व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुझ्या उजव्या हातात सुखे सर्वकाळ आहेत”

“तुझ्या उजव्या हातात सुखे सर्वकाळ आहेत”

जीवन कथा

“तुझ्या उजव्या हातात सुखे सर्वकाळ आहेत”

लोइस डीडर यांच्याद्वारे कथित

‘मी तशी निवड केली नसती, तर किती बरं झालं असतं,’ असं कधी तुम्हाला वाटलं आहे का? पूर्ण-वेळच्या सेवेत ५० वर्षं घालवल्यावर, यहोवाच्या उजव्या हाताकडे राहिल्यामुळे कायमचं दुःख झाल्याचं मला तरी आठवत नाही. असं मी का म्हणू शकते, ते मी तुम्हाला सांगू इच्छिते.

माझा जन्म १९३९ मध्ये कॅनडातील सॅस्केचिवन प्रांतातील ग्रामीण भागात झाला आणि तिथंच मी माझ्या चार बहिणी व एक भाऊ यांच्यासोबत लहानाची मोठी झाले. गवताळ प्रदेशातील शेतमळ्यावरचं जीवन सुखाचं होतं. एके दिवशी, यहोवाचे साक्षीदार आमच्या घरी आले व ते माझ्या बाबांशी बोलले; देवाला नाव आहे का, असं मी त्यांना विचारलं. त्यांनी आम्हाला स्तोत्र ८३:१८ मध्ये यहोवा हे नाव दाखवलं. त्यामुळे देवाबद्दल व त्याच्या वचनाबद्दल जास्त जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.

त्या काळी, शेतमळ्यांवर असणारी मुलं आठव्या वर्गापर्यंतच्या शिक्षणासाठी एका खोलीत भरणाऱ्‍या ग्रामीण शाळेत जायची. ती कित्येक मैल घोड्यांवर बसून किंवा चालतच शाळेला जायची. शाळेतील शिक्षकाच्या गरजा त्या जिल्ह्यातील कुटुंबंच भागवायचे. एका वर्षी, जॉन डीडर नावाच्या नवीन शिक्षकाच्या राहण्याची व खाण्यापिण्याची सोय करण्याची पाळी माझ्या आईबाबांची होती.

या तरुण शिक्षकालाही देवाच्या वचनाबद्दल खूप आस्था होती, हे मला माहीत नव्हतं. एकदा मी साम्यवादाची व समाजवादाची प्रशंसा करत होते, ज्यांचं समर्थन त्या काळी माझे बाबा करायचे. तेव्हा जॉननी शांतपणे म्हटलं: “कोणाही माणसाला इतर माणसांवर शासन करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार केवळ देवाला आहे.” याचा परिणाम असा झाला की या विषयावर आम्ही अनेकदा खूप आवडीनं चर्चा केली.

जॉनचा जन्म १९३१ मध्ये झाला होता, त्यामुळे त्यांनी युद्धकाळातील अडचणींविषयी ऐकलं होतं. १९५० मध्ये कोरियन युद्ध सुरू झालं तेव्हा जॉननी वेगवेगळ्या चर्चच्या पाळकांना युद्धातील त्यांच्या सहभागाबद्दल विचारलं. त्या सर्वांनी म्हटलं की ख्रिश्‍चनांनी युद्धात भाग घेण्यात काहीच गैर नाही. नंतर, जॉननी तोच प्रश्‍न यहोवाच्या साक्षीदारांना विचारला. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी युद्धाबद्दल बायबलवर आधारित जी भूमिका घेतली होती त्याकडे साक्षीदारांनी जॉनचं लक्ष वेधलं. जॉननी १९५५ मध्ये बाप्तिस्मा घेतला. त्याच्या पुढच्या वर्षी मीदेखील बाप्तिस्मा घेतला. यहोवाच्या सेवेत आमचं संपूर्ण जीवन व शक्‍ती खर्च करण्याची आम्हा दोघांचीही इच्छा होती. (स्तो. ३७:३, ४) सन १९५७ च्या जुलै महिन्यात आम्ही लग्न केलं.

