व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तणावग्रस्त विवाहाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगा

तणावग्रस्त विवाहाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगा

तणावग्रस्त विवाहाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगा

“ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करितो, मी नव्हे तर प्रभु करितो.”—१ करिंथ. ७:१०.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

देवाने विवाहसोबत्यांना कोणत्या अर्थाने एकत्र जोडले आहे?

वैवाहिक समस्यांचा सामना करणाऱ्‍यांना मंडळीतील वडील कशा प्रकारे साहाय्य करू शकतात?

आपण विवाहबंधनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?

१. ख्रिस्ती व्यक्‍ती विवाहबंधनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, आणि का?

 ख्रिस्ती व्यक्‍ती लग्न करतात, तेव्हा ते देवासमोर शपथ घेतात. विवाहित जोडप्यांनी ही शपथ कधीही हलकी मानू नये. (उप. ५:४-६) विवाह व्यवस्थेची सुरुवात यहोवा देवाने केलेली असल्यामुळे, विवाहबंधनात एकत्र झालेल्यांना त्यानेच एकत्र “जोडले” आहे असे म्हणता येईल. (मार्क १०:९) विवाहाच्या बाबतीत वेगवेगळ्या देशांतील कायदे काहीही असले, तरी देवाच्या दृष्टीत ते दोघे एकत्र जोडलेले आहेत. यहोवाच्या सेवकांनी विवाह हे एक कायमचे बंधन आहे असा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. एखाद्या जोडप्याचे लग्न झाले तेव्हा कदाचित ते यहोवाचे सेवक नसतील. तरीसुद्धा, आज यहोवाचे सेवक या नात्याने त्यांनी विवाहाविषयी त्याच्यासारखा दृष्टिकोन बाळगला पाहिजे.

२. या लेखात कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा केली जाईल?

वैवाहिक जीवन यशस्वी असेल, तर त्यात आनंदच आनंद असतो. पण, विवाहबंधन तणावग्रस्त झाले असेल, तर काय करता येईल? कमकुवत झालेल्या विवाहबंधनाला मजबूत करता येईल का? वैवाहिक जीवनातील शांती धोक्यात आली असेल, तर ती टिकवून ठेवण्यासाठी कोणते साहाय्य उपलब्ध आहे?

विवाहबंधनात आनंद अनुभवणार की दुःख?

३, ४. विवाहसोबती निवडण्याच्या बाबतीत एखाद्याने सुज्ञपणे निर्णय न घेतल्यास काय घडू शकते?

एका ख्रिस्ती व्यक्‍तीचा विवाह यशस्वी होतो तेव्हा आनंद अनुभवायला मिळतो आणि त्यामुळे यहोवाचा सन्मान होतो. पण, एखादा विवाह टिकला नाही, तर वाट्याला येतात असंख्य मनोवेदना. ज्या ख्रिश्‍चनांचे अजून लग्न झाले नाही, पण जे लग्न करण्याचा विचार करत आहेत त्यांनी देवाच्या मार्गदर्शनाचे पालन केले, तर ते त्यांच्या विवाहाची चांगली सुरुवात करू शकतात. दुसरीकडे पाहता, विवाहसोबती निवडताना एखाद्याने सुज्ञपणे निर्णय न घेतल्यास, त्याच्या वाट्याला केवळ असमाधान व दुःख येऊ शकते. उदाहरणार्थ, विवाहासोबत येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या पेलण्यासाठी तयार नसूनही, काही तरुण-तरुणी एकमेकांशी गाठीभेटी करू लागतात. काही जण इंटरनेटवर भेटलेल्या व्यक्‍तीशी, पुरेसा विचार न करताच लग्न करण्याची घाई करतात; परिणामस्वरूप ते वैवाहिक जीवनात अतिशय दुःखी होतात. इतर काही जण, लग्नाअगोदर गाठीभेटी करताना गंभीर पाप करतात आणि तरीसुद्धा लग्न करतात. ते वैवाहिक जीवनाची सुरुवात तर करतात, पण त्यांना एकमेकांबद्दल फारसा आदर वाटत नाही.

“केवळ प्रभूमध्ये” लग्न न केल्यामुळे काही ख्रिश्‍चनांना धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांमधील दुःखद समस्या सोसाव्या लागतात. (१ करिंथ. ७:३९) तुमच्याही बाबतीत हे खरे असेल, तर देवाने तुम्हाला क्षमा करावी व मदत करावी म्हणून त्याला प्रार्थना करा. देव एका व्यक्‍तीच्या गतकाळातील चुकांचे परिणाम काढून टाकत नाही. पण, जे पश्‍चात्ताप करतात त्यांना समस्यांचा सामना करण्यासाठी तो मदत करतो. (स्तो. १३०:१-४) तुम्ही आता व सदासर्वकाळ देवाला खूश करण्याचा मनापासून प्रयत्न केला, तर परमेश्‍वराविषयीचा आनंद तुमचा आश्रयदुर्ग होईल.—नहे. ८:१०.

