व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आता कुठं आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आहे!”

“आता कुठं आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आहे!”

जीवन कथा

“आता कुठं आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आहे!”

सन १९५१ ची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस. विशीत असलेल्या चार तरुणांनी उत्सुकतेने अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील इथाका येथून आजूबाजूला असलेल्या फोन बूथवरून मिशिगन, आयोवा आणि कॅलिफोर्निया अशा दूरच्या ठिकाणांना फोन केला. त्यांच्याजवळ एक चांगली बातमी होती!

काही महिन्यांआधी, गिलियड प्रशालेच्या १७ व्या वर्गाला उपस्थित राहण्यास १२२ पायनियर न्यू यॉर्कमधील साउथ लँसिंग येथे जमले होते. त्या भावी मिशनऱ्‍यांमध्ये लोएल टर्नर, विल्यम (बिल) कॅस्टन, रिचर्ड केल्सी आणि रेमन टेम्पलटन हे होते. लोएल व बिल दोघे मिशिगनचे होते, रिचर्ड आयोवाचा, तर रेमन कॅलिफोर्नियाचा होता. लवकरच हे चौघेही चांगले मित्र बनले.

सुमारे पाच महिन्यांनंतर, जागतिक मुख्यालयातून बंधू नेथन नॉर विद्यार्थ्यांसोबत बोलण्यास येणार असल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहचली. या चार बांधवांनी, शक्य असल्यास एकाच देशात सोबत सेवा करण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. आता त्यांना विदेशातील त्यांच्या मिशनरी सेवेच्या नेमणुकीविषयी कळणार होते का? हो, नक्कीच कळणार होते!

विद्यार्थ्यांशी बोलताना, बंधू नॉर त्यांच्या विदेशी नेमणुकींविषयी घोषणा करू लागले तेव्हा सर्वांची उत्सुकता आणखीनच ताणली गेली. सर्वात पहिले या चौघांना स्टेजवर बोलावण्यात आले. ते चौघे जण जरी घाबरलेले असले, तरी शेवटी जेव्हा त्यांना कळले की ते सोबत राहणार आहेत तेव्हा त्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला! पण त्यांना कोठे नेमण्यात आले होते? त्यांना जर्मनीत पाठवण्यात येणार आहे हे ऐकल्यावर त्यांचे वर्गसोबती आश्‍चर्यचकित झाले व जोरजोराने टाळ्या वाजवू लागले.

१९३३ पासून पुढे हिटलरच्या शासनकाळात जर्मनीतील साक्षीदारांनी दाखवलेल्या विश्‍वासाविषयी ऐकून जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांना खूप कौतुक वाटले होते. बऱ्‍याच विद्यार्थ्यांनी आठवून सांगितले की दुसऱ्‍या महायुद्धानंतर युरोपच्या बंधुभगिनींना कपडे व साधन सामग्री पाठवण्याच्या कार्यास त्यांनी हातभार लावला होता. जर्मनीतील बंधुभगिनींनी विश्‍वास, दृढनिश्‍चय, धैर्य व यहोवावर भरवसा दाखवण्याच्या बाबतीत उल्लेखनीय उदाहरण मांडले होते. लोएलने आठवून म्हटले: ‘आता आपण वैयक्‍तिक रीत्या या बंधुभगिनींना भेटू शकू व त्यांना जाणून घेऊ शकू.’ म्हणूनच त्या संध्याकाळी ते इतके उत्सुक होते यात काहीच शंका नाही. कारण त्या सर्वांना ही गोष्ट आपल्या कुटुंबाला व मित्रांना सांगायची होती.

जर्मनीला जाताना

२७ जुलै १९५१ रोजी होमलँड हे वाफेवर चालणारे जहाज न्यू यॉर्कच्या ईस्ट रिव्हरच्या बंदरावरून जर्मनीच्या दिशेने निघाले. आणि अशा प्रकारे या चार मित्रांनी ११ दिवसांच्या त्यांच्या समुद्रप्रवासाची सुरुवात केली. गिलियड प्रशिक्षक व नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनलेले बंधू ॲल्बर्ट श्रोडर यांनी त्यांना जर्मनमध्ये काही वाक्ये शिकवली होती. आता त्यांच्या जहाजावर बरेच जर्मन भाषा बोलणारे प्रवासी असल्यामुळे, कदाचित हे चौघे त्यांच्याकडून जास्त शिकू शकले असते. पण ते प्रवासी जर्मन भाषेच्या वेगवेगळ्या बोली बोलत होते. यामुळे ते किती गोंधळात पडले असावेत!

