व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पित्याला प्रगट करण्यास पुत्र उत्सुक आहे

पित्याला प्रगट करण्यास पुत्र उत्सुक आहे

पित्याला प्रगट करण्यास पुत्र उत्सुक आहे

“पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”—लूक १०:२२.

तुमचे उत्तर काय असेल?

पित्याला प्रगट करण्यासाठी येशूच सर्वात सुयोग्य का होता?

येशूने कशा प्रकारे इतरांसमोर पित्याला प्रगट केले?

येशूप्रमाणेच तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी पित्याला प्रगट करू शकता?

१, २. कोणत्या प्रश्‍नाने अनेकांना बुचकळ्यात पाडले आहे आणि का?

 ‘देव कोण आहे?’ हा प्रश्‍न बऱ्‍याच लोकांना बुचकळ्यात पाडतो. उदाहरणार्थ, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे बहुतेक लोक देव हा तीन व्यक्‍ती मिळून एक आहे असे मानतात. पण, ही त्रैक्याची शिकवण समजणे अशक्य आहे हेदेखील यांपैकी बरेच जण मान्य करतील. एका पाळकाने आपल्या पुस्तकात असे कबूल केले: “हा सिद्धान्त मनुष्याच्या मर्यादित बुद्धीच्या आवाक्याबाहेरचा आहे. मानवी तर्काच्या साहाय्याने त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही.” दुसरीकडे पाहता, उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्तावर विश्‍वास ठेवणारे बहुतेक जण असे मानतात की देवच अस्तित्वात नाही. सृष्टीतील सर्व अद्‌भुत गोष्टी आपोआप अस्तित्वात आल्या असे ते म्हणतात. चार्ल्‌झ डार्व्हिन याने मात्र देवाचे अस्तित्व नाकारण्याऐवजी असे म्हटले: “मला तर असा निष्कर्ष काढणे सर्वात सोयीचे वाटते की हा सबंध विषय मानवाच्या समजशक्‍तीच्या पलीकडचा आहे.”

बहुतेक लोकांनी, मग ते काहीही मानत असले, तरी देवाच्या अस्तित्वासंबंधी प्रश्‍नांवर कधी ना कधी विचार केलाच असेल. पण समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे बरेच लोक कालांतराने देवाचा शोध घेण्याचे सोडून देतात. खरोखर, सैतानाने “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने . . . आंधळी केली आहेत.” (२ करिंथ. ४:४) यामुळे साहजिकच, जगातील बहुतेक लोक पित्याबद्दलच्या, म्हणजेच विश्‍वाच्या निर्माणकर्त्याबद्दलच्या सत्याबाबत अंधारात आहेत, गोंधळलेले आहेत.—यश. ४५:१८.

३. (क) निर्माणकर्त्याला आपल्यासमोर कोणी प्रगट केले आहे? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

तरीसुद्धा, लोकांनी देवाबद्दलचे सत्य जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. का? कारण जे यहोवाचे “नाव घेऊन” त्याचा धावा करतील केवळ त्यांचेच तारण होईल. (रोम. १०:१३) यहोवाच्या नावाचा धावा करण्यासाठी एक व्यक्‍ती म्हणून त्याची ओळख करून घेणे गरजेचे आहे. येशूने आपल्या शिष्यांपासून हे महत्त्वाचे ज्ञान लपवून ठेवले नाही. त्याने शिष्यांसमोर पित्याला प्रगट केले. (लूक १०:२२ वाचा.) येशू इतर कोणाहीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पित्याला प्रगट का करू शकत होता? येशूने हे कशा प्रकारे केले? आणि इतरांसमोर पित्याला प्रगट करण्याबाबत आपण कशा प्रकारे येशूचे अनुकरण करू शकतो? पाहू या.

येशू ख्रिस्त—सर्वात सुयोग्य

४, ५. पित्याला प्रगट करण्यास येशू सर्वात सुयोग्य का होता?

