व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निकडीची भावना टिकवून ठेवा

निकडीची भावना टिकवून ठेवा

निकडीची भावना टिकवून ठेवा

“तू निकडीने सर्वदा देवाच्या वचनाची घोषणा करीत राहा.”—२ तीम. ४:२, सुबोधभाषांतर.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी निकडीच्या भावनेने प्रचार का केला?

आपण आपली निकडीची भावना कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो?

राज्याच्या प्रचाराचे कार्य आज कधी नव्हे इतक्या निकडीचे का आहे?

१, २. पौलाने “निकडीने” प्रचार करण्याचा जो सल्ला दिला त्यावरून कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

 जेलोक इतरांचे जीवन वाचवण्याचे काम करतात ते सहसा तातडीच्या भावनेने कार्य करतात. उदाहरणार्थ, एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्‌भवतो तेव्हा अग्निशामक दलाचे कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहचतात, कारण लोकांचे जीवन धोक्यात असेल हे त्यांना माहीत असते.

यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण इतरांना त्यांचे जीवन वाचवण्यास मदत करू इच्छितो. त्यामुळे, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची आपली जबाबदारी आपण गांभीर्याने घेतो. अर्थात, आपण हे कार्य विचार न करता घाईगडबडीने करत नाही. तर मग, “तू निकडीने सर्वदा देवाच्या वचनाची घोषणा करीत राहा,” असा जो सल्ला प्रेषित पौलाने दिला त्याचा काय अर्थ होतो? (२ तीम. ४:२) आपण निकडीच्या भावनेने प्रचार कसा करू शकतो? आणि आपले प्रचार कार्य इतक्या निकडीचे का आहे?

आपले प्रचार कार्य इतक्या निकडीचे का आहे?

३. लोकांनी राज्याचा संदेश स्वीकारला किंवा नाकारला तर त्यांना कोणते परिणाम मिळतील?

आपल्या प्रचार कार्यामुळे लोकांचे जीवन कसे वाचू शकते याचा तुम्ही विचार करता तेव्हा निकडीच्या भावनेने इतरांना सुवार्ता सांगणे गरजेचे आहे असे कदाचित तुम्हाला वाटेल. (रोम. १०:१३, १४) देवाचे वचन म्हणते: “मी कोणा दुर्जनास म्हणालो की तू मरशीलच, आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरून फिरून नीति व न्याय आचरील; . . . तर तो जगेलच, मरावयाचा नाही. त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशेबी धरिली जाणार नाहीत.” (यहे. ३३:१४-१६) जे इतरांना राज्याविषयी शिकवतात त्यांना बायबल असे म्हणते: “तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.”—१ तीम. ४:१६; यहे. ३:१७-२१.

४. पहिल्या शतकात निकडीच्या भावनेने प्रचार करणे गरजेचे का होते?

पौलाने तीमथ्याला निकडीने प्रचार करण्याचा सल्ला का दिला हे समजून घेण्यासाठी आपण या लेखाच्या मुख्य वचनाचा मागचा-पुढचा संदर्भ पाहू या. आपण असे वाचतो: “तू निकडीने सर्वदा देवाच्या वचनाची घोषणा करीत राहा. संधी मिळेल तेव्हा, वेळी अवेळी, सोईस्कर असेल तेव्हा, आणि सोईस्कर नसेल तेव्हाही, देवाचा संदेश देत राहा. आवश्‍यक असेल तेव्हा तुझ्या लोकांचे दोष दाखवून त्यांची कानउघाडणी कर. चांगले ते करण्यासाठी त्यांना उत्तेजन दे आणि सतत त्यांना देवाच्या वचनाचे अन्‍न धीराने भरवीत राहा. कारण अशी वेळ येत आहे की लोक सत्य ऐकणार नाहीत व त्यांना हवे ते ऐकवणाऱ्‍या शिक्षकांच्या शोधार्थ ते इकडे तिकडे भटकतील. पवित्रशास्त्र काय सांगते इकडे ते लक्ष देणार नाहीत.” (२ तीम. ४:२-४, सुबोधभाषांतर) येशूने पूर्वभाकीत केले होते की पुढील काळी धर्मत्यागाचा उदय होईल. (मत्त. १३:२४, २५, ३८) ती वेळ एव्हाना आली होती. आणि खोट्या शिकवणींच्या फसव्या आकर्षणामुळे ख्रिश्‍चनांची दिशाभूल होऊ नये म्हणून तीमथ्याने मंडळीमध्येही “वचनाची घोषणा” करत राहणे निकडीचे होते. त्या वेळी, ख्रिश्‍चनांचे जीवन धोक्यात होते. आज आपल्या काळाबद्दल काय म्हणता येईल?

