व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नाथान—शुद्ध उपासनेचा निष्ठावान समर्थक

नाथान—शुद्ध उपासनेचा निष्ठावान समर्थक

नाथानशुद्ध उपासनेचा निष्ठावान समर्थक

एका शक्‍तिशाली व्यक्‍तीला तिची कार्य करण्याची पद्धत चुकीची आहे याची खात्री पटवून देणे आणि तिने तिचे मार्ग बदलायला पाहिजे असे सांगणे सोपे नाही. अशा एखाद्या व्यक्‍तीने तिचे पाप लपवण्यासाठी एका व्यक्‍तीला ठार मारले आहे हे तुम्हाला माहीत असते तर तुम्ही तिला तिची चूक पटवून द्यायचा प्रयत्न केला असता का?

प्राचीन इस्राएलच्या दावीद राजाने बथशेबासोबत व्यभिचार केला आणि ती गरोदर झाली. त्यांनी केलेले पाप लपवण्यासाठी दाविदाने बथशेबाच्या पतीची हत्या घडवून आणली आणि तिला आपली पत्नी करून घेतले. बरेच महिने दावीद त्याच्या राज्याचे कामकाज सांभाळत एक दुटप्पी जीवन जगत राहिला. पण यहोवाने त्याच्या पापांकडे दुर्लक्ष केले नाही. दाविदाच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्याने आपल्या संदेष्ट्याला, नाथानाला पाठवले.

ही एक अवघड कामगिरी होती. स्वतःला नाथानाच्या जागी ठेवून पाहा. यहोवाप्रती एकनिष्ठा आणि त्याच्या उच्च स्तरांचे समर्थन करण्याच्या दृढ निश्‍चयानेच नाथानाला, दाविदाच्या पापांची त्याला आठवण करून द्यायला प्रेरित केले यात शंका नाही. नाथानाने हे कसे केले आणि दावीद राजाला पश्‍चात्ताप करण्याची गरज आहे याची खात्री त्याला कशी पटवून दिली?

कुशल शिक्षक

नाथानाने हे कसे केले ते जाणून घेण्यासाठी २ शमुवेल १२:१-२५ हा उतारा वाचून पाहा. कल्पना करा की तुम्ही नाथानाच्या जागी उभे आहात आणि दाविदाला पुढील गोष्ट सांगत आहात: “एका नगरात दोन मनुष्य राहत होते; त्यातला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत मनुष्याची मेंढरे व गुरे विपुल होती; पण त्या गरिबापाशी एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते; ती त्याजबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली; ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या पेल्यातून पाणी पीत असे व त्याच्या उराशी निजत असे, ती त्याची मुलगीच बनली होती. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला, तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरडामेंढरांतून अथवा गाईबैलांतून एखादे न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.”—२ शमु. १२:१-४.

दावीद जो स्वतः एक मेंढपाळ होता, त्याला ही खरी घटना वाटली. एक टीकाकार असे सुचवतात की “कदाचित दावीद राजाजवळ नाथान सहसा अशा लोकांच्या विनंत्या घेऊन येत असावा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि दाविदाला ही पण एक तशीच परिस्थिती वाटली असावी जिथे त्याला न्याय द्यायचा होता.” असे जरी असले तरी, दाविदासोबत नाथान ज्या प्रकारे बोलला त्यासाठी त्याला देवाप्रती असलेली निष्ठा आणि धैर्याची गरज होती. नाथानाने सांगितलेल्या गोष्टीमुळे दावीद राजा क्रोधित झाला. त्याने म्हटले: “परमेश्‍वराच्या जीविताची शपथ, ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे.” तेव्हा नाथानाने ठामपणे असे म्हटले: “तो मनुष्य तूच आहेस!”—२ शमु. १२:५-७.

नाथानाने ही परिस्थिती अशी का हाताळली त्याकडे लक्ष द्या. एखादी व्यक्‍ती जर दुसऱ्‍या व्यक्‍तीसोबत भावनिक रीत्या गुंतलेली असेल तर तिला आपल्या परिस्थितीकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहणे कठीण जाऊ शकते. आपली वागणूक आक्षेपार्ह असल्यास आपण सगळेच निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी कारणे सांगू लागतो. पण नाथानाने सांगितलेल्या दृष्टान्ताने दाविदाला नकळतपणे स्वतःच्याच कृत्यांची निंदा करण्यास प्रेरित केले. दाविदाला हे स्पष्ट दिसून आले की ज्या परिस्थितीबद्दल नाथानाने सांगितले त्यातील वागणूक चुकीची होती. दाविदाने स्वतः त्या वागणुकीची निंदा केल्यावरच नाथानाने सांगितले की तो दृष्टान्त दाविदावर लागू होतो. यामुळे दावीद त्याने केलेल्या पापाचे गांभीर्य समजू शकला आणि तो ताडन स्वीकारण्यास तयार झाला. दाविदाने कबूल केले की बथशेबासोबत त्याने जे केले त्यामुळे त्याने यहोवाच्या आज्ञांना “तुच्छ” लेखले आहे आणि त्याने योग्य ताडन स्वीकारले.—२ शमु. १२:९-१४; स्तो. ५१, उपरिलेखन.