पित्याला प्रगट करण्यासाठी येशूच सर्वात सुयोग्य होता. का? कारण कालांतराने जो पृथ्वीवर येशू नावाचा मनुष्य बनला तो आत्मिक प्राणी, इतर कोणत्याही प्रकारच्या सजिवांना निर्माण करण्यात आले त्याअगोदर, देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून स्वर्गात अस्तित्वात होता. (योहा. १:१४; ३:१८) देवाच्या या पुत्राला खरोखर किती अनोखा विशेषाधिकार लाभला होता! इतर कोणतीही व्यक्‍ती अस्तित्वात नव्हती, तेव्हा त्याला पित्याचा प्रेमळ सहवास लाभला आणि पित्याविषयी व त्याच्या गुणांविषयी शिकून घेण्याची संधी मिळाली. अगणित युगांदरम्यान पित्याने व पुत्राने व्यापक प्रमाणात विचारांची देवाणघेवाण केली असेल आणि त्यांच्यात अतिशय जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले असेल. (योहा. ५:२०; १४:३१) कल्पना करा, पुत्राला आपल्या पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाची किती जवळून ओळख झाली असेल!—कलस्सैकर १:१५-१७ वाचा.

पित्याने पुत्राला आपला प्रवक्‍ता, “देवाचा शब्द” म्हणून नेमले. (प्रकटी. १९:१३) त्यामुळे, इतरांसमोर पित्याला प्रगट करण्यासाठी येशूच अगदी सुयोग्य होता. म्हणूनच, शुभवर्तमान लेखक योहान याने, येशू म्हणजेच “शब्द” हा “देवपित्याच्या उराशी” असल्याचे सांगितले. (योहा. १:१, १८) असे वर्णन करताना योहानाच्या मनात त्याच्या काळातील एक सर्वसामान्य रीत होती. त्या काळी सहसा एकाच दिवाणावर दोन व्यक्‍ती समोरासमोर बसून जेवत. एकमेकांच्या इतक्या जवळ असल्यामुळे हे दोघे सहज संभाषण करू शकत होते. त्याच प्रकारे, पित्याच्या “उराशी” असल्यामुळे पुत्राने पित्यासोबत मनापासून संवाद साधला.

६, ७. पिता व पुत्र यांच्यातील नाते कशा प्रकारे गाढ होत गेले?

पिता व पुत्र यांच्यातील नाते अधिकाधिक गाढ होत गेले. पुत्र देवाला “नित्य आनंददायी” होता. (नीतिसूत्रे ८:२२, २३, ३०, ३१ वाचा.) ते दोघे जसजसे एकमेकांसोबत कार्य करू लागले, आणि पुत्र जसजसा आपल्या पित्याच्या गुणांचे अनुकरण करण्यास शिकू लागला, तसतसे साहजिकच त्यांच्यातील नाते अधिकच घनिष्ट झाले. इतर बुद्धिमान प्राण्यांची सृष्टी करण्यात आल्यानंतर, त्या प्रत्येकासोबत यहोवा कशा प्रकारे व्यवहार करतो हे पाहून त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल पुत्राची कदर नक्कीच वाढली असेल.

काही काळाने, सैतानाने यहोवाच्या सार्वभौमत्वाला आव्हान केले. पण, यहोवा कशा प्रकारे कठीण परिस्थितीतही प्रीती, न्याय, बुद्धी व शक्‍तीचा वापर करतो हे त्या प्रसंगी पुत्राला शिकायला मिळाले. यामुळे, पुढे पृथ्वीवर त्याच्या सेवाकार्यादरम्यान आलेल्या आव्हानांना तोंड देण्यास नक्कीच त्याला मदत मिळाली असेल.—योहा. ५:१९.

८. शुभवर्तमानांतील अहवाल कशा प्रकारे आपल्याला पित्याच्या गुणांबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करतात?