५, ६. प्रचार कार्यादरम्यान कोणत्या लोकप्रिय शिकवणींशी आपला सामना होतो?

खऱ्‍या उपासनेतून सुरू झालेला धर्मत्याग आज वाढला आहे व तो सगळीकडे पसरला आहे. (२ थेस्सलनी. २:३, ८) लोकांना आज कोणत्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात? अनेक ठिकाणी, उत्क्रांतिवादाची शिकवण धार्मिक आवेशाने शिकवली जात आहे. उत्क्रांतिवादाची शिकवण सहसा वैज्ञानिक भाषेत सादर केली जात असली, तरी या शिकवणीने जवळजवळ धर्माचेच स्वरूप धारण केले आहे. आणि लोक देवाकडे व इतरांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात त्यावर उत्क्रांतिवादाचा प्रभाव पडला आहे. आणखी एक लोकप्रिय शिकवण ही आहे की देवाला आपल्यामध्ये मुळीच आस्था नाही; त्यामुळे आपल्यालाही त्याच्यामध्ये आस्था बाळगण्याची गरज नाही. या शिकवणींमुळे लाखो लोक आध्यात्मिक रीत्या झोपी जातात. लोकांना या शिकवणी इतक्या आकर्षक का वाटतात? या शिकवणींतून लोकांना पुढील संदेश दिला जातो: ‘तुम्हाला जे काही आवडते ते तुम्ही करू शकता, कारण तुम्हाला कोणीच जाब विचारणार नाही.’ मुळात अनेक लोकांना हेच ऐकायला आवडते.—स्तोत्र १०:४ वाचा.

आणखीही काही शिकवणी आहेत ज्या लोकांना ऐकायला आवडतात. जे थोडेफार लोक अजूनही चर्चला जातात त्यांना असे शिक्षक आवडतात जे त्यांना सांगतात की ‘तुम्ही काहीही केले तरी देव तुमच्यावर प्रेम करतो.’ धर्मगुरू त्यांच्या लोकांना हा भरवसा देतात की अनेक धार्मिक विधी केल्याने व सण साजरे केल्याने त्यांना देवाचे आशीर्वाद मिळतील. पण, या लोकांना आपली स्थिती किती गंभीर आहे हे मुळीच कळत नाही. (स्तो. ११५:४-८) पण, बायबलचा खरा संदेश काय आहे हे समजण्यास आपण त्यांना आध्यात्मिक रीत्या जागृत केले, तर देवाच्या राज्यापासून त्यांना फायदा होऊ शकतो.

निकडीच्या भावनेने प्रचार करण्याचा काय अर्थ होतो?

७. आपण निकडीची भावना कशा प्रकारे दाखवू शकतो?

एका विवेकी डॉक्टरने त्याच्यासमोर जे काम आहे केवळ त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते, कारण लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न असतो. आपण आपल्या सेवाकार्यादरम्यान, आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्याद्वारे, म्हणजे क्षेत्रात भेटणाऱ्‍या लोकांच्या समस्या काय आहेत, त्यांना कोणते प्रश्‍न भेडसावतात किंवा त्यांना कोणती माहिती आवडते याविषयी विचार करण्याद्वारे आपण निकडीच्या भावनेने कार्य करत आहोत हे दाखवू शकतो. निकडीच्या भावनेमुळे आपल्याला आपल्या आराखड्यात बदल करण्याची व लोकांना अशा वेळी भेटण्याची प्रेरणा मिळेल जेव्हा ते आपला संदेश ऐकू शकतील.—रोम. १:१५, १६; १ तीम. ४:१६.

