यहोवानं मला त्याच्या इच्छेनुसार करण्यास शिकवलं
जीवन कथा
यहोवानं मला त्याच्या इच्छेनुसार करण्यास शिकवलं
मॅक्स लॉइड यांच्याद्वारे कथित
सन १९५५ ची गोष्ट आहे. मी आणि माझा मिशनरी सोबती दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात सेवा करत होतो. एका रात्री बराच उशीर झाला होता. आम्ही ज्या घरात होतो त्या घराला एका संतप्त जमावानं घेरलं होतं आणि ते जोरजोरानं ओरडत होते: “आमचा देव रक्तपिपासू देव आहे, आणि त्याला या ग्रिन्गोंचं रक्त हवं आहे.” पण, आम्ही ग्रिन्गो (विदेशी) या ठिकाणी कसं काय पोचलो होतो?
माझ्या सेवेची सुरुवात कितीतरी वर्षांआधी ऑस्ट्रेलियात झाली होती जिथं मी लहानाचा मोठा झालो आणि जिथं यहोवानं मला त्याच्या इच्छेनुसार करण्यास शिकवण्यास सुरुवात केली. माझ्या बाबांनी १९३८ साली एका साक्षीदार स्त्रीकडून एनिमीझ नावाचं एक पुस्तक स्वीकारलं होतं. आमच्या चर्चच्या पाळकांमुळं बाबा आणि आई आधीच असमाधानी होते, कारण ते बायबलच्या काही भागांना कल्पकथा म्हणायचे. सुमारे एक वर्षानंतर, माझ्या आईबाबांनी यहोवाला केलेल्या समर्पणाचं प्रतीक म्हणून बाप्तिस्मा घेतला. तेव्हापासून, आमच्या कुटुंबानं यहोवाच्या इच्छेनुसार कार्य करण्याचा ध्यास घेतला. नंतर, माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी असलेल्या माझ्या बहिणीनं, लेस्लीनं बाप्तिस्मा घेतला, आणि त्यानंतर १९४० मध्ये, नऊ वर्षांचा असताना मी बाप्तिस्मा घेतला.
दुसरं महायुद्ध सुरू झाल्याच्या थोड्याच काळानंतर, ऑस्ट्रेलियामध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांची छपाई व वितरण यांवर बंदी घालण्यात आली. म्हणून मी लहान असताना, केवळ बायबलचा उपयोग करून माझ्या विश्वासाचा आधार काय आहे हे स्पष्ट करून सांगण्यास शिकलो. मी झेंडावंदन का करत नाही किंवा युद्धाच्या बाबतीत राष्ट्रांचे समर्थन का करत नाही हे दाखवण्यासाठी मी नेहमी माझ्यासोबत शाळेत बायबल घेऊन जाण्यास शिकलो.—निर्ग. २०:४, ५; मत्त. ४:१०; योहा. १७:१६; १ योहा. ५:२१.
शाळेतली मुलं मला “जर्मन गुप्तहेर” म्हणायची, त्यामुळं बरीच मुलं माझ्यासोबत बोलायची नाहीत. त्या काळी शाळेत चित्रपट दाखवले जायचे. चित्रपट सुरू होण्याआधी, सर्वांनी उभं राहून राष्ट्रगीत गावं अशी अपेक्षा केली जायची. पण, मी बसूनच राहायचो तेव्हा दोघं-तिघं माझे केस ओढून मला उभं करण्याचा प्रयत्न करायचे. मी बायबलवर आधारित माझ्या विश्वासांना जडून राहिल्यामुळं शेवटी मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण, मी घरी राहून पत्रव्यवहाराद्वारे अभ्यास केला.