यहोवासोबत अतिशय घनिष्ट नातेसंबंध असल्यामुळेच पुत्र पित्याचे व्यक्‍तिमत्त्व इतर कोणाच्याही तुलनेत अधिक स्पष्टपणे प्रगट करू शकला. तर मग, पित्याची ओळख करून घेण्यासाठी त्याच्या एकुलत्या एका पुत्राने जे शिकवले व ज्या प्रकारे तो वागला त्याचे परीक्षण करण्यापेक्षा अधिक चांगला मार्ग आणखी कोणता असू शकतो? उदाहरणार्थ, “प्रेम” या शब्दाची नुसतीच परिभाषा वाचून त्याचा अर्थ पूर्णपणे समजणे आपल्याला किती कठीण जाईल याचा विचार करा. पण, शुभवर्तमानांच्या लेखकांनी येशूच्या सेवाकार्याबद्दल, तसेच इतरांसोबतच्या त्याच्या प्रेमळ व्यवहाराबद्दल लिहिलेल्या बोलक्या अहवालांवर मनन केल्यास, “देव प्रीती आहे” या विधानाचा अर्थ आपल्याला अधिक स्पष्टपणे समजू शकतो. (१ योहा. ४:८, १६) येशूने पृथ्वीवर असताना देवाचे जे इतर गुण आपल्या शिष्यांसमोर प्रगट केले, त्यांबद्दलही हेच म्हणता येईल.

येशूने कशा प्रकारे पित्याला प्रगट केले?

९. (क) येशूने कोणत्या दोन प्रमुख मार्गांनी पित्याला प्रगट केले? (ख) येशूने त्याच्या शिकवणींतून कशा प्रकारे पित्याला प्रगट केले याचे एक उदाहरण द्या.

येशूने आपल्या शिष्यांसमोर आणि पर्यायाने त्याच्या भविष्यातील अनुयायांसमोरही पित्याला कशा प्रकारे प्रगट केले? त्याने हे दोन प्रमुख मार्गांनी केले: त्याच्या शिकवणींद्वारे आणि त्याच्या व्यवहाराद्वारे. सर्वप्रथम येशूच्या शिकवणींविषयी चर्चा करू या. येशूने आपल्या अनुयायांना जे काही शिकवले त्यावरून त्याला पित्याचे विचार, भावना व कार्य करण्याच्या पद्धती यांविषयी किती सखोल ज्ञान होते हे दिसून आले. उदाहरणार्थ, येशूने आपल्या पित्याची तुलना एका अशा प्रेमळ मनुष्याशी केली, जो आपल्या कळपातील एक हरवलेले मेंढरू शोधण्यासाठी जातो. येशूने म्हटले की ते हरवलेले मेंढरू सापडल्यावर “न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील.” या दृष्टान्तावरून तो काय शिकवू इच्छित होता? याचा खुलासा करत येशूने म्हटले, “तसे या लहानांतील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.” (मत्त. १८:१२-१४) या दृष्टान्तावरून तुम्ही यहोवाबद्दल काय शिकू शकता? आपली कोणालाही किंमत नाही, किंवा सर्व जण आपल्याला विसरले आहेत, असे कधीकधी तुम्हाला वाटते का? तुम्हाला असे वाटत असले, तरीही तुमच्या स्वर्गातील पित्याला तुमच्याबद्दल आस्था आहे आणि त्याचे तुमच्यावर प्रेम आहे हे आठवणीत असू द्या. त्याच्या दृष्टीत तुम्ही “या लहानांतील” एक आहात.

१०. येशूने त्याच्या व्यवहारातून कशा प्रकारे पित्याला प्रगट केले?

१० येशूने त्याच्या शिकवणींसोबतच त्याच्या व्यवहाराद्वारेही पित्याला शिष्यांसमोर प्रगट केले. म्हणूनच प्रेषित फिलिप्पाने येशूला, “आम्हाला पिता दाखवा” अशी विनंती केली, तेव्हा येशू त्याला असे म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहा. १४:८, ९) येशूने त्याच्या पित्याचे गुण कशा प्रकारे प्रदर्शित केले त्याची काही उदाहरणे पाहा. एका कुष्ठरोग्याने त्याला बरे करण्याची येशूला याचना केली, तेव्हा “कुष्ठरोगाने भरलेल्या” त्या माणसाला येशूने स्पर्श केला आणि त्याला म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” बरे झाल्यावर त्या कुष्ठरोग्याला, येशूने जे केले त्यातून नक्कीच यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाची झलक दिसली असेल. (लूक ५:१२, १३) तसेच, लाजाराचा मृत्यू झाला त्या प्रसंगी, येशू “आत्म्यात खवळला व विव्हळ झाला” आणि तो “रडला.” हे पाहिल्यावर शिष्यांना नक्कीच पित्याचा कनवाळूपणा जाणवला असेल. आपण लाजाराचे पुनरुत्थान करणार हे येशूला माहीत असूनही त्याच्या कुटुंबीयांचे आणि स्नेह्‍यांचे दुःख पाहून येशूचेही हृदय हेलावले. (योहा. ११:३२-३५, ४०-४३) बायबलमध्ये तुमचेही काही आवडीचे अहवाल नक्कीच असतील, ज्यांत येशूच्या व्यवहारातून त्याच्या दयाळू पित्याची छबी झळकते.

