व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या उपासनेत एकजूट असलेले “परदेशी”

खऱ्‍या उपासनेत एकजूट असलेले “परदेशी”

खऱ्‍या उपासनेत एकजूट असलेले “परदेशी”

“परदेशी तुमचे नांगऱ्‍ये व द्राक्षाचे मळे लावणारे होतील. तुम्हास तर परमेश्‍वराचे याजक असे नाव पडेल.”—यश. ६१:५, ६.

तुमचे उत्तर काय असेल?

काही जण परदेशी लोकांकडे कोणत्या दृष्टीने पाहतात, पण बायबलचा दृष्टिकोन कसा वेगळा आहे?

सर्व राष्ट्रांच्या लोकांना कोणते आमंत्रण देण्यात येत आहे?

ज्यात कोणीही “परदेशी” नाही अशा जगाचा अनुभव आजही आपण कोणत्या अर्थाने घेत आहोत?

१. काही जण “परदेशी” लोकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, पण असे करणे योग्य का नाही?

 याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे काही जण “परदेशी” हा शब्द इतरांना तुच्छ लेखण्यासाठी अपमानास्पद रीत्या वापरतात. दुसऱ्‍या राष्ट्राच्या लोकांना तुच्छ लेखणे अनादराचे आहे. शिवाय, अशा प्रवृत्तीतून दिसून येते की आपल्याला वास्तवाची जाणीव नाही. द रेसेस ऑफ मॅनकाइंड हे पुस्तक असे विधान करते: “बायबल म्हणते त्याप्रमाणे मानवजातीचे वेगवेगळे वंश खरेतर एकमेकांची भावंडे आहेत.” भावंडे सहसा एकमेकांपेक्षा वेगळी असतात, पण तरीही ती भावंडेच असतात.

२, ३. यहोवा परदेशी लोकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

अर्थातच, आपण कोठेही राहत असलो, तरी आपल्यामध्ये परदेशी असतातच. मोशेच्या नियमशास्त्रामुळे प्राचीन इस्राएल राष्ट्राचा यहोवा देवाशी एक खास नातेसंबंध होता. या राष्ट्रातदेखील परदेशी लोक राहत होते. या गैरइस्राएली लोकांचे हक्क काहीसे मर्यादित होते, पण इस्राएली लोकांनी त्यांच्याशी आदराने व निःपक्षपातीपणे वागायचे होते. आपल्याकरता किती उत्तम धडा! खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये भेदभाव किंवा पूर्वग्रह यांना स्थान नाही. का? प्रेषित पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रे. कृत्ये १०:३४, ३५.

प्राचीन काळात इस्राएली लोकांसोबतच्या निकट सहवासामुळे त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या परदेशी लोकांना फायदा व्हायचा. यातून परदेशी लोकांकडे पाहण्याचा यहोवाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित झाला. हे अनेक वर्षांनंतर प्रेषित पौलाने यहोवाविषयी जे विचारले त्यावरून दिसते: “देव केवळ यहुद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? हो, आहे.”—रोम. ३:२९; योए. २:३२.

४. देवाच्या इस्राएलात “अन्यदेशीय” नाहीत असे का म्हटले जाऊ शकते?

नव्या कराराद्वारे, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीने प्राचीन इस्राएल राष्ट्राची जागा घेतली, ज्यांच्यासोबत यहोवाचा खास नातेसंबंध असणार होता. त्यामुळे त्यांना देवाचे इस्राएल म्हणण्यात आले. (गलती. ६:१६) आणि पौलाने स्पष्ट केल्याप्रमाणे या नवीन राष्ट्रात “हेल्लेणी व यहुदी, सुंता व बेसुंता, अन्यदेशीय व स्कुथी, दास व स्वतंत्र हे नाहीत; तर ख्रिस्त सर्व काही व सर्वांमध्ये आहे.” (कलस्सै. ३:११, पं.र.भा.) म्हणूनच, ख्रिस्ती मंडळीत कोणीही परदेशी असणार नव्हते.

५, ६. (क) यशया ६१:५, ६ या वचनांविषयी काहींना कोणता प्रश्‍न पडू शकतो? (ख) यशयाने उल्लेख केलेले “परमेश्‍वराचे याजक” आणि “परदेशी” कोण आहेत? (ग) या दोन्ही गटांमध्ये कोणती गोष्ट सारखी आहे?

