व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दियाबलाच्या पाशांपासून खबरदार!

दियाबलाच्या पाशांपासून खबरदार!

दियाबलाच्या पाशांपासून खबरदार!

सैतानाच्या पाशांतून आपली सुटका करून घ्या. —२ तीम. २:२६.

तुमचे उत्तर काय असेल?

इतरांची टीका करण्याची प्रवृत्ती तुमच्यात असल्यास तुम्ही कोणते आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे?

पिलात व पेत्र यांच्या उदाहरणांवरून, भीती व दबावाला बळी न पडण्याविषयी तुम्ही काय शिकू शकता?

अवाजवी दोषभावना तुम्ही कशा टाळू शकता?

१, २. या लेखात आपण दियाबलाच्या कोणत्या पाशांबद्दल चर्चा करणार आहोत?

 एखाद्या शिकाऱ्‍याप्रमाणे दियाबल सैतान यहोवाच्या सेवकांना पकडण्याच्या प्रयत्नात आहे. पण आपल्या सावजाला ठार मारणाऱ्‍या शिकाऱ्‍यासारखा, तो त्यांना जिवे मारू इच्छित नाही. तर, तो यहोवाच्या सेवकांना जिवंतच धरू इच्छितो, जेणेकरून तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांना वागायला लावू शकेल.—२ तीमथ्य २:२४-२६ वाचा.

प्राण्यांना जिवंत धरण्यासाठी, फासेपारधी वेगवेगळ्या प्रकारच्या पाशांचा उपयोग करतो. कधीकधी तो प्राण्याला झाडाझुडपांतून बाहेर, खुल्या जागेत यायला लावतो आणि मग त्याला फासात अडकवतो. तर काही वेळा, लगेच दिसून येणार नाही अशा प्रकारे सापळा रचून, तो बेसावध प्राण्याला त्यात अडकवतो. दियाबलसुद्धा देवाच्या सेवकांना जिवंत धरण्यासाठी अशाच प्रकारच्या पाशांचा उपयोग करतो. सैतानाच्या पाशात आपल्याला अडकायचे नसेल, तर कोणकोणत्या परिस्थितींत तो आपल्याला पाशात अडकवू शकतो याविषयी दिल्या जाणाऱ्‍या धोक्याच्या सूचनांकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. या लेखात आपण अशा तीन पाशांची चर्चा करणार आहोत, ज्यांचा वापर करण्यात दियाबलाला काही प्रमाणात यश आले आहे. हे पाश आहेत (१) अविचारी संभाषण, (२) भीती व दबाव, आणि (३) अवास्तव प्रमाणात दोषीपणाची भावना. पुढील लेखात आपण सैतानाच्या आणखी दोन पाशांची चर्चा करू.

अविचारी संभाषणाची आग विझवा

३, ४. जिभेवर नियंत्रण न ठेवल्यास काय घडू शकते? उदाहरण द्या.

लपलेल्या प्राण्यांना बाहेर यायला लावण्यासाठी शिकारी कधीकधी झाडाझुडपांच्या काही भागात आग लावतो. मग, जीव वाचवण्यासाठी प्राणी जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो त्यांना पकडतो. एका अर्थाने, दियाबलसुद्धा ख्रिस्ती मंडळीत आग लावण्याचा प्रयत्न करतो. असे करण्यात यश आल्यास मंडळीतील सदस्य आपोआपच मंडळीच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर निघून सरळ आपल्या तावडीत सापडतील हे त्याला माहीत आहे. सैतानाच्या या दुष्ट प्रयत्नात आपण नकळत त्याला सहकार्य करण्याद्वारे त्याच्या पाशात अडकण्याची शक्यता आहे. ते कसे?