११. (क) येशूने मंदिर शुद्ध केले तेव्हा त्याने आपल्या पित्याबद्दल कोणती गोष्ट प्रगट केली? (ख) मंदिर शुद्ध करण्याविषयीचा अहवाल आपल्यासाठी दिलासादायक का आहे?

११ पण, येशूने मंदिर शुद्ध केले त्या अहवालातून तुम्ही कोणता निष्कर्ष काढू शकता? ते दृश्‍य डोळ्यांपुढे उभे करा: येशूने दोऱ्‍यांचा एक चाबूक बनवला आणि मेंढरे व गुरे विकणाऱ्‍यांना मंदिरातून हाकलून लावले. त्याने सराफांची नाणी जमिनीवर विखरून टाकली आणि त्यांचे मेज पालथे केले. (योहा. २:१३-१७) येशूच्या या जोरदार कृतीवरून शिष्यांना दावीद राजाच्या या भविष्यसूचक शब्दांची आठवण झाली: “तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकिले आहे.” (स्तो. ६९:९) अशी कडक कारवाई करण्याद्वारे, येशूने दाखवून दिले की त्याला खऱ्‍या उपासनेचे रक्षण करण्याची उत्कट इच्छा होती. या अहवालात तुम्हाला पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाची झलक दिसते का? हा अहवाल आपल्याला याची आठवण करून देतो, की पृथ्वीवरील दुष्टाई काढून टाकण्यासाठी देवाजवळ अमर्याद सामर्थ्य तर आहेच, पण त्यासोबतच असे करण्याची त्याला उत्कट इच्छादेखील आहे. गैरकृत्यांप्रती येशूच्या तीव्र प्रतिक्रियेवरून, आज पृथ्वीवर सर्वत्र दिसून येणारी दुष्टाई पाहून पित्याला कसे वाटत असेल हे आपल्याला कळून येते. आपल्या जीवनात जेव्हा आपल्याला अन्यायाला तोंड द्यावे लागते तेव्हा ही जाणीव आपल्याला केवढा दिलासा देते!

१२, १३. येशूने आपल्या शिष्यांशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून तुम्ही यहोवाबद्दल काय शिकू शकता?

१२ आणखी एक उदाहरण पाहू या—येशूने त्याच्या शिष्यांसोबत केलेला व्यवहार. आपल्यापैकी सर्वात मोठा कोण याबद्दल शिष्यांमध्ये सतत वाद चालायचे. (मार्क ९:३३-३५; १०:४३; लूक ९:४६) पित्याच्या दीर्घ सहवासातून मिळालेल्या अनुभवामुळे, अशा अहंकारी प्रवृत्तींबद्दल यहोवाला कसे वाटते हे येशूला चांगले माहीत होते. (२ शमु. २२:२८; स्तो. १३८:६) शिवाय, दियाबल सैतानाने अशा प्रकारची वृत्ती दाखवल्याचे येशूने पाहिले होते. अहंकारी सैतानाला सर्वांहून वरचढ व श्रेष्ठ असण्याची इच्छा होती. त्यामुळे, तीच मोठेपणाची हाव शिष्यांमध्ये—ज्यांना येशूने स्वतः प्रशिक्षण दिले होते—त्यांच्यामध्येही होती हे पाहून येशूला किती दुःख झाले असेल! कल्पना करा, ज्यांना त्याने प्रेषित म्हणून निवडले होते त्यांच्यातही ही वृत्ती आढळली! येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शिष्यांनी अशी महत्त्वाकांक्षी वृत्ती दाखवली. (लूक २२:२४-२७) असे असूनही, येशू प्रेमळपणे त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत राहिला. आज ना उद्या, ते त्याच्यासारखीच नम्र मनोवृत्ती दाखवायला शिकतील ही आशा त्याने कधीही सोडली नाही.—फिलिप्पै. २:५-८.