माझं ध्येय शेवटी पूर्ण झालं
१४ वर्षांचा झाल्यावर पायनियर म्हणून पूर्ण-वेळ सेवा करण्याचं मी ध्येय ठेवलं होतं. म्हणून, आईबाबांनी जेव्हा मला आधी एखादं काम शोध असं सांगितलं, तेव्हा मला अतिशय निराश झाल्यासारखं वाटलं. त्यांचं म्हणणं होतं, की मी माझ्या राहण्याचा व खाण्यापिण्याचा खर्च उचलावा, आणि त्यांनी वचन दिलं की मी १८ वर्षांचा झाल्यावर पायनियर सेवा सुरू करू शकतो. त्यामुळं, माझ्या कमाईविषयी आमच्यात नेहमी चर्चा व्हायच्या. मी पायनियर सेवेसाठी पैसे जमा करू इच्छितो, पण माझे सर्व पैसे तुम्हीच घेत आहात, असं म्हणून मी त्यांच्यासोबत वाद घालायचो.
पायनियर सेवा सुरू करण्याची वेळ आली, तेव्हा आईबाबांनी
माझ्यासोबत बसून मला सांगितलं, की मी त्यांना दिलेले पैसे त्यांनी एका बचत खात्यात जमा केले होते. नंतर, त्यांनी कपडे आणि पायनियर सेवेसाठी लागणाऱ्या इतर वस्तू खरेदी करण्यासाठी ते सर्व पैसे मला दिले. मी इतरांकडून अपेक्षा न करता स्वतःची देखभाल स्वतः करावी हे मला शिकवण्याचा ते प्रयत्न करत होते. मी मागं वळून पाहतो, तेव्हा ती शिकवण किती मोलाची होती याची मला जाणीव होते.लेस्ली व मी लहानाचे मोठे होत होतो, तेव्हा पायनियर अनेकदा आमच्या घरी राहायचे, आणि त्यांच्यासोबत मिळून सेवेत जायला आम्हाला आवडायचं. आम्ही शनिवार-रविवारी घरोघरच्या प्रचार कार्यात, रस्त्यावरील प्रचार कार्यात भाग घ्यायचो आणि बायबल अभ्यास चालवायचो. त्या दिवसांत, मंडळीचे प्रचारक महिन्यातून ६० तास प्रचार कार्य करण्याचं ध्येय ठेवायचे. आई नेहमीच तिचं ध्येय गाठायची. अशा प्रकारे तिनं आमच्यासमोर एक उत्तम उदाहरण मांडलं.
टास्मानियामध्ये पायनियरिंग
पायनियर म्हणून माझी पहिली नेमणूक ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया नावाच्या एका बेटावर होती. माझी बहीण लेस्ली व तिचा पती आधीपासूनच तिथं सेवा करत होते. पण, काही काळातच ते गिलियड प्रशालेच्या १५ व्या वर्गाला उपस्थित राहण्यासाठी निघून गेले. मी अतिशय लाजाळू होतो व याआधी कधीच घरापासून दूर राहिलेलो नव्हतो. काहींना वाटलं की मी तीन महिन्यांपेक्षा जास्त तिथं टिकणार नाही. पण, एका वर्षाच्या आत, १९५० मध्ये मला कंपनी सर्व्हंट म्हणून नेमण्यात आलं, ज्यांना आज वडील वर्गाचे संयोजक म्हटलं जातं. नंतर, मला खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं, आणि आणखी एक तरुण बांधव माझा सहकारी बनला.
आमची नेमणूक तांब्याच्या खाणी असलेल्या अशा एका दुर्गम भागातील शहरात होती जिथं एकही यहोवाचा साक्षीदार नव्हता. आम्ही बसनं प्रवास करून तिथं दुपारी उशिरा पोचलो. पहिल्या रात्री आम्ही एका जुन्या हॉटेलमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी घरोघरचं साक्षकार्य करताना, राहण्याचं एखादं ठिकाण मिळू शकेल का, याबद्दल आम्ही घरमालकांकडे विचारपूस केली. संध्याकाळच्या सुमारास, एका माणसानं आम्हाला सांगितलं, की प्रेसबिटेरियन चर्चला लागून असलेलं पाळकाचं घर रिकामं आहे, आणि पाळकाच्या साहाय्यकाशी आम्ही बोलावं असं त्यानं आम्हाला सुचवलं. पाळकाचा साहाय्यक मैत्रिपूर्ण होता आणि त्यानं आम्हाला त्या घरात राहण्याची अनुमती दिली. दररोज पाळकाच्या घरातून प्रचार करायला बाहेर पडताना जरा विचित्र वाटायचं.
