व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कसा द्याल सल्ला?

कसा द्याल सल्ला?

कसा द्याल सल्ला?

तुम्हाला कधी कोणी सल्ला विचारला आहे का? उदाहरणार्थ, ‘मी काय करावं? मी अमुक पार्टीला जावं का? मी अमुक करियर करावं का? लग्नाच्या हेतूनं मी अमुक व्यक्‍तीशी गाठीभेटी कराव्यात का?’ असे प्रश्‍न कधी तुम्हाला विचारण्यात आले आहेत का?

जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी काही लोक अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला मदत मागतील. हे असे निर्णय असू शकतात ज्यांचा त्यांच्या मित्रांसोबतच्या, कुटुंबासोबतच्या, इतकेच नव्हे तर यहोवासोबतच्या नातेसंबंधावर प्रभाव पडू शकतो. अशा वेळी तुम्ही कशाच्या आधारावर त्यांना उत्तर द्याल? इतरांना सल्ला देण्याच्या बाबतीत तुमची पद्धत काय आहे? विषय अगदी क्षुल्लक असो अथवा गंभीर स्वरूपाचा असो, एक “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो” असे नीतिसूत्रे १५:२८ म्हणते. सल्ला देण्याच्या बाबतीत बायबलमधील पुढील पाच तत्त्वे तुम्हाला कशी मदत करू शकतात ते विचारात घ्या.

१ खरी परिस्थिती ओळखा.

“ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.”नीति. १८:१३.

चांगला सल्ला देण्यासाठी, आपण मदत मागणाऱ्‍या व्यक्‍तीची परिस्थिती व तिचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. उदाहरणार्थ: तुम्हाला एखाद्या व्यक्‍तीने फोन करून तुमच्या घरी येण्याचा मार्ग विचारला, तर तिला मदत करण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे? ती व्यक्‍ती सध्या कोठे आहे हे जाणून न घेताच तुम्ही तिला तुमच्या घरी येण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग कोणता हे सांगाल का? साहजिकच नाही! त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्‍तीला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, ती व्यक्‍ती सध्या “कोठे आहे” म्हणजे तिची परिस्थिती व दृष्टिकोन काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. कदाचित त्या व्यक्‍तीच्या परिस्थितीसंबंधी अशा काही गोष्टी असतील ज्या आपल्याला माहीत नाहीत आणि त्यामुळे आपण तिला जो सल्ला देऊ त्यावर या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच एखाद्या व्यक्‍तीच्या परिस्थितीची पुरेशी माहिती न मिळवताच आपण तिला सल्ला दिला तर कदाचित ती आणखीनच गोंधळात पडेल.—लूक ६:३९.

त्या व्यक्‍तीने किती संशोधन केले आहे ते जाणून घ्या. सल्ला घेणाऱ्‍या व्यक्‍तीला पुढील प्रश्‍न विचारणेसुद्धा सुज्ञपणाचे ठरू शकते: “सदर विषयावर बायबलची कोणती तत्त्वं लागू होतात असं तुम्हाला वाटतं?” “तुमच्यासमोर जे पर्याय आहेत त्यांचे कोणते फायदे व तोटे असू शकतात?” “या विषयावर तुम्ही संशोधन केलं आहे का?” “या बाबतीत इतरांनी म्हणजे मंडळीतल्या वडिलांनी, तुमच्या पालकांनी किंवा तुमचा बायबल अभ्यास घेणाऱ्‍याने तुम्हाला कोणती मदत केली आहे?”

ती व्यक्‍ती या प्रश्‍नांची जी उत्तरे देईल त्यांवरून उत्तर शोधण्यासाठी तिने किती प्रयत्न केला आहे हे आपल्याला समजेल. तसेच, आपल्या आधी इतरांनी तिला जो काही सल्ला दिला असेल तोही आपण विचारात घेऊ. आपल्याला हेसुद्धा कळेल की ती व्यक्‍ती मुळात अशा सल्लागाराच्या शोधात आहे का जो तिला तिच्या मनासारखा सल्ला देईल.—२ तीम. ४:३.

२ सल्ला देण्याचा उतावळेपणा करू नका.

‘प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा असावा.’याको. १:१९.

चांगल्या हेतूने आपण कदाचित लगेचच सल्ला देऊ. पण, एखाद्या विषयावर आणि खासकरून ज्या विषयावर आपण चर्चा करत आहोत त्यावर पुरेसे संशोधन न करताच लगेच सल्ला देणे सुज्ञपणाचे ठरेल का? नीतिसूत्रे २९:२० म्हणते: “बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते.”

