आमच्या संग्रहातून
अगदी योग्य वेळी आलेली एक “अविस्मरणीय” गोष्ट
“अविस्मरणीय!” पुष्कळ लोकांनी असे म्हणून “क्रिएशन ड्रामाचे” वर्णन केले. क्रिएशन ड्रामा अगदी वेळेवर आला आणि ज्या लोकांनी तो ड्रामा पाहिला त्यांच्या मनावर याचा कायमचा ठसा उमटला. युरोपमध्ये हिटलरच्या शासनादरम्यान यहोवाच्या लोकांचा मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आला. पण, त्याच्या थोड्याच काळाआधी या “क्रिएशन ड्रामाने” एक मोठी साक्ष देऊन यहोवाचे गौरव केले. हा “क्रिएशन ड्रामा” नक्की होता तरी काय?
१९१४ मध्ये अमेरिकेतील न्यू यॉर्क राज्यात ब्रुकलिन येथे असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाने “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” रिलीज केला. हा सरकचित्रांचा व चलचित्रांचा समावेश असलेला आठ तासांचा रंगीत व ध्वनिसहित चित्रपट होता. जगभरातील लाखो लोकांनी हा चित्रपट पाहिला. १९१४ मध्ये या ड्रामाची लहान आवृत्ती अर्थात “युरेका ड्रामा”देखील प्रकाशित करण्यात आला. पण १९२० च्या दशकापर्यंत ही सरकचित्रे, फिल्म्स आणि प्रोजेक्टर इत्यादी साहित्य पूर्णपणे झिजले होते. तरीही “फोटो ड्रामा” या चित्रपटाला अजूनही बरीच मागणी होती. उदाहरणार्थ, जर्मनीतील, लुडविग्सबुर्गमध्ये राहणाऱ्यांनी विचारले: “‘फोटो ड्रामा’ पुन्हा केव्हा दाखवण्यात येईल?” लोकांची ही मागणी कशी काय पूर्ण केली जाणार होती?
फोटो ड्रामा पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी, १९२० च्या दशकात मध्ये जर्मनीतील मॅग्डेबुर्ग येथे असलेल्या बेथेल कुटुंबातील बांधवांनी फ्रांसमधील पॅरिस येथील वृत्तपत्र एजंसीकडून फिल्म्स, तर लाइपसिक व ड्रेस्डनमधील ग्राफिक्स कंपन्यांकडून सरकचित्रे विकत घेतली. ही नवी सरकचित्रे, फोटो ड्रामाच्या अद्यापही वापरण्याजोग्या सरकचित्रांसोबत जोडण्यात आली.
बंधू एरिक फ्रॉस्ट जे एक कुशल संगीतकार होते, त्यांनी या फिल्म्स व सरकचित्रांसोबत वापरण्यासाठी संगीताची रचना केली. या चित्रपटातील निवेदनाचा काही भाग आपल्या क्रिएशन या पुस्तकातून घेण्यात आला होता. म्हणून “फोटो ड्रामा”च्या या सुधारित आवृत्तीला “क्रिएशन ड्रामा” हे नवे नाव देण्यात आले.
हा नवीन ड्रामा जुन्या “फोटो ड्रामा”सारखाच आठ तासांचा होता आणि याचा एक भाग एका वेळी तर पुढचा भाग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अशा प्रकारे अनेक दिवस दाखवण्यात यायचा. “क्रिएशन ड्रामा”मध्ये जगाच्या निर्मितीच्या दिवसांबद्दल चित्तवेधक माहिती देण्यात आली, बायबल व मानवी इतिहासाबद्दल सांगण्यात आले आणि खोटा धर्म मानवजातीच्या अपेक्षा व गरजा पूर्ण करण्यात कशा प्रकारे अपयशी ठरला आहे याकडे लक्ष वेधण्यात आले. ऑस्ट्रिया, जर्मनी, लक्समबर्ग, स्वित्झर्लंड आणि जर्मन भाषा बोलल्या जाणाऱ्या इतर क्षेत्रांत हा “क्रिएशन ड्रामा” दाखवण्यात आला.
