व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वातंत्र्य देणाऱ्‍या देवाची सेवा करा

स्वातंत्र्य देणाऱ्‍या देवाची सेवा करा

स्वातंत्र्य देणाऱ्‍या देवाची सेवा करा

“देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहा. ५:३.

तुम्ही उत्तर देऊ शकता का?

सैतान कशा प्रकारे देवाचे नियम अतिशय कठीण आहेत असे भासवण्याचा प्रयत्न करतो?

आपण आपल्या सोबत्यांची निवड काळजीपूर्वक का केली पाहिजे?

स्वातंत्र्य देणाऱ्‍या देवाला एकनिष्ठ राहण्यास आपल्याला काय मदत करेल?

१. स्वातंत्र्याकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, आणि आदाम व हव्वा यांच्याशी व्यवहार करताना त्याने हे कसे दाखवले?

 सबंध विश्‍वात केवळ यहोवाच असा आहे ज्याच्या स्वातंत्र्यावर कोणतीच बंधने नाहीत. तरीसुद्धा तो कधीच त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत नाही; तसेच, तो आपल्या सेवकांच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण करण्याचाही प्रयत्न करत नाही. त्याऐवजी, त्याने त्यांना इच्छास्वातंत्र्य दिले आहे ज्यामुळे ते स्वतःहून निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्या सर्व उचित इच्छा पूर्ण करू शकतात. उदाहरणार्थ, देवाने आदाम व हव्वा यांना केवळ एकच बंधनकारक आज्ञा दिली होती—“बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ” खाण्याची मनाई. (उत्प. २:१७) आपल्या निर्माणकर्त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी त्यांना किती अद्‌भुत प्रमाणात स्वातंत्र्य मिळाले होते!

२. देवाने आपल्या पहिल्या आईवडिलांना दिलेले स्वातंत्र्य ते का गमावून बसले?

आपल्या पहिल्या आईवडिलांना देवाने इतके स्वातंत्र्य का दिले होते? त्याने त्यांना स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले होते आणि त्यांना एक विवेकही दिला होता. निर्माणकर्त्याबद्दल वाटणारे प्रेम त्यांना योग्य मार्गाने चालण्यास प्रवृत्त करेल अशी देवाची अपेक्षा होती. (उत्प. १:२७; रोम. २:१५) पण दुःखाची गोष्ट म्हणजे आदाम व हव्वा यांनी, त्यांना जीवन देणाऱ्‍या प्रेमळ देवाबद्दल आणि त्याने दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल कृतज्ञता दाखवली नाही. उलट, सैतानाने देऊ केलेल्या अयोग्य प्रकारच्या स्वातंत्र्याची त्यांनी निवड केली, अर्थात, योग्य काय व अयोग्य काय हे स्वतःहून ठरवण्याचे स्वातंत्र्य. पण, असे केल्यामुळे आपल्या पहिल्या आईवडिलांना पूर्वीपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळाले नाही. उलट त्यांनी स्वतःलाच नव्हे तर त्यांच्या भावी संततीलाही जणू पापाच्या गुलामीत विकले आणि याचे परिणाम साहजिकच अतिशय दुःखदायक होते.—रोम. ५:१२.

३, ४. यहोवाच्या नीतिनियमांच्या बाबतीत सैतान कशा प्रकारे आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतो?

जर सैतान दोन परिपूर्ण मानवांना—शिवाय, अनेक आत्मिक प्राण्यांनाही देवाचे सार्वभौमत्व नाकारण्यास प्रवृत्त करू शकला, तर मग तो आपल्यालाही असे करण्यास नक्कीच प्रवृत्त करू शकतो. त्याचे डावपेच अजूनही फारसे बदललेले नाहीत. आजही तो आपल्याला असा विचार करायला लावतो की देवाचे नीतिनियम कठीण आहेत; त्यांचे पालन केल्यामुळे आपल्याला जीवनात मौज व आनंद उपभोगता येत नाही. (१ योहा. ५:३) अशा प्रकारच्या विचारांचा वारंवार आपल्या मनावर भडिमार झाल्यास ते आपल्या वागणुकीवर बराच प्रभाव पाडू शकतात. लैंगिक अनैतिकतेच्या पाशात सापडलेल्या एका २४ वर्षांच्या बहिणीने असे म्हटले: “माझ्यावर वाईट संगतीचा फार मोठा प्रभाव पडला, कारण मुळातच मला माझ्या मित्रमैत्रिणींपेक्षा वेगळं मत बाळगण्याची भीती वाटायची.” तुम्हीही कदाचित मित्रमैत्रिणींकडून येणारा अशा प्रकारचा दबाव अनुभवला असेल.