यातून आपण काय शिकू शकतो? एका बायबल शिक्षकाचे ध्येय त्याच्या ऐकणाऱ्‍यांना योग्य निष्कर्षावर पोचण्यास मदत करणे हे असते. नाथान दाविदाचा आदर करत होता आणि त्यामुळे त्याने या परिस्थितीला कुशलतेने हाताळले. त्याला माहीत होते की दावीद राजाला नीतिमत्ता व न्याय मनापासून प्रिय होते. त्यामुळे या दृष्टान्ताचा वापर करून नाथानाने दाविदाला त्याच्या या चांगल्या गुणांच्या आधारावर विचार करण्यास प्रेरित केले. आपणही खऱ्‍या मनाच्या लोकांना यहोवाचा दृष्टिकोन समजून घेण्यास मदत करू शकतो. हे आपण कसे करू शकतो? त्यांना बऱ्‍यावाइटाबद्दल असलेल्या ज्ञानाचा वापर करायला लावून. आणि असे करत असताना आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत किंवा काय योग्य काय अयोग्य हे सांगण्याचा अधिकार आपल्याला आहे असा भास होऊ न देण्याची आपण खबरदारी बाळगली पाहिजे. चांगले व वाईट याबाबत निर्णय घेताना आपले निर्णय बायबलवर आधारित असले पाहिजेत, आपल्या स्वतःच्या मतांवर नाही.

या शक्‍तिशाली राजाला ताडन देण्यात नाथानाला देवाबद्दल असलेल्या निष्ठेने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. (२ शमु. १२:१) अशा प्रकारची निष्ठा बाळगल्यास आपल्यालाही यहोवाच्या नीतिमान तत्त्वांचे समर्थन करण्याचे धैर्य प्राप्त होईल.

शुद्ध उपासनेचा समर्थक

नाथान आणि दावीद चांगले मित्र होते असे दिसून येते, कारण दाविदाने आपल्या एका मुलाचे नाव नाथान असे ठेवले. (१ इति. ३:१, ५) बायबलमध्ये नाथानाचा पहिल्यांदा उल्लेख येतो तेव्हा तो दाविदासोबत होता. त्या दोघांचेही यहोवावर प्रेम होते. दावीद राजाला नाथानाच्या निर्णयांवर भरवसा होता त्यामुळेच त्याने यहोवासाठी एक मंदिर बांधण्याची त्याची इच्छा या संदेष्ट्याजवळ व्यक्‍त केली. “‘पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे!’ नाथान राजास म्हणाला, ‘तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्‍वर तुझ्याबरोबर आहे.’”—२ शमु. ७:२, ३.

यहोवाचा एक विश्‍वासू सेवक असल्यामुळे यहोवाच्या उपासनेसाठी सर्वात पहिले स्थायी मंदिर बांधण्याच्या दाविदाच्या इच्छेचे नाथानाने आवेशाने समर्थन केले. पण या प्रसंगी नाथानाने यहोवाचा संदेश देण्याऐवजी स्वतःचे मत व्यक्‍त केले. त्या रात्री देवाने नाथानाला दावीद राजाला एक वेगळा संदेश द्यायला सांगितले. दावीद यहोवासाठी एक मंदिर बांधणार नाही तर ते बांधणारा त्याचा एक पुत्र असेल. यासोबतच नाथानाने दाविदाला असेही सांगितले की यहोवा त्याच्यासोबत एक करार करत आहे ज्याद्वारे त्याचे राजपद ‘कायमचे स्थापित’ होईल.—२ शमु. ७:४-१६.

देवासाठी मंदिर बांधण्याबाबत नाथानाने दाविदाला आधी जे सांगितले ते देवाच्या इच्छेशी सुसंगत नव्हते. पण नाथानाने नम्रपणे काहीही हरकत न घेता देवाची इच्छा स्वीकारली आणि त्यानुसार कार्य केले. नाथानाने आपल्यासाठी किती चांगले उदाहरण मांडले! देवाने आपल्यालाही एखाद्या बाबतीत सुधार करण्यास सांगितले तर आपणही नाथानाच्या उदाहरणाचे पालन केले पाहिजे. संदेष्टा या नात्याने नाथानाने यानंतर केलेली कार्ये दाखवतात की पुढेही त्याच्यावर यहोवाची मर्जी होती. मंदिरात ४,००० गायक व वादकांना नेमण्याची दाविदाला आज्ञा देण्यास यहोवाने नाथान व द्रष्टा गाद यांना सांगितले असे दिसते.—१ इति. २३:१-५; २ इति. २९:२५.

