व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करत राहा

पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करत राहा

पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करत राहा

“माझ्या मुला तू आपल्या बापाच्या देवाला जाण, आणि पूर्ण हृदयाने . . . त्याची सेवा कर.” —१ इति. २८:९, पं.र.भा.

या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा

लाक्षणिक हृदय काय आहे?

आपल्या हृदयाचे परीक्षण करण्यासाठी आपण कोणत्या व्यावहारिक मार्गाचा उपयोग करू शकतो?

आपण यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने कशी करू शकतो?

१, २. (क) देवाच्या वचनात मानवी शरीराच्या कोणत्या भागाचा उल्लेख सर्वात जास्त वेळा लाक्षणिक अर्थाने करण्यात आला आहे? (ख) आपण लाक्षणिक हृदयाचा अर्थ समजून घेणे इतके महत्त्वाचे का आहे?

 देवाच्या वचनात पुष्कळदा मानवी शरीराच्या अवयवांना लाक्षणिक अर्थाने संबोधले आहे. उदाहरणार्थ, कुलपिता ईयोबाने असे म्हटले: “माझ्या हातून काही अन्याय झाला नाही.” शलमोन राजाच्या असे निदर्शनास आले की: “चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते.” यहोवाने यहेज्केलाला असे आश्‍वासन दिले: “मी तुझे डोके . . . वज्रप्राय कठीण करतो.” आणि प्रेषित पौलाला काही लोकांनी म्हटले: “तुम्ही आम्हाला अशा गोष्टी ऐकवत आहात ज्या आमच्या कानांस अपरिचित आहेत.”—ईयो. १६:१७; नीति. १५:३०; यहे. ३:९; प्रे. कृत्ये १७:२०, NW.

पण, मानवी शरीराच्या इतर अवयवांच्या तुलनेत एका विशिष्ट अवयवाचा बायबलमध्ये लाक्षणिक अर्थाने कितीतरी जास्त वेळा वापर करण्यात आला आहे. विश्‍वासू हन्‍नाने तिच्या प्रार्थनेत या अवयवाचा उल्लेख केला: “परमेश्‍वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे.” (१ शमु. २:१) खरेतर, बायबल लेखकांनी हृदयाचा उल्लेख जवळजवळ हजार वेळा केला आणि बहुतेक वेळा लाक्षणिक अर्थानेच. हृदय कशास सूचित करते हे समजणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण बायबल म्हणते की आपण आपल्या हृदयाचे रक्षण केले पाहिजे.नीतिसूत्रे ४:२३ वाचा.

लाक्षणिक हृदय काय आहे?

३. “हृदय” या शब्दाचा काय अर्थ होतो हे आपण बायबलमधून कशा प्रकारे समजून घेऊ शकतो? उदाहरण द्या.

देवाचे वचन “हृदय” या शब्दाची एखाद्या शब्दकोशाप्रमाणे व्याख्या देत नसले, तरी या शब्दाचा अर्थ काय होतो हे आपण बायबलच्या आधारे समजून घेऊ शकतो. ते कसे? उदाहरणार्थ, एका भिंतीवर जवळजवळ एक हजार लहानलहान रंगीत दगडांपासून अतिशय सुंदर नक्षीकाम केले आहे अशी कल्पना करा. हे नक्षीकाम जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा काळजीपूर्वक रचलेल्या सर्व दगडांचे मिळून एक सुंदर चित्र तयार झालेले तुम्हाला दिसते. त्याचप्रमाणे, बायबलमध्ये आलेल्या हृदयाच्या अनेक संदर्भांचे परीक्षण केल्यास या सर्वांचे मिळून एक चित्र तयार होते हे आपण समजू शकू. कोणते चित्र?

४. (क) “हृदय” हा शब्द कशास सूचित करतो? (ख) मत्तय २२:३७ मधील येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो?