शिष्य याकोबाने जिभेची तुलना आगीशी केली. (याकोब ३:६-८ वाचा.) आपण आपल्या जिभेवर नियंत्रण न ठेवल्यास मंडळीत लाक्षणिक अर्थाने मोठा वणवा पेटू शकतो. हे कसे घडू शकते? पुढील परिस्थितीचा विचार करा: मंडळीच्या सभेत एका बहिणीला सामान्य पायनियर म्हणून नेमण्यात आल्याची घोषणा केली जाते. सभेनंतर दोन प्रचारक या घोषणेविषयी आपसात चर्चा करत असतात. त्यांपैकी एक बहीण आनंदाने नव्या पायनियर बहिणीबद्दल आपल्या सदिच्छा व्यक्‍त करते. दुसरी बहीण मात्र पायनियर बनलेल्या बहिणीच्या हेतूंविषयी शंका व्यक्‍त करून ती केवळ इतरांपेक्षा स्वतःला वरचढ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हणते. या दोघींपैकी तुम्हाला कोणत्या बहिणीशी मैत्री करावीशी वाटेल? त्यांपैकी कोणाच्या बोलण्यामुळे मंडळीत वणवा पेटण्याची शक्यता आहे हे अगदीच स्पष्ट आहे.

५. अविचारी संभाषणाची आग विझवण्यासाठी आपण कोणते आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे?

अविचारी संभाषणाची ही आग आपण कशी विझवू शकतो? येशूने म्हटले: “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” (मत्त. १२:३४) तेव्हा, पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या अंतःकरणाचे परीक्षण केले पाहिजे. ज्या नकारात्मक भावनांमुळे इतरांचे मन दुखवणारे बोल आपल्या तोंडून निघू शकतात अशा भावना आपण टाळतो का? उदाहरणार्थ, एखादा बांधव मंडळीत सेवेचा एखादा विशेषाधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असे आपल्या कानावर येते. या बांधवाचे हेतू चांगले आहेत असे मानायला आपण तयार असतो का, की तो स्वार्थी हेतूने असे करत आहे अशी शंका आपण घेतो? आपली अशी शंकेखोर वृत्ती असल्यास आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की दियाबलाने देवाचा विश्‍वासू सेवक ईयोब याच्या हेतूंविषयी शंका घेतली होती. (ईयो. १:९-११) आपल्या बांधवावर शंका घेण्याऐवजी, आपण त्याची टीका का करत आहोत याचे परीक्षण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याची टीका करण्याचे खरोखर काही चांगले कारण आपल्याजवळ आहे का? की या शेवटल्या दिवसांत सर्वत्र दिसणाऱ्‍या द्वेषपूर्ण प्रवृत्तीने आपले मन दूषित झाल्यामुळे आपण असे करत आहोत?—२ तीम. ३:१-४.

६, ७. (क) इतरांप्रती आपली टीकात्मक वृत्ती असण्यामागे कोणती काही कारणे असू शकतात? (ख) इतरांनी आपली निंदा केल्यास आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

आपल्यात इतरांची टीका करण्याची प्रवृत्ती असण्यामागे आणखीही काही कारणे असू शकतात. आपण केलेल्या चांगल्या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधण्याची कदाचित आपली इच्छा असेल. दुसऱ्‍या शब्दांत, इतरांना खाली खेचून त्यांच्यापेक्षा वरचढ होण्याचा आपला हेतू असू शकतो. किंवा एखादे चांगले काम जे आपण करायला हवे होते, पण केले नाही ते इतरांनी केल्यावर आपण त्यांची टीका करत असू. पण टीका करण्यामागे आपला गर्व असो, ईर्ष्येची भावना असो, किंवा आपल्याला वाटणारी असुरक्षितता असो, अशा वृत्तीचे परिणाम नेहमीच नाशकारक असतात.

काही वेळा, आपण इतरांची जी टीका करत आहोत ती योग्यच आहे असे आपल्याला वाटू शकते. कदाचित त्या व्यक्‍तीने अविचारीपणे बोलून आपले मन दुखावले असेल. असे असले, तरीसुद्धा जशास तसे वागणूक देणे हा त्यावरचा उपाय नाही. असे वागणे हे आगीत तेल ओतण्यासारखे ठरेल आणि त्यामुळे देवाचा नव्हे तर दियाबलाचा उद्देश साध्य होईल. (२ तीम. २:२६) त्याऐवजी, आपण याबाबतीत येशूचे अनुकरण केले पाहिजे. त्याची निंदा करण्यात आली तेव्हा, “त्याने उलट निंदा केली नाही.” तर, त्याने “यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.” (१ पेत्र २:२१-२३) यहोवा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने कारवाई करेल याची येशूला खातरी होती. आपल्यालाही देवावर असाच भरवसा असला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या शब्दांनी इतरांना दुखवण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मंडळीतील “ऐक्य” व शांतीचे बंधन टिकवून ठेवण्यास आपण हातभार लावत असतो.—इफिसकर ४:१-३ वाचा.