८. निकडीच्या भावनेने कार्य करण्यात सहसा काय समाविष्ट असते?

निकडीच्या भावनेने कार्य करण्यात प्राधान्यक्रम ठरवणेदेखील समाविष्ट आहे. (उत्पत्ति १९:१५ वाचा.) उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की तुमचे टेस्ट रिपोर्ट मिळाल्यावर डॉक्टर तुम्हाला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावतो आणि तुम्हाला कळकळीने असे म्हणतो: “पाहा! तुमची स्थिती खूप नाजूक आहे. तुमच्याजवळ एक महिना आहे, काय करायचंय ते लवकर ठरवा.” आणीबाणीच्या प्रसंगी जसा अग्निशामक दलाचा माणूस तातडीने निघतो तसे तुम्ही डॉक्टरच्या ऑफिसमधून कदाचित बाहेर पडणार नाही. पण तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊन घरी जाल आणि सर्वात आधी काय करायचे त्याविषयी गंभीरतेने विचार कराल.

९. इफिसमध्ये असताना पौलाने निकडीच्या भावनेने प्रचार केला असे आपण का म्हणू शकतो?

पौलाने आशिया प्रांतात सुवार्तेचा जो प्रचार केला त्याविषयी इफिसच्या वडिलांना त्याने जे सांगितले त्यावरून त्याच्या निकडीच्या भावनेविषयी आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. (प्रेषितांची कृत्ये २०:१८-२१ वाचा.) असे दिसते, की तेथे पोहचल्याच्या पहिल्याच दिवसापासून तो घरोघरी जाऊन लोकांना सुवार्ता सांगू लागला. त्यासोबतच, त्याने नियमितपणे दोन वर्षे ‘तुरन्‍नाच्या पाठशाळेत दररोज वादविवाद केला.’ (प्रे. कृत्ये १९:१, ८-१०) यावरून स्पष्टपणे दिसते, की पौलाच्या निकडीच्या भावनेचा त्याच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडला होता. ‘आपले सेवाकार्य निकडीने’ करण्याचा जो आर्जव आपल्याला करण्यात आला आहे तो आपल्यावर दडपण आणण्यासाठी नाही. तरीसुद्धा, आपण आपल्या जीवनात प्रचार कार्याला प्राधान्य दिले पाहिजे.

१०. काही शंभर वर्षांआधी ख्रिश्‍चनांनी निकडीच्या भावनेने कार्य केले याचा आपल्याला आनंद का होतो?

१० निकडीच्या भावनेने प्रचार करण्याचा काय अर्थ होतो हे सन १९१४ च्या आधीच्या काळात सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी सज्ज झालेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या एक लहानशा गटाच्या उदाहरणावरून चित्रित होते. त्या वेळी त्यांची संख्या केवळ काही हजार होती. पण त्यांनी काळाची निकड ओळखली व आवेशाने राज्याचा प्रचार करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांनी शेकडो वृत्तपत्रांमध्ये बायबलचा संदेश प्रकाशित केला आणि “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” नावाचा रंगीत सरकचित्रांचा व चलचित्रांचा एक कार्यक्रम सादर केला. अशा प्रकारे, त्यांची सुवार्ता लाखो लोकांपर्यंत पोहचली. त्यांनी निकडीच्या भावनेने कार्य केले नसते, तर आपल्यापैकी किती लोकांना राज्याचा संदेश ऐकायला मिळाला असता?—स्तोत्र ११९:६० वाचा.

निकडीची भावना गमावण्याच्या धोक्यापासून सावध असा

११. काही जणांनी कशामुळे निकडीची भावना गमावली आहे?