आमचं क्षेत्र फलदायक होतं. लोकांसोबत आमच्या चांगल्या चर्चा झाल्या आणि आम्ही अनेक जणांसोबत बायबल अभ्यास सुरू केला. राजधानीत असणाऱ्या चर्च अधिकाऱ्यांना याबद्दल जेव्हा कळलं आणि त्यांनी जेव्हा ऐकलं की यहोवाचे साक्षीदार पाळकाच्या घरात राहत आहेत, तेव्हा त्यांनी पाळकाच्या साहाय्यकाला आम्हाला लगेच घरातून बाहेर काढण्यास सांगितलं. आमच्याकडे पुन्हा एकदा राहण्यासाठी जागा नव्हती!
दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत प्रचार केल्यावर, रात्र घालवण्यासाठी आम्ही जागा शोधायला सुरुवात केली. आम्हाला जे एकमात्र ठिकाण सापडलं ते होतं स्पोर्ट्स स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी उभारलेलं छप्पर. आम्ही आमच्या सूटकेस तिथं लपवल्या आणि पुन्हा प्रचार कार्य सुरू केलं. अंधार पडायला लागला होता, तरी आम्ही गल्लीतल्या उरलेल्या काही घरांना भेट देण्याचं ठरवलं.
एका घरमालकानं, त्याच्या घरामागं असलेल्या दोन खोल्यांच्या एका छोट्याशा घरात राहण्याची आम्हाला अनुमती दिली!विभागीय कार्य आणि गिलियड प्रशाला
या नेमणुकीत सुमारे आठ महिने सेवा केल्यावर, ऑस्ट्रेलियातील शाखा कार्यालयानं मला विभागीय पर्यवेक्षक होण्याचं आमंत्रण दिलं. हे ऐकून मला धक्काच बसला, कारण मी फक्त २० वर्षांचा होतो. काही आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर, मंडळ्यांना उत्तेजन देण्यासाठी मी नियमितपणे त्यांना भेटी देऊ लागलो. मी वयानं लहान होतो. जवळजवळ सगळेच वयानं माझ्यापेक्षा मोठे होते, तरीसुद्धा त्यांनी कधीच मला तुच्छ लेखलं नाही. उलट, त्यांनी माझ्या कार्याचा आदर केला.
एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीला प्रवास करणं खूपच वैविध्यपूर्ण होतं! एक आठवडा मी बसनं प्रवास करायचो. दुसऱ्या आठवड्यात ट्रॅमनं, नंतर कारनं किंवा मोटरसायकलच्या मागं बसून एका हातात सूटकेस आणि दुसऱ्या हातात प्रचाराची बॅग घेऊन प्रवास करायचो. साक्षीदारांसोबत त्यांच्या घरात राहणं खूप आनंददायक होतं. एका कंपनी सर्व्हंटचं घर पूर्णपणे बांधून झालेलं नव्हतं, तरी मला आपल्या घरी ठेवायला तो खूप उत्सुक होता. त्या आठवड्यात माझा बिछाना बाथटबमध्ये होता. तरीपण, आम्हा दोघांनाही त्या सबंध आठवड्यात खूप आध्यात्मिक प्रोत्साहन मिळालं.
