व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या यहोवावर भरवसा ठेवा

“प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या यहोवावर भरवसा ठेवा

“प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या यहोवावर भरवसा ठेवा

“तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजांस स्थानापन्‍न अथवा स्थानभ्रष्ट करितो.”—दानी. २:२१.

तुमचे उत्तर काय असेल?

यहोवा महान कालनियंता आहे हे सृष्टीवरून आणि पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांवरून कशा प्रकारे दिसून येते?

यहोवा “प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणारा देव आहे हे समजल्यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळते?

यहोवाचे वेळापत्रक जगातील घडामोडींवर आणि मानवी योजनांवर का अवलंबून नाही?

१, २. यहोवाला काळाविषयी पूर्ण ज्ञान आहे हे कशावरून दिसून येते?

 मानवांना निर्माण करण्याच्या बऱ्‍याच काळाआधी यहोवा देवाने काळ मोजण्याची तरतूद केली होती. निर्मितीच्या चवथ्या दिवशी देवाने म्हटले: “दिवस व रात्र ही भिन्‍न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखविणाऱ्‍या होवोत.” (उत्प. १:१४, १९, २६) आणि यहोवाच्या इच्छेनुसार असेच घडून आले.

पण, काळ म्हणजे नेमके काय हा आजही शास्त्रज्ञांमध्ये एक वादाचा विषय आहे. एका विश्‍वकोशाने म्हटले, “काळ हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. काळ म्हणजे नेमके काय हे कोणीही सांगू शकत नाही.” पण, यहोवा देवाला काळाविषयी पूर्ण ज्ञान आहे. शेवटी, तोच “आकाशाचा उत्पन्‍नकर्ता . . . पृथ्वीचा घडणारा व कर्ता” आहे. शिवाय, यहोवा “आरंभीच शेवट कळवितो.” “होणाऱ्‍या गोष्टी घडविण्यापूर्वी” त्या प्राचीन काळापासून सांगतो. (यश. ४५:१८; ४६:१०) तेव्हा, सृष्टी आणि पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या यांवरून यहोवा महान कालनियंता आहे हे कशा प्रकारे दिसून येते, याचा आपण विचार करू या. असे केल्याने यहोवावर आणि त्याचे वचन बायबल यावर आपला विश्‍वास निश्‍चितच आणखी दृढ होईल.

सृष्टी महान कालनियंत्यावर विश्‍वास ठेवण्यास प्रेरित करते

३. निसर्गात कशा प्रकारे अचूक वेळेचे पालन होताना दिसते?

निसर्गात सर्वात सूक्ष्म पदार्थ आणि सर्वात विशाल वस्तूदेखील अचूक वेळेचे पालन करताना दिसतात. परमाणूंमध्ये अगदी अचूक गतीने कंपन होत असते. परमाणूंच्या या कंपनांवर आधारित असलेली आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ दाखविणारी घड्याळे इतकी अचूक असतात की ८ कोटी वर्षांत त्यांमध्ये १ सेकंदाचाही फरक पडत नाही. ग्रहताऱ्‍यांच्या हालचालीही अत्यंत अचूक गतीने होत असतात. विशिष्ट वेळी आकाशात त्यांची स्थिती अगदी अचूकपणे सांगता येत असल्यामुळे निरनिराळे ऋतू ओळखण्यासाठी आणि दिशा ठरवण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात आला आहे. या भरवशालायक “घड्याळांचा” निर्माणकर्ता यहोवा खरोखरच “महासमर्थ” आणि स्तुतिपात्र आहे.—यशया ४०:२६ वाचा.

४. अचूक वेळा पाळण्याविषयीची जीवसृष्टीतील उदाहरणे कशा प्रकारे देवाची बुद्धी प्रदर्शित करतात?

