व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुःखद घटनांना धैर्याने तोंड देऊ या!

दुःखद घटनांना धैर्याने तोंड देऊ या!

दुःखद घटनांना धैर्याने तोंड देऊ या!

“देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.”—स्तो. ४६:१.

तुम्ही उत्तर देऊ शकता का?

दुःखद घटनांमुळे खचून जाण्याचे आपण कसे टाळू शकतो?

धैर्य दाखवण्याची कोणती कारणे आपल्याजवळ आहेत?

दुःखद घटनांना तोंड देण्यास आपल्याला साहाय्य करण्यासाठी यहोवाने कोणकोणत्या तरतुदी केल्या आहेत?

१, २. अनेकांनी कोणत्या दुःखद घटनांना तोंड दिले आहे, पण देवाच्या सेवकांची इच्छा काय आहे?

 आपण आज अतिशय कठीण काळात राहत आहोत. पृथ्वी ग्रहाला अनेक संकटांनी ग्रासले आहे. भूकंप, त्सुनामी, आगीच्या दुर्घटना, अतिवृष्टी, ज्वालामुखी, चक्रीवादळे, तुफान व झंझावात यांसारख्या अनर्थकारी घटनांनी मानवजातीला हैराण करून सोडले आहे. भरीस भर म्हणजे कौटुंबिक व वैयक्‍तिक समस्यांमुळे अनेकांच्या जीवनावर भीती व दुःखाचे सावट आले आहे. “समय व प्रसंग” सर्वांवरच येतात हे शब्द किती खरे आहेत!—उप. ९:११, पं.र.भा.

एकंदरीत पाहता, देवाच्या सेवकांनी अशा प्रकारच्या दुःखद घटनांना आजवर अतिशय खंबीरपणे तोंड दिले आहे. तरीसुद्धा, या जगाचा अंत जवळ येत असता भविष्यात जे काही कठीण प्रसंग येतील त्यांना तोंड देण्यासाठी आपण सुसज्ज होऊ इच्छितो. आपल्यासमोर येणाऱ्‍या आव्हानांमुळे खचून न जाता आपण कशा प्रकारे त्यांना तोंड देऊ शकतो? आज घडत असलेल्या दुःखद घटनांना धैर्याने तोंड देण्यास आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल?

धैर्याने जीवनाला सामोरे गेलेल्यांची अनुकरणीय उदाहरणे

३. रोमकर १५:४ यात सांगितल्यानुसार, दुःखद घटनांना तोंड देताना आपल्याला कोठून सांत्वन मिळू शकते?

आज अभूतपूर्व प्रमाणात लोकांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत असले, तरीही दुःखद घटना या मानव इतिहासाच्या सुरुवातीपासूनच घडत आल्या आहेत. तेव्हा, गतकाळात देवाच्या काही सेवकांनी जीवनातील समस्यांना यशस्वी रीत्या कसे तोंड दिले, आणि त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो हे पाहू या.—रोम. १५:४.

४. दाविदाला कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागले, आणि त्याला कशामुळे साहाय्य मिळाले?

दाविदाचे उदाहरण लक्षात घ्या. जीवनात सर्वसाधारणपणे येणाऱ्‍या समस्यांसोबतच, त्याला एका राजाच्या क्रोधाला सामोरे जावे लागले; शत्रूंनी अनेक वेळा त्याच्यावर हल्ले केले; त्याच्या बायकांना कैद करून नेण्यात आले; त्याच्या विश्‍वासातल्या माणसांनी त्याला दगा दिला, आणि बरेच दुःख व मनस्ताप त्याला सोसावा लागला. (१ शमु. १८:८, ९; ३०:१-५; २ शमु. १७:१-३; २४:१५, १७; स्तो. ३८:४-८) या सर्व संकटांमुळे दाविदाला किती क्लेश झाले, याची कल्पना आपल्याला बायबलमधील त्याच्या जीवनावर आधारित अहवालांवरून येते. पण, या संकटांमुळे देवावरील त्याच्या विश्‍वासाला तडा गेला नाही. त्याने पूर्ण विश्‍वासाने असे म्हटले: “परमेश्‍वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू?”—स्तो. २७:१; स्तोत्र २७:५, १० वाचा.