विवाहबंधन धोक्यात येते तेव्हा

५. वैवाहिक जीवनात सुख नसेल, तर कोणत्या प्रकारची विचारसरणी टाळली पाहिजे?

ज्यांचे वैवाहिक जीवन सुखी नाही, ते कदाचित असा विचार करतील: ‘माझ्या वैवाहिक जीवनात सुखच नाही, तर हा विवाह वाचवण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ आहे का? त्यापेक्षा दुसऱ्‍या जोडीदारासोबत नव्याने सुरुवात केल्यास कदाचित मी सुखी होईन का?’ ते आपल्या साथीदाराला सोडण्याचे स्वप्न पाहत असतील आणि कदाचित असा विचार करत असतील: ‘मला या बंधनातून मुक्‍त व्हायचंय! तर घटस्फोट का घेऊ नये? जरी बायबलनुसार घटस्फोट मिळत नसला, तरी साथीदारापासून विभक्‍त होऊन पुन्हा एकदा जीवनात आनंदी होणं मला शक्य आहे.’ अशा प्रकारे विचार करण्याऐवजी किंवा एका वेगळ्या जीवनाचे स्वप्न पाहण्याऐवजी, ख्रिश्‍चनांनी देवाच्या वचनातील मार्गदर्शन मिळवून त्यावर अंमल करण्याद्वारे, आहे त्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.

६. मत्तय १९:९ मध्ये येशूने काय म्हटले होते ते स्पष्ट करा.

एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने घटस्फोट घेतल्यास, तो किंवा ती शास्त्रवचनांनुसार पुन्हा विवाह करण्यास मोकळी असेलच असे नाही. येशूने म्हटले: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो.” (मत्त. १९:९) येथे “जारकर्म” असे जे म्हटले आहे त्यात विवाहबाह्‍य लैंगिक संबंधांचा आणि इतर गंभीर लैंगिक पापांचा समावेश होतो. विवाहसोबत्यांपैकी कोणीही लैंगिक अनैतिकतेबद्दल दोषी नसेल, तर घटस्फोट घेणे कितपत योग्य ठरेल याविषयी प्रार्थनापूर्वक विचार करणे अत्यावश्‍यक आहे.

७. यहोवाचे साक्षीदार असलेल्यांचा विवाह असफल झाल्यास पाहणाऱ्‍यांना काय वाटू शकते?

एखाद्याचा विवाह मोडल्यास, त्याच्या आध्यात्मिकतेविषयी प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. या संदर्भात प्रेषित पौलाने हा गंभीर प्रश्‍न विचारला: “ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?” (१ तीम. ३:५) खरेतर, दोघेही विवाहसोबती यहोवाचे साक्षीदार असून त्यांचा विवाह असफल होतो तेव्हा पाहणाऱ्‍यांना वाटू शकते की हे लोक इतरांना जे शिकवतात त्याचे पालन ते स्वतः करत नाहीत.—रोम. २:२१-२४.

८. विवाहसोबती विभक्‍त होण्याचा निर्णय घेतात, तेव्हा त्यांच्या वैवाहिक जीवनात कशाची उणीव असते?

जेव्हा बाप्तिस्मा घेतलेले विवाहसोबती एकमेकांपासून विभक्‍त होण्याचा किंवा शास्त्रवचनीय आधार नसताना घटस्फोट घेण्याचा विचार करत असतात तेव्हा नक्कीच त्यांच्या आध्यात्मिकतेत काहीतरी उणीव असते. अशा वेळी सहसा, एक साथीदार किंवा दोघेही वैवाहिक जीवनात बायबलमधील तत्त्वांचे पालन करत नसतात. जर त्यांनी “अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव” ठेवला, तर नक्कीच ते आपला तणावग्रस्त विवाह वाचवू शकतील.—नीतिसूत्रे ३:५, ६ वाचा.

९. विवाहाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना कशा प्रकारे त्यांच्या धीराचे प्रतिफळ मिळाले?

उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत असे वाटत असलेले अनेक विवाह कालांतराने अतिशय यशस्वी झाले आहेत. विवाहात समस्या असूनही जे ख्रिस्ती हार न मानता आपला विवाह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात अशांचे प्रयत्न सहसा सार्थक होतात. उदाहरणार्थ, धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबामध्ये काय घडू शकते त्याचा विचार करा. प्रेषित पेत्राने असे लिहिले: “स्त्रियांनो, तुम्हीही आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” (१ पेत्र ३:१, २) होय, एक अविश्‍वासू विवाहसोबती आपल्या जोडीदाराच्या चांगल्या वर्तनामुळे सत्य स्वीकारू शकतो! अशा प्रकारे आपल्या विवाहाचे रक्षण केल्याने देवाचा सन्मान होतो आणि पतीसाठी, पत्नीसाठी आणि त्यांना मुले असल्यास त्यांच्यासाठीही मोठा आशीर्वाद ठरू शकतो.

१०, ११. वैवाहिक जीवनात कोणत्या अनपेक्षित समस्या निर्माण होऊ शकतात, पण एक ख्रिस्ती व्यक्‍ती कशाची खातरी बाळगू शकते?

१० यहोवाचे मन आनंदित करायचे असल्यामुळे बहुतेक ख्रिस्ती, यहोवाला समर्पित असलेल्या विश्‍वासू सेवकांशीच लग्न करतात. पण तरीसुद्धा, त्यांच्या वैवाहिक जीवनात त्यांना अनपेक्षित परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. उदाहरणार्थ, क्वचित प्रसंगी, पती किंवा पत्नीमध्ये गंभीर मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. किंवा लग्नाच्या काही काळानंतर पती किंवा पत्नी प्रचार कार्यात निष्क्रिय होऊ शकते. लिन्डा नावाच्या एका आवेशी ख्रिस्ती बहिणीचे व आईचेच उदाहरण पाहा. * बाप्तिस्मा घेतलेल्या तिच्या पतीने बायबल तत्त्वांच्या विरुद्ध असलेला मार्ग अनुसरला तेव्हा ती काहीही करू शकली नाही. तो अपश्‍चात्तापीपणे बायबलच्या विरोधात कार्य करत राहिल्यामुळे त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले. एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीचे वैवाहिक जीवन अशा एखाद्या कारणामुळे विस्कळीत होत आहे असे वाटल्यास त्या व्यक्‍तीने काय केले पाहिजे?

११ कदाचित तुम्हाला असा प्रश्‍न पडेल: ‘काहीही झाले तरी मी माझा विवाह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत राहावा का?’ या बाबतीत कोणीही तुमच्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही, आणि घेऊही नये. तरीसुद्धा, कमकुवत होत चाललेले विवाहबंधन मजबूत करण्याच्या बाबतीत हार न मानण्याची अनेक ठोस कारणे आहेत. विवाहात अनेक समस्या असूनही जे आपल्या विवेकामुळे वैवाहिक जीवनातील समस्यांना धीराने तोंड देतात असे पती किंवा पत्नी देवाच्या नजरेत अनमोल आहेत. (१ पेत्र २:१९, २० वाचा.) जो विवाहसोबती कमकुवत झालेल्या विवाहबंधनाला मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला यहोवा आपल्या पवित्र आत्म्याद्वारे साहाय्य करतो.

साहाय्य उपलब्ध आहे

१२. आपण वडिलांना मदत मागितली तर ते आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतील?

१२ तुम्ही जर वैवाहिक जीवनात समस्यांचा सामना करत असाल, तर आध्यात्मिक रीत्या प्रौढ ख्रिश्‍चनांची मदत घेण्यास मागेपुढे पाहू नका. मंडळीतील वडील हे मेंढपाळ या नात्याने कळपाची काळजी घेतात आणि त्यामुळे बायबलमधील देवप्रेरित सल्ल्याकडे ते तुमचे लक्ष वेधतील. (प्रे. कृत्ये २०:२८; याको. ५:१४, १५) तुम्ही जर वडिलांकडून आध्यात्मिक साहाय्य मागितले आणि त्यांच्यासोबत आपल्या वैवाहिक जीवनातील गंभीर समस्यांची चर्चा केली तर त्यांच्या नजरेत तुमचा आदर कमी होईल असा विचार करू नका. तुम्ही हरतऱ्‍हेने देवाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहात हे जेव्हा वडील पाहतील तेव्हा तुमच्याबद्दल असलेला त्यांचा आदर आणखी वाढेल.

१३. पहिले करिंथकर ७:१०-१६ मध्ये कोणता सल्ला सापडतो?

