व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाला जिवेभावे बलिदाने अर्पण करा

यहोवाला जिवेभावे बलिदाने अर्पण करा

यहोवाला जिवेभावे बलिदाने अर्पण करा

“जे काही तुम्ही करिता ते . . . प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.”—कलस्सै. ३:२३.

तुम्ही उत्तर देऊ शकता का ते पाहा:

आपण आपल्या दैनंदिन जीवनात यहोवाचा सन्मान कसा करू शकतो?

देवाची उपासना करताना आपण कोणती बलिदाने अर्पण करत असतो?

आपण यहोवाला आपल्या भौतिक गोष्टींतून अर्पण कसे करू शकतो?

१-३. (क) येशूचा वधस्तंभावर मृत्यू झाला याचा अर्थ असा होतो का, की यहोवा आता आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या बलिदानाची अपेक्षा करत नाही? स्पष्ट करा. (ख) बलिदाने अर्पण करण्याच्या बाबतीत कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

 यहोवाने इसवी सन पहिल्या शतकात आपल्या लोकांना हे प्रकट केले की येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे मोशेचे नियमशास्त्र रद्द करण्यात आले आहे. (कलस्सै. २:१३, १४) त्यामुळे, यहुदी लोक शेकडो वर्षांपासून जी बलिदाने अर्पण करत होते त्यांची आता गरज नव्हती आणि त्या बलिदानांना काही मोलही राहिले नव्हते. नियमशास्त्राने, “ख्रिस्ताकडे पोहचविणारे बालरक्षक,” या नात्याने आपली भूमिका पूर्ण केली होती.—गलती. ३:२४.

याचा अर्थ, ख्रिश्‍चनांना आता बलिदानांमध्ये काहीच आस्था नाही असा होतो का? नाही, याच्या अगदी उलट प्रेषित पेत्र ‘येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण’ करण्याच्या गरजेविषयी बोलला. (१ पेत्र २:५) इतकेच नव्हे, तर प्रेषित पौलानेदेखील हे स्पष्ट केले होते की एका समर्पित ख्रिस्ती व्यक्‍तीचे जीवन—तिच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जणू एक “यज्ञ” आहे.—रोम. १२:१.

तर मग, एक ख्रिस्ती व्यक्‍ती यहोवाला विशिष्ट गोष्टी अर्पण करण्याद्वारे किंवा यहोवासाठी विशिष्ट गोष्टींचा त्याग करण्याद्वारे बलिदाने अर्पण करते. बलिदाने अर्पण करण्यासंबंधी देवाने इस्राएल लोकांकडून ज्या अपेक्षा केल्या होत्या त्यांची आपल्याला माहिती आहे. त्या माहितीच्या आधारावर आपण याची खातरी कशी बाळगू शकतो की आज आपण यहोवाला अर्पण करत असलेली बलिदाने त्याला स्वीकृत आहेत?

दैनंदिन जीवनात

४. दैनंदिन जीवनातील कामांसंबंधी आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

आपण रोजच्या जीवनात जी काही कामे करतो त्यांचा यहोवाला बलिदाने अर्पण करण्याशी काहीएक संबंध नाही असे कदाचित आपल्याला वाटेल. घरकाम, शाळेचा अभ्यास, नोकरी-व्यवसाय, खरेदी आणि अशा इतर कामांचा, वरवर पाहता आध्यात्मिक गोष्टींशी फारसा संबंध नाही असे आपल्याला वाटू शकते. परंतु, तुम्ही जर यहोवाला आपले जीवन समर्पित केले असेल किंवा भविष्यात करणार असाल, तर रोजची कामे तुम्ही कोणत्या मनोवृत्तीने करता ते महत्त्वाचे आहे. आपण २४ तास यहोवाचे साक्षीदार आहोत. तेव्हा, जीवनातील प्रत्येक पैलूत बायबलची तत्त्वे लागू करण्याची गरज आहे. म्हणूनच, पौलाने आपल्याला असे आर्जवले: “जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.”—कलस्सैकर ३:१८-२४ वाचा.

