व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या” यहोवा प्रकट करतो

“ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या” यहोवा प्रकट करतो

“ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या” यहोवा प्रकट करतो

“येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण: हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले.”—प्रकटी. १:१.

तुमचे उत्तर काय असेल?

विशाल पुतळ्याचे कोणते भाग अँग्लो-अमेरिकन महासत्तेला सूचित करतात?

अँग्लो-अमेरिकन महासत्ता आणि संयुक्‍त राष्ट्रे यांच्यातील संबंधाचे योहान कशा प्रकारे चित्रण करतो?

मानवी सरकारांच्या अंताविषयी दानीएल व योहान यांनी कशा प्रकारे वर्णन केले आहे?

१, २. (क) दानीएल व योहानाच्या भविष्यवाण्यांमुळे आपल्याला काय समजण्यास साहाय्य मिळते? (ख) श्‍वापदाची पहिली सहा डोकी कशास सूचित करतात?

 दानीएल व योहान यांच्या भविष्यवाण्या अनेक बाबतींत एकमेकांशी जुळतात. त्यांच्या साहाय्याने सध्याच्या काळात व भविष्यात घडणाऱ्‍या बऱ्‍याच जागतिक घडामोडींचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. तर मग, योहानाने पाहिलेला श्‍वापदाचा दृष्टान्त; दहा शिंगे असलेल्या हिंस्र श्‍वापदाविषयीचा दानीएलाचा अहवाल; आणि विशाल पुतळ्याचा दानीएलाने सांगितलेला अर्थ यांची तुलना केल्याने आपण काय शिकू शकतो? आणि या भविष्यवाण्यांची स्पष्ट समज मिळाल्यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे?

योहानाने पाहिलेल्या श्‍वापदाच्या दृष्टान्ताचा विचार करू या. (प्रकटी., अध्या. १३) आपण मागील लेखात पाहिल्याप्रमाणे, श्‍वापदाची पहिली सहा डोकी इजिप्त, अश्‍शूर, बॅबिलोन, मेद व पारस, ग्रीस, आणि रोम यांना सूचित करतात. या सर्वांनी स्त्रीच्या संततीशी द्वेषपूर्ण व्यवहार केला. (उत्प. ३:१५) योहानाने या दृष्टान्ताविषयी लिहिल्यानंतर अनेक शतकांपर्यंत सहाव्या डोक्याचे म्हणजे रोमन साम्राज्याचे जगात वर्चस्व होते. कालांतराने, रोमची जागा सातवे डोके घेणार होते. ते सातवे डोके कोणती जागतिक महासत्ता असल्याचे सिद्ध झाले, आणि त्या महासत्तेने स्त्रीच्या संततीशी कसा व्यवहार केला?

ब्रिटन आणि अमेरिका सत्तेवर येतात

३. दहा शिंगे असलेले भयानक श्‍वापद कशास सूचित करते, आणि दहा शिंगे कशास सूचित करतात?

योहानाच्या दृष्टान्ताची तुलना दानीएलाने पाहिलेल्या दहा शिंगांच्या भयानक श्‍वापदाच्या दृष्टान्ताशी केल्यास प्रकटीकरण १३ व्या अध्यायातील श्‍वापदाचे सातवे डोके कशास सूचित करते हे आपण ओळखू शकतो. * (दानीएल ७:७, ८, २३, २४ वाचा.) दानीएलाने पाहिलेले श्‍वापद रोमन साम्राज्याला सूचित करते. (पृष्ठे १२-१३ वरील तक्‍ता पाहा.) इ.स. पाचव्या शतकात रोमन साम्राज्य विभाजित व्हायला सुरुवात झाली. त्या भयानक श्‍वापदाच्या डोक्यावरील दहा शिंगे रोमन साम्राज्यातून उदयास आलेल्या राज्यांना सूचित करतात.

४, ५. (क) लहानशा शिंगाने काय केले? (ख) श्‍वापदाच्या सातव्या डोक्याची ओळख काय आहे?