२२ व्या गिलियड प्रशालेसाठी उपस्थित राहण्याकरता मला १९५३ मध्ये एक अर्ज मिळाला तेव्हा मला आश्चर्याचा आणखी एक सुखद धक्का बसला. मला आनंद तर झाला, पण काळजीही वाटली. त्याचं झालं असं, की ३० जुलै १९५० रोजी लेस्ली व तिचा पती गिलियड प्रशालेतून पदवीधर झाल्यानंतर, त्यांना पाकिस्तानमध्ये नेमणूक मिळाली होती. पण, एका वर्षाच्या आत लेस्ली आजारी पडली आणि तिथंच तिचा मृत्यू झाला. मी विचार केला, की त्यानंतर थोड्याच काळात मीही एका दूर देशी निघून जाणार हे ऐकून माझ्या आईबाबांना कसं वाटेल? पण त्यांनी म्हटलं: “जिथं कुठं यहोवा तुला पाठवेल तिथं जाऊन सेवा कर.” त्यानंतर, मी बाबांना पुन्हा कधीच पाहिलं नाही. १९५७ मध्ये ते वारले.
त्यानंतर थोड्याच काळात, मी न्यू यॉर्क सिटीला जाण्यासाठी इतर पाच ऑस्ट्रेलियन बंधुभगिनींसोबत जहाजात बसलो. हा प्रवास सहा आठवड्यांचा होता. मार्गात, आम्ही बायबल वाचन व अभ्यास केला, आणि सहप्रवाशांना साक्षही दिली. न्यू यॉर्कमधील साउथ लँसिंग इथं असलेल्या गिलियड प्रशालेच्या ठिकाणी जाण्याआधी, आम्ही जुलै १९५३ मध्ये यँकी स्टेडियममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलो. त्या अधिवेशनाला १,६५,८२९ जण उपस्थित होते!
गिलियड प्रशालेच्या आमच्या वर्गात १२० विद्यार्थी होते आणि हे सगळे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांतून आले होते. सेवा करण्यासाठी आम्हाला कुठं पाठवण्यात येईल हे पदवीदानाच्या दिवसापर्यंत आम्हाला सांगण्यात आलं नव्हतं. आमच्या नेमणुकीविषयी कळल्यावर, त्या त्या देशाबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही संधी मिळताच गिलियड लायब्ररीकडे गेलो. मला ज्या देशात नेमण्यात आलं होतं, त्या पॅराग्वेमध्ये बरीच राजकीय आंदोलनं घडली असल्याचं मला कळलं. तिथं पोचल्याच्या थोड्याच काळानंतर, मी एका सकाळी इतर मिशनऱ्यांना विचारलं, रात्रभर कोणता “उत्सव” सुरू होता? ते हसून म्हणाले: “हे इथलं तुझं पहिलं आंदोलन आहे. समोरच्या दारातून बाहेर पाहा.” बाहेर जागोजागी सैनिक उभे होते!
एक रोमांचक अनुभव
एकदा मी विभागीय पर्यवेक्षकासोबत एका दूरच्या मंडळीला भेट देण्यासाठी आणि द न्यू वर्ल्ड सोसायटी इन ॲक्शन हा चित्रपट दाखवण्यासाठी गेलो होतो. आम्ही आधी ट्रेननं, नंतर घोडागाडीनं, आणि शेवटी बैलगाडीनं असा आठ-नऊ तासांचा प्रवास केला. आम्ही आमच्यासोबत एक जेनरेटर आणि चित्रपट दाखवण्यासाठी एक प्रोजेक्टर घेतलं होतं. मंडळीपर्यंत पोचल्यानंतर, आम्ही दुसऱ्या दिवशी शेतमळ्यांवर जाऊन, त्या रात्री दाखवला जाणारा चित्रपट पाहण्यासाठी सर्व लोकांना बोलावलं. चित्रपट पाहायला १४-१५ जण आले.