जवळजवळ दरवर्षी, आम्ही आमच्या लग्नाच्या वाढदिवशी अधिवेशनात असायचो. अधिवेशनात, लग्नाबद्दल आदर असणाऱ्‍या हजारो लोकांच्या सहवासात असल्याचा आम्हाला खूप आनंद व्हायचा. १९५८ मध्ये आम्ही पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलो. न्यू यॉर्क सिटीला जाण्यासाठी आम्ही पाच जण सॅस्केचिवनहून कारनं निघालो. आठवडाभर, आम्ही दिवसा प्रवास केला आणि रात्री तंबूत झोपलो. पेन्सिल्वेनिया राज्यातील बेथलेहेममध्ये आम्हाला एक बांधव भेटले. त्यांनी त्या रात्री आम्हाला त्यांच्या घरी राहण्यास बोलावलं तेव्हा आम्हाला किती आनंद झाला त्याचा विचार करा! त्या बांधवानं पहिल्याच भेटीत दाखवलेल्या या प्रेमामुळे आम्ही न्यू यॉर्क सिटीत व्यवस्थित तयार होऊन पोहचू शकलो. यहोवाची सेवा करणं किती सुखावह आहे हे त्या मोठ्या अधिवेशनानं आमच्या मनावर बिंबवलं! “तुझ्या उजव्या हातात सुखे सर्वकाळ आहेत,” असं जे स्तोत्रकर्त्यानं म्हटलं होतं त्याप्रमाणेच आम्हाला वाटलं.—स्तो. १६:११, पं.र.भा.

पायनियर सेवा

त्याच्या एक वर्षानंतर, म्हणजे १९५९ मध्ये आम्ही पायनियर सेवा सुरू केली आणि सॅस्केचिवनमधील एका गवताळ टेकडीवर एका छोट्याशा ट्रेलरमध्ये राहू लागलो. तिथून आम्ही कित्येक मैल दूरपर्यंत पाहू शकत होतो. त्यापैकी काही भाग आमच्या प्रचाराचं क्षेत्र होतं.

एके दिवशी, शाखा कार्यालयातून आम्हाला एक पत्र आलं. मी लगबगीनं, जॉन जिथं ट्रॅक्टरची दुरुस्ती करत होते तिथं गेले. त्या पत्राद्वारे, आम्हाला आँटेरियो राज्यातील रेड लेक नगरात खास पायनियर या नात्यानं सेवा करण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. ते ठिकाण कुठं आहे हे आम्हाला माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही लगेच नकाशा बाहेर काढला आणि ते ठिकाण त्यात शोधू लागलो.

ते ठिकाण गवताळ प्रदेशापेक्षा किती वेगळं होतं! आता आम्हाला आमच्या आवतीभोवती मोठमोठी जंगलं आणि सोन्याच्या खाणींच्या आसपास असलेले छोटे-छोटे शहर दिसत होते. पहिल्या दिवशी, राहण्यासाठी घर शोधत असताना आम्ही एका स्त्रीशी बोलत होतो तेव्हा एका लहान मुलीनं आमचं बोलणं ऐकलं. ती धावत घरी गेली आणि त्याबद्दल तिनं तिच्या आईला सांगितलं. त्या मुलीच्या आईनं प्रेमळपणे आम्हाला त्या रात्री त्यांच्याकडे राहण्यास सांगितलं. तिथं आमचा बिछाना मातीच्या तळघरात होता. दुसऱ्‍या दिवशी, आम्ही एक घर शोधून काढलं. ते दोन खोल्यांचं लाकडाचं घर होतं. त्या घरात नळ नव्हता आणि सामानसुमानही नव्हतं; केवळ लाकडं जाळणारा एक लोखंडी हीटर होता. आम्ही जुन्या सामानांच्या एका दुकानातून काही वस्तू विकत घेतल्या. आमच्याजवळ जे काही होतं त्यात आम्ही समाधान मानलं.

तिथून १३० मैल दूरपर्यंत (२०९ किमी) एकही मंडळी नव्हती. सोन्याच्या खाणींतील अनेक कामगार युरोपमधून आले होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या भाषेत बायबल आणायला सांगितलं. काही काळातच आम्ही ३० चांगले बायबल अभ्यास चालवत होतो. आणि सहा महिन्यांच्या आत तिथं एक लहानशी मंडळी सुरू झाली.

आम्ही एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास करायचो. तिच्या पतीनं त्यांच्या पाळकाला फोन करून घरी बोलावलं आणि त्याची पत्नी आमच्याकडून जे काही शिकत आहे ते चुकीचं आहे हे सिद्ध करण्यास सांगितलं. पाळक आले तेव्हा त्यांनी आम्हाला म्हटलं की आम्ही इतर गोष्टींसोबत त्रैक्यदेखील शिकवलं पाहिजे. त्या स्त्रीनं त्यांचं कॅथलिक बायबल आणलं आणि पाळक जे म्हणत होते ते बायबलमधून सिद्ध करण्यास सांगितलं. मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही असं म्हणत पाळकानं बायबल टेबलावर फेकून दिलं. तिथून जाता जाता त्या पाळकानं युक्रेनियन भाषेत म्हटलं की त्यांनी आम्हाला घराबाहेर हाकलून द्यावं आणि पुन्हा कधीच घरात येऊ देऊ नये. पण जॉनला युक्रेनियन भाषा कळते हे त्या पाळकाला माहीत नव्हतं!