१३ येशूने ज्या प्रकारे सहनशीलतेने आपल्या शिष्यांच्या चुकीच्या प्रवृत्ती सुधारल्या त्यातून तुम्हाला पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाची झलक दिसते का? येशूच्या कृतींतून व शब्दांतून तुम्हाला पित्याची छबी दिसते का, जो आपल्या लोकांनी वारंवार चुका केल्या तरीही त्यांना टाकून देत नाही? यहोवाच्या गुणांबद्दलची ही जाणीव, आपल्याला प्रार्थनेत त्याच्याजवळ जाऊन आपल्या चुकांबद्दल मनःपूर्वक पश्‍चात्ताप व्यक्‍त करण्यास प्रवृत्त करत नाही का?

पित्याला प्रगट करण्यास पुत्र उत्सुक होता

१४. पित्याला प्रगट करण्यास उत्सुक असल्याचे येशूने कशा प्रकारे दाखवले?

१४ कित्येक हुकूमशहा, लोकांना आपल्या कह्‍यात ठेवण्यासाठी त्यांना महत्त्वाच्या माहितीपासून वंचित करतात. याउलट, येशूला पित्याबद्दल असलेली माहिती इतरांना सांगण्यास तो उत्सुक होता. त्याने पित्याला इतरांसमोर पूर्णपणे प्रगट केले. (मत्तय ११:२७ वाचा.) शिवाय, येशूने आपल्या शिष्यांना यहोवा देव, “जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धि” दिली. (१ योहा. ५:२०) याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, पित्याविषयीच्या शिकवणी समजून घेता याव्यात म्हणून येशूने आपल्या अनुयायांची मने उघडली. देव हा मनुष्याच्या समजशक्‍तीच्या पलीकडे असलेल्या त्रैक्याचा एक भाग आहे असे येशूने शिकवले नाही. त्याने आपला पिता गूढ, रहस्यमय आहे असे भासवले नाही.

१५. येशूने पित्याबद्दल काही माहिती देण्यापासून स्वतःला का आवरले?

१५ येशूला पित्याबद्दल जे काही माहीत होते ते सर्वच त्याने प्रगट केले का? नाही, त्याला माहीत असलेल्या कितीतरी गोष्टी सांगण्यापासून त्याने सुज्ञपणे स्वतःला आवरले. (योहान १६:१२ वाचा.) का? कारण त्या वेळी शिष्यांना ती माहिती “सोसवणार” नव्हती. पण येशूने स्पष्ट केले की कालांतराने “कैवारी” म्हणजेच पवित्र आत्मा येईल आणि त्यांना “सर्व सत्यात” मार्गदर्शित करेल. त्या वेळी शिष्यांना मोठ्या प्रमाणात ज्ञान लाभेल असे येशूने सांगितले. (योहा. १६:७, १३) सुज्ञ आईवडील आपली मुले समजू लागण्याइतकी मोठी होईस्तोवर काही गोष्टी त्यांना सांगत नाहीत. त्याच प्रकारे, येशूही त्याचे शिष्य परिपक्व होईपर्यंत आणि पित्याबद्दल विशिष्ट गोष्टींचे आकलन होण्याइतके समंजस होईपर्यंत थांबून राहिला. तो प्रेमळपणे त्याच्या शिष्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्याशी वागला.

येशूसारखेच इतरांना यहोवाबद्दल जाणून घेण्यास मदत करा

१६, १७. तुम्ही पित्याला इतरांसमोर प्रगट करण्याच्या स्थितीत का आहात?