काही दिवस जहाज लागल्यामुळे होणारा त्रास सहन केल्यानंतर हे बांधव शेवटी एकदाचे मंगळवार, ७ ऑगस्ट रोजी सकाळी जर्मनीतील हेम्बुर्ग येथे उतरले. सहा वर्षांपूर्वी झालेल्या युद्धाच्या जखमांचे वण शहरात सर्वत्र दिसत होते. हे पाहून ते दुःखी झाले. त्यानंतर ते ट्रेनने वीस्बाडनला जाण्यास निघाले, जेथे पूर्वी शाखा कार्यालय होते.

बुधवारी पहाटे ते ज्या पहिल्याच जर्मन साक्षीदाराला भेटले त्याचे नाव होते हान्स. हे जर्मनीतले एक सर्वसामान्य नाव आहे! हान्स त्यांना स्टेशनहून बेथेलला घेऊन गेला, आणि तेथे पोहचल्यावर त्याने त्यांना कडक स्वभावाच्या एका वयस्कर भगिनीकडे सोपवले. तिला इंग्रजी बिलकूल येत नव्हते. तरी, मोठमोठ्याने बोलल्यास त्यांना आपले बोलणे नक्कीच कळेल असा कदाचित तिचा ग्रह होता. पण, तिने कितीही आवाज चढवला तरी त्यांना काही कळत नव्हते. शेवटी शाखा सेवक (ब्रांच सर्व्हंट) बंधू एरिक फ्रॉस्ट यांनी येऊन इंग्रजीत त्यांचे स्वागत केले तेव्हा त्यांना हायसे वाटले.

ऑगस्टच्या अखेरीस ते चौघे फ्रँकफुर्ट आम माईन येथे भरलेल्या “शुद्ध उपासना” या जर्मन भाषेतील त्यांच्या पहिल्याच अधिवेशनाला उपस्थित राहिले. ४७,४३२ लोक त्या अधिवेशनाला उपस्थित राहिल्याचे, आणि २,३७३ जणांनी बाप्तिस्मा घेतल्याचे पाहून मिशनरी सेवा करण्याचा त्यांचा आवेश व प्रचार करण्याची त्यांची इच्छा आणखीनच वाढली. पण काही दिवसांनंतर बंधू नॉर यांनी त्यांना सांगितले की ते बेथेलमध्येच राहणार होते आणि त्यांना तेथेच काम करण्यास नेमण्यात येणार होते.

रेमनला मिशनरी सेवा करायची मनापासून इच्छा होती. त्यामुळे, एके काळी अमेरिकेतील बेथेलमध्ये सेवा करण्याच्या संधीला त्याने नाकारले होते. बेथेल सेवा करण्याचा विचार, ना रिचर्डने कधी केला होता ना बिलने. पण या नेमणुकीत त्यांना मिळालेला आनंद अनुभवल्यानंतर, आपल्यासाठी सर्वात उत्तम काय हे यहोवालाच माहीत असते याची त्यांना खातरी पटली. तर मग स्वतःच्या वैयक्‍तिक इच्छांवर विसंबून राहण्यापेक्षा यहोवाच्या मार्गदर्शनावर विसंबून राहणे किती सुज्ञपणाचे आहे! ज्यांना हे सत्य उमगले आहे ते कोठेही असले आणि कोणत्याही नेमणुकीत असले तरीही आनंदाने यहोवाची सेवा करतात.

फेरबोटन!

या अमेरिकन बांधवांसोबत सहवास करण्याचा आनंद जर्मन बेथेल कुटुंबातील बऱ्‍याच जणांना झाला, कारण आता ते त्यांच्यासोबत इंग्रजी भाषा बोलण्याचा सराव करू शकणार होते. पण एके दिवशी जेवणाच्या खोलीमध्ये त्यांची ही आशा धुळीस मिळाली. बंधू फ्रॉस्ट त्यांच्या विशिष्ट शैलीत उत्स्फूर्तपणे जर्मन भाषेत बहुधा खूप गंभीर असे काहीतरी सांगू लागले. कुटुंबातील बरेच जण खूप शांत बसले होते व ते वरसुद्धा पाहत नव्हते. नुकत्याच आलेल्या या बांधवांना जरी समजत नसले की बंधू नक्की काय बोलत होते तरी त्यांना हळूहळू कळायला लागले की ते बोलणे त्यांच्याशीच संबंधित आहे. आणि जेव्हा बंधू फ्रॉस्ट यांनी जोरात “फेरबोटन!” (“परवानगी नाही!”) असे म्हटले, व आणखी जोर देण्यासाठी पुन्हा एकदा जोरात म्हटले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांनी असे काय केले होते ज्यामुळे बंधू फ्रॉस्ट यांनी इतकी तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त केली?