बायबल लिहिणाऱ्‍यांनी मनुष्याच्या संपूर्ण आंतरिक व्यक्‍तिमत्त्वाचे वर्णन करण्यासाठी “हृदय” या शब्दाचा वापर केला. यात आपल्या इच्छा, विचार, मनोवृत्ती, क्षमता, प्रेरणा आणि ध्येये या पैलूंचा समावेश होतो. (अनुवाद १५:७; नीतिसूत्रे १६:९; प्रेषितांची कृत्ये २:२६ वाचा.) एका संदर्भ ग्रंथात असे सांगण्यात आले आहे की हृदय म्हणजे “संपूर्ण आंतरिक मनुष्य.” पण काही ठिकाणी हृदयाचा अर्थ मर्यादित असतो. उदाहरणार्थ येशूने म्हटले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.” (मत्त. २२:३७) या वचनात अंतःकरण किंवा हृदय म्हणजे आंतरिक व्यक्‍तीच्या भावना व इच्छा. येथे येशूने अंतःकरण, जीव व मन यांचा वेगवेगळा उल्लेख केला. असे करण्याद्वारे त्याने या गोष्टीवर जोर दिला की आपण आपल्या भावनांतून, आपल्या जीवनातून व ज्या प्रकारे आपण आपल्या बुद्धीचा वापर करतो त्यावरूनही देवावरील आपले प्रेम व्यक्‍त केले पाहिजे. (योहा. १७:३; इफिस. ६:६) पण जेव्हा फक्‍त हृदयाचा उल्लेख केला जातो तेव्हा ते संपूर्ण आंतरिक व्यक्‍तीला सूचित करते.

हृदयाचे रक्षण का केले पाहिजे?

५. यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्याची आपली इच्छा का आहे?

हृदयाविषयी बोलताना दावीद राजाने शलमोनाला आठवण करून दिली: “माझ्या मुला तू आपल्या बापाच्या देवाला जाण, आणि पूर्ण हृदयाने व उत्सुक मनाने त्याची सेवा कर; कारण यहोवा सर्व अंतःकरणे शोधून पाहतो व विचारांच्या सर्व कल्पना समजतो.” (१ इति. २८:९ पं.र.भा.) यहोवा सर्व अंतःकरणे पारखतो व त्यात आपलेही अंतःकरण समाविष्ट आहे. (नीति. १७:३; २१:२) त्याला आपल्या हृदयात जे पाहायला मिळते त्याचा जबरदस्त प्रभाव त्याच्यासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर व आपल्या भविष्यावर पडतो. म्हणूनच, आपण दाविदाचा देवप्रेरित सल्ला अनुसरून यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करू इच्छितो.

६. यहोवाची सेवा करण्याच्या आपल्या निर्धाराबद्दल आपल्याला कशाची जाणीव असली पाहिजे?

यहोवाचे लोक या नात्याने आपण आवेशाने करत असलेले कार्य हे दाखवते की देवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्याची खरोखरच आपली तीव्र इच्छा आहे. असे असले, तरी सैतानाच्या दुष्ट जगाचा दबाव व आपल्या पापी शरीराची पापपूर्ण प्रवृत्ती यांचा जबरदस्त प्रभाव आपल्यावर पडू शकतो ज्यामुळे यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्याचा आपला निर्धार ढासळू शकतो. (यिर्म. १७:९; इफिस. २:२) म्हणूनच देवाची सेवा करण्याचा आपला निर्धार कमजोर तर होत नाही ना, किंवा आपले लक्ष विचलित तर होत नाही ना, हे तपासून पाहण्यासाठी आपण नियमितपणे आपल्या हृदयाचे बारकाईने परीक्षण करण्याची गरज आहे. आपण हे कसे करू शकतो?

७. आपल्या हृदयाची स्थिती कशी आहे हे कसे प्रदर्शित होते?

एका झाडाचा आतला भाग किंवा गाभा सहसा दिसत नाही. तरीसुद्धा, झाडाच्या फळांवरून झाडाची स्थिती कशी आहे हे दिसून येते असे डोंगरावरील प्रवचनात येशूने सांगितले. त्याचप्रमाणे आपले आंतरिक व्यक्‍तिमत्त्व कोणी पाहू शकत नाही. पण, आपली कार्ये आपल्या हृदयाची खरी स्थिती प्रदर्शित करतात. (मत्त. ७:१७-२०) आता आपण अशा एका कार्याचा विचार करू.

अंतःकरणाचे परीक्षण करण्याचा एक व्यावहारिक मार्ग

८. मत्तय ६:३३ मधील येशूच्या शब्दांचा आपल्या हृदयात जे आहे त्याच्याशी काय संबंध आहे?

