व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पस्तावा न करता देवाची सेवा करत राहा

पस्तावा न करता देवाची सेवा करत राहा

“मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून . . . मी धावतो.”—फिलिप्पै. ३:१३.

१-३. (क) पस्तावा वाटणे म्हणजे काय, आणि या भावनेचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो? (ख) झाले गेले विसरून देवाची सेवा करत राहण्याविषयी पौलाकडून आपण काय शिकू शकतो?

 ‘अरेरे! असं झालं असतं तर . . . !’ या शब्दांतून जितके दुःख व्यक्‍त होते, तितके आजपर्यंत उच्चारलेल्या किंवा लिहिलेल्या कोणत्याही शब्दांतून होत नाही असे एका कवीने म्हटले. त्या कवीचे नाव होते जे. जी. व्हिटियर आणि तो लिहीत होता जीवनात घडलेल्या अशा गोष्टींबद्दल ज्यांचा आपल्याला नंतर पस्तावा होतो, किंवा त्या अमुक प्रकारे न करता वेगळ्या प्रकारे केल्या असत्या तर किती बरे झाले असते, असे ज्यांविषयी आपल्याला वाटते. “पस्तावा” म्हणजे एखादी गोष्ट केल्याबद्दल किंवा न केल्याबद्दल मनापासून दुःख किंवा खेद वाटणे. जणू आपण त्या गोष्टीबद्दल “पुन्हा पुन्हा रडत राहतो.” आपल्या सर्वांच्याच जीवनात अशा काही गोष्टी आहेत ज्या घड्याळाचे काटे उलटे फिरवून वेगळ्या प्रकारे करण्याचे आपण स्वप्न पाहतो. तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्या गोष्टींबद्दल असे वाटते?

काही लोकांनी आपल्या जीवनात अतिशय दुःखदायक चुका केल्या आहेत आणि काहींनी तर गंभीर पातकेदेखील केली आहेत. इतरांनी कदाचित इतकी वाईट कृत्ये केली नसतील, पण जीवनात त्यांनी घेतलेले विशिष्ट निर्णय सर्वात उत्तम होते का असा प्रश्‍न त्यांना पडतो. काही लोक झाले गेले विसरून पुढील जीवन आनंदाने व्यतीत करतात. पण काही जण मात्र “असं झालं असतं तर . . . ” यांसारख्या विचारांच्या चक्रातच अडकून पडतात. (स्तो. ५१:३) तुम्ही कशा प्रकारच्या लोकांपैकी आहात? झालेल्या गोष्टींबद्दल पस्तावा करत बसण्याऐवजी, निदान आजपासून पुढे आनंदाने देवाची सेवा करता यावी असे तुम्हाला वाटते का? हे कसे करता येईल याविषयी ज्याच्याकडून शिकून घेता येईल अशा एखाद्याचे उदाहरण आपल्याजवळ आहे का? हो नक्कीच आहे आणि ते म्हणजे प्रेषित पौलाचे उदाहरण.

पौलाने त्याच्या जीवनात काही भयंकर चुका केल्या आणि काही सुज्ञ निर्णयदेखील घेतले. पूर्वी केलेल्या चुकांबद्दल त्याला मनापासून पस्तावा तर वाटत होताच, पण देवाची विश्‍वासूपणे सेवा करून यशस्वी रीत्या जीवन जगण्याचे तंत्रही त्याने आत्मसात करून घेतले. झाले गेले विसरून देवाची सेवा करत राहण्याविषयी त्याच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळते हे आता पाहू या.

पौलाचा खेदजनक गतकाळ

४. पौलाने पूर्वी कोणत्या खेदजनक चुका केल्या होत्या?