११ विकर्षणांमुळे एका व्यक्‍तीचे लक्ष प्रचार कार्याच्या महत्त्वावरून विचलित होऊ शकते. सैतानाच्या जगाची रचना एका व्यक्‍तीला वैयक्‍तिक गोष्टींमध्ये व कमी महत्त्वाच्या इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. (१ पेत्र ५:८; १ योहा. २:१५-१७) एके काळी यहोवाच्या सेवेला प्राधान्य दिलेल्या काहींनी आपली निकडीची भावना गमावली आहे. उदाहरणार्थ, पहिल्या शतकातील देमास नावाचा एक ख्रिस्ती पौलाचा “सहकारी” होता, पण देमास सैतानाच्या जगातील गोष्टींमुळे विचलित झाला. संकटकाळात पौलाला मदत करत राहण्याऐवजी देमासने पौलाला सोडून दिले.—फिले. २३, २४; २ तीम. ४:१०.

१२. आता आपल्यासमोर कोणती संधी आहे, आणि भविष्यात सदासर्वकाळासाठी आपल्याला कोणत्या संधी असतील?

१२ आपल्याला आपली निकडीची भावना टिकवून ठेवायची असल्यास, सांसारिक गोष्टींचा जास्त उपभोग घेण्याच्या आपल्या इच्छेचा आपण प्रतिकार करण्याची गरज आहे. आपण ‘खरे जीवन बळकट धरण्याचा’ प्रयत्न केला पाहिजे. (१ तीम. ६:१८, १९) देवाच्या राज्यात आपल्याला पृथ्वीवर आनंददायक गोष्टींचा उपभोग घेण्याच्या अनंत संधी मिळतील याविषयी कदाचित तुमच्या मनात काहीही शंका नसेल. पण, इतरांना हर्मगिदोनातून वाचण्यास मदत करण्याची आपल्याला मिळालेली संधी ही आजच्या काळाकरता खास आहे.

१३. आपण आता ख्रिस्ती असल्यामुळे, आपण कशा प्रकारे आपली निकडीची भावना टिकवून ठेवू शकतो?

१३ आपल्या आवतीभोवती असलेले लोक अविचारीपणे आध्यात्मिक झोप घेत असताना, आपण आपली निकडीची भावना गमावू नये म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? आपण एक महत्त्वाची गोष्ट आठवू शकतो, ती म्हणजे एके काळी आपण जणू अंधारात झोपलेलो होतो. पण, आपल्याला जागे करण्यात आले आणि पौलाने म्हटल्यानुसार, ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यावर पडला. हा प्रकाश धारण करण्याचा विशेषाधिकार आता आपल्याला मिळाला आहे. (इफिसकर ५:१४ वाचा.) या गोष्टीचा उल्लेख केल्यावर पौलाने लिहिले, की तुम्ही “अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” (इफिस. ५:१५, १६) आपल्या सभोवताली वाईट गोष्टी घडत असताना, आपण “वेळेचा सदुपयोग” अशा गोष्टी करण्यासाठी करू या ज्यांमुळे आपल्याला आध्यात्मिक रीत्या जागृत राहणे शक्य होईल.

आपण महत्त्वाच्या काळात जगत आहोत

१४-१६. राज्याचे प्रचार कार्य आज कधी नव्हे इतक्या निकडीचे का आहे?

१४ ख्रिस्ती सेवाकार्य नेहमीच निकडीचे राहिले आहे, आणि आता तर ते कधी नव्हे इतके तातडीचे बनले आहे. देवाच्या वचनात वर्णन केलेले संयुक्‍त चिन्ह सन १९१४ पासून सुस्पष्ट दिसू लागले आहे. (मत्त. २४:३-५१) मानवजातीच्या अस्तित्वाला पूर्वी कधी नव्हे इतका धोका निर्माण झाला आहे. अलीकडेच शस्त्रास्त्र न वापरण्याचा करार करूनही, जागतिक महासत्तांनी सुमारे २,००० आण्विक शस्त्रे हल्ल्यासाठी सज्ज करून ठेवली आहेत. आण्विक पदार्थ “हरवले” असल्याची शेकडो प्रकरणे अधिकाऱ्‍यांनी नमूद केली आहेत. त्या पदार्थापैकी काही दहशतवाद्यांच्या हातात पडले आहे का? एखाद्या दहशतवाद्याने हल्ला केल्यास संपूर्ण मानवजातीचा सहजपणे विनाश होऊ शकतो असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. पण, केवळ युद्धामुळेच मानवजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे का?

