व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्तर वर्षांपासून मी एका यहुद्याचा पदर धरून आहे

सत्तर वर्षांपासून मी एका यहुद्याचा पदर धरून आहे

जीवन कथा

सत्तर वर्षांपासून मी एका यहुद्याचा पदर धरून आहे

लेनर्ड स्मिथ यांच्याद्वारे कथित

मी तेरा-चौदा वर्षांचा असताना, बायबलमधील दोन वचनांचा माझ्या मनावर खोलवर प्रभाव पडला. जखऱ्‍या ८:२३ या वचनाचा अर्थ मला पूर्णपणे उमगला तो काळ, आज ७० वर्षं उलटूनही मला स्पष्ट आठवतो. या वचनात एका “यहूदी माणसाचा पदर” धरणाऱ्‍या दहा जणांबद्दल सांगितलं आहे. ते त्या यहुद्याला म्हणतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”

या वचनात सांगितलेला यहुदी मनुष्य अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना सूचित करतो आणि दहा जण हे दुसऱ्‍या मेंढरांना सूचित करतात. त्या काळी या दुसऱ्‍या मेंढरांना “योनादाब” म्हटलं जायचं. * (योहा. १०:१६) त्या वचनाचा अर्थ समजल्यावर मला जाणीव झाली की पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची माझी आशा ही अभिषिक्‍त वर्गाला एकनिष्ठपणे पाठिंबा देण्यावरच पूर्णपणे अवलंबून आहे.

तसेच, मत्तय २५:३१-४६ यात येशूनं शेरडं व मेंढरं यांचा जो दृष्टान्त दिला होता, त्याचादेखील माझ्या मनावर गहिरा प्रभाव पडला. मेंढरं अशा लोकांना सूचित करतात, जे ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील अभिषिक्‍त बांधवांना साहाय्य करतात. अशांना अंतसमयी होणाऱ्‍या न्यायात देवाची कृपापसंती मिळते. योनादाब वर्गाचा एक लहान सदस्य या नात्यानं मी स्वतःला म्हटलं, ‘लेन्‌, ख्रिस्तानं तुला मेंढरांमध्ये गणावं असं वाटत असेल तर तू त्याच्या अभिषिक्‍त बांधवांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे कारण देव त्यांच्यासोबत आहे.’ तेव्हापासून, सातपेक्षा अधिक दशकांच्या काळात मी ही गोष्ट आठवणीत ठेवून चाललो आहे.

‘माझं स्थान काय?’

१९२५ साली बेथेलच्या सभागृहात माझ्या आईचा बाप्तिस्मा झाला. त्या सभागृहाला ‘लंडन टॅबरनॅकल’ म्हटलं जायचं आणि आसपासच्या परिसरातील बांधव या सभागृहाचा वापर करायचे. माझा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. १९४० सालच्या मार्च महिन्यात इंग्लंडच्या किनारपट्टीवरील डोवर इथं झालेल्या एका संमेलनात माझा बाप्तिस्मा झाला. बायबलमधील सत्य मला खूप प्रिय होतं. माझी आई अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपैकी असल्यामुळं मी सर्वप्रथम ज्या यहुद्याचा पदर धरला ती माझी आईच होती. त्या वेळी माझे बाबा व मोठी बहीण यहोवाचे सेवक नव्हते. आम्ही इंग्लंडच्या गिलिंगहम मंडळीचे सदस्य होतो. या मंडळीचे बहुतेक सदस्य अभिषिक्‍त जन होते. आईनं आवेशानं प्रचार कार्य करण्याबाबतीत उत्तम उदाहरण मांडलं.

१९४१ सालच्या सप्टेंबरमध्ये लेस्टर शहरात झालेल्या अधिवेशनात “सचोटी” असे शीर्षक असलेल्या एका भाषणात सबंध विश्‍वाच्या सार्वभौमत्वाचा विषय विचारात घेतला गेला. ते भाषण ऐकल्यावर मला पहिल्यांदा समजलं की यहोवा व सैतान यांच्यामध्ये चाललेल्या एका वादविषयात आपणही गोवलेलो आहोत. आणि म्हणूनच, आपण यहोवाचा पक्ष घेऊन सबंध विश्‍वाचा सार्वभौम या नात्यानं त्याच्याप्रती सचोटी राखली पाहिजे.

