व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचे बोलणे होय तर होय असावे

तुमचे बोलणे होय तर होय असावे

तुमचे बोलणे होय तर होय असावे

“तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे.” —मत्त. ५:३७.

तुम्ही उत्तर देऊ शकता का ते पाहा:

शपथ वाहण्याविषयी येशूने काय म्हटले?

दिलेले वचन पूर्ण करण्याच्या बाबतीत येशूचे उदाहरण सर्वोत्तम का आहे?

जीवनातील कोणत्या क्षेत्रांत आपले म्हणणे होय तर होय असले पाहिजे?

१. शपथ वाहण्याविषयी येशूने काय म्हटले, आणि का?

 सहसा, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी शपथ वाहण्याची गरज नाही. कारण, ते येशूच्या आज्ञेचे पालन करतात. त्याने म्हटले: “तुमचे बोलणे, होय तर होय” असावे. कोणत्याही व्यक्‍तीने, दिलेल्या वचनाचे पालन करावे असे त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. येशूने ही आज्ञा देण्याच्या आधी असे म्हटले: “शपथ वाहूच नका.” जे लोक शपथ पूर्ण करण्याचा कोणताही हेतू नसताना रोजच्या बोलण्यात या ना त्या गोष्टीसाठी उगाच वारंवार शपथ वाहतात अशा अनेक लोकांचा धिक्कार करण्यासाठी येशूने असे म्हटले होते. त्यांचे हेतू जाहीर करण्यासाठी सरळ सरळ होय किंवा नाही न म्हणता, “जे अधिक” आहे ते बोलण्याद्वारे असे लोक कदाचित दाखवतील की मुळात ते भरवशालायक नाहीत; आणि ते त्या “वाइटापासून” आहेत अर्थात सैतानाच्या प्रभावाखाली आहेत.—मत्तय ५:३३-३७ वाचा.

२. शपथ घेणे नेहमीच अयोग्य का नसते ते स्पष्ट करा.

तर मग, शपथ वाहणे नेहमीच अयोग्य असते असा येशूच्या शब्दांचा अर्थ होता का? ते कसे शक्य आहे? कारण, आपण मागील लेखात पाहिले होते, की यहोवा देवाने आणि त्याचा नीतिमान सेवक अब्राहाम याने अनेकदा महत्त्वाच्या प्रसंगी शपथ वाहिली होती. शिवाय, देवाच्या नियमशास्त्रात सांगितले होते की काही वाद सोडवण्यासाठी शपथ घेणे आवश्‍यक आहे. (निर्ग. २२:१०, ११; गण. ५:२१, २२) म्हणून, कोर्टात खरी साक्ष देण्यासाठी एका ख्रिश्‍चनाने शपथ घेणे आवश्‍यक असू शकते. किंवा, क्वचित प्रसंगी, आपले हेतू चांगले आहेत याचे आश्‍वासन देण्यासाठी किंवा एखादा वाद मिटवण्यास मदत करण्यासाठी शपथ घेणे आवश्‍यक आहे असे एखाद्या ख्रिश्‍चनाला वाटू शकते. किंबहुना, खुद्द येशूला जेव्हा महायाजकाने शपथ घातली होती, तेव्हा त्याने यावर आक्षेप घेतला नाही तर यहुदी न्यायसभेला जे खरे आहे ते सांगितले. (मत्त. २६:६३, ६४) खरेतर येशूला शपथ घेण्याची गरजच नव्हती. तरीसुद्धा, त्याचा संदेश भरवशालायक आहे यावर जोर देण्यासाठी तो या विशिष्ट शैलीत म्हणायचा: “मी तुम्हाला खचित खचित सांगतो.” (योहा. १:५१; १३:१६, २०, २१, ३८) येशू, पौल, आणि इतर अनेकांचे म्हणणे होय तर होय असे होते. त्यांच्या उदाहरणांतून आपण आणखी काय शिकू शकतो ते पाहू या.

येशू—सर्वोत्तम उदाहरण

३. येशूने प्रार्थनेत देवाला कोणते वचन दिले, आणि त्याच्या स्वर्गीय पित्याने कसा प्रतिसाद दिला?