चित्रपट सुरू झाल्याच्या साधारण २० मिनिटांनी, आम्हाला लवकरात लवकर घरात जायला सांगण्यात आलं. आम्ही प्रोजेक्टर उचलला आणि लगबगीनं घरात शिरलो. हीच ती वेळ होती जेव्हा माणसं जोरजोरानं ओरडून, बंदुकीच्या गोळ्या झाडत म्हणाले: “आमचा देव रक्तपिपासू देव आहे, आणि त्याला या ग्रिन्गोंचं रक्त हवं आहे.” तिथं फक्त दोघंच ग्रिन्गो होते, आणि मी त्यांच्यापैकी एक होतो! त्या जमावानं घरात शिरण्याचा प्रयत्न केला, पण चित्रपट पाहायला आलेल्या लोकांनी त्यांना अडवलं. पहाटे तीनच्या सुमारास ते विरोधक परत आले. बंदुकीच्या गोळ्या झाडत ते म्हणाले, की आम्ही शहरात परत जाताना ते आमच्यावर हल्ला करतील.
बांधवांनी फौजदाराशी संपर्क साधला, आणि तो आम्हाला शहरात घेऊन जाण्यासाठी दुपारी दोन घोडे सोबत घेऊन आला. शहराकडे जाताना वाटेत जिथं कुठं दाट झाडी होती तिथं तो आपली बंदूक ताणून त्या परिसराचं निरीक्षण करण्यासाठी आमच्यापुढं जायचा. या भागात घोडा प्रवासाचं उपयुक्त साधन आहे हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मीही नंतर एक घोडा विकत घेतला.
आणखी मिशनरी आले
प्रचार कार्याचा चर्च पाळकांकडून वारंवार विरोध होऊनही हे कार्य जोरात सुरू राहिलं. १९५५ मध्ये आणखी पाच मिशनरी तिथं आले. त्यांच्यामध्ये कॅनडाची एक तरुण बहीण होती एल्सी स्वॉन्सन, जी गिलियड प्रशालेच्या २५ व्या वर्गाला उपस्थित राहिली होती. काही काळ आम्ही शाखा कार्यालयात सोबत सेवा केली. नंतर तिला दुसऱ्या एका शहरात पाठवण्यात आलं. तिनं यहोवाच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं होतं. तिला तिच्या आईबाबांचा पाठिंबा नव्हता, आणि ते कधीही यहोवाचे साक्षीदार बनले नाहीत. ३१ डिसेंबर १९५७ रोजी आमचं लग्न झालं. आणि पॅराग्वेच्या दक्षिण भागात असलेल्या मिशनरी गृहात आम्ही दोघं राहू लागलो.
आमच्या घरात नळाची सोय नव्हती, तर घरामागं एक विहीर होती. म्हणून घरात न्हाणीघर किंवा टॉयलेट, वॉशिंग मशीन; इतकंच काय तर साधा फ्रिजसुद्धा नव्हता. आम्हाला रोजच भाजीपाला वगैरे विकत घ्यावा लागायचा. पण, साधं राहणीमान आणि मंडळीतल्या बंधुभगिनींसोबतचा प्रेमळ सहवास यांमुळं आमच्या वैवाहिक जीवनाचा तो काळ अगदी सुखात गेला.