त्यानंतर लवकरच, जॉनला विभागीय सेवेसाठी प्रशिक्षण दिलं जाणार होतं, त्यामुळे आम्ही रेड लेक सोडलं. पण, त्याच्या सुमारे एक वर्षानंतर जॉन एका प्रांतीय अधिवेशनात बाप्तिस्म्याचं भाषण देत होते, त्या वेळी बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांमध्ये त्या स्त्रीचा पतीदेखील होता! पाळकासोबतच्या त्या घटनेमुळे, तिचा पती स्वतः बायबलचं परीक्षण करू लागला होता.

प्रवासी कार्यात व्यस्त

विभागीय कार्यात, आम्हाला वेगवेगळ्या कुटुंबांसोबत राहण्याची सुसंधी मिळाली. ज्यांनी आम्हाला त्यांच्या घरात राहू दिलं व आम्हाला त्यांच्या जीवनाचा भाग बनवला त्यांच्याशी आमची जवळीक निर्माण झाली. एकदा आम्ही एका वरच्या मजल्यावरच्या खोलीत राहत होतो ज्यात हिवाळ्यात खोली गरम ठेवण्याची काहीच व्यवस्था नव्हती. रोज पहाटे, त्या घरातली वयोवृद्ध बहीण आमच्या खोलीतला छोटासा स्टोव्ह पेटवण्यासाठी हळूच आमच्या खोलीत यायची. त्यानंतर, थोड्याच वेळानं ती एक पातेलं आणि गरम पाणी घेऊन परत यायची आणि आम्ही आमचं आवरून कार्याला निघून जायचो. त्या बहिणीच्या या शांत, प्रेमळ कृत्यांवरून मी बरंच काही शिकले.

विभागीय कार्यामुळे मला यहोवाच्या आणखी जवळ यायला मदत मिळाली. ॲल्बर्टा राज्याच्या अगदी उत्तरेस सोन्याची खाण असलेले एक शहरदेखील आमच्या विभागात समाविष्ट होते. त्या शहरात एक बहीण राहायची. या दूरच्या क्षेत्रात राहणाऱ्‍या त्या एकट्या बहिणीकडे पाहण्याचा यहोवाच्या संघटनेचा दृष्टिकोन कसा होता? दर सहा महिन्यांनी, आम्ही एका आठवड्यासाठी विमानानं तिथं जायचो. आणि मोठ्या शहरातील मंडळीप्रमाणेच आम्ही त्या बहिणीसोबत सेवेला जायचो व सभा घ्यायचो. यावरून यहोवा प्रत्येक लहान मेंढरांसमान व्यक्‍तीची किती प्रेमळपणे काळजी घेतो याची आम्हाला जाणीव व्हायची.

विभागीय कार्यात ज्या बंधुभगिनींनी आमच्या राहण्याची सोय केली होती त्यांच्या संपर्कात आम्ही राहिलो. त्यावरून जॉननी मला दिलेल्या पहिल्या भेटवस्तूची मला आठवण होते. त्यांनी मला एक रंगीबेरंगी डबा दिला होता ज्यात पत्र लिहिण्यासाठी पुष्कळ कागद होते. त्या कागदांचा उपयोग करून मित्रांच्या संपर्कात राहायला आम्हाला खूप आवडायचं. तो डबा मी आजपर्यंत जपून ठेवला आहे.

टराँटोतील एका विभागात सेवा करत असताना, कॅनडा बेथेलमधील एका बांधवानं आम्हाला फोन केला आणि आम्ही बेथेलमध्ये सेवा करण्याचा विचार करू शकतो का, असं आम्हाला विचारलं. त्यांना उत्तर कधीपर्यंत हवं होतं? त्यांनी म्हटलं, “शक्यतो उद्याच!” दुसऱ्‍या दिवशी आम्ही त्यांना आमचा होकार कळवला.

बेथेल सेवा

प्रत्येक नवीन नेमणुकीत, यहोवाच्या उजव्या हाताकडे राहिल्यामुळे मिळणाऱ्‍या सुखाचे निरनिराळे पैलू आम्ही अनुभवले. आम्ही १९७७ मध्ये बेथेलला गेलो तेव्हादेखील आम्ही हे अनुभवलं. आम्हाला काही अभिषिक्‍त जनांसोबत सहवास करायला मिळाल्यामुळे, आम्ही केवळ त्यांचे वेगवेगळे व्यक्‍तिमत्त्वच पाहिले नाही, तर त्यांना देवाच्या वचनाबद्दल किती आदर आहे हेदेखील पाहिलं.

