व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुज्ञ वयस्कांचा माझ्यावर चांगला प्रभाव पडला

सुज्ञ वयस्कांचा माझ्यावर चांगला प्रभाव पडला

जीवन कथा

सुज्ञ वयस्कांचा माझ्यावर चांगला प्रभाव पडला

एल्वा जेर्डी यांच्याद्वारे कथित

सुमारे सत्तर वर्षांपूर्वी एका पाहुण्यानं माझ्या वडिलांना सुचवलेल्या एका गोष्टीमुळं माझं जीवन पार बदलून गेलं. त्या महत्त्वाच्या दिवसानंतर इतरही अनेक लोकांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. आणि मला अशी एक मैत्री लाभली जिचं मोल इतर सर्व नात्यांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला खुलासा करून सांगते.

माझा जन्म १९३२ साली सिड्‌नी, ऑस्ट्रेलिया इथं झाला. माझ्या आईवडिलांचा देवावर विश्‍वास होता पण ते चर्चला जात नव्हते. आई मला शिकवायची की देव नेहमी आपल्याला बघत असतो आणि जर का मी दंगामस्ती केली तर तो लगेच मला शिक्षा करेल. यामुळं मला देवाची भीती वाटू लागली. तरीपण, बायबलविषयी माझ्या मनात कुतूहल होतं. शनिवार-रविवारी माझी मावशी आमच्या घरी यायची तेव्हा ती मला बायबलमधल्या छानछान गोष्टी सांगायची. त्यामुळं, केव्हा मावशी येईल आणि मला गोष्टी सांगेल असं मला व्हायचं.

मी तेरा-चौदा वर्षांची असताना बाबा मला पुस्तकांच्या एका संचातून वाचून दाखवायचे. आईनं ही पुस्तकं यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेल्या एका आजीकडून आणली होती. त्या ख्रिस्ती प्रकाशनांतून वाचलेल्या माहितीमुळं बाबा इतके प्रभावित झाले की ते साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागले. एका संध्याकाळी बायबल अभ्यास सुरू असताना बाबांनी मला चोरून त्यांचं बोलणं ऐकताना पकडलं. ते मला पुन्हा झोपायला जायला सांगणार, तेवढ्यात त्यांचा अभ्यास घेण्यासाठी आमच्या घरी आलेला पाहुणा म्हणाला, “एल्वालाही अभ्यासाला बसू द्या, काय हरकत आहे?” त्यांनी असं सुचवल्यामुळं माझ्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली; एका नव्या मैत्रीची, अर्थात खरा देव यहोवा याच्यासोबतच्या मैत्रीची ती सुरुवात ठरली.

लवकरच बाबा व मी ख्रिस्ती सभांना जाऊ लागलो. सभांमध्ये जे शिकायला मिळालं त्यामुळं बाबांनी त्यांच्या जीवनात बरेच बदल केले. त्यांनी आपल्या तापट स्वभावावरही नियंत्रण मिळवलं. हे पाहिल्यावर आई आणि माझा मोठा भाऊ फ्रँकसुद्धा सभांना येऊ लागला. * आम्ही चौघांनीही प्रगती केली आणि काही काळानं आम्ही बाप्तिस्मा घेऊन यहोवाच्या साक्षीदारांत सामील झालो. तेव्हापासून माझ्या जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक वयस्क बंधुभगिनींच्या मैत्रीचा माझ्यावर खूप चांगला प्रभाव पडला.

करियर निवडताना

किशोरवयात मी आमच्या मंडळीच्या अनेक वयस्क बंधुभगिनींशी मैत्री केली होती. ॲलिस प्लेस ही वयस्क बहीणही त्यांच्यापैकी एक होती. तिनंच पहिल्यांदा आमच्या कुटुंबाला भेट दिली होती. अगदी स्वतःची नात असल्याप्रमाणं ती माझा लाड करायची. ॲलिस आजीनं मला प्रचार कार्य कसं करायचं ते शिकवलं आणि बाप्तिस्मा घेण्याचं प्रोत्साहन दिलं. वयाच्या १५ व्या वर्षी मी बाप्तिस्मा घेण्याचं ध्येय गाठलं.