भयानक श्‍वापदाच्या डोक्यातून निघालेल्या चार शिंगांविषयी म्हणजे राज्यांविषयी खास उल्लेख करण्यात आला आहे. आणखी एका लहानशा शिंगामुळे तीन शिंगे समूळ उपटली गेली. पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग असलेले ब्रिटन सत्तेवर आले. सतराव्या शतकापर्यंत ब्रिटन तितके प्रभावशाली नव्हते. पूर्वी रोमन साम्राज्याचे भाग असलेले स्पेन, नेदरलँड्‌झ, आणि फ्रान्स हे देश ब्रिटनपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रभावशाली होते. ब्रिटनने एकेक करून या देशांना सत्तेवरून पाडले. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, ब्रिटन जगावर सत्ता गाजवणारे साम्राज्य बनण्याच्या मार्गावर होते. पण, ब्रिटन अद्याप श्‍वापदाचे सातवे डोके बनले नव्हते.

ब्रिटनने जगावर वर्चस्व गाजवायला सुरुवात तर केली, पण उत्तर अमेरिकेतील वसाहती ब्रिटनपासून वेगळ्या झाल्या. असे असले, तरी ब्रिटनने आपल्या नौदलाचे संरक्षण देण्याद्वारे अमेरिकेला प्रभावशाली बनू दिले. १९१४ मध्ये प्रभूचा दिवस सुरू झाला तोपर्यंत ब्रिटनने इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य उभे केले होते आणि अमेरिका जगातील सर्वात मोठी औद्योगिक शक्‍ती बनली होती. * पहिल्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने ब्रिटनसोबत एक खास मैत्री जोडली. अशा रीतीने अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता उदयास आली. हेच श्‍वापदाचे सातवे डोके होते. या सातव्या डोक्याने स्त्रीच्या संततीशी कसा व्यवहार केला?

६. सातव्या डोक्याने देवाच्या लोकांशी कसा व्यवहार केला?

प्रभूचा दिवस सुरू झाल्यानंतर काही काळातच सातव्या डोक्याने देवाच्या लोकांवर—पृथ्वीवर उरलेल्या ख्रिस्ताच्या बांधवांवर हल्ला केला. (मत्त. २५:४०) येशूने सूचित केले होते, की त्याच्या उपस्थितीदरम्यान स्त्रीच्या संततीचा उरलेला भाग या पृथ्वीवर क्रियाशील असेल. (मत्त. २४:४५-४७; गलती. ३:२६-२९) त्या पवित्र जनांविरुद्ध अँग्लो-अमेरिकन महासत्तेने युद्ध केले. (प्रकटी. १३:३, ७) त्या महासत्तेने पहिल्या महायुद्धादरम्यान देवाच्या लोकांवर जुलूम केला, त्यांच्या काही प्रकाशनांवर बंदी घातली, आणि विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाच्या प्रतिनिधींना तुरुंगात टाकले. श्‍वापदाच्या सातव्या डोक्याने काही काळाकरता प्रचार कार्य जवळजवळ थांबवले होते. यहोवाने या नाट्यमय घटनेला आधीपासूनच पाहिले आणि त्याविषयी योहानाला प्रकट केले. देवाने योहानाला हेही सांगितले, की संततीच्या दुय्यम भागाचे पुनरुज्जीवन होईल आणि तो आध्यात्मिक कार्यांत पुन्हा आवेशाने भाग घेईल. (प्रकटी. ११:३, ७-११) या घटना घडल्याचे यहोवाच्या सेवकांच्या आधुनिक काळातील इतिहासावरून स्पष्टपणे दिसून येते.

अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता आणि लोखंड व मातीची पावले

७. श्‍वापदाचे सातवे डोके व दानीएलाच्या दृष्टान्तातील विशाल पुतळा यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?

श्‍वापदाचे सातवे डोके व दानीएलाच्या दृष्टान्तातील विशाल पुतळा यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? ब्रिटन आणि एका अर्थाने अमेरिका हे राष्ट्रसुद्धा रोमन साम्राज्यातून उदयास आले. पण, पुतळ्याच्या पावलांविषयी काय म्हणता येईल? पावले ही लोखंड व मातीच्या मिश्रणाने बनली आहेत असे वर्णन केले आहे. (दानीएल २:४१-४३ वाचा.) हे वर्णन, सातवे डोके म्हणजेच अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता उदयास येते त्या काळाशी जुळते. ज्या प्रकारे लोखंड व मातीच्या मिश्रणाने बनलेले एखादे बांधकाम भरीव लोखंडाने बनलेल्या बांधकामापेक्षा कमजोर असते, त्याच प्रकारे अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता ज्या साम्राज्यातून उदयास आली त्यापेक्षा कमजोर आहे. अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता कशामुळे कमजोर बनली?