दुसरीकडे पाहता, कोणी यशया ६१ अध्यायात वर्णन केलेल्या भविष्यावाणीकडे लक्ष वेधेल जी ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीत पूर्ण होत आहे. त्या अध्यायाच्या ६ व्या वचनात “परमेश्‍वराचे याजक” म्हणून सेवा करणाऱ्‍यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण, ५ व्या वचनात “परदेशी” लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे जे त्या याजकांशी सहकार्य करतील आणि त्यांच्यासोबत कार्य करतील. याचा नेमका काय अर्थ आहे?

“परमेश्‍वराचे याजक” हे अभिषिक्‍त ख्रिस्ती आहेत ज्यांना “पहिल्या पुनरुत्थानात” भाग आहे आणि ते “देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.” (प्रकटी. २०:६) त्यासोबतच, असे अनेक एकनिष्ठ ख्रिस्ती आहेत ज्यांना पृथ्वीवर जगण्याची आशा आहे. हे लोक स्वर्गात सेवा करणार असलेल्यांच्या निकट सहवासात काम करत असले, तरीसुद्धा लाक्षणिक अर्थाने ते परदेशी आहेत. हे लोक परमेश्‍वराच्या याजकांना आनंदाने पाठिंबा देतात आणि त्यांच्यासोबत मिळून कार्य करतात, जणू ते त्यांचे “नांगऱ्‍ये” आणि “द्राक्षाचे मळे लावणारे” आहेत. ते लोकांना आध्यात्मिक गोष्टी शिकवण्याद्वारे, देवाचे गौरव करण्यात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना साहाय्य करतात. अभिषिक्‍त जन व “दुसरी मेंढरे” या दोन्ही गटांचे लोक सदासर्वकाळपर्यंत देवाची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधतात आणि निरंतर देवाची सेवा करण्यास त्यांना मदत करतात.—योहा. १०:१६.

अब्राहामाप्रमाणे “परदेशवासी”

७. आज ख्रिस्ती कशा प्रकारे अब्राहामाप्रमाणे आणि प्राचीन काळातील विश्‍वासू जनांप्रमाणे आहेत?

याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, सैतानाच्या या दुष्ट जगात, खरे ख्रिस्ती परदेशी किंवा प्रवासी आहेत. या बाबतीत ते प्राचीन काळातील विश्‍वासू लोकांप्रमाणे आहेत ज्यात अब्राहामाचाही समावेश होतो. त्यांच्याविषयी म्हणण्यात आले आहे, की ते देशात “परके व प्रवासी” होते. (इब्री ११:१३) तर मग, आपल्याला स्वर्गातील जीवनाची आशा असो वा पृथ्वीवरील जीवनाची, अब्राहामाप्रमाणेच आपल्यालाही यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंधाचा आनंद अनुभवण्याचा विशेषाधिकार लाभला आहे. याकोबाने स्पष्ट केले की “अब्राहामाने देवावर विश्‍वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले; आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले.”—याको. २:२३.

८. अब्राहामाला कोणते अभिवचन देण्यात आले होते, आणि त्याच्या पूर्णतेविषयी त्याने कोणता दृष्टिकोन बाळगला?

देवाने अभिवचन दिले होते, की अब्राहामाद्वारे आणि त्याच्या वंशजांद्वारे, केवळ एका राष्ट्रालाच नव्हे, तर पृथ्वीवरील सर्व कुटुंबांना आशीर्वाद मिळतील. (उत्पत्ती २२:१५-१८ वाचा.) देवाने अब्राहामाला दिलेले हे अभिवचन भविष्यात पूर्ण होणार असले, तरी त्याने ते अभिवचन पूर्ण होईल असा भरवसा बाळगला. त्याच्या आयुष्याचा अर्ध्यापेक्षा जास्त काळ, तो आणि त्याची पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी भटकत राहिले. या सर्व काळादरम्यान अब्राहामाने यहोवासोबतची त्याची मैत्री टिकवून ठेवली.

९, १०. (क) आपण कशा प्रकारे अब्राहामाच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो? (ख) आपण इतरांना कोणते आमंत्रण देण्यात सहभागी होऊ शकतो?

अब्राहामाची आशा पूर्ण होण्यासाठी त्याला किती काळ वाट पाहावी लागेल हे त्याला माहीत नव्हते. तरीसुद्धा, यहोवाबद्दलचे अब्राहामाचे प्रेम व भक्‍ती कधीही कमी झाली नाही. त्याने आपली दृष्टी एखाद्या राष्ट्राचा कायमचा रहिवासी बनण्यावर केंद्रित केली नाही. (इब्री ११:१४, १५) आपण भौतिक मालमत्ता, सामाजिक प्रतिष्ठा, किंवा करियर यांबद्दल अवाजवी चिंता करण्याऐवजी, अब्राहामाप्रमाणे साधे जीवन जगणे किती सुज्ञपणाचे आहे! लवकरच नाश होणाऱ्‍या या जगात ‘सामान्य’ जीवन जगण्यासाठी आपण का झटावे? केवळ तात्कालिक असलेल्या गोष्टींसाठी आपण प्रेम विकसित का करावे? अब्राहामाप्रमाणे आपणही, आजच्यापेक्षा कितीतरी चांगल्या जगाकडे वाटचाल करत आहोत. आपली आशा पूर्ण होईपर्यंत आपण धीर धरण्यास आणि प्रतिक्षा करण्यास तयार आहोत.—रोमकर ८:२५ वाचा.

१० यहोवा आजही सर्व राष्ट्रांना अब्राहामाच्या संततीद्वारे आशीर्वाद मिळवण्यासाठी आमंत्रित करत आहे. आणि “परमेश्‍वराचे याजक” असलेले अभिषिक्‍त जन, तसेच “परदेशी” असलेले त्यांचे सहकारी अर्थात दुसरी मेंढरे ६०० पेक्षा जास्त भाषांत जगभरातील लोकांना हे आमंत्रण देत आहेत.

राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे पाहा

११. शलमोनाने इतर राष्ट्रांतील लोकांबद्दल कोणता दृष्टिकोन व्यक्‍त केला?

११ यहोवाने अब्राहामाला दिलेल्या अभिवचनाच्या सामंजस्यात, सर्व राष्ट्रांतील लोक यहोवाची स्तुती करण्यात सहभागी होतील असे शलमोनाने इसवी सन पूर्व १०२६ मध्ये मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी म्हटले. एका मनस्वी प्रार्थनेत त्याने असे म्हटले: “तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला, (कारण तुझे मोठे नाम, बलिष्ठ हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच,) आणि त्याने येऊन ह्‍या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर; म्हणजे या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील.”—१ राजे ८:४१-४३.

१२. काही जण यहोवाच्या साक्षीदारांना विचित्र किंवा “परदेशी” का समजतात?

१२ परदेशी सहसा अशा व्यक्‍तीला म्हणतात जी परक्या देशात राहत असते किंवा जी एखाद्या समाजाची किंवा समुहाची मुळात सदस्य नसताना त्यामध्ये राहत असते. यहोवाच्या साक्षीदारांबद्दलही हेच म्हणता येईल. ते आपले समर्थन प्रामुख्याने ख्रिस्ताच्या शासनाखाली असलेल्या स्वर्गीय सरकारला देतात. आजच्या समाजात काही जण त्यांना विचित्र समजतात, तरीही ते राजकारणाशी संबंधित बाबींत पूर्णपणे तटस्थ राहतात.

१३. (क) इतरांना “परदेशी” मानणे हे केवळ एखाद्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते ते कोणत्या अर्थाने? (ख) यहोवाच्या मूळ उद्देशात “परदेशी” ही संकल्पना होती का? स्पष्ट करा.

१३ परदेशी लोकांना सहसा त्यांच्या अल्पसंख्याक समूहाच्या वैशिष्ट्यांवरून ओळखले जाते. हे कदाचित ते बोलत असलेल्या भाषेमुळे, त्यांच्या रीतिरिवाजांमुळे, त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये किंवा त्यांच्या पेहरावाच्या पद्धतींमुळे असू शकते. पण यांपेक्षा महत्त्वाची ती वैशिष्ट्ये असतात जी सर्व मानवांमध्ये सारखी असतात, मग ते कोणत्याही राष्ट्राचे असोत. त्याअर्थी, केवळ विशिष्ट बाबतींत इतरांपेक्षा वेगळा असल्यामुळे एखाद्याला परदेशी मानले जाते. पण, जेव्हा आपण या वास्तविक किंवा कल्पित भिन्‍नतांपलीकडे पाहण्यास शिकतो तेव्हा “परदेशी” या शब्दाला जास्त अर्थ उरत नाही. जर पृथ्वीवरील सर्व जण केवळ एकाच सरकारच्या शासनाखाली राहत असते, तर कोणीही परदेशी नसता. खरेतर, यहोवाचा मूळ उद्देश हाच होता की सर्व मानवांनी एकाच शासनाखाली, म्हणजे त्याच्या शासनाखाली एकाच कुटुंबात एकत्र राहावे. इतर राष्ट्रांतील लोकांना परदेशी न मानणे सध्याच्या या जगात शक्य आहे का?