५, ६. आपल्या पेहरावाच्या व वर्तनाच्या बाबतीत आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

एक ख्रिस्ती व्यक्‍ती दैनंदिन जीवनात जी कामे करते ती कामे तिच्या पवित्र सेवेचा भाग नसतात. पण, पौल आपल्याला “प्रभूसाठी म्हणून जिवेभावे,” कार्य करण्याचा आर्जव करतो, त्यामुळे आपण आपल्या संपूर्ण जीवनक्रमाचा विचार करण्यास प्रवृत्त होतो. तर मग, ही गोष्ट आपण स्वतःला कशी लागू करू शकतो? आपले वर्तन आणि आपला पेहराव सर्व प्रसंगी सभ्य असतो का? की दैनंदिन जीवनातील कामे करताना आपण ज्या प्रकारे वागतो किंवा ज्या प्रकारे पेहराव करतो त्यामुळे स्वतःची ओळख यहोवाचे साक्षीदार म्हणून करण्यास आपल्याला लाज वाटते? असे कधीच होऊ नये! यहोवाचे लोक असे काहीही करू इच्छिणार नाहीत ज्यामुळे देवाचे नाव कलंकित होईल.—यश. ४३:१०; २ करिंथ. ६:३, ४, ९.

“प्रभूसाठी म्हणून जिवेभावे,” कार्य करण्याच्या आपल्या इच्छेचा जीवनातील निरनिराळ्या पैलूंवर कसा प्रभाव पडतो याचे आपण परीक्षण करू या. असे करत असताना आपण हे लक्षात ठेवू या, की इस्राएल लोक यहोवाला जी बलिदाने अर्पण करायचे ती त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींपैकी सर्वात उत्तम असणे आवश्‍यक होते.—निर्ग. २३:१९.

तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो?

७. ख्रिस्ती समर्पणात काय गोवलेले आहे?

तुम्ही यहोवाला आपले जीवन समर्पित केले तेव्हा कोणत्याही अटीविना तुम्ही तो निर्णय घेतला होता, नाही का? असे करण्याद्वारे, तुम्ही जणू असे म्हणत होता, की तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत तुम्ही यहोवाला पहिले स्थान द्याल. (इब्री लोकांस १०:७ वाचा.) तुम्ही घेतलेला तो निर्णय चांगला होता. एखाद्या गोष्टीसंबंधी यहोवाची इच्छा जाणून त्यानुसार कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास चांगले परिणाम घडून येतात हे नक्कीच तुम्ही पाहिले असेल. (यश. ४८:१७, १८) देवाचे लोक पवित्र व आनंदी आहेत कारण त्यांना जो शिक्षण देतो त्याचे गुण ते प्रतिबिंबित करतात.—लेवी. ११:४४; १ तीम. १:११.

८. प्राचीन काळातील बलिदानांना यहोवाने पवित्र मानले ही गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे का आहे?

इस्राएल लोक यहोवाला जी बलिदाने अर्पण करायचे ती पवित्र मानली जायची. (लेवी. ६:२५; ७:१) “पवित्रता” असे भाषांतरीत केलेल्या हिब्रू शब्दातून वेगळेपणा अथवा केवळ देवाच्या मालकीचा असा अर्थ ध्वनित होतो. आपली बलिदाने यहोवाला स्वीकृत असावीत म्हणून ती जगाच्या प्रभावांपासून वेगळी व निष्कलंक असली पाहिजेत. यहोवाला ज्या गोष्टींचा वीट आहे त्यांवर आपण मुळीच प्रेम करू नये. (१ योहान २:१५-१७ वाचा.) यावरून स्पष्टपणे दिसून येते की ज्या लोकांमुळे व गोष्टींमुळे आपण देवाच्या नजरेत दूषित होऊ अशा लोकांपासून व गोष्टींपासून आपण दूर राहिले पाहिजे. (यश. २:४; प्रकटी. १८:४) याचा असाही अर्थ होतो, की आपण कोणत्याही अशुद्ध किंवा अनैतिक गोष्टी पाहू नयेत किंवा अशा गोष्टींचे स्वप्नरंजन करू नये.—कलस्सै. ३:५, ६.

९. एक ख्रिस्ती व्यक्‍ती इतरांशी ज्या प्रकारे वागते ते किती महत्त्वाचे आहे, आणि का?

पौलाने त्याच्या सहविश्‍वासू बांधवांना असे आर्जवले: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” (इब्री १३:१६) तर मग, आपण नेहमी चांगले वागलो व इतरांचे चांगले करत राहिलो तर या कृत्यांना यहोवा स्वीकृत बलिदाने मानतो. इतरांबद्दल प्रेमळ कळकळ ही खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे ठळक वैशिष्ट्य आहे.—योहा. १३:३४, ३५; कलस्सै. १:१०.