त्या अधिवेशनात पायनियर सेवेवर बराच जोर देण्यात आला आणि तरुणांना पायनियर बनण्याचं ध्येय ठेवण्याचं प्रोत्साहन देण्यात आलं. “संघटनेत पायनियरांचे स्थान” हे भाषण ऐकल्यावर मी विचार करू लागलो, ‘माझं स्थान काय आहे?’ त्या अधिवेशनानं मला याची खात्री पटवून दिली की योनादाब या नात्यानं मी प्रचार कार्यात अभिषिक्‍त जनांना होता होईल तितकं साहाय्य केलं पाहिजे. त्यामुळं, मी तिथंच, लेस्टरमध्येच पायनियर सेवेकरता अर्ज भरला.

युद्धाच्या काळात पायनियर सेवा

१ डिसेंबर १९४१ रोजी वयाच्या १५ व्या वर्षी माझी खास पायनियर म्हणून नेमणूक झाली. माझी पहिली पायनियर सोबती आईच होती. पण वर्षभरानंतर तिच्या प्रकृतीमुळं तिला पायनियर सेवा सोडावी लागली. मग लंडन शाखा कार्यालयानं रॉन पार्किन यांना माझा पायनियर सोबती म्हणून नेमलं. सध्या ते प्वेर्टोरिको येथील शाखा समितीत कार्य करत आहेत.

आम्हाला केंट प्रांतातील ब्रॉडस्टेअर्स व रॅम्सगेट या समुद्रकिनाऱ्‍याजवळ असलेल्या गावांत पाठवण्यात आलं. तिथं आम्ही एक खोली भाड्यानं घेतली. त्या वेळी खास पायनियरांना महिन्याला ४० शिलिंग (त्या काळचे साधारण ८ अमेरिकन डॉलर) मिळायचे. त्यामुळं, घरभाडं दिल्यानंतर आमच्याजवळ फार कमी पैसे उरायचे. पुन्हा जेवायला कुठून मिळेल याचीही कधीकधी खातरी नसायची. पण, यहोवानं नेहमीच या ना त्या मार्गानं आमच्या गरजा भागवल्या.

आम्ही सायकलींवरूनच फिरायचो. उत्तर समुद्राकडून येणाऱ्‍या जोरदार वाऱ्‍यांच्या विरुद्ध दिशेनं आम्हाला अवजड सामान लादलेल्या आमच्या सायकली चालवाव्या लागायच्या. तसंच, आम्हाला हवाई हल्ल्यांनाही तोंड द्यावं लागायचं. लंडनवर बॉम्बहल्ला करण्यासाठी जर्मनीची व्ही-१ क्षेपणास्त्रं केंटवरून अगदी कमी अंतरावरून आकाशातून जायची. एकदा एक बॉम्ब अगदी माझ्या डोक्यावरून गेला तेव्हा मला सायकलीवरून अक्षरशः उडी मारून एका खड्ड्यात आश्रय घ्यावा लागला. जवळच्याच एका शेतात त्या बॉम्बचा स्फोट झाला. हे सर्व असूनही केंटमध्ये पायनियरिंग करतानाची ती वर्षं अतिशय आनंदात गेली.

मी बेथेल सदस्य बनलो

आई बेथेलबद्दल नेहमी खूप कौतुकानं बोलायची. ती म्हणायची, “तू बेथेलमध्ये गेलास, तर त्यापेक्षा मोठा आनंद मला दुसरा कोणताही नसेल.” त्यामुळं १९४६ च्या जानेवारीत मला लंडन बेथेलमध्ये तीन आठवडे काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं तेव्हा मला किती आनंद व आश्‍चर्य वाटलं असेल याची कल्पना करा. त्या तीन आठवड्यांच्या शेवटी शाखा सेवक प्राइस ह्‍यूझ यांनी मला बेथेलमध्येच राहायला सांगितलं. तिथं मिळालेलं प्रशिक्षण माझ्या संबंध जीवनात मला उपयोगी पडलं.

लंडनच्या बेथेल कुटुंबात त्या वेळी जवळजवळ ३० सदस्य होते. यांपैकी बहुतेक जण तरुण अविवाहित बांधव होते. पण, बेथेल कुटुंबात अनेक अभिषिक्‍त बांधवही होते. उदाहरणार्थ, प्राइस ह्‍यूझ, एड्‌गर क्ले आणि नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनलेले जॅक बार. तरुण वयात या आधारस्तंभांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली कार्य करण्याद्वारे ख्रिस्ताच्या बांधवांना पाठिंबा देणं हा किती मोठा बहुमान होता!—गलती. २:९.