१४, १५. यहोवाच्या साक्षीदारांनी एक समूह या नात्याने कोणती गोष्ट शिकून घेतली आहे?

१४ एका स्वार्थी आणि राष्ट्रीयत्वाची भावना जपणाऱ्‍या जगात, राष्ट्रांच्या सीमांपलीकडे पाहू शकणारे, किंबहुना पाहणारे लोकही आहेत हे जाणून आनंद होतो. हे मान्य आहे, की पूर्वग्रहांवर मात करणे सोपे नाही. ‘सीएनएन’ या दूरचित्रवाणी समूहाचे संस्थापक टेड्‌ टर्नर यांनी विविध राष्ट्रांतील प्रतिभावान व्यक्‍तींसोबत काम केले आहे. त्यांनी म्हटले: “या लोकांना जाणून घेणे हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता. मला जाणीव झाली की इतर देशांतील लोक ‘परदेशी’ नाहीत, तर तेही माझ्यासारखेच या पृथ्वी ग्रहाचे नागरिक आहेत. आता मी ‘परदेशी’ या शब्दाला तुच्छतादर्शक मानतो. त्यामुळेच मी ‘सीएनएन’मध्ये असा नियम बनवला की दूरचित्रवाणीवरील प्रसारणांत किंवा कार्यालयातील संभाषणांमध्ये हा शब्द मुळीच वापरायचा नाही. त्याऐवजी, ‘आंतरराष्ट्रीय’ हा शब्द वापरला जावा.”

१५ जगातील अनेक देशांमध्ये, केवळ यहोवाच्या साक्षीदारांनीच एक समूह या नात्याने देवाच्या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे. यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्यास शिकण्याद्वारे, त्यांना मानसिक व भावनात्मक रीत्या राष्ट्रीय सीमा मिटवून टाकणे शक्य झाले आहे. इतर राष्ट्रांच्या सदस्यांकडे अविश्‍वासाने, शंकेने पाहण्याऐवजी किंवा सरळसरळ त्यांचा द्वेष करण्याऐवजी, त्यांच्यातील विविधतांबद्दल आणि त्यांच्या कौशल्यांबद्दल आनंद मानण्यास ते शिकले आहेत. एक समूह या नात्याने यहोवाच्या साक्षीदारांना हे कसे शक्य झाले आहे आणि याचा इतरांसोबत व्यवहार करण्याच्या बाबतीत तुम्हाला कसा फायदा झाला आहे यावर तुम्ही मनन केले आहे का?

एक जग ज्यात कोणीही परदेशी नसेल

१६, १७. प्रकटीकरण १६:१६ आणि दानीएल २:४४ या वचनांच्या पूर्ततेचा वैयक्‍तिक रीत्या तुमच्याकरता काय अर्थ होऊ शकतो?

१६ देवाच्या शासनाचा विरोध करणारी आजच्या काळातील सर्व राष्ट्रे आणि येशू ख्रिस्त व त्याचे स्वर्गीय सैन्य यांच्यात लवकरच शेवटचे युद्ध होईल, ज्याला “इब्री भाषेत हर्मगिदोन” म्हटले आहे. (प्रकटी. १६:१४, १६; १९:११-१६) देवाच्या उद्देशाच्या विरोधात असलेल्या मानवी सरकारांचे काय होईल याविषयी पूर्वभाकीत करण्यास २,५०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी दानीएल संदेष्ट्याला प्रेरणा मिळाली होती. त्याने असे लिहिले: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानी. २:४४.