भीती व दबावाच्या फासात अडकू नका

८, ९. पिलाताने येशूला मृत्यूदंड का सुनावला?

फासात अडकलेला प्राणी आपल्या हालचालींवर नियंत्रण गमावून बसतो. त्याच प्रकारे, जी व्यक्‍ती भीतीला व दबावाला बळी पडते ती काही प्रमाणात का होईना, आपल्या जीवनावरील नियंत्रण गमावते. (नीतिसूत्रे २९:२५ वाचा.) दबाव व भीती यांपुढे ज्यांनी हात टेकले अशा अगदी वेगवेगळ्या परिस्थितींत असलेल्या दोन मनुष्यांची उदाहरणे आता आपण पाहू या आणि त्यांच्या अनुभवांतून आपण कोणता धडा घेऊ शकतो यावर विचार करू या.

रोमी सुभेदार पंतय पिलात याला येशू निर्दोष असल्याचे माहीत होते आणि मुळात येशूला शिक्षा ठोठावण्याची त्याची इच्छा नव्हती. खरेतर, येशूने “मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही” असे पिलाताने बोलूनही दाखवले. पण, असे असूनही पिलाताने त्याला मृत्यूदंड सुनावला. का? कारण तो जमावाच्या दबावाला बळी पडला. (लूक २३:१५, २१-२५) पिलाताला आपल्या इच्छेनुसार करायला भाग पाडण्यासाठी विरोधकांच्या त्या जमावाने ओरडून म्हटले: “आपण ह्‍याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही.” (योहा. १९:१२) ख्रिस्ताचे समर्थन केले तर आपले पद, इतकेच काय तर आपला जीवही जाईल अशी पिलाताला भीती वाटली असेल. त्यामुळे, त्याने दबावापुढे हात टेकले आणि अशा रीतीने दियाबलाच्या इच्छेनुसार केले.

१०. पेत्राने कशामुळे ख्रिस्ताला नाकारले?

१० प्रेषित पेत्र हा येशूच्या सर्वात जवळच्या सोबत्यांपैकी एक होता. येशू हाच ख्रिस्त असल्याचे त्याने जाहीरपणे कबूल केले होते. (मत्त. १६:१६) येशूच्या एका शिकवणीचा अर्थ न समजल्यामुळे इतर शिष्य त्याला सोडून गेले, तेव्हा पेत्र येशूला एकनिष्ठ राहिला. (योहा. ६:६६-६९) तसेच, येशूचे शत्रू त्याला अटक करायला आले तेव्हा पेत्राने आपल्या प्रभूचा बचाव करण्यासाठी तलवार चालवली. (योहा. १८:१०, ११) पण, काही काळानंतर पेत्र भीतीला बळी पडला आणि त्याने येशू ख्रिस्ताला ओळखत असल्याचेही नाकारले. थोड्या काळापुरता हा प्रेषित मनुष्याच्या भीतीच्या पाशात अडकला आणि त्यामुळे तो धैर्य दाखवण्यास असमर्थ ठरला.—मत्त. २६:७४, ७५.

११. आपल्याला कोणत्या वाईट प्रभावांचा सामना करावा लागू शकतो?

११ ख्रिस्ती या नात्याने, आपण देवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी करण्याच्या दबावाचा प्रतिकार केला पाहिजे. कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ किंवा इतर जण आपल्यावर अप्रामाणिकपणे वागण्याचा किंवा लैंगिक अनैतिकतेत सामील होण्याचा दबाव आणू शकतात. शाळा-कॉलेजांत जाणाऱ्‍या विद्यार्थ्यांवर त्यांचे सोबती परीक्षेत कॉपी करण्याचा, अश्‍लील चित्रे पाहण्याचा, धूम्रपान करण्याचा, ड्रग्स घेण्याचा, अतिमद्यपान करण्याचा किंवा लैंगिक गैरकृत्ये करण्याचा दबाव आणू शकतात. तर मग, कोणती गोष्ट आपल्याला भीतीचा आणि यहोवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी करण्याच्या दबावाचा प्रतिकार करण्यास साहाय्य करेल?

