व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“रहस्य प्रकट करणारा देव” यहोवा

“रहस्य प्रकट करणारा देव” यहोवा

“रहस्य प्रकट करणारा देव” यहोवा

“देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्‍वर आहे आणि . . . तो रहस्य प्रकट करणारा देव आहे.”—दानी. २:४७.

तुमचे उत्तर काय असेल?

यहोवाने भविष्याविषयी आपल्याला कोणते तपशील प्रकट केले आहेत?

श्‍वापदाची पहिली सहा डोकी कशास सूचित करतात?

श्‍वापद आणि नबुखदनेस्सराने पाहिलेला विशाल पुतळा यांत काय संबंध आहे?

१, २. यहोवाने आपल्याला काय प्रकट केले आहे, आणि त्याने असे का केले आहे?

 देवाचे राज्य मानवी सरकारांचा अंत करेल तेव्हा या पृथ्वीवर प्रामुख्याने कोणत्या सरकारांचे आधिपत्य असेल? आपल्याला उत्तर माहीत आहे—“रहस्य प्रकट करणारा देव” यहोवा याने ते आपल्याला प्रकट केले आहे. ती सरकारे कोणती असतील हे ओळखण्यास देव आपल्याला दानीएल संदेष्ट्याच्या आणि प्रेषित योहानाच्या लिखाणांद्वारे साहाय्य करतो.

यहोवाने दानीएल व योहान यांना अनेक दृष्टान्त दाखवले, ज्यांत त्यांना एकापाठोपाठ एक प्रकट होणारी श्‍वापदे दिसली. तसेच, यहोवाने दानीएलाला धातूच्या एका विशाल पुतळ्याच्या भविष्यसूचक दृष्टान्ताचा अर्थदेखील सांगितला. यहोवाने आज आपल्या फायद्याकरता हे अहवाल बायबलमध्ये नमूद करवून सुरक्षित ठेवले आहेत. (रोम. १५:४) देवाचे राज्य लवकरच सर्व मानवी सरकारांचा नाश करेल ही आपली आशा आणखी दृढ व्हावी म्हणून त्याने असे केले आहे.—दानी. २:४४.

३. बायबलमधील भविष्यवाण्या तंतोतंतपणे समजण्यासाठी आपण सर्वात आधी काय समजून घेणे गरजेचे आहे, आणि का?

दानीएलाच्या व योहानाच्या अहवालांचे एकत्र परीक्षण केल्याने आपल्याला आठ राजांची किंवा मानवी सरकारांची ओळख तर पटतेच, शिवाय ही सरकारे कोणत्या क्रमाने प्रकट होतील हेदेखील आपल्याला कळते. पण, या भविष्यवाण्या तंतोतंतपणे समजण्यासाठी आपण आधी बायबलमध्ये नमूद असलेल्या सर्वात पहिल्या भविष्यवाणीचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. असे का? कारण, त्या भविष्यवाणीची पूर्तता हाच सबंध बायबलचा विषय आहे. खरेतर, या भविष्यवाणीवरच इतर सर्व भविष्यवाण्या आधारित आहेत असे आपण म्हणू शकतो.

सापाची संतती आणि श्‍वापद

४. स्त्रीच्या संततीत कोणाचा समावेश होतो, आणि ही संतती काय करेल?

एदेन बागेत झालेल्या बंडाळीनंतर, यहोवाने असे वचन दिले की एक “स्त्री,” “संतती” उत्पन्‍न करेल. * (उत्पत्ति ३:१५ वाचा.) ही संतती कालांतराने सापाचे, सैतानाचे डोके फोडेल. यहोवाने नंतर प्रकट केले की ही संतती अब्राहामाच्या वंशातून आणि इस्राएल राष्ट्रातून येईल. तसेच, ही संतती यहुदी असेल व दावीद राजाची वंशज असेल असेही प्रकट करण्यात आले. (उत्प. २२:१५-१८; ४९:१०; स्तो. ८९:३, ४; लूक १:३०-३३) या संततीचा प्रमुख भाग ख्रिस्त येशू असल्याचे स्पष्ट झाले. (गलती. ३:१६) ख्रिस्ती मंडळीतील आत्म्याने अभिषिक्‍त सदस्य या संततीचा दुय्यम भाग आहेत. (गलती. ३:२६-२९) येशू आणि या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे मिळून देवाचे राज्य बनते. या राज्याद्वारे देव सैतानाचा नाश करेल.—लूक १२:३२; रोम. १६:२०.

५, ६. (क) दानीएल आणि योहानाने किती महासत्तांविषयी सांगितले? (ख) प्रकटीकरणात सांगितलेल्या श्‍वापदाची डोकी कशास सूचित करतात?

एदेन बागेतील त्या पहिल्या भविष्यवाणीत सांगण्यात आले की सैतानदेखील एक “संतती” उत्पन्‍न करेल. त्याची संतती स्त्रीच्या संततीचा द्वेष करेल असे सांगण्यात आले. तर मग, सापाची संतती कोण आहे? जे सैतानाप्रमाणे देवाचा द्वेष करतात आणि देवाच्या लोकांचा विरोध करतात ते सर्व सैतानाच्या संततीचा भाग आहेत. सबंध इतिहासादरम्यान, सैतानाने त्याच्या संततीला वेगवेगळ्या राजकीय गटांमध्ये, किंवा साम्राज्यांमध्ये संघटित केले आहे. (लूक ४:५, ६) पण, त्यांच्यापैकी केवळ काहीच मानवी सरकारांनी देवाच्या लोकांवर, म्हणजेच एकतर इस्राएल राष्ट्रावर किंवा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीवर मोठा प्रभाव पाडला आहे. ही गोष्ट इतकी महत्त्वाची का आहे? कारण, दानीएल आणि योहान यांच्या दृष्टान्तांमध्ये एकूण आठ महासत्तांचेच वर्णन का केले आहे हे त्याद्वारे स्पष्ट होते.

पुनरुत्थान झालेल्या येशूने इ.स. पहिल्या शतकाच्या शेवटीशेवटी प्रेषित योहानाला अनेक रोमांचक दृष्टान्त दाखवले. (प्रकटी. १:१) त्यांपैकी एका दृष्टान्तात दियाबल सैतानाला सूचित करणारा एक अजगर विशाल समुद्राच्या किनाऱ्‍यावर उभा असलेला योहानाला दिसला. (प्रकटीकरण १२:१८; १३:१, २ वाचा.) तसेच, समुद्रातून एक विचित्र श्‍वापद बाहेर आल्याचे व त्याला दियाबलाकडून मोठा अधिकार देण्यात आल्याचेही योहानाने पाहिले. नंतर एका देवदूताने योहानाला सांगितले, की किरमिजी रंगाचा श्‍वापद जो प्रकटीकरण १३:१ मधील श्‍वापदाची मूर्ती आहे, त्याची सात डोकी ही सात राजांना म्हणजे सरकारांना सूचित करतात. (प्रकटी. १३:१४, १५; १७:३, ९, १०) योहानाने या गोष्टी लिहिल्या तेव्हा त्या सरकारांपैकी पाच होऊन गेली होती, एक सत्तेवर होते, आणि एक “अद्याप” सत्तेवर आले नव्हते. या राज्यांना किंवा जागतिक महासत्तांना आपण कसे ओळखू शकतो? त्यासाठी आपण प्रकटीकरणात वर्णन केलेल्या श्‍वापदाच्या प्रत्येक डोक्याविषयी चर्चा करू या. तसेच, यांपैकी अनेक राज्ये अस्तित्वात येण्याच्या कितीतरी शतकांआधी दानीएलाच्या पुस्तकात त्यांच्याविषयी कशा प्रकारे तपशीलवार माहिती देण्यात आली होती त्याविषयीदेखील आपण चर्चा करणार आहोत.

इजिप्त आणि अश्‍शूर —पहिली दोन डोकी

७. पहिले डोके कशास सूचित करते, आणि का?

श्‍वापदाचे पहिले डोके इजिप्तला सूचित करते. का? कारण, इजिप्त ही देवाच्या लोकांशी द्वेषपूर्ण व्यवहार करणारी पहिली महासत्ता होती. स्त्रीची संतती अब्राहामाच्या वंशातून येईल असे अभिवचन देण्यात आले होते. या वंशजांची संख्या इजिप्तमध्ये खूप वाढली तेव्हा इजिप्तने इस्राएलवर जुलूम करण्यास सुरुवात केली. संतती प्रकट होण्याआधीच सैतानाने देवाच्या लोकांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. तो कसा? सैतानाने इस्राएलमधील सर्व मुलग्यांना मारून टाकण्यासाठी इजिप्तच्या फारोला प्रेरित केले. यहोवाने सैतानाचा हा प्रयत्न निष्फळ केला आणि आपल्या लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवले. (निर्ग. १:१५-२०; १४:१३) नंतर, देवाने इस्राएली लोकांना प्रतिज्ञात देशात वसवले.

८. दुसरे डोके कोणास सूचित करते, आणि त्याने काय करण्याचा प्रयत्न केला?

श्‍वापदाचे दुसरे डोके अश्‍शूरला सूचित करते. या महासत्तेनेदेखील देवाच्या लोकांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला. इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्याने मूर्तिपूजा आणि विद्रोह केल्यामुळे यहोवाने त्यांना दंड देण्यासाठी अश्‍शूरचा वापर केला होता हे खरे आहे. पण, अश्‍शूरने नंतर जेरूसलेमवर हल्ला केला. ज्या राजांच्या वंशातून पुढे येशू प्रकट होणार होता तो वंशच पूर्णपणे मिटवून टाकावा असा कदाचित सैतानाचा इरादा असावा. पण, हा हल्ला यहोवाच्या उद्देशाचा भाग नव्हता, आणि त्यामुळे हल्ला करणाऱ्‍यांचा नाश करण्याद्वारे त्याने आपल्या विश्‍वासू लोकांची चमत्कारिक रीत्या सुटका केली.—२ राजे १९:३२-३५; यश. १०:५, ६, १२-१५.

बॅबिलोन—तिसरे डोके

९, १०. (क) यहोवाने बॅबिलोन्यांना काय करण्याची अनुमती दिली? (ख) भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी काय घडणे गरजेचे होते?

योहानाने ज्या श्‍वापदाला पाहिले होते त्याचे तिसरे डोके त्या राज्याला सूचित करते ज्याची राजधानी बॅबिलोन होती. यहोवाने बॅबिलोन्यांना जेरूसलेमचा पाडाव करण्याची व त्याच्या लोकांना बंदी बनवून नेण्याची अनुमती दिली. पण, या अपमानास्पद गोष्टीची अनुमती देण्याआधी, यहोवाने विद्रोही इस्राएली लोकांना असे दुःखद संकट त्यांच्यावर कोसळेल याची ताकीद दिली होती. (२ राजे २०:१६-१८) त्याने भाकीत केले होते, की जेरूसलेममध्ये “परमेश्‍वराच्या सिंहासनावर” बसतात असे ज्या राजांच्या वंशाविषयी म्हटले जायचे त्या वंशाकडून राजपद काढून घेण्यात येईल. (१ इति. २९:२३) पण, यहोवाने हेदेखील वचन दिले होते की ज्याचा “हक्क आहे” असा दावीद राजाच्या वंशातील एक जण आपला अधिकार परत मिळवेल.—यहे. २१:२५-२७.

१० आणखी एका भविष्यवाणीतून सूचित करण्यात आले होते, की मशीहा किंवा अभिषिक्‍त जन येईल त्या वेळी यहुदी लोक अद्यापही जेरूसलेमच्या मंदिरात देवाची उपासना करत असतील. (दानी. ९:२४-२७) इस्राएल लोकांना बॅबिलोनमध्ये बंदीवासात नेण्याआधी करण्यात आलेल्या एका भविष्यवाणीत सांगण्यात आले होते की त्या व्यक्‍तीचा जन्म बेथलेहेम येथे होईल. (मीखा ५:२) या भविष्यवाण्या पूर्ण होण्यासाठी, यहुद्यांची बंदीवासातून सुटका होणे, त्यांनी आपल्या मायदेशी परत जाणे आणि मंदिराची पुनर्बांधणी करणे गरजेचे होते. पण, आपल्या बंदीवानांना मुक्‍त करणे हे बॅबिलोनचे धोरण नव्हते. मग या समस्येवर कशा प्रकारे मात केली जाणार होती? यहोवाने याचे उत्तर आपल्या संदेष्ट्यांना प्रकट केले.—आमो. ३:७.

११. बॅबिलोनचे साम्राज्य कोणकोणत्या प्रकारे चित्रित करण्यात आले आहे? (तळटीप पाहा.)

