व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“अनन्य परमेश्‍वर” यहोवा आपल्या कुटुंबास एकत्रित करतो

“अनन्य परमेश्‍वर” यहोवा आपल्या कुटुंबास एकत्रित करतो

“अनन्य परमेश्‍वर” यहोवा आपल्या कुटुंबास एकत्रित करतो

“आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य . . . राखावयास झटत जा.”—इफिस. ४:३.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

देवाच्या व्यवस्थेचा उद्देश काय आहे?

आपण “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य” कसे राखू शकतो?

एकमेकांबरोबर दयाळूपणे वागण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

१, २. पृथ्वी व मानवांकरता यहोवाचा काय उद्देश आहे?

 कुटुंब. हा शब्द ऐकताच तुमच्या मनात कोणता विचार येतो? आपुलकी? आनंद? एकच ध्येय मिळवण्यासाठी एकत्र मिळून कार्य करणे? सर्वांना वाढायला, शिकत राहायला आणि विचारांची देवाणघेवाण करायला संधी मिळेल असे सुरक्षित ठिकाण? तुम्ही एका प्रेमळ कुटुंबाचे सदस्य असाल, तर कुटुंब हा शब्द ऐकल्यावर कदाचित तुमच्याही मनात या सर्व गोष्टी आल्या असतील. कुटुंब व्यवस्था ही मुळात यहोवाने स्थापन केली आहे. (इफिस. ३:१४, १५) त्याचा असा उद्देश होता की स्वर्गात आणि पृथ्वीवर त्याने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांना सुरक्षिततेची भावना, आपसांतील भरवसा आणि खरे ऐक्य अनुभवायला मिळावे.

मानवांनी पाप केल्यानंतर ते देवाच्या विश्‍वव्यापी कुटुंबाचा भाग राहिले नाहीत. पण यामुळे यहोवाचा उद्देश निष्फळ ठरला नाही. पृथ्वी नंदनवन बनावी आणि आदाम व हव्वा यांच्या संततीने भरून जावी हा त्याचा उद्देश तो नक्कीच पूर्ण करेल. (उत्प. १:२८; यश. ४५:१८) आणि हा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने सर्व आवश्‍यक तरतुदीही केल्या आहेत. यांपैकी बऱ्‍याच तरतुदींविषयी बायबलमधील इफिसकरांच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. या पुस्तकाचा मुख्य विषय ऐक्य हाच आहे. तर आता आपण या पुस्तकातील काही वचनांवर विचार करू या आणि सबंध सृष्टीत ऐक्य घडवून आणण्याच्या यहोवाच्या उद्देशाला आपण कशा प्रकारे सहकार्य करू शकतो हे पाहू या.

देवाने केलेली व्यवस्था आणि तिचे कार्य

३. इफिसकर १:१० यात उल्लेख केलेली देवाची व्यवस्था काय आहे आणि या व्यवस्थेचा पहिला टप्पा केव्हा सुरू झाला?

मोशेने इस्राएली लोकांना सांगितले: “आपला देव परमेश्‍वर [“यहोवा,” NW] हा अनन्य परमेश्‍वर आहे.” (अनु. ६:४) यहोवाची सर्व कार्ये त्याच्या उद्देशाशी सुसंगत असतात. म्हणूनच यहोवाने कालखंडाच्या पूर्णतेस एक “व्यवस्था” किंवा तरतूद केली ज्याद्वारे तो स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व बुद्धिमान प्राण्यांना एकत्र करणार होता. (इफिसकरांस १:८-१० वाचा.) ही व्यवस्था दोन टप्प्यांत आपले कार्य पूर्ण करेल. पहिल्या टप्प्यात अभिषिक्‍त जनांच्या मंडळीला येशू ख्रिस्ताच्या आध्यात्मिक नेतृत्वाखाली स्वर्गात राहण्यासाठी तयार केले जाते. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाने स्वर्गात ख्रिस्तासोबत राज्य करणाऱ्‍यांना निवडण्यास सुरुवात केली तेव्हा हा पहिला टप्पा सुरू झाला. (प्रे. कृत्ये २:१-४) अभिषिक्‍त जनांना ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर सार्वकालिक जीवनाकरता नीतिमान ठरवण्यात आले असल्यामुळे, त्यांना “देवाची मुले” होण्यासाठी दत्तक घेण्यात आले आहे ही गोष्ट ते चांगल्या प्रकारे ओळखतात.—रोम. ३:२३, २४; ५:१; ८:१५-१७.

