“माझं स्वप्न पूर्ण झालं”
“माझं स्वप्न पूर्ण झालं”
एमीलिया पंधरा वर्षांआधी सामान्य पायनियर या नात्याने सेवा करत होती. पण, तिला आपली पूर्ण वेळेची सेवा थांबवावी लागली. पायनियर सेवा करत असताना तिने जो अतुलनीय आनंद अनुभवला होता त्याविषयी ती अलीकडच्या वर्षांत सारखा विचार करू लागली, आणि तिला पुन्हा एकदा सेवेतील आपला सहभाग वाढवण्याची इच्छा झाली.
पण, एमीलियाचा बराच वेळ नोकरीतच खर्च होत होता, त्यामुळे ती तितकी आनंदी नव्हती. एकदा तिने आपल्या सहकाऱ्यांसमोर आपली इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली: “मी कमी तास काम करू शकले असते तर किती बरं झालं असतं!” तिच्या बॉसने हे ऐकले आणि तिने जे म्हटले ते खरे आहे का असे तिला विचारले. ते खरे असल्याचे एमीलियाने कबूल केले. पण कामाचे तास कमी करण्यासाठी कंपनीच्या एका संचालकांची मंजुरी आवश्यक होती. कारण, कंपनीच्या धोरणानुसार कंपनीतील सर्वांनीच पूर्ण वेळ काम करणे गरजेचे होते. आपल्या बहिणीने कंपनीच्या संचालकांशी बोलण्यासाठी तयारी केली आणि मन शांत राहावे व धैर्य मिळावे म्हणून प्रार्थना केली.
संचालकांशी बोलताना एमीलियाने विचारपूर्वक पण धैर्याने तिच्या कामाचे तास कमी करण्याची विनंती केली. तिने संचालकांना स्पष्ट करून सांगितले की सुटीच्या दिवशी ती इतरांना मदत करते: “मी एक यहोवाची साक्षीदार आहे आणि मी लोकांना आध्यात्मिक गोष्टी शिकण्यास मदत करते. आजकाल अनेकांचे नैतिक स्तर खालावले आहेत. त्यांना स्पष्ट मूल्यांची व स्तरांची गरज आहे, आणि बायबलमधून मी ज्या बोधकारक गोष्टी सांगते त्या त्यांच्यासाठी खूप मोलाच्या आहेत. कंपनीतल्या माझ्या कामाची गुणवत्ता कमी होणार नाही याची मी खातरी देते, पण लोकांना मदत करण्यासाठी मला आणखी जास्त वेळ मिळावा अशी माझी इच्छा आहे. याच कारणामुळं मला माझ्या कामाचे तास कमी करण्याची गरज आहे.”
संचालकांनी तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि म्हटले की एके काळी त्यांनी समाजसेवा करण्याचा विचार केला होता. मग ते म्हणाले: “तू जी कारणं सांगितली त्यांमुळं तुझी विनंती मान्य करायलाच हवी असं मला वाटतं. पण यामुळं तुला कमी पगार मिळेल याची तुला जाणीव आहे ना?” आपल्याला त्याची जाणीव आहे असे एमीलियाने सांगितले आणि पुढे म्हटले की गरज पडल्यास ती आपले जीवन साधे करेल. तिने म्हटले: “लोकांचं भलं होईल असं काहीतरी करणं माझं सर्वात महत्त्वाचं ध्येय आहे.” संचालक तिला म्हणाले: “निस्वार्थपणे दुसऱ्यांसाठी आपला वेळ खर्च करणाऱ्यांचं मला खूप कौतुक वाटतं.”
त्या कंपनीच्या कोणत्याही कामगाराला कमी तास काम करण्याची अनुमती याआधी कधीच देण्यात आली नव्हती. एमीलियाला आता आठवड्यातून केवळ चार दिवस काम करण्याची मंजुरी मिळाली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे तिच्या पगारात वाढ करण्यात आली आणि तिला आता पूर्वीइतकाच पगार मिळतो! ती म्हणते: “माझं स्वप्न पूर्ण झालं आहे, आणि मी पुन्हा एकदा सामान्य पायनियर सेवा करू शकते!”
तुम्ही तुमच्या परिस्थितीत काही फेरबदल करून पायनियर सेवा सुरू करू शकता का, किंवा तुम्हाला पायनियर सेवा थांबवावी लागली असेल, तर पुन्हा एकदा सुरू करू शकता का?
[३२ पानांवरील संक्षिप्त आशय]
संचालक तिला म्हणाले: “निस्वार्थपणे दुसऱ्यांसाठी आपला वेळ खर्च करणाऱ्यांचं मला खूप कौतुक वाटतं”