“पाहा, हे देवा, . . . तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” (इब्री १०:७) या अर्थपूर्ण शब्दांचा उपयोग करून, येशूने प्रतिज्ञात संततीविषयी जे काही भाकीत करण्यात आले होते ते सर्व पूर्ण करण्यासाठी स्वतःस देवाला सादर केले. या पूर्वभाकीत केलेल्या गोष्टींत सैतानाद्वारे त्याची “टाच” फोडली जाणेही सामील होते. (उत्प. ३:१५) याआधी कधीच कोणाही मानवाने स्वेच्छेने अशी मोठी जबाबदारी स्वीकारली नव्हती. यहोवाने स्वर्गातून आपल्या पुत्रावरील त्याचा भरवसा व्यक्‍त केला. येशूने शपथ वाहावी अशी अपेक्षा यहोवाने त्याच्याकडून केली नाही.—लूक ३:२१, २२.

४. आपले म्हणणे होय तर होय आहे हे येशूने कशा प्रकारे दाखवून दिले?

येशूने ज्याविषयी प्रचार केला त्यानुसार तो स्वतः वागला, आणि अशा प्रकारे त्याने दाखवून दिले, की त्याचे म्हणणे होय तर होय आहे. येशूला देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची आणि देवाने ज्यांना येशूकडे आकर्षिले होते त्या सर्वांना शिष्य बनवण्याची कामगिरी देवाकडून मिळाली होती. येशूने कोणत्याही गोष्टीला या कार्याच्या आड येऊ दिले नाही. (योहा. ६:४४) येशूचे बोलणे इतके भरवशालायक होते की बायबल त्याच्या विश्‍वसनीयतेचे वर्णन या सुपरिचित शब्दांत करते: “देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे.” (२ करिंथ. १:२०) खरोखर, पित्याला दिलेले वचन पूर्ण करण्याच्या बाबतीत येशूने सर्वोत्तम उदाहरण मांडले. आता आपण, येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यासाठी ज्याने सर्वतोपरी प्रयत्न केला होता त्याच्याविषयी पाहू या.

पौलदिलेला शब्द पाळणारा

५. प्रेषित पौलाने आपल्याकरता कोणते उदाहरण मांडले?

“प्रभूजी, मी काय करावे?” (प्रे. कृत्ये २२:१०) पौलाला, जो तेव्हा शौल या नावाने ओळखला जायचा, महिमावान प्रभू येशू एका दृष्टान्तात दिसला. येशूने त्याला आपल्या शिष्यांचा छळ करण्याचे थांबवण्यास सांगितले, तेव्हा शौलाने वरीलप्रमाणे आपल्या प्रामाणिक भावना व्यक्‍त केल्या. या घटनेचा परिणाम असा झाला, की शौलाने नम्रपणे आपल्या गतकाळातील कार्यांविषयी पश्‍चात्ताप केला, बाप्तिस्मा घेतला, आणि येशूविषयी राष्ट्रांना साक्ष देण्याच्या विशेष नेमणुकीचा स्वीकार केला. तेव्हापासून पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटापर्यंत पौलाने येशूला “प्रभू” म्हणून संबोधित केले आणि येशूच्या आज्ञांचे पालन केले. (प्रे. कृत्ये २२:६-१६; २ करिंथ. ४:५; २ तीम. ४:८) पौल त्या लोकांप्रमाणे नव्हता ज्यांना येशूने असे म्हटले: “तुम्ही मला प्रभू, प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही?” (लूक ६:४६) होय, जे लोक येशूला आपला प्रभू मानतात त्या सर्वांकडून तो अपेक्षा करतो की त्यांनी प्रेषित पौलाप्रमाणेच, दिलेला शब्द पाळावा.