५. अब्राहाम व सारा यांना जीवनातील खडतर परिस्थितींना तोंड देणे कशामुळे शक्य झाले?

अब्राहाम व सारा यांना जवळजवळ त्यांच्या संपूर्ण जीवनभर तंबूंमध्ये व अनोळखी देशांत परक्यांप्रमाणे राहावे लागले. त्यांच्यासमोर अनेक खडतर प्रसंग आले. तरीसुद्धा, दुष्काळ व आसपासच्या राष्ट्रांचे हल्ले यांसारख्या आव्हानांना त्यांनी खंबीरपणे तोंड दिले. (उत्प. १२:१०; १४:१४-१६) त्यांना हे कशामुळे शक्य झाले? देवाचे वचन आपल्याला सांगते की “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची [अब्राहाम] वाट पाहत होता.” (इब्री ११:८-१०) अब्राहाम व सारा त्यांच्या जीवनातील खडतर परिस्थितींमुळे खचून गेले नाहीत. उलट, देवाने केलेल्या प्रतिज्ञा त्यांनी नेहमी मनात बाळगल्या.

६. ईयोबाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

ईयोबावर खूपच दुःखदायक परिस्थिती गुदरली. त्याचे सबंध जीवनच जणू उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गाला लागले होते, तेव्हा त्याला कसे वाटले असेल याची कल्पना करून पाहा. (ईयो. ३:३, ११) त्यातल्या त्यात, ही सगळी संकटे आपल्यावर कशामुळे येत आहेत याची त्याला पूर्ण कल्पना नव्हती. तरीसुद्धा, ईयोबाने परिस्थितीपुढे हात टेकले नाही. त्याने आपली सचोटी व देवावरील आपला विश्‍वास टिकवून ठेवला. (ईयोब २७:५ वाचा.) खरोखर, ईयोबाच्या उदाहरणावरून आपण किती चांगल्या गोष्टी शिकू शकतो!

७. देवाची सेवा करत असताना पौलाला कशा प्रकारचे अनुभव आले, पण कोणत्या जाणिवेमुळे त्याला देवाची सेवा करत राहण्याचे धैर्य मिळाले?

तसेच, प्रेषित पौलाचेही उदाहरण विचारात घ्या. त्याला “नगरांतली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे,” सोसावी लागली. “तहानभूक, . . . थंडी व उघडावागडेपणा,” यांचाही तो उल्लेख करतो. तसेच, जहाज फुटण्याच्या एका अनुभवाबद्दल सांगताना, “एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली” असे त्याने लिहिले. (२ करिंथ. ११:२३-२७) पण हे सर्व असूनही, देवाच्या सेवेमुळे मृत्यूला सामोरे जावे लागल्यानंतर पौलाने कशा प्रकारची मनोवृत्ती व्यक्‍त केली याकडे लक्ष द्या. त्याने म्हटले: “आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, . . . आणि तो आम्हाला ह्‍यापुढेही सोडवील.” (२ करिंथ. १:८-१०) पौलाला जितक्या कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला तितक्या कठीण प्रसंगांचा सामना आपल्यापैकी बहुतेकांना करावा लागलेला नाही. तरीसुद्धा, आपल्यापैकी बऱ्‍याच जणांनी पौलासारख्या भावना अनुभवल्या आहेत आणि त्याच्या धैर्यवान उदाहरणावरून आपल्याला नक्कीच सांत्वन मिळते.

दुःखद घटनांमुळे खचून जाण्याचे टाळा

८. आजच्या जगातील समस्यांमुळे आपल्यावर कोणता परिणाम होऊ शकतो? उदाहरण द्या.