जीवसृष्टीतही अचूक वेळेचे पालन होताना आढळते. अनेक वनस्पतींमध्ये व प्राण्यांमध्ये असलेल्या आंतरिक घड्याळांवर त्यांचे जीवनचक्र आधारित असते. अनेक पक्ष्यांना स्थलांतर करण्यास केव्हा सुरुवात करावी हे उपजतच माहीत असते. (यिर्म. ८:७) मानवांतही आंतरिक घड्याळ असते. हे घड्याळ दिवस व रात्रीच्या २४ तासांच्या चक्रावर आधारित असते. विमानाने प्रवास करणारी व्यक्‍ती एका खंडातून दुसऱ्‍या खंडात जाते तेव्हा तिच्या शरीराला तेथील वेळेशी जुळवून घ्यायला कधीकधी अनेक दिवस लागतात. खरोखर, अचूक वेळेचे पालन करण्याविषयीच्या सृष्टीतील या अनेक उदाहरणांवरून “प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या यहोवा देवाची अफाट शक्‍ती व बुद्धी दिसून येते. (स्तोत्र १०४:२४ वाचा.) महान कालनियंता यहोवा हा सर्वात बुद्धिमान आणि सर्वशक्‍तिमान आहे यात काहीही शंका नाही. त्याच्या इच्छेनुसार तो काहीही घडवून आणण्यास समर्थ आहे याविषयी आपण पूर्ण विश्‍वास बाळगू शकतो!

वेळेवर पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांमुळे विश्‍वास वाढतो

५. (क) मानवांच्या भविष्याबद्दल जाणून घेण्याचा एकमेव मार्ग कोणता आहे? (ख) यहोवा भविष्यातील घटना आणि त्या घडण्याची अचूक वेळ का सांगू शकतो?

सृष्टीतून आपल्याला नक्कीच यहोवाच्या “अदृश्‍य” गुणांबद्दल ज्ञान मिळते. पण, काही महत्त्वाच्या प्रश्‍नांचे उत्तर मात्र आपल्याला केवळ सृष्टीच्या निरीक्षणातून मिळत नाही. उदाहरणार्थ, भविष्यात मानवांकरता काय राखून ठेवले आहे? (रोम. १:२०) अशा प्रश्‍नांच्या उत्तरांकरता आपल्याला देवाने त्याचे वचन, बायबल यात प्रकट केलेल्या माहितीकडे वळावे लागेल. बायबलमधील माहितीचे आपण परीक्षण करतो तेव्हा आपल्याला अशा अनेक भविष्यवाण्यांबद्दल वाचायला मिळते, ज्या अगदी वेळेवर पूर्ण झाल्या! भविष्यात काय घडणार हेदेखील यहोवा प्रकट करू शकतो कारण तो भविष्य अगदी अचूकपणे पाहू शकतो. शिवाय, बायबलमध्ये जे भाकीत करण्यात आले आहे ते अगदी वेळेवर पूर्ण होते कारण यहोवा देव त्याच्या उद्देशानुसार आणि त्याच्या वेळापत्रकानुसार घटना घडवून आणू शकतो.

६. बायबलमधील भविष्यवाण्यांच्या पूर्णतेविषयी आपण समजून घ्यावे असे यहोवाला वाटते हे कशावरून दिसून येते?

यहोवाची अशी इच्छा आहे की त्याच्या उपासकांनी बायबलमधील भविष्यवाण्या समजून घ्याव्यात आणि त्यांपासून त्यांना फायदा व्हावा. काळाविषयी देवाचे ज्ञान मानवांप्रमाणे मर्यादित नाही. तरीसुद्धा, एखादी घटना विशिष्ट वेळी घडेल असे भाकीत करताना तो आपल्याला समजू शकेल अशी भाषा वापरतो. (स्तोत्र ९०:४ वाचा.) उदाहरणार्थ, प्रकटीकरणाच्या पुस्तकात चार देवदूतांविषयी सांगण्यात आले आहे, जे “नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्‍यांसाठी तयार केलेले” आहेत. येथे काळ दर्शवण्यासाठी वापरलेले शब्द आपल्याला समजू शकतील असे आहेत. (प्रकटी. ९:१४, १५) बायबलमधील भविष्यवाण्या कशा प्रकारे अगदी वेळेवर पूर्ण झाल्या याचे परीक्षण केल्यावर “प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या देवावर आणि त्याच्या वचनावर आपला विश्‍वास आणखी दृढ झाला पाहिजे. अशा काही भविष्यवाण्यांची उदाहरणे पाहू या.

