व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा देत असलेले खरे स्वातंत्र्य स्वीकारा

यहोवा देत असलेले खरे स्वातंत्र्य स्वीकारा

यहोवा देत असलेले खरे स्वातंत्र्य स्वीकारा

“स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण” करा.—याको. १:२५.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

कोणत्या नियमामुळे खरे स्वातंत्र्य प्राप्त होते, आणि त्या नियमापासून कोणाला फायदा होतो?

खरे स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे रहस्य काय आहे?

जे जीवनाच्या मार्गावर टिकून राहतात त्यांना भविष्यात कोणते स्वातंत्र्य मिळणार आहे?

१, २. (क) जगातील स्वातंत्र्याचे काय होत चालले आहे, आणि का? (ख) यहोवाच्या सेवकांना कोणते स्वातंत्र्य अनुभवण्याची आशा आहे?

 आपण अशा एका काळात जगत आहोत ज्यात लोभ, अराजकता आणि हिंसा या गोष्टी दिवसेंदिवस वाढत आहेत. (२ तीम. ३:१-५) यामुळे सरकारे आणखी जास्त कायदे बनवतात, पोलीस बल आणखी मजबूत करतात आणि लोकांवर नजर ठेवण्यासाठी जागोजागी कॅमेरे बसवतात. काही देशांमध्ये, नागरिक स्वतः आपल्या घरांत धोक्याची सूचना देणारे अलार्म बसवून घेण्याद्वारे, बरीच कुलुपे लावण्याद्वारे आणि घराभोवती विद्युत कुंपण बसवण्याद्वारे घर आणखी जास्त सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. बरेच लोक रात्री बाहेर निघण्याचे टाळतात. काही जण कोणी मोठा माणूस सोबत असल्याशिवाय मुलांना बाहेर खेळायला पाठवत नाहीत, मग रात्र असो किंवा दिवस. यावरून स्पष्टपणे दिसते, की लोकांचे स्वातंत्र्य दिवसेंदिवस कमी होत चालले आहे, आणि या परिस्थितीत काही सुधार होण्याची आशा वाटत नाही.

एदेन बागेत सैतानाने असा दावा केला होता, की यहोवापासून स्वतंत्र झाल्यानेच एका व्यक्‍तीला खरे स्वातंत्र्य मिळू शकते. सैतानाचा तो दावा द्वेषपूर्ण व अतिशय खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तवात, नैतिकता व आध्यात्मिकता यांच्या बाबतीत देवाने घालून दिलेल्या सीमांचे लोक जितक्या जास्त प्रमाणात उल्लंघन करतात, तितकाच जास्त त्रास समाजाला भोगावा लागतो. दिवसेंदिवस वाईट होत चाललेल्या या परिस्थितीचा आपल्यावरही म्हणजे यहोवाच्या सेवकांवरही परिणाम होतो. तरीसुद्धा, पाप आणि नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होण्याची व बायबल जिला “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” असे म्हणते, ती अनुभवण्याची आशा आपल्याला आहे. (रोम. ८:२१) खरेतर, हे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी यहोवाने त्याच्या सेवकांना तयार करण्यास सुरुवातही केली आहे. ते कसे?

३. यहोवाने ख्रिस्ताच्या अनुयायांना कोणता नियम दिला आहे, आणि आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

याचे उत्तर बायबल लेखक याकोब याने स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाविषयी जे लिहिले त्यातून मिळते. (याकोब १:२५ वाचा.) इतर काही बायबल आवृत्तींमध्ये या वाक्यांशाचे भाषांतर ‘मनुष्याला स्वतंत्र करणारे परिपूर्ण धर्मशास्त्र’ (मराठी कॉमन लँग्वेज) आणि ‘स्वातंत्र्याचा पूर्ण कायदा’ (द न्यू अमेरिकन बायबल) असे करण्यात आले आहे. सर्वसाधारणतः, लोक नियमांचा संबंध स्वातंत्र्याशी नव्हे, तर बंधनांशी जोडतात. तर मग, ‘स्वातंत्र्याचा परिपूर्ण नियम’ काय आहे? आणि तो नियम कशा प्रकारे आपल्याला स्वतंत्र करू शकतो?