राजपदाचा संरक्षक

वृद्ध झालेल्या दावीद राजानंतर शलमोन राजा होईल हे नाथानाला माहीत होते. त्यामुळे जेव्हा अदोनीयाने राजपद बळकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा नाथानाने हा कट विफल करण्यासाठी पाऊल उचलले. त्याच्या कृतींतून त्याची कुशलता व देवाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा दिसून आली. पहिले, शलमोनाला राजा बनवण्याच्या दावीद राजाने घेतलेल्या शपथेविषयी त्याला आठवण करून देण्यास नाथानाने बथशेबाला सांगितले. त्यानंतर नाथानाने स्वतः दाविदासमोर जाऊन अदोनीयाला दाविदाने राजा नेमले आहे का? असे विचारले. परिस्थितीचे गांभीर्य समजल्यावर दाविदाने नाथान व राजाच्या विश्‍वासू सेवकांना शलमोनाचा अभिषेक करून त्याला राजा घोषित करण्याची आज्ञा दिली. अदोनीयाचा राजपद बळकावण्याचा कट विफल ठरला.—१ राजे १:५-५३.

नम्र इतिहासकार

१ शमुवेल अध्याय २५ ते ३१ आणि २ शमुवेल याचे लेखक नाथान व गाद असल्याचे मानले जाते. या अध्यायांत लिहिण्यात आलेल्या देवप्रेरित इतिहासाविषयी असे म्हटले आहे: “दावीद राजाचे साद्यत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमुवेल द्रष्टा याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा याच्या ग्रंथात लिहिले आहे.” (१ इति. २९:२९) ‘शलमोनाची सर्व कृत्ये’ याविषयीच्या अहवालाचाही लेखक नाथान असल्याचे समजले जाते. (२ इति. ९:२९) यावरून असे दिसून येते की दावीद राजाच्या मृत्यूनंतरही नाथान राजदरबारातील कार्यांत भाग घेत होता.

नाथानाविषयी जी काही माहिती आपल्याजवळ आहे ती जवळजवळ सर्व नाथानानेच लिहिली असावी. त्याने ज्या गोष्टी लिहिल्या नाहीत त्यातूनही आपण त्याच्याविषयी बरेच काही शिकू शकतो. नाथान एक नम्र इतिहासकार होता. तो महत्त्वाकांक्षी नव्हता आणि त्याने स्वतःच्या नावाला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला नाही. एका बायबलच्या शब्दकोशात म्हटल्यानुसार प्रेरित अहवालात त्याचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा त्याच्याबद्दल “कोणतीही मागची पुढची माहिती आणि वंशावळ दिलेली नाही.” नाथानाच्या वैयक्‍तिक जीवनाबद्दल तसेच त्याच्या वंशावळीबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही.

यहोवाला एकनिष्ठ राहण्याच्या इच्छेने प्रेरित

शास्त्रवचनांमध्ये नाथानाविषयी जी थोडीफार माहिती आपल्याला मिळते त्यावरून हे स्पष्ट होते की तो नम्र होता आणि त्यासोबतच देवाने दिलेल्या नियमांचा आवेशी समर्थक होता. यहोवाने त्याच्यावर बऱ्‍याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या सोपवल्या. नाथानाच्या गुणांवर मनन करा, जसे की त्याची देवाप्रती असलेली निष्ठा आणि देवाच्या स्तरांप्रती असलेले मनःपूर्वक प्रेम. या गुणांचा आपल्या जीवनात अवलंब करण्यासाठी परिश्रम घ्या.

एखाद्या व्यभिचारी राजाला ताडन देण्यासाठी किंवा एखादा कट विफल करण्यासाठी तुम्हाला सांगितले जाईल याची शक्यता फार कमी आहे. पण देवाच्या मदतीने तुम्ही त्याला एकनिष्ठ राहू शकता आणि त्याच्या नैतिक स्तरांना जडून राहू शकता. त्यासोबतच तुम्ही सत्याचे धैर्यवान व कुशल शिक्षक आणि शुद्ध उपासनेचे समर्थकही बनू शकता.

[२५ पानांवरील चित्र]

राजपदाचा संरक्षक या नात्याने नाथान बथशेबाशी कुशलतेने बोलला