पौल एक तरुण परूशी होता तेव्हा त्याने अशा काही गोष्टी केल्या होत्या, ज्यांबद्दल त्याला नंतर पस्तावा झाला. उदाहरणार्थ, ख्रिस्ताच्या शिष्यांचा हिंसक छळ करण्याच्या एका मोहिमेचे त्याने नेतृत्व केले होते. बायबलमध्ये सांगितले आहे की स्तेफनाला त्याच्या ख्रिस्ती विश्‍वासांमुळे जिवे मारण्यात आल्यानंतर लगेचच “शौल [ज्याला नंतर पौल असे नाव पडले] मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकीत असे.” (प्रे. कृत्ये ८:३) ॲल्बर्ट बार्न्‌स हे विद्वान असे म्हणतात की “हैराण करू लागला” असे भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द हा एक “अतिशय तीव्र भावना व्यक्‍त करणारा शब्द असून, ख्रिश्‍चनांचा छळ करण्यात [शौलाने] ज्या त्वेषाने व आवेशाने सहभाग घेतला त्यास तो सूचित करतो.” म्हणूनच बार्न्‌स यांनी असे म्हटले की “शौल ख्रिस्ती मंडळीच्या विरोधात एखाद्या श्‍वापदासारखा चवताळून उठला होता.” एक प्रांजळ यहुदी या नात्याने शौलाचे असे मानणे होते की ख्रिस्ती धर्मास चिरडून टाकणे ही देवाने त्याला दिलेली जबाबदारी होती. म्हणूनच तो अतिशय क्रूरतेने ख्रिश्‍चनांच्या मागे लागून त्यांना “धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्‍याविषयीचे फूत्कार टाकीत . . . पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास” त्यांचा घात करण्याचा प्रयत्न करत असे.—प्रे. कृत्ये ९:१, २; २२:४. *

५. येशूच्या अनुयायांचा छळ करणारा शौल ख्रिस्ताविषयी प्रचार करणारा कसा काय बनला हे स्पष्ट करा.

दिमिष्काला जाऊन येशूच्या शिष्यांना त्यांच्या घरांतून ओढून काढण्याचा व त्यांना शिक्षा देण्याकरता जेरूसलेममधील यहुदी न्यायसभेपुढे आणण्याचा शौलाचा मनसुबा होता. पण, असे करण्यात त्याला यश आले नाही कारण त्याने ख्रिस्ती मंडळीच्या मस्तकाशी म्हणजे खुद्द येशू ख्रिस्ताशी वैर घेतले होते. (इफिस. ५:२३) शौल दिमिष्काच्या वाटेवर असताना येशूने त्याला दर्शन दिले आणि एका चमत्कारिक प्रकाशामुळे त्याला अंधत्व आले. त्यानंतर येशूने शौलाला दिमिष्कास जाण्यास आणि पुढील सूचना मिळेपर्यंत तेथेच थांबण्यास सांगितले. पुढे काय घडले हे तर आपल्याला माहीतच आहे.—प्रे. कृत्ये ९:३-२२.

६, ७. पौलाला आपल्या गतकाळातील खेदजनक चुकांची पुरेपूर जाणीव होती हे कशावरून म्हणता येईल?

ख्रिस्ती बनताच पौलाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि एकेकाळी ख्रिस्ती धर्माचा क्रूर शत्रू मानला जाणारा हा मनुष्य त्याचा खंदा समर्थक बनला. असे असूनही नंतर त्याने स्वतःविषयी लिहिले: “यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा पराकाष्टेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे.” (गलती. १:१३) पुढे करिंथकरांना, फिलिप्पैकरांना व तीमथ्याला पत्रे लिहिताना पौलाने आपल्या पूर्वीच्या या खेदजनक चुकांबद्दल पुन्हा उल्लेख केला. (१ करिंथकर १५:९ वाचा; फिलिप्पै. ३:६; १ तीम. १:१३) स्वतःविषयी अशा गोष्टी लिहिताना साहजिकच पौलाला अभिमान वाटला नाही; पण दुसरीकडे पाहता, या गोष्टी जणू कधी घडल्याच नाहीत असे दाखवण्याचाही त्याने प्रयत्न केला नाही. त्याने केलेल्या गंभीर चुकांची त्याला पुरेपूर जाणीव होती.—प्रे. कृत्ये २६:९-११.

बायबल विद्वान फ्रेड्रिक डब्ल्यू. फॅरार यांनी ख्रिश्‍चनांच्या “भयानक छळात” शौलाने घेतलेल्या सहभागाविषयी उल्लेख केला. फॅरार पुढे म्हणतात की पौलाच्या जीवनातील या दुःखद काळाचा जेव्हा आपल्याला अर्थबोध होतो, तेव्हा कोठे आपण हे समजू शकतो की “त्याच्या मनावर पश्‍चात्तापाचे केवढे मोठे ओझे असेल आणि त्याच्या द्वेषपूर्ण शत्रूंनी मारलेल्या टोमण्यांमुळे त्याला किती वेदना झाल्या असतील.” पौल निरनिराळ्या मंडळ्यांना भेटी द्यायचा तेव्हा त्याला पहिल्यांदा भेटणारे काही बांधव कदाचित त्याला असे म्हणत असतील, ‘अच्छा, म्हणजे पूर्वी आमचा छळ करणारा पौल तुम्हीच आहात तर!’—प्रे. कृत्ये ९:२१.