बेथेलमध्ये असताना एके दिवशी एका बांधवानं मला सांगितलं की समोरच्या दारावर मला भेटायला एक बहीण आली आहे. जाऊन पाहतो तर काय, माझी आई तिथं हातात एक पार्सल घेऊन उभी होती. तुझ्या कामात व्यत्यय यायला नको म्हणून मी आत येणार नाही असं ती मला म्हणाली. तिनं मला ते पार्सल दिलं आणि निघून गेली. त्यात एक गरम कोट होता. तिच्या त्या प्रेमळ कृत्यामुळं मला निवासमंडपात सेवा करत असलेल्या शमुवेल बाळासाठी झगा आणणाऱ्‍या हन्‍नाची आठवण झाली.—१ शमु. २:१८, १९.

गिलियड—एक अविस्मरणीय अनुभव

१९४७ साली बेथेलमध्ये सेवा करत असलेल्या आम्हा पाच जणांना अमेरिकेतील गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं आणि पुढच्या वर्षी आम्ही गिलियडच्या ११ व्या वर्गाला उपस्थित राहिलो. आम्ही आलो तेव्हा प्रशाला जिथं होती त्या न्यूयॉर्कच्या उत्तरेकडील भागात कडाक्याची थंडी पडली होती. आईनं प्रेमानं दिलेला गरम कोट मला त्या वेळी किती उपयोगी पडला!

गिलियडमध्ये घालवलेले सहा महिने खरंच अविस्मरणीय होते. १६ वेगवेगळ्या देशांतील वर्गसोबत्यांच्या सहवासामुळं माझ्या ज्ञानात पुष्कळ भर पडली. प्रशालेतून मिळालेल्या आध्यात्मिक रीत्या समृद्ध करणाऱ्‍या अनुभवासोबतच मला अनेक प्रौढ ख्रिस्ती बांधवांच्या सहवासातूनही बरंच काही शिकायला मिळालं. माझा एक वर्गसोबती लॉइड बॅरी; प्रशिक्षकांपैकी एक, ॲल्बर्ट श्रोडर; आणि किंग्डम फार्म (ज्या ठिकाणी प्रशाला होती) इथं पर्यवेक्षक म्हणून कार्य करणारे जॉन बूथ हे नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनले. या सर्व बांधवांनी मला दिलेलं प्रेमळ मार्गदर्शन आणि यहोवा व त्याच्या संघटनेप्रती एकनिष्ठा दाखवण्याच्या बाबतीत त्यांचं उत्तम उदाहरण माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं.

विभागीय कार्य आणि बेथेलला परतणं

गिलियड प्रशाला झाल्यानंतर मला अमेरिकेच्या ओहायो राज्यात विभागीय कार्य करण्यास नेमण्यात आलं. मी अवघ्या २१ वर्षांचा होतो, पण बांधवांनी माझ्या तारुण्यसुलभ उत्साहाचा प्रेमळपणे स्वीकार केला. त्या विभागातल्या वयस्क व अनुभवी बांधवांकडून मला बरंच काही शिकायला मिळालं.

काही महिन्यांनंतर, मला आणखी प्रशिक्षणासाठी पुन्हा ब्रुकलिन बेथेलला यायला सांगण्यात आलं. त्या वेळी, मला मिल्टन हेन्शेल, कार्ल क्लाईन, नेथन नॉर, टी. जे. (बड) सलिव्हन आणि लायमन स्विंगल यांसारख्या अनुभवी बांधवांची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. हे सर्व बांधव एके काळी नियमन मंडळाचे सदस्य होते. त्यांना काम करताना पाहणं आणि त्यांच्या ख्रिस्ती जीवनाचं जवळून निरीक्षण करणं हा एक अतिशय बोधकारक अनुभव होता. यहोवाच्या संघटनेवरील माझा भरवसा कित्येक पटीनं वाढला. यानंतर मला परत एकदा युरोपला पाठवण्यात आलं आणि तिथं मी माझं सेवाकार्य चालू ठेवलं.

