व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कसे मिळवाल जीवनात खरे यश?

कसे मिळवाल जीवनात खरे यश?

कसे मिळवाल जीवनात खरे यश?

“तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ती घडेल.”—यहो. १:८.

तुमचे उत्तर काय असेल?

शलमोन कितपत यशस्वी ठरला?

पौल कशा प्रकारे खऱ्‍या अर्थाने यशस्वी ठरला?

तुम्ही आता व भविष्यातही यशस्वी कसे ठरू शकता?

१, २. (क) यशाबद्दल बऱ्‍याच लोकांची काय मते आहेत? (ख) यशाबाबत तुमचा वैयक्‍तिक दृष्टिकोन तुम्ही कसा जाणून घेऊ शकता?

 जीवनात खरोखर यशस्वी कोणाला म्हणता येईल? तुम्ही हा प्रश्‍न लोकांसमोर ठेवल्यास, कोणत्याही दोन व्यक्‍तींचे उत्तर सारखे नसल्याचे तुम्हाला आढळेल. उदाहरणार्थ, बऱ्‍याच जणांच्या मते आर्थिक, व्यावसायिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्‍या व्यक्‍ती यशस्वी असतात. तर इतर जण नातेसंबंधांच्या आधारावर, म्हणजे एखाद्या व्यक्‍तीचे तिच्या कुटुंबाशी, मित्रमैत्रिणींशी किंवा सहकर्मचाऱ्‍यांशी कसे संबंध आहेत याच्या आधारावर तिच्या यशाचे मोजमाप करतात. देवाची सेवा करणारे काही जण, मंडळीत एखादे जबाबदारीचे पद मिळवण्याशी किंवा ख्रिस्ती सेवेत बरेच कार्य साध्य करण्याशी यशाचा संबंध जोडतात.

यशाबाबत तुमचा वैयक्‍तिक दृष्टिकोन जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही अशा काही व्यक्‍तींच्या नावांची यादी तयार करू शकता, ज्या तुमच्या मते यशस्वी आहेत; किंवा ज्यांच्याविषयी तुमच्या मनात खूप कौतुक व आदर आहे. या सर्व व्यक्‍तींमध्ये कोणती समान वैशिष्ट्ये आहेत? त्या सर्व धनाढ्य किंवा सुप्रसिद्ध व्यक्‍ती आहेत का? चारचौघांत त्यांना मानाचे स्थान आहे का? या प्रश्‍नांच्या उत्तरांवरून यशाबाबत तुमच्या मनातल्या खऱ्‍या भावना प्रकट होतील आणि त्यांचा तुमच्या जीवनातील निर्णयांवर व ध्येयांवर बराच प्रभाव पडू शकतो.—लूक ६:४५.

३. (क) यशस्वी होण्याकरता यहोशवाने काय करायचे होते? (ख) आता आपण काय पाहणार आहोत?

यहोवाच्या दृष्टीत आपण यशस्वी आहोत किंवा नाही हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण, यहोवाची संमती मिळवण्यावरच आपले जीवन अवलंबून आहे. इस्राएलांना प्रतिज्ञात देशात नेण्याची महत्त्वाची जबाबदारी यहोशवावर सोपवताना यहोवाने त्याला मोशेचे नियमशास्त्र “रात्रंदिवस” वाचण्याची आणि त्यात लिहिलेल्या गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करण्याची आज्ञा दिली. देवाने त्याला हे आश्‍वासन दिले: “म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ती घडेल.” (यहो. १:७, ८) आणि तुम्हाला तर माहीतच आहे की यहोशवा खरोखरच यशस्वी ठरला. मग आपल्याविषयी काय? यशाबद्दल आपला दृष्टिकोन यहोवाच्या दृष्टिकोनाशी जुळतो किंवा नाही हे आपण कसे ठरवू शकतो? याचे उत्तर मिळवण्यासाठी आपण बायबलमध्ये उल्लेख केलेल्या दोन व्यक्‍तींच्या जीवनाचे परीक्षण करू या.

