अंधश्रद्धाळूपणे बायबलचा वापर करण्यापासून सावध राहा
अंधश्रद्धाळूपणे बायबलचा वापर करण्यापासून सावध राहा
“देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे. (इब्री ४:१२) असे म्हणून प्रेषित पौलाने ठळकपणे दाखवून दिले, की देवाच्या वचनात एखाद्याच्या मनावर खोलवर प्रभाव पाडण्याची व त्याचे जीवन पूर्णपणे बदलून टाकण्याची शक्ती आहे.
पण भाकीत करण्यात आलेला धर्मत्याग प्रेषितांच्या मृत्यूनंतर मूळ धरू लागला तेव्हा बायबलमधील संदेशाच्या या सामर्थ्याविषयी लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. (२ पेत्र २:१-३) कालांतराने चर्चचे पुढारी देवाच्या वचनात जादुई शक्ती आहे असे शिकवू लागले. प्रोफेसर हॅरी वाय. गॅम्बल यांनी “ख्रिस्ती शास्त्रवचनांच्या जादुई उपयोगाविषयी” लिहिले. त्यांनी म्हटले तिसऱ्या शतकात चर्च फादर ओरीजेन यांनी सुचवले की, “पवित्र शब्द केवळ कानांवर पडले तरी त्यांचा या ना त्या मार्गाने फायदा होतो: मूर्तिपूजक लोकांच्या मंत्रोच्चारात इतकी शक्ती असू शकते, तर देवाकडून मिळालेल्या शास्त्रवचनांत नक्कीच त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्ती असणार.” चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या जॉन क्रिसोस्टोम याने लिहिले की “ज्या घरात शुभवर्तमानाचे पुस्तक असेल त्या घरात शिरण्याची हिम्मत दियाबल मुळीच करणार नाही.” त्याने असेही सांगितले की काहींनी शुभवर्तमानातील काही वचने शक्तिशाली ताइताप्रमाणे त्यांच्या गळ्यात अडकवली. “कोणाला डोकेदुखी असल्यास त्याने योहानाच्या शुभवर्तमानाचे पुस्तक झोपताना आपल्या उशीखाली ठेवण्यास काही हरकत नाही,” असे कॅथलिक धर्मवेत्ता ऑगस्टीन याचे मत असल्याचे प्रोफेसर गॅम्बल सांगतात. अशा प्रकारे बायबलमधील शास्त्रवचनांचा वापर जादूटोण्यासाठी केला जाऊ लागला. तुम्ही बायबलला एक ताइत, किंवा चांगले नशीब घडवून आणणारी वस्तू मानता का, जी तुमचे वाइटापासून संरक्षण करेल?
बायबलच्या दुरुपयोगाचा एक सामान्य प्रकार म्हणजे बिबलियोमँसी. बिबलियोमँसी म्हणजे काय? एखाद्या पुस्तकातील, विशेषतः बायबलमधील कोणतेही पान उघडून जे शास्त्रवचन डोळ्यांसमोर पहिले दिसते ते वाचायचे. त्या शास्त्रवचनातून आपल्याला आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल अशा विश्वासाने हे केले जाते. उदाहरणार्थ, प्रोफेसर गॅम्बल यांच्यानुसार, एका प्रसंगी जेव्हा ऑगस्टीनने त्याच्या शेजारच्या घरातील एका लहान मुलाला “घे आणि वाच, घे आणि वाच” असे म्हणताना ऐकले तेव्हा देवच आपल्याला आज्ञा देत आहे असे मानून त्याने बायबल उघडले आणि जे शास्त्रवचन सर्वात पहिले त्याच्या दृष्टीस पडले ते त्याने वाचले.
काही लोक कठीण परिस्थितीत देवाला प्रार्थना करतात आणि बायबलमधील कोणतेही पान उघडून जे पहिले वचन त्यांना दिसेल ते वाचतात. हे वचन समस्यांचा सामना करण्यास आपल्याला मदत करेल असा त्यांचा ग्रह असतो. त्यांचा हेतू जरी चांगला असला, तरी ख्रिश्चनांनी बायबलमधून मार्गदर्शन मिळवण्याची ही पद्धत नाही.
येशूने आपल्या शिष्यांना आश्वासन दिले की तो त्यांच्यासाठी “कैवारी म्हणजे पवित्र आत्मा” पाठवील. त्याने पुढे म्हटले: “तो . . . तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल.” (योहा. १४:२६) याउलट, बिबलियोमँसीवर विश्वास करणाऱ्यांना बायबलचे ज्ञान असण्याची गरज नसते.
बिबलियोमँसी व अंधश्रद्धाळूपणे बायबलचा वापर करण्याचे इतर प्रकार आज सर्रासपणे दिसून येतात. पण देवाचे वचन शकुनमुहूर्त पाहण्याची निंदा करते. (लेवी. १९:२६; अनु. १८:९-१२; प्रे. कृत्ये १९:१९) “देवाचे वचन सजीव, सक्रिय” असले, तरी त्याचा वापर करण्यात आपण कुशल असले पाहिजे. जीवन सुधारण्यासाठी बायबलचा अंधश्रद्धाळूपणे वापर करणे नव्हे, तर त्याचे अचूक ज्ञान घेणे गरजेचे आहे. असे ज्ञान मिळवल्यामुळे बऱ्याच जणांना नैतिकता उत्पन्न करण्यास, हानिकारक जीवनशैली सोडून देण्यास, कौटुंबिक जीवन मजबूत करण्यास व बायबलच्या लेखकाशी, यहोवाशी वैयक्तिक नातेसंबंध जोडण्यास मदत मिळाली आहे.