स्वतंत्र करणारा नियम

४. ‘स्वातंत्र्याचा परिपूर्ण नियम’ काय आहे, आणि त्याच्यापासून कोणाला फायदा होतो?

‘स्वातंत्र्याचा परिपूर्ण नियम’ म्हणजे मोशेचे नियमशास्त्र नव्हे; कारण ते नियमशास्त्र, इस्राएल लोक पापी आहेत याची त्यांना जाणीव व्हावी म्हणून देण्यात आले होते आणि ख्रिस्ताने ते नियमशास्त्र पूर्ण केले. (मत्त. ५:१७; गलती. ३:१९) तर मग, याकोब कोणत्या नियमाविषयी बोलत होता? त्याच्या मनात “ख्रिस्ताचा नियम” होता, ज्याला ‘विश्‍वासाचा नियम’ आणि ‘माणसाला स्वतंत्र करणारा नियम’ असेही म्हटले आहे. (गलती. ६:२; रोम. ३:२७; याको. २:१२, मराठी कॉमन लँग्वेज) म्हणून, ‘परिपूर्ण नियम’ यात त्या सर्व गोष्टी गोवलेल्या आहेत ज्यांची यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. या नियमापासून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनाच नव्हे, तर दुसऱ्‍या मेंढरांनाही फायदा होतो.—योहा. १०:१६.

५. स्वातंत्र्याच्या नियमाचे पालन करणे कठीण का नाही?

अनेक देशांचे नियम किंवा कायदे गुंतागुंतीचे व पालन करण्यास कठीण असतात. याउलट, ‘स्वातंत्र्याचा परिपूर्ण नियम’ हा सरळ-सोप्या आज्ञा व मूलभूत तत्त्वे यांनी बनलेला आहे. (१ योहा. ५:३) येशूने म्हटले: “माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्त. ११:२९, ३०) तसेच, परिपूर्ण नियमात दंडांची किंवा शिक्षांची लांबलचक यादी असण्याची गरज नाही, कारण हा नियम प्रेमावर आधारित आहे आणि दगडी पाट्यांऐवजी लोकांच्या मनावर व हृदयावर कोरलेला आहे.—इब्री लोकांस ८:६, १० वाचा.

‘परिपूर्ण नियम’ कसा स्वतंत्र करतो?

६, ७. यहोवाच्या स्तरांविषयी काय म्हणता येईल, आणि स्वातंत्र्याचा नियम मुक्‍त करणारा का आहे?

यहोवाने मानवांसाठी ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत त्या त्यांच्या फायद्याकरता आणि संरक्षणाकरता आहेत. उदाहरणार्थ, उर्जा आणि पदार्थ यांच्यावर नियंत्रण करणाऱ्‍या नैसर्गिक नियमांचाच विचार करा. या नियमांमुळे त्रास होत असल्याची कोणीही तक्रार करत नाही. उलट, नैसर्गिक नियम आपल्या भल्याकरता आहेत याची जाणीव बाळगून लोक त्या नियमांची कदर करतात. त्याचप्रमाणे, यहोवाने घालून दिलेले नैतिकतेचे व आध्यात्मिकतेचे स्तर, जे ख्रिस्ताच्या परिपूर्ण नियमातून प्रतिबिंबित होतात ते खरेतर मानवांच्या फायद्याकरता आहेत.

स्वातंत्र्याच्या नियमामुळे आपले संरक्षण तर होतेच, शिवाय त्यामुळे स्वतःला हानी न पोचवता किंवा इतरांच्या हक्कांवर किंवा स्वातंत्र्यावर अतिक्रमण न करता आपल्याला आपल्या उचित इच्छा पूर्ण करणे शक्य होते. तर मग, खऱ्‍या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठी, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे करता येण्यासाठी, आपण योग्य इच्छा अर्थात यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या आणि स्तरांच्या सामंजस्यात असलेल्या इच्छा विकसित केल्या पाहिजेत. दुसऱ्‍या शब्दांत, यहोवाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींसाठी आपण प्रेम विकसित केले पाहिजे आणि तो ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टींचा आपणही द्वेष करण्यास शिकले पाहिजे. स्वातंत्र्याचा नियम हेच करण्यास आपल्याला मदत करतो.—आमो. ५:१५.