दुःखाची गोष्ट म्हणजे, वाईट गोष्टी करण्याचा दबाव कधीकधी ख्रिस्ती मंडळीतील मित्रमैत्रिणींकडूनही येऊ शकतो. एक साक्षीदार तरुण म्हणतो, “मी काही तरुणांना ओळखतो जे सत्यात नसलेल्या व्यक्‍तींसोबत डेटिंग (प्रणयभेटी) करायचे. पण काही काळानं माझ्या लक्षात आलं की मी जितका जास्त या तरुणांच्या सहवासात राहत होतो, तितकाच त्यांच्यासारखा बनू लागलो होतो. याचा माझ्या आध्यात्मिक आरोग्यावर परिणाम झाला. सभांमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या आध्यात्मिक गोष्टी मला कंटाळवाण्या वाटू लागल्या. मी क्वचितच सेवाकार्याला जायचो. तेव्हा मला जाणीव झाली की मी लगेच या मित्रांशी संबंध तोडून टाकले पाहिजेत आणि मी तसंच केलं!” तुमच्या मित्रमैत्रिणींचा तुमच्यावर किती मोठा प्रभाव पडू शकतो याची तुम्हाला जाणीव आहे का? आज आपल्याला साहाय्यक ठरू शकेल असे बायबलमधील एक उदाहरण विचारात घ्या.—रोम. १५:४.

त्याने त्यांची मने हरण केली

५, ६. अबशालोमाने कशा प्रकारे इतरांची फसवणूक केली, आणि त्याचे कारस्थान यशस्वी ठरले का?

बायबलमध्ये अशा बऱ्‍याच जणांची उदाहरणे आहेत ज्यांनी इतरांवर वाईट प्रभाव पाडला. असेच एक उदाहरण दावीद राजाचा पुत्र अबशालोम याचे आहे. अबशालोम अतिशय देखणा होता. पण कालांतराने सैतानाप्रमाणेच त्यानेही लोभी व महत्त्वाकांक्षी भावनांना आपल्या मनात थारा दिला. आणि यामुळे, हक्क नसतानाही, तो आपल्या पित्याचे राजपद मिळवण्याची इच्छा बाळगू लागला. * राजपद बळकावण्यासाठी त्याने एक कारस्थान रचले. त्याने इस्राएली लोकांबद्दल खूपच आपुलकी असल्याचा आव आणला आणि दावीद राजाला त्यांच्याबद्दल काहीच काळजी नाही असे त्यांना पटवून देण्याचा त्याने मोठ्या चलाखीने प्रयत्न केला. एदेन बागेत दियाबलाने जे केले तेच अबशालोमाने केले. इतरांच्या हिताची फार काळजी असल्याचे भासवून त्याने दुष्टपणे स्वतःच्याच पित्याची निंदा केली.—२ शमु. १५:१-५.

अबशालोमाचे हे धूर्त कारस्थान यशस्वी ठरले का? काही प्रमाणात ते यशस्वी ठरले असे म्हणता येईल कारण बायबलमधील अहवालात असे सांगितले आहे: “अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली.” (२ शमु. १५:६) पण, शेवटी मात्र अबशालोमाच्या घमेंडी वृत्तीमुळे त्याचा पराभव झाला. तसेच, यामुळे त्याचाच नव्हे तर त्याच्या डावपेचांना बळी पडलेल्या हजारो लोकांचाही मृत्यू झाला.—२ शमु. १८:७, १४-१७.

७. अबशालोमाच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? (पृष्ठ १४ वरील चित्र पाहा.)