८. यहोवाने व येशूने दाखवलेल्या कृपेबद्दल व प्रेमाबद्दल पौलाच्या भावना काय होत्या, आणि यावरून आपण काय शिकू शकतो?

पण, पौलाला याची जाणीव होती की तो जे सेवाकार्य करत होता ते केवळ देवाच्या अगाध कृपेमुळेच शक्य झाले होते. पौलाने लिहिलेल्या १४ पत्रांत देवाच्या या गुणाचा त्याने सुमारे ९० वेळा, म्हणजे इतर कोणत्याही बायबल लेखकाच्या तुलनेत जास्त वेळा उल्लेख केला आहे. (१ करिंथकर १५:१० वाचा.) देवाने पौलाशी ज्या दयाळूपणे व्यवहार केला होता त्याविषयी तो मनापासून कृतज्ञ होता आणि देवाने त्याला दाखवलेली अगाध कृपा त्याला कोणत्याही परिस्थितीत व्यर्थ ठरू द्यायची नव्हती. म्हणूनच, प्रेषितांमध्ये त्याने “सर्वांपेक्षा . . . अतिशय श्रम केले.” पौलाच्या उदाहरणावरून हे स्पष्टपणे दिसून येते की जर आपण आपल्या चुका कबूल करून वाईट मार्गापासून फिरलो, तर येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा आपली अगदी गंभीर पापेदेखील पुसून टाकण्यास तयार आहे. ‘ख्रिस्ताच्या बलिदानामुळे माझ्या पापांची खरंच क्षमा होऊ शकेल का?’ अशी शंका ज्यांना वाटते त्यांना पौलाच्या उदाहरणातून किती उत्तम धडा शिकायला मिळतो! (१ तीमथ्य १:१५, १६ वाचा.) पूर्वी पौलाने ख्रिस्ताचा छळ केला असला, तरी तो असे लिहू शकला: “[देवाच्या पुत्राने] माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.” (गलती. २:२०; प्रे. कृत्ये ९:५) यावरून स्पष्टच आहे, की पस्ताव्याच्या ओझ्याखाली दबून न जाता देवाची सेवा करत राहण्याचे तंत्र पौलाने आत्मसात केले होते. तुम्हीही ते आत्मसात केले आहे का?

पस्तावा न करता देवाची सेवा करण्याचे तंत्र पौलाने शिकून घेतले होते

तुम्हाला गतकाळातील चुकांचा पस्तावा होतो का?

९, १०. (क) यहोवाच्या लोकांपैकी काहींना कशामुळे पस्तावा होतो? (ख) गतकाळाविषयी सतत काळजी करत राहणे अयोग्य का आहे?

तुम्ही पूर्वी अशा काही गोष्टी केल्या आहेत का, ज्यांविषयी विचार केल्यावर आज तुम्हाला पस्तावा होतो? चुकीच्या ध्येयांमागे लागून कधी तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ व शक्‍ती वाया घालवली आहे का? इतरांचे नुकसान होईल अशा प्रकारे कधी तुम्ही वागला आहात का? या किंवा अशा इतर कारणांमुळे कदाचित तुम्हाला वाईट वाटत असेल व पस्तावा होत असेल. पण प्रश्‍न हा आहे, की तुम्ही त्याविषयी काय करणार?