आज जगात संकटे, समस्या व दबाव इतके वाढले आहेत की बरेच लोक—अगदी यहोवाच्या खऱ्‍या उपासकांपैकीही काही जण, त्यांमुळे खचून जातात. उदाहरणार्थ, लॅनी * ऑस्ट्रेलियात आपल्या पतीसोबत अगदी आनंदाने पूर्णवेळेची सेवा करत होती. पण अचानक तिला स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले. हे समजले तेव्हा ती पार उद्‌ध्वस्त झाली. आपल्यावर जणू आभाळच कोसळले असे ती सांगते. ती म्हणते: “उपचारांच्या दुष्परिणामांमुळे माझी प्रकृती खूपच खालावली आणि माझ्यात जराही आत्मविश्‍वास उरला नाही.” आणि हे सारे कमी होते म्हणून की काय, तिला पाठीच्या कण्याचे ऑपरेशन झालेल्या आपल्या पतीचीही देखभाल करावी लागत होती. आपल्या जीवनात अशी परिस्थिती उद्‌भवल्यास आपण काय करू शकतो?

९, १०. (क) आपण सैतानाला काय करण्यास वाव देऊ नये? (ख) प्रेषितांची कृत्ये १४:२२ यात सांगितलेल्या वास्तवाला आपण कशा प्रकारे तोंड देऊ शकतो?

एक गोष्ट आपण आठवणीत ठेवली पाहिजे. आपला विश्‍वास कमकुवत करण्यासाठी सैतान आपल्यावर येणाऱ्‍या संकटांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो. पण अशा प्रकारे आपल्याला निराश करण्यास आपण कधीही सैतानाला वाव देऊ नये. नीतिसूत्रे २४:१० म्हणते: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ती अल्प होय.” बायबलमधील याआधी चर्चा केलेल्या व इतर उदाहरणांवर मनन केल्यामुळे आपल्याला कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देण्यास साहाय्य मिळेल.

१० तसेच, सर्व समस्या काढून टाकणे आपल्या हातात नाही हेही आपण आठवणीत ठेवले पाहिजे. उलट, जीवनात समस्या या येतीलच, हे आपण धरून चालले पाहिजे. (२ तीम. ३:१२) प्रेषितांची कृत्ये १४:२२ सांगते की आपल्याला “पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.” तेव्हा, निराश होण्याऐवजी, संकटांमुळे आपल्याला देवाच्या सामर्थ्यावर भरवसा व्यक्‍त करण्याची आणि धैर्य दाखवण्याची संधी मिळते अशी भूमिका तुम्ही का बाळगू नये?

११. जीवनातील संकटांमुळे खचून जाण्याचे आपण कसे टाळू शकतो?

११ आपण प्रोत्साहनदायक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. देवाचे वचन आपल्याला सांगते: “आनंदी मनाने मुख प्रसन्‍न होते; मनातील खेदाने हृदय भंग पावते.” (नीति. १५:१३) आजार बरा होण्यात सकारात्मक विचारसरणीचा मोठा वाटा असतो हे वैद्यकीय संशोधकांनी फार पूर्वीपासूनच मान्य केले आहे. बऱ्‍याच रुग्णांना प्लॅसिबो (रुग्णाच्या समाधानाकरता दिलेली निरर्थक औषधे) देण्यात आलीत, तेव्हा या गोळीमुळे आपण बरे होणार या विचारानेच त्यांना बरे वाटू लागले. याउलट, योग्य औषध देऊनही, या औषधाने काही दुष्परिणाम होतील असे सांगितल्यामुळे, काही रुग्णांचा रोग आणखी बळावल्याची उदाहरणेदेखील पाहण्यात आली आहेत. तात्पर्य हेच, की जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही तिचा सतत विचार केल्यामुळे आपण आणखीनच निराश होतो. पण यहोवा केवळ रुग्णाच्या समाधानाकरता औषधे देणाऱ्‍या डॉक्टरसारखा नाही. उलट, कठीण परिस्थितीतही, त्याच्या वचनातून मिळणारे प्रोत्साहन, आपल्याला मदत व आधार देणारे मंडळीतील बांधव, तसेच, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारे सामर्थ्य या माध्यमांतून तो आपल्याला खरोखरचे साहाय्य पुरवतो. या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्या मनाला उभारी मिळेल. तेव्हा, दुःखदायक परिस्थितींचा सतत विचार करत बसण्याऐवजी, प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी व्यावहारिक पावले उचला आणि तुमच्या जीवनातील प्रोत्साहनदायक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.—नीति. १७:२२.