बंधू फ्रॉस्ट सांगतात: “ड्रामाच्या मध्यंतरात प्रेक्षकांच्या प्रत्येक रांगेत जाऊन
आपली सुरेख पुस्तकं व पुस्तिका त्यांना सादर करण्याचं मी माझ्या सहकाऱ्यांना, खासकरून ऑर्केस्ट्रामध्ये असलेल्यांना उत्तेजन द्यायचो. घरोघरच्या कार्यांत आम्ही जितकी पुस्तकं द्यायचो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पुस्तकं आम्ही या पद्धतीमुळं लोकांना देऊ शकलो.” योहानस राऊटे, ज्यांनी पोलंडमध्ये आणि आता ज्याला चेक रिपब्लिक म्हटले जाते तेथे हा ड्रामा दाखवण्याची व्यवस्था केली होती. ते आठवून सांगतात की चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांनी त्यांच्याशी संपर्क साधता यावा म्हणून आपला पत्ता दिला. या पत्त्यांमुळे त्या लोकांना पुनर्भेट देणे आणि त्यांच्यासोबत बायबलवर चांगल्या चर्चा करणे आम्हाला शक्य झाले.१९३० च्या दशकातही “क्रिएशन ड्रामा” पाहण्यासाठी लोकांची खचाखच गर्दी असायची आणि शहरात सर्वत्र यहोवाच्या साक्षीदारांविषयी चर्चा व्हायची. १९३३ पर्यंत तब्बल दहा लाख लोकांनी जर्मनीतील आपल्या शाखा कार्यालयाने आयोजित केलेले या चित्रपटाचे सादरीकरण पाहिले होते. कॅटे क्राउस म्हणते: “फक्त तो ड्रामा पाहण्यासाठी आम्ही पाच दिवस रोज जंगलातून, डोंगर दऱ्यांतून दहा किमी पायी जायचो आणि पुन्हा दहा किमी पायी यायचो.” एल्झा बिल्हार्ट्स म्हणते: “‘क्रिएशन ड्रामा’ पाहिल्यामुळंच माझ्या मनात सत्याबद्दल प्रेम रुजलं.”
ऑल्फ्रेट ऑल्मेन्डिंगर सांगतात की जेव्हा त्यांच्या आईने हा ड्रामा पाहिला तेव्हा तिला “इतका आनंद झाला की तिनं एक बायबल विकत घेतलं व त्यात ती ‘परगेटरी’ हा शब्द शोधू लागली.” तिला हा शब्द बायबलमध्ये न सापडल्यामुळे, तिने चर्चला जाणे बंद केले आणि बाप्तिस्मा घेतला. एरिक फ्रॉस्ट सांगतात: “असंख्य लोक ‘क्रिएशन ड्रामा’ पाहून सत्यात आले.”—३ योहा. १-३.
“क्रिएशन ड्रामा”चे प्रदर्शन जोरात सुरू असतानाच नात्सीवादाने युरोपला आपल्या विळख्यात घेतले. १९३३ पासून जर्मनीतील साक्षीदारांच्या कार्यांवर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून ते १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपुष्टात येईपर्यंत युरोपमधील यहोवाच्या साक्षीदारांना अतोनात छळाचा सामना करावा लागला. एरिक फ्रॉस्ट आठ वर्षे तुरुंगात होते. पण ते छळातून जिवंत बचावले आणि नंतर त्यांनी जर्मनीतील वीस्बाडन बेथेल गृहात सेवा केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान बऱ्याच ख्रिश्चनांना विश्वासाच्या परीक्षांना सामोरे जावे लागले. पण अगदी योग्य वेळी आलेल्या अविस्मरणीय “क्रिएशन ड्रामा”मुळे या परीक्षांना तोंड देण्याचे धैर्य त्यांना मिळाले!—जर्मनीतील आमच्या संग्रहातून.