शलमोन जीवनात यशस्वी ठरला का?

४. शलमोन यशस्वी ठरला असे का म्हणता येईल?

बऱ्‍याच अर्थांनी शलमोन अतिशय यशस्वी ठरला. असे का म्हणता येईल? कारण अनेक वर्षांपर्यंत तो यहोवाला भिऊन चालला व त्याच्या आज्ञेत राहिला, आणि यामुळे यहोवाने त्याला भरभरून आशीर्वाद दिला. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा यहोवाने शलमोनाला वर मागण्यास सांगितले, तेव्हा शलमोन राजाने लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धी मिळावी अशी विनंती केली. आणि देवाने त्याची ही विनंती मान्य करून त्याला फक्‍त बुद्धीच नव्हे, तर धनसंपत्तीही दिली. (१ राजे ३:१०-१४ वाचा.) शलमोनाचे ज्ञान “सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी यांच्याहून अधिक होते.” त्याची कीर्ती “आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली.” (१ राजे ४:३०, ३१) धनसंपत्तीच्या बाबतीत पाहता, त्याच्या राज्यात फक्‍त सोन्याचेच वार्षिक उत्पन्‍न सुमारे २५ टन इतके होते! (२ इति. ९:१३) राजकारण, बांधकाम व व्यापार या क्षेत्रांतही शलमोनाने उत्तुंग यश मिळवले. तात्पर्य हेच, की जोपर्यंत शलमोन यहोवाच्या दृष्टीने योग्य ते करत राहिला, तोपर्यंत तो खऱ्‍या अर्थाने यशस्वी ठरला.—२ इति. ९:२२-२४.

५. जे देवाच्या दृष्टीने यशस्वी असतात त्यांच्याविषयी शलमोनाने कोणता निष्कर्ष काढला?

ज्यांच्याजवळ धनसंपत्ती किंवा मानमरातब असतो केवळ तेच जीवनात सफल व आनंदी असतात, या चुकीच्या विचारसरणीला शलमोन कधीही बळी पडला नाही. त्याने उपदेशक या पुस्तकात जे लिहिले त्यावरून हे दिसून येते. त्याने लिहिले: “मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यांस काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे.” (उप. ३:१२, १३) आणि त्याला याचीही जाणीव होती, की ज्यांना देवाची संमती असते व ज्यांचा त्याच्यासोबत चांगला नातेसंबंध असतो तेच या सर्व सुखांचा खऱ्‍या अर्थाने आनंद घेऊ शकतात. शलमोनाने अगदी योग्य असा निष्कर्ष काढला: “सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उप. १२:१३.

६. खऱ्‍या यशाचे मोजमाप कसे करावे यासंबंधी शलमोन आपल्याला कोणती महत्त्वाची माहिती देतो?

कित्येक वर्षांपर्यंत शलमोन देवाला भिऊन चालला. अहवाल सांगतो, की “आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे.” (१ राजे ३:३) यालाच तुम्ही खरे यश म्हणणार नाही का? देवाच्या मार्गदर्शनाने शलमोनाने खऱ्‍या उपासनेकरता एक भव्य मंदिर उभारले. तसेच, त्याने बायबलमधील तीन पुस्तकांचे लिखाण केले. शलमोनाने ज्या गोष्टी केल्या त्या तर आपण करू शकत नाही. पण तो देवाला विश्‍वासू होता तेव्हाचे त्याचे उदाहरण, खरे यश काय असते आणि ते आपण कसे मिळवू शकतो हे समजण्यास आपल्याला साहाय्य करू शकते. या संदर्भात, देवाच्या प्रेरणेने शलमोनाने जे लिहिले होते ते तुम्हाला आठवत असेल. आज बरेच लोक धनसंपत्ती, ज्ञान, प्रसिद्धी व सत्ता या गोष्टी खऱ्‍या यशाची चिन्हे आहेत असे मानतात. पण शलमोनाने या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत असे म्हटले. त्यांच्या मागे लागणे म्हणजे “वायफळ उद्योग” आहे असेही त्याने म्हटले. धनसंपत्तीची हाव धरणारे बरेच लोक आणखी जास्त पैसा मिळवण्यासाठी हपापलेले असतात हे तुमच्याही पाहण्यात आले असेलच. आणि जी संपत्ती त्यांच्याजवळ असते ती सुरक्षित राहील की नाही याचीच त्यांना सतत काळजी लागलेली असते. शिवाय, आज ना उद्या त्यांच्याजवळची सर्व संपत्ती दुसऱ्‍यांच्या मालकीची होणार असते.—उपदेशक २:८-११, १७; ५:१०-१२ वाचा.