१२, १३. (क) विनाशकारक विपत्तींच्या परिणामांना सामोरे जाण्यास देवाच्या सेवकांना कशामुळे मदत झाली आहे? उदाहरण द्या. (ख) विपत्ती येते तेव्हा एखाद्याच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे काय आहे हे कशा प्रकारे स्पष्ट होते?

१२ अलीकडच्या काळात काही देशांना अतिशय विनाशकारक विपत्तींचा तडाखा बसला. पण, या देशांतील बांधवांनी उल्लेखनीय धैर्य दाखवून नव्याने आपले जीवन सुरू केले आहे. अर्थातच, हे त्यांना सोपे गेले नाही. २०१० च्या सुरुवातीलाच चिली येथे झालेल्या एका शक्‍तिशाली भूकंपामुळे व त्सुनामीमुळे आपल्या अनेक बांधवांच्या घरांचे व मालमत्तेचे नुकसान झाले. काही जणांची उदरनिर्वाहाची साधने नष्ट झाली. असे असूनही, बांधवांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात व्यत्यय येऊ दिला नाही. सॅम्युएल, ज्यांचे घर या भूकंपात जमीनदोस्त झाले ते म्हणतात: “या अत्यंत बिकट परिस्थितीतही मी व माझ्या पत्नीनं कधीही सभांना व सेवाकार्याला जायचं थांबवलं नाही. मला वाटतं, याच सवयींमुळं आम्हाला परिस्थितीपुढं हार न मानण्यास साहाय्य मिळालं.” इतर अनेक बांधवांप्रमाणेच, ते घडलेल्या विपत्तीवर लक्ष केंद्रित न करता यहोवाची सेवा करत राहिले.

१३ सन २००९ च्या सप्टेंबर महिन्यात फिलिपीन्झमध्ये आलेल्या वादळी पावसामुळे महापूर येऊन मनिला शहराचा ८० टक्के भाग पाण्याखाली बुडाला. बरीच संपत्ती गमावलेल्या एका श्रीमंत माणसाने म्हटले, “या पुरानं माणसामाणसातला फरकच पुसून टाकला, कारण श्रीमंत काय आणि गरीब काय, सर्वांनाच अडचणी व दुःख सोसावं लागलं.” यावरून आपल्याला येशूच्या या सुज्ञ सल्ल्याची आठवण होते: “स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत.” (मत्त. ६:२०) पैसा व धनसंपत्ती क्षणात नष्ट होऊ शकते; त्यामुळे जे लोक या गोष्टींना आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व देतात त्यांची सहसा निराशा होते. त्याऐवजी यहोवासोबतचा आपला नातेसंबंध जीवनात केंद्रस्थानी ठेवणे किती सुज्ञपणाचे आहे; कारण, कितीही मोठे संकट आले तरी ते यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधास नष्ट करू शकत नाही.—इब्री लोकांस १३:५, ६ वाचा.

का दाखवू शकतो आपण धैर्य?

१४. धैर्य दाखवण्याची कोणती कारणे आपल्याजवळ आहेत?

१४ येशूने सांगितले होते की त्याच्या उपस्थितीदरम्यान अनेक कठीण प्रसंग उद्‌भवतील. पण त्याने म्हटले: “घाबरू नका.” (लूक २१:९) येशू ख्रिस्त आपला राजा असल्यामुळे आणि सबंध विश्‍वाचा निर्माणकर्ता यहोवा आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण नक्कीच आत्मविश्‍वास बाळगू शकतो. पौलाने तीमथ्याला असे म्हणून प्रोत्साहन दिले: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.”—२ तीम. १:७.

१५. देवाच्या सेवकांनी व्यक्‍त केलेल्या दृढ आत्मविश्‍वासाची उदाहरणे द्या आणि आपण अशा प्रकारचे धैर्य कसे मिळवू शकतो हे स्पष्ट करा.