१७ या भविष्यवाणीच्या पूर्ततेचा वैयक्‍तिक रीत्या तुमच्यासाठी काय अर्थ होतो याची तुम्ही कल्पना करू शकता का? विविध राष्ट्रांच्या मानवनिर्मित सरहद्दींमुळे एका अर्थाने आज प्रत्येकच जण “परदेशी” आहे. पण, लवकरच या सरहद्दी अस्तित्वात नसतील. त्या वेळी जर मनुष्यांचे रंगरूप वेगळे असलेच, तर त्यातून केवळ देवाच्या सृष्टीतील वैविध्य दिसून येईल. इतकी रोमांचक आशा असल्यामुळे आपल्याला मनापासून आपल्या निर्माणकर्त्याची, म्हणजेच यहोवा देवाची स्तुती व सन्मान करत राहण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे.

१८. “परदेशी” या संकल्पनेवर मात करता येणे शक्य आहे हे अलीकडील कोणत्या घडामोडींवरून दिसून येते?

१८ संपूर्ण पृथ्वीवर अशा प्रकारचा बदल घडून येईल असा विश्‍वास बाळगणे अतर्कसंगत आहे का? मुळीच नाही. त्याच्या अगदी उलट, असे नक्कीच घडेल हा विश्‍वास बाळगणे पूर्णपणे वाजवी आहे. किंबहुना, यहोवाच्या साक्षीदारांनी इतर राष्ट्रांतील लोकांना “परदेशी” समजण्याचे केव्हाच सोडून दिले आहे. आपल्यामधील लोक कोणत्या राष्ट्राचे आहेत याकडे ते जास्त लक्ष देत नाहीत. उदाहरणार्थ, त्यांच्या शाखा कार्यालयांच्या देखरेखीत सरलता आणण्यासाठी आणि देवाच्या राज्य सुवार्तेच्या कार्यात आणखी परिणामकारकता आणण्यासाठी अलीकडेच त्यांच्या अनेक लहान शाखा कार्यालयांना दुसऱ्‍या शाखांत विलीन करण्यात आले. (मत्त. २४:१४) कायद्याचा अडसर नव्हता तोवर असे निर्णय घेताना या राष्ट्रांच्या सीमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. यहोवाने नियुक्‍त केलेला शासक या नात्याने येशू ख्रिस्त मानवी सीमा मिटवून टाकत आहे याचा हा आणखी एक दृश्‍य पुरावा आहे. आणि येशू लवकरच या कार्यात पूर्णपणे “विजय” मिळवेल!—प्रकटी. ६:२.

१९. सत्याच्या शुद्ध वाणीमुळे काय शक्य झाले आहे?

१९ यहोवाचे साक्षीदार अनेक राष्ट्रांतून आलेले असले, आणि अनेक भिन्‍न भाषा बोलत असले तरीही ते सत्याच्या शुद्ध वाणीचे समर्थन करण्यास झटतात. यामुळे असे एक बंधन निर्माण होते ज्याचा भंग होणे अशक्य आहे. (सफन्या ३:९ वाचा.) हे एक असे आंतरराष्ट्रीय कुटुंब आहे जे या दुष्ट जगात असूनही त्या जगापासून अलिप्त आहे. हे एकत्रित कुटुंब येणाऱ्‍या जगाची केवळ एक पूर्वझलक आहे, ज्यात कोणीही “परदेशी” नसेल. त्या वेळी जगणारे सर्वच जण, कोणाचाही अपवाद न वगळता, आनंदाने हे मान्य करतील, की लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या पुस्तकातील विधान सत्य आहे: “बायबल म्हणते त्याप्रमाणे मानवजातीचे वेगवेगळे वंश खरेतर एकमेकांची भावंडे आहेत.”—द रेसेस ऑफ मॅनकाइंड.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील संक्षिप्त आशय]

जेव्हा राष्ट्रांच्या मानवनिर्मित सीमा अस्तित्वात नसतील, आणि “परदेशी” ही संकल्पना भूतकाळातील गोष्ट झालेली असेल, त्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहता का?

[२५ पानांवरील चित्र]

देव आपली अभिवचने पूर्ण करेल यावर अब्राहामाप्रमाणे तुम्हीदेखील आपले लक्ष केंद्रित ठेवाल का?

[२७ पानांवरील चित्र]

यहोवाच्या दृष्टीत यांच्यापैकी कोणीही परदेशी नाही