७, ८.  शलमोन कशा प्रकारे अविश्‍वासूपणे वागला, आणि याचा परिणाम काय झाला?

कालांतराने शलमोन अविश्‍वासूपणे वागला आणि त्याने देवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले हेही तुम्हाला माहीतच आहे. देवाचे वचन म्हणते: “शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले; त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्‍वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे. . . . परमेश्‍वराच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनाने केले.”—१ राजे ११:४-६.

साहजिकच यहोवा शलमोनावर नाराज झाला. त्याने शलमोनाला म्हटले: “माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळिता हे असे आचरण तू केले त्या अर्थी मी तुझे राज्य तुजपासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकास देईन.” (१ राजे ११:११) किती दुःखाची गोष्ट! अनेक प्रकारे शलमोन यशस्वी ठरला असला, तरी कालांतराने त्याने यहोवाचा अपेक्षाभंग केला. जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रात, म्हणजेच यहोवाला विश्‍वासू राहण्याच्या बाबतीत शलमोन अयशस्वी ठरला. तेव्हा, आपण प्रत्येक जण स्वतःला हा प्रश्‍न विचारू शकतो, ‘शलमोनाच्या उदाहरणावरून जो धडा शिकायला मिळाला त्याचा उपयोग मी जीवनात खरे यश मिळवण्यासाठी करणार का?’

खऱ्‍या अर्थाने यशस्वी जीवन

९. जगाच्या दृष्टिकोनाने पौल त्याच्या जीवनात यशस्वी ठरला होता का? स्पष्ट करा.

प्रेषित पौल आणि शलमोन राजा यांच्या जीवनात जमीन अस्मानाचा फरक होता. पौल कधी हस्तीदंती सिंहासनावर किंवा राजा-महाराजांच्या पंक्‍तीला बसला नाही. उलट, कितीतरी वेळा त्याने तहानभूक, कडाक्याची थंडी आणि विवस्त्रता यांसारख्या खडतर परिस्थितींना तोंड दिले. (२ करिंथ. ११:२४-२७) येशूला मशीहा म्हणून स्वीकारल्यानंतर यहुदी धर्मव्यवस्थेत पौलाला मानाचे स्थान राहिले नाही. उलट, यहुदी धर्मपुढारी त्याचा द्वेष करू लागले. त्याला तुरुंगात डांबण्यात आले, चाबकाने व सोट्याने फटके मारण्यात आले आणि दगडमारदेखील करण्यात आला. पौलाने सांगितले की त्याची व त्याच्या सोबतीच्या ख्रिस्ती बांधवांची निर्भर्त्सना, छळणूक व निंदा करण्यात आली. त्याने म्हटले, “आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहो.”—१ करिंथ. ४:११-१३.

१०. पौलाने यशाला आपणहून लाथाडले असे काहींना का वाटले असावे?