तुम्ही जो सल्ला देता तो पूर्णपणे देवाच्या बुद्धीच्या एकवाक्यतेत आहे याची खातरी करण्यासाठी पुरेसा वेळ घ्या. स्वतःला विचारा, ‘माझ्या विचारसरणीवर जगाच्या विचारांचा आणि जगाच्या आत्म्याचा प्रभाव पडला आहे का?’ (१ करिंथ. २:१२, १३) हे लक्षात ठेवा की केवळ चांगले हेतू असणे पुरेसे नाही. प्रेषित पेत्राला येशूच्या कठीण नेमणुकीविषयी समजले तेव्हा त्याने येशूला असा सल्ला दिला: “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” पेत्राच्या प्रतिक्रियेवरून आपण काय शिकू शकतो? हेच की, जर आपण काळजी घेतली नाही, तर एक प्रामाणिक व्यक्‍तीसुद्धा देवाच्या विचारांना नव्हे, तर माणसांच्या विचारांना चालना देऊ शकते. (मत्त. १६:२१-२३) देवाच्या बुद्धीच्या तुलनेत आपला अनुभव अत्यंत मर्यादित आहे. तेव्हा बोलण्याआधी विचार करणे किती महत्त्वाचे आहे!—ईयो. ३८:१-४; नीति. ११:२.

३ नम्रपणे देवाच्या वचनातील सल्ला लागू करा.

“मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्‍या गोष्टी बोलतो.”योहा. ८:२८.

तुम्ही असे म्हणाल का, “मी जर तुझ्या जागी असतो तर मी . . .”? एखाद्याने विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर तुम्हाला सहजपणे देता येत असले, तरी नम्र व मर्यादशील असण्याच्या बाबतीत येशूने जे उदाहरण मांडले त्यावरून तुम्ही बरेच काही शिकू शकता. येशू कोणत्याही मनुष्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बुद्धिमान व अनुभवी होता, तरीसुद्धा त्याने असे म्हटले: ‘मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्‍याविषयी पित्याने मला आज्ञा दिली आहे.’ (योहा. १२:४९, ५०) होय, येशूची शिकवण व त्याचा सल्ला नेहमी देवाच्या इच्छेवर आधारित होता.

उदाहरणार्थ, लूक २२:४९ मध्ये आपण असे वाचतो की येशूला अटक केली जाणार होती तेव्हा त्याच्या शिष्यांनी आपण लढावे का असे त्याला विचारले. त्याच्या एका शिष्याने तरवार चालवली. हाच अहवाल मत्तय २६:५२-५४ मध्ये वाचायला मिळतो. तेथे सांगितले आहे की येशूने तशा परिस्थितीतसुद्धा त्या शिष्याला यहोवाची इच्छा काय आहे हे समजावून सांगण्यासाठी वेळ काढला. येशूला उत्पत्ति ९:६ मधील तत्त्वांची व स्तोत्र २२ आणि यशया ५३ मधील भविष्यवाण्यांची माहिती असल्यामुळे तो सुज्ञ मार्गदर्शन देऊ शकला ज्यामुळे नक्कीच लोकांचे जीवन वाचले व यहोवाचे मन आनंदी झाले.

४ तुमच्या ईश्‍वरशासित ग्रंथालयाचा उपयोग करा.

“ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण?”मत्त. २४:४५.

येशूने महत्त्वाचे आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी एका भरवशालायक दास वर्गाला नेमले आहे. तुम्ही एखाद्याला महत्त्वाच्या विषयांवर सल्ला व मार्गदर्शन देता, तेव्हा बायबलवर आधारित प्रकाशनांचा उपयोग करून तुम्ही पुरेसे संशोधन करण्यासाठी वेळ काढता का?

वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स आणि वॉचटावर लायब्ररी * यांद्वारे आपल्याला सहजासहजी विपुल प्रमाणात व स्पष्ट माहिती मिळते. माहितीच्या या भांडाराकडे दुर्लक्ष करणे किती चुकीचे ठरेल! सल्ला मागणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत करण्यासाठी वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स आणि वॉचटावर लायब्ररी यांत हजारो विषयांचा व त्या विषयांवरील अनेक लेखांचा उल्लेख आढळतो. बायबलच्या तत्त्वांचे परीक्षण करण्यास व देवाच्या वचनावर तर्क करण्यास इतरांना मदत करण्यात तुम्ही किती कुशल आहात? ज्याप्रमाणे जीपीएस एका व्यक्‍तीला ती कोठे आहे हे दाखवू शकते आणि तिला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे जाण्यासाठी मार्गदर्शित करू शकते, त्याचप्रमाणे संशोधनाची साधने एका व्यक्‍तीला ती कोणत्या मार्गावर आहे व ती कशा प्रकारे जीवनाच्या मार्गावर चालत राहू शकते हे पाहण्यास मदत करू शकतात.

अनेक वडिलांनी प्रचारकांना इंडेक्सचावॉचटावर लायब्ररीचा उपयोग करून लेख शोधण्याचे प्रशिक्षण दिले आहे आणि अशा प्रकारे त्यांनी बंधुभगिनींना शास्त्रवचनांवर तर्क करण्यास मदत केली आहे. या मदतीमुळे प्रचारकांना त्यांच्यासमोर असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यास मदत तर मिळतेच; शिवाय, त्यांना संशोधन करण्याची व यहोवाच्या आध्यात्मिक तरतुदींवर विसंबून राहण्याची सवयसुद्धा लागते. अशा रीतीने त्यांना ‘त्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे.’—इब्री ५:१४.