४, ५. देवाच्या व्यवस्थेच्या दुसऱ्‍या टप्प्यात काय केले जाते?

दुसऱ्‍या टप्प्यात, अशा लोकांना तयार केले जाते जे ख्रिस्ताच्या मशीही राज्यात पृथ्वीवरील नंदनवनात राहतील. या गटातील पहिला भाग म्हणजे “मोठा लोकसमुदाय.” (प्रकटी. ७:९, १३-१७; २१:१-५) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यशासनात, कोट्यवधी लोकांचे पुनरुत्थान होईल आणि तेसुद्धा मोठ्या लोकसमुदायासोबत पृथ्वीवर राहू लागतील. (प्रकटी. २०:१२, १३) पुनरुत्थानामुळे देवाच्या लोकांतील ऐक्य किती अद्‌भुत प्रकारे दिसून येईल याची कल्पना करा! हजार वर्षांच्या शेवटी “पृथ्वीवर जे आहे,” अर्थात मोठा लोकसमुदाय आणि पुनरुत्थित जन यांची एक शेवटली परीक्षा होईल. जे विश्‍वासू राहतील त्यांना पृथ्वीवरील “देवाची मुले” म्हणून दत्तक घेतले जाईल.—रोम. ८:२१; प्रकटी. २०:७, ८.

देवाच्या व्यवस्थेचे दोन्ही टप्पे आज सुरू असून, अभिषिक्‍तांना स्वर्गात आणि दुसऱ्‍या मेंढरांना पृथ्वीवरील नंदनवनात राहण्याकरता तयार केले जात आहे. पण, आज आपण व्यक्‍तिशः देवाच्या व्यवस्थेशी कशा प्रकारे सहकार्य करू शकतो?

“आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य” राखा

६. ख्रिश्‍चनांनी एकत्र आले पाहिजे हे कोणत्या शास्त्रवचनांत सांगण्यात आले आहे?

बायबलमध्ये ख्रिश्‍चनांना उपासनेकरता एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे. (१ करिंथ. १४:२३; इब्री १०:२४, २५) पण, ज्याप्रमाणे लोक बाजारात किंवा स्टेडियममध्ये केवळ काही वेळाकरता एकत्र येतात, त्यासारखे हे नाही. यात आणखीही बरेच काही गोवलेले आहे. जेव्हा आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन करून त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देतो, तेव्हा आपल्यात खरे ऐक्य निर्माण होते.

७. “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य” आपण कसे राखू शकतो?

यहोवाने ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर अभिषिक्‍त जनांना पुत्र या नात्याने, आणि दुसऱ्‍या मेंढरांना मित्र या नात्याने नीतिमान ठरवले आहे. तरीसुद्धा, जोपर्यंत आपण सध्याच्या या जगात राहत आहोत तोपर्यंत आपल्यामध्ये वैयक्‍तिक मतभेद हे होतीलच. (रोम. ५:९; याको. २:२३) म्हणूनच तर बायबलमध्ये आपल्याला “एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या” असा सल्ला देण्यात आला आहे. आपण ख्रिस्ती बांधवांसोबत ऐक्याने कशा प्रकारे राहू शकतो? यासाठी आपण “पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता” उत्पन्‍न केली पाहिजे. शिवाय पौल आपल्याला असेही प्रोत्साहन देतो, “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा.” (इफिसकरांस ४:१-३ वाचा.) या सल्ल्याचे पालन करण्यासाठी आपण देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे आणि त्याचे फळ आपल्या जीवनात उत्पन्‍न केले पाहिजे. या फळामुळे आपसांतील मतभेद दूर होतात. दुसरीकडे पाहता, देहाच्या कर्मांमुळे नेहमी लोकांमध्ये फुटी निर्माण होतात.

८. देहाच्या कर्मांमुळे कशा प्रकारे ऐक्य नष्ट होते?