६, ७. (क) पौलाने करिंथला पुन्हा भेट देण्याच्या आपल्या योजनेत फेरबदल का केला, आणि जे त्याच्या विश्‍वसनीयतेविषयी शंका घेत होते त्यांचे म्हणणे चुकीचे का होते? (ख) आपल्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी नेमण्यात आलेल्यांविषयी आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

पौलाने संपूर्ण आशिया मायनर व युरोपमध्ये मोठ्या आवेशाने राज्य संदेशाचा प्रसार केला, आणि अनेक मंडळ्या स्थापित करून त्यांना पुन्हा भेटी दिल्या. त्याने मंडळ्यांना जे लिहिले त्याची सत्यता पटवून देण्यासाठी, काही प्रसंगी शपथ घेणे त्याला आवश्‍यक वाटले होते. (गलती. १:२०) करिंथमधील काहींनी पौलाच्या विश्‍वसनीयतेविषयी आरोप केला तेव्हा त्याने आपल्या बचावात असे लिहिले: “देव विश्‍वसनीय आहे. आमचे तुम्हाबरोबर बोलणे, होय, नाही, असे नाही.” (२ करिंथ. १:१८) पौलाने असे लिहिले तेव्हा तो करिंथला जाण्यासाठी इफिसस शहरातून निघाला होता आणि मासेदोनियामधून प्रवास करत होता. मुळात, मासेदोनियाला जाण्याआधी करिंथला पुन्हा भेट द्यावी अशी त्याची योजना होती. (२ करिंथ. १:१५, १६) पण, कधीकधी काही कारणांमुळे योजनांमध्ये फेरबदल करावे लागू शकतात. उदाहरणार्थ, प्रवासी पर्यवेक्षकांना कधीकधी मंडळ्यांना भेटी देण्याच्या आपल्या तारखांमध्ये फेरबदल करावा लागू शकतो. असे फेरबदल ते क्षुल्लक कारणांसाठी किंवा स्वार्थापोटी करत नाहीत, तर एखाद्या आकस्मिक प्रसंगामुळे करतात. पौलाच्या बाबतीत पाहिल्यास, करिंथला भेट देण्याची आधीपासूनच त्याची योजना होती, पण करिंथ मंडळीच्या भल्यासाठी त्याने ती भेट पुढे ढकलली. ते कसे?

पौलाने करिंथला भेट देण्याची मुळात योजना केली होती, त्याच्या थोड्याच काळात करिंथ मंडळीतील एकता भंग होत असल्याची आणि मंडळीत अनैतिकता खपवून घेतली जात असल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. (१ करिंथ. १:११; ५:१) मंडळीतील परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी त्याने करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात कडक सल्ला दिला. त्यानंतर, इफिससहून थेट करिंथला जाण्याऐवजी, पौलाने आपल्या बांधवांना हा सल्ला लागू करण्यासाठी वेळ द्यायचे ठरवले. यामुळे तो शेवटी तेथे पोहचल्यावर त्याच्या भेटीमुळे त्यांना जास्त प्रोत्साहन मिळणार होते. त्याने आपल्या योजनेत फेरबदल का केला याच्या सत्यतेविषयी त्यांना आश्‍वासन देताना त्याने आपल्या दुसऱ्‍या पत्रात असे लिहिले: “देवाला साक्षी ठेऊन मी आपल्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की, मी करिंथास येणे रहित केले, ह्‍यात तुमची गय केली.” (२ करिंथ. १:२३) तर मग, आपण कधीही पौलाची टीका करणाऱ्‍यांप्रमाणे असू नये; त्याउलट, आपल्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी ज्यांना नेमण्यात आले आहे त्यांचा आपण मनापासून आदर केला पाहिजे. खरेच, दिलेला शब्द पाळण्याविषयी पौलाने ख्रिस्ताचे अनुकरण केले. तर मग, आपण या बाबतीत पौलाचे अनुकरण करू या.—१ करिंथ. ११:१; इब्री १३:७.

आणखी काही उत्तम उदाहरणे

८. रिबकेने आपल्याकरता कोणते उदाहरण मांडले?

“होय, मी जाण्यास तयार आहे.” (उत्प. २४:५८, सुबोधभाषांतर) अब्राहामाचा मुलगा इसहाक याची पत्नी होण्यासाठी, त्याच दिवशी आपले घर सोडून एका अनोळखी इसमासोबत ८०० किलोमीटरपेक्षा जास्त दूर जाण्याविषयी रिबकेला तिच्या आईने व भावाने विचारले, तेव्हा तिने वरील सरळसोप्या शब्दांत होकार दिला. (उत्प. २४:५०-५८) रिबकेचे म्हणणे होय तर होय असे होते, आणि इसहाकाची देवभीरू पत्नी असल्याचे तिने दाखवून दिले. ती आयुष्यभर, प्रतिज्ञात देशात विदेश्‍यांप्रमाणे तंबूंत राहिली. तिच्या विश्‍वासूपणासाठी देवाने तिला आशीर्वाद दिला. ती प्रतिज्ञात संततीची, म्हणजे येशू ख्रिस्ताची पूर्वज बनली.—इब्री ११:९, १३.