उपासनेतील बलिदाने

१०, ११. यहोवा आपल्या ख्रिस्ती सेवेकडे व उपासनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, आणि याचा आपल्यावर काय परिणाम झाला पाहिजे?

१० ख्रिस्ती या नात्याने आपण ज्या एका ठळक मार्गाने इतरांचे चांगले करू शकतो तो म्हणजे इतरांना आपल्या ‘आशेबद्दल’ सांगणे. इतरांना साक्ष देण्यासाठी तुम्ही प्रत्येक संधीचा फायदा घेता का? पौलाने या महत्त्वपूर्ण ख्रिस्ती कार्याला “[देवाचे] नाव पत्करणाऱ्‍या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ” असे म्हटले. (इब्री १०:२३; १३:१५; होशे. १४:२) आपण सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी किती वेळ खर्च करतो आणि आपण ज्या प्रकारे प्रचार करतो त्यात सुधारणा कशी करू शकतो याचा विचार करणे लाभदायक ठरू शकते. सेवा सभेतील बरेच भाग असे करण्यास आपल्याला मदत करतात. थोडक्यात सांगायचे, तर आपली क्षेत्र सेवा आणि अनौपचारिक साक्षकार्य “स्तुतीचा यज्ञ,” असल्यामुळे म्हणजे आपल्या उपासनेचा भाग असल्यामुळे तो यज्ञ किंवा बलिदान सर्वोत्कृष्ट प्रतीचे असले पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असली, तरी सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आपण जितका वेळ खर्च करतो त्यावरून आध्यात्मिक गोष्टींबद्दल आपल्याला किती कदर आहे हे दिसून येते.

११ आपण नियमितपणे यहोवाची उपासना करतो, मग ती घरात असो अथवा मंडळीत. आपण असे करावे अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. हे खरे आहे की आज आपल्याला शब्बाथाचा दिवस पाळण्याची किंवा सणांसाठी नियमितपणे जेरूसलेमला जाण्याची गरज नाही. पण, या विशिष्ट दिवसांसंबंधी इस्राएल लोकांना दिलेल्या नियमांपासून आपण बरेच काही शिकू शकतो. आजही यहोवा आपल्याकडून ही अपेक्षा करतो की आपण त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यासाठी आपली निर्जीव कामे बाजूला सारली पाहिजे. तसेच, ख्रिस्ती कुटुंबप्रमुखांनी आपल्या कुटुंबाच्या सदस्यांसोबत कौटुंबिक उपासना करण्यात पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यहोवा करतो. (१ थेस्सलनी. ५:१७; इब्री १०:२४, २५) तेव्हा, आपल्या आध्यात्मिक कार्यांसंबंधी आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, की ‘उपासनेच्या बाबतीत मी आणखी सुधारणा करू शकतो का?’

१२. (क) प्राचीन काळी उपासनेत उपयोग केल्या जाणाऱ्‍या धुपाची तुलना आज कशासोबत केली जाऊ शकते? (ख) आपण आपल्या प्रार्थना धुपाप्रमाणे कशा सादर करू शकतो?

१२ दावीद राजाने यहोवाची स्तुती करताना म्हटले: “माझी प्रार्थना, तुझ्यासमोर धुपाप्रमाणे . . . सादर होवो.” (स्तो. १४१:२) तुमच्या स्वतःच्या प्रार्थनांचा म्हणजे तुम्ही किती नियमितपणे प्रार्थना करता व तुमच्या प्रार्थनेचा दर्जा काय आहे याचा विचार करा. प्रकटीकरणाच्या पुस्तकात, ‘पवित्र जनांच्या प्रार्थनांची’ तुलना धुपाशी केली आहे. याचा अर्थ, यहोवाला स्वीकृत असलेल्या प्रार्थना प्रसन्‍न करणाऱ्‍या सुगंधी धुपाप्रमाणे आहेत. (प्रकटी. ५:८) प्राचीन इस्राएलमध्ये, यहोवाच्या वेदीवर नियमितपणे जाळला जाणारा धूप काळजीपूर्वक व काटेकोरपणे तयार करावा लागत असे. हा धूप, यहोवाने दिलेल्या सूचनांनुसार सादर केला तरच यहोवा तो स्वीकारत असे. (निर्ग. ३०:३४-३७; लेवी. १०:१, २) त्याचप्रमाणे, आपण यहोवाच्या इच्छेनुसार मनःपूर्वक प्रार्थना केल्या, तरच तो आपल्या प्रार्थना स्वीकारेल याची खातरी आपण बाळगू शकतो.