१० प्रेषित पौल जेव्हा शौल नावाचा तरुण होता, तेव्हा कोणालाही हेवा वाटावा असे त्याचे जीवन होते. एका प्रतिष्ठित कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. शिवाय, गमलियेल नावाच्या एका नामवंत शिक्षकाकडून त्याला शिक्षण मिळाले. या संदर्भात पौलाने नंतर असे लिहिले: “माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो.” (गलती. १:१४) शौलाचे हिब्रू व ग्रीक भाषांवर प्रभुत्व होते. शिवाय, त्याच्याजवळ रोमचे नागरिकत्व होते; यामुळे कोणालाही हव्याहव्याशा वाटतील अशा बऱ्‍याच सवलती व सुहक्क त्याला उपलब्ध होते. जगातील या यशाच्या मागे लागण्याचे त्याने निवडले असते, तर कदाचित तो आणखी प्रतिष्ठा व धनसंपत्ती मिळवू शकला असता. पण त्याऐवजी त्याने असा एक मार्ग निवडला जो इतरांना, कदाचित त्याच्या काही नातलगांनाही अगदीच मूर्खपणाचा वाटला असेल. का?

११. पौलाने कोणत्या गोष्टींना व कोणत्या ध्येयाला महत्त्व दिले आणि का?

११ पौलाचे यहोवावर प्रेम होते. आणि धनसंपत्ती किंवा लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळवण्यापेक्षा यहोवाची संमती मिळवण्याची त्याला जास्त उत्सुकता होती. सत्याचे अचूक ज्ञान मिळाल्यामुळे, खंडणी बलिदान, ख्रिस्ती सेवाकार्य, स्वर्गातील जीवनाची आशा या गोष्टी—ज्यांना जगाच्या दृष्टीने काहीच अर्थ नाही, त्या पौलाला मौल्यवान वाटू लागल्या. सैतानाने उठवलेला वादविषय अद्याप सुटलेला नाही याची पौलाला जाणीव होती. आपण मानवांना देवाची सेवा करण्यापासून परावृत्त करू शकतो असा दावा सैतानाने केला होता. (ईयो. १:९-११; २:३-५) त्यामुळे, पौलाच्या मार्गात कोणत्याही परीक्षा आल्या तरीसुद्धा देवाला विश्‍वासू राहण्याचा व खऱ्‍या उपासनेत टिकून राहण्याचा त्याचा दृढनिश्‍चय होता. पण, जगातील लोक मात्र यशाचा पाठपुरावा करताना या ध्येयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

१२. तुम्ही देवावर आशा ठेवण्याचे का निवडले?

१२ तुमचाही पौलासारखाच दृढनिश्‍चय आहे का? यहोवाला विश्‍वासू राहणे हे नेहमीच सोपे नसते. पण, आपल्याला माहीत आहे की असे केल्यानेच यहोवाचा आशीर्वाद व संमती आपण मिळवू शकतो आणि खरे यश मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. (नीति. १०:२२) यहोवाला विश्‍वासू राहिल्यामुळे आज तर आपल्याला फायदा होतोच, पण भविष्यातही आपण अनेक आशीर्वाद मिळवण्याची आशा बाळगू शकतो. (मार्क १०:२९, ३० वाचा.) म्हणूनच, आपण “चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.” तसेच, “जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा” आपण स्वतःकरता मिळवू इच्छितो. (१ तीम. ६:१७-१९) आपण अगदी पक्की खातरी बाळगू शकतो की आजपासून शंभर वर्षांनंतर, किंबहुना आजपासून हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्षांनंतर मागे वळून पाहताना आपण पूर्ण आत्मविश्‍वासाने असे म्हणू शकू, “मी नक्कीच खऱ्‍या यशाचा मार्ग निवडला!”

जेथे तुमचे धन आहे . . .

१३. संपत्ती साठवण्याच्या संदर्भात येशूने कोणता सल्ला दिला?

१३ धनसंपत्तीविषयी येशूने म्हटले: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, आणि चोर घर फोडून चोरी करतात; तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत; कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल.”—मत्त. ६:१९-२१.

१४. पृथ्वीवरील संपत्तीच्या मागे लागणे व्यर्थ का आहे?

