व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज सोपी आवृत्ती का सुरू करण्यात आली?

टेहळणी बुरूज सोपी आवृत्ती का सुरू करण्यात आली?

टेहळणी बुरूज सोपी आवृत्ती का सुरू करण्यात आली?

कित्येक दशकांपासून जगभरातील अनेकांनी टेहळणी बुरूज नियतकालिकात प्रकाशित झालेली बायबल आधारित माहिती आवडीने वाचली आहे व त्यांना या माहितीपासून फायदा झाला आहे. जुलै २०११ मध्ये सोप्या इंग्रजीतील पहिली अभ्यास आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. त्या आवृत्तीत सांगितले होते: “सुरुवातीला एका वर्षासाठी प्रयोग म्हणून आम्ही ही आवृत्ती प्रकाशित करत आहोत आणि उपयोगी ठरल्यास, ती पुढेही प्रकाशित करण्यात येईल.”

आम्हाला हे घोषित करण्यास आनंद होत आहे की ही आवृत्ती पुढेही प्रकाशित करत राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. शिवाय, काही काळात फ्रेंच, पोर्तुगीझ आणि स्पॅनिश या भाषांतही सोपी आवृत्ती उपलब्ध होईल.

का आवडली?

सोपी आवृत्ती मिळाल्यानंतर दक्षिण पॅसिफिक येथील अनेकांनी असे म्हटले: “आता बंधुभगिनींना टेहळणी बुरूजमध्ये येणारे लेख पूर्णपणे समजत आहेत.” दुसऱ्‍या पत्रात असे म्हटले होते: “आधी जो वेळ शब्दांचा अर्थ शोधण्यात व निरनिराळ्या वाक्यांशांचा अर्थ स्पष्ट करण्यात जायचा, तो आता लेखात दिलेली शास्त्रवचनं समजून घेण्यासाठी व ती विषयाशी कशा प्रकारे जुळलेली आहेत हे पाहण्यासाठी उपयोगात आणला जातो.”

महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या अमेरिकेतील एका भगिनीने म्हटले: “उच्च शिक्षणात वापरली जाणारी क्लिष्ट भाषा मी १८ वर्षं बोलत व लिहीत होते. म्हणून मला अशाच भाषेत बोलण्याची व विचार करण्याची सवय लागली जी खूप कठीण होती. मला माझ्या विचार करण्याच्या व बोलण्याच्या पद्धतीत खूप मोठा बदल करण्याची गरज भासली.” आता एक परिणामकारक सुवार्तिक या नात्याने ती लिहिते: “टेहळणी बुरूज सोपी आवृत्ती खूप मदतदायी ठरली आहे. एखादी गोष्ट सोप्या पद्धतीत कशी मांडता येईल हे या आवृत्तीतील भाषेवरून मला शिकायला मिळालं आहे.”

इंग्लंडमधील एक बहीण जिचा बाप्तिस्मा १९७२ मध्ये झाला होता तिने टेहळणी बुरूजच्या सोप्या आवृत्तीविषयी असे लिहिले: “मी सोप्या आवृत्तीचा पहिला अंक वाचला तेव्हा मला असं वाटलं, की रात्रीच्या वेळी आपल्या मुलाला गोष्ट सांगणाऱ्‍या एका पित्याप्रमाणे यहोवानं माझ्या खांद्यांवर हात ठेवला आहे आणि आम्ही दोघं सोबत बसून वाचत आहोत.”

अमेरिकेतील बेथेल गृहात राहणारी एक बहीण जिचा बाप्तिस्मा होऊन ४० वर्षे लोटली आहेत ती सांगते की सोप्या आवृत्तीमुळे तिला काही वेळा नव्या गोष्टी समजण्यास मदत मिळाली आहे. उदाहरणार्थ, १५ सप्टेंबर २०११ च्या अंकात “काही शब्दांचे स्पष्टीकरण” या चौकटीत इब्री लोकांस १२:१ यातील “साक्षीरूपी मेघाने” या वाक्यांशाचे असे स्पष्टीकरण देण्यात आले: “त्यांची संख्या इतकी जास्त होती की ती मोजणे शक्य नव्हते.” ती म्हणते: “यामुळे या वचनाविषयीच्या माझ्या ज्ञानात आणखी भर पडली.” आठवड्यातील टेहळणी बुरूज अभ्यासाविषयी ती म्हणते: “लहान मुलांनी सोप्या आवृत्तीतून सरळ वाचून दाखवले तरी सर्वांकडे नेहमीची टेहळणी बुरूज आवृत्ती असल्यामुळे मुलांची उत्तरं वेगळी असतात आणि ती श्रोत्यांना नवीन वाटतात.”