१२. पिलात व पेत्र यांच्याकडून आपण काय शिकू शकतो?

१२ पिलात व पेत्र यांच्या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो हे पाहू या. पिलाताला ख्रिस्ताविषयी फार कमी ज्ञान होते. तरीसुद्धा, येशू निर्दोष आहे आणि तो एक साधारण मनुष्य नाही हे त्याला माहीत होते. पण, पिलातामध्ये नम्रता नव्हती आणि खऱ्‍या देवाबद्दल त्याला प्रेम नव्हते. त्यामुळे, दियाबलाने त्याला अगदी सहजपणे आपल्या पाशात अडकवले. पेत्राजवळ अचूक ज्ञान होते आणि देवाबद्दल त्याला प्रेमही होते. पण काही वेळा त्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवली नाही आणि तो भीती व दबावाला बळी पडला. येशूला अटक होण्याआधी, पेत्राने मोठ्या आत्मविश्‍वासाने असे म्हटले होते: “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.” (मार्क १४:२९) दुसरीकडे, एका स्तोत्रकर्त्याचे उदाहरण पाहा, ज्याने देवावर भरवसा ठेवून म्हटले: “परमेश्‍वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” (स्तो ११८:६) प्रेषित पेत्राने या स्तोत्रकर्त्याप्रमाणे देवावर भरवसा ठेवला असता तर त्याच्यासमोर आलेल्या परीक्षांना यशस्वी रीत्या तोंड देणे त्याला शक्य झाले असते. येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री त्याने पेत्राला व दुसऱ्‍या दोन प्रेषितांना आपल्यासोबत गेथशेमाने बागेतील एका एकांत स्थळी नेले. पण तेथे जागे राहण्याऐवजी पेत्र व त्याचे सोबती झोपी गेले. येशूने त्यांना झोपेतून उठवून म्हटले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मार्क १४:३८) पण पेत्र पुन्हा झोपी गेला आणि नंतर तो भीती व दबावापुढे टिकाव धरू शकला नाही.

१३. एखादी वाईट गोष्ट करण्याच्या दबावाचा प्रतिकार आपण कसा करू शकतो?

१३ पिलात व पेत्र यांच्या उदाहरणांवरून आपल्याला आणखी एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो: दबावाचा यशस्वी रीत्या प्रतिकार करण्यासाठी अचूक ज्ञान, नम्रता, आपल्या मर्यादांची जाणीव, देवाबद्दल प्रेम, आणि मानवांचे नव्हे तर यहोवाचे भय बाळगणे या सर्व गोष्टी आवश्‍यक आहेत. जर आपला विश्‍वास अचूक ज्ञानावर आधारित असेल, तर आपण आपल्या विश्‍वासांबद्दल धैर्याने व आत्मविश्‍वासाने बोलू. असे केल्यामुळे आपल्याला दबावाचा प्रतिकार करणे आणि मनुष्याच्या भीतीवर मात करणे शक्य होईल. अर्थात, आपण कधीही स्वतःच्याच बळावर यशस्वी होण्याची अपेक्षा करू नये. उलट, दबावांना तोंड देण्यासाठी आपल्याला देवाच्या साहाय्याची गरज आहे हे आपण नम्रपणे ओळखले पाहिजे. यहोवाचा पवित्र आत्मा मिळावा म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे आणि यहोवाबद्दल असलेल्या प्रेमाने प्रवृत्त होऊन आपण त्याच्या नावाचे व नीतिनियमांचे समर्थन केले पाहिजे. शिवाय, आपल्यासमोर एखादी परीक्षा येण्याअगोदरच आपण दबावाला तोंड देण्यासाठी स्वतःची तयारी केली पाहिजे. उदाहरणार्थ, आपण आपल्या मुलांसोबत पूर्वतयारी केल्यास व प्रार्थना केल्यास, त्यांचे सोबती एखादी वाईट गोष्ट करण्याचा त्यांच्यावर दबाव आणतात, तेव्हा ती जास्त परिणामकारक रीत्या उत्तर देऊ शकतील.—२ करिंथ. १३:७. *

चिरडून टाकणारा पाश —अवाजवी दोषभावना टाळा

१४. गतकाळात केलेल्या चुकांबद्दल दियाबल आपल्याला कशा प्रकारे विचार करण्यास लावू इच्छितो?