तसंच, पर्सी व मॅज [मार्गरेट्‌] डनहम या वयस्क जोडप्याशीही माझी घट्ट मैत्री होती. त्यांच्या सहवासामुळं माझ्या भविष्यावर बराच मोठा प्रभाव पडला. त्याचं काय आहे, की मला गणित विषयाची खूप गोडी होती. आणि पुढं चालून गणित शिकवायचं हे माझं स्वप्न होतं. पर्सी आणि मॅज यांनी १९३० च्या दशकात लॅट्‌विया इथं मिशनरी सेवा केली होती. युरोपात दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा त्यांना ऑस्ट्रेलियात सिड्‌नी शहराच्या एका उपनगरात असलेल्या बेथेलमध्ये येऊन सेवा करण्याचं आमंत्रण देण्यात आलं. पर्सी आणि मॅज यांनी माझ्याबद्दल खूप आस्था दाखवली. मिशनरी सेवा करत असताना त्यांना आलेले अनेक रोमांचक अनुभव त्यांनी सांगितले. ते ऐकून मला स्पष्टपणे जाणीव झाली की गणित शिकवण्यापेक्षा लोकांना बायबलचं ज्ञान दिल्यामुळं नक्कीच मला जीवनात जास्त समाधान लाभेल. म्हणून मग मी मिशनरी होण्याचं ठरवलं.

मिशनरी सेवेची तयारी करण्यासाठी डनहम दांपत्यानं मला पायनियर सेवा करण्याचा सल्ला दिला. सिड्‌नीच्या आमच्या हर्ट्‌झविल मंडळीत दहा तरुण बंधुभगिनी आनंदाने पायनियर सेवा करत होते. १९४८ साली, मीही वयाच्या १६ व्या वर्षी त्यांच्यासोबत पायनियर सेवा करू लागले.

पुढच्या चार वर्षांत मी न्यू साउथ वेल्स आणि क्वीन्सलंडच्या आणखी चार शहरांत पायनियर सेवा केली. माझ्या सर्वात पहिल्या बायबल विद्यार्थ्यांपैकी एक होती बेट्टी लॉ (आता तिचे आडनाव रेम्नंट आहे). माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेली बेट्टी अतिशय प्रेमळ स्वभावाची होती. नंतर ती काउरा नावाच्या शहरात माझी पायनियर सोबतीण बनली. हे शहर सिड्‌नीच्या पश्‍चिमेकडे २३० किलोमीटरच्या अंतरावर आहे. आम्ही अगदी थोडाच काळ सोबत मिळून पायनियर सेवा केली असली, तरी बेट्टी व मी अजूनही मैत्रिणी आहोत.

