व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या आध्यात्मिक वारशाची तुम्ही कदर करता का?

आपल्या आध्यात्मिक वारशाची तुम्ही कदर करता का?

“परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट . . . घेतली.”—प्रे. कृत्ये १५:१४.

१, २. (क) दाविदाचा “डेरा” काय होता आणि तो कशा प्रकारे पुन्हा बांधला जाणार होता? (ख) यहोवाचे सेवक या नात्याने आज कोण ऐक्याने सेवा करत आहेत?

 जेरूसलेममध्ये इ.स. ४९ साली झालेल्या नियमन मंडळाच्या एका महत्त्वाच्या सभेत शिष्य याकोबाने असे म्हटले: “परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने [पेत्र] सांगितले आहे; आणि ह्‍याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्‍तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की, ‘ह्‍यानंतर मी परत येईन, व दावीदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन; ह्‍यासाठी की, शेष राहिलेल्या माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा; हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.’”—प्रे. कृत्ये १५:१३-१८.

दावीदाचा “डेरा” म्हणजे त्याचे शाही घराणे. सिद्‌कीया राजाला राजपदावरून काढण्यात आले तेव्हा हा डेरा पडला. (आमो. ९:११) पण, हा “डेरा” पुन्हा उभारण्यात येणार होता. दाविदाच्याच घराण्यातून आलेला येशू कायमचा राजा बनणार होता. (यहे. २१:२७; प्रे. कृत्ये २:२९-३६) नियमन मंडळाच्या त्या ऐतिहासिक सभेत याकोबाने स्पष्ट केल्याप्रमाणे, यहुदी व विदेशी या दोन्ही गटांमधून राज्याच्या वारसदारांना एकत्रित केले जाण्याद्वारे आमोसची ही भविष्यवाणी त्या काळी पूर्ण होत होती. आज अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा शेषवर्ग आणि येशूच्या दुसऱ्‍या मेंढरांतील लाखो जण ऐक्याने यहोवाचे सेवक या नात्याने बायबलमधील सत्य जाहीर रीत्या घोषित करत आहेत.—योहा. १०:१६.

यहोवाच्या लोकांचा बंदिवास

३, ४. बॅबिलोनमध्ये असताना यहोवाचे लोक खऱ्‍या उपासनेत कशा प्रकारे टिकून राहिले?

यहुद्यांना बंदिवान बनवून बॅबिलोनला नेण्यात आले, तेव्हा दाविदाचा “डेरा” पडला आहे हे स्पष्ट झाले. बॅबिलोनमध्ये खोट्या धर्माचा जबरदस्त पगडा होता. तर मग, इ.स.पू. ६०७ पासून इ.स.पू. ५३७ पर्यंतच्या ७० वर्षांच्या बंदिवासादरम्यान देवाचे लोक खऱ्‍या उपासनेत कसे काय टिकून राहिले? अगदी त्याच प्रकारे, ज्या प्रकारे सैतानाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या जगात यहोवाचे लोक या नात्याने आज आपण टिकून राहिलो आहोत. (१ योहा. ५:१९) एका समृद्ध आध्यात्मिक वारशामुळेच आपल्याला असे करणे शक्य झाले आहे.

आपल्या या आध्यात्मिक वारशाचा एक पैलू म्हणजे आपल्याजवळ असलेले देवाचे लिखित वचन. बॅबिलोनच्या बंदिवासात असलेल्या यहुद्यांजवळ पवित्र शास्त्रवचनांतील सगळी पुस्तके नव्हती; पण त्यांना मोशेच्या नियमशास्त्राविषयी, तसेच दहा आज्ञांविषयी माहिती होती. त्यांना ‘सियोनेची गाणी’ येत होती; बरीच नीतिसूत्रेही त्यांना अवगत होती. शिवाय, त्यांच्याआधी होऊन गेलेल्या यहोवाच्या इतर सेवकांच्या पराक्रमांविषयीही त्यांना माहीत होते. सियोनेची आठवण काढून हे बंदिवान रडायचे. ते यहोवाला विसरले नाहीत. (स्तोत्र १३७:१-६ वाचा.) यामुळे, बॅबिलोनमध्ये अनेक खोटे सिद्धान्त व चालीरिती प्रचलित असूनही ते यहुदी खऱ्‍या उपासनेत टिकून राहिले.

त्रैक्य नवीन नाही!

५. प्राचीन बॅबिलोन व इजिप्तमध्ये त्रिदेवांची किंवा त्रैक्यांची उपासना केली जायची याचा कोणता पुरावा आपल्याजवळ आहे?

बॅबिलोनमध्ये त्रिदेवांची किंवा त्रैक्याची उपासना अतिशय सर्रासपणे केली जायची. तेथील एका त्रिदेवात सिन (चंद्रदेवता), शामाश (सूर्यदेवता) आणि इश्‍तार (सुपीकतेची व युद्धांची देवी) यांचा समावेश होता. प्राचीन इजिप्तमध्ये, सहसा एक देव, त्याची पत्नी म्हणजे एक देवी आणि त्यांचा मुलगा अशा तिघांची उपासना केली जायची. एका संदर्भ ग्रंथानुसार, “या दैवी त्रिकुटात किंवा त्रैक्यात पिता हा नेहमीच मुख्य नसायचा; कधीकधी, केवळ देवीचा नवरा असलेला राजकुमार एवढीच त्याची भूमिका असे; त्या विशिष्ट परिसराचे मुख्य दैवत ही देवीच असायची.” (न्यू लॅरूस एन्सायक्लोपिडिया ऑफ मिथॉलॉजी) इजिप्तमधील एका त्रिदेवात ओसायरिस हा देव, आयसिस ही देवी आणि होरस हा त्यांचा मुलगा समाविष्ट होता.

६. त्रैक्य म्हणजे काय, आणि या खोट्या शिकवणीपासून आपला बचाव कशामुळे झाला आहे?

ख्रिस्ती धर्मजगताजवळही त्यांचा त्रिदेव, अर्थात त्रैक्य आहे. पाळक म्हणतात की पिता, पुत्र व पवित्र आत्मा मिळून एक देव आहे. पण हे तर यहोवाच्या सार्वभौमत्वावर आघात करण्यासारखे आहे. कारण यावरून असे सुचवले जाते, की यहोवा हा तीन देवांपासून बनलेल्या त्रैक्याचा केवळ एक भाग आहे. यहोवाचे लोक या खोट्या शिकवणीला बळी पडले नाहीत कