सुज्ञ व्हा “कुशल मार्गदर्शन” मिळवा
सुज्ञ व्हा “कुशल मार्गदर्शन” मिळवा
अनेकदा जीवनाची तुलना समुद्रप्रवासाशी करण्यात आली आहे. पण हा प्रवास यशस्वी रीत्या पूर्ण करण्यात मानवी बुद्धी सहसा अपुरी ठरली आहे. जीवनातील वादळांसमान संकटांमुळे कित्येक जणांची जीवनरूपी नौका बुडाली आहे. (स्तो. १०७:२३, २७) पण, ही तुलना इतकी उचित का आहे?
प्राचीन काळात, समुद्रप्रवास करणे खूप आव्हानात्मक होते; त्यासाठी अनुभव असणे गरजेचे होते. ही एक कला होती जी सहसा अनुभवी खलाशांकडून, उदाहरणार्थ, जहाजाच्या कप्तानाकडून शिकता येत असे. (प्रे. कृत्ये २७:९-११) जहाजाच्या कप्तानाची भूमिका किती महत्त्वाची आहे हे दाखवण्यासाठी प्राचीन काळातील बऱ्याच चित्रांत त्याला इतरांपेक्षा मोठा दाखवण्यात यायचे. विशाल समुद्रातून प्रवास करण्यासाठी जहाज चालवणाऱ्यांनी ताऱ्यांविषयी, वाऱ्यांविषयी आणि इतर सूचक बिंदूंविषयी शिकून घेतले. बायबल काही खलाशांचे वर्णन “चतुर” असे करते, ज्याचा अर्थ कुशल किंवा सुज्ञ असाही होऊ शकतो.—यहे. २७:८.
प्राचीन काळात समुद्रप्रवास करणे जितके कठीण होते तितकेच आज आपल्याला जीवनातील समस्यांतून मार्ग काढणे कठीण वाटू शकते. तर मग, कोणती गोष्ट आपली मदत करू शकते?
आपण “कुशल मार्गदर्शन” कसे प्राप्त करू शकतो?
जीवनाची तुलना समुद्रप्रवासाशी करण्यात आली आहे हे लक्षात ठेवून बायबलमधील हे सत्य विचारात घ्या: “सुज्ञ पुरुष ऐकेल आणि त्याचे ज्ञान आणखी वाढेल; आणि जो समजदार पुरुष आहे तो कुशल मार्गदर्शन प्राप्त करेल.” (नीति. १:५, ६, NW) “कुशल मार्गदर्शन” असे भाषांतरित केलेला हिब्रू शब्द प्राचीन काळातील जहाजाच्या कप्तानाच्या कार्याचे वर्णन करतो. त्या शब्दातून कुशलतेने मार्गदर्शन करण्याची क्षमता सूचित होते.
“कुशल मार्गदर्शन” प्राप्त करण्यासाठी जरी खूप मेहनत करावी लागली, तरी आपण ती प्राप्त करू शकतो आणि जीवनाचा प्रवास यशस्वी रीत्या करू शकतो. नीतिसूत्रे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपण बुद्धी, समज आणि सुज्ञता यांचा वापर केला पाहिजे. (नीति. १:२-६; २:१-९) दुष्ट लोक अन्यायी मार्गांनी जीवन जगण्यात कुशल असू शकतात. पण, आपण देवाचे मार्गदर्शन घेण्याकडे दुर्लक्ष करू नये.—नीति. १२:५.
तर मग, आपण प्रामाणिकपणे देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे. अशा अभ्यासाद्वारे आपण यहोवाबद्दल व त्याचे तंतोतंत अनुकरण करणाऱ्या येशू ख्रिस्ताबद्दल अनमोल माहिती घेऊ शकतो. (योहा. १४:९) ख्रिस्ती सभांद्वारे आपल्याला बराच सुज्ञ सल्ला मिळतो. इतकेच नव्हे, तर आपण आपल्या पालकांच्या व इतरांच्या अनुभवांतून शिकू शकतो.—नीति. २३:२२.
अंदाज घ्या व योजना करा
जीवनात वादळे येतात तेव्हा खासकरून आपल्याला कुशल मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते. कठीण प्रसंगी कोणता निर्णय घ्यावा यासंबंधी अनिश्चिततेमुळे आपण निर्णय घेण्याची आपली क्षमताच हरवून बसू शकतो, आणि त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात.—याको. १:५, ६.
लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, “कुशल मार्गदर्शन” असे भाषांतरित केलेला शब्द युद्धाच्या संदर्भातदेखील वापरण्यात आला आहे. बायबल असे म्हणते: “शहाणपणाने व्यवस्था करून [“कुशल डावपेच आखून,” द रिवाइज्ड इंग्लिश बायबल] युद्ध चालीव; बहुत सुमंत्री असल्याने यश मिळते.”—युद्धात डावपेच आखणाऱ्या व्यक्तीप्रमाणे, आपण आपल्या आध्यात्मिकतेला धोका निर्माण करू शकणाऱ्या गोष्टींचा अंदाज घेतला पाहिजे. (नीति. २२:३) उदाहरणार्थ, एखादी नवीन नोकरी किंवा कामावर बढती स्वीकारण्याच्या बाबतीत तुम्हाला कदाचित निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही नक्कीच पगार, कामाला येण्याजाण्यासाठी लागणारा वेळ आणि इतर बारीकसारीक गोष्टींचा विचार कराल. पण इतरही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही विचारात घेतल्या पाहिजेत: ही नोकरी बायबल तत्त्वांच्या सामंजस्यात असेल का? नोकरीच्या वेळांचा, जसे की वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काम करावे लागणार असेल तर याचा माझ्या ख्रिस्ती कार्यांवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो?—लूक १४:२८-३०.
यहोवाची साक्षीदार असलेल्या लोरेटाला खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी होती. ही कंपनी दुसरीकडे हलवली जाणार होती, तेव्हा त्या नवीन ठिकाणी लोरेटाला एक महत्त्वाचे पद देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. कंपनीच्या संचालकांनी तिला म्हटले: “जीवनात अशी संधी वारंवार येत नाही. आणि तिथं एक राज्य सभागृह आहे हेही आम्ही शोधून काढलं आहे.” पण सृष्टिकर्त्याची सेवा आणखी जास्त करण्याची लोरेटाची इच्छा असल्यामुळे तिला आपले जीवन साधे ठेवायचे होते. कंपनीतील त्या नवीन पदामुळे तिच्याकडे ख्रिस्ती कार्यांकरता जास्त वेळ उरणार नाही हे तिला माहीत होते. तिच्या कंपनीच्या संचालकाने तिला खासगीत सांगितले की ती एकटीच आहे जिला कंपनी कामावर ठेवू इच्छिते, पण तरीसुद्धा लोरेटाने राजीनामा दिला. मागील जवळजवळ २० वर्षांपासून लोरेटा पायनियर सेवा करत आहे. तिला याची पूर्ण खातरी आहे की तिने देवाच्या वचनात सापडणाऱ्या सल्ल्याच्या सामंजस्यात कुशल मार्गदर्शनाने योजना केल्यामुळे तिला चांगले परिणाम मिळाले आहेत. यहोवासोबतचा तिचा नातेसंबंध आणखी मजबूत झाला आहे आणि बायबल सत्य स्वीकारण्यास अनेकांना मदत करण्याचा सुहक्क तिला लाभला आहे.
कुटुंबात कुशल मार्गदर्शनाची नक्कीच गरज आहे. मुलांना मोठे करणे ही जणू एक दीर्घपल्ल्याची नोकरीच आहे. आणि आध्यात्मिक व भौतिक गोष्टींच्या बाबतीत पालकांनी केलेल्या निवडींचा कुटुंबातील सर्वांच्याच भविष्यावर प्रभाव पडतो. (नीति. २२:६) तेव्हा ख्रिस्ती पालकांनी स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘आम्ही आमच्या बोलण्यातून व उदाहरणातून मुलांना आध्यात्मिक गोष्टींचे महत्त्व शिकवत आहोत का, ज्यांमुळे मोठेपणी ते समस्यांचा सामना सुज्ञतेने करू शकतील? जीवन साधे ठेवून समाधानी कसे असावे हे मुलांना समजण्यास आणि ख्रिस्ती सेवेवर त्यांचे लक्ष केंद्रित करण्यास आमच्या जीवनशैलीमुळे त्यांना मदत होत आहे का?’—१ तीम. ६:६-१०, १८, १९.
आज जगातील लोक भौतिक गोष्टी व सामाजिक प्रतिष्ठा यांचा पाठपुरावा करतात. पण जीवनातील खरे यश या गोष्टींद्वारे ठरत नाही. शलमोन राजाला हे माहीत होते. त्याने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल.” (उप. ८:१२) यावरून हे सिद्ध होते की देवाच्या वचनाच्या आधारावर व त्या वचनाच्या सामंजस्यात “कुशल मार्गदर्शन” प्राप्त करणे सुज्ञतेचे आहे.—२ तीम. ३:१६, १७.
[३० पानांवरील चित्र]
कप्तानाची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर जोर देण्यासाठी चित्रांमध्ये त्याला इतर खलाशांपेक्षा सहसा मोठे दाखवले जायचे
[चित्राचे श्रेय]
Su concessione del Ministero per i Beni e le Attività Culturali. कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही माध्यमाद्वारे या छायाचित्राच्या प्रती तयार करण्यास किंवा त्याची नक्कल करण्यास मनाई आहे.