८, ९. (क) सातव्या जागतिक महासत्तेने कशा प्रकारे लोखंडासमान शक्‍ती प्रदर्शित केली? (ख) पुतळ्याच्या पावलांतील माती कशास सूचित करते?

श्‍वापदाच्या सातव्या डोक्याने काही वेळा लोखंडासमान वैशिष्ट्ये प्रदर्शित केली. उदाहरणार्थ, पहिल्या महायुद्धात विजय मिळवण्याद्वारे त्याने आपली शक्‍ती सिद्ध केली. दुसऱ्‍या महायुद्धादरम्यानही सातव्या डोक्याची लोखंडासमान शक्‍ती स्पष्टपणे दिसली. * त्या युद्धानंतरही, सातव्या डोक्याने अधूनमधून लोखंडासमान शक्‍ती प्रदर्शित केली. असे असले, तरी बऱ्‍याच पूर्वीपासून त्या लोखंडात माती मिसळलेली होती.

यहोवाच्या सेवकांनी बऱ्‍याच काळापासून पुतळ्याच्या पावलांचा लाक्षणिक अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. लोखंड व मातीच्या मिश्रणाचे वर्णन दानीएल २:४१ मध्ये अनेक राज्ये असे नव्हे, तर एक “राज्य” असे केले आहे. त्यामुळे, माती हे अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या अशा घटकांना सूचित करते जे या साम्राज्याला लोखंडासमान असलेल्या रोमन साम्राज्यापेक्षा कमजोर बनवतात. माती हे लोकांना म्हणजे सर्वसामान्य जनतेला सूचित करते. (दानी. २:४३) अँग्लो-अमेरिकन साम्राज्यात नागरिक हक्कांच्या चळवळी, कामगार संघटना, आणि स्वातंत्र्यासाठी आंदोलने यांद्वारे लोकांनी आपल्या हक्कांची मागणी केली आहे. हे सर्वसामान्य लोक अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेला लोखंडासमान शक्‍तीने कार्य करण्यापासून रोखतात. तसेच, राजकीय पुढाऱ्‍यांची विचारसरणी वेगवेगळी असल्यामुळे आणि निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे त्यांचा प्रभाव कमकुवत झाला आहे. परिणामस्वरूप, त्यांना त्यांची धोरणे प्रभावीपणे अंमलात आणणे शक्य होत नाही. दानीएलाने असे पूर्वभाकीत केले होते: “ते राज्य अंशतः बळकट व अंशतः भंगुर असे होईल.”—दानी. २:४२; २ तीम. ३:१-३.

१०, ११. (क) पावलांचे भविष्यात काय होईल? (ख) पावलांच्या बोटांविषयी आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो?

१० ब्रिटन आणि अमेरिकेने अनेकदा जागतिक घडामोडींमध्ये एकत्र कार्य करण्याद्वारे एकविसाव्या शतकातही आपली खास मैत्री कायम ठेवली आहे. विशाल पुतळ्याच्या आणि श्‍वापदाच्या भविष्यवाण्या हे दाखवून देतात, की भविष्यात अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेची जागा इतर कोणतीही महासत्ता घेणार नाही. लोखंडाच्या पायांनी चित्रित केलेल्या महासत्तेपेक्षा ही शेवटची महासत्ता कमजोर असली, तरी तिचा नाश आपोआप होणार नाही.

११ पुतळ्याच्या दृष्टान्तात पावलांच्या बोटांची संख्या काही खास अर्थ सूचित करते का? हे विचारात घ्या: दानीएलाने पाहिलेल्या इतर दृष्टान्तांत त्याने विशिष्ट संख्यांचा उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ, त्याने विविध श्‍वापदांच्या डोक्यांवर किती शिंगे आहेत याचा उल्लेख केला. या संख्यांचा खास अर्थ आहे. पण, पुतळ्याचे वर्णन करताना दानीएल पावलांना किती बोटे आहेत याचा उल्लेख करत नाही. म्हणून, पुतळ्याचे बाहू, हात, हाताची बोटे, पाय आणि पावले यांच्या संख्येचा ज्याप्रमाणे काही विशिष्ट अर्थ नाही, त्याचप्रमाणे पावलांच्या बोटांच्या संख्येचाही या दृष्टान्तात काही विशिष्ट अर्थ असल्याचे दिसत नाही. अर्थात, पावलांची बोटे ही लोखंड व मातीच्या मिश्रणाने बनली आहेत या गोष्टीचा दानीएल खास उल्लेख करतो. दानीएलाच्या वर्णनावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो, की देवाच्या राज्याला सूचित करणारा “पाषाण” पुतळ्याच्या पावलांवर आदळेल तेव्हा अँग्लो-अमेरिकन महासत्ताच जगात वर्चस्व गाजवत असेल.—दानी. २:४५.

अँग्लो-अमेरिका आणि दोन शिंगांचे श्‍वापद

१२, १३. दोन शिंगांचे श्‍वापद कशास सूचित करते, आणि ते काय करते?

१२ अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता ही लोखंड व मातीच्या मिश्रणाने बनलेली असली, तरी येशूने योहानाला दिलेल्या दृष्टान्तांतून दिसून येते, की शेवटल्या दिवसांदरम्यान ही महासत्ता एक महत्त्वाची भूमिका बजावेल. ती कशी? योहानाने दोन शिंगे असलेल्या व अजगराप्रमाणे बोलणाऱ्‍या एका श्‍वापदाचा दृष्टान्त पाहिला. हे विचित्र श्‍वापद कशास सूचित करते? श्‍वापदाला दोन शिंगे आहेत, त्यामुळे ही दोन राष्ट्रांनी बनलेली एक संयुक्‍त सत्ता आहे. योहान येथे पुन्हा एकदा अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेलाच पाहत आहे, पण एका खास भूमिकेत.—प्रकटीकरण १३:११-१५ वाचा.

१३ दोन शिंगांचे हे श्‍वापद सात डोक्यांच्या श्‍वापदाची मूर्ती करण्याचे प्रोत्साहन देते. योहानाने लिहिले की श्‍वापदाची मूर्ती उदयास येईल, नाहीशी होईल, आणि पुन्हा प्रकट होईल. जगातील राष्ट्रांमध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याच्या हेतूने ब्रिटन आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने ज्या संघटनेची स्थापना करण्यात आली होती तिच्या बाबतीत नेमके हेच घडले. * पहिल्या महायुद्धानंतर ही संघटना उदयास आली आणि तिला राष्ट्र संघ असे म्हणण्यात आले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ही संघटना नाहीशी झाली. त्या युद्धादरम्यान, देवाच्या लोकांनी घोषणा केली होती की प्रकटीकरणातील भविष्यवाणीनुसार श्‍वापदाची मूर्ती पुन्हा प्रकट होईल. आणि हे खरे ठरले; संयुक्‍त राष्ट्रे या संघटनेच्या रूपात ती मूर्ती खरोखरच पुन्हा प्रकट झाली.—प्रकटी. १७:८.

१४. कोणत्या अर्थाने श्‍वापदाची मूर्ती हा “आठवा राजा” आहे?

१४ योहानाने त्या श्‍वापदाच्या मूर्तीचे वर्णन “आठवा राजा” असे केले. कोणत्या अर्थाने? मूळ श्‍वापदाचे आठवे डोके असे या आठव्या राजाला चित्रित करण्यात आलेले नाही. हा आठवा राजा श्‍वापदाची केवळ मूर्ती आहे. या राजाजवळ जो काही अधिकार आहे तो केवळ त्याच्या सदस्य राष्ट्रांकडून, प्रामुख्याने अँग्लो-अमेरिका या त्याच्या मुख्य समर्थकाकडून मिळालेला आहे. (प्रकटी. १७:१०, ११) पण, त्याला राजा या नात्याने एक विशिष्ट कार्य करण्याचा अधिकार देण्यात येतो. या कार्यामुळे इतिहासाला कलाटणी देणाऱ्‍या घटनांची मालिका सुरू होते.