१६ तुम्ही एखाद्या व्यक्‍तीला चांगल्या प्रकारे ओळखू लागता आणि तिचे प्रेमळ व्यक्‍तिमत्त्व तुम्हाला आवडू लागते तेव्हा तिच्याबद्दल इतरांनाही सांगण्याची तुम्हाला आपोआपच प्रेरणा मिळत नाही का? पृथ्वीवर असताना येशू आपल्या पित्याबद्दल बोलला. (योहा. १७:२५, २६) त्याचे अनुकरण करून, आपल्यालाही इतरांना यहोवाबद्दल जाणून घेण्यास मदत करता येईल का?

१७ आपण आधी पाहिल्याप्रमाणे, पित्याबद्दल येशूला इतरांपेक्षा कितीतरी पटीने जास्त ज्ञान होते. तरीसुद्धा, तो हे ज्ञान इतरांना देण्यास उत्सुक होता. त्याने तर देवाच्या व्यक्‍तिमत्त्वातील बारकावे समजून घेण्यासाठी आपल्या अनुयायांना बुद्धीदेखील दिली. येशूच्या साहाय्यामुळेच आपल्याला जगातील बहुतेक लोकांच्या तुलनेत पित्याला अधिक जवळून ओळखणे शक्य झाले आहे, हे खरे नाही का? येशूने मोठ्या उत्सुकतेने त्याच्या शिकवणींद्वारे आणि व्यवहाराद्वारे पित्याला आपल्यासमोर प्रगट केले याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! खरेतर आपण पित्याला ओळखतो याबद्दल आपण अभिमान बाळगू शकतो. (यिर्म. ९:२४; १ करिंथ. १:३१) आपण यहोवाच्या जवळ जाण्याचा जसजसा प्रयत्न केला, तसतसा तोही आपल्या जवळ आला आहे. (याको. ४:८) त्यामुळे, आपल्याजवळ असलेले ज्ञान आता आपण इतरांना देण्याच्या स्थितीत आहोत. हे आपल्याला कशा प्रकारे करता येईल?

१८, १९. तुम्ही कशा प्रकारे इतरांसमोर पित्याला प्रगट करू शकता? स्पष्ट करा.

१८ आपल्या शब्दांतून व कृतींतून पित्याला प्रगट करण्याद्वारे आपण येशूचे अनुकरण केले पाहिजे. क्षेत्र सेवेत आपल्याला भेटणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांना देव कोण आहे हे माहीत नसते याचे भान ठेवा. खोट्या शिकवणींमुळे कदाचित त्यांच्या मनात देवाबद्दल अनेक गैरसमज असतील. आपण अशा लोकांना देवाचे नाव, मानवजातीकरता त्याचा उद्देश, आणि त्याचे व्यक्‍तिमत्त्व यांबद्दल बायबलमध्ये सांगितलेली माहिती देऊ शकतो. शिवाय, बायबलच्या विशिष्ट अहवालांतून देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचा एखादा पैलू आपल्याला पहिल्यांदाच स्पष्ट झाला असल्यास, आपण अशा अहवालांबद्दल आपल्या बंधुभगिनींशी चर्चा करू शकतो. असे केल्यास, त्यांनाही या माहितीचा फायदा होईल.

१९ तसेच, येशूचे अनुकरण करून आपण आपल्या व्यवहारातून कशा प्रकारे पित्याला प्रगट करू शकतो? आपल्या कृतींतून लोकांना ख्रिस्ताची प्रीती दिसून आल्यास ते पित्याकडे आणि येशूकडेही आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाहीत. (इफिस. ५:१, २) प्रेषित पौलाने, “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा” असे प्रोत्साहन आपल्याला दिले. (१ करिंथ. ११:१) आपल्या व्यवहारातून, यहोवा कसा आहे हे पाहण्यास लोकांना मदत करण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला लाभला आहे! तर मग, पित्याला इतरांसमोर प्रगट करण्याद्वारे आपण सर्व जण येशूचे अनुकरण करत राहू या!

[अभ्यासाचे प्रश्‍न]