११ बंदी बनवून बॅबिलोनमध्ये नेलेल्या लोकांमध्ये दानीएल संदेष्टादेखील होता. (दानी. १:१-६) या जागतिक महासत्तेनंतर पुढे एकापाठोपाठ एक सत्तेवर येणाऱ्‍या सरकारांविषयी प्रकट करण्यासाठी यहोवाने त्याचा उपयोग केला. कितीतरी वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करून यहोवाने ही रहस्ये प्रकट केली. उदाहरणार्थ, यहोवाने बॅबिलोनचा राजा नबुखदनेस्सर याला वेगवेगळ्या धातूंनी बनलेल्या एका विशाल पुतळ्याचे स्वप्न दाखवले. (दानीएल २:१, १९, ३१-३८ वाचा.) त्या पुतळ्याचे सोन्याचे डोके बॅबिलोनच्या साम्राज्याला सूचित करते हे दानीएलाद्वारे यहोवाने प्रकट केले. * पुतळ्याची चांदीने बनलेली छाती आणि बाहू यांनी बॅबिलोननंतर येणाऱ्‍या महासत्तेला चित्रित केले. ही कोणती महासत्ता होती, आणि ती देवाच्या लोकांशी कसा व्यवहार करणार होती?

मेद व पारस—चौथे डोके

१२, १३. (क) बॅबिलोनच्या पाडावाविषयी यहोवाने काय प्रकट केले? (ख) प्रकटीकरणातील श्‍वापदाचे चौथे डोके म्हणून मेद व पारसला का चित्रित करण्यात आले आहे?

१२ कोणती महासत्ता बॅबिलोनचा पाडाव करेल याविषयीचा तपशील यहोवाने यशया संदेष्ट्याद्वारे दानीएलाच्या काळाच्या शंभरपेक्षा जास्त वर्षांआधी प्रकट केला होता. बॅबिलोन शहराचा कोणत्या पद्धतीने पाडाव होईल केवळ इतकेच नव्हे, तर पाडाव करणाऱ्‍या राजाविषयीदेखील यहोवाने प्रकट केले. तो होता पारसचा कोरेश. (यश. ४४:२८–४५:२) मेद व पारस या जागतिक महासत्तेविषयी दानीएलाला आणखी दोन दृष्टान्त देण्यात आले. एका दृष्टान्तात, या राज्याचे चित्रण एका अंगावर उभ्या असलेल्या अस्वलासारखे करण्यात आले होते. त्याला “पुष्कळ मांस खा” असे सांगण्यात आले. (दानी. ७:५) आणखी एका दृष्टान्तात, या जागतिक महासत्तेला दोन शिंगे असलेल्या एडक्यासारखे चित्रित करण्यात आल्याचे दानीएलाने पाहिले.—दानी. ८:३, २०.

१३ बॅबिलोनचा पाडाव करण्याद्वारे आणि इस्राएल लोकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याद्वारे भविष्यवाणीची पूर्णता करण्यासाठी यहोवाने मेद व पारस साम्राज्याचा उपयोग केला. (२ इति. ३६:२२, २३) पण, नंतर याच महासत्तेने देवाच्या लोकांचा नाश जवळजवळ केलाच होता. बायबलमधील एस्तेर नावाच्या पुस्तकात सांगितले आहे, की हामान नावाच्या पारसच्या प्रधानमंत्र्याने एक कट रचला. पारसच्या विशाल साम्राज्यात राहणाऱ्‍या सर्व यहुद्यांचा नाश करण्याची त्याने व्यवस्था केली आणि या जातिसंहाराची एक खास तारीखदेखील त्याने ठरवली. पण, केवळ यहोवाने कारवाई केल्यामुळे सैतानाच्या संततीच्या शत्रुत्वापासून पुन्हा एकदा त्याच्या लोकांचे संरक्षण झाले. (एस्ते. १:१-३; ३:८, ९; ८:३, ९-१४) म्हणूनच, प्रकटीकरणातील श्‍वापदाचे चौथे डोके या नात्याने मेद व पारसला चित्रित करण्यात आले ते अगदी उचित आहे.

ग्रीस—पाचवे डोके

१४, १५. प्राचीन ग्रीस साम्राज्याविषयी यहोवाने कोणते तपशील प्रकट केले?