७. जेरूसलेम व यहूदासंबंधी यिर्मयाच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेवरून यहोवा महान कालनियंता असल्याचे कशा प्रकारे दिसून येते?

सर्वप्रथम, आपण इ.स.पू. सातव्या शतकाकडे वळू या. “यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकीर्दीच्या चौथ्या वर्षी” यिर्मयाला “यहूदाच्या सर्व लोकांविषयी” महान कालनियंता यहोवा याचे वचन प्राप्त झाले. (यिर्म. २५:१) यहोवाने असे भाकीत केले की जेरूसलेम शहर उद्‌ध्वस्त केले जाईल आणि यहुद्यांना बंदिवान बनवून बॅबिलोनला नेले जाईल. तेथे ते “सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करितील.” बॅबिलोनी सैन्याने इ.स.पू. ६०७ मध्ये जेरूसलेम शहराचा नाश केला. आणि यहुद्यांना खरोखरच बंदिवान बनवून यहूदातून बॅबिलोनला नेण्यात आले. पण ७० वर्षानंतर काय घडणार होते? यिर्मयाने असे भाकीत केले: “परमेश्‍वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन.” (यिर्म. २५:११, १२; २९:१०) ही भविष्यवाणी अगदी वेळेवर पूर्ण झाली. इ.स.पू. ५३७ मध्ये मेदी व पारसी यांनी यहुद्यांची बॅबिलोनमधून सुटका केली.

८, ९. मशीहाच्या येण्याविषयी आणि स्वर्गीय राज्याच्या स्थापनेविषयी दानीएलाच्या भविष्यवाण्या कशा प्रकारे दाखवतात की यहोवा “प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणारा देव आहे?

देवाच्या प्राचीन काळातील लोकांसंबंधी आणखी एक भविष्यवाणी पाहू या. यहुदी लोकांची बॅबिलोनमधून सुटका होण्याच्या सुमारे दोन वर्षांआधी देवाने दानीएल संदेष्ट्याद्वारे असे घोषित केले की जेरूसलेम शहराच्या पुनर्बांधणीची आज्ञा देण्यात आल्यावर ४८३ वर्षांनी मशीहा प्रकट होईल. मेद व पारसच्या राजाने इ.स.पू. ४५५ मध्ये ही आज्ञा दिली. यानंतर बरोबर ४८३ वर्षांनी म्हणजे इ.स. २९ मध्ये नासरेथच्या येशूला त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले आणि अशा रीतीने तो मशीहा बनला. *नहे. २:१, ५-८; दानी. ९:२४, २५; लूक ३:१, २, २१, २२.

आता देवाच्या राज्याबद्दल बायबलमध्ये काय भाकीत करण्यात आले होते त्याकडे लक्ष द्या. बायबल भविष्यवाणीद्वारे असे सुचवण्यात आले होते की मशीही राज्य १९१४ साली स्वर्गात स्थापन केले जाईल. उदाहरणार्थ, बायबलमध्ये येशूच्या उपस्थितीचे “चिन्ह” देण्यात आले होते आणि असे सांगण्यात आले होते की त्या वेळी सैतानाला स्वर्गातून खाली फेकल्यामुळे पृथ्वीवर भयानक घटना घडतील. (मत्त. २४:३-१४; प्रकटी. १२:९, १२) शिवाय, १९१४ मध्येच “परराष्ट्रीयांची सद्दी संपेल” आणि मशीही राज्य स्वर्गात शासन करू लागेल हेदेखील बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते.—लूक २१:२४; दानी. ४:१०-१७. *

१०. भविष्यात कोणत्या घटना त्यांच्या नियुक्‍त वेळी अवश्‍य घडतील?