जेवण झाल्यानंतर सर्व जण लगबगीने आपापल्या खोलीत गेले. नंतर एका बांधवाने त्यांना सांगितले: “आम्हाला मदत करता यावी म्हणून तुम्हाला जर्मन भाषा बोलता येणे गरजेचे आहे. म्हणून जोपर्यंत तुम्ही ही भाषा शिकत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत इंग्रजीत बोलण्याची परवानगी नाही असा आदेश बंधू फ्रॉस्ट यांनी दिला आहे.”

बेथेल कुटुंबाने हा आदेश लगेच अंमलात आणला. यामुळे नुकत्याच आलेल्या बांधवांना जर्मन शिकण्यास मदत तर मिळालीच; शिवाय, त्यांना हेही शिकायला मिळाले की एखाद्या प्रेमळ बांधवाने दिलेला सल्ला सुरुवातीला लागू करण्यास जरी कठीण वाटला, तरी तो सहसा आपल्या भल्यासाठीच असतो. बंधू फ्रॉस्ट यांना यहोवाच्या संघटनेच्या हिताविषयी किती आस्था होती व बांधवांविषयी त्यांना किती प्रेम होते हे त्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून दिसते. * त्यामुळे हळूहळू या चौघांना बंधू फ्रॉस्ट आवडू लागले याचे आश्‍चर्य वाटू नये.

मित्रांकडून खूप काही शिकण्यासारखे

देवाला भिऊन वागणाऱ्‍या मित्रांकडून आपण महत्त्वाचे धडे शिकू शकतो जे आपल्याला यहोवाचे आणखी चांगले मित्र बनण्यास मदत करतात. या चौघांनी जर्मनीतल्या असंख्य विश्‍वासू बंधुभगिनींकडून बऱ्‍याच गोष्टी शिकल्या, शिवाय ते एकमेकांकडूनही शिकले. रिचर्ड म्हणतात: “लोएलला जर्मन भाषेचं थोडंफार ज्ञान होतं आणि तो चांगलाही बोलायचा, पण आम्हा तिघांना खूप कष्ट करावं लागत होतं. शिवाय तो आम्हा तिघांपेक्षा मोठा होता, म्हणून भाषाविषयक काही माहिती घेण्यासाठी व पुढाकार घेण्यासाठी आम्ही साहजिकच त्याच्याकडे जायचो.” ते पुढे म्हणतात: “जर्मनीमध्ये एक वर्ष घालवल्यानंतर आम्ही आमच्या पहिल्या सुटीसाठी स्वित्झर्लंडला गेलो. एका स्विस बांधवानं आम्हाला राहण्यासाठी त्याचं शॅलेट (लहानसं लाकडी घर) दिलं, तेव्हा मला किती आनंद झाला होता! आता दोन आठवडे जर्मन बोलण्याचं कष्ट करावं लागणार नव्हतं. पण लोएल काय करणार होता याची जराही कल्पना मला नव्हती. दररोज सकाळी दैनिक वचन जर्मन भाषेत वाचण्याचा व चर्चा करण्याचा आग्रह त्यानं धरला. आणि त्याच्यापुढं आमचं काहीएक चाललं नाही. तो हट्टाला पेटला होता. पण आम्ही या घटनेपासून एक महत्त्वाचा धडा शिकलो. जे खरोखर आपल्यावर प्रेम करतात त्यांचं मार्गदर्शन आपण स्वीकारलं पाहिजे, मग ती गोष्ट आपल्याला आवडो अथवा न आवडो. या सर्व वर्षांत हीच मनोवृत्ती बाळगल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे आणि ईश्‍वरशासित मार्गदर्शनाचं पालन करणं आम्हाला सोपं गेलं आहे.”

हे चार मित्र एकमेकांच्या चांगल्या गुणांची कदर करण्यासही शिकले. जसे फिलिप्पैकर २:३ म्हणते: “लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” त्यामुळे बिल आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे गोष्टी हाताळू शकतो हे स्वीकारून त्याचे तीन मित्र अनेक वेळा त्यालाच काही गोष्टी हाताळण्याचा मान द्यायचे. लोएल म्हणतात, “गुंतागुंतीची समस्या सोडवण्यासाठी मुश्‍कील किंवा न आवडणारी पावले उचलावी लागणार असल्यास आम्ही ते काम बिलवर सोपवायचो. कठीण समस्या कशी सोडवावी हे आम्हाला माहीत असलं तरी ती सोडवण्याचं धैर्य किंवा क्षमता आमच्याजवळ नव्हती; पण बिलकडे ती कुवत होती.”