१५ देवाच्या सेवकांनी व्यक्‍त केलेल्या आत्मविश्‍वासाची काही उदाहरणे पाहा. दाविदाने म्हटले: “परमेश्‍वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी साहाय्य पावलो; म्हणून माझे हृदय उल्लासते.” (स्तो. २८:७) पौलानेही पुढील शब्दांत आपला दृढ विश्‍वास व्यक्‍त केला: “ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे . . . आपण महाविजयी ठरतो.” (रोम. ८:३७) त्याच प्रकारे, येशूच्या अटकेची व मृत्यूची वेळ जवळ येत होती, तेव्हा त्याने म्हटले: “मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.” (योहा. १६:३२) त्याच्या या शब्दांवरून देवासोबतचा त्याचा नातेसंबंध किती घट्ट आहे हे नक्कीच त्याच्या ऐकणाऱ्‍यांच्या लक्षात आले असेल. वरील सर्व उदाहरणांवरून काय स्पष्ट होते? प्रत्येक उदाहरणात यहोवावरील दृढ विश्‍वास दिसून येतो. आपण देवावर असाच विश्‍वास उत्पन्‍न केल्यास, आज तोंड द्याव्या लागणाऱ्‍या कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे धैर्य आपल्याला मिळेल.—स्तोत्र ४६:१-३ वाचा.

धैर्य टिकवून ठेवण्यासाठी यहोवाच्या तरतुदींचा फायदा घ्या

१६. देवाच्या वचनाचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?

१६ स्वतःच्या बळावर संकटांना तोंड देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ख्रिस्ती धैर्य नव्हे. तर, देवाची चांगल्या प्रकारे ओळख करून घेतल्यामुळे व त्याच्यावर विसंबून राहिल्यामुळे ख्रिस्ती धैर्य निर्माण होते. यासाठी आपण देवाच्या लिखित वचनाचा, बायबलचा नियमित अभ्यास केला पाहिजे. तीव्र नैराश्‍याला तोंड देत असलेल्या एका बहिणीने तिला कशामुळे साहाय्य प्राप्त होते हे सांगितले. ती म्हणते, “मला जे उतारे विशेष सांत्वनदायक वाटतात ते मी पुन्हापुन्हा वाचते.” कौटुंबिक उपासनेकरता नियमित रीत्या वेळ काढण्याविषयी देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचे आपण पालन केले आहे का? या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला त्या स्तोत्रकर्त्यासारखी मनोवृत्ती दाखवण्यास मदत मिळेल, ज्याने म्हटले: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.”—स्तो. ११९:९७.

१७. (क) धैर्यवान मनोवृत्ती टिकवून ठेवण्यास कोणत्या तरतुदीमुळे आपल्याला साहाय्य मिळू शकते? (ख) आपल्या प्रकाशनांतील अशा एखाद्या जीवनकथेचे उदाहरण द्या जिच्यामुळे तुम्हाला मदत मिळाली आहे.

१७ आपल्याजवळ बायबलवर आधारित प्रकाशनेही आहेत, ज्यांतील माहिती यहोवावरील विश्‍वास दृढ करण्यास आपल्याला साहाय्य करते. अनेक बंधुभगिनींना आपल्या नियतकालिकांत प्रकाशित होणाऱ्‍या जीवनकथा विशेषतः उपयोगी वाटतात. आशियात राहणाऱ्‍या एका बहिणीला बायपोलर मूड डिसॉर्डर (एक प्रकारचा मनोविकार) झाला आहे. याच समस्येला यशस्वी रीत्या तोंड दिलेल्या एका भूतपूर्व मिशनरी बांधवाची जीवनकथा वाचल्यावर तिला खूप आनंद झाला. तिने लिहिले, “या लेखानं मला माझी समस्या समजून घेण्यास मदत केली व मला आशेचा किरण दाखवला.”

१८. प्रार्थनेच्या तरतुदीचा आपण फायदा का घेतला पाहिजे?

