व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

“परमेश्‍वराच्या दृष्टीने त्याच्या भक्‍तांचे मरण अमोल आहे,” ते कोणत्या अर्थाने?

▪ देवाच्या प्रेरणेने एका स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “परमेश्‍वराच्या दृष्टीने त्याच्या भक्‍तांचे मरण अमोल आहे.” (स्तो. ११६:१५) यहोवाकरता त्याच्या प्रत्येक निष्ठावान सेवकाचे जीवन अनमोल आहे. पण, वर उद्धृत केलेल्या स्तोत्र ११६ मधील शब्दांमध्ये एखाद्या व्यक्‍तीच्या मृत्यूपेक्षाही जास्त गोवलेले आहे.

एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती मृत्यूच्या वेळी यहोवाला एकनिष्ठ असली, तरीसुद्धा अशा व्यक्‍तीच्या स्मृतीप्रीत्यर्थ भाषण देताना स्तोत्र ११६:१५ मधील शब्द तिच्यावर लागू करणे योग्य नाही. का? कारण, तेथे स्तोत्रकर्त्याने जे म्हटले त्याचा व्यापक अर्थ आहे. त्या शब्दांचा अर्थ होतो, की यहोवाच्या नजरेत त्याच्या एकनिष्ठ सेवकांचा संपूर्ण समूह इतका मौल्यवान आहे की तो त्यांचा नाश होऊ देणार नाही.—स्तोत्र ७२:१४; ११६:८ पाहा.

स्तोत्र ११६:१५ आपल्याला आश्‍वासन देते, की यहोवा कधीही या पृथ्वीवरून त्याच्या एकनिष्ठ सेवकांना एक समूह या नात्याने पूर्णपणे नाश होऊ देणार नाही. खरेतर, आपल्या आधुनिक इतिहासावरून दिसून येते की आपण अतिशय खडतर परीक्षांचा आणि छळाचा धीराने सामना केला आहे. त्यावरून हा स्पष्ट पुरावा मिळतो, की देव कधीच आपले समूळ उच्चाटन होण्याची परवानगी देणार नाही.

यहोवाजवळ अमर्याद सामर्थ्य असल्यामुळे आणि त्याचा उद्देश कधीही फोल ठरत नसल्यामुळे, एक समूह या नात्याने तो आपले अस्तित्व मिटू देणार नाही. देवाने असे घडू दिले, तर त्याचे शत्रू त्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्यशाली आहेत असे भासेल. तसेच, या पृथ्वीवर यहोवाचे एकनिष्ठ सेवक राहावेत हा त्याचा उद्देश असफल ठरेल; आणि असे घडणे शक्यच नाही. (यश. ४५:१८; ५५:१०, ११) इतकेच काय, जर यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात त्याची उपासना करायला मनुष्य नसतील, तर पृथ्वीवरील त्याची पवित्र सेवा बंद होईल! नव्या आकाशाच्या शासनाखाली नव्या पृथ्वीचा पाया बनण्याकरता या गोलार्धावर नीतिमान मानवांचा समाज उरणार नाही. (प्रकटी. २१:१) शिवाय, पृथ्वीवर प्रजा नसल्यास, ख्रिस्ताचे हजार वर्षांचे शासन वास्तवात उतरू शकणार नाही.—प्रकटी. २०:४, ५.

देवाने जर त्याच्या शत्रूंना त्याच्या लोकांच्या संपूर्ण समूहाला या पृथ्वीवरून समूळ नाश करण्याची परवानगी दिली, तर त्याचे पद व प्रतिष्ठा यांवर प्रश्‍नचिन्ह लागेल. त्याने आपल्या लोकांचा नाश होऊ दिल्यास, या विश्‍वाचा सार्वभौम या नात्याने त्याच्या पदाला कलंक लागेल. शिवाय, यहोवाला स्वतःविषयी व त्याच्या पवित्र नावाविषयी आदर असल्यामुळे, तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना एक समूह या नात्याने मृत्यूच्या हवाली करणार नाही. आणि याचा विचार करा: देवाच्या “ठायी अनीती नाही,” त्यामुळे एकनिष्ठपणे त्याची सेवा करणाऱ्‍या समूहातील मानवांचे रक्षण करण्यास तो कधीही चुकणार नाही. (अनु. ३२:४; उत्प. १८:२५) शिवाय, देवाने त्याच्या सेवकांचा एक समूह या नात्याने नाश होऊ दिल्यास, हे त्याच्या वचनाच्या विरुद्ध ठरेल. त्याचे वचन म्हणते: “परमेश्‍वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.” (१ शमु. १२:२२) हो, यहोवा “आपल्या लोकांचा त्याग करणार नाही; तो आपले वतन सोडून देणार नाही.”—स्तो. ९४:१४.

यहोवाचे लोक या पृथ्वीवरून कधीच नाश पावणार नाहीत हे जाणून किती दिलासा मिळतो! तर मग, आपण नेहमी देवाला एकनिष्ठ राहू या, आणि त्याने दिलेल्या वचनावर भरवसा ठेवू या: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील. परमेश्‍वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे.”—यश. ५४:१७.

[२२ पानांवरील चित्र]

देव कधीही त्याच्या लोकांचा समूळ नाश होऊ देणार नाही