१९६३ मध्ये आम्ही आईला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेलो. तिथं पोचल्याच्या थोड्याच काळानंतर, तिला हृदयविकाराचा
झटका आला. हा झटका कदाचित ती दहा वर्षांनंतर आपल्या मुलाला पाहत असल्यामुळं आला असावा. पॅराग्वेला परत जाण्याची वेळ जवळ येऊ लागली, तेव्हा आम्हाला जीवनातील सर्वात कठीण निर्णय घ्यायचा होता. कोणीतरी आईची काळजी घेईल असं मानून तिला एखाद्या इस्पितळात ठेवावं का, आणि आम्हाला आवडणारी सेवा करण्यासाठी पॅराग्वेला परत जावं का? अनेकदा प्रार्थना केल्यावर, आम्ही आईजवळ राहून तिची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. १९६६ मध्ये आई वारली तोपर्यंत आम्ही तिची देखभाल करू शकलो आणि पूर्ण-वेळ सेवादेखील करत राहू शकलो.ऑस्ट्रेलियात अनेक वर्षं विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्याचा आणि वडिलांसाठी असलेल्या राज्य सेवा प्रशालेत प्रशिक्षण देण्याचा मला विशेषाधिकार लाभला. नंतर, आमच्या जीवनात आणखी एक बदल घडून आला. मला ऑस्ट्रेलियातील पहिल्या शाखा समितीचा सदस्य म्हणून नेमण्यात आलं. पुढं, नवीन शाखा कार्यालय बांधलं जाणार होतं तेव्हा मला बांधकाम समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आलं. अनेक अनुभवी बांधवांच्या सहकार्यानं एक सुंदर शाखा कार्यालय उभं राहिलं.
त्यानंतर मला सेवा विभागात नेमण्यात आलं. हा विभाग देशातील प्रचार कार्याची देखरेख करतो. तसंच, मला परिमंडळ पर्यवेक्षक (झोन ओव्हरसियर) या नात्यानं जगभरातील इतर शाखा कार्यालयांना भेटी देऊन मदत व प्रोत्साहन देण्याचा विशेषाधिकारही लाभला. विशेषतः, ज्यांनी यहोवाला विश्वासू राहिल्यामुळं अनेक वर्षं—इतकंच काय तर दशकं—तुरुंगांत आणि छळ छावण्यांमध्ये घालवली होती अशा बंधुभगिनींना भेटी दिल्यानं माझा विश्वास खूप दृढ झाला.
आमची सध्याची नेमणूक
२००१ मध्ये परिमंडळ पर्यवेक्षक म्हणून दौरा करून आल्यानंतर, मला एक पत्र मिळालं. त्या पत्राद्वारे मला, नवीनच स्थापन करण्यात आलेल्या अमेरिका शाखा समितीचा सदस्य म्हणून सेवा करण्यासाठी न्यू यॉर्कमधील ब्रुकलिनला येण्याचं आमंत्रण देण्यात आलं. आम्ही दोघांनी त्या आमंत्रणाविषयी प्रार्थनापूर्वक विचार केला, आणि आनंदानं ती नेमणूक स्वीकारली. आज ११ पेक्षा जास्त वर्षांनंतरही आम्ही ब्रुकलिनमध्ये सेवा करत आहोत.
यहोवाची जी काही इच्छा असेल त्याच्याशी आनंदानं सहकार्य करणारी पत्नी मिळाल्याबद्दल मला खूप समाधान वाटतं. एल्सी व मी आता वयाची ८० वर्षं पार केली आहेत आणि आमचं आरोग्य त्यामानानं अजून चांगलं आहे. आम्ही यहोवाकडून सदासर्वकाळ शिकत राहण्याची, आणि तसंच, जे त्याच्या इच्छेनुसार करतात त्यांना मिळणारे अनेक आशीर्वाद उपभोगण्याची मनस्वी आशा बाळगतो.
[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]
एक आठवडा मी बसनं प्रवास करायचो. दुसऱ्या आठवड्यात ट्रॅमनं, नंतर कारनं किंवा मोटरसायकलच्या मागं बसून एका हातात सूटकेस आणि दुसऱ्या हातात प्रचाराची बॅग घेऊन प्रवास करायचो
[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]
आम्ही यहोवाकडून सदासर्वकाळ शिकत राहण्याची मनस्वी आशा बाळगतो
[१८ पानांवरील चित्रे]
डावीकडे: ऑस्ट्रेलियात विभागीय कार्य करताना
उजवीकडे: आईबाबांसोबत
[२० पानांवरील चित्र]
आमच्या लग्नाच्या दिवशी, ३१ डिसेंबर १९५७