१४ पृथ्वीवरील एखाद्याची संपत्ती म्हणजे केवळ पैसा नव्हे. खरे पाहता, लोकांच्या नजरेत यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्‍या ज्या गोष्टींविषयी शलमोनाने लिहिले होते, अर्थात प्रतिष्ठा, प्रसिद्धी किंवा सत्ता, यांपैकी कोणतीही गोष्ट पृथ्वीवरील या संपत्तीत समाविष्ट असू शकते. शलमोनाने उपदेशकाच्या पुस्तकात जे म्हटले त्याच्याशी मिळताजुळता एक मुद्दा येशूनेही मांडला. तो म्हणजे, जगातील संपत्ती टिकाऊ नसते. ही धनसंपत्ती नाश होण्याजोगी असते आणि सहज गमावली जाऊ शकते. हे नक्कीच तुमच्याही पाहण्यात आले असेल. प्राध्यापक एफ. डेल ब्रूनर अशा संपत्तीबाबत लिहितात: “सर्वांनाच माहीत आहे की प्रसिद्धी ही क्षणभंगुर असते. मागच्या शनिवारी नायक म्हणून ज्याचा उदोउदो करण्यात आला, त्याचा काही काळातच लोकांना विसर पडतो. या वर्षी जो सर्वात श्रीमंत म्हणून गणला जातो तो पुढच्या वर्षी दिवाळखोर बनू शकतो. . . . येशूचे मानवांवर प्रेम आहे. म्हणूनच क्षणिक वैभवासोबत जे दुःख खातरीने मनुष्याच्या वाट्याला येते ते टाळण्याचा सल्ला तो त्यांना देतो. वैभव आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे, आपल्या शिष्यांची निराशा होऊ नये असे येशूला वाटते. ‘कालपर्यंत जो प्रसिद्धीच्या शिखरावर होता त्याला विसरून जग पुढे वाटचाल करते.’ ” बरेच लोक या टिप्पण्यांशी सहमत असल्याचे सांगतील, पण किती लोक त्यांमागील वास्तवाचा आपल्या जीवनातील निर्णयांवर प्रभाव पडू देतात? तुमच्याविषयी काय?

१५. आपण कशा प्रकारचे यश मिळवण्यास झटले पाहिजे?

१५ काही धर्मपुढारी असा उपदेश देतात की यश मिळवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे आणि असा प्रयत्न केलाच जाऊ नये. पण येशूने मात्र यश मिळवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे असे शिकवले नाही याकडे लक्ष द्या. उलट, या प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचा, म्हणजे पृथ्वीवर संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी “स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती” साठवण्याचा सल्ला त्याने आपल्या शिष्यांना दिला; कारण ही संपत्ती कधीही नष्ट होणार नाही. तेव्हा, आपण यहोवाच्या दृष्टीत यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येशूचे शब्द आपल्याला याची आठवण करून देतात की जीवनात कोणता मार्ग निवडावा हे आपल्या हातात आहे. पण, आपल्या मनात जे असते, म्हणजेच, आपल्याला मनापासून जे मौल्यवान वाटते त्याच्याच मागे आपण लागतो ही एक वस्तुस्थिती आहे.

१६. आपण कोणत्या गोष्टीवर पूर्ण भरवसा ठेवू शकतो?

१६ जर आपल्या मनात खरोखरच यहोवाला आनंदित करण्याची इच्छा असेल, तर आपल्याला आवश्‍यक असलेल्या गोष्टी तो अवश्‍य पुरवेल हा भरवसा आपण बाळगू शकतो. कदाचित पौलाप्रमाणेच, तात्पुरत्या काळासाठी तहानभूक यांसारख्या समस्यांना आपल्यालाही तोंड द्यावे लागेल. (१ करिंथ. ४:११) पण येशूने दिलेल्या या सुज्ञ सल्ल्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो: “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्त. ६:३१-३३.