१५ “हवामानातील बदल हा २१ व्या शतकात जगभरातील लोकांच्या आरोग्याला मोठा धोका ठरला आहे,” असे द लॅन्सेट या नियतकालिकाने आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने २००९ मध्ये संयुक्‍तपणे सादर केलेल्या एका अहवालात म्हटले. त्या अहवालात असेही म्हटले आहे: “पुढील दशकांमध्ये हवामानातील बदलाचा जगातील अनेक भागांतील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन व आरोग्य आणखी जास्त धोक्यात येईल.” समुद्रांची पातळी वाढल्यामुळे, दुष्काळांमुळे, प्रलयांमुळे, रोगराईमुळे, चक्रीवादळांमुळे आणि साधन टंचाईवर होणाऱ्‍या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो. होय, युद्धांमुळे व संकटांमुळे मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

१६ काही जण कदाचित असा विचार करतील की आण्विक युद्धाच्या धोक्यामुळे अशा घटना घडू शकतात ज्यांमुळे ‘चिन्हाची’ पूर्तता होईल. पण, त्या चिन्हाचे खरे महत्त्व काय आहे हे पुष्कळ लोकांना माहीत नाही. हे चिन्ह अनेक दशकांपासून स्पष्टपणे दिसत आहे. यावरून हे सूचित होते की ख्रिस्ताची उपस्थिती हे एक वास्तव आहे आणि जगाचा अंत वेगाने जवळ येत आहे. (मत्त. २४:३) यापूर्वी कधीच त्या चिन्हाची इतकी सारी वैशिष्ट्ये इतक्या स्पष्टपणे पाहायला मिळाली नाहीत. लोकांनी आध्यात्मिक झोपेतून जागे होण्याची हीच वेळ आहे. आपण आपल्या सेवाकार्याद्वारे त्यांना जागे होण्यास मदत करू शकतो.

१७, १८. (क) शेवटल्या दिवसांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो? (ख) राज्य संदेशाप्रती लोकांचा दृष्टिकोन कोणत्या गोष्टींमुळे बदलू शकतो?

१७ यहोवावर आपले प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आणि शेवटल्या दिवसांकरता नेमून दिलेले प्रचार कार्य संपवण्यासाठी आपल्याजवळ खूप कमी वेळ उरला आहे. पौलाने पहिल्या शतकात रोममधील ख्रिश्‍चनांना जे लिहिले होते ते आज आपल्याकरता आणखी जास्त अर्थपूर्ण आहे. त्याने लिहिले: “समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्‍वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे.”—रोम. १३:११.

१८ शेवटल्या दिवसांमध्ये घडणाऱ्‍या घटनांविषयी जे पूर्वभाकीत केले आहे त्यामुळे काही लोकांना त्यांच्या आध्यात्मिक गरजेची जाणीव होऊ शकते. इतर काही जण आर्थिक संकटे, आण्विक धोका, हिंसक कृत्ये किंवा पर्यावरणाचा नाश यांसारख्या गोष्टींना आळा घालण्यात सरकारे अपयशी ठरली आहेत यावर विचार करतात तेव्हा मानवांना मदतीची गरज आहे याची त्यांना जाणीव होते. इतर काहींना त्यांच्या कुटुंबात घडणाऱ्‍या घटनांमुळे, जसे की गंभीर आरोग्य समस्या, घटस्फोट किंवा प्रियजनाचा मृत्यू यांसारख्या घटनांमुळे आध्यात्मिक गरजेची जाणीव होते. आपण सेवाकार्यात भाग घेतो तेव्हा अशा लोकांना मदत करण्यासाठी आपण तयार आहोत हे दाखवतो.