खास पायनियर सेवेची नेमणूक मिळाल्यावर मी काउरापासून दक्षिण-पश्‍चिम दिशेला २२० किलोमीटर अंतरावर असलेल्या नरॅनडरा या शहरात राहायला गेले. जॉय लेनॉक्स (आता तिचं आडनाव हंटर आहे) माझी नवी पायनियर सोबतीण होती. ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती आणि एक आवेशी पायनियर होती. आमच्या दोघींशिवाय त्या शहरात एकही यहोवाचा साक्षीदार नव्हता. जॉय व मी, रे आणि एस्तर आयन्स नावाच्या एका अगत्यशील दांपत्याकडे खोली घेऊन राहू लागलो. त्या दोघांना, तसंच त्यांचा मुलगा आणि तीन मुली यांना सत्याबद्दल आस्था होती. रे आणि त्यांचा मुलगा आठवडाभर शहराबाहेर असलेल्या एका गव्हाच्या शेतात काम करायचे, जेथे मेंढरंही पोसली जायची. तर, एस्तर व मुली घरी राहून पेइंग गेस्ट्‌सची व्यवस्था पाहायच्या. दर रविवारी जॉय व मी भरपूर मांस भाजून आयन्स कुटुंब आणि त्यांच्याकडे राहणाऱ्‍या दहा-बारा पेइंग गेस्ट्‌ससाठी जेवण बनवायचो. ती माणसं रेल्वेत मजूर म्हणून काम करत असल्यामुळं भरपूर जेवायची. दर रविवारी स्वयंपाक करून दिल्यामुळं आम्हाला थोडं कमी घरभाडं द्यावं लागायचं. सगळी आवराआवर झाल्यानंतर आम्ही आयन्स कुटुंबाला अतिशय रुचकर असं आध्यात्मिक जेवण वाढायचो—आठवड्याचा टेहळणी बुरूज अभ्यास. रे, एस्तर आणि त्यांची चार मुलं सत्यात आली आणि ते नरॅनडरा मंडळीचे पहिले सदस्य बनले.

१९५१ मध्ये मी सिड्‌नी इथं यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनाला गेले. अधिवेशनात मिशनरी सेवा करू इच्छिणाऱ्‍या पायनियरांसाठी घेण्यात आलेल्या एका खास सभेला मी उपस्थित राहिले. एका मोठ्या तंबूत भरवण्यात आलेल्या या सभेला ३०० पेक्षा जास्त जण आले होते. ब्रुकलिन बेथेलहून आलेल्या नेथन नॉर यांनी सभेत भाषण दिलं आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत सुवार्तेचा प्रचार करण्याची तातडीची गरज असल्याचं सांगितलं. आम्ही त्यांचा शब्दन्‌शब्द लक्ष देऊन ऐकत होतो. त्या सभेला उपस्थित राहिलेल्या पायनियरांपैकी अनेकांनी नंतर दक्षिण पॅसिफिक व इतर क्षेत्रांत राज्य प्रचाराचं काम सुरू केलं. मला इतर १६ ऑस्ट्रेलियन बंधुभगिनींसोबत १९५२ साली होणार असलेल्या गिलियड प्रशालेच्या १९ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण देण्यात आलं. मला खूप आनंद झाला. मिशनरी सेवेत उतरण्याचं माझं स्वप्न वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी पूर्ण होणार होतं!

दृष्टिकोन सुधारण्याची गरज होती तेव्हा

गिलियड इथं मिळालेल्या शिक्षणामुळं व सहवासामुळं बायबलच्या माझ्या ज्ञानात भर पडून माझा विश्‍वास तर मजबूत झालाच, पण माझ्या व्यक्‍तिमत्त्वावरही या प्रशालेचा मोठा प्रभाव पडला. मी तरुण आणि आदर्शवादी असल्यामुळं, एक विशिष्ट वागण्याची पद्धतच योग्य आहे असा माझा ग्रह होता. माझे काही विचार खूपच अवाजवी होते. उदाहरणार्थ, एकदा मी बंधू नॉर यांना बेथेलच्या काही तरुणांसोबत बेसबॉल खेळताना पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला.

गिलियडचे प्रशिक्षक हे कित्येक वर्षांचा अनुभव गाठीशी असणारे अतिशय समंजस बांधव होते. त्यामुळं काही गोष्टींशी जुळवून घ्यायला मला त्रास होतोय हे त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यांनी माझ्याबद्दल आस्था दाखवून मला माझ्या विचारसरणीत बदल करायला मदत केली. हळूहळू मला जाणीव झाली की यहोवा हा एक कठोर आणि अवाजवी अपेक्षा करणारा देव नसून आपल्या सेवकांची कदर करणारा एक प्रेमळ देव आहे. माझ्या काही वर्गसोबत्यांनीही मला साहाय्य केलं. मला आठवतं, एक बहीण मला म्हणाली: “एल्वा, यहोवा काही चाबूक घेऊन बसलेला नाही. स्वतःशी इतकं कडक वागू नकोस!” तिच्या या साध्या शब्दांचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला.