१३ धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांत राहणारे ख्रिस्ती, मंडळीच्या वडिलांकडून मदत मागतात तेव्हा वडील प्रेषित पौलाने दिलेल्या सल्ल्याकडे त्यांचे लक्ष वेधतात. पौलाने लिहिले: “ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करितो, मी नव्हे तर प्रभु करितो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये; परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये. . . . कारण हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पते, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक?” (१ करिंथ. ७:१०-१६) एक अविश्‍वासू विवाहसोबती आपल्या जोडीदाराच्या चांगल्या आचरणाने प्रभावित होऊन सत्य स्वीकारतो तेव्हा तो एक आशीर्वादच आहे असे म्हणता येणार नाही का?

१४, १५. एक ख्रिस्ती विवाहसोबती विभक्‍त होण्याचा निर्णय केव्हा घेऊ शकतो, पण या बाबतीत प्रार्थनापूर्वक व प्रामाणिकपणे विचार करणे का महत्त्वाचे आहे?

१४ एक ख्रिस्ती पत्नी कोणत्या परिस्थितींत आपल्या पतीपासून “वेगळी” होऊ शकते? पती जाणूनबुजून कुटुंबाचे पालनपोषण करत नसल्यामुळे काही पत्नींनी विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला आहे. इतर काहींनी, पतीच्या मारहाणीमुळे जिवाला धोका असल्यामुळे किंवा त्यांच्या आध्यात्मिकतेला धोका निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

१५ विभक्‍त होणे किंवा न होणे हा वैयक्‍तिक निर्णय आहे. पण, बाप्तिस्मा घेतलेल्या विवाहसोबत्याने याविषयी प्रार्थनापूर्वक व प्रामाणिकपणे विचार करायला हवा. उदाहरणार्थ, विश्‍वासू जोडीदाराच्या आध्यात्मिकतेला केवळ अविश्‍वासू साथीदारामुळेच धोका निर्माण झाला आहे का? की ख्रिस्ती व्यक्‍ती स्वतःच बायबल अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहे, नियमितपणे सभांना येत नाही आणि सेवेतही नियमितपणे भाग घेत नाही?

१६. घटस्फोटाचा निर्णय घेण्याची घाई करण्यापासून ख्रिश्‍चनांना कोणत्या गोष्टीने रोखले पाहिजे?

१६ यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाबद्दल आपल्याला कदर आहे आणि विवाहाच्या देणगीबद्दल आपण देवाला कृतज्ञ आहोत. या वास्तविकतेच्या जाणिवेमुळे आपण घटस्फोट घेण्याची घाई करू नये. आपण यहोवाचे सेवक असल्यामुळे, त्याच्या नावावर कलंक लागू नये हीच आपली इच्छा आहे. तेव्हा, दुसरा विवाह करण्याच्या हेतूने सध्याच्या विवाहातून बाहेर पडण्याची आपण कधीही युक्‍ती करू नये.—यिर्म. १७:९; मला. २:१३-१६.

१७. विवाहित ख्रिश्‍चनांना देवाने शांतीत राहण्यासाठी पाचारण केले आहे असे कोणत्या परिस्थितींत म्हटले जाऊ शकते?

१७ सत्यात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न केलेल्या ख्रिश्‍चनाने आपले विवाहबंधन अतूट ठेवण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे. ख्रिस्ती विवाहसोबत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही, जर सत्यात नसलेला विवाहसोबती विभक्‍त होऊ इच्छित असेल, तर ख्रिस्ती विवाहसोबत्याने स्वतःला दोषी मानू नये. पौलाने लिहिले: “जर ख्रिस्तीतर व्यक्‍ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही; देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता पाचारण केले आहे.”—१ करिंथ. ७:१५. *

यहोवावर भरवसा ठेवा

१८. प्रयत्न करूनही एखाद्या विवाहाला वाचवणे शक्य नसले, तरी त्यामुळे कोणते चांगले परिणाम मिळू शकतात?

१८ एखाद्या वैवाहिक समस्येचा धीराने सामना करण्यासाठी यहोवाचे मार्गदर्शन घ्या आणि नेहमी त्याच्यावर भरवसा ठेवा. (स्तोत्र २७:१४ वाचा.) याआधी उल्लेख करण्यात आलेल्या लिन्डाचेच उदाहरण घ्या. तिने अनेक वर्षे आपल्या विवाहाला वाचवण्याचा प्रयत्न करूनही शेवटी तिच्या विवाहाचा अंत घटस्फोटाने झाला. आपले प्रयत्न वाया गेले असे तिला वाटते का? ती म्हणते: “मुळीच नाही. माझ्या प्रयत्नांमुळे पाहणाऱ्‍यांना चांगली साक्ष मिळाली. मला एक चांगला विवेक लाभला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी इतकी वर्षं प्रयत्न केल्यामुळे आमच्या मुलीला सत्यात मजबूत व्हायला मदत मिळाली. ती यहोवाची एक समर्पित व आवेशी सेवक बनली.”