९. रूथने कशा प्रकारे दिलेला शब्द पाळला?

“नाही, नाही; आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.” (रूथ १:१०) विधवा नामी, मवाबहून बेथलेहेमला परत जात होती तेव्हा तिच्या विधवा सुना, रूथ व अर्पा या तिला असे म्हणत राहिल्या. शेवटी, नामीच्या आग्रहामुळे अर्पा आपल्या मायदेशी परत गेली. पण, रूथचे म्हणणे नाही तर नाही असे होते. (रूथ १:१६, १७ वाचा.) ती नामीला एकनिष्ठपणे जडून राहिली. तिने कायमचे आपल्या कुटुंबाला व मवाबच्या खोट्या उपासनेला सोडून दिले. ती विश्‍वासूपणे यहोवाची उपासना करत राहिली. आणि त्यामुळे शुभवर्तमान लिहिणाऱ्‍या मत्तयने ख्रिस्ताच्या वंशावळीत ज्या केवळ पाच स्त्रियांचा उल्लेख केला त्यांच्यापैकी एक असण्याचा बहुमान रूथला मिळाला.—मत्त. १:१, ३, ५, ६, १६.

१०. यशयाचे उदाहरण आपल्याकरता उत्तम का आहे?

१० “हा मी आहे, मला पाठीव.” (यश. ६:८) यशयाने हे उद्‌गार काढले त्याच्याआधी त्याने एक अद्‌भुत दृष्टान्त पाहिला. त्यात त्याने इस्राएलच्या मंदिराच्या वर यहोवाला राजासनावर बसलेले पाहिले. यशया हे भव्य दृश्‍य पाहत होता त्या वेळी त्याने यहोवाला असे म्हणताना ऐकले: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” यहोवाचा प्रवक्‍ता या नात्याने त्याचा संदेश, मार्ग भटकलेल्या त्याच्या लोकांना सांगण्याचे हे एक आमंत्रण होते. यशया आपल्या शब्दाला जागला. त्याचे म्हणणे होय तर होय होते. त्याने ४६ वर्षे विश्‍वासूपणे संदेष्टा या नात्याने सेवा केली. त्याने देवाच्या न्यायदंडाविषयीचे जोरदार संदेश घोषित केले. त्यासोबच, त्याने खऱ्‍या उपासनेच्या पुनःस्थापनेबद्दल अद्‌भुत अभिवचनांचीही घोषणा केली.

११. (क) आपले म्हणणे होय तर होय असणे इतके गंभीर का आहे? (ख) ज्यांचे म्हणणे होय तर होय असे नव्हते अशा कोणत्या काही लोकांची उदाहरणे बायबलमध्ये आहेत?

११ यहोवाने वरील सर्व उदाहरणे त्याच्या वचनात नमूद का करवून ठेवली आहेत? आणि आपले म्हणणे होय तर होय असणे इतके गंभीर का आहे? बायबलमध्ये स्पष्टपणे ताकीद देण्यात आली आहे, की जे “वचनभंग करणारे” आहेत “ते मरणास पात्र आहेत.” (रोम. १:३१, ३२) इजिप्तचा फारो, यहूदाचा राजा सिदकीया, आणि हनन्या व सप्पीरा हे बायबलमध्ये उल्लेख केलेल्या त्या वाईट लोकांपैकी काही जण आहेत ज्यांचे म्हणणे होय तर होय असे नव्हते. या सर्व लोकांना वाईट परिणाम भोगावे लागले आणि त्यांची उदाहरणे आज आपल्याकरता इशारेवजा उदाहरणे आहेत.—निर्ग. ९:२७, २८, ३४, ३५; यहे. १७:१३-१५, १९, २०; प्रे. कृत्ये ५:१-१०.

१२. आपले म्हणणे होय तर होय आहे हे दाखवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला साहाय्यक ठरेल?