१० बरेच लोक काळजी करत राहतात! पण सतत काळजी करणे म्हणजे एक प्रकारे स्वतःला पीडा देत राहणे, त्रास देत राहणे किंवा स्वतःचाच छळ करत राहणे. कालांतराने काळजीचे रूपांतर तीव्र चिंतेत होते. आणि काळजी केल्याने कोणत्याही समस्या सुटतात का? मुळीच नाही! अशी कल्पना करा, की तुम्ही स्टँडवर लावलेल्या सायकलवर बसून पेडल मारत आहात व पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही कित्येक तास प्रयत्न करता, सगळी शक्‍ती पणाला लावता. पण सायकल जागच्या जागीच राहते, पुढे जात नाही! चिंता करत बसण्याऐवजी, तुम्ही सकारात्मक पावले उचलल्यास कदाचित चांगले परिणाम होतील. उदाहरणार्थ, तुमच्या चुकीमुळे ज्या व्यक्‍तीचे नुकसान झाले, तिची क्षमा तुम्ही मागू शकता. यामुळे कदाचित तुमचे संबंध पुन्हा सुरळीत होतील. तसेच, ज्या गोष्टींमुळे तुम्ही विशिष्ट चूक करण्यास प्रवृत्त झाला होता, त्या गोष्टी तुम्ही टाळू शकता. यामुळे भविष्यात पुन्हा त्याच प्रकारच्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागणार नाही. अर्थात, जीवनात काही गोष्टी बदलता येत नाहीत. त्या स्वीकारून जीवन जगण्यास तुम्हाला शिकावे लागेल. पण, नुसतीच काळजी केल्याने काहीही साध्य होत नाही. उलट, तुम्ही हतबल होता आणि देवाची पूर्णार्थाने सेवा करण्यास असमर्थ ठरता.

११. (क) यहोवाची क्षमा व प्रेमदया मिळवण्याकरता आपण काय करू शकतो? (ख) गतकाळात आपल्याकडून काही चुका घडल्या असतील, तर मनःशांती मिळवण्याकरता आपण देवाच्या वचनातील कोणते सूत्र पाळले पाहिजे?

११ काही जण गतकाळातील चुकांचा स्वतःवर इतका जास्त परिणाम होऊ देतात की आपण देवाच्या कृपेच्या लायक नाही असे त्यांना वाटू लागते. आपण खूप गंभीर चुका केल्या आहेत किंवा खूप वेळा चुका केल्या आहेत आणि त्यामुळे देव कधीच आपल्याला क्षमा करणार नाही असे त्यांना वाटू शकते. पण वास्तवात, त्यांनी पूर्वी कोणत्याही चुका केल्या असल्या, तरीसुद्धा ते पश्‍चात्ताप करून वाईट मार्गापासून वळून देवाची क्षमा मागू शकतात. (प्रे. कृत्ये ३:१९) यहोवा इतर अनेकांप्रमाणे त्यांनासुद्धा प्रेमदया दाखवून त्यांच्या चुकांची क्षमा करेल. त्यांची नम्र व प्रामाणिक मनोवृत्ती आणि त्यांनी केलेला मनःपूर्वक पश्‍चात्ताप पाहून यहोवा कधीही त्यांना झिडकारणार नाही. ईयोबाने जेव्हा “मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत [पस्तावत आहे] आहे” असे म्हटले, तेव्हा देवाने त्याच्याशीही दयाळूपणे व्यवहार केला होता. (ईयो. ४२:६) मनःशांती मिळवण्याकरता आपण सर्वांनीच देवाच्या वचनात सांगितलेले हे सूत्र पाळले पाहिजे: “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.” (नीति. २८:१३; याको. ५:१४-१६) तेव्हा, आपण देवाजवळ आपले पाप कबूल करू शकतो, प्रार्थनेत त्याची क्षमा मागू शकतो आणि केलेली चूक सुधारण्यासाठी आवश्‍यक पावले उचलू शकतो. (२ करिंथ. ७:१०, ११) जर आपण या गोष्टी केल्या असतील, तर “भरपूर क्षमा” करणाऱ्‍या यहोवा देवाची दया आपल्यालाही अनुभवता येईल.—यश. ५५:७.

१२. (क) पूर्वी केलेल्या चुकांबद्दल आपला विवेक बोचत असल्यास दाविदाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? (ख) यहोवाला पस्तावा झाला तो कोणत्या अर्थाने, आणि हे समजल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो? (चौकट पाहा.)