देणे आणि घेणे

१३, १४. (क) एपफ्रदीताने आणि फिलिप्पै येथील मंडळीने पौलाची कशा प्रकारे सेवा केली, आणि याबद्दल पौलाला कसे वाटले? (ख) आपण एपफ्रदीताच्या आणि फिलिप्पैकरांच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?

१३ जगभरात चाललेल्या कार्याला हातभार लावण्यासाठी जे आर्थिक दान दिले जाते त्याची तुलना एखाद्या बलिदानाशी केली जाऊ शकते, मग ते जास्त असो अथवा कमी. (मार्क १२:४१-४४) इसवी सन पहिल्या शतकात फिलिप्पै येथील मंडळीने पौलाच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी एपफ्रदीताला रोमला पाठवले. फिलिप्पैकरांच्या या दूताने बहुधा मंडळीने पौलासाठी पैशाच्या रूपात दिलेली देणगी आपल्यासोबत घेतली होती. फिलिप्पैकरांनी याआधीसुद्धा पौलाला औदार्य दाखवले होते. पौलाला प्रेमळपणे मदत करून ते त्याला आर्थिक चिंतेतून मुक्‍त करू इच्छित होते, जेणेकरून पौल त्याच्या सेवाकार्यात अधिक वेळ खर्च करू शकत होता. फिलिप्पैकरांनी दिलेल्या देणगीकडे पौलाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले? त्याने त्यास “सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ,” म्हणून संबोधले. (फिलिप्पैकर ४:१५-१९ वाचा.) फिलिप्पैकरांच्या या प्रेमळ कृत्याची पौलाने आणि यहोवानेसुद्धा खूप कदर केली.

१४ त्याचप्रमाणे आज, जगभरातील कार्यासाठी आपण जे दान देतो त्याची यहोवा खूप कदर करतो. शिवाय, तो आपल्याला हे अभिवचन देतो की आपण जर त्याच्या राज्याला आपल्या जीवनात नेहमी प्रथम स्थान दिले, तर तो आपल्या आध्यात्मिक व शारीरिक गरजा पूर्ण करेल.—मत्त. ६:३३; लूक ६:३८.

कृतज्ञता दाखवा

१५. कोणत्या काही गोष्टींबद्दल तुम्ही यहोवाचे कृतज्ञ आहात?

१५ यहोवाला कृतज्ञता दाखवण्याची बरीच कारणे आपल्याजवळ आहेत. यहोवाने आपल्याला जीवनाची देणगी दिल्याबद्दल आपण दररोज त्याचे आभार मानू नये का? जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टी—अन्‍न, वस्त्र आणि निवारा, तसेच जगण्यासाठी प्रत्येक श्‍वास तो आपल्याला देतो. शिवाय, अचूक ज्ञानावर आधारित असलेल्या आपल्या विश्‍वासामुळे आपल्याला आशा मिळते. तेव्हा, आपण यहोवाची उपासना केली पाहिजे व त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण केला पाहिजे, कारण तोच आपला देव आहे आणि त्यानेच आपल्यासाठी सर्व काही केले आहे.—प्रकटीकरण ४:११ वाचा.

१६. ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाप्रती आपण कृतज्ञ आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?

१६ आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, देवाने मानवजातीला दिलेली सगळ्यात अनमोल देणगी म्हणजे ख्रिस्ताचे खंडणी बलिदान. ही देणगी, देवाच्या प्रेमाचा सगळ्यात उल्लेखनीय पुरावा आहे. (१ योहा. ४:१०) या देणगीबद्दल आपण कृतज्ञता कशी दाखवू शकतो? पौलाने म्हटले: “ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला . . . आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे.” (२ करिंथ. ५:१४, १५) दुसऱ्‍या शब्दांत, पौल हे सांगत होता की आपण अपात्र असूनही देवाने आपल्यावर केलेल्या प्रेमाबद्दल आपल्याला कदर असेल, तर आपण आपल्या जीवनाचा उपयोग देवाचा व त्याच्या पुत्राचा सन्मान करण्यासाठी करू. आपल्याला देवावर व ख्रिस्तावर प्रेम आहे व आपण त्यांचे कृतज्ञ आहोत हे आपण आपल्या आज्ञाधारकतेवरून तसेच प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या आपल्या इच्छेवरून दाखवतो.—१ तीम. २:३, ४; १ योहा. ५:३.