१२ आज आपण “शेवटल्या” काळात राहत असल्यामुळे, आपल्या सभोवती असलेले लोक भरवशालायक नाहीत; ते लोक “सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य” नाकारतात. (२ तीम. ३:१-५) अशा लोकांचा सहवास टाळण्यासाठी आपण होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. त्याउलट, आपण अशा लोकांसोबत नियमितपणे सहवास केला पाहिजे, जे आपले म्हणणे होय तर होय आहे हे दाखवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करतात.—इब्री १०:२४, २५.

तुम्ही म्हटलेले सर्वात महत्त्वाचे “होय”

१३. येशू ख्रिस्ताचा अनुयायी सर्वात महत्त्वाचे होय केव्हा म्हणतो?

१३ एक व्यक्‍ती आपल्या जीवनात जे सर्वात महत्त्वाचे वचन देऊ शकते, ते देवाप्रती तिच्या समर्पणाशी संबंधित आहे. जे लोक येशूचे शिष्य या नात्याने स्वतःचा त्याग करतात, त्यांना तीन विशिष्ट प्रसंगी विचारलेल्या प्रश्‍नांना होय म्हणण्याद्वारे त्यांची इच्छा व्यक्‍त करण्याची संधी मिळते. (मत्त. १६:२४) जेव्हा मंडळीचे दोन वडील, बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्याची इच्छा असलेल्या एखाद्या व्यक्‍तीला भेटतात तेव्हा ते तिला हा प्रश्‍न विचारतात: “तुम्ही खरोखर यहोवाचे साक्षीदार होऊ इच्छिता का?” नंतर, त्या व्यक्‍तीने पुढे आणखी आध्यात्मिक प्रगती केल्यावर, तिला बाप्तिस्मा घ्यायची इच्छा असेल, तर वडील तिला भेटून असे विचारतात: “तुम्ही यहोवाला प्रार्थनेत आपले जीवन समर्पित केले आहे का?” शेवटी, बाप्तिस्म्याच्या दिवशी, बाप्तिस्मा घेण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला असे विचारले जाते: “येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावर तुम्ही, तुमच्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करून यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचे जीवन त्याला समर्पित केले आहे का?” अशा प्रकारे, हे नवीन लोक सर्वांसमोर होय म्हणण्याद्वारे, देवाची सेवा सदासर्वकाळ करण्याची त्यांची इच्छा व्यक्‍त करतात.

१४. आपण अधूनमधून कोणते आत्मपरीक्षण केले पाहिजे?

१४ तुमचा बाप्तिस्मा कदाचित अलीकडेच झालेला असेल, किंवा कित्येक दशकांपासून तुम्ही देवाची सेवा करत असाल. तरी, तुम्ही अधूनमधून स्वतःचे परीक्षण केले पाहिजे आणि स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजे: ‘येशूचे अनुकरण करून, मी जे सर्वात महत्त्वाचे होय म्हटले होते त्यानुसार जगत आहे का? प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याला जीवनात केंद्रस्थानी ठेवण्याद्वारे मी येशूच्या आज्ञेचे पालन करत आहे का?’—२ करिंथकर १३:५ वाचा.

१५. जीवनाच्या कोणत्या क्षेत्रांत तुमचे म्हणणे होय तर होय असणे महत्त्वाचे आहे?

१५ आपल्या समर्पणाच्या शपथेनुसार जगण्यासाठी आपण इतर महत्त्वाच्या गोष्टींतही विश्‍वासू राहिले पाहिजे. उदाहरणार्थ: तुम्ही विवाहित आहात का? असाल, तर तुमच्या विवाहसोबत्यावर प्रेम करण्याविषयी व त्याला मौल्यवान समजून त्याचा संभाळ करण्याविषयी तुम्ही वाहिलेल्या शपथेचा सन्मान करा. तुम्ही इतरांसोबत व्यवसाय करण्याचा करार केला आहे का, किंवा एखाद्या ईश्‍वरशासित जबाबदारीसाठी अर्ज केला आहे का? तर मग, तुमच्या वचनबद्धतेला जडून राहा. एखाद्या गरीब व्यक्‍तीकडून तुम्ही जेवणाचे आमंत्रण स्वीकारले आहे का? तर मग, यापेक्षा चांगले आमंत्रण मिळाल्यास, आधीचे आमंत्रण रद्द करू नका. किंवा घरोघरच्या सेवाकार्यात भेटलेल्या कोणा व्यक्‍तीला तुम्ही पुन्हा भेटण्याचे वचन दिले आहे का, जेणेकरून तुम्हाला तिला आणखी आध्यात्मिक मदत करता येईल? तर मग, तुमचे म्हणणे होय तर होय आहे हे दाखवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. यहोवा नक्कीच तुमच्या सेवाकार्यावर आशीर्वाद देईल.—लूक १६:१० वाचा.