बेथेल गृहात राहणारी आणखी एक बहीण लिहिते: “मंडळीतल्या लहान मुलांची उत्तरं ऐकण्यास मी खूप उत्सुक असते. टेहळणी बुरूजच्या सोप्या आवृत्तीमुळे त्यांना त्यांचा विश्‍वास पूर्ण खातरीने प्रकट करण्यास मदत मिळाली आहे. त्यांची उत्तरं ऐकून मला नेहमीच उत्तेजन मिळतं.”

१९८४ मध्ये बाप्तिस्मा झालेल्या एका बहिणीने सोप्या आवृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करत म्हटले: “मला असं वाटतं की ही आवृत्ती जणू माझ्यासाठीच प्रकाशित करण्यात आली आहे. मी जे वाचते ते मला सहजपणे कळतं. आता टेहळणी बुरूज अभ्यासादरम्यान मी पूर्ण आत्मविश्‍वासानं उत्तर देऊ शकते.”

पालकांकरता एक मौल्यवान साधन

एका सात वर्षांच्या मुलाच्या आईने असे म्हटले: “टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करताना त्याला बरीच वाक्यं समजवावी लागत असल्यामुळं खूप वेळ जायचा व आम्ही थकून जायचो.” सोपी आवृत्ती मदतदायी कशी ठरली? ती लिहिते: “मला आश्‍चर्य वाटतं की तोही परिच्छेदांचं वाचन करू शकतो व त्यांचा पूर्ण अर्थ समजू शकतो. सोपे शब्द असल्यामुळं व लहान लहान वाक्यांमुळं त्याला भीती वाटत नाही. तो आता माझ्या मदतीविना सभांमध्ये उत्तरं देण्यासाठी तयारी करतो, आणि पूर्ण अभ्यासादरम्यान त्याचं लक्ष मासिकावर केंद्रित असतं.”

नऊ वर्षांच्या एका मुलीच्या आईने लिहिले: “आधी उत्तरं तयार करण्यासाठी आम्हाला तिला मदत करावी लागायची. पण आता ती स्वतः तयार करते. आता तिला एखादा मुद्दा समजवण्याची किंवा तो सोपा करून सांगण्याची क्वचितच गरज भासते. सर्व माहिती सहज समजत असल्यामुळे आता तिला टेहळणी बुरूज अभ्यासात खऱ्‍या अर्थानं सहभागी झाल्यासारखं वाटतं.”

मुलांना काय वाटते?

बऱ्‍याच मुलांना वाटते की टेहळणी बुरूजची सोपी आवृत्ती खास त्यांच्यासाठीच प्रकाशित करण्यात आली आहे. बारा वर्षांची रिबेक्का हिने अशी विनंती केली: “कृपया, ही नवी आवृत्ती पुढेही सुरू राहू द्या!” ती पुढे म्हणते: “ ‘काही शब्दांचे स्पष्टीकरण’ ही चौकट मला खूप आवडते. मुलांसाठी ती फारच सोपी आहे.”

सात वर्षांची निकोलेट्‌ हिलादेखील तसेच वाटते: “आधी मला टेहळणी बुरूज समजण्यास खूप कठीण जायचं. आता मी स्वतःहून जास्त उत्तरं देऊ शकते.” नऊ वर्षांची एम्मा लिहिते: “मला व माझ्या सहा वर्षांच्या भावाला या आवृत्तीमुळे खूप मोठी मदत मिळाली आहे. आता आम्हाला टेहळणी बुरूज बऱ्‍यापैकी समजू लागलं आहे! धन्यवाद!”

खरेच, सहजसोपी वाक्ये व शब्द वापरले जाणाऱ्‍या टेहळणी बुरूजच्या सोप्या आवृत्तीमुळे बऱ्‍याच लोकांना फायदा होत आहे. या आवृत्तीमुळे लोकांची गरज पूर्ण होत आहे आणि त्यामुळे ती नेहमीच्या आवृत्तीसोबत जी १८७९ पासून एक अनमोल तरतूद ठरली आहे, पुढेही प्रकाशित करण्यात येईल.

[३० पानांवरील संक्षिप्त आशय]

“आधी जो वेळ शब्दांचा अर्थ शोधण्यात व निरनिराळ्या वाक्यांशांचा अर्थ स्पष्ट करण्यात जायचा, तो आता लेखात दिलेली शास्त्रवचनं समजून घेण्यासाठी व ती विषयाशी कशा प्रकारे जुळलेली आहेत हे पाहण्यासाठी उपयोगात आणला जातो”

[३१ पानांवरील संक्षिप्त आशय]

“मला आश्‍चर्य वाटतं की तोही परिच्छेदांचं वाचन करू शकतो व त्यांचा पूर्ण अर्थ समजू शकतो”