आनंदी विवाह

एक एक करून चौघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची मैत्री यहोवावरील व पूर्णवेळेच्या सेवाकार्यावरील त्यांच्या प्रेमावर आधारित होती, म्हणून जो यहोवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्यास तयार असेल असाच सोबती निवडण्याचा निश्‍चय त्यांनी केला. पूर्णवेळेच्या सेवेने त्यांना घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद मानण्यास आणि वैयक्‍तिक इच्छांपेक्षा, राज्याशी संबंधित कार्यांना जीवनात प्राधान्य देण्यास शिकवले. म्हणून त्यांनी अशा सोबत्यांची निवड केली ज्यांनी स्वतःहून पूर्णवेळेची सेवा सुरू केली होती. परिणामस्वरूप, त्यांचे विवाह मजबूत व आनंदी ठरले.

मैत्री किंवा विवाह दीर्घ काळ टिकवून ठेवण्यासाठी, या नातेसंबंधात यहोवाचे असणे महत्त्वाचे आहे. (उप. ४:१२) कालांतराने बिल व रेमन यांचे सोबती मरण पावले असले तरी एका विश्‍वासू पत्नीकडून मिळणारा आनंद व सहवास त्यांनी अनुभवला होता. लोएल व रिचर्ड आतापर्यंत या सहवासाचा आनंद घेत आहेत. बिल यांनी पुनर्विवाह केला. त्यांनी सुज्ञपणे आपल्या सहचारिणीची निवड केली, ज्यामुळे ते पूर्णवेळेच्या सेवेत राहू शकले.

नंतरच्या वर्षांत त्यांच्या नेमणुकीमुळे ते चौघे एकमेकांपासून वेगवेगळ्या ठिकाणी—मुख्यतः जर्मनी, ऑस्ट्रिया, लक्झम्बर्ग, कॅनडा आणि अमेरिका येथे पांगले. त्यामुळे, या चौघांना एकमेकांसोबत हवा तितका वेळ घालवणे शक्य नव्हते. एकमेकांपासून इतके दूर असले तरी ते संपर्कात राहिले आणि सुखदुःखात त्यांनी नेहमी एकमेकांना साथ दिली. (रोम. १२:१५) असे मित्र यहोवाकडील अमोल भेट आहेत; त्यांची मैत्री आपण जपली पाहिजे व त्यांना कधीच क्षुल्लक लेखू नये. (नीति. १७:१७) आजच्या जगात खरे मित्र सापडणे किती कठीण आहे! पण, प्रत्येक खऱ्‍या ख्रिश्‍चनाला असे भरपूर मित्र मिळू शकतात. यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण जगभरातील बंधुभगिनींचे मित्र बनू शकतो, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण यहोवा व येशू ख्रिस्त यांचे मित्र बनू शकतो.

आपल्या सर्वांप्रमाणेच या चौघांनीही आपल्या जीवनात खडतर प्रसंगांचा सामना केला आहे: सोबत्याच्या मृत्यूचे दुःख, गंभीर आजारामुळे येणारा तणाव, वृद्ध पालकांना सांभाळण्याची काळजी, पूर्णवेळेच्या सेवेत राहून मुलांचे संगोपन करण्याचे आव्हान, नवीन नेमणूक स्वीकारताना वाटणारी भीती, आणि आता वृद्धापकाळाच्या वाढत्या समस्या. पण त्यांना अनुभवावरून समजले आहे की मित्र, मग ते जवळ असोत वा दूर, ते यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना, प्रत्येक आव्हानाचा यशस्वी रीत्या सामना करण्यास साहाय्य करतात.

सदासर्वकाळचे मैत्र

लोएल, रेमन, बिल आणि रिचर्ड यांनी अनुक्रमे १८, १२, ११, १० वर्षांचे असताना यहोवाला आपले जीवन समर्पित केले आणि त्या सर्वांनी १७-२१ या वयांत पूर्णवेळेची सेवा करण्यास सुरुवात केली. खरोखर त्यांनी किती उत्तम निर्णय घेतला! “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर,” या उपदेशक १२:१ मध्ये दिलेल्या प्रोत्साहनानुसार त्यांनी केले.