देहाची कर्मे कशा प्रकारे ऐक्य नष्ट करतात याकडे लक्ष द्या. (गलतीकर ५:१९-२१ वाचा.) जारकर्म करणाऱ्‍याचे यहोवाशी व त्याच्या मंडळीशी नाते तुटते आणि व्यभिचारामुळे आईवडिलांची मुलांपासून आणि निर्दोष पती किंवा पत्नीची आपल्या विवाह जोडीदारापासून ताटातूट होते. अशुद्धपणामुळे एका व्यक्‍तीचे देवासोबत आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांसोबत ऐक्य राहत नाही. दोन वस्तू एकमेकांना चिकटवायच्या असल्यास दोन्ही वस्तूंचा पृष्ठभाग स्वच्छ असणे गरजेचे असते, तरच त्या एकमेकांना घट्ट चिकटू शकतात. निर्लज्ज वर्तन केल्याने देवाच्या नीतिनियमांबद्दल जराही आदर नसल्याचे दिसून येते. देहाच्या इतर कर्मांमुळेही, इतरांशी आणि देवाशी असलेले ऐक्याचे संबंध नष्ट होतात. अशा प्रकारची वागणूक यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाशी मुळीच जुळत नाही.

९. “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास” आपण खरोखरच झटत आहोत किंवा नाही हे कसे ठरवू शकतो?

तेव्हा, आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला पुढील प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘“आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास” मी प्रामाणिकपणे झटतो का? कोणाशी मतभेद झाल्यास मी कशी प्रतिक्रिया दाखवतो? जास्तीत जास्त मित्रांचे समर्थन मिळवण्याच्या हेतूने, मी जो कोणी ऐकून घेईल त्याला आपले गाऱ्‍हाणे सांगतो का? शांतीपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी स्वतः प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याऐवजी, मंडळीच्या वडिलांनी मध्यस्थी करावी अशी अपेक्षा मी करतो का? इतरांना माझ्याविरुद्ध काही तक्रार असल्यास मी मुद्दामहून त्यांच्याशी भेटण्या-बोलण्याचे टाळतो का?’ अशा प्रकारे वागल्यास, सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र करण्याच्या यहोवाच्या उद्देशाशी आपण सहकार्य करत असल्याचे दिसून येईल का?

१०, ११. (क) आपल्या बांधवांसोबत शांतीचे संबंध असणे महत्त्वाचे का आहे? (ख) शांती आणि खरी आध्यात्मिक समृद्धी कोणत्या कृतींमुळे घडून येईल?

१० येशूने म्हटले: “ह्‍यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर.” (मत्त. ५:२३-२५) याकोबाने लिहिले की “शांती करणाऱ्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.” (याको. ३:१७, १८) याचा अर्थ, इतरांसोबत शांतीचे संबंध नसल्यास, जे योग्य आहे ते करत राहणे आपल्याला शक्य होणार नाही.

११ उदाहरणार्थ, युद्धांमुळे उद्‌ध्वस्त झालेल्या काही देशांत, जमिनीखाली असलेल्या सुरुंगांच्या भीतीमुळे जवळजवळ ३५ टक्के जमीन शेतीसाठी वापरली जाऊ शकत नाही. एखाद्या सुरुंगाचा स्फोट होतो तेव्हा शेते ओस पडतात, गावकऱ्‍यांना रोजगार मिळेनासा होतो आणि शहरांना पुरेसे अन्‍नधान्य मिळत नाही. त्याच प्रकारे, आपल्या बांधवांसोबत असलेले शांतीचे संबंध ज्यांमुळे नष्ट होतील असे गुण व सवयी आपल्या व्यक्‍तिमत्त्वात असल्यास, आपली आध्यात्मिक प्रगती खुंटते. पण इतरांना क्षमा करायला तयार असल्याने आणि इतरांचे भले करण्यासाठी झटल्याने, आपण खऱ्‍या आध्यात्मिक समृद्धीसाठी पोषक वातावरण तयार करत असतो.

१२. वडील आपल्याला एकता राखण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात?

१२ तसेच, ख्रिस्ती वडील हे मंडळीला मिळालेल्या “देणग्या” आहेत आणि मंडळीचे ऐक्य टिकवून ठेवण्याकरता ते बराच हातभार लावू शकतात. विश्‍वासाची एकता प्राप्त करण्यास आपल्याला साहाय्य करण्यासाठी यहोवाने वडिलांची तरतूद केली आहे. (इफिस. ४:८, १३) वडील आपल्यासोबत उपासनेत सहभागी होतात आणि देवाच्या वचनाच्या आधारावर आपल्याला सुधारणा करण्यासाठी विशिष्ट सूचना करतात. अशा रीतीने ते आपल्याला ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व धारण करण्यात उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी साहाय्य करतात. (इफिस. ४:२२-२४) वडिलांनी दिलेल्या मार्गदर्शनाद्वारे यहोवा त्याच्या पुत्राच्या शासनाखाली नव्या जगात राहण्यासाठी तुमची तयारी करत आहे, असा दृष्टिकोन तुम्ही बाळगता का? वडिलांनो, तुम्हीही हाच हेतू मनात बाळगून बांधवांना सल्ला देण्याचा प्रयत्न करता का?—गलती. ६:१.