१० लवकरच येशूने भाकीत केलेले “मोठे संकट” येणार आहे. त्यानंतर त्याचे हजार वर्षांचे शासन सुरू होईल. या गोष्टी त्यांच्या नियुक्‍त वेळी घडतील याविषयी तिळमात्र शंका नाही. येशूने पृथ्वीवर असताना म्हटले, की या घटना घडण्याचा दिवस व घटका केवळ पित्याला माहीत आहे. त्याअर्थी यहोवाने आधीपासूनच तो दिवस व घटका ठरवली होती.—मत्त. २४:२१, ३६; प्रकटी. २०:६.

“वेळेचा सदुपयोग करा”

११. आपण शेवटल्या काळात राहत आहोत हे समजल्यामुळे आपल्यावर कोणता प्रभाव पडला पाहिजे?

११ राज्य शासन स्वर्गात सुरू झाले आहे आणि आपण अंतसमयात जगत आहोत हे समजल्यामुळे आपल्यावर कोणता प्रभाव पडला पाहिजे? (दानी. १२:४) जगाची बिघडत चाललेली परिस्थिती पाहूनही काही जण हे मान्य करत नाहीत की या घटनांद्वारे शेवटल्या काळाविषयी बायबलमध्ये केलेल्या भविष्यवाणीची पूर्णता होत आहे. आज ना उद्या ही जागतिक व्यवस्था कोलमडून पडेल अशी अपेक्षा कदाचित ते करत असतील; किंवा मग असे मानत असतील की मानवांना जगात शांती व सुरक्षितता स्थापण्यात यश येईल. (१ थेस्सलनी. ५:३) पण आपल्याविषयी काय? आपल्याला माहीत आहे की आपण सैतानाच्या जगाच्या अगदी शेवटल्या काळात राहत आहोत. तर मग, “प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या यहोवा देवाची सेवा करण्यासाठी आणि इतरांनाही त्याच्याविषयी जाणून घेण्यास मदत करण्यासाठी आपण या उर्वरित वेळेचा उपयोग करू नये का? (२ तीम. ३:१) वेळेचा उपयोग करण्यासंबंधी आपण सुज्ञतेने निर्णय घेतले पाहिजेत.—इफिसकर ५:१५-१७ वाचा.

१२. येशूने नोहाच्या दिवसांविषयी केलेल्या विधानातून आपण काय शिकू शकतो?

१२ “वेळेचा सदुपयोग” करणे सोपे नाही कारण या जगात आपले लक्ष विचलित करणाऱ्‍या अनेक गोष्टी आहेत. येशूने इशारा दिला होता, “नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.” नोहाच्या दिवसांत कशी परिस्थिती होती? त्या काळातील जगाचा अंत होईल असे भाकीत करण्यात आले होते. दुष्ट मानवांचा एका जागतिक जलप्रलयात नाश होईल असे सांगण्यात आले होते. नोहाने “नीतिमत्त्वाचा उपदेशक” या नात्याने विश्‍वासूपणे त्याच्या काळातील लोकांना देवाचा संदेश सांगितला. (मत्त. २४:३७; २ पेत्र २:५) पण ते “खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही.” म्हणूनच येशूने आपल्या अनुयायांना असा इशारा दिला: “सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्त. २४:३८, ३९, ४४) आपण नोहाच्या काळातील लोकांप्रमाणे नव्हे, तर नोहाप्रमाणे असले पाहिजे. तर मग, सिद्ध किंवा तयार असण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१३, १४. मनुष्याच्या पुत्राच्या येण्याची वाट पाहत असताना, यहोवाबद्दल कोणती गोष्ट आठवणीत ठेवल्यामुळे आपल्याला त्याची सेवा विश्‍वासूपणे करत राहण्यास साहाय्य मिळेल?