१८ प्रार्थना आपल्याला सर्व प्रकारच्या परिस्थितींत मदत करू शकते. ही तरतूद किती मौल्यवान आहे याकडे लक्ष वेधून प्रेषित पौलाने म्हटले: “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पै. ४:६, ७) संकटकाळी बळ मिळवण्यासाठी या मौल्यवान तरतुदीचा आपण पुरेपूर फायदा घेतो का? बऱ्‍याच काळापासून नैराश्‍याचा सामना करत असलेल्या ब्रिटनमधील ॲलेक्स नावाच्या एका बांधवाने म्हटले: “प्रार्थनेत यहोवाशी बोलणं आणि त्याचं वचन वाचण्याद्वारे त्याचं ऐकणं, याच गोष्टी मला जीवनात तग धरून राहण्यास साहाय्य करतात.”

१९. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यासंबंधी आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

१९ आपल्याला मदत करण्यासाठी केलेली आणखी एक तरतूद म्हणजे सभांमध्ये मिळणारा बंधुभगिनींचा सहवास. एका स्तोत्रकर्त्याने असे लिहिले: “माझ्या जिवाला परमेश्‍वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे.” (स्तो. ८४:२) आपल्यालाही असेच वाटते का? याआधी जिचा उल्लेख करण्यात आला होता, ती लॅनी ख्रिस्ती सहवासाबद्दलचा तिचा दृष्टिकोन या शब्दांत व्यक्‍त करते: “सभांना जावं की नाही असा विचार मी कधीच केला नाही. मला माहीत होतं, की जर मी यहोवाच्या साहाय्याची अपेक्षा करते, तर ते मिळवण्यासाठी मी सभांना गेलंच पाहिजे.”

२०. प्रचार कार्यात सहभागी झाल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे साहाय्य मिळेल?

२० तसेच राज्य प्रचाराच्या कार्यात सहभाग घेत राहिल्याने आपले धैर्य वाढते. (१ तीम. ४:१६) ऑस्ट्रेलियात राहणारी एक बहीण, जिच्या जीवनात अनेक समस्या आल्या, ती म्हणते: “खरं सांगायचं तर, प्रचाराला जावंसं मला मुळीच वाटत नव्हतं, पण एका वडिलांनी मला त्यांच्यासोबत येण्याचं सुचवलं. मी त्यांच्यासोबत प्रचाराला गेले. त्या बांधवाच्या माध्यमानं यहोवा देवच मला मदत करत असावा; कारण प्रत्येक वेळी सेवेला गेल्यावर मला खूप आनंदी वाटायचं.” (नीति. १६:२०) इतरांना यहोवावर विश्‍वास ठेवण्यास मदत केल्यामुळे आपला स्वतःचा विश्‍वास बळकट होतो असे अनेकांना आढळले आहे. या कार्यात सहभागी झाल्यामुळे, त्यांना स्वतःच्या समस्यांचा विसर पडतो आणि जास्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.—फिलिप्पै. १:१०, ११.

२१. आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या कठीण प्रसंगांबाबत आपण कोणती खातरी बाळगू शकतो?

२१ आजच्या दुःखद समस्यांना धैर्याने तोंड देण्यासाठी यहोवाने आपल्याला भरपूर मदत पुरवली आहे. आपण ही खातरी बाळगू शकतो, की या सर्व तरतुदींचा फायदा घेतल्यास; आणि देवाच्या धैर्यवान सेवकांच्या उत्तम उदाहरणांवर मनन करून त्यांचे अनुकरण केल्यास, आपल्यासमोर येणाऱ्‍या कठीण परिस्थितींना आपण यशस्वी रीत्या तोंड देऊ शकतो. जसजसा या जगाचा अंत जवळ येईल तसतसे आपल्याला कदाचित आणखी बऱ्‍याच कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. पण, तरीसुद्धा पौलाप्रमाणे आपणही असे म्हणू शकतो: “आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही; . . . आम्ही धैर्य सोडीत नाही.” (२ करिंथ. ४:९, १६) यहोवाच्या मदतीने आपण आजच्या दुःखद समस्यांना नक्कीच धैर्याने तोंड देऊ शकतो.—२ करिंथकर ४:१७, १८ वाचा.

[तळटीप]

^ परि. 8 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्रे]

दुःखद प्रसंगाला तोंड देत असताना, यहोवाने पुरवलेल्या साहाय्याचा फायदा घ्या