आपला महायाजक व राजा याच्यापासून फायदा प्राप्त करा

१६. दिलेले वचन आपण पूर्ण करू शकलो नाही, तर आपण काय केले पाहिजे?

१६ बायबल म्हणते, की अपरिपूर्ण असल्यामुळे “आपण सगळेच पुष्कळ चुका करतो,” विशेषतः जिभेचा वापर करताना. (याको. ३:२) दिलेला शब्द आपण पाळला नाही असे आपल्या लक्षात आल्यास आपण काय केले पाहिजे? “एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा” केली असेल, तर देवाने इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात त्याविषयी एक प्रेमळ तरतूद करण्यात आली होती. (लेवी. ५:४-७, ११) अशा प्रकारचे पाप करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांकरतादेखील एक प्रेमळ तरतूद करण्यात आली आहे. आपण यहोवाजवळ आपले विशिष्ट पाप कबूल केले, तर तो आपला महायाजक, येशू ख्रिस्त याच्याद्वारे दयाळूपणे आपल्या पापांची क्षमा करेल. (१ योहान २:१, २) पण, आपल्यावर नेहमी देवाची कृपा असावी यासाठी, आपण तसे पाप पुढे करू नये, आणि ज्यांतून आपला पश्‍चात्ताप दिसून येईल असे गुण दाखवले पाहिजे. शिवाय, आपण वचन न पाळल्यामुळे समस्या निर्माण झाल्या असतील, तर त्या सोडवण्यासाठी आपण होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. (नीति. ६:२, ३) अर्थातच, आपण एखादे वचन पूर्ण करूच शकत नसू, तर त्याविषयी वचन देण्याआधी काळजीपूर्वक विचार करणे नेहमीच चांगले.—उपदेशक ५:२ वाचा.

१७, १८. आपले म्हणणे होय तर होय आहे हे दाखवण्यासाठी झटणाऱ्‍या सर्वांसमोर कोणते उज्ज्वल भविष्य आहे?

१७ आपले म्हणणे होय तर होय आहे हे दाखवण्यासाठी झटणाऱ्‍या यहोवाच्या सर्वच उपासकांचे भविष्य किती उज्ज्वल आहे! याचा अर्थ, १,४४,००० अभिषिक्‍त जनांना स्वर्गात अमर जीवन मिळेल; तेथे ते येशूच्या राज्यात त्याच्यासोबत मिळून “एक हजार वर्षे राज्य करतील.” (प्रकटी. २०:६) इतर लाखो लोक, नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर ख्रिस्ताच्या राज्य शासनाचे फायदे उपभोगतील. तेथे त्यांना शारीरिक व मानसिक रीत्या परिपूर्ण बनण्यास मदत केली जाईल.—प्रकटी. २१:३-५.

१८ येशूच्या हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी, आपण अखेरच्या परीक्षेत विश्‍वासू राहिल्यास, आपल्याला पुढे कधीही कोणाच्या म्हणण्यावर शंका घेण्याचे कारण राहणार नाही. (प्रकटी. २०:७-१०) तेव्हा सर्वांचेच म्हणणे होय तर होय, आणि नाही तर नाही असेल. कारण, त्या वेळी जगणारा प्रत्येक जण आपला स्वर्गीय पिता यहोवा, जो “सत्यस्वरूप” देव आहे त्याचे तंतोतंत अनुकरण करेल.—स्तो. ३१:५.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्र]

येशूच्या बाप्तिस्म्यापासून ते मृत्यूपर्यंत, तो पित्याला दिलेल्या वचनानुसार जगला

[३० पानांवरील चित्र]

तुम्ही जे सर्वात महत्त्वाचे होय म्हटले होते त्यानुसार जगत आहात का?