१४ काही वेळा प्राण्यांना धरण्यासाठी, एखादा मोठा ओंडका किंवा मोठा दगड झाडावरून लटकवला जातो आणि प्राण्याच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर एक तार बांधली जाते. बेसावध प्राणी तारेला स्पर्श करताच ओंडका किंवा मोठा दगड त्याच्यावर पडतो आणि तो त्याखाली चिरडला जातो. अवाजवी प्रमाणातील दोषभावनांची तुलना या चिरडून टाकणाऱ्‍या पाशासोबत केली जाऊ शकते. गतकाळात केलेल्या एखाद्या चुकीबद्दल विचार करताना आपल्याला दोषभावनांच्या ओझ्याखाली अक्षरशः दबून गेल्यासारखे वाटू शकते. (स्तोत्र ३८:३-५,  वाचा.) आपण इतके वाईट आहोत की यहोवा कधीच आपल्याला दया दाखवणार नाही; आणि त्याच्या नियमांचे पालन करणे आपल्याकरता अशक्य आहे, असा विचार करण्यास सैतान आपल्याला प्रवृत्त करू इच्छितो.

१५, १६. अवाजवी प्रमाणात दोषभावना बाळगण्याचा पाश तुम्ही कसा टाळू शकता?

१५ हा चिरडून टाकणारा पाश तुम्ही कसा टाळू शकता? जर तुमच्या हातून एखादे गंभीर पाप झाले असेल, तर यहोवासोबतची मैत्री पुन्हा मिळवण्यासाठी लगेच पावले उचला. मंडळीच्या वडिलांशी संपर्क करा आणि त्यांना मदतीची विनंती करा. (याको. ५:१४-१६) आपली चूक सुधारण्यासाठी जमेल ते सर्व करा. (२ करिंथ. ७:११) तुम्हाला ताडन देण्यात आल्यास, खचून जाऊ नका. ताडन मिळणे हे यहोवाचे तुमच्यावर प्रेम असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. (इब्री १२:६) ज्या गोष्टींनी तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त केले होते त्या गोष्टी पुन्हा न करण्याचा निश्‍चय करा आणि त्यानुसार वागा. पश्‍चात्ताप करून मागे वळल्यानंतर, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा तुमच्या पापांची क्षमा करू शकतो याची खातरी बाळगा.—१ योहा. ४:९, १४.

१६ एखाद्या पापाची क्षमा मिळाल्यानंतरही काही जण मनात त्या पापाबद्दल दोषीपणाच्या भावना बाळगतात. तुमच्या बाबतीत असे असल्यास, हे आठवणीत असू द्या की पेत्र व इतर प्रेषित येशूला—यहोवाच्या परमप्रिय पुत्राला—त्याच्या सर्वात कठीण परीक्षेच्या वेळी एकटे सोडून निघून गेले, तरीसुद्धा यहोवाने त्यांना क्षमा केली. अतिशय गंभीर अनैतिकतेत गोवलेल्या करिंथ मंडळीतील एका मनुष्याला बहिष्कृत करण्यात आले आणि नंतर त्याने पश्‍चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्याला क्षमा केली. (१ करिंथ. ५:१-५; २ करिंथ. २:६-८) देवाच्या वचनात गंभीर पाप करणाऱ्‍या इतरांचीही उदाहरणे आहेत ज्यांनी पश्‍चात्ताप केला आणि ज्यांना देवाने क्षमा केली.—२ इति. ३३:२, १०-१३; १ करिंथ. ६:९-११.

१७. खंडणी बलिदानामुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?