गिलियड प्रशाला पूर्ण केल्यानंतर, मला व माझ्या इतर चार वर्गसोबत्यांना आफ्रिकेतील नामिबिया इथं नेमण्यात आलं. काही काळातच आम्ही सर्व जण मिळून ८० बायबल अभ्यास चालवत होतो. नामिबियातील मिशनरी जीवनात मी खूप आनंदी होते. पण दरम्यान, मी गिलियडमधल्या एका वर्गसोबत्याच्या प्रेमात पडले होते. त्याला स्वित्झर्लंड इथं नेमण्यात आलं होतं. नामिबियात एक वर्ष राहिल्यानंतर आमची मागणी झाली आणि मी स्वित्झर्लंडला राहायला गेले. लग्न झाल्यानंतर आम्ही पती-पत्नी विभागीय कार्य करू लागलो.

एका दुःखद समस्येला तोंड देताना

विभागीय कार्यात पाच वर्षं आनंदानं सेवा केल्यानंतर आम्हाला स्वित्झर्लंड बेथेलमध्ये सेवा करायला आमंत्रित करण्यात आलं. तिथल्या बेथेल कुटुंबात अनेक आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या वयस्क बंधुभगिनींचा सहवास लाभल्यामुळे मला खूप आनंद झाला.

पण याच्या थोड्याच काळानंतर माझ्या जीवनात एक धक्कादायक घटना घडली. माझ्या पतीनं माझ्याशी आणि यहोवाशी अविश्‍वासूपणा केल्याचं मला कळलं. मग ते मला सोडून निघून गेले. माझ्यावर आभाळच कोसळलं! त्या वेळी, बेथेल कुटुंबातल्या माझ्या प्रिय वयस्क बंधुभगिनींचं प्रेम आणि आधार मिळाला नसता, तर मी त्या धक्क्यातून कसे सावरले असते कुणास ठाऊक! मला जेव्हाही कुणाजवळ मन मोकळं करावसं वाटायचं तेव्हा ते माझं ऐकून घ्यायचे. तसंच मला विश्रांतीची गरज असायची तेव्हा ते मला विश्रांती घेऊ द्यायचे. मी कमालीची हताश व दुःखी असतानाच्या त्या काळात त्यांच्या सांत्वनदायक शब्दांमुळं आणि प्रेमळ कृत्यांमुळं मला खूप आधार मिळाला आणि मी यहोवाच्या आणखी जवळ आले.

स्वतः अनेक परीक्षांना तोंड दिलेल्या सुज्ञ वयस्क बंधुभगिनींनी अनेक वर्षांपूर्वी काढलेले उद्‌गार आठवल्यामुळेही मला सांत्वन मिळालं. उदाहरणार्थ मॅज डनहम हिचे शब्द मला आठवले. एकदा ती मला म्हणाली होती: “एल्वा, यहोवाची सेवा करताना तुला अनेक कठीण परीक्षांना तोंड द्यावं लागेल, पण सर्वात कठीण परीक्षा तुझ्या सर्वात जवळच्या माणसांकडून येऊ शकतात हे लक्षात ठेव. अशा परीक्षा येतील तेव्हा यहोवाच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न कर. तू त्याची सेवा करत आहेस, अपरिपूर्ण मानवांची नव्हे, हे नेहमी आठवणीत असू दे!” मॅजनं दिलेल्या त्या सल्ल्यानं मला कित्येकदा निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं. मी मनाशी ठरवलं की माझ्या पतीनं केलेल्या चुकांमुळं मी यहोवाशी असलेला माझा नातेसंबंध कधीच तुटू देणार नाही.

