आपला विश्वास दृढ होत नाही का? अर्थात, आज यहोवाने चमत्कारिक रीत्या आपली सुटका करावी अशी अपेक्षा आपण करत नाही. तरीसुद्धा, तो आपल्या लोकांसाठी आपल्या सामर्थ्याचा वापर करतो यावर आपला पूर्ण विश्वास आहे. (२ इति. १६:९) तो त्याच्या सामर्थ्यशाली पवित्र आत्म्याद्वारे, आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही परीक्षेवर मात करण्यास आपल्याला मदत करू शकतो. (२ करिंथ. ४:७; २ पेत्र २:९) आणि यहोवा लवकरच, मृत्यूच्या कैदेत असलेल्या असंख्य लोकांना मुक्त करण्यासाठी त्याच्या पुत्राला सामर्थ्यवान करेल. (योहा. ५:२८, २९) देवाच्या अभिवचनांवरील विश्वासामुळे आज आपल्याला परीक्षांचा सामना करण्यासाठी कमालीचे धैर्य मिळू शकते.
अडथळे असूनही पूर्णपणे साक्ष देणे
१७. आवेशाने व तातडीच्या भावनेने प्रचार करण्याच्या बाबतीत पौलाने कशा प्रकारे उल्लेखनीय उदाहरण मांडले?
१७ जागृत राहण्याविषयी आपण प्रेषितांकडून तिसरा धडा घेऊ शकतो. अडथळे असूनही प्रेषित पूर्णपणे साक्ष देत राहिले. जागृत राहण्यासाठी आवेशाने व तातडीच्या भावनेने प्रचार करणे आवश्यक आहे. या बाबतीत प्रेषित पौलाचे उदाहरण उल्लेखनीय आहे. त्याने आवेशाने कार्य केले, दूरदूरपर्यंत प्रवास केला आणि अनेक मंडळ्यांची स्थापना केली. त्याने अनेक अडचणींचा सामना केला, पण कधीही आपला आवेश कमी होऊ दिला नाही किंवा तातडीची भावना गमावली नाही.—२ करिंथ. ११:२३-२९.
१८. रोममध्ये कैदेत असताना पौल कशा प्रकारे साक्ष देत राहिला?
१८ प्रेषितांची कृत्ये पुस्तकाच्या २८ व्या अध्यायात आपल्याला पौलाची जी शेवटली झलक पाहायला मिळते त्याविषयी आता आपण पाहू या. पौल रोमला पोहचला, जेथे त्याला रोमी सम्राट निरोसमोर उपस्थित राहायचे होते. पौल एक कैदी होता व त्याला कदाचित साखळीने एका शिपायाला बांधले होते. पण, कोणतीही बंधने या आवेशी प्रेषिताला गप्प ठेवू शकत नव्हती! पौल वेगवेगळ्या मार्गांनी साक्ष देत राहिला. (प्रेषितांची कृत्ये २८:१७, २३, २४ वाचा.) तीन दिवसांनंतर, पौलाने साक्ष देण्याच्या उद्देशाने तेथील यहुद्यांच्या मुख्य पुरुषांना आपल्याकडे बोलावून घेतले. नंतर, एका ठरवलेल्या दिवशी, त्याने आणखी मोठ्या प्रमाणात साक्ष दिली. २३ वे वचन म्हणते: “त्यांनी [स्थानिक यहुद्यांनी] त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिऱ्हाडी आले; त्यांस देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरिता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरिता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करीत होता.”
१९, २०. (क) साक्ष देण्याच्या बाबतीत पौल यशस्वी का ठरला? (ख) पौलाच्या श्रोत्यांपैकी प्रत्येकाने सुवार्ता स्वीकारली नाही तेव्हा पौलाची प्रतिक्रिया काय होती?
१९ साक्ष देण्याच्या बाबतीत पौल इतका यशस्वी का ठरला? २३ व्या वचनात याची अनेक कारणे ठळकपणे दाखवली आहेत, त्यांकडे लक्ष द्या. (१) पौलाचे लक्ष देवाच्या राज्यावर व येशू ख्रिस्तावर केंद्रित होते. (२) त्याने आपल्या श्रोत्यांना “खातरी” पटवून देण्याद्वारे, म्हणजे विश्वास ठेवण्यास सबळ कारणे देण्याद्वारे त्यांना मदत केली. (३) त्याने शास्त्रवचनांवरून तर्कवाद केला. (४) त्याने “सकाळपासून संध्याकाळपर्यंत” साक्ष देण्याद्वारे निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवली. पौलाने जबरदस्त साक्ष दिली, पण सर्वांनी सकारात्मक प्रतिक्रिया दाखवली नाही. २४ वे वचन म्हणते: “त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर कित्येक विश्वास ठेविनात.” परिणामी, पौलाच्या श्रोत्यांमध्ये मतभेद झाले, आणि ते तेथून निघून गेले.