८, ९. स्वातंत्र्याच्या नियमाला जे जडून राहतात त्यांना कोणते फायदे मिळतात? उदाहरण द्या.

अपरिपूर्णतेमुळे, आपल्या चुकीच्या इच्छांवर नियंत्रण करणे आपल्याला कठीण जाते. पण तरीसुद्धा, एकनिष्ठपणे स्वातंत्र्याच्या नियमाला जडून राहिल्यास, त्यामध्ये असलेले मुक्‍त करण्याचे सामर्थ्य आपण अनुभवू शकतो. उदाहरणार्थ: जय नावाच्या एका नवीन बायबल विद्यार्थ्याला धूम्रपान करण्याची सवय जडली होती. या वाईट सवयीमुळे देव नाराज होतो हे कळल्यावर त्याला एक निर्णय घ्यावा लागला: आपल्या शारीरिक इच्छेच्या अधीन व्हायचे, की स्वतःला यहोवाच्या अधीन करायचे? ही वाईट सवय सोडणे सोपे नसले, तरी त्याने सुज्ञपणे निर्णय घेऊन देवाची सेवा करण्याचे ठरवले. या सवयीवर मात केल्यावर त्याला कसे वाटले? त्याने म्हटले: “मला गुलामगिरीतून मुक्‍त झाल्यासारखं वाटलं व अतिशय आनंद झाला.”

जय स्वतःच्या अनुभवावरून शिकला, की या जगातील स्वातंत्र्य जे लोकांना “देह स्वभावाचे चिंतन” करण्याची अनुमती देते, ते खरेतर त्यांना गुलाम बनवते. दुसरीकडे पाहता, यहोवा जे स्वातंत्र्य देतो त्याचा अर्थ “आत्म्याचे चिंतन” असून ते लोकांना मुक्‍त करते आणि त्यामुळे “जीवन व शांती” मिळते. (रोम. ८:५, ६) जय ज्या वाईट सवयीचा गुलाम बनला होता तिच्यावर मात करण्याचे सामर्थ्य त्याला कोठून मिळाले? त्याला ते आपोआप नव्हे, तर देवाकडून मिळाले. जयने म्हटले: “मी नियमितपणे बायबलचा अभ्यास करत राहिलो, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली, आणि ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांनी प्रेमळपणे केलेली मदत स्वीकारली.” आपण खरे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असताना या तरतुदी आपल्यालाही साहाय्यक ठरू शकतात. ते कसे, पाहू या.

देवाच्या वचनाचे निरीक्षण करा

१०. देवाच्या नियमाचे “निरीक्षण” करण्याचा काय अर्थ होतो?

१० याकोब १:२५ मध्ये असे म्हटले आहे: “जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, . . . त्याला आपल्या कार्यांत धन्यता मिळेल.” ज्या मूळ ग्रीक शब्दाचे भाषांतर ‘निरीक्षण करणे’ असे केले आहे त्याचा अर्थ “आत पाहण्यासाठी डोकावणे” असा होतो आणि त्यातून लक्ष केंद्रित करून परिश्रम करणे सूचित होते. होय, आपल्या मनावर व हृदयावर स्वातंत्र्याच्या नियमाचा प्रभाव पडावा अशी आपली इच्छा असल्यास, आपण परिश्रमपूर्वक बायबलचा अभ्यास करण्याद्वारे आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन करण्याद्वारे आपली भूमिका पूर्ण केली पाहिजे.—१ तीम. ४:१५.

११, १२. (क) सत्याला आपल्या जीवनक्रमाचा भाग बनवण्याच्या गरजेवर येशूने कशा प्रकारे जोर दिला? (ख) वरील चित्रांत दाखवल्याप्रमाणे, खासकरून तरुणांनी कोणता धोका टाळला पाहिजे?