१७ तुम्ही मनापासून पश्‍चात्ताप केला आणि यहोवाच्या दयेचा स्वीकार केला तर तो तुम्हाला क्षमा करेल आणि तुम्ही केलेल्या चुका विसरून जाईल. येशूच्या खंडणी बलिदानात तुमच्या पापांची क्षमा करण्याची ताकद नाही असा कधीही विचार करू नका. असा विचार केल्यास तुम्ही सैतानाच्या एका पाशाला बळी पडाल. दियाबल तुम्हाला काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करत असला, तरीसुद्धा येशूचे खंडणी बलिदान, ज्यांच्या हातून पाप घडले आहे आणि ज्यांनी पश्‍चात्ताप केला आहे अशा सर्वांना क्षमा करण्यास समर्थ आहे. (नीति. २४:१६) खंडणीवर विश्‍वास ठेवल्यामुळे, तुमच्या मनावर अवाजवी दोषभावनांचे आलेले दडपण दूर होईल आणि तुम्हाला पूर्ण मनाने, बुद्धीने व शक्‍तीने यहोवाची सेवा करण्याचे सामर्थ्य लाभेल.—मत्त. २२:३७.

सैतानाच्या डावपेचांबाबत आपण अंधारात नाही

१८. आपण दियाबलाचे पाश कसे टाळू शकतो?

१८ आपण कोणत्या पाशाला बळी पडतो याच्याशी सैतानाला कारण नाही; आपण त्याच्या तावडीत सापडावे एवढेच त्याला वाटते. सैतानाचे डावपेच आपल्याला माहीत असल्यामुळे आपल्यावर त्याचे वर्चस्व होऊ देण्याचे आपण टाळू शकतो. (२ करिंथ. २:१०, ११) जर आपण परीक्षांना तोंड देण्यासाठी प्रार्थना करून देवाच्या बुद्धीसाठी विनंती केली तर आपण सैतानाच्या पाशांत अडकणार नाही. याकोबाने लिहिले: “जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याको. १:५) नियमित वैयक्‍तिक अभ्यास करण्याद्वारे आणि देवाच्या वचनाचे पालन करण्याद्वारे आपल्या प्रार्थना प्रांजळ असल्याचे आपण दाखवून दिले पाहिजे. विश्‍वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या बायबल अभ्यासाच्या साहित्यांतून आपल्याला दियाबलाच्या वेगवेगळ्या पाशांची माहिती मिळते आणि ते पाश टाळण्यासाठी साहाय्य मिळते.

१९, २०. आपण वाइटाचा द्वेष का केला पाहिजे?

१९ प्रार्थना व बायबलचा अभ्यास केल्यामुळे जे योग्य आहे त्याबद्दल आपल्या मनात प्रेम उत्पन्‍न होते. पण त्यासोबतच, जे अयोग्य आहे त्याबद्दल आपण द्वेषही उत्पन्‍न केला पाहिजे. (स्तो. ९७:१०) स्वार्थी इच्छांच्या मागे लागल्यामुळे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात यावर मनन केल्यास अशा इच्छा टाळण्यास आपल्याला मदत मिळेल. (याको. १:१४, १५) आपण वाइटाचा द्वेष करायला आणि जे चांगले आहे त्यावर खऱ्‍या अर्थाने प्रेम करायला शिकतो, तेव्हा सैतान आपल्याला पाशात अडकवण्याच्या हेतूने दाखवत असलेली प्रलोभने आपल्याला मुळीच आकर्षक वाटणार नाहीत; उलट आपण त्यांचा तिरस्कार करू.

२० सैतानाने आपल्यावर वर्चस्व मिळवू नये म्हणून देव आपल्याला जे साहाय्य देतो त्याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे आपल्याला त्या “वाइटापासून” सोडवतो. (मत्त. ६:१३) पुढील लेखात आपण आणखी दोन पाशांबद्दल पाहणार आहोत, ज्यांचा उपयोग करून दियाबल देवाच्या सेवकांना जिवंत धरण्यात यशस्वी ठरला आहे.

[तळटीप]

^ परि. 13 पालकांनी तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकातील पृष्ठे ७६-७७ वरील “मी कशी प्रतिक्रिया दाखवेन?” या शीर्षकाखालील माहितीची मुलांसोबत चर्चा करावी. आठवड्याच्या कौटुंबिक उपासनेत या भागाची चर्चा केली जाऊ शकते.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

अविचारी संभाषणामुळे मंडळीत अनेक समस्यांचा वणवा पेटू शकतो

[२४ पानांवरील चित्र]

तुम्ही अवाजवी दोषभावनेखाली दबून जाण्याची गरज नाही