इस्राएली लोक अबशालोमाच्या फसवणुकीला इतक्या सहजासहजी बळी का पडले? अबशालोमाने त्यांना ज्या गोष्टी देण्याचे वचन दिले होते, त्या गोष्टी त्यांना हव्याहव्याशा वाटत असल्यामुळे कदाचित असे घडले असेल. किंवा, ते त्याच्या देखण्या स्वरूपावर भाळले असतील. काहीही असो, पण एक गोष्ट मात्र नक्की: ते यहोवाशी आणि त्याने नियुक्‍त केलेल्या राजाशी एकनिष्ठ नव्हते. आजही, सैतान अबशालोमासारख्या व्यक्‍तींचा उपयोग करून यहोवाच्या सेवकांची मने हरण करण्याचा प्रयत्न करतो. या व्यक्‍ती कदाचित तुम्हाला म्हणतील, ‘यहोवाचे नीतिनियम फारच कडक आहेत. जे यहोवाची सेवा करत नाहीत त्या लोकांना बघा. ते जीवनात किती मौजमजा करतात!’ अशा तिरस्करणीय लबाडीला बळी न पडता तुम्ही देवाला एकनिष्ठ राहाल का? केवळ यहोवाचा परिपूर्ण नियम, अर्थात ख्रिस्ताचा नियम तुम्हाला खरे स्वातंत्र्य देऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवाल का? (याको. १:२५) तर मग, तुम्ही या नियमाची कदर बाळगता हे नेहमी दाखवा आणि तुमच्या ख्रिस्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करण्याचा कधी विचारही करू नका.—१ पेत्र २:१६ वाचा.

८. यहोवाच्या स्तरांचे उल्लंघन केल्याने आनंद मिळत नाही हे कोणत्या वास्तविक उदाहरणांवरून दिसून येते?

आज सैतान खासकरून तरुण लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तिशीत असलेल्या एका बांधवाने त्याच्या किशोरावस्थेबद्दल आठवून असे म्हटले: “यहोवाचे नैतिक स्तर आपल्या संरक्षणासाठी आहेत असं नव्हे, तर बंधनकारक आहेत असं मी मानायचो.” परिणामस्वरूप, तो लैंगिक अनैतिकतेला बळी पडला. पण, यामुळे त्याला आनंद मिळाला नाही. तो म्हणतो: “दोषीपणाच्या भावना मला कितीतरी वर्षांपर्यंत सतावत राहिल्या.” एका बहिणीने आपल्या किशोरवयीन दिवसांबद्दल आठवून असे लिहिले: “अनैतिक कृत्य केल्यावर, तुम्ही स्वतःच्या नजरेतून उतरता. आज १९ वर्षांनंतरही वाईट आठवणी मला सतावतात.” आणखी एक बहीण असे म्हणते: “माझ्या वागणुकीमुळं माझ्या प्रियजनांना किती दुःख झालं याचा विचार करून मी मानसिक, आध्यात्मिक व भावनिक दृष्ट्या अगदी खचून गेले. खरोखर, यहोवाची कृपा नसल्यास जीवन अतिशय दुःखदायक बनतं.” पापपूर्ण कृत्यांमुळे होणाऱ्‍या परिणामांचा तुम्ही विचारच करू नये अशी सैतानाची इच्छा आहे.

९. (क) यहोवाबद्दल आणि त्याचे कायदे व तत्त्वे यांबद्दल आपल्या दृष्टिकोनाचे परीक्षण करण्यास कोणते प्रश्‍न आपल्याला मदत करू शकतात? (ख) देवाला अगदी जवळून जाणून घेणे महत्त्वाचे का आहे?

अनैतिक कृत्यांतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केल्यास मोठी किंमत मोजावी लागते हे सत्यात असलेल्या अनेक तरुणांना—आणि कित्येक वयस्कर लोकांनासुद्धा अतिशय दुःखदायक अनुभवांतून शिकावे लागले आहे. ही गोष्ट किती खेदजनक आहे! (गलती. ६:७, ८) म्हणून स्वतःला विचारा: ‘सैतानाच्या दुष्ट व फसव्या कुयुक्त्या मी ओळखतो का? मी यहोवाला माझा सर्वात जवळचा मित्र मानतो का, आणि तो जे काही सांगतो ते नेहमीच खरे असते आणि माझ्या भल्यासाठीच असते याची मला खातरी आहे का? जी गोष्ट माझ्याकरता खरोखर चांगली आहे आणि जिच्यामुळे मला खऱ्‍या अर्थाने आनंद मिळेल अशी कोणतीही गोष्ट यहोवा माझ्यापासून कधीच राखून ठेवणार नाही यावर मला पूर्ण भरवसा आहे का?’ (यशया ४८:१७, १८ वाचा.) या प्रश्‍नांना मनापासून हो असे उत्तर देण्यासाठी, तुम्हाला यहोवाबद्दल केवळ वरवरचे ज्ञान असून चालणार नाही. तुम्ही त्याला अगदी जवळून जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच, बायबलमधील कायदे व तत्त्वे ही तुमच्यावर बंधने घालण्यासाठी नसून, त्यांतून यहोवाला तुमच्यावर असलेले प्रेम दिसून येते याची जाणीव बाळगणेही गरजेचे आहे.—स्तो. २५:१४.

बुद्धिमान व आज्ञाधारक हृदयासाठी प्रार्थना करा

१०. आपण तरुण राजा शलमोन याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

१० शलमोनाने तरुण असताना प्रार्थनेत नम्रपणे असे म्हटले: “मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही.” त्याने नंतर बुद्धिमान व आज्ञाधारक हृदयासाठी प्रार्थना केली. (१ राजे ३:७-९, १२) यहोवाने त्याच्या प्रामाणिक विनंतीचे उत्तर दिले. तो तुमच्याही प्रार्थनेचे उत्तर देईल, मग तुम्ही तरुण असोत वा वयस्कर. अर्थातच, यहोवा तुम्हाला चमत्कारिक रीत्या समजशक्‍ती व बुद्धी देणार नाही. पण, तुम्ही जर परिश्रमपूर्वक त्याच्या वचनाचा अभ्यास केला, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली, आणि ख्रिस्ती मंडळीद्वारे पुरवल्या जाणाऱ्‍या आध्यात्मिक तरतुदींचा पूर्ण फायदा घेतला, तर तो तुम्हाला बुद्धिमान बनवेल. (याको. १:५) खरेच, जे लोक यहोवाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात त्यांपेक्षा, इतकेच काय तर या जगात ज्यांना “ज्ञानी आणि विचारवंत” असे म्हटले जाते अशा सर्व लोकांपेक्षा यहोवा त्याच्या तरुण सेवकांना या तरतुदींद्वारे बुद्धिमान बनवू शकतो.—लूक १०:२१; स्तोत्र ११९:९८-१०० वाचा.

११-१३. (क) स्तोत्र २६:४, नीतिसूत्रे १३:२० आणि १ करिंथकर १५:३३ या वचनांतून आपण कोणते मौल्यवान धडे शिकू शकतो? (ख) शास्त्रवचनांतील ही तत्त्वे तुम्ही कशा प्रकारे लागू कराल?

११ यहोवाला अगदी जवळून जाणून घेण्यासाठी बायबलचा अभ्यास करणे आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन करणे किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील शास्त्रवचनांचा विचार करा. प्रत्येक वचनात, आपण कशा प्रकारचे सोबती निवडावेत याविषयी एक महत्त्वाचे तत्त्व दिलेले आहे: “अधम लोकांत मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही.” (स्तो. २६:४) “सुज्ञ लोकांत वावरणारा सुज्ञ बनतो; मूर्खांचा सोबती पस्तावतो.” (नीति. १३:२०, मराठी कॉमन लँग्वेज) “वाईट सोबती चांगल्या सवयी बिघडवितात.”—१ करिंथ. १५:३३, ईझी-टू-रीड व्हर्शन.

१२ या वचनांतून आपण कोणते मौल्यवान धडे शिकू शकतो? (१) आपण आपले सोबती विचारपूर्वक निवडावेत अशी यहोवाची इच्छा आहे. तो नैतिक व आध्यात्मिक रीत्या आपले संरक्षण करू इच्छितो. (२) आपण ज्या लोकांची संगत धरतो त्यांचा आपल्यावर चांगला किंवा वाईट प्रभाव पडतो; हे जीवनातील एक वास्तव आहे. वरील वचनांत ज्या प्रकारे शब्द मांडण्यात आले आहेत त्यावरून दिसून येते की यहोवा आपल्या हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. ते कसे? वरील कोणतेही वचन नियमाच्या रूपात दिलेले नाही, जसे की, “तू असे करू नको. . . ” त्याऐवजी, ती सुस्पष्ट अशी सत्य विधाने आहेत. दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा आपल्याला असे म्हणत आहे: ‘वस्तुस्थिती अशी आहे. तू कशा प्रकारे प्रतिसाद देणार? तुझ्या हृदयात काय आहे?’