तुम्ही एक तरुण ख्रिस्ती बांधव असाल, तर शक्य असल्यास पूर्णवेळेची सेवा करण्याच्या यहोवाच्या आमंत्रणाचा स्वीकार करा. तेव्हा तुम्हालाही यहोवाच्या अपार दयेमुळे या चार मित्रांप्रमाणेच अनेक आनंददायक विशेषाधिकार अनुभवता येतील. जसे की, विभागीय, प्रांतीय किंवा परिमंडळ पर्यवेक्षक या नात्याने सेवा करणे, बेथेल सेवा, तसेच शाखा समितीचा सदस्य म्हणून बेथेल सेवा करणे, राज्य सेवा व पायनियर सेवा प्रशालेत प्रशिक्षक म्हणून सेवा करणे आणि मोठ्या अथवा लहान अधिवेशनांमध्ये भाषण देणे. या चौघांच्या सेवेमुळे हजारो जणांना फायदा झाल्याचे कळल्यानंतर त्यांना किती आनंद झाला असेल! आणि हे सगळे केवळ यामुळे शक्य झाले, कारण तरुण असताना या चौघांनी यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्याच्या त्याच्या प्रेमळ आमंत्रणाचा स्वीकार केला होता.—कलस्सै. ३:२३.

आज लोएल, रेमन आणि रिचर्ड पुन्हा एकदा जर्मनीच्या शाखा कार्यालयात सेवा करत आहेत जे आता सेल्टर्स येथे आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे २०१० मध्ये अमेरिकेत खास पायनियर म्हणून सेवा करत असताना बिल मरण पावले. तब्बल ६० वर्षे अतिशय खास अशी मैत्री अनुभवलेल्या या चार मित्रांची मृत्यूमुळे ताटातूट झाली. पण आपला देव यहोवा त्याच्या मित्रांना कधीही विसरत नाही. आपण खातरी बाळगू शकतो की मृत्यूमुळे तात्पुरत्या काळासाठी भंग झालेली प्रत्येक ख्रिस्ती मैत्री देवाच्या राज्यात पूर्ववत होईल.

मृत्यूच्या काही काळाआधी बिल यांनी लिहिले: “६० वर्षांच्या आमच्या मैत्रीचा विचार करताना एकही कडू आठवण माझ्या मनात येत नाही. आमची मैत्री ही माझ्याकरता नेहमीच खास राहिली आहे.” देवाच्या राज्यातही त्यांची मैत्री नक्कीच कायम राहील या खातरीने बिलचे तीन मित्र लगेच म्हणतात: “आणि आता कुठं आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आहे.”

[तळटीप]

^ परि. 17 बंधू फ्रॉस्ट यांची रोमांचक जीवन कथा टेहळणी बुरूज (इंग्रजी), १५ एप्रिल १९६१, पृष्ठे २४४-२४९ वर आढळते.

[१८ पानांवरील संक्षिप्त आशय]

नेमणुकीत त्यांना मिळालेला आनंद अनुभवल्यानंतर, आपल्यासाठी सर्वात उत्तम काय हे यहोवालाच माहीत असते याची त्यांना खातरी पटली

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

“६० वर्षांच्या आमच्या मैत्रीचा विचार करताना एकही कडू आठवण माझ्या मनात येत नाही”

[१७ पानांवरील चित्र]

डावीकडून उजवीकडे: रिचर्ड, लोएल, रेमन आणि बिल यांची मैत्री गिलियडमध्ये झाली

[१८ पानांवरील चित्रे]

वर: राज्य सेवा प्रशालेचा वर्ग घेताना रेमन; उजवीकडे: वीस्बाडन येथील बेथेलमध्ये ॲड्रेसोग्राफ यंत्रावर काम करताना रिचर्ड

[१९ पानांवरील चित्रे]

वर: बंधू फ्रॉस्ट (उजवीकडे) व इतर जण, बंधू नॉर (डावीकडे) यांच्या भेटीदरम्यान; उजवीकडे: १९५२ मध्ये स्वित्झर्लंड येथे सुटीला गेलेले असताना

[२० पानांवरील चित्र]

डावीकडून उजवीकडे: १९८४ मध्ये रिचर्ड, बिल, लोएल आणि रेमन हे सेल्टर्स येथील नवीन शाखा इमारतींच्या समर्पणाच्या वेळी एकमेकांना भेटले तेव्हा

[२१ पानांवरील चित्र]

डावीकडून उजवीकडे: रेमन, रिचर्ड आणि लोएल