श्‍वापदाची मूर्ती वेश्‍येचा नाश करते

१५, १६. वेश्‍या कशास सूचित करते, आणि तिला मिळणाऱ्‍या पाठिंब्याविषयी काय म्हणता येईल?

१५ योहानाने सांगितल्यानुसार, एक लाक्षणिक वेश्‍या एका किरमिजी रंगाच्या श्‍वापदावर—श्‍वापदाच्या मूर्तीवर—बसून त्याच्यावर अधिकार चालवते. तिच्यावर “मोठी बाबेल” हे नाव लिहिलेले आहे. (प्रकटी. १७:१-६) ही वेश्‍या सर्व खोट्या धर्मांचे, आणि प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसचे उचित प्रतीक आहे. धार्मिक संघटनांनी श्‍वापदाच्या मूर्तीला आपला पाठिंबा दिला आहे आणि तिच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

१६ पण, प्रभूच्या दिवसादरम्यान, मोठ्या बाबेलचे पाणी बऱ्‍याच प्रमाणात आटले आहे, म्हणजेच लोकांकडून तिला मिळणारा पाठिंबा कमी झाला आहे. (प्रकटी. १६:१२; १७:१५) उदाहरणार्थ, श्‍वापदाची मूर्ती पहिल्यांदा प्रकट झाली, तेव्हा ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसचा—मोठ्या बाबेलच्या प्रभावशाली भागाचा—पाश्‍चिमात्य जगावर मोठा पगडा होता. आज, चर्चेसनी व पाळकांनी लोकांचा आदर व पाठिंबा गमावला आहे. खरेतर, पुष्कळ लोकांचे मानणे आहे, की अनेक संघर्षांना धर्मच कारणीभूत आहे. पाश्‍चिमात्य देशांतील उग्रवादी विचारसरणीचे काही बुद्धिजीवी, समाजावर असलेला धर्माचा प्रभाव नाहीसा करण्याची जोरदार मागणी करत आहेत.

१७. लवकरच खोट्या धर्माचे काय होईल, आणि का?

१७ पण, खोट्या धर्माचा नाश आपोआप होणार नाही. सत्तेवर असलेल्या राष्ट्रांच्या मनात देव जोपर्यंत त्याची इच्छा घालत नाही तोपर्यंत वेश्‍या आपला प्रभाव दाखवत राहील; आणि राष्ट्रांना तिच्या इच्छेनुसार करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत राहील. (प्रकटीकरण १७:१६, १७ वाचा.) यहोवा लवकरच संयुक्‍त राष्ट्राद्वारे प्रतिनिधित्व केल्या जाणाऱ्‍या सैतानाच्या जगातील राजकीय शक्‍तींना खोट्या धर्मावर हल्ला करायला लावेल. ते तिचा प्रभाव व वैभव नाहीसे करतील. अशी घटना घडेल यावर काही दशकांपूर्वी कदाचित कोणाचाच विश्‍वास बसला नसता. पण आज, वेश्‍या किरमिजी रंगाच्या श्‍वापदाच्या पाठीवर हेलकावे खात आहे. असे असले, तरी ती श्‍वापदाच्या पाठीवरून हळूहळू घसरणार नाही. तर, तिचा पाडाव अचानक व एका झटक्यात होईल.—प्रकटी. १८:७, ८, १५-१९.

श्‍वापदांचा अंत होतो

१८. (क) श्‍वापद काय करेल, आणि त्याचा परिणाम काय होईल? (ख) दानीएल २:४४ या वचनानुसार देवाचे राज्य कोणत्या राज्यांचा नाश करते? (पृष्ठ १७ वरील चौकट पाहा.)

१८ खोट्या धर्माचा नाश झाल्यानंतर, श्‍वापदाला म्हणजेच सैतानाच्या पृथ्वीवरील राजकीय यंत्रणेला देवाच्या राज्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले जाईल. स्वर्गापर्यंत पोचणे अशक्य असल्यामुळे, पृथ्वीवर जे देवाच्या राज्याचे समर्थन करतात त्यांच्यावर पृथ्वीवरील राजांचा क्रोध भडकेल. याचा परिणाम एकच असेल—देवासोबतचे शेवटले युद्ध. (प्रकटी. १६:१३-१६; १७:१२-१४) दानीएलाने या युद्धाच्या एका पैलूचे वर्णन केले. (दानीएल २:४४ वाचा.) या युद्धात प्रकटीकरण १३:१ मध्ये उल्लेख केलेल्या श्‍वापदाचा, त्याच्या मूर्तीचा, आणि दोन शिंगांच्या श्‍वापदाचा नाश होईल.