त्याच प्रवचनात आधी येशूने आपल्या ऐकणाऱ्‍यांना सांगितले की त्यांच्या कोणत्या विशिष्ट कामावरून, त्यांना पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा करण्याची इच्छा असल्याचे दिसून येईल. त्याने म्हटले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्त. ६:३३) आपण आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो त्यावरून आपल्या मनातील इच्छा, विचार व योजना आपण व्यक्‍त करत असतो. तर मग, आपण पूर्ण अंतःकरणाने देवाची सेवा करत आहोत की नाही हे तपासून पाहण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे आपल्या जीवनातील प्राधान्यक्रमाचे परीक्षण करणे.

९. येशूने काही माणसांना कोणते आमंत्रण दिले, आणि त्यांच्या प्रतिक्रियेवरून काय दिसून आले?

“पहिल्याने त्याचे राज्य . . . मिळविण्यास झटा” असे येशूने त्याच्या शिष्यांना आर्जवून सांगितले त्याच्या काही काळानंतरच एक घटना घडली. एक व्यक्‍ती आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला प्राधान्य देते यावरून तिच्या हृदयाची स्थिती दिसून येते हे या घटनेवरून स्पष्ट झाले. शुभवर्तमानाचा लेखक लूक याने या घटनेबद्दल सांगताना असे म्हटले की येशूने “यरुशलेमेस जाण्याच्या दृढनिश्‍चयाने तिकडे आपले तोंड वळविले.” खरेतर, तिथे गेल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे हे येशूला चांगल्या प्रकारे माहीत होते. “वाटेने चालत असता” येशू व त्याच्या शिष्यांना काही माणसे भेटली व येशूने त्यांना माझ्यामागे या असे आमंत्रण दिले. ती माणसे येशूचे आमंत्रण स्वीकारण्यास इच्छुक होती, पण काही अटींवरच. एकाने उत्तर दिले: “पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या.” आणखी एकाने म्हटले: “प्रभुजी, मी आपल्यामागे येईन; परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या.” (लूक ९:५१, ५७-६१) येशूचा दृढ व मनःपूर्वक निर्धार आणि त्या माणसांनी सांगितलेली लंगडी निमित्ते यांत किती मोठा फरक होता! देवाच्या राज्याऐवजी त्यांनी आपल्या स्वतःच्या चिंतांना जास्त महत्त्व देऊन ते पूर्ण अंतःकरणाने देवाची सेवा करण्यास तयार नव्हते हे दाखवून दिले.

१०. (क) येशूच्या अनुयायांनी त्याच्या आमंत्रणाला कसा प्रतिसाद दिला आहे? (ख) येशूने कोणता लहानसा दाखला दिला?

१० येशूचे शिष्य होऊ पाहणाऱ्‍या या माणसांपेक्षा आपण खूप वेगळे आहोत. त्याचे अनुयायी बनण्याचे आमंत्रण आपण सुज्ञपणे स्वीकारले आहे आणि रोज यहोवाची सेवा करत आहोत. अशा प्रकारे यहोवाबद्दल आपल्याला कसे वाटते हे आपण प्रदर्शित करतो. पण, आपण मंडळीत सक्रिय असलो तरी आपल्या हृदयाच्या स्थितीला असलेल्या एका संभाव्य धोक्याचे आपण नेहमी भान ठेवले पाहिजे. तो धोका कोणता? येशूचे शिष्य होऊ पाहणाऱ्‍यांसोबतच्या त्याच संभाषणात येशूने या धोक्याविषयी सांगितले: “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही.” (लूक ९:६२) त्याने दिलेल्या या दाखल्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

आपण “बऱ्‍याला चिकटून” राहतो का?

११. येशूच्या दाखल्यातील मजुराच्या कामाचे काय झाले, आणि का?