१३ वरील तिन्ही वचनांमध्ये सांगितलेल्या गोष्टी मूलभूत सत्ये आहेत, त्यामुळे ती सर्व काळांसाठी उपयुक्‍त आहेत आणि ती सत्ये बऱ्‍याच परिस्थितींत लागू होतात. उदाहरणार्थ, स्वतःला पुढील प्रश्‍न विचारा: जे “कपटी” आहेत अशा लोकांची संगत धरण्याचे मी कसे टाळू शकतो? कोणत्या परिस्थितींत मी अशा लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे? (नीति. ३:३२; ६:१२) मी ज्यांची संगत धरावी अशी यहोवाची इच्छा आहे, ते “सुज्ञ” लोक कोण आहेत? मी ज्यांना टाळले पाहिजे अशी यहोवाची इच्छा आहे, ते ‘मूर्ख’ लोक कोण आहेत? (स्तो. १११:१०; ११२:१; नीति. १:७) वाईट सोबती निवडल्यामुळे माझ्या कोणत्या “चांगल्या सवयी” बिघडू शकतात? मी फक्‍त जगातील लोकांमध्येच वाईट सोबत्यांच्या संपर्कात येऊ शकतो का? (२ पेत्र २:१-३) तुम्ही या प्रश्‍नांची उत्तरे कशी द्याल?

१४. तुम्ही आपली कौटुंबिक उपासना आणखी अर्थपूर्ण कशी बनवू शकता?

१४ शास्त्रवचनांवर अशा प्रकारे तर्क केल्यानंतर, तुम्ही बायबलमधील अशा इतर वचनांचेही परीक्षण करू शकता का, ज्यांतून तुमच्या व तुमच्या कुटुंबाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींविषयी देवाची विचारसरणी काय आहे हे तुम्हाला कळून येईल? * आईवडिलांनो, अशा विषयांवर तुम्ही तुमच्या कौटुंबिक उपासनेत चर्चा करू शकता. असे करताना हे लक्षात ठेवा, की देवाच्या नियमांतून व तत्त्वांतून त्याचे आपल्यावर खूप प्रेम असल्याचे दिसून येते, याची कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जाणीव करून देणे हा तुमचा हेतू आहे. (स्तो. ११९:७२) होय, अशा प्रकारच्या अभ्यासामुळे कुटुंबातील सर्व जण यहोवाच्या व एकमेकांच्या आणखी जवळ येतील.

१५. तुम्ही एक बुद्धिमान व आज्ञाधारक हृदय विकसित करत आहात हे तुम्ही कसे म्हणू शकता?

१५ तुम्ही एक बुद्धिमान व आज्ञाधारक हृदय विकसित करत आहात हे तुम्ही कसे म्हणू शकता? असे करण्याचा एक मार्ग आहे गतकाळातील देवाच्या विश्‍वासू सेवकांच्या, जसे की दावीद राजाच्या, विचारसरणीची तुलना तुमच्या विचारसरणीशी करून पाहणे. दाविदाने असे लिहिले: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” (स्तो. ४०:८) त्याचप्रमाणे, स्तोत्र ११९ च्या लेखकाने असे लिहिले: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.” (स्तो. ११९:९७) असे प्रेम केवळ वरवरच्या ज्ञानाने विकसित होत नाही. तर, ते प्रेम सखोल अभ्यास, प्रार्थना, मनन यांमुळे विकसित होते. तसेच, देवाच्या स्तरांचे पालन केल्याने अनेक आशीर्वाद मिळतात हे जेव्हा तुम्ही स्वतः अनुभवता तेव्हादेखील हे प्रेम विकसित होते.—स्तो. ३४:८.

तुमच्या ख्रिस्ती स्वातंत्र्यासाठी संघर्ष करा

१६. खरे स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या संघर्षात आपल्याला विजयी व्हायचे असेल, तर आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?

१६ सबंध इतिहासात, अनेक राष्ट्रांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली युद्धे लढली आहेत. तर मग, तुम्ही आपल्या ख्रिस्ती स्वातंत्र्यासाठी, आध्यात्मिक रीत्या संघर्ष करण्यास किती जास्त तयार असले पाहिजे! सैतान, हे जग, आणि या जगाचा विषारी आत्मा हेच केवळ तुमचे शत्रू नाहीत हे लक्षात ठेवा. तुम्हाला स्वतःच्या अपरिपूर्णतेशी, तसेच तुमच्या कपटी हृदयाशीही संघर्ष करावा लागणार आहे. (यिर्म. १७:९; इफिस. २:३) असे असले, तरी यहोवाच्या मदतीने तुम्ही या संघर्षात विजयी ठरू शकता. इतकेच काय, तर प्रत्येक विजयाचे, मग तो मोठा असो की लहान, कमीत कमी दोन चांगले परिणाम घडून येतील. पहिला, तुम्ही यहोवाचे मन आनंदित कराल. (नीति. २७:११) दुसरा, स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमात मुक्‍त करण्याचे सामर्थ्य आहे हे जेव्हा तुम्ही स्वतः अनुभवाल, तेव्हा जीवनाच्या “संकोचित” मार्गावर टिकून राहण्याचा तुमचा निर्धार आणखी पक्का होईल. कालांतराने, तुम्ही अधिकाधिक स्वातंत्र्याचा आनंद अनुभवाल, जे यहोवाला एकनिष्ठ राहणाऱ्‍यांना भविष्यात मिळणार आहे.—याको. १:२५; मत्त. ७:१३, १४.