१४ प्रकटीकरणातील श्‍वापदाचे पाचवे डोके ग्रीसला सूचित करते. दानीएलाने नबुखदनेस्सराच्या स्वप्नाचा अर्थ सांगताना याआधी प्रकट केल्याप्रमाणे, याच महासत्तेला पुतळ्याचे पितळेचे पोट व मांड्या यांनी चित्रित करण्यात आले. दानीएलालाही दोन दृष्टान्त मिळाले ज्यांमध्ये या साम्राज्याच्या स्वरूपाविषयी आणि त्याच्या प्रमुख शासकाविषयी उल्लेखनीय माहिती देण्यात आली.

१५ दानीएलाने एका दृष्टान्तात, ग्रीस साम्राज्याला चार पंख असलेल्या एका चित्त्यासारखे चित्रित करण्यात आल्याचे पाहिले. यावरून सूचित होते की ते साम्राज्य झपाट्याने विजय मिळवणार होते. (दानी. ७:६) आणखी एका दृष्टान्तात दानीएलाने वर्णन केले की केवळ एकच प्रमुख शिंग असलेला एक बकरा कशा प्रकारे दोन शिंगे असलेल्या एका एडक्याला म्हणजे मेद व पारसला क्षणार्धात मारून टाकतो. यहोवाने दानीएलाला सांगितले, की बकरा हा ग्रीसला सूचित करतो आणि त्याचे मोठे शिंग हे त्याच्या एका राजाला चित्रित करते. दानीएलाने पुढे लिहिले की मोठे शिंग मोडेल आणि चार लहान शिंगे त्याची जागा घेतील. ही भविष्यवाणी, ग्रीस एक महासत्ता बनण्याच्या शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेली असली, तरी भविष्यवाणीतील प्रत्येक तपशील खरा ठरला. प्राचीन ग्रीसचा सर्वात प्रमुख राजा ॲलेक्झांडर द ग्रेट याने मेद व पारस यांच्याविरुद्ध युद्ध लढले. पण, लवकरच हे शिंग मोडले; म्हणजे हा थोर राजा वयाच्या केवळ ३२ व्या वर्षी सत्तेच्या शिखरावर असताना मरण पावला. कालांतराने त्याचे राज्य त्याच्या चार सेनापतींमध्ये विभाजित झाले.—दानीएल ८:२०-२२ वाचा.

१६. अँटियोकस चौथा याने काय केले?

१६ पारसवर विजय मिळवल्यानंतर, ग्रीसने देवाचे लोक राहत असलेल्या प्रदेशावर राज्य केले. तोपर्यंत, यहुदी लोक प्रतिज्ञात देशात पुन्हा वसले होते आणि त्यांनी जेरूसलेममधील मंदिर पुन्हा बांधले होते. ते अजूनही देवाचे निवडलेले लोक होते आणि पुन्हा बांधलेले मंदिर अद्यापही खऱ्‍या उपासनेचे केंद्र होते. पण, इ.स.पू. दुसऱ्‍या शतकात, ग्रीसने म्हणजे श्‍वापदाच्या पाचव्या डोक्याने देवाच्या लोकांवर हल्ला केला. ॲलेक्झांडरच्या विभाजित साम्राज्याच्या एका उत्तराधिकाऱ्‍याने, अँटियोकस चौथा याने जेरूसलेममधील मंदिराच्या जमिनीवर मूर्तिपूजेसाठी एक वेदी बांधली आणि यहुदी धर्माचे पालन करणे हा मृत्यूदंडास पात्र गुन्हा असल्याचे घोषित केले. सैतानाच्या संततीद्वारे देवाच्या लोकांचा द्वेष करण्याचे हे किती घृणित कृत्य! पण, लवकरच ग्रीसची जागा आणखी एका महासत्तेने घेतली. तर मग, कोणते साम्राज्य श्‍वापदाचे सहावे डोके असणार होते?

रोम—सहावे डोके, “विक्राळ” व “भयानक”

१७. उत्पत्ति ३:१५ च्या पूर्ततेत सहाव्या डोक्याने कोणती महत्त्वाची भूमिका बजावली?

१७ योहानाला श्‍वापदाचा दृष्टान्त देण्यात आला तेव्हा जगावर रोमचे वर्चस्व होते. (प्रकटी. १७:१०) या सहाव्या डोक्याने उत्पत्ति ३:१५ मधील भविष्यवाणीच्या पूर्ततेत एक महत्त्वाची भूमिका बजावली. सैतानाने रोमन अधिकाऱ्‍यांचा वापर करून संततीवर प्रहार केला म्हणजे संततीची “टाच” फोडली, ज्यामुळे संतती तात्पुरत्या काळासाठी जखमी झाली. हे कसे घडले? त्यांनी येशूवर देशद्रोहाचा खोटा आरोप लावून त्याला वधस्तंभावर खिळले. (मत्त. २७:२६) पण, ही जखम लवकरच भरून निघाली, कारण यहोवाने येशूला पुन्हा जिवंत केले.