११ येशूने दिलेल्या या लहानशा दाखल्यातून मिळणारा धडा स्पष्टपणे समजण्यासाठी या शब्दचित्रात आपण काही रंग भरू या. शेतात काम करणारा एक मजूर नांगर चालवण्यात व्यस्त आहे. पण नांगर चालवता चालवता तो आपल्या घराबद्दल, जिथे त्याचे कुटुंब, मित्र, जेवण, संगीत, हसणे व सावली आहे याचा सतत विचार करत राहतो. त्याला हे सगळे हवेहवेसे वाटते. जमिनीच्या बऱ्‍यापैकी भागात नांगर चालवल्यानंतर, त्याला जीवनात सुखावह वाटणाऱ्‍या गोष्टी इतक्या हव्याहव्याशा वाटतात की तो भारावून जातो व “मागे पाहतो.” शेतात पेरणी होईपर्यंत बरेच काम अद्यापही बाकी आहे, पण मजुराचे लक्ष विचलित झाल्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होतो. साहजिकच, या मजुरात चिकाटी नाही हे पाहून त्याचा मालक नाराज होतो.

१२. येशूच्या दाखल्यातील मजूर आणि आजच्या ख्रिश्‍चनांमध्ये कोणते साम्य आहे?

१२ आता याची तुलना आधुनिक दिवसांशी करा. या दाखल्यातील मजूर कोणाही ख्रिस्ती व्यक्‍तीला सूचित करू शकतो जिचे कदाचित सर्व ठीकठाक चालले आहे असे भासेल, पण खरे पाहता ती आध्यात्मिक रीत्या धोक्यात आहे. उदाहरणार्थ, असा विचार करा की एक बांधव सेवाकार्यात स्वतःला व्यस्त ठेवतो. परंतु तो जेव्हा सभांना जातो आणि क्षेत्र सेवेत सहभाग घेतो तेव्हा जगातील जीवनशैलीच्या आकर्षक पैलूंचा सतत विचार करत राहतो. मनातल्या मनात त्याला त्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. कालांतराने, बरीच वर्षे आपले सेवाकार्य पार पाडल्यानंतर जगातील काही गोष्टींची त्याला इतकी ओढ लागते की तो भारावून जातो व “मागे पाहतो.” सेवाकार्यात आणखी बरेच काम बाकी राहिले असले, तरी जीवनाच्या वचनावर घट्ट पकड न ठेवल्यामुळे देवाच्या सेवेतील त्याच्या कार्यांवर परिणाम होतो. (फिलिप्पै. २:१६) अशा प्रकारे, धीराची कमतरता दाखवल्यामुळे पिकाच्या धन्याला, यहोवाला दुःख होते.—लूक १०:२.

१३. पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा करण्यात काय गोवलेले आहे?

१३ धडा स्पष्टच आहे. आपण जर नियमित रीत्या हितकारक व समाधान देणारी कार्ये करत असू, अर्थात सभांना उपस्थित राहत असू व सेवा कार्यात सहभागी होत असू, तर ही फार प्रशंसनीय गोष्ट आहे. पण, पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा करण्यात आणखी काहीतरी गोवलेले आहे. (२ इति. २५:१, २, २७) एक ख्रिस्ती व्यक्‍ती मनातल्या मनात जगातील काही गोष्टींवर प्रेम करत राहते, तेव्हा देवासोबतचा तिचा चांगला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. (लूक १७:३२) जर आपण खरोखर वाइटाचा वीट मानला व बऱ्‍याला चिकटून राहिलो तरच आपण देवाच्या राज्यास उपयोगी ठरू. (रोम. १२:९; लूक ९:६२) म्हणूनच, सैतानाच्या जगातील कोणतीही गोष्ट, मग ती कितीही उपयोगी किंवा हवीहवीशी वाटत असली, तरी राज्याशी संबंधित कार्ये पूर्ण मनाने करण्यास ती आपल्याला रोखणार नाही याची आपण प्रत्येकाने खातरी केली पाहिजे.—२ करिंथ. ११:१४; फिलिप्पैकर ३:१३, १४ वाचा.

सतर्क राहा!

१४, १५. (क) आपल्या हृदयाच्या स्थितीवर प्रभाव पाडण्यासाठी सैतान कशा प्रकारे प्रयत्न करत आहे? (ख) सैतानाची कार्य करण्याची पद्धत इतकी धोकादायक का आहे हे उदाहरण देऊन सांगा.