५ इतरांसाठी निर्णय घेण्याचे टाळा.

“प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.”गलती. ६:५.

शेवटी, कोणता सल्ला व मार्गदर्शन आपल्यासाठी योग्य आहे हे ज्याने-त्याने स्वतःच ठरवले पाहिजे. आपण यहोवाच्या तत्त्वांचे अनुसरण करणार की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य यहोवा सगळ्यांना देतो. (अनु. ३०:१९, २०) असे काही प्रसंग असतात ज्यांत बायबलची अनेक तत्त्वे लागू होऊ शकतात, आणि सल्ला मागणाऱ्‍या व्यक्‍तीने शेवटी स्वतःच आपला काय तो निर्णय घ्यायचा असतो. सल्ला विचारणाऱ्‍या व्यक्‍तीचा प्रश्‍न व वय विचारात घेऊन आपण स्वतःला असाही प्रश्‍न विचारला पाहिजे, की ‘या प्रश्‍नाचं उत्तर देण्याचा मला खरंच अधिकार आहे का?’ कारण अशा काही बाबी असतात ज्या फक्‍त मंडळीच्या वडिलांनी हाताळणे, किंवा प्रश्‍न विचारणारी व्यक्‍ती वयाने लहान असेल, तर तिच्या पालकांनी हाताळणे सगळ्यात योग्य असते.

[तळटीप]

^ परि. 20 सीडी-रॉमवरील वॉचटावर लायब्ररी सध्या ३९ भाषांमध्ये उपलब्ध आहे. वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स सध्या ४५ पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे.

[८ पानांवरील चित्र/चौकट]

कौटुंबिक उपासना प्रकल्प

अभ्यास प्रकल्प म्हणून, तुम्हाला अलीकडे विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्ही संशोधन करू शकता का? प्रश्‍न विचारणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत करण्यासाठी तुम्ही कोणते लेख किंवा बायबलची कोणती तत्त्वे शोधू शकता? उदाहरणार्थ, असे समजा, की एका बंधू किंवा भगिनीने एखाद्या व्यक्‍तीशी गाठीभेटी करण्याविषयी व त्यानंतर लग्न करण्याविषयी तुम्हाला प्रश्‍न विचारला आहे. इंडेक्सचा किंवा वॉचटावर लायब्ररीचा उपयोग करताना सदर प्रश्‍नाशी थेट संबंधित असलेले विषय आधी पाहा. उदाहरणार्थ, इंडेक्समध्ये “डेटिंग” किंवा “मॅरेज” हे विषय तुम्ही पाहू शकता. मग, त्या प्रश्‍नाशी संबंधित असलेले इतर लेख पाहण्यासाठी त्या विषयांखाली दिलेले उपविषय पाहा. एखादा मुख्य विषय पाहताना, तेथे “सी ऑल्सो” विषय आहेत का ते पाहा; कदाचित त्या विषयांखाली तुमच्या प्रश्‍नाशी अधिक थेटपणे निगडित असलेली माहिती तुम्हाला मिळू शकते.

[९ पानांवरील चौकट]

यहोवा त्याच्या संघटनेमार्फत आपल्यासाठी ज्या अनेक तरतुदी करतो त्यांबद्दल आपण किती आभारी आहोत! कारण त्या तरतुदींमुळेच आपण उत्तम सल्ला देऊ शकतो व मिळवूही शकतो. उपदेशक १२:११ (मराठी कॉमन लँग्वेज) म्हणते: “ज्ञानवंताची बोधवचने अंकुशाप्रमाणे असतात. संग्रहीत केलेली ती घट्ट ठोकलेल्या खिळ्यासारखी असतात. ती एकाच मेंढपाळाकडून आलेली असतात.” ‘अंकुशाचा’ उपयोग प्राण्यांना योग्य मार्गाने नेण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे चांगला व प्रेमळ सल्ला प्रामाणिक लोकांना योग्य दिशेने मार्गदर्शित करतो. तसेच, ज्याप्रमाणे ‘घट्ट ठोकलेल्या खिळ्यांमुळे’ इमारत भक्कम बनते, त्याचप्रमाणे उत्तम सल्ला एखाद्या व्यक्‍तीला जीवनात उत्तम व पक्के निर्णय घेण्यास मदत करतो. ज्ञानवंतांना किंवा बुद्धिमान लोकांना ‘संग्रहित केलेल्या बोधवचनांचे’ म्हणजे सुज्ञ सल्ल्याचे पालन करण्यात अपार आनंद होतो, कारण ही बोधवचने आपल्या ‘मेंढपाळाची’ अर्थात यहोवाची बुद्धी प्रकट करतात.

तेव्हा, इतरांना सल्ला देताना आपला मेंढपाळ यहोवा याचे अनुकरण करा. सल्ला विचारणाऱ्‍या व्यक्‍तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि शक्य तेव्हा उत्तम सल्ला देणे हा खरोखरच एक बहुमान आहे. आपला सल्ला पूर्णपणे बायबलच्या तत्त्वांवर आधारित असेल, तर इतरांना त्याचा फायदा होईल व त्यामुळे त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल.