व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खंबीर राहा आणि सैतानाचे पाश टाळा!

खंबीर राहा आणि सैतानाचे पाश टाळा!

खंबीर राहा आणि सैतानाचे पाश टाळा!

“सैतानाच्या डावपेचांपुढे” टिकाव धरा. —इफिस. ६:११.

तुमचे उत्तर काय असेल?

यहोवाचा एखादा सेवक भौतिकवादाच्या पाशात अडकण्याचे कसे टाळू शकतो?

व्यभिचाराचा पाश टाळण्यास एका विवाहित ख्रिश्‍चनाला काय साहाय्यक ठरू शकते?

भौतिकवाद व लैंगिक अनैतिकता यांचा खंबीरपणे प्रतिकार केल्याने फायदा होतो असे तुम्हाला का वाटते?

१, २. (क) सैतानाला अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांबद्दल व दुसऱ्‍या मेढरांबद्दल दयामाया का नाही? (ख) या लेखात सैतानाच्या कोणत्या पाशांची चर्चा केली जाईल?

 दियाबल सैतानाला मनुष्यांबद्दल, खासकरून यहोवाच्या सेवकांबद्दल मुळीच दयामाया नाही. खरेतर, सैतान अभिषिक्‍त शेषजनांसोबत लढाई करत आहे. (प्रकटी. १२:१७) या धैर्यवान ख्रिश्‍चनांनी आधुनिक दिवसांत देवाच्या राज्याच्या प्रचार कार्यात पुढाकार घेतला आहे आणि सैतान या जगाचा शासक आहे हे त्यांनी उघड केले आहे. दियाबलाला दुसऱ्‍या मेढरांबद्दलही मुळीच दयामाया नाही; कारण ते अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पाठिंबा देतात. शिवाय, त्यांना अनंतकाळचे जीवन मिळणार आहे. (योहा. १०:१६) पण, सैतानाने मात्र ही आशा गमावली आहे आणि त्यामुळे तो साहजिकच संतापलेला आहे! आपल्याला स्वर्गातील जीवनाची आशा असो वा पृथ्वीवरील जीवनाची, आपले भले व्हावे अशी नक्कीच सैतानाची इच्छा नाही. तर, आपल्याला बळी बनवणे हा एकच त्याचा उद्देश आहे.—१ पेत्र ५:८.

सैतानाने त्याचा उद्देश साध्य करण्यासाठी अनेक प्रकारचे पाश रचले आहेत. त्याने देवावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांची मने आंधळी केली आहेत. त्यामुळे, ते राज्याच्या सुवार्तेचा स्वीकार करत नाहीत आणि हे पाश पाहू शकत नाहीत. पण, राज्याची सुवार्ता स्वीकारलेल्या काही लोकांनाही दियाबल त्याच्या पाशात अडकवतो. (२ करिंथ. ४:३, ४) मागील लेखात आपण पाहिले होते की सैतानाचे तीन पाश आपण कसे टाळू शकतो: (१) अविचारी संभाषण, (२) भीती व दबाव, आणि (३) अवास्तव प्रमाणात दोषीपणाची भावना. सैतानाच्या आणखी दोन पाशांविरुद्ध आपण कशा प्रकारे खंबीरपणे उभे राहू शकतो याची आता आपण चर्चा करू या. ते पाश आहेत: भौतिकवाद आणि व्यभिचार करण्याचे प्रलोभन.

भौतिकवाद—गुदमरून टाकणारा पाश

३, ४. या जगातील चिंतांमुळे आपण भौतिकवादाच्या जाळ्यात कसे अडकू शकतो?

येशूने त्याच्या एका दृष्टान्तात काटेरी झुडपांमध्ये पेरलेल्या बीचा उल्लेख केला होता. त्याने सांगितले होते की एखादा मनुष्य वचन ऐकतो, “परंतु जगाची चिंता व द्रव्याची भूल ही वचनाला गुदमरवितात आणि तो निष्फळ होतो.” (मत्त. १३:२२, पं.र.भा.) खरोखर, भौतिकवाद हा एक पाश आहे ज्याचा उपयोग आपला शत्रू सैतान करतो.

दोन घटक एकत्र येतात तेव्हा वचनाला गुदमरून टाकतात. त्यांपैकी एक घटक आहे या “जगाची चिंता.” आजच्या काळातील “कठीण” दिवसांत बऱ्‍याच गोष्टींमुळे तुम्ही चिंतित होऊ शकता. (२ तीम. ३:१) वाढत्या महागाईमुळे व बेरोजगारीमुळे उदरनिर्वाह करणे तुम्हाला कठीण वाटू शकते. तुम्हाला कदाचित भविष्याचीही चिंता वाटेल आणि तुम्हाला हा प्रश्‍न पडेल, ‘सेवानिवृत्त झाल्यावर माझ्याकडे पुरेसे पैसे असतील का?’ अशा प्रकारच्या चिंतेमुळे काहींनी श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना वाटते की भरपूर पैसा असल्यास आपल्याला सुरक्षितता लाभेल.

५. पैशाचा लोभ कशा प्रकारे पाश ठरू शकतो?

येशूने आणखी एका घटकाविषयी सांगितले—“द्रव्याची भूल.” पैशाचा लोभ आणि चिंता हे दोन घटक मिळून वचनाला गुदमरून टाकू शकतात. पैसा “आश्रय देणारा आहे” असे बायबल म्हणते. (उप. ७:१२) पण, पैसा कमवण्याच्या मागे लागणे हे सुज्ञतेचे नाही. अनेकांना हे कळून चुकले आहे की श्रीमंत होण्याचा ते जितका जास्त प्रयत्न करतात तितकेच ते भौतिकवादाच्या जाळ्यात अडकतात. काही जण तर पैशाचे गुलाम बनले आहेत.—मत्त. ६:२४.

६, ७. (क) आणखी जास्त पैसा कमवण्याचा धोका नोकरीच्या ठिकाणी कसा संभवू शकतो? (ख) ओव्हरटाईम करण्याबाबत एका ख्रिश्‍चनाने कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत?

श्रीमंत होण्याची इच्छा नकळतपणे तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, पुढील परिस्थितीचा विचार करा. तुमचा बॉस तुम्हाला म्हणतो: “एक चांगली बातमी आहे! आपल्या कंपनीला एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. याचा अर्थ पुढील काही महिने बरेचदा ओव्हरटाईम करावा लागेल. पण, यासाठी भरपूर पैसे मिळतील याची मी गॅरंटी देतो.” असा प्रस्ताव तुमच्यासमोर मांडण्यात आल्यास तुमची प्रतिक्रिया काय असेल? अर्थातच, तुमच्या कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याची गंभीर जबाबदारी तुमच्यावर आहे; पण तुमच्यावर ही एकच जबाबदारी नाही. (१ तीम. ५:८) इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांचा तुम्ही विचार करणे गरजेचे आहे. किती ओव्हरटाईम करावा लागेल? तुमची नोकरी तुमच्या आध्यात्मिक कार्यांच्या, जसे की मंडळीच्या सभांच्या आणि दर आठवड्यातील कौटुंबिक उपासनेच्या आड येईल का?

कोणता निर्णय घ्यावा याचा विचार करताना तुम्ही कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व द्याल—तुमच्या बँक खात्यातील रक्कम कशी वाढेल याला, की तुमच्या आध्यात्मिकतेवर कोणता परिणाम होईल याला? जास्त पैसा कमवण्याच्या उत्सुकतेपोटी तुम्ही देवाच्या राज्याशी संबंधित गोष्टींना प्राधान्य देण्याकडे दुर्लक्ष कराल का? तुम्ही तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास भौतिकवादाचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे तुमच्या लक्षात आले का? सध्या तुमच्यासोबत असे घडत असेल, तर तुम्ही कशा प्रकारे खंबीर राहू शकता आणि भौतिकवादाने गुदमरून जाण्याचे कसे टाळू शकता?—१ तीमथ्य ६:९, १० वाचा.

८. बायबलमधील कोणत्या उदाहरणांचा विचार केल्यास तुम्हाला आपल्या जीवनशैलीचे परीक्षण करण्यास साहाय्य मिळेल?

भौतिकवादामुळे गुदमरून जाण्याचे टाळण्यासाठी अधूनमधून आपल्या जीवनशैलीचे परीक्षण करा. एसावासारखे कधीही वागू नका, ज्याने त्याच्या कृतींद्वारे आध्यात्मिक गोष्टींना तुच्छ लेखत असल्याचे दाखवून दिले! (उत्प. २५:३४; इब्री १२:१६) आणि तुम्ही त्या श्रीमंत माणसासारखे नक्कीच असू नये, ज्याला त्याची मालमत्ता विकून गरिबांना देण्यास आणि येशूचे अनुकरण करण्यास सांगण्यात आले होते. तसे न करता तो माणूस “खिन्‍न होऊन निघून गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती.” (मत्त. १९:२१, २२) धनसंपत्तीच्या जाळ्यात अडकून त्याने एक मोठा विशेषाधिकार गमावला—पृथ्वीवर होऊन गेलेल्या सर्वश्रेष्ठ मनुष्याचा शिष्य बनण्याचा विशेषाधिकार! तेव्हा, येशू ख्रिस्ताचा शिष्य बनण्याचा जो सुहक्क तुम्हाला मिळाला आहे तो तुम्ही गमावू नये म्हणून काळजी घ्या.

९, १०. भौतिक गोष्टींविषयी बायबलचा दृष्टिकोन काय आहे?

भौतिक गोष्टींची अवाजवी चिंता टाळण्यासाठी येशूने दिलेल्या सल्ल्याचे पालन करा: “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.”—मत्त. ६:३१, ३२; लूक २१:३४, ३५.

१० श्रीमंत बनण्याच्या पाशात अडकण्याऐवजी, बायबल लेखक आगूर याच्यासारखा दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करा. त्याने म्हटले: “मला खूप श्रीमंत वा खूप गरीब करू नकोस. मला रोज लागणाऱ्‍या गोष्टीच फक्‍त दे.” (नीति. ३०:८, ईझी-टू-रीड व्हर्शन) यावरून स्पष्ट दिसते, की पैशामुळे संरक्षण तर होते, पण तो पाशदेखील ठरू शकतो हे आगूरला समजले होते. या जगाची चिंता आणि पैशाचा लोभ यांमुळे आध्यात्मिकतेला नुकसान पोहचू शकते हे लक्षात असू द्या. भौतिक गोष्टींबद्दल अवाजवी चिंता केल्याने तुमचा वेळ व शक्‍ती वाया जाऊ शकते, आणि यामुळे राज्याशी संबंधित गोष्टी करण्यासाठी तुमच्यामध्ये इच्छाच उरणार नाही. म्हणून, सैतानाने रचलेल्या भौतिकवादाच्या पाशात न सापडण्याचा दृढनिश्‍चय करा!—इब्री लोकांस १३:५ वाचा.

व्यभिचार —एक छुपा पाश

११, १२. एक ख्रिस्ती कामाच्या ठिकाणी व्यभिचार करण्याच्या पाशात कसा पडू शकतो?

११ एखाद्या ताकदवान प्राण्याला पकडण्यासाठी शिकारी त्याच्या येण्याजाण्याच्या वाटेत एक खड्डा खणतात. मग खड्ड्यावर काड्या व माती टाकून प्राण्याला दिसणार नाही अशा प्रकारे खड्डा झाकतात. अशाच प्रकारच्या एका पाशाचा उपयोग करण्यात सैतानाला खूप यश आले आहे. हा पाश आहे लैंगिक अनैतिकतेचे पाप. (नीति. २२:१४; २३:२७) अनेक ख्रिस्ती या पाशात पडले आहेत, कारण त्यांनी अनैतिक वर्तन करणे सोपे जाईल अशा प्रकारच्या परिस्थितीत स्वतःला येऊ दिले आहे. काही विवाहित ख्रिश्‍चनांनी विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत अयोग्य प्रकारची मैत्री केल्यामुळे त्यांच्या हातून व्यभिचाराचे पाप घडले आहे.

१२ तुमच्या नोकरीच्या ठिकाणी अशी अयोग्य प्रकारची मैत्री निर्माण होऊ शकते. खरेतर, एका अभ्यासात असे दिसून आले आहे की व्यभिचार करणाऱ्‍या स्त्रियांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त स्त्रियांनी आणि व्यभिचार करणाऱ्‍या ४ पैकी जवळजवळ ३ पुरुषांनी आपल्या सहकर्मचाऱ्‍यासोबत व्यभिचार केला आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा संबंध विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत येतो का? असल्यास, त्यांच्यासोबत तुमचे नाते कशा प्रकारचे आहे? त्यांच्याशी तुम्ही फक्‍त कामापुरता संबंध ठेवता का, ज्यामुळे या संबंधाचे रूपांतर अयोग्य प्रकारच्या मैत्रीत होणार नाही? उदाहरणार्थ, एक ख्रिस्ती बहीण एखाद्या पुरुष सहकाऱ्‍याशी वारंवार इकडच्या-तिकडच्या गोष्टी करते. हळूहळू ती त्याच्यावर इतका भरवसा करायला लागते की ती त्याला आपल्या वैवाहिक समस्यांबद्दलही सांगते. आणखी एका परिस्थितीत, एक बांधव आपल्या स्त्री सहकाऱ्‍याशी मैत्री केल्यानंतर कदाचित असा तर्क करेल: “माझी मतं तिला पटतात आणि मी बोलतो तेव्हा ती लक्ष देऊन ऐकते. आणि ती माझी कदर करते. माझ्या पत्नीकडून मला अशीच वागणूक मिळाली असती तर किती बरं झालं असतं!” अशा परिस्थितींत एक ख्रिस्ती किती सहजासहजी व्यभिचाराच्या पाशात पडू शकतो याकडे तुम्ही लक्ष दिले आहे का?

१३. मंडळीत विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत अयोग्य प्रकारची मैत्री कशा प्रकारे निर्माण होऊ शकते?

१३ मंडळीतही विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत अयोग्य प्रकारची मैत्री निर्माण होऊ शकते. या सत्यघटनेचा विचार करा. डॅनियल आणि त्याची पत्नी सारा * हे सामान्य पायनियर होते. डॅनियल मंडळीत एक वडीलही होता, जो कधीच कोणत्याही विशेषाधिकाराला “नाही” म्हणत नव्हता. तो पाच तरुणांसोबत बायबल अभ्यास चालवायचा, ज्यांपैकी तिघांनी बाप्तिस्मा घेतला. नवीनच बाप्तिस्मा घेतलेल्या या बांधवांना बऱ्‍याच बाबतींत मदतीची गरज होती. डॅनियल मंडळीतील जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यात व्यस्त असायचा तेव्हा सहसा सारा या बांधवांना मदत करायची. हळूहळू असे वारंवार घडू लागले: डॅनियलच्या बायबल विद्यार्थ्यांना ज्या भावनिक मदतीची गरज होती ती त्यांना साराकडून मिळायची. शिवाय, साराला हवा असलेला भावनिक आधार तिला डॅनियलच्या बायबल विद्यार्थ्यांकडून मिळू लागला. अशा प्रकारे एक जीवघेणा पाश रचला गेला. डॅनियल म्हणतो: “महिनो न्‌ महिने इतरांना मदत दिल्यामुळं माझी पत्नी आध्यात्मिक व भावनिक रीत्या कमजोर झाली. शिवाय, मीदेखील तिच्याकडे दुर्लक्ष करत होतो त्यामुळं घटनांनी भयंकर वळण घेतलं. माझ्या पत्नीनं माझ्या एका बायबल विद्यार्थ्यासोबत व्यभिचार केला. ती अगदी माझ्या डोळ्यांसमोर आध्यात्मिक रीत्या कमजोर झाली. आणि मी मंडळीतील माझ्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यात इतका व्यस्त होतो की हे माझ्या लक्षातही आलं नाही.” अशी दुःखद घटना तुम्ही कशी टाळू शकता?

१४, १५. व्यभिचाराचा पाश टाळण्यासाठी विवाहित ख्रिश्‍चनांना कोणत्या गोष्टी साहाय्यक ठरू शकतात?

१४ व्यभिचाराचा पाश टाळण्यासाठी, आपल्या विवाहसोबत्याला एकनिष्ठ राहण्याचा काय अर्थ होतो यावर मनन करा. येशूने म्हटले: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्त. १९:६) मंडळीतील विशेषाधिकार तुमच्या विवाहसोबत्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असा विचार कधीही करू नका. शिवाय, याची जाणीव ठेवा की आपल्या सोबत्याला एकटे सोडून तुम्ही अनावश्‍यक गोष्टींमध्ये वारंवार वेळ घालवत असाल, तर हे तुमचे वैवाहिक बंधन कमजोर झाल्याचे लक्षण असू शकते; आणि यामुळे तुम्ही मोहात पडण्याची व गंभीर पाप करण्याची शक्यता आहे.

१५ पण, तुम्ही जर मंडळीत एक वडील असाल तर कळपाचे काय? प्रेषित पेत्राने लिहिले: “तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा.” (१ पेत्र ५:२) मंडळीत तुमच्या देखरेखीखाली असलेल्यांकडे तुम्ही नक्कीच दुर्लक्ष करू नये. पण, मेंढपाळ या नात्याने आपली भूमिका पार पाडताना तुम्ही तुमच्या पत्नीकडे दुर्लक्ष करू नये. तुमच्या विवाहसोबत्याला तुमची गरज असताना तुम्ही आपले सर्व लक्ष मंडळीच्या गरजा पूर्ण करण्याकडे लावणे निरर्थकच नव्हे, तर धोकादायक आहे. डॅनियल म्हणतो: “मंडळीतील विशेषाधिकार हाताळण्यात तुम्ही इतके गुरफटून जाऊ नये की त्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल.”

१६, १७. (क) अयोग्य प्रकारची मैत्री करण्यासाठी आपण उपलब्ध नाही हे दाखवण्यासाठी विवाहित ख्रिस्ती कोणती व्यावहारिक पावले उचलू शकतात? (ख) ख्रिस्ती कशा प्रकारे व्यभिचाराचा पाश टाळू शकतात याविषयी आपल्या साहित्यात प्रकाशित झालेल्या लेखांची उदाहरणे सांगा.

१६ व्यभिचाराचा पाश टाळण्यास विवाहित ख्रिश्‍चनांना साहाय्यक ठरेल असा पुष्कळ चांगला सल्ला टेहळणी बुरूज नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज, १५ सप्टेंबर २००६ च्या अंकात हा सल्ला देण्यात आला: “कामाच्या ठिकाणी आणि इतरत्र, जवळीक निर्माण होईल अशा प्रसंगांपासून सावधान राहा. उदाहरणार्थ, विरुद्धलिंगी व्यक्‍तीबरोबर जास्त वेळ घालवल्यास मोहात पाडणारा प्रसंग निर्माण होऊ शकतो. विवाहित स्त्री अथवा पुरुष या नात्याने तुम्ही तुमच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून दाखवले पाहिजे, की तुम्ही तुमच्या वैवाहिक जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही जवळीक करू इच्छित नाही. ईश्‍वरी भक्‍तीचे आचरण करणारी व्यक्‍ती या नात्याने तुम्ही, विरुद्धलिंगी व्यक्‍तीबरोबर प्रणयचेष्टा करण्याद्वारे किंवा आपल्या असभ्य पेहरावाद्वारे इतरांचे लक्ष विनाकारण आपल्याकडे आकर्षित करणार नाही. . . . कामाच्या ठिकाणी आपल्या विवाहसोबत्याचे आणि आपल्या मुलांचे फोटो लावण्याद्वारे तुम्ही स्वतःला आणि इतरांनाही याची आठवण करून देता, की तुमचे कुटुंब तुम्हाला प्रिय आहे. इतरांच्या प्रणयी हालचालींना प्रोत्साहन किंवा त्या सहनही न करण्याचा दृढनिश्‍चय करा.”

१७ टेहळणी बुरूज, १५ जुलै १९९४ अंकातील “तुमच्या विवाहास टिकाऊ बंधन बनवा” असे शीर्षक असलेल्या लेखात, आपल्या विवाहसोबत्याव्यतिरिक्‍त दुसऱ्‍या कोणाविषयी अनैतिक कल्पना मनात आणणे किती धोकादायक असू शकते याविषयी सांगण्यात आले होते. या लेखात, “एकमेकांना विश्‍वासू राहा” या उपशीर्षकाखाली असे सांगण्यात आले होते, की अशा अनैतिक कल्पनांमध्ये रमल्यामुळे व्यभिचाराच्या पाशात अडकण्याचा जास्त धोका संभवू शकतो. (याको. १:१४, १५) जर तुम्ही विवाहित असाल, तर अशा माहितीची पती-पत्नी दोघांनी मिळून उजळणी करणे सुज्ञपणाचे आहे. विवाहबंधनाची व्यवस्था यहोवाने केली आहे, आणि विवाह एक पवित्र बंधन आहे. तेव्हा, तुमच्या वैवाहिक नातेसंबंधाविषयी तुमच्या जोडीदाराशी चर्चा करण्यासाठी वेळ काढा. यावरून, तुम्हाला पवित्र गोष्टी मौल्यवान वाटतात हे दिसून येईल.—उत्प. २:२१-२४.

१८, १९. (क) व्यभिचार केल्याने कोणते परिणाम होतात? (ख) विवाहसोबती एकनिष्ठ राहिल्यास कोणते फायदे होतात?

१८ एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत अयोग्य प्रकारची मैत्री करण्याचा मोह तुम्हाला होतो, तेव्हा जारकर्म किंवा व्यभिचार केल्यामुळे होणाऱ्‍या भयंकर परिणामांवर मनन करा. (नीति. ७:२२, २३; गलती. ६:७) अनैतिक वर्तन करणारे यहोवाचे मन दुखवतात आणि आपल्या सोबत्याला व स्वतःला हानी पोहचवतात. (मलाखी २:१३, १४ वाचा.) त्याउलट, जे आपले वर्तन शुद्ध ठेवतात त्यांना मिळणाऱ्‍या फायद्यांचा विचार करा. असे लोक सदासर्वकाळ जगण्याची आशा बाळगण्यासोबतच, आतादेखील सर्वोत्तम जीवनाचा आनंद लुटतात आणि त्यांना एक शुद्ध विवेकही लाभतो.—नीतिसूत्रे ३:१, २ वाचा.

१९ एका स्तोत्रकर्त्याने म्हटले: “तुझे [देवाचे] नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्‍यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.” (स्तो. ११९:१६५) तेव्हा सत्यावर प्रेम करा आणि या दुष्ट जगात “अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला.” (इफिस. ५:१५, १६) आज यहोवाच्या खऱ्‍या उपासकांना पाशात अडकवण्यासाठी सैतानाने त्यांच्या मार्गात अनेक पाश ठेवले आहेत. पण, आपण स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सुसज्ज आहोत. सैतानाविरुद्ध “टिकाव” धरण्यासाठी आणि “त्या दुष्टाचे सगळे जळते बाण” निकामी करण्यासाठी यहोवाने आवश्‍यक त्या सर्व गोष्टींची तरतूद आपल्याकरता केली आहे.—इफिस. ६:११, १६.

[तळटीप]

^ परि. 13 नावे बदलण्यात आली आहेत.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्र]

भौतिकवादामुळे एक व्यक्‍ती आध्यात्मिक रीत्या गुदमरू शकते. असे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून जपा

[२९ पानांवरील चित्र]

प्रेमाचे चाळे केल्याने—किंवा त्यांस प्रतिसाद दिल्याने—एक व्यक्‍ती व्यभिचाराच्या पाशात पडू शकते