१४ यहोवावरील आपल्या प्रेमामुळे आपण समर्पण करण्यास प्रवृत्त झालो होतो. तेव्हापासून अनेक वर्षे यहोवाला विश्‍वासू राहण्याद्वारे, आपल्यापैकी बऱ्‍याच जणांनी दाखवून दिले आहे की त्याची सेवा पूर्ण मनाने करण्याचा आपला पक्का निर्धार आहे. पण, सैतानाने आपल्या बाबतीत हार मानलेली नाही. अजूनही आपले हृदय त्याचे लक्ष्य आहे. (इफिस. ६:१२) साहजिकच, त्याला याची जाणीव आहे की आपण यहोवाला एकदम सोडणार नाही. म्हणून तो धूर्तपणे या जगातील गोष्टींचा उपयोग करून देवाप्रती असलेला आपला आवेश हळूहळू कमजोर करण्याचा प्रयत्न करतो. (मार्क ४:१८, १९ वाचा.) सैतानाची ही पद्धत इतकी परिणामकारक का आहे?

१५ उत्तरासाठी आपण या उदाहरणाचा विचार करू या. तुम्ही १०० वॉटच्या बल्बच्या प्रकाशात पुस्तक वाचत आहात, पण तो बल्ब अचानक उडाल्यामुळे सगळीकडे अंधार होतो. अंधार कशामुळे झाला आहे हे तुम्हाला माहीत असल्यामुळे तुम्ही तो बल्ब काढून नवीन लावता. पुन्हा त्या खोलीत प्रकाश येतो. दुसऱ्‍या दिवशी संध्याकाळी, तुम्ही त्याच बल्बच्या प्रकाशात पुस्तक वाचता. परंतु, तुमच्या नकळत कोणीतरी १०० वॉटचा बल्ब काढून त्याजागी ९५ वॉटचा बल्ब लावला आहे. तुम्हाला काही फरक जाणवेल का? कदाचित नाही. आणि मग तिसऱ्‍या दिवशी कोणी ९० वॉटचा बल्ब लावला तर काय? तरीही तुमच्या ध्यानात येणार नाही. का नाही? त्या बल्बचा प्रकाश इतक्या हळूहळू मंद होत चालला आहे की तुम्हाला ते कळतच नाही. त्याच प्रकारे, सैतानाच्या दुष्ट जगाचा प्रभाव आपला आवेश हळूहळू मंद करू शकतो. असे झाले, तर सैतान जणू यहोवाची सेवा करण्याचा १०० वॉटचा आपला आवेश कमी करण्यात यशस्वी ठरला आहे असे म्हणता येईल. एक ख्रिस्ती व्यक्‍ती सतर्क राहिली नाही तर हळूहळू तिचा आवेश कमी होत आहे हे तिच्या ध्यानातही येणार नाही.—मत्त. २४:४२; १ पेत्र ५:८.

प्रार्थना करणे महत्त्वाचे

१६. सैतानाच्या युक्त्यांपासून आपण स्वतःचे रक्षण कसे करू शकतो?

१६ सैतानाच्या अशा युक्त्यांपासून आपण स्वतःचे रक्षण कसे करू शकतो व यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने कशी करत राहू शकतो? (२ करिंथ. २:११) यासाठी प्रार्थना करणे खूप गरजेचे आहे. पौलाने आपल्या सहविश्‍वासू बांधवांना सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरा असे प्रोत्साहन दिले. मग त्याने त्यांना असे आर्जवले: “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी . . . प्रार्थना करा.”—इफिस. ६:११, १८; १ पेत्र ४:७.

१७. येशूच्या प्रार्थनेवरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

१७ सैतानाविरुद्ध टिकाव धरण्यासाठी आपण येशूच्या प्रार्थनापूर्वक मनोवृत्तीचे अनुकरण करणे सुज्ञपणाचे ठरेल. त्याच्या मनोवृत्तीतून त्याला यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्याची तीव्र इच्छा होती हे प्रदर्शित झाले. उदाहरणार्थ, येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री ज्या प्रकारे प्रार्थना केली त्याबद्दल लूकने असे लिहिले: “मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली.” (लूक २२:४४) येशूने आधीसुद्धा आग्रहाने किंवा कळकळीने प्रार्थना केली होती, पण या प्रसंगी पृथ्वीवरील त्याच्या सगळ्यात कठीण परीक्षेचा सामना करण्यासाठी तो “अधिक आग्रहाने” प्रार्थना करतो व त्याला त्याच्या प्रार्थनेचे उत्तर मिळते. येशूच्या उदाहरणावरून दिसते की आपण नेहमी एकसारख्याच आग्रहाने प्रार्थना करत नाही. तर मग, आपली परीक्षा जितकी कठीण आणि सैतानाच्या युक्त्या जितक्या धूर्त असतील, तितक्याच “अधिक आग्रहाने” आपण यहोवाकडे संरक्षणासाठी प्रार्थना केली पाहिजे.