१२ देवाची मदत मिळवण्याकरता प्रार्थना हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. दाविदाने एकदा देवाला पूर्ण विश्‍वासाने केलेली प्रार्थना व त्या प्रार्थनेत व्यक्‍त केलेल्या उत्कट भावना आपण स्तोत्रसंहितेत वाचू शकतो. (स्तोत्र ३२:१-५ वाचा.) दाविदाने म्हटले की जोपर्यंत त्याने देवाजवळ आपली चूक कबूल केली नाही तोपर्यंत त्याचा विवेक बोचत राहिला! त्याला शारीरिक व मानसिक वेदना होऊ लागल्या. त्याच्या जीवनातील आनंद नाहीसा झाला. मग, दाविदाला त्याच्या चुकांची क्षमा आणि या त्रासातून मुक्‍तता कशामुळे मिळू शकली? केवळ त्याने देवाजवळ आपले पाप कबूल केल्यामुळे. यहोवाने दाविदाच्या प्रार्थनांचे उत्तर दिले आणि पुढील जीवन जगण्यासाठी व त्याची सेवा करत राहण्यासाठी त्याने दाविदाला मदत केली. त्याच प्रकारे, जर तुम्ही मनापासून यहोवाला प्रार्थना केली तर तुम्ही ही खातरी बाळगू शकता की तो तुमच्या प्रामाणिक याचनांकडे जरूर लक्ष देईल. गतकाळातील चुकांमुळे जर तुमचे मन अस्वस्थ होत असेल, तर त्या चुका दुरुस्त करण्याचा तुमच्याने होईल तितका प्रयत्न करा आणि मग यहोवाने तुम्हाला क्षमा केली आहे या त्याच्या आश्‍वासनावर भरवसा बाळगा!—स्तो. ८६:५.

भविष्याकडे डोळे लावा

१३, १४. (क) आज आपण कशाचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे? (ख) आपल्या जीवनातील सध्याच्या परिस्थितीचे परीक्षण करण्यासाठी कोणते प्रश्‍न आपली मदत करू शकतील?

१३ असे म्हटले जाते की मागे वळून पाहिल्यामुळे आपल्याला जीवनाचा अर्थ समजू शकतो, पण जीवन जगण्यासाठी आपण पुढे पाहिले पाहिजे. तेव्हा, गतकाळाविषयी चिंता करत बसण्याऐवजी आपण वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे. आज आपण असे काही करत आहोत का किंवा करण्यापासून चुकत आहोत का, ज्याविषयी काही वर्षांनंतर आपल्याला पस्तावा होईल, किंवा आपण ते वेगळ्या प्रकारे करायला हवे होते असे आपल्याला वाटेल? भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारे पस्तावा होणार नाही यासाठी आज आपण सर्व गोष्टींत देवाला विश्‍वासू राहण्याचा प्रयत्न करत आहोत का?

१४ मोठे संकट जवळ येऊ लागेल तेव्हा पुढील विचारांमुळे आपले मन बेचैन व्हावे अशी आपली इच्छा नाही: ‘देवाच्या सेवेत मला आणखी जास्त सहभाग घेता आला असता का? मला संधी असूनही मी पायनियर सेवा का केली नाही? सेवा सेवक म्हणून कार्य करण्यास पात्र ठरण्याचा मी प्रयत्न का केला नाही? नवा मनुष्य धारण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला का? यहोवाला त्याच्या नव्या जगात प्रवेश द्यावासा वाटेल अशा प्रकारची व्यक्‍ती मी आहे का?’ अशा महत्त्वाच्या प्रश्‍नांबद्दल नुसतीच चिंता करण्याऐवजी, आपण त्यांच्या साहाय्याने स्वतःचे परीक्षण केले पाहिजे आणि यहोवाच्या सेवेत आपण होताहोईल तितके श्रम घेत आहोत किंवा नाही याची खातरी केली पाहिजे. नाहीतर, आपण पुढेही अशा चुका करत राहू ज्यांचा नंतर आपल्याला पस्तावा होईल.—२ तीम. २:१५.

तुमच्या पवित्र सेवेबद्दल कधीही पस्तावा करू नका

१५, १६. (क) देवाच्या सेवेला जीवनात प्राधान्य देण्यासाठी काहींनी कोणते त्याग केले आहेत? (ख) राज्याशी संबंधित कार्यांना प्राधान्य देण्याकरता आपण जे त्याग केले आहेत त्यांबद्दल आपण कधीही पस्तावा का करू नये?