१९५० सालच्या फेब्रुवारी महिन्यात आईचा मृत्यू झाला. तिचा अंत्यविधी झाल्यानंतर, मी माझे बाबा व बहीण डोरा हिच्यासोबत बसून काही गोष्टींसंबंधी अगदी मोकळेपणानं चर्चा केली. आता आई गेली असल्यामुळं आणि मीसुद्धा घर सोडून दिलं असल्यामुळं, सत्याविषयी त्यांनी काय करायचं ठरवलं आहे हे मी त्यांना विचारलं. ते हॅरी ब्राउनिंग या वयस्क अभिषिक्‍त बांधवाला ओळखत होते आणि त्यांचा आदरही करत होते. त्यामुळं या बांधवासोबत सत्याविषयी चर्चा करण्यास बाबा आणि माझी बहीण तयार झाले. एका वर्षाच्या आत बाबा आणि डोरा यांचा बाप्तिस्मा झाला. बाबांना नंतर गिलिंगहम मंडळीत सेवक म्हणून नेमण्यात आलं. बाबांच्या मृत्यूनंतर डोराचं लग्न एक विश्‍वासू वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या रॉय मॉरटन यांच्याशी झालं आणि २०१० साली तिचा मृत्यू होईपर्यंत तिनं विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली.

फ्रांसमध्ये साहाय्य करण्याची संधी

शाळेत असताना मी फ्रेंच, जर्मन आणि लॅटिन या भाषा शिकलो होतो. आणि या तिन्ही भाषांपैकी माझी फ्रेंच सगळ्यात कच्ची होती. त्यामुळं, मला फ्रांसमधील पॅरिस बेथेलमध्ये साहाय्य करायला जाण्याविषयी सांगण्यात आलं, तेव्हा माझ्या मनात संमिश्र भावना होत्या. तिथं मला शाखा सेवक ऑन्री जेजे या वयस्क अभिषिक्‍त बांधवांसोबत कार्य करण्याची संधी मिळाली. मला दिलेलं काम नेहमीच सोपं नव्हतं आणि साहजिकच माझ्या हातून बऱ्‍याच चुका व्हायच्या, पण वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी जुळवून घेण्याविषयी मला त्या ठिकाणी बरंच काही शिकायला मिळालं.

शिवाय, दुसऱ्‍या महायुद्धानंतर प्रथमच पॅरिसमध्ये १९५१ साली एक आंतरराष्ट्रीय अधिवेशन भरवण्याची योजना आखली जात होती. त्या अधिवेशनाचं नियोजन करण्यात मीही सामील होतो. मला मदत करण्यासाठी विभागीय पर्यवेक्षक असणारा लेओपोल्ड झॉन्ते हा तरुण बांधव बेथेलला आला. कालांतरानं लेओपोल्डला शाखा पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. आयफल टावरच्या जवळच असलेल्या पॉले दे स्पॉर या ठिकाणी अधिवेशन भरवण्यात आलं. २८ देशांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला आले होते. शेवटल्या दिवशी ६,००० फ्रेंच साक्षीदारांना, तब्बल १०,४५६ लोक अधिवेशनाला उपस्थित राहिल्याचं पाहून खूप आनंद झाला!

मी फ्रांसला आलो होतो तेव्हा अगदीच मोडकीतोडकी फ्रेंच बोलायचो. त्यात, आपण फ्रेंचमध्ये जे बोलतोय ते अचूक आहे याची खातरी असल्याशिवाय तोंड उघडायचं नाही असं माझं धोरण होतं. हे अर्थातच चुकीचं होतं. कारण जोपर्यंत तुम्ही चुका करत नाही, तोपर्यंत कोणी तुमची चूक सुधारत नाही आणि साहजिकच तुम्ही प्रगती करू शकत नाही.

माझ्या समस्येवर उपाय म्हणून मी परदेशी लोकांना फ्रेंच शिकवणाऱ्‍या एका शाळेत प्रवेश घेतला. ज्या दिवशी सभा नसायच्या त्या दिवशी संध्याकाळी मी वर्गांना जायचो. हळूहळू मला फ्रेंच भाषा मनापासून आवडू लागली आणि फ्रेंच भाषेवरचं हे प्रेम पुढं वाढतंच गेलं. शिवाय, याचा मला खूप फायदाही झाला कारण मला फ्रांसच्या शाखा कार्यालयातील भाषांतर कार्यात साहाय्य करण्याची संधी मिळाली. कालांतराने मी स्वतः इंग्रजीतून फ्रेंचमध्ये भाषांतर करू लागलो. दास वर्गानं पुरवलेलं पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न सबंध जगातील फ्रेंच बोलणाऱ्‍या बांधवांपर्यंत पोचवण्यात योगदान देणं हा खरोखर एक मोठा सुहक्क होता.—मत्त. २४:४५-४७.