निकडीच्या भावनेने प्रवृत्त

१९, २०. निकडीच्या भावनेमुळे कशा प्रकारे अनेक ख्रिश्‍चन त्यांची जीवनशैली बदलण्यास प्रवृत्त झाले आहेत?

१९ निकडीच्या भावनेमुळे अनेक ख्रिश्‍चनांना त्यांची सेवा आणखी वाढवण्याची प्रेरणा मिळाली आहे. उदाहरणार्थ, एक्वाडॉरमधील एका तरुण दांपत्याने २००६ मध्ये “आपला डोळा निर्दोष ठेवा” या खास संमेलनाला उपस्थित राहिल्यानंतर आपले जीवन साधे करण्याचे ठरवले. त्यांनी गरज नसलेल्या गोष्टींची एक यादी बनवली, आणि तीन महिन्यांच्या आत ते आपल्या तीन-बेडरूम फ्लॅटमधून एका सिंगल-बेडरूमच्या घरात राहायला गेले, त्यांनी काही वस्तू विकून टाकल्या आणि स्वतःला कर्जमुक्‍त केले. लवकरच त्यांनी साहाय्यक पायनियर सेवा सुरू केली आणि विभागीय पर्यवेक्षकाने सुचवल्यानुसार ते प्रचारकांची जास्त गरज असलेल्या मंडळीसोबत सेवा करू लागले.

२० उत्तर अमेरिकेतील एका बांधवाने असे लिहिले: “मी आणि माझी पत्नी २००६ मध्ये एका संमेलनाला उपस्थित राहिलो त्या वेळी आमचा बाप्तिस्मा होऊन ३० वर्षं झाली होती. जीवन साधं करण्याविषयी संमेलनात दिलेला सल्ला आम्ही कसा लागू करू शकतो याविषयी संमेलनानंतर घरी परतताना आम्ही चर्चा केली. (मत्त. ६:१९-२२) आमच्याकडे आमच्या मालकीची तीन घरं, जमीन, आलिशान गाड्या, एक बोट आणि राहण्याच्या सर्व सुखसोयी असलेली एक मोठी गाडी होती. आम्ही इतरांना बुद्धीहीन ख्रिश्‍चनांप्रमाणे भासलो असू असं आम्हाला वाटलं आणि आम्ही पूर्ण-वेळ सेवेला आपलं ध्येय बनवण्याचं ठरवलं. आमची मुलगी आधीपासूनच सामान्य पायनियर सेवा करत होती; २००८ मध्ये आम्हीदेखील तिच्यासोबत मिळून सामान्य पायनियर सेवा करायला सुरुवात केली. बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून काम केल्यानं खरोखर किती आनंद मिळतो! आम्हाला प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करणं शक्य झालं आहे. तसंच, यहोवाच्या सेवेत जास्त परिश्रम केल्यानं आम्हाला त्याच्या जवळ जाणं शक्य झालं आहे. खासकरून, देवाचं वचन ऐकल्यावर आणि त्याची समज प्राप्त झाल्यावर लोकांच्या डोळ्यांतील चमक पाहण्याचा विशेषाधिकार आम्हाला मिळाला आहे.”

२१. कोणत्या ज्ञानामुळे आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा मिळते?

२१ आपल्याला माहीत आहे की लवकरच या दुष्ट जगावर “न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस” उजाडेल. (२ पेत्र ३:७) आपल्याला देवाच्या वचनाचे ज्ञान असल्यामुळे, आपल्याला येणाऱ्‍या मोठ्या संकटाविषयी व भविष्यातील नवीन जगाविषयी आवेशाने घोषणा करण्याची प्रेरणा मिळते. आपण निकडीच्या भावनेने लोकांना खऱ्‍या आशेविषयी सांगत राहू या. तातडीच्या या कार्यात पूर्णपणे सहभाग घेऊन आपण देवाप्रती व इतरांप्रती खरे प्रेम दाखवू या.

[अभ्यासाचे प्रश्‍न]