व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लहान मुलांच्या मुखातून प्रोत्साहन

लहान मुलांच्या मुखातून प्रोत्साहन

लहान मुलांच्या मुखातून प्रोत्साहन

डिसेंबर २००९ मध्ये, रशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे, टागनरोग येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक संघटनेची अधिकृत नोंदणी रद्द करण्यात आली. तेथील राज्य सभागृह जप्त करण्यात आले आणि आपली ३४ प्रकाशने लोकांकरता हानिकारक आहेत असे घोषित करण्यात आले. धक्का देणारी ही बातमी आणि न्यायालयाच्या या निर्णयाचा ज्या साक्षीदारांवर प्रभाव पडला होता त्यांचे व सोबतच लहान मुलांचे फोटो यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात आले.

काही महिन्यांनंतर, रशियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रशासकीय केंद्राला ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्झलँड राज्यातील एका साक्षीदार कुटुंबाकडून एक बॉक्स व एक पत्र मिळाले. या कुटुंबाने न्यायालयाचा निर्णय वाचला होता. त्या पत्रात असे लिहिले होते: “प्रिय बांधवांनो, रशियातील मित्रांचा विश्‍वास व परीक्षा पाहून आमच्या मुलांचे, कोडी व लेरीसा यांचे मन भरून आले. त्यांनी काही पत्रं लिहिली आहेत आणि आम्ही भेटवस्तूंचा एक लहानसा बॉक्स टागनरोग येथील मुलांना पाठवू इच्छितो. असे करण्याचा उद्देश हा आहे, की त्यांच्यापासून पुष्कळ दूर असलेल्या दुसऱ्‍या देशात, अशी इतर मुलंही आहेत जी विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत व त्यांचा विचार करत आहेत हे त्यांना कळावं. ते सर्वांना खूप खूप प्रेम पाठवत आहेत.”

या भेटवस्तू मिळाल्यावर टागनरोग येथील मुलांनी ऑस्ट्रेलियातील या कुटुंबाचे आभार मानण्यासाठी रंगीबेरंगी चित्रे काढलेली पत्रे पाठवली. लहान मुलांच्या मुखातून प्रोत्साहन देण्यात आल्याचे पाहून रशिया शाखेत सेवा करत असलेला एक बांधव कोडी व लेरीसा यांना पत्र लिहिण्यास प्रवृत्त झाला. त्याने लिहिले: “लहान मुलांना व मोठ्यांना काही न करता शिक्षा देण्यात आल्यामुळं त्यांना किती वाईट वाटलं असेल याचा तुम्ही विचार करू शकता. टागनरोग येथील आपल्या बंधुभगिनींनी काहीही चुकीचं केलं नाही, तरीसुद्धा त्यांचं राज्य सभागृह जप्त करण्यात आलं. यामुळं ते खूप दुःखी झाले आहेत. पण जगातील दुसऱ्‍या भागात कुणीतरी आपला विचार करत आहे ही गोष्ट कळल्यानं त्यांना खूप प्रोत्साहन मिळेल. प्रेमळ व उदार आत्मा दाखवल्याबद्दल तुमचे आभार मानतो.”—स्तो. ८:२.

आपण खरोखरच जगभरातील बंधुसमाजाचा एक भाग आहोत, आणि एकमेकांप्रती असलेले आपले प्रेम जीवनातील परीक्षांचा व समस्यांचा सामना करण्यास आपल्याला मदत करते. यहोवाच्या साक्षीदारांवर असा आरोप लावण्यात आला आहे की ते लोकांना एकमेकांचा द्वेष करण्यास शिकवतात. पण वेगवेगळ्या देशांच्या व वेगवेगळ्या संस्कृतींच्या आपल्या लहान मुलांनी दाखवून दिले आहे की ते एकमेकांवर प्रेम करतात व एकमेकांची काळजी करतात. त्यांच्या मनोवृत्तीवरून येशूचे शब्द किती खरे आहेत हे दिसून येते: “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहा. १३:३५.

[३२ पानांवरील चित्रे]

रशियातील मुलांना (डावीकडे) ऑस्ट्रेलियातील मुलांकडून (उजवीकडे) भेटवस्तू मिळाल्या