एकमेकांबरोबर दयाळू व्हा

१३. इफिसकर ४:२५-३२ यांतील सल्ल्याचे आपण पालन न केल्यास काय घडू शकते?

१३ इफिसकर ४:२५-२९ यांत अशा कृत्यांचा उल्लेख करण्यात आला आहे जी आपण आवर्जून टाळली पाहिजेत. उदाहरणार्थ खोटे बोलणे, रागावणे किंवा आळशीपणा करणे, चांगल्या व प्रोत्साहन देणाऱ्‍या गोष्टी बोलण्याऐवजी तोंडातून कुजके शब्द काढणे. या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणारी व्यक्‍ती देवाच्या आत्म्याला खिन्‍न करते कारण पवित्र आत्मा हा नेहमी एकता निर्माण करण्यासाठी कार्य करतो. (इफिस. ४:३०) शांती व एकता कायम राखण्यासाठी पौलाने पुढे जे लिहिले त्याचेही पालन करणे गरजेचे आहे: “सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.”—इफिस. ४:३१, ३२, ईझी-टू-रीड व्हर्शन.

१४. (क) ‘दयाळू व्हा’ या शब्दांवरून काय सुचवले आहे? (ख) दयाळूपणाने वागण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

१४ वरील वचनांत ‘दयाळू व्हा’ असे म्हटले आहे. यावरून, कदाचित आपण पूर्वी तितके दयाळू नव्हतो आणि आपल्याला याबाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे असे सुचवले आहे. तेव्हा, आपण स्वतःच्या भावनांपेक्षा इतरांच्या भावनांचा विचार करण्यास शिकून घ्यायला नको का? (फिलिप्पै. २:४) कदाचित आपल्याला असे काहीतरी बोलण्याचा मोह होत असेल, जे ऐकून सर्व जण हसतील किंवा ज्यामुळे सर्वांना आपल्या हुशारीचे कौतुक वाटेल; पण असे करणे दयाळूपणाचे आहे का? आधीच याचा विचार केल्यास, ‘दयाळू व्हा’ या सल्ल्याचे पालन करणे आपल्याला शक्य होईल.

कुटुंबात प्रेम व आदर दाखवायला शिकणे

१५. इफिसकर ५:२८ यात पौलाने मंडळीसोबत ख्रिस्ताच्या व्यवहाराच्या कोणत्या पैलूकडे लक्ष वेधले?

१५ बायबलमध्ये ख्रिस्त व त्याच्या मंडळीच्या नातेसंबंधाची तुलना पती-पत्नीच्या नात्याशी करण्यात आली आहे. ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करून, पतीने आपल्या पत्नीचे मार्गदर्शन केले पाहिजे, तिच्यावर प्रेम केले पाहिजे आणि तिची काळजी घेतली पाहिजे; आणि पत्नीनेही आपल्या पतीच्या अधीन राहिले पाहिजे. (इफिस. ५:२२-३३) “त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी” असे जेव्हा पौलाने म्हटले, तेव्हा त्याने कोणाच्या उदाहरणाकडे पतींचे लक्ष वेधले? (इफिस. ५:२८) या वचनाच्या आधीच्या वचनात आपण असे वाचतो, “ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, . . . तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र” केले. त्याअर्थी, सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र करण्याच्या यहोवाच्या उद्देशाशी सहकार्य करायचे असेल, तर पतीने आपल्या कुटुंबाचे आध्यात्मिक पोषण करण्याविषयी जागरूक राहिले पाहिजे.

१६. आईवडील कुटुंबात देवाकडून मिळालेली जबाबदारी पार पाडतात तेव्हा कोणते परिणाम घडून येतात?