काही काळानं मी माझ्या कुटुंबाच्या जवळ राहून पायनियर सेवा करण्याच्या विचारानं ऑस्ट्रेलियाला परत जायचं ठरवलं. घरी परतण्याच्या समुद्रप्रवासात माझ्यासोबत प्रवास करत असलेल्या एका गटासोबत मी बायबलच्या विषयांवर नियमितपणे चर्चा करत असे. त्या गटात ऑर्नी जेर्डी नावाचा एक नॉर्वीजियन माणूसदेखील होता. मी सांगितलेल्या गोष्टी त्याला आवडल्या. नंतर ऑर्नी मला व माझ्या कुटुंबाला भेट द्यायला सिड्‌नीला आला. त्यानं फार कमी काळात उत्तम आध्यात्मिक प्रगती केली आणि तो सत्यात आला. १९६३ साली ऑर्नीशी माझं लग्न झालं आणि दोन वर्षांनी आमचा मुलगा, गॅरी याचा जन्म झाला.

आणखी एका दुःखाला सामोरं जाताना

ऑर्नी, गॅरी व मी आमच्या कौटुंबिक जीवनात अतिशय आनंदी होतो. लवकरच ऑर्नीनं आमचं घर वाढवलं आणि माझे आईबाबाही आमच्यासोबत राहू लागले. पण, लग्नाला सहा वर्षं झाल्यानंतर आमच्यावर एका वेगळ्या स्वरूपाचं संकट कोसळलं. ऑर्नींना मेंदूचा कर्करोग असल्याचं निदान झालं. बराच काळ त्यांच्यावर रेडिएशन उपचार सुरू असताना मी दररोज त्यांना भेटायला रुग्णालयात जायचे. काही काळ त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला, पण नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना पक्षाघात झाला. ते फक्‍त काही आठवडेच जगतील असं डॉक्टरांनी सांगितलं. पण असं काही घडलं नाही. काही काळानं ते घरी परत आले आणि मी त्यांची सेवा करू लागले. हळूहळू, त्यांची प्रकृती सुधारली. काही काळानं ते पुन्हा चालू लागले आणि पूर्वीप्रमाणे मंडळीचे वडील म्हणून काम करायलाही त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या हसतमुख स्वभावाचं आणि विनोदबुद्धीचं त्यांची प्रकृती सुधारण्यात बरंच योगदान होतं आणि त्यांच्या अशा स्वभावामुळं आजारपणात त्यांची काळजी घेणं मला फारसं कठीण गेलं नाही.

अनेक वर्षांनी, १९८६ साली ऑर्नींची प्रकृती पुन्हा खालावली. तोपर्यंत माझ्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं आमच्या मित्रपरिवाराच्या जवळपास राहता यावं म्हणून आम्ही सिड्‌नीच्या बाहेरील ब्लू माउंटन्सच्या सुंदर परिसरात राहायला गेलो. काही काळानं गॅरीनं, कॅरिन नावाच्या एका आध्यात्मिक मनोवृत्तीच्या सुस्वभावी मुलीशी लग्न केलं. आम्ही सर्वांनी सोबतच राहावं असं त्या दोघांनी सुचवल्यामुळं, काही महिन्यांतच आम्ही सर्व, ऑर्नी व मी जिथं राहत होतो तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या एका घरात राहायला गेलो.

ऑर्नींचा मृत्यू होण्याआधी जवळजवळ दीड वर्ष ते अंथरुणाला खिळले होते आणि त्यांची सतत काळजी घ्यावी लागायची. त्या काळात मला घराबाहेर पडणं शक्य नसल्यामुळं मी दररोज दोन तास बायबलचा व बायबल आधारित प्रकाशनांचा अभ्यास करायची. या अभ्यासातून माझ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मला पुष्कळ उपयुक्‍त माहिती मिळाली. तसंच, आमच्या मंडळीतले काही वयस्क बंधुभगिनी आम्हाला भेटायला यायचे. त्यांच्यापैकी काहींनी अशाच प्रकारच्या परीक्षांना तोंड दिलं होतं. त्यांच्या भेटींमुळं मला खूप प्रोत्साहन मिळायचं! २००३ सालच्या एप्रिल महिन्यात ऑर्नींचा मृत्यू झाला. पुनरुत्थानाच्या आशेवर त्यांचा पूर्ण भरवसा होता.