१९. आपण कोणती खातरी बाळगू शकतो आणि ही काय करण्याची वेळ आहे?

१९ आज आपण सातवे डोके ज्याला सूचित करते त्या महासत्तेच्या काळात राहत आहोत. या श्‍वापदाचा समूळ नाश होण्याअगोदर आता त्याच्यावर आणखी डोकी प्रकट होणार नाहीत. खोट्या धर्माचा नाश केला जाईल तेव्हा जगावर अँग्लो-अमेरिकन महासत्तेचेच वर्चस्व असेल. दानीएल व योहान यांच्या भविष्यवाण्यांतील अगदी बारीकसारीक तपशीलही पूर्ण झाले आहेत. लवकरच खोट्या धर्माचा अंत होऊन हर्मगिदोनाची लढाई सुरू होईल ही खातरी आपण बाळगू शकतो. देवाने या सर्व गोष्टी घडण्याअगोदरच प्रकट केल्या आहेत. आपण या भविष्यसूचक इशाऱ्‍यांकडे लक्ष देणार का? (२ पेत्र १:१९) यहोवाचा पक्ष घेऊन त्याच्या राज्याला आपला पाठिंबा दर्शवण्याची हीच वेळ आहे.—प्रकटी. १४:६, ७.

[तळटीपा]

^ परि. 3 बायबलमध्ये, दहा ही संख्या सहसा संपूर्ण समूहाला सूचित करते. येथे ही संख्या रोमन साम्राज्यातून उदयास आलेल्या सर्व राज्यांना सूचित करते.

^ परि. 5 ब्रिटिश साम्राज्य व अमेरिका हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात होते. पण, योहानाच्या दृष्टान्तावरून दिसते की प्रभूच्या दिवसाच्या सुरुवातीला ते जागतिक महासत्तेच्या रूपात उदयास येतील. खरेतर, प्रकटीकरण पुस्तकात नमूद असलेल्या दृष्टान्तांची पूर्तता प्रभूच्या दिवसादरम्यान होते. (प्रकटी. १:१०) पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली तोपर्यंत सातव्या डोक्याने संयुक्‍तपणे जागतिक महासत्ता म्हणून कार्य सुरू केले नव्हते.

^ परि. 8 त्या युद्धात हा राजा किती भयंकर विनाश करेल हे दानीएलाने दृष्टान्तात पाहिले होते. त्याने लिहिले: “तो विलक्षण नाश करील.” (दानी. ८:२४) उदाहरणार्थ, अमेरिकेने अँग्लो-अमेरिकन महासत्तेच्या शत्रूंवर दोन अणुबॉम्ब टाकण्याद्वारे अभूतपूर्व प्रमाणावर भयंकर नाश घडवून आणला.

^ परि. 13 प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!, पृष्ठे २४०, २४१, २५३ पाहा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चौकट]

दानीएल २:४४ मध्ये उल्लेख केलेली सर्व राज्ये कोणत्या राष्ट्रांना सूचित करतात?

दानीएल २:४४ मधील भविष्यवाणीनुसार देवाचे राज्य “या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील.” ही भविष्यवाणी केवळ पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांनी चित्रित करण्यात आलेल्या राज्यांच्या संदर्भात आहे.

तर मग, इतर मानवी सरकारांविषयी काय? याच घटनेविषयी सांगणारी प्रकटीकरणातील भविष्यवाणी आपल्याला अधिक माहिती देते. त्या भविष्यवाणीनुसार “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांस” यहोवाविरुद्ध लढण्याकरता एकत्र केले जाईल. (प्रकटी. १६:१४; १९:१९-२१) त्याअर्थी, हर्मगिदोनात फक्‍त पुतळ्याद्वारे सूचित होणाऱ्‍या राज्यांचाच नव्हे, तर इतर सर्व मानवी सरकारांचाही नाश केला जाईल.