आम्हाला बेथेलमधला नवीन दिनक्रम खूप आवडला. उदाहरणार्थ, आता आम्ही आमचे कपडे सूटकेसऐवजी कपाटामध्ये ठेवू लागलो. तसंच, आता आम्ही केवळ एकाच मंडळीसोबत सहवास करू लागलो. बेथेलमधल्या माझ्या कामाव्यतिरिक्‍त, बेथेल पाहायला येणाऱ्‍यांना बेथेल दाखवायला मला नेहमीच खूप आवडायचं. मी त्यांना बेथेलमध्ये कोणतं काम केलं जातं ते स्पष्ट करून सांगायचे, त्यांच्या टिपण्या ऐकायचे आणि त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायचे.

वर्षं भरभर निघून गेले आणि १९९७ मध्ये जॉनला, न्यू यॉर्क राज्यातील पॅटरसनमध्ये शाखा समिती सदस्यांच्या प्रशालेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. त्यानंतर, आम्हाला युक्रेनमध्ये जाण्याबद्दल विचारण्यात आलं. त्याबद्दल आम्ही काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार करावा असं प्रोत्साहन आम्हाला देण्यात आलं. त्या दिवसाच्या अखेरीस, आमचं उत्तर हो असेल हे आम्हाला पक्कं ठाऊक होतं.

नवी नेमणूक—युक्रेन

आम्ही १९९२ मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये भरलेल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला, आणि त्यानंतर १९९३ मध्ये युक्रेनमधील कियेफमध्ये भरलेल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो होतो. त्या अधिवेशनांमुळे आम्ही पूर्व युरोपमधील आमच्या बंधुभगिनींकडे आकर्षित झालो. युक्रेनमधील ल्वॉफमध्ये एका जुन्या घराच्या दुसऱ्‍या मजल्यावर आमच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. तिथल्या खिडक्यांतून आम्हाला अंगण दिसायचं ज्यात एक छोटीशी बाग, एक मोठा लाल कोंबडा आणि काही कोंबड्या होत्या. त्यामुळे मला मी जणू सॅस्केचिवनच्या शेतमळ्यावर आहे असं वाटायचं. त्या घरात आम्ही बारा जण राहत होतो. बेथेलमध्ये कामावर जाण्यासाठी आम्हाला रोज पहाटे शहरातून जावं लागायचं.

युक्रेनमधील आमच्या वास्तव्याबद्दल आम्हाला कसं वाटलं? ज्या अनेक बंधुभगिनींनी संकटांचा, बंदीचा सामना केला होता आणि तुरुंगवास सोसला होता अशांसोबत सहवास केल्यानं त्यांनी जीवनात किती काही सोसलं होतं याची जाणीव आम्हाला झाली. इतकं सगळं सोसूनही त्यांचा विश्‍वास दृढ होता. आम्ही त्यांची प्रशंसा करायचो तेव्हा ते म्हणायचे, “आम्ही ते यहोवासाठी केलं.” त्यांना कधीच असं वाटलं नाही, की त्यांना वाऱ्‍यावर सोडण्यात आलं होतं. आजही, त्यांनी केलेल्या एखाद्या प्रेमळ कृतीसाठी त्यांचे आभार मानले, तर “आमचे नाही, यहोवाचे आभार माना,” असं ते म्हणतात. यावरून सर्व उत्तम गोष्टींचा स्रोत यहोवाच आहे हे ते मान्य करतात.

युक्रेनमध्ये अनेक बंधुभगिनी चालतच सभेला जातात. त्यांना सभेला जाण्यासाठी एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चालावं लागतं. त्यामुळे एकमेकांशी बोलण्यासाठी आणि एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी त्यांच्याजवळ भरपूर वेळ असतो. ल्वॉफमध्ये ५० पेक्षा जास्त मंडळ्या आहेत, आणि त्यांपैकी २१ मंडळ्या एका मोठ्या राज्य सभागृह-संकुलाचा उपयोग करतात. दर रविवारी, वेगवेगळ्या मंडळ्यांतील बंधुभगिनींचे थवेच्या थवे सभेला येतात तेव्हा ते दृश्‍य पाहण्यासारखं असतं.

सौम्य स्वभावाच्या व इतरांची काळजी करण्यास उत्सुक असणाऱ्‍या बंधुभगिनींमध्ये आम्ही सहज मिसळून गेलो. मला जेव्हा त्यांचं बोलणं कळत नव्हतं तेव्हा आणि आताही मला काही समजलं नाही, तर ते माझ्याशी धीरानं वागतात. त्यांच्या बोलण्यातून जे व्यक्‍त होतं, तितकंच त्यांच्या डोळ्यांतूनही व्यक्‍त होतं.