देवाच्या दृष्टीत यशस्वी व्हा

१७, १८. (क) खऱ्‍या यशाचे गमक काय आहे? (ख) कोणत्या गोष्टींवर यश अवलंबून नाही?

१७ महत्त्वाचा मुद्दा हाच आहे: जगात आपण जे यश मिळवतो किंवा चारचौघांत जो मानसन्मान मिळवतो त्यावर खरे यश अवलंबून नाही. तसेच, ख्रिस्ती मंडळीत एखादे जबाबदारीचे पद असणे यावरूनही खरे यश ठरत नाही. असे जबाबदारीचे पद मिळण्याचा आशीर्वाद देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे व त्याला विश्‍वासू राहिल्यामुळे मिळतो. आणि खरेतर देवाच्या आज्ञा पाळणे व त्याला विश्‍वासू राहणे हेच खऱ्‍या यशाचे गमक आहे. देवाचे वचन म्हणते: “कारभारी म्हटला की, तो विश्‍वासू असला पाहिजे.” (१ करिंथ. ४:२) आणि आपण केवळ काही काळापुरते नव्हे तर नेहमीच विश्‍वासू राहिले पाहिजे. येशूने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.” (मत्त. १०:२२) तारण मिळणे हा यशाचा एक खात्रीशीर पुरावा आहे असे तुम्हालाही वाटत नाही का?

१८ तर आतापर्यंत आपण पाहिल्याप्रमाणे, देवाला विश्‍वासू राहणे हे एखाद्याचे पद, प्रतिष्ठा, शिक्षण, आर्थिक स्थिती किंवा समाजातील स्थान यांच्याशी संबंधित नाही; त्याच प्रकारे विश्‍वासूपणा हा एखाद्याची बौद्धिक क्षमता, नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्ये यांवरही अवलंबून नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरीसुद्धा आपण देवाला विश्‍वासू राहू शकतो. पहिल्या शतकातील देवाच्या उपासकांमध्ये काही श्रीमंत होते तर काही गरीब. श्रीमंतांना पौलाने अगदी योग्यपणे असा सल्ला दिला, की त्यांनी “चांगले ते करावे; सत्कर्मांविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे.” श्रीमंत व गरीब दोन्ही प्रकारचे लोक “खरे जीवन” बळकट धरू शकत होते. (१ तीम. ६:१७-१९) आजही हीच गोष्ट खरी आहे. आपल्या सर्वांना एकसमान संधी व एकसमान जबाबदारी उपलब्ध आहे: आपण देवाला विश्‍वासू राहिले पाहिजे आणि “सत्कर्मांविषयी धनवान” असले पाहिजे. असे केल्यास, आपण आपल्या निर्माणकर्त्याच्या दृष्टीत यशस्वी ठरू आणि त्याचे मन आनंदित केल्याचे समाधान आपल्याला लाभेल.—नीति. २७:११.

१९. यश मिळवण्याबाबत तुम्ही काय ठरवले आहे?

१९ तुमच्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण करणे कदाचित तुम्हाला शक्य नसेल, पण त्या परिस्थितीला कशा प्रकारे तोंड द्यायचे हे ठरवणे नक्कीच तुमच्या हातात आहे. तेव्हा, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असला, तरी विश्‍वासू राहण्यास प्रयत्नशील असा. तुमचे प्रयत्न नक्कीच सार्थक ठरतील. यहोवा आता आणि सदासर्वकाळ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल याची खातरी बाळगा. येशूने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना उद्देशून बोललेले हे शब्द कधीही विसरू नका: “मरेपर्यंत तू विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन.” (प्रकटी. २:१०) खरे यश आणखी काय असू शकेल!

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[६ पानांवरील चित्र]

मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यास, शौल यशस्वी होण्याच्या मार्गावर होता

[७ पानांवरील चित्र]

पौल खऱ्‍या अर्थाने यशस्वी ठरला