१९. विवाह वाचवण्यासाठी प्रयत्न केले तर काय घडू शकते?

१९ मेरिलिन नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीने यहोवावर भरवसा ठेवून तिचा तणावग्रस्त विवाह वाचवण्यासाठी होता होईल तितके प्रयत्न केले होते याचा तिला खूप आनंद होतो. ती म्हणते: “माझे पती कुटुंबाची देखभाल करायचे नाही आणि त्यांनी माझ्या आध्यात्मिकतेलाही धोका निर्माण केला होता, त्यामुळं त्यांच्यापासून विभक्‍त होण्याचा मला मोह झाला. व्यापारासंबंधी काही अयोग्य निर्णय घेण्याआधी ते मंडळीत एक वडील या नात्यानं सेवा करत होते. हळूहळू ते सभा चुकवू लागले; आम्ही दोघांनी एकमेकांशी बोलणंही बंद केलं. आमच्या शहरावर झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यानंतर मी इतकी घाबरले की मी एकटी-एकटीच राहू लागले. नंतर मला जाणीव झाली की माझ्या या अवस्थेसाठी मी स्वतःदेखील जबाबदार होते. आम्ही दोघं नवरा-बायको पुन्हा एकमेकांशी बोलू लागलो, कौटुंबिक अभ्यास करू लागलो आणि सभांना नियमितपणे जाऊ लागलो. मंडळीतील वडिलांनी प्रेमळपणे आम्हाला मदत केली. आमच्या विवाहाला जणू जीवदान मिळालं. कालांतरानं, माझ्या पतीला पुन्हा एकदा मंडळीतील जबाबदाऱ्‍या मिळू लागल्या. आम्ही एका दुःखदायक अनुभवातून हा धडा शिकलो.”

२०, २१. विवाहाच्या बाबतीत आपण काय करण्याचा दृढ निश्‍चय केला पाहिजे?

२० तर मग, आपण अविवाहित असो किंवा विवाहित, आपण सर्व जण नेहमी धैर्याने कार्य करू या आणि यहोवावर भरवसा ठेवू या. आपण जर वैवाहिक समस्यांचा सामना करत असू, तर त्या समस्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करू या आणि हे लक्षात ठेवू या, की जे विवाहबंधनात एक झाले आहेत ते “दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत.” (मत्त. १९:६) सोबतच आपण हेही लक्षात ठेवू या, की धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबात वैवाहिक समस्या असूनही आपण आपला विवाह टिकवून ठेवण्याचा मनस्वी प्रयत्न केला, तर आपण आपल्या विवाहसोबत्याला सत्य स्वीकारण्यास मदत करू शकतो.

२१ आपली परिस्थिती काहीही असो, ज्यामुळे पाहणाऱ्‍यांना उत्तम साक्ष मिळेल अशा प्रकारे वागण्याचा आपण पक्का निर्धार करू या. आपल्या विवाहबंधनाला धोका निर्माण झाल्यास आपण काकुळतीने यहोवाला प्रार्थना करू या, प्रामाणिकपणे आपल्या हेतूंचे परीक्षण करू या, काळजीपूर्वक शास्त्रवचने विचारात घेऊ या, आणि मंडळीतील वडिलांकडून आध्यात्मिक मदत घेऊ या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्व गोष्टींत यहोवा देवाचे मन आनंदित करण्याचा दृढ निश्‍चय करू या आणि विवाहाच्या अद्‌भुत देणगीबद्दल त्याचे मनापासून आभार मानू या.

[तळटीपा]

^ परि. 10 नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 17 देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे २५१-२५३; टेहळणी बुरूज (इंग्रजी), १ नोव्हेंबर १९८८, पृष्ठे २६-२७; १५ सप्टेंबर १९७५, पृष्ठ ५७५ पाहा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील संक्षिप्त आशय]

जे ख्रिस्ती तणावग्रस्त विवाह वाचवण्याचा निरंतर प्रयत्न करतात त्यांना सहसा उत्तम परिणाम मिळतात

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

नेहमी यहोवावर भरवसा ठेवा आणि धैर्यासाठी त्याला मदत मागा

[९ पानांवरील चित्र]

तणावग्रस्त विवाह मजबूत करण्यासाठी मनस्वी प्रयत्न करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना यहोवा आशीर्वादित करतो

[११ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती मंडळीतून सांत्वन व आध्यात्मिक साहाय्य मिळू शकते