१३ मनुष्याचा पुत्र, आपल्याला कल्पना नाही अशा घटकेस येणार असला, तरीसुद्धा यहोवा हा महान कालनियंता आहे हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. त्याचे वेळापत्रक हे जगातील घटनांवर व मानवी योजनांवर अवलंबून नाही. यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी विशिष्ट घटना अमुक वेळी आणि अमुक पद्धतीने घडवून आणू शकतो. (दानीएल २:२१ वाचा.) नीतिसूत्रे २१:१ तर आपल्याला असे सांगते: “राजाचे मन पाटांच्या पाण्याप्रमाणे परमेश्‍वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवितो.”

१४ यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आणि तो नियुक्‍त वेळी घडवून आणण्यासाठी घटनांना हवे तसे वळण देऊ शकतो. आज जगातील अनेक मोठमोठ्या घडामोडी बायबलमधील भविष्यवाणीनुसार घडून येत आहेत. उदाहरणार्थ, देवाच्या राज्याची सुवार्ता सबंध जगात गाजविली जाण्याविषयीची भविष्यवाणी आज मोठ्या प्रमाणात पूर्ण होत आहे. सोव्हिएट संघाच्या विघटनामुळे जे मोठे बदल घडून आले त्यांविषयी विचार करा. इतक्या कमी काळात एवढे मोठे राजकीय बदल घडणे शक्य आहे असे कदाचित कोणालाही वाटले नसेल. पण हे बदल घडून आल्यामुळे पूर्वी जेथे प्रचार कार्यावर बंदी होती अशा अनेक देशांत आज सुवार्तेचा प्रचार केला जात आहे. तर मग, “प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या देवाची विश्‍वासूपणे सेवा करण्यासाठी आपण वेळेचा सदुपयोग करत राहू या.

यहोवावर विश्‍वास ठेवा

१५. संघटनेकडून काही फेरबदल सुचवले जातात तेव्हा आपण यहोवावर विश्‍वास असल्याचे कसे दाखवू शकतो?

१५ या शेवटल्या काळात राज्य प्रचाराचे कार्य करत राहण्यासाठी यहोवावर विश्‍वास असणे आणि तो योग्य वेळी सर्वकाही घडवून आणेल हा भरवसा बाळगणे गरजेचे आहे. जगाची परिस्थिती बदलत असल्यामुळे, शिष्य बनवण्याचे कार्य करण्याच्या पद्धतीतही काही बदल करण्याची गरज पडू शकते. राज्य प्रचारक या नात्याने आपले कार्य साध्य करण्यासाठी देवाची संघटना आपल्याला वेळोवेळी काही फेरबदल करायला सांगू शकते. असे फेरबदल करण्यास सांगितले जाते तेव्हा आपण पूर्ण सहकार्य दिले पाहिजे. असे केल्यास, “प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या यहोवा देवावर आपल्याला पूर्ण विश्‍वास असल्याचे आपण दाखवू. तसेच, “मंडळीचे मस्तक” असलेल्या त्याच्या पुत्राच्या नेतृत्वाखाली आपण एकनिष्ठपणे सेवा करत आहोत हेदेखील दाखवू.—इफिस. ५:२३.

१६. यहोवा योग्य वेळी आपल्याला आवश्‍यक साहाय्य पुरवेल असा भरवसा आपण का बाळगू शकतो?

१६ आपण यहोवाला मनापासून प्रार्थना करावी आणि तो योग्य वेळी आपल्याला आवश्‍यक असलेले साहाय्य पुरवेल असा पक्का भरवसा बाळगावा अशी त्याची इच्छा आहे. (इब्री ४:१६) यावरून, त्याला आपल्यापैकी प्रत्येकाबद्दल प्रेम व काळजी आहे हे दिसून येत नाही का? (मत्त. ६:८; १०:२९-३१) यहोवा देवाला नियमितपणे प्रार्थना करून साहाय्याची विनंती करण्याद्वारे आणि आपल्या प्रार्थनांच्या आणि त्याच्या मार्गदर्शनाच्या अनुरूप कार्य करण्याद्वारे आपण त्याच्यावर विश्‍वास असल्याचे दाखवतो. शिवाय, आपल्या बांधवांसाठीही प्रार्थना करण्यास आपण विसरू नये.