११ त्यासोबतच, आपण देवाच्या वचनाचे पालन ‘करीत’ राहिले पाहिजे, आणि अशा प्रकारे सत्याला आपल्या जीवनक्रमाचा भाग बनवले पाहिजे. येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या काहींना त्याने जे म्हटले त्यातून त्यानेही हाच विचार व्यक्‍त केला: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.” (योहा. ८:३१, ३२) एक संदर्भग्रंथ म्हणतो, की या ठिकाणी ‘समजणे’ या शब्दाचा अर्थ, एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटणे असाही होतो; कारण ‘समजलेली’ गोष्ट त्या व्यक्‍तीला मोलाची किंवा महत्त्वाची वाटते. अशा रीतीने, आपण सत्याला जेव्हा आपल्या जीवनक्रमाचा भाग बनवतो तेव्हा आपल्याला सत्याचा अर्थ पूर्णपणे समजतो. आणि तेव्हाच आपण उचितपणे असे म्हणू शकतो, की “देवाचे वचन” आपल्यामध्ये “कार्य करीत” आहे, आणि आपल्या स्वर्गातील पित्याचे व्यक्‍तिमत्त्व आणखी चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी ते आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देत आहे.—१ थेस्सलनी. २:१३.

१२ स्वतःला विचारा: ‘मला सत्य खरोखर समजले आहे का? सत्याला मी आपल्या जीवनक्रमाचा भाग बनवला आहे का? की जगातील ‘स्वातंत्र्य’ मला अजूनही हवेहवेसे वाटते?’ एक बहीण जी साक्षीदार कुटुंबात लहानाची मोठी झाली होती, तिने आपल्या तरुणपणातील जीवनाविषयी असे लिहिले: “सत्यात तुमचं संगोपन केलं जातं तेव्हा यहोवा जणू नेहमीच तुमच्या जीवनात असतो. पण माझ्या बाबतीत पाहिल्यास, मी कधीच त्याला खऱ्‍या अर्थानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तो ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टींचा मी कधीही द्वेष करायला शिकले नाही. माझ्या कृतींचा यहोवाशी संबंध आहे असं मला कधीच वाटलं नाही. आणि संकटकाळात त्याला प्रार्थना करण्यास मी कधीच शिकले नाही. मी माझ्या स्वतःच्याच समजबुद्धीवर अवलंबून राहिले, आणि आता मला कळलं आहे, की ही गोष्ट हास्यास्पद होती, कारण माझ्याजवळ खरंतर समजबुद्धीच नव्हती.” आनंदाची गोष्ट म्हणजे त्या बहिणीची विचारसरणी किती चुकीची होती याची तिला नंतर जाणीव झाली, आणि तिने जीवनात काही मोठे फेरबदल केले. ती नंतर सामान्य पायनियर सेवादेखील करू लागली.

स्वतंत्र होण्यासाठी पवित्र आत्म्याची मदत

१३. स्वतंत्र होण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आपल्याला कशा प्रकारे मदत करतो?

१३ दुसरे करिंथकर ३:१७ मध्ये असे म्हटले आहे: “जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.” स्वतंत्र होण्यासाठी पवित्र आत्मा कशा प्रकारे आपल्याला मदत करतो? स्वातंत्र्यासाठी आवश्‍यक असलेल्या इतर गोष्टींसोबतच पवित्र आत्मा आपल्यामध्ये “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” हे गुण उत्पन्‍न करतो. (गलती. ५:२२, २३) या गुणांशिवाय, खासकरून प्रेमाशिवाय कोणताही समाज खऱ्‍या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही, आणि हे आजच्या जगातील सुस्पष्ट दिसणारे वास्तव आहे. लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, आत्म्याच्या फळाचा उल्लेख केल्यावर प्रेषित पौलाने पुढे म्हटले: “अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.” त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? देवाच्या आत्म्याच्या फळाची वाढ रोखण्यासाठी कोणत्याही नियमशास्त्राचे किंवा कायद्याचे बंधन नाही. (गलती. ५:१८) खरेतर, असा कायदा असूच शकत नाही. आपण सदासर्वकाळ ख्रिस्तासारखे गुण विकसित करावेत आणि ते गुण कोणत्याही बंधनाशिवाय प्रदर्शित करावेत अशी यहोवाची इच्छा आहे.

१४. जे लोक स्वतःला या जगाच्या आत्म्याच्या अधीन करतात ते कशा प्रकारे त्याचे गुलाम बनतात?