१६ आईवडिलांनी हे आठवणीत ठेवले पाहिजे की मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांना यहोवाकडून मिळाली आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे आजच्या जगात बरेच लोक “ममताहीन” झाले आहेत. (२ तीम. ३:१, ३) कितीतरी पिता आपल्या जबाबदाऱ्‍यांपासून हात झटकून मोकळे होतात. यामुळे त्यांच्या मुलांचे आयुष्य बरबाद होते व ती दुःखी होतात. पण पौलाने ख्रिस्ती पित्यांना असा सल्ला दिला: “आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिस. ६:४) प्रेम दाखवण्याबाबत व अधिकाराचा आदर करण्याबाबत मुले सर्वप्रथम कुटुंबातच शिकत नाहीत का? तर मग, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना या गोष्टी शिकवल्या आहेत त्यांनी यहोवाच्या व्यवस्थेच्या सामंजस्यात कार्य केले आहे असे म्हणता येईल. राग, संताप व अपमानास्पद भाषण दूर करून जेव्हा आपण आपल्या घरांत प्रेमाचे वातावरण निर्माण करतो, तेव्हा प्रेम दाखवण्याबाबत आणि अधिकाराचा आदर करण्याबाबत आपण आपल्या मुलांना महत्त्वाचे धडे शिकवत असतो. असे केल्यामुळे ते देवाच्या नव्या जगात राहण्यासाठी तयार होतील.

१७. दियाबलाचा प्रतिकार करण्यासाठी आपण काय करण्याची गरज आहे?

१७ दियाबलानेच सर्वप्रथम वैश्‍विक शांती व एकता भंग केली होती. त्यामुळे देवाच्या इच्छेनुसार वागण्याच्या आपल्या प्रयत्नांचा तो नक्कीच कडाडून विरोध करेल, हे आपण ओळखले पाहिजे. जेव्हा घटस्फोटांचे प्रमाण वाढतात, लोक लग्न न करताच एकत्र राहण्याचे पसंत करतात, आणि समलिंगी विवाहांना मान्यता दिली जाते तेव्हा आपोआपच सैतानाच्या मनासारखे घडते. पण, आपण आधुनिक समाजाच्या अशा चालीरितींचा आपल्या वागणुकीवर व मनोवृत्तीवर प्रभाव पडू देत नाही. ख्रिस्त आपला आदर्श आहे. (इफिस. ४:१७-२१) म्हणूनच, दियाबलाचा आणि त्याच्या दुरात्म्यांचा यशस्वीपणे प्रतिकार करण्यासाठी “देवाची शस्त्रसामग्री धारण करा” अशी आज्ञा आपल्याला देण्यात आली आहे.—इफिसकर ६:१०-१३ वाचा.

“प्रीतीने चाला”

१८. ख्रिस्ती ऐक्य राखण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?

१८ ख्रिस्ती ऐक्य कायम राखण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आपण आपला एकच प्रभू, ख्रिस्त येशू याच्यावर, एकच देव यहोवावर, तसेच एकमेकांवर मनापासून प्रेम करतो. म्हणूनच, “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास” झटत राहण्याचा आपला दृढनिश्‍चय आहे. (इफिस. ४:३-६) येशूने प्रार्थनेत या प्रेमाबद्दल असे म्हटले: “मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्‍वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करितो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, . . . मी तुझे नाव त्यांस कळविले आहे आणि कळवीन; ह्‍यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”—योहा. १७:२०, २१, २६.

१९. तुम्ही काय करण्याचा निश्‍चय केला आहे?

१९ अपरिपूर्णतेमुळे आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील काही गोष्टी बदलणे आपल्याला कठीण वाटू शकते, पण प्रेमामुळे प्रवृत्त होऊन आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणे अशी प्रार्थना केली पाहिजे: “तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.” (स्तो. ८६:११) तर मग, आपल्या प्रेमळ पित्यापासून आणि आपल्या ख्रिस्ती बांधवांपासून आपल्याला दूर करण्याचे दियाबलाचे प्रयत्न हाणून पाडण्याचा आपण निश्‍चय करू या. तसेच, कुटुंबात, सेवाकार्यात व मंडळीत देवाची प्रिय मुले या नात्याने त्याचे अनुकरण करण्याचा आणि प्रीतीने चालत राहण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करू या.—इफिस. ५:१, २.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्र]

आपले अर्पण वेदीजवळ ठेवून तो आपल्या बांधवासोबत सलोखा करण्यास जातो

[३१ पानांवरील चित्र]

आईवडिलांनो, आपल्या मुलांना इतरांचा आदर करण्यास शिकवा