१७, १८. काहींनी, यहोवाला अर्पण करत असलेल्या स्तुतीच्या यज्ञात कोणत्या मार्गांनी सुधारणा केली आहे? उदाहरण द्या.

१७ तुम्ही देवाला जो स्तुतीचा यज्ञ अर्पण करता त्यात तुम्ही आणखी सुधारणा करू शकता का? यहोवाने आपल्यासाठी ज्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यांवर मनन केल्यामुळे अनेकांना राज्य प्रचाराच्या कार्यात व इतर ईश्‍वरशासित कार्यांत अधिक भाग घेण्यासाठी आपल्या वेळेचे व कार्यांचे नियोजन करण्याची प्रेरणा मिळाली आहे. काहींना दरवर्षी एक किंवा अधिक महिने साहाय्यक पायनियरिंग करणे शक्य झाले आहे, तर इतर काहींना नियमित पायनियरिंग करणे शक्य झाले आहे. काहींनी राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पांत भाग घेतला आहे. ही सर्व कार्ये आपली कृतज्ञता व्यक्‍त करण्याचे उत्कृष्ट मार्ग नाहीत का? पवित्र सेवेची ही कार्ये योग्य हेतूने—कृतज्ञता दाखवण्यासाठी व आभार मानण्यासाठी—आपण केली, तर ती देवाला स्वीकृत असतील.

१८ यहोवाने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल पुष्कळ ख्रिश्‍चनांनी आपली कृतज्ञता व्यक्‍त केली आहे. त्यांपैकी एक आहे मोरेना. ती ज्या धर्मात लहानाची मोठी झाली होती त्या कॅथलिक धर्मात, तसेच आशियाई तत्त्वज्ञानात तिने तिच्या आध्यात्मिक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांत तिला तिच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. ती यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागली, तेव्हा तिला तिच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. बायबलमधून तिला तिच्या प्रश्‍नांची जी उत्तरे मिळाली त्याबद्दल आणि या उत्तरांमुळे तिच्या जीवनाला मिळालेल्या स्थैर्याबद्दल तिच्या मनात यहोवाविषयी इतकी कृतज्ञता दाटून आली की ती आपली सर्व शक्‍ती यहोवाच्या सेवेत खर्च करू इच्छित होती. तिचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तिने लगेच नियमितपणे साहाय्यक पायनियर सेवा करण्यास सुरुवात केली. पुढे तिची परिस्थिती बदलली तेव्हा तिने लगेच नियमित पायनियर सेवा सुरू केली. या गोष्टीला ३० वर्षे उलटली आहेत आणि मोरेना अजूनही पूर्ण वेळची सेवा करत आहे.

१९. तुम्ही यहोवाला अर्पण करत असलेली बलिदाने आणखी कशी वाढवू शकता?

१९ अर्थात, यहोवाचे असे अनेक विश्‍वासू सेवक आहेत ज्यांना आपल्या परिस्थितीमुळे पायनियर सेवा करणे शक्य नाही. तरीसुद्धा, आपण सर्व जण यहोवाला स्वीकृत आध्यात्मिक बलिदाने अर्पण करू शकतो. आपल्या वर्तनाच्या बाबतीत आपण नीतिमान तत्त्वांचे काळजीपूर्वक पालन करण्याची गरज आहे कारण आपण सर्व प्रसंगी यहोवाचे प्रतिनिधित्व करतो. विश्‍वासाच्या बाबतीत आपण देवाच्या उद्देशांच्या पूर्णतेवर पूर्ण भरवसा ठेवतो. चांगली कार्ये करण्याच्या बाबतीत आपण सुवार्तेचा प्रसार करण्यात हातभार लावतो. तर मग, यहोवाने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञ दाखवण्यासाठी आपण त्याला जिवेभावे बलिदाने अर्पण करत राहू या.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवाच्या चांगुलपणामुळे तुम्हाला स्तुतीच्या यज्ञात आणखी सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते का?

[२३ पानांवरील चित्र]

इतरांना साक्ष देण्यासाठी तुम्ही प्रत्येक संधीचा फायदा घेता का?