१४ जे लोक या जगाच्या आत्म्याच्या नियंत्रणात आहेत आणि जे स्वैराचारीपणे वागतात ते कदाचित विचार करतील, की ते स्वतंत्र आहेत. (२ पेत्र २:१८, १९ वाचा.) पण, खरेतर ते जगाच्या आत्म्याचे गुलाम आहेत. आणि त्यांच्या हानिकारक इच्छांना आणि वागणुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी ढीगभर नियमांची व कायद्यांची आवश्‍यकता आहे. पौलाने म्हटले: “नियमशास्त्र नीतिमानासाठी केलेले नाही तर अधर्मी व अनावर” यांच्यासाठी केलेले आहे. (१ तीम. १:९, १०) ते लोक पापाचेही दास आहेत, आणि त्यांच्यावर क्रूरपणे नियंत्रण ठेवणाऱ्‍या “देहाच्या . . . इच्छांप्रमाणे” करण्यास ते प्रवृत होतात. (इफिस. २:१-३) हे लोक जणू अशा मुंग्यांप्रमाणे आहेत ज्या हळूहळू चालत जातात आणि सरळ मधाच्या वाटीत पडतात. ते त्यांच्या इच्छांमुळे प्रवृत्त होऊन लवकरच पाशात अडकतात.—याको. १:१४, १५.

ख्रिस्ती मंडळीत स्वातंत्र्य

१५, १६. ख्रिस्ती मंडळीसोबत आपला सहवास किती महत्त्वाचा आहे, आणि आपण कोणत्या स्वातंत्र्याचा आनंद घेतो?

१५ ख्रिस्ती मंडळीसोबत सहवास करायला सुरुवात करणे हे एखाद्या सामाजिक संस्थेचे सदस्यत्व घेण्यासारखे नाही. यहोवाने तुम्हाला आकर्षित केल्यामुळे तुम्ही ख्रिस्ती मंडळीचा भाग बनलात. (योहा. ६:४४) त्याने तुम्हाला मंडळीत का आणले असावे? तुम्ही एक नीतिमान व देवभीरू व्यक्‍ती असल्याचे त्याने पाहिले होते का? तुम्ही कदाचित म्हणाल, “मुळीच नाही!” तर मग, देवाने काय पाहिले? त्याने तुमच्यामध्ये असे एक हृदय पाहिले जे त्याच्या मुक्‍त करणाऱ्‍या नियमाचा स्वीकार करेल, जे त्याच्या प्रेमळ प्रभावाच्या अधीन होईल. ख्रिस्ती मंडळीत यहोवाने तुम्हाला आध्यात्मिक अन्‍न भरवण्याद्वारे तुमच्या हृदयाचे पोषण केले. त्याने तुम्हाला खोट्या धार्मिक शिकवणींपासून आणि अंधश्रद्धांपासून मुक्‍त केले, आणि ख्रिस्तासारखे व्यक्‍तिमत्त्व कसे विकसित करावे हे शिकवले. (इफिसकर ४:२२-२४ वाचा.) परिणामस्वरूप, तुम्हाला जगातील अशा एकमात्र लोकांमध्ये सामील होण्याचा विशेषाधिकार लाभला आहे, ज्यांना ‘स्वतंत्र’ लोक असे उचितपणे म्हटले जाऊ शकते.—याको. २:१२.

१६ याचा विचार करा: जेव्हा तुम्ही यहोवावर पूर्ण हृदयाने प्रेम करणाऱ्‍यांच्या सहवासात असता, तेव्हा तुम्हाला भीती वाटते का? राज्य सभागृहात बंधुभगिनींशी बोलत असताना, आपले सामान कोणी चोरू नये म्हणून तुम्ही ते घट्ट धरून ठेवता का? मुळीच नाही! बंधुभगिनींच्या सहवासात तुम्हाला अगदी सुरक्षित आणि स्वतंत्र वाटते. जगातील लोकांच्या एखाद्या कार्यक्रमात तुम्हाला असे वाटेल का? नक्कीच नाही! खरे पाहता, देवाच्या लोकांमध्ये आता तुम्ही ज्या स्वातंत्र्याचा आनंद अनुभवत आहात ते भविष्यात मिळणाऱ्‍या स्वातंत्र्याची केवळ एक झलक आहे.

“देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता”

१७. मानवांचे स्वातंत्र्य कशा प्रकारे “देवाच्या पुत्रांच्या प्रकट” होण्याशी संबंधित आहे?

१७ यहोवाने त्याच्या पृथ्वीवरील सेवकांसाठी जे स्वातंत्र्य राखून ठेवले आहे त्याविषयी बोलताना पौलाने असे लिहिले: “सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे.” पुढे त्याने लिहिले: “सृष्टीही स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते.” (रोम. ८:१९-२१) येथे “सृष्टी” असे जे म्हटले आहे ते पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्या मानवांना सूचित करते. या मानवांना आत्म्याने अभिषिक्‍त पुत्रांच्या “प्रकट” होण्यामुळे फायदा होईल. जेव्हा स्वर्गातील जीवनासाठी पुनरुत्थित झालेले हे पुत्र ख्रिस्तासोबत मिळून या पृथ्वीवरून दुष्टता काढून टाकतील व नवीन जगात प्रवेश करण्यासाठी एका मोठ्या लोकसमुदायाचे संरक्षण करतील, तेव्हा पुत्रांचे “प्रकट” होणे सुरू होईल.—प्रकटी. ७:९, १४.

१८. आज्ञाधारक मानवांना कशा प्रकारे अधिकाधिक स्वातंत्र्य मिळत जाईल, आणि शेवटी ते कोणते स्वातंत्र्य अनुभवतील?

१८ सुटका झालेले मानव तेव्हा एक पूर्णपणे नवीन प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवतील—सैतान व त्याच्या दुरात्म्यांच्या प्रभावापासून स्वातंत्र्य. (प्रकटी. २०:१-३) तो किती सुखद अनुभव असेल! त्यानंतर, आदामाकडून वारशाने मिळालेले पाप व अपरिपूर्णता समूळ नाहीशी होईपर्यंत, ख्रिस्ताचे १,४४,००० सहराजे व याजक, प्रगतीशील रीतीने खंडणी बलिदानाचे फायदे लागू करण्याद्वारे मानवजातीला स्वतंत्र करत राहतील. (प्रकटी. ५:९, १०) परीक्षेतही विश्‍वासू असल्याचा पुरावा दिल्यानंतर, मानवजातीला जे परिपूर्ण स्वातंत्र्य देण्याची यहोवाची सुरुवातीला इच्छा होती ते स्वातंत्र्य त्यांना मिळेल—“देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता.” विचार करा! देवाच्या दृष्टीत जे योग्य आहे ते करणे तुम्हाला कठीण जाणार नाही. कारण, तुमचे शरीर, बुद्धी व मन परिपूर्ण झालेले असेल आणि तुमचे व्यक्‍तिमत्त्व पूर्णपणे देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या सामंजस्यात असेल.

१९. खऱ्‍या स्वातंत्र्याच्या मार्गावर टिकून राहण्यासाठी आज आपण काय करत राहिले पाहिजे?

१९ तुम्ही “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” प्राप्त करण्याची उत्कट इच्छा बाळगता का? असल्यास, तुमच्या मनावर व हृदयावर स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचा प्रभाव निरंतर पडू द्या. त्यासाठी, परिश्रमपूर्वक बायबलचा अभ्यास करा. सत्याला तुमच्या जीवनक्रमाचा भाग बनवा व त्यानुसार जगा. पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. ख्रिस्ती मंडळीचा व यहोवा पुरवत असलेल्या आध्यात्मिक अन्‍नाचा पुरेपूर फायदा घ्या. सैतानाने ज्या प्रकारे हव्वेला देवाचे नियम अतिशय कठीण आहेत असा विचार करण्यास लावण्याद्वारे फसवले, त्या प्रकारे त्याने तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. दियाबल सैतान अतिशय धूर्त आहे. पण, आपण पुढील लेखात पाहणार आहोत की “आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ” देण्याची गरज नाही, कारण “त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.”—२ करिंथ. २:११.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्रे]

मला अजूनही जगातील ‘स्वातंत्र्य’ हवेहवेसे वाटते का?

[९ पानांवरील चित्रे]

मी सत्याला माझ्या जीवनक्रमाचा भाग बनवला आहे का?