लग्न व आणखी विशेषाधिकार

१९५६ साली मी एस्तर नावाच्या एका स्विस पायनियरशी लग्न केलं, जिच्याशी काही वर्षांपूर्वी माझी भेट झाली होती. लंडन बेथेलच्या शेजारच्या राज्य सभागृहात (पूर्वीचं लंडन टॅबरनॅकल, जिथं माझ्या आईचा बाप्तिस्मा झाला होता) आमचा लग्न समारंभ पार पडला. बंधू ह्‍यूझ यांनी लग्नाचं भाषण दिलं. एस्तरची आईदेखील लग्नाला आली होती. तिलासुद्धा स्वर्गीय जीवनाची आशा होती. एस्तरशी लग्न केल्यामुळं मला एक जिवाभावाची मैत्रीण आणि एकनिष्ठ सहचारिणी तर मिळालीच; शिवाय, अतिशय आध्यात्मिक मनोवृत्ती असलेल्या माझ्या सासूचाही मोलाचा सहवास मला लाभला. २००० साली त्यांचं पृथ्वीवरील जीवन संपुष्टात आलं.

लग्नानंतर एस्तर व मी बेथेलच्या बाहेर राहू लागलो. मी अद्यापही बेथेलमध्येच भाषांतराचं काम करत होतो आणि एस्तर पॅरिसच्या उपनगरांत खास पायनियर म्हणून सेवा करू लागली. तिला अनेक जणांना यहोवाचे सेवक बनण्यास मदत करण्याची संधी मिळाली. १९६४ साली आम्हाला बेथेलमध्ये येऊन राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं. मग १९७६ साली, प्रथमच शाखा समित्या स्थापन करण्यात आल्या तेव्हा मलाही शाखा समितीचा एक सदस्य म्हणून नेमण्यात आलं. या सबंध काळात मला नेहमीच एस्तरचा प्रेमळ आधार मिळाला आहे.

“मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही”

मला बरेचदा न्यू यॉर्क येथील जागतिक मुख्यालयाला परत जाण्याची सुसंधी मिळाली. या भेटींदरम्यान नियमन मंडळाच्या वेगवेगळ्या सदस्यांकडून मला उत्तम सल्ला मिळाला. उदाहरणार्थ, दिलेल्या वेळेत एक काम पूर्ण करता येत नसल्यामुळं मी बंधू नॉर यांच्याजवळ काळजी व्यक्‍त केली तेव्हा ते हसून एवढंच म्हणाले, “काळजी करू नकोस, फक्‍त काम करत राहा!” तेव्हापासून जेव्हाही माझ्यासमोर खूप कामं येतात तेव्हा गोंधळून जाण्याऐवजी, मी एका वेळी एक काम पूर्ण करायला घेतो आणि यामुळं सहसा मला सर्व कामं वेळेवर पूर्ण करणं शक्य होतं.

येशूचा मृत्यू होण्याच्या थोड्याच काळाआधी त्यानं आपल्या शिष्यांना म्हटलं: “मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही.” (मत्त. २६:११) दुसऱ्‍या मेंढरांतील बांधवांनाही याची जाणीव आहे की ख्रिस्ताचे अभिषिक्‍त बंधू नेहमीकरता पृथ्वीवर आपल्यासोबत राहणार नाहीत. म्हणूनच, ७० वर्षांपेक्षा अधिक काळादरम्यान अभिषिक्‍तांपैकी अनेक बांधवांचा जवळचा सहवास—एका यहुद्याचा पदर धरण्याचा अतुलनीय विशेषाधिकार—मला लाभला याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे!

[तळटीप]

^ परि. 5 “योनादाब” या संज्ञेसाठी टेहळणी बुरूज, १ जानेवारी १९९८, पृष्ठ १३, परि. ५ व ६ पाहा.

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

बंधू नॉर हसून एवढंच म्हणाले, “काळजी करू नकोस, फक्‍त काम करत राहा!”

[१९ पानांवरील चित्रे]

(डावीकडे) माझी आई व बाबा

(उजवीकडे) १९४८ साली गिलियडच्या आवारात, आईनं मला दिलेला गरम कोट घालून

[२० पानांवरील चित्र]

१९९७ मध्ये फ्रांस शाखा कार्यालयाच्या समर्पण कार्यक्रमात बंधू लॉइड बॅरी यांच्या भाषणाचा अनुवाद करताना

[२१ पानांवरील चित्रे]

(डावीकडे) एस्तरसोबत आमच्या लग्नाच्या दिवशी

(उजवीकडे) सोबत मिळून साक्षकार्य करताना