आपल्या बांधवांचा एकमेकांवरचा खरा भरवसा, २००३ मध्ये कियेफ इथं भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनादरम्यान दिसून आला. आम्ही नुकतंच व्यस्त भुयारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोचलो होतो, तेवढ्यात एक छोटी मुलगी आमच्याजवळ येऊन आम्हाला शांतपणे म्हणाली: “मी माझ्या आजीला शोधतेय, ती मला सापडत नाहीए.” त्या मुलीनं आमचे बॅज कार्ड्‌ज पाहिले होते आणि आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत हे तिनं ओळखलं होतं. ती धैर्यवान होती व मुळीच रडत नव्हती. आमच्यासोबत असलेल्या एका विभागीय पर्यवेक्षकांच्या पत्नीनं त्या मुलीला अगदी प्रेमानं आपल्यासोबत घेतलं आणि अधिवेशन भरलं होतं त्या स्टेडियममध्ये असलेल्या हरवलेल्या वस्तूंच्या विभागात नेलं. त्यानंतर लवकरच तिला तिच्या आजीच्या हवाली करण्यात आलं. हजारो लोकांच्या गर्दीतदेखील त्या चिमुकल्या मुलीचा साक्षीदारांवर किती भरवसा होता हे पाहून माझं मन भरून आलं.

मे २००१ मध्ये नवीन शाखा कार्यालयाच्या इमारतींच्या समर्पण कार्यक्रमाच्या वेळी अनेक देशांतील बंधुभगिनी युक्रेनला आले. एका स्टेडियममध्ये रविवार सकाळी झालेल्या खास भाषणानंतर, नवीन बेथेल पाहण्यासाठी असंख्य बंधुभगिनी रस्त्यावरून चालत येत होते. किती अविस्मरणीय दृश्‍य होतं ते! शांत व शिस्तीनं वागणाऱ्‍या त्या बंधुभगिनींना पाहून माझं मन हेलावून गेलं. हे सगळं पाहून, देवाची सेवा केल्यामुळे मिळणाऱ्‍या सुखाबद्दल माझी कदर आणखी वाढली.

एक मोठा बदल

दुःखाची गोष्ट म्हणजे २००४ मध्ये जॉनला कर्करोग असल्याचं निदान करण्यात आलं. आम्ही त्यांच्या उपचारासाठी कॅनडाला गेलो. कीमोथेरपीचं पहिलं सत्र जॉनसाठी खूप असह्‍य होतं, त्यामुळे त्यांना काही आठवडे अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. आनंदाची गोष्ट म्हणजे ते शुद्धीवर आले. ते बोलू शकत नव्हते, पण त्यांना भेटायला येणाऱ्‍यांबद्दल त्यांच्या डोळ्यांतून कदर व्यक्‍त व्हायची.

पण, जॉन आजारातून बरे होऊ शकले नाही, आणि त्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ते वारले. त्यांच्या मृत्यूमुळे माझा एक महत्त्वाचा अवयव माझ्यापासून वेगळा झाला असं मला वाटलं. आम्ही दोघांनी यहोवाच्या सेवेत खूप आनंद अनुभवला होता. जॉनशिवाय मी काय करणार होते? मी युक्रेनला परत जायचं ठरवलं. बेथेल कुटुंबानं व तिथल्या मंडळीनं दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी नेहमीच त्यांची खूप आभारी आहे.

आम्ही केलेल्या निवडींचा आम्हाला कधीच पस्तावा झाला नाही. बंधुभगिनींच्या सहवासातलं आमचं जीवन सुखावह ठरलं. मला माहीत आहे की यहोवाच्या चांगुलपणाबद्दल मला अजूनही बरंच काही शिकायचं आहे, आणि अनंतकाळपर्यंत त्याची सेवा करण्याची माझी इच्छा आहे, कारण ‘त्याच्या उजव्या हातात सुखे आहेत’ हे मी खरोखर अनुभवलं आहे.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आम्ही केलेल्या निवडींचा आम्हाला कधीच पस्तावा झाला नाही”

[३ पानांवरील चित्र]

आमच्या लग्नाच्या वेळी

[४ पानांवरील चित्र]

आँटेरियोतील रेड लेकमध्ये मी खास पायनियर म्हणून सेवा करत होते तेव्हा

[५ पानांवरील चित्र]

युक्रेनमध्ये जॉनसोबत, २००२