१७, १८. (क) यहोवा लवकरच त्याच्या शत्रूंविरुद्ध कोणती कारवाई करेल? (ख) आपण कोणती घोडचूक करण्याचे टाळले पाहिजे?

१७ ही “अविश्‍वासामुळे” डळमळण्याची नव्हे, तर “विश्‍वासाने सबळ” होण्याची वेळ आहे. (रोम. ४:२०) येशूने आपल्यावर राज्य प्रचाराचे कार्य सोपवले आहे. पण देवाचे शत्रू—सैतान आणि त्याच्या प्रभावाखाली असलेले—हे कार्य थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. (मत्त. २८:१९, २०) अर्थात, दियाबलाने कोणत्याही प्रकारे हल्ला केला तरीसुद्धा यहोवा “सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचा तारणारा” जिवंत देव आहे हे आपल्याला माहीत आहे. “भक्‍तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे” हे त्याला चांगले ठाऊक आहे.—१ तीम. ४:१०; २ पेत्र २:९.

१८ लवकरच यहोवा या दुष्ट जगाचा नाश करेल. हे कशा प्रकारे आणि केव्हा घडेल यासंबंधी सर्व माहिती आणि त्याची नेमकी वेळ आपल्याला सांगण्यात आलेली नाही. तरीसुद्धा, आपल्याला हे नक्की माहीत आहे की ख्रिस्त अगदी योग्य वेळी देवाच्या सर्व शत्रूंचा नाश करेल आणि यहोवाचे सार्वभौमत्व कायमचे सिद्ध केले जाईल. तर मग, आज आपण ज्या काळात जगत आहोत त्याचे महत्त्व न ओळखणे ही केवढी मोठी चूक ठरेल! “सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे” असा विचार करण्याची घोडचूक आपण कधीही करू नये.—१ थेस्सलनी. ५:१; २ पेत्र ३:३, ४.

वाट पाहत राहा

१९, २०. आपण यहोवाची वाट का पाहत राहावी?

१९ यहोवाने मानवांना निर्माण केले तेव्हा त्याची अशी इच्छा होती की त्यांनी सर्वकाळ जगावे आणि त्याच्याबद्दल व त्याने निर्माण केलेल्या सुंदर सृष्टीबद्दल शिकत राहावे. उपदेशक ३:११ म्हणते: “आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तू [देवाने] सुंदर बनविली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.”

२० मानवांकरता असलेला यहोवाचा मूळ उद्देश त्याने बदललेला नाही ही किती आनंदाची गोष्ट आहे. (मला. ३:६) देव “छायेसारखा बदलत नाही.” (याको. १:१७, मराठी कॉमन लँग्वेज) मानव पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या आधारावर वेळ ठरवतात. पण देवाचे वेळापत्रक अशा गोष्टींवर आधारित नाही. यहोवा “सनातन” राजा आहे. (१ तीम. १:१७) म्हणून आपले तारण करणाऱ्‍या देवाची आपण वाट पाहत राहू या. (मीखा ७:७) “अहो परमेश्‍वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा; तुमचे मन धीर धरो.”—स्तो. ३१:२४.

[तळटीपा]

^ परि. 8 बायबल नेमके काय शिकवते? यातील पृष्ठे १९७-१९९ पाहा.

^ परि. 9 बायबल नेमके काय शिकवते? यातील पृष्ठे २१५-२१८ पाहा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९ पानांवरील चित्र]

देवाने केलेल्या भविष्यवाण्या पूर्ण होतील यावर दानीएलाला भरवसा होता

[२१ पानांवरील चित्र]

यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्ही वेळेचा सदुपयोग करता का?