१८. (क) यहोवाने कोणत्या नवीन राष्ट्राची निवड केली, आणि का? (ख) सापाची संतती कशा प्रकारे स्त्रीच्या संततीचा द्वेष करत राहिली?

१८ इस्राएलच्या धर्मगुरूंनी रोमी लोकांसोबत मिळून येशूविरुद्ध कट रचला; इस्राएल राष्ट्रातील बहुतेक लोकांनीदेखील त्याला नाकारले. त्यामुळे, यहोवाने इस्राएल राष्ट्राचा आपले लोक या नात्याने त्याग केला. (मत्त. २३:३८; प्रे. कृत्ये २:२२, २३) त्याने आता एका नवीन राष्ट्राला, देवाच्या इस्राएलाला त्याचे लोक म्हणून निवडले. (गलती. ३:२६-२९; ६:१६) ते नवीन राष्ट्र अभिषिक्‍त जनांची मंडळी होती, ज्यात यहुदी व यहुदीतर लोकांचा समावेश होता. (इफिस. २:११-१८) येशूचा मृत्यू व पुनरुत्थान झाल्यावरही, सापाची संतती स्त्रीच्या संततीचा द्वेष करत राहिली. रोमने अनेकदा, ख्रिस्ती मंडळीचा म्हणजे स्त्रीच्या संततीच्या दुय्यम भागाचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला. *

१९. (क) दानीएल सहाव्या जागतिक महासत्तेचे वर्णन कसे करतो? (ख) दुसऱ्‍या एका लेखात कशाची चर्चा केली जाईल?

१९ दानीएलाने नबुखदनेस्सराच्या ज्या स्वप्नाचा अर्थ सांगितला होता त्यातील पुतळ्याचे लोखंडाचे पाय हे रोमला चित्रित करतात. (दानी. २:३३) तसेच, दानीएलाने पाहिलेल्या एका दृष्टान्तात केवळ रोमन साम्राज्याचेच नव्हे, तर रोममधून उदयास येणाऱ्‍या पुढील जागतिक महासत्तेचेदेखील वर्णन करण्यात आले आहे. (दानीएल ७:७, ८ वाचा.) कितीतरी शतकांपर्यंत, रोम हे त्याच्या शत्रूंच्या दृष्टीत “विक्राळ, भयानक व अतिशयित बळकट” साम्राज्य होते. पण, भविष्यवाणीत सांगण्यात आले होते, की या साम्राज्यातून “दहा शिंगे” निघतील आणि त्यांपैकी खासकरून एक शिंग वर्चस्व गाजवेल. ही दहा शिंगे कशास सूचित करतात, आणि त्या लहान शिंगाची ओळख काय आहे? नबुखदनेस्सराने पाहिलेल्या विशाल पुतळ्याच्या वर्णनाशी या लहान शिंगाचा काय संबंध आहे? पृष्ठ १४ वरील लेख या प्रश्‍नांचे उत्तर देईल.

[तळटीपा]

^ परि. 4 ही स्त्री यहोवाच्या पत्नीसमान संघटनेला सूचित करते. ही संघटना स्वर्गातील आत्मिक प्राण्यांनी बनलेली आहे.—यश. ५४:१; गलती. ४:२६; प्रकटी. १२:१, २.

^ परि. 11 दानीएलाच्या पुस्तकातील पुतळ्याचे डोके आणि प्रकटीकरणात वर्णन केलेल्या श्‍वापदाचे तिसरे डोके हे दोन्ही बॅबिलोनला चित्रित करतात. पृष्ठे १२-१३ वरील तक्‍ता पाहा.

^ परि. 18 रोमने इ.स. ७० मध्ये जेरूसलेमचा नाश केला असला, तरी तो हल्ला उत्पत्ति ३:१५ च्या पूर्ततेचा भाग नव्हता. त्याआधीच, निवडलेले राष्ट्र म्हणून देवाने इस्राएल राष्ट्राला नाकारले होते.

[अभ्यासाचे प्रश्‍न]