१८. (क) प्रार्थनेबद्दल आपण स्वतःला काय विचारले पाहिजे, आणि का? (ख) कोणत्या कारणांमुळे आपल्या हृदयावर परिणाम होऊ शकतो, आणि कोणत्या मार्गांनी? ( पृष्ठ १६ वरील चौकट पाहा.)

१८ या प्रार्थनांचा आपल्यावर काही प्रभाव पडेल का? पौलाने लिहिले: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे . . . राखेल.” (फिलिप्पै. ४:६, ७) होय, यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करत राहण्यासाठी त्याला कळकळीने व सातत्याने प्रार्थना करणे खूप गरजेचे आहे. (लूक ६:१२) म्हणून स्वतःला विचारा, ‘मी किती कळकळीने व सातत्याने प्रार्थना करतो?’ (मत्त. ७:७; रोम. १२:१२) तुम्हाला देवाची सेवा किती मनापासून करायची आहे हे तुमच्या उत्तरावरून दिसून येईल.

१९. यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करत राहण्यासाठी तुम्ही काय कराल?

१९ आज आपण चर्चा केल्याप्रमाणे, जीवनात आपण ज्या गोष्टींना प्राधान्य देतो त्यांवरून आपल्या हृदयाची स्थिती दिसून येते. जगातील आकर्षक गोष्टींमुळे किंवा सैतानाच्या धूर्त युक्त्यांमुळे, पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करण्याचा आपला दृढनिश्‍चय कमकुवत होणार नाही याची आपण खातरी केली पाहिजे. (लूक २१:१९, ३४-३६ वाचा.) तर मग, दाविदाप्रमाणे आपण यहोवाला विनवणी करत राहू या: “माझे चित्त एकाग्र कर.”—स्तो. ८६:११.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चौकट]

आपल्या हृदयावर परिणाम करणाऱ्‍या तीन गोष्टी

आपले खरोखरचे हृदय चांगल्या स्थितीत राहावे म्हणून त्याची काळजी घेण्याकरता आपण काही पावले उचलतो. त्याच प्रकारे लाक्षणिक हृदय निरोगी ठेवण्यासाठीही आपण काही पावले उचलू शकतो. पुढील तीन महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्या:

१ पोषण: आपल्या खरोखरच्या हृदयाला पुरेसे हितकारक पोषण मिळणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, नियमितपणे वैयक्‍तिक अभ्यास करण्याद्वारे, मनन करण्याद्वारे व सभांना उपस्थित राहण्याद्वारे पुरेसे हितकारक आध्यात्मिक अन्‍न घेण्याची आपण खातरी केली पाहिजे.—स्तो. १:१, २; नीति. १५:२८; इब्री १०:२४, २५.

 २ व्यायाम: निरोगी राहण्यासाठी काही वेळा आपल्या हृदयाचे ठोके वाढतील अशा प्रकारचे व्यायाम करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे, आवेशाने सेवाकार्यात सहभाग घेतल्याने, म्हणजे अधिक प्रमाणात कार्य करण्यासाठी परिश्रम घेतल्याने आपल्या लाक्षणिक हृदयाला चांगल्या स्थितीत ठेवण्यास मदत मिळते.—लूक १३:२४; फिलि. ३:१२.

३ वातावरण: अभक्‍त वातावरणात काम करत असल्यामुळे व जीवन जगत असल्यामुळे आपल्या खरोखरच्या हृदयावर व लाक्षणिक हृदयावर खूप ताण येऊ शकतो. पण, होता होईल तितके आपल्या बांधवांसोबत, जे खरोखर आपली काळजी घेतात व जे पूर्ण अंतःकरणाने देवाची सेवा करतात अशांसोबत सहवास केल्यास हा ताण आपण कमी करू शकतो.—स्तो. ११९:६३; नीति. १३:२०.