व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परूश्‍यांच्या खमिराविषयी संभाळा

परूश्‍यांच्या खमिराविषयी संभाळा

परूश्‍यांच्या खमिराविषयी संभाळा

येशूने त्याच्या शिष्यांना असा इशारा दिला: “तुम्ही आपणास परूश्‍यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी संभाळा.” (लूक १२:१) मत्तयाच्या समांतर अहवालातून स्पष्टपणे दिसून येते की येशूने खरेतर परूश्‍यांच्या “शिकवणीविषयी” हे धिक्काराचे उद्‌गार काढले होते.—मत्त. १६:१२.

बायबल कधीकधी एखाद्या भ्रष्ट करणाऱ्‍या गोष्टीला सूचित करण्यासाठी “खमीर” किंवा किण्व यांचा वापर करते. परूश्‍यांची शिकवण आणि त्यांची मनोवृत्ती या दोन्ही गोष्टी लोकांना भ्रष्ट करणाऱ्‍या होत्या यात काही शंका नाही. पण, परूश्‍यांची शिकवण इतकी धोकादायक का होती?

१ अहंकारी परूशी स्वतःला अतिशय नीतिमान मानायचे आणि सर्वसामान्य लोकांना तुच्छ लेखायचे.

स्वतःला अतिशय नीतिमान समजण्याची परूश्‍यांची प्रवृत्ती येशूने दिलेल्या एका दृष्टान्तातून दिसून येते. त्याने म्हटले: “परूश्‍याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली: हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्‍या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून दोनदा उपास करितो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर.”—लूक १८:११-१३.

येशूने त्या जकातदाराच्या नम्र मनोवृत्तीची प्रशंसा केली. येशूने म्हटले: “मी तुम्हास सांगतो, त्या [परूश्‍यापेक्षा] हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.” (लूक १८:१४) जकातदार बेइमानी करणारे म्हणून बदनाम होते; पण त्यांच्यापैकी जे येशूचे ऐकण्यास इच्छुक होते त्यांना मदत करण्याचा येशूने प्रयत्न केला. कमीत कमी दोन जकातदार—मत्तय आणि जक्कय—येशूचे शिष्य बनले.

आपल्याजवळ असलेल्या काही विशिष्ट कौशल्यांमुळे किंवा विशेषाधिकारांमुळे; अथवा इतरांच्या चुकांमुळे आणि उणिवांमुळे आपण जर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असू, तर काय? असे असल्यास, आपण ते विचार लगेच डोक्यातून काढून टाकले पाहिजेत, कारण बायबल असे म्हणते: “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती दुसऱ्‍यांच्या चुकांमुळे आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते.”—१ करिंथ. १३:४-६, द न्यू इंग्लिश बायबल.

आपली मनोवृत्ती पौलाच्या मनोवृत्तीसारखी असली पाहिजे. “ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला,” असा उल्लेख करून पौलाने पुढे म्हटले, की “त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे.”—१ तीम. १:१५.

मनन करण्यासाठी प्रश्‍न:

मी पापी आहे आणि माझे तारण यहोवाच्या अगाध कृपेवर अवलंबून आहे हे मी मान्य करतो का? की अनेक वर्षे विश्‍वासूपणे सेवा केल्यामुळे, देवाच्या संघटनेतील विशेषाधिकारांमुळे, किंवा माझ्या कौशल्यांमुळे मी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो?

२ लोकांसमोर आपल्या नीतिमत्तेचे प्रदर्शन करून परूशी त्यांच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करायचे. ते अधिकारपदाची इच्छा बाळगायचे व पदव्या मिरवण्याची त्यांना हौस होती.

पण येशूने अशी ताकीद दिली: “आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करितात, ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करितात; जेवणावळींतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानांतील श्रेष्ठ आसने, बाजारांत नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांस आवडते.” (मत्त. २३:५-७) परूश्‍यांच्या मनोवृत्तीची तुलना येशूच्या मनोवृत्तीशी करा. देवाचा परिपूर्ण पुत्र असूनही येशू नम्र होता. एकदा एका माणसाने त्याला “उत्तम” असे म्हटले, तेव्हा येशूने त्याला म्हटले: “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही.” (मार्क १०:१८) दुसऱ्‍या एका प्रसंगी येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले, आणि अशा प्रकारे त्याने त्याच्या अनुयायांसमोर एक उत्तम आदर्श मांडला.—योहा. १३:१-१५.

आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी आपल्या सहविश्‍वासू बांधवांची सेवा केली पाहिजे. (गलती. ५:१३) खासकरून, मंडळीत पर्यवेक्षक या नात्याने जे सेवा करण्यास पात्र होऊ इच्छितात त्यांनी या बाबतीत उत्तम उदाहरण मांडले पाहिजे. पर्यवेक्षक म्हणून काम करण्याची इच्छा बाळगण्यात काहीच गैर नाही, पण इतरांना मदत करण्याच्या इच्छेमुळे आपल्याला ही प्रेरणा मिळाली पाहिजे. पर्यवेक्षकाचे काम हे श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व दाखवण्यासाठी नाही. जे पर्यवेक्षक या नात्याने सेवा करतात त्यांनी येशूसारखे मनाचे “लीन” असणे गरजेचे आहे.—१ तीम. ३:१, ६; मत्त. ११:२९.

मनन करण्यासाठी प्रश्‍न:

मंडळीत मोठे पद किंवा जास्त विशेषाधिकार मिळवण्यासाठी मी मंडळीत जबाबदारीच्या पदावर असलेल्यांची खुशामत करतो का? देवाच्या सेवेतील ज्या कामांमुळे लोकांचे लक्ष माझ्याकडे जाईल किंवा ते माझी स्तुती करतील अशीच कामे करण्यास मी अधिक उत्सुक असतो का? दुसऱ्‍या शब्दांत, मी इतरांसमोर चमकण्याचा प्रयत्न करत आहे का?

३ परूश्‍यांच्या नियमांमुळे व परंपरांमुळे सर्वसामान्य लोकांना नियमशास्त्राचे पालन करणे अतिशय कठीण बनले होते.

इस्राएल लोकांनी यहोवाची उपासना कशी करावी याची संपूर्ण रूपरेखा मोशेच्या नियमशास्त्रात देण्यात आली होती. पण, त्यात अगदी बारीकसारीक गोष्टी सांगण्यात आल्या नव्हत्या. उदाहरणार्थ, शब्बाथाच्या दिवशी काम करू नये असा नियम होता, पण कोणते काम करावे आणि कोणते काम करू नये याची तपशीलवार माहिती देण्यात आली नव्हती. (निर्ग. २०:१०) परूश्‍यांनी मात्र त्यांच्या नियमांद्वारे आणि परंपरांद्वारे ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. परूश्‍यांनी स्वतःहून बनवलेल्या या नियमांना येशूने जुमानले नाही, पण त्याने मोशेच्या नियमशास्त्राचे पालन केले. (मत्त. ५:१७, १८; २३:२३) नियमशास्त्रातील कायद्यांमागचा मूळ उद्देश तो पाहू शकत होता. आणि लोकांनी दया व करुणा दाखवावी ही देवाची इच्छा आहे याची त्याला जाणीव होती. येशूच्या शिष्यांनी त्याला निराश केले तेव्हादेखील तो त्यांच्याशी दयाळूपणे वागला. उदाहरणार्थ, ज्या रात्री त्याला अटक केली जाणार होती त्या रात्री त्याने आपल्या प्रेषितांपैकी तिघांना जागे राहण्यास आर्जवले, तरीही ते वारंवार झोपी गेले. तरीसुद्धा, येशूने सहानुभूतीने असे म्हटले: “आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्‍त आहे.”—मार्क १४:३४-४२.

मनन करण्यासाठी प्रश्‍न:

मी माझ्या मनास येईल तसे, कडक नियम बनवण्याचा प्रयत्न करतो का किंवा माझ्या वैयक्‍तिक मतांना नियमांचे रूप देण्याचा प्रयत्न करतो का? मी इतरांकडून ज्या अपेक्षा करतो त्या वाजवी असतात का?

येशूच्या शिकवणींत आणि परूश्‍यांच्या शिकवणींत जो फरक आहे त्यावर मनन करा. तुम्हालाही काही बाबतींत सुधारणा करण्याची गरज आहे असे वाटते का? असल्यास, सुधारणा करण्याचा पक्का निर्धार का करू नये?

[२८ पानांवरील चित्र]

परूशी कपाळाला व हाताला शास्त्रवचने असलेल्या लहान चामडी पेट्या बांधायचे.—मत्त. २३:२, ५.

[२९ पानांवरील चित्रे]

नम्र ख्रिस्ती वडील परूश्‍यांसारखे न वागता इतरांची सेवा करतात

[३० पानांवरील चित्र]

येशूप्रमाणेच, तुम्हीदेखील इतरांकडून वाजवी अपेक्षा करता का?