“मी कुतूहलाचा विषय बनले”
आमच्या संग्रहातून
“मी कुतूहलाचा विषय बनले”
पूर्ण वेळची प्रचारक शार्लट व्हाईट अमेरिकेच्या केन्टकी राज्यातील लुइविल येथे पहिल्यांदा चाकांची सूटकेस घेऊन आली तेव्हा तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
वर्ष होते १९०८, आणि बहीण शार्लट एक नवीनच उपकरण—डॉन-मोबाईल घेऊन शहरात आली तेव्हा अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिने म्हटले: “लोक त्याविषयी बोलू लागले आणि मी कुतूहलाचा विषय बनले.”
बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यामुळे बायबल विद्यार्थ्यांना (यहोवाच्या साक्षीदारांना त्या वेळी बायबल विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे) बायबलमधून अनेक मौल्यवान सत्ये शिकायला मिळाली आणि या सत्यांविषयी इतरांना सांगण्याची गरज त्यांना भासू लागली. अनेकांनी मिलेनियल डॉन नावाच्या (नंतर या पुस्तकांना स्टडीज इन द स्क्रिप्चर्स या नावानेदेखील ओळखले गेले) पुस्तक खंडांच्या साहाय्याने बायबलचे ज्ञान घेतले होते. त्या ख्रिश्चनांपैकी जे प्रवास करण्यास इच्छुक व समर्थ होते त्यांनी इतर उत्सुक वाचकांना मिलेनियल डॉनचे खंड देण्यासाठी दूर-दूर—वेगवेगळ्या शहरांतून, गावांतून आणि ग्रामीण भागांतून—प्रवास केला. या खंडांना त्या काळी “हेल्पिंग हँड्स फॉर बायबल स्टुडन्टस” असेही म्हटले जायचे, ज्याचा अर्थ ‘बायबल विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी’ असा होतो.
सन १९०८ मध्ये, बहीण शार्लट आणि इतर आवेशी राज्य उद्घोषक कापडाचे आवरण असलेल्या या सहा खंडांचा संच १.६५ अमेरिकन डॉलरला लोकांना द्यायचे. घरमालकांना हे खंड लगेच देण्याऐवजी ते आधी ऑर्डर घ्यायचे आणि नंतर—सहसा पगाराच्या दिवशी—परत जाऊन ते हे खंड अल्प मुद्रण किमतीला घरमालकांना द्यायचे. हे खंड घेताना लोक किती अल्प दान द्यायचे याविषयी एका विरोधकाने तक्रार केली!
मलिन्डा कीफर नावाच्या बहिणीला आठवते की ती एका आठवड्यात सहसा दोनशे ते तीनशे पुस्तकांची ऑर्डर घ्यायची. लोकांनी
या पुस्तकांमध्ये खूप आवड घेतली, पण त्यासोबतच एक पेचही निर्माण झाला. कारण, एकट्या सहाव्या खंडातच ७४० पृष्ठे होती! टेहळणी बुरूजच्या (इंग्रजी) एका अंकात असे म्हटले होते, की “पन्नास पुस्तकांचे वजन चाळीस पौंड (१८ किलो) असल्यामुळे” ते लोकांपर्यंत पोहचवणे, खासकरून बहिणींना “फार मुश्कील” होते.हा पेच सोडवण्यासाठी बंधू जेम्स कोल यांनी दोन चाकांची घडी घालता येण्याजोगी एक फ्रेम तयार केली, ज्याला स्क्रूच्या साहाय्याने एक सूटकेस बसवली जाऊ शकत होती. आता पुस्तकांनी खचाखच भरलेले जड खोके खांद्यांवर वाहून नेण्याची गरज नसल्यामुळे, या उपकरणाचा शोध लावणाऱ्या बंधूने स्वतः असे म्हटले: “आता माझे खांदे मुळीच दुखत नाहीत.” ओहायो राज्यातील सिनसिनॅटी शहरात झालेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या एका अधिवेशनात या बांधवाने हे नवीन उपकरण सादर केले तेव्हा श्रोत्यांना खूप आनंद झाला. उपकरणाच्या आडव्या दांड्याच्या दोन्ही टोकांना असलेल्या बटनांवर डॉन-मोबाईल हे नाव कोरले होते, कारण त्याद्वारे प्रामुख्याने मिलेनियल डॉन पुस्तकांची वाहतूक केली जाणार होती. थोड्याशा सरावाने, कित्येक डझन पुस्तकांनी भरलेली सूटकेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका हाताने ओढत नेणे सोपे बनले. डॉन-मोबाईलची उंची कमी-जास्त करता येऊ शकत होती आणि त्यास रस्त्यांवरून ओढत नेणे शक्य होते. दिवसभर सेवाकार्य करून चालत किंवा ट्रॅमने घरी परत जाताना त्याची रबरी चाके सूटकेसच्या बाजूला दुमडली जाऊ शकत होती.
पूर्ण वेळची सेवा करणाऱ्या भगिनींना डॉन-मोबाईल मोफत मिळू शकत होते. इतरांना त्याच्यासाठी २.५० अमेरिकन डॉलर द्यावे लागायचे. येथे चित्रात दाखवलेली बहीण कीफर हिने डॉन-मोबाईल घेऊन जाण्याचे तंत्र इतक्या चांगल्या प्रकारे आत्मसात केले होते, की ती पुस्तकांनी भरलेली एक सूटकेस एका हाताने ओढत न्यायची आणि दुसऱ्या हातात पुस्तकांनी भरलेली आणखी एक बॅग घ्यायची. अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया राज्यातील कोळशाच्या खाणी असलेल्या एका शहरात भेटलेल्या अनेक आस्थेवाईक लोकांना पुस्तके देण्याच्या दिवशी ती एका पुलावरून सहसा तीन ते चार फेऱ्या मारायची.
सन १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, एका वैमानिकाने चाकांची सूटकेस बनवली होती जी आज विमानतळांवर आणि रेल्वे स्थानकांवर सर्रासपणे पाहायला मिळते. पण, जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी, बायबलमधील मौल्यवान सत्ये इतरांना सांगण्यासाठी आवेशी बायबल विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने डॉन-मोबाईलचा वापर केला आणि ते बायबल विद्यार्थी लोकांच्या कुतूहलाचा विषय बनले.
[३२ पानांवरील संक्षिप्त आशय]
आस्थेवाईक लोकांना पुस्तके देण्याच्या दिवशी बहीण कीफर एका नदीच्या पुलावरून सहसा तीन ते चार फेऱ्या मारायची
[३२ पानांवरील संक्षिप्त आशय]
मिलेनियल डॉन लोकांपर्यंत पोहचवण्याचा पेच सुटला