१७. आपल्या अपरिपूर्णतांमुळे आपण खचून जाण्याची गरज का नाही, आणि यहोवाने कोणत्या मदतीची तरतूद केली आहे?

१७ अर्थातच, आपण सर्व जण कधी ना कधी चुका करतो. (उप. ७:२०) पण, असे घडते तेव्हा आपण कवडीमोल आहोत असा विचार करू नका किंवा अगदीच खचून जाऊ नका. तुमच्या हातून एखादी चूक झाल्यास, ती सुधारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. त्यासाठी मंडळीच्या वडिलांची मदत मागावी लागत असेल, तर त्यांची मदत मागा. याकोबाने असे लिहिले: “विश्‍वासाची प्रार्थना दुखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.” (याको. ५:१५) होय, हे कधीही विसरू नका, की देव खरोखर दयाळू आहे आणि त्याने तुमच्या हृदयात काहीतरी चांगले पाहिले असल्यामुळेच त्याने तुम्हाला मंडळीत आकर्षित केले आहे. (स्तोत्र १०३:८, ९ वाचा.) तुम्ही पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करत राहाल, तर तो कधीच तुमचा त्याग करणार नाही.—१ इति. २८:९.

१८. यहोवाचे संरक्षण मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१८ येशूने त्याच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री आपल्या ११ विश्‍वासू प्रेषितांसोबत प्रार्थना करत असताना, या अविस्मरणीय शब्दांत त्यांच्या वतीने देवाला विनंती केली: “तू त्यांना त्या दुष्टापासून राखावे.” (योहा. १७:१५, सुबोधभाषांतर) येशूला केवळ त्याच्या प्रेषितांचीच काळजी नव्हती, तर त्याला आजही त्याच्या सर्व अनुयायांची काळजी आहे. म्हणून, आपण ही खातरी बाळगू शकतो, की यहोवा येशूच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि या कठीण दिवसांदरम्यान आपले संरक्षण करेल. “सात्विकपणे चालणाऱ्‍यांस तो ढाल आहे,” आणि तो “आपल्या भक्‍तांचा मार्ग” संभाळेल. (नीति. २:७, ८) होय, एकनिष्ठेच्या मार्गात अडथळे येणार नाहीत असे नाही; पण कोणतेही अडथळे आलेत, तरी अनंतकाळच्या जीवनाकडे व खऱ्‍या स्वातंत्र्याकडे नेणारा हाच एकमेव मार्ग आहे. (रोम. ८:२१) तेव्हा, कोणीही तुम्हाला या मार्गापासून परावृत्त करू नये म्हणून सावध राहा!

[तळटीपा]

^ परि. 5 दाविदाचा एक भावी ‘वंशज’ त्याच्यामागून राजा बनेल हे अभिवचन देवाने अबशालोमाचा जन्म झाल्यानंतर दिले होते. त्यामुळे, दाविदानंतर राजा बनण्यासाठी यहोवाने आपल्याला निवडलेले नाही हे अबशालोमाला माहीत असायला हवे होते.—२ शमु. ३:३; ७:१२.

^ परि. 14 याची चांगली उदाहरणे आहेत १ करिंथकर १३:४-८, जेथे पौल प्रेमाचे वर्णन करतो, आणि स्तोत्र १९:७-११, जेथे यहोवाच्या नियमांचे पालन केल्याने मिळणाऱ्‍या आशीर्वादांविषयी सांगितले आहे.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्रे]

आपण कशा प्रकारे अबशालोमासारख्या व्यक्‍तींना ओळखून त्यांच्यापासून सावध राहू शकतो?