माझा सर्वात मोठा आधार

तरुणपणी मी आदर्शवादी होते. पण जीवनात आपण अपेक्षा केल्याप्रमाणे सहसा घडून येत नाही याचा मला प्रत्यय आला. मला कित्येक आशीर्वाद मिळाले, पण दोन अतिशय दुःखद घटना माझ्या जीवनात घडल्या. एका जोडीदाराला अविश्‍वासूपणामुळं तर दुसऱ्‍याला आजारामुळं मी गमावलं. जीवनाच्या प्रवासात मला कित्येक लोकांकडून मार्गदर्शन व सांत्वन लाभलं. पण माझा सर्वात मोठा आधार आजही “पुराणपुरुष” यहोवा देवच आहे. (दानी. ७:९) त्याच्या मार्गदर्शनानं माझ्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार दिला आणि मिशनरी कार्यात अनेक समाधानदायी अनुभव मला मिळू शकले. जीवनात समस्या उद्‌भवल्या तेव्हा यहोवापासून लाभणाऱ्‍या सांत्वनाने माझ्या जिवाचं समाधान केलं. (स्तो. ९४:१८, १९) शिवाय, मला माझ्या कुटुंबाचं आणि संकटांत मदतीला धावून येणाऱ्‍या स्नेह्‍यांचंही प्रेम आणि आधार लाभला. (नीति. १७:१७) यांपैकी बहुतेक सुज्ञ वयस्क जन होते.

कुलप्रमुख ईयोब यानं म्हटलं, “वृद्धाच्या ठायी ज्ञान असते; दीर्घायु मनुष्याच्या ठायी समज असतो.” (ईयो. १२:१२) मागं वळून पाहताना, ईयोबाचे हे शब्द अगदी खरे आहेत असं मी म्हणेन. सुज्ञ वयस्क जनांच्या सल्ल्यामुळं मला साहाय्य मिळालं, त्यांच्या सांत्वनानं मला आधार दिला आणि त्यांच्या मैत्रीनं माझं जीवन समृद्ध झालं. त्यांच्याशी मैत्री केल्याबद्दल मी फार समाधानी आहे.

आज मी ८० वर्षांची असून स्वतः वयस्कांपैकी एक आहे. मला आलेल्या अनुभवांमुळं मी इतर वृद्ध जनांच्या गरजांबद्दल अधिक संवेदनशील बनले आहे. आजही त्यांना भेटायला जायला, त्यांना साहाय्य करायला मला आवडतं. पण मला तरुणांचाही सहवास आवडतो. त्यांचा सळसळणारा उत्साह इतरांनाही उत्साही बनवतो. कुणीही तरुण माझा सल्ला किंवा आधार मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असं जाणवल्यास त्यांना मदत करण्यात मला खूप आनंद वाटतो.

[तळटीप]

^ परि. 7 एल्वा यांचा भाऊ फ्रँक लँबर्ट यांनी ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागांत एक आवेशी पायनियर म्हणून सेवा केली. त्यांच्या अनेक रोमांचक प्रचार मोहिमांपैकी एका मोहिमेचे वर्णन, यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८३ सालच्या वार्षिकपुस्तकातील पृष्ठे ११०-११२ वर केले आहे.

[१४ पानांवरील चित्र]

नरॅनडरा इथं जॉय लेनॉक्ससोबत पायनियर सेवा करताना

[१५ पानांवरील चित्र]

१९६० साली स्वित्झर्लंडच्या बेथेल कुटुंबातील सदस्यांसोबत एल्वा

[१६ पानांवरील चित्र]

ऑर्नींच्या आजारपणात त्यांची देखभाल करताना