१५ तुमच्यापैकी ज्यांनी यहोवाची पूर्णवेळ सेवा करण्यासाठी जीवनात त्याग केले आहेत त्यांच्याविषयी काय? राज्याच्या कार्यांसाठी अधिक वेळ मिळावा म्हणून कदाचित तुम्ही एक यशस्वी करियर करण्याच्या संधीकडे किंवा फायद्याच्या व्यवसायाकडे पाठ फिरवली असेल. कदाचित तुम्ही अविवाहित राहिला असाल; किंवा विवाह झाला तरी मुले होऊ द्यायची नाहीत असा निर्णय तुम्ही घेतला असेल. यामुळे तुम्हाला बेथेल सेवा, आंतरराष्ट्रीय बांधकाम कार्य, विभागीय कार्य किंवा मिशनरी सेवा यांपैकी एखाद्या प्रकारची पूर्णवेळेची सेवा करणे शक्य झाले असेल, जे अन्यथा शक्य झाले नसते. आता यहोवाची सेवा करता-करता तुमचे वय वाढत जात असताना तुम्ही त्या निर्णयांबद्दल पस्तावा करावा का? आपण केलेले त्याग अनावश्‍यक होते किंवा आपण ते चुकीच्या वेळी केले असा विचार तुम्ही करावा का? मुळीच नाही!

१६ यहोवावर मनापासून प्रेम असल्यामुळे आणि त्याची सेवा करू इच्छिणाऱ्‍या इतरांना मदत करण्याच्या प्रामाणिक इच्छेमुळे प्रेरित होऊन तुम्ही ते निर्णय घेतले होते. तेव्हा, ते त्याग न करता आपण वेगळ्या प्रकारे जीवन जगलो असतो तर बरे झाले असते, असा कधीही विचार करू नका. तुमच्या परिस्थितीनुसार, यहोवाच्या सेवेत तुमच्याने होईल ते सर्व तुम्ही केले याबद्दल मनस्वी समाधान व आनंद बाळगा. तुम्ही केलेले त्याग यहोवा कधीही विसरणार नाही. भविष्यातील खऱ्‍या जीवनात तो तुम्हाला असे उत्तम आशीर्वाद देईल, ज्यांची तुम्ही आज कल्पनाही करू शकत नाही!—स्तो. १४५:१६; १ तीम. ६:१९.

गतकाळाविषयी पस्तावा न करता सेवा कशी करावी?

१७, १८. (क) कोणते तत्त्व आत्मसात केल्यामुळे पौलाला पस्तावा न करता देवाची सेवा करत राहण्यास मदत मिळाली? (ख) यहोवाच्या सेवेतील तुमच्या गतकाळाविषयी, वर्तमानाविषयी आणि भविष्याविषयी तुम्ही कोणता निर्धार केला आहे?

१७ पौलाने कोणते तत्त्व आत्मसात केले, ज्यामुळे आणखी पस्तावा न करता देवाची सेवा करत राहण्यास त्याला मदत मिळाली? जे. बी. फिलिप्स भाषांतरातील अनुवादाप्रमाणे पौलाने असे लिहिले: “मी गतकाळाला मागे सोडून, भविष्यात जे काही असेल ते कवटाळण्याची तयारी ठेवतो आणि माझ्या ध्येयाकडे वाटचाल करतो.” (फिलिप्पैकर ३:१३, १४ वाचा.) यहुदी धर्मात असताना केलेल्या चुकांवर पौलाने आपले लक्ष केंद्रित केले नाही. त्याऐवजी, भविष्यातील सार्वकालिक जीवनाचे बक्षीस मिळवण्यास पात्र ठरण्याकरता त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.

१८ पौलाच्या शब्दांमागील तत्त्वाचे आपण सर्व जण पालन करू शकतो. गतकाळातील चुकांमुळे उद्विग्न होण्याऐवजी, व जे बदलता येत नाही त्याचा सतत विचार करत बसण्याऐवजी आपण भविष्याकडे डोळे लावून पुढे वाटचाल केली पाहिजे. पूर्वी केलेल्या चुकांचा आपल्याला कदाचित कधीच पूर्णपणे विसर पडणार नाही, पण या चुकांमुळे सतत स्वतःला दोष देत राहण्याची गरज नाही. झाले गेले विसरून, आपण वर्तमानात देवाच्या सेवेत होताहोईल तितके करू शकतो आणि भविष्यातील अद्‌भुत आशीर्वादांची प्रतीक्षा करू शकतो!

^ पौलाने पुरुषांसोबतच स्त्रियांचाही छळ केला याचा या अहवालात वारंवार उल्लेख आढळतो. यावरून दिसून येते की आजच्या प्रमाणेच पहिल्या शतकातदेखील ख्रिस्ती विश्‍वासाच्या प्रसारात स्त्रियांचा सिंहाचा वाटा होता.—स्तो. ६८:११.