२० पौलाच्या श्रोत्यांपैकी प्रत्येकाने सुवार्ता स्वीकारली नाही तेव्हा तो निराश झाला का? मुळीच नाही! प्रेषितांची कृत्ये २८:३०, ३१ आपल्याला सांगते: “तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला, आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे, आणि प्रभु येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवीत असे.” या उत्साहपूर्ण शब्दांनी प्रेषितांची कृत्ये या देवप्रेरित पुस्तकाचा समारोप होतो.
२१. पौलाने नजरकैदेत असताना जे उदाहरण मांडले त्यापासून आपण काय शिकू शकतो?
२१ पौलाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? पौल नजरकैदेत होता तेव्हा तो घरोघरी जाऊन प्रचार करू शकत नव्हता. तरीसुद्धा, त्याने सकारात्मक दृष्टिकोन बाळगला व जे त्याच्याकडे यायचे त्यांना तो साक्ष द्यायचा. त्याचप्रमाणे, आज देवाच्या लोकांपैकी अनेकांना त्यांच्या विश्वासासाठी अन्यायीपणे तुरुंगात टाकले जाते तेव्हा तेदेखील आपला आनंद टिकवून ठेवतात आणि प्रचार करत राहतात. आपल्या काही बंधुभगिनींना घराबाहेर जाता येत नाही; इतकेच नव्हे, तर वाढत्या वयामुळे किंवा आजारपणामुळे काहींना कदाचित रुग्णालयांमध्ये राहावे लागते. त्यांच्या क्षमतेनुसार, ते डॉक्टरांना व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना, त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि रुग्णालयात येणाऱ्या इतरांना साक्ष देतात. देवाच्या राज्याविषयी पूर्णपणे साक्ष देणे हीच त्यांची मनस्वी इच्छा असते. त्यांच्या या उदाहरणाची आपल्याला कदर वाटत नाही का?
२२. (क) बायबलमधील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकापासून लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या तरतुदीमुळे साहाय्य मिळत आहे? (वरील चौकट पाहा.) (ख) या दुष्ट जगाच्या अंताची वाट पाहत असताना, तुम्ही काय करण्याचा दृढनिश्चय केला आहे?
२२ स्पष्टच आहे, की जागृत राहण्याविषयी आपण प्रेषितांकडून व प्रेषितांची कृत्ये पुस्तकात उल्लेख केलेल्या, पहिल्या शतकातील इतर ख्रिश्चनांकडून बरेच काही शिकू शकतो. या दुष्ट जगाच्या अंताची वाट पाहत असताना, धैर्याने व आवेशाने साक्ष देण्याच्या बाबतीत आपण पहिल्या शतकातील ख्रिश्चनांचे अनुकरण करण्याचा दृढनिश्चय करू या. आज, देवाच्या राज्याविषयी पूर्णपणे ‘साक्ष देणे’ यापेक्षा मोठा विशेषाधिकार दुसरा नाही!—प्रे. कृत्ये २८:२३.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चौकट]
“प्रेषितांची कृत्ये पुस्तकाविषयी माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे”
“बेअरिंग थरो विटनेस” अबाऊट गॉड्स किंग्डम हे पुस्तक वाचल्यावर एका प्रवासी पर्यवेक्षकांना कसे वाटले त्याविषयी त्यांनी असे म्हटले: “प्रेषितांची कृत्ये पुस्तकाविषयी माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.” बायबलमधील प्रेषितांची कृत्ये पुस्तक त्यांनी अनेकदा वाचले होते, पण आता हे नवीन पुस्तक वाचल्यावर, या पुस्तकापासून त्यांना जास्त फायदा होऊ शकतो असे त्यांना वाटते.
[१२ पानांवरील चित्र]
एका देवदूताने पेत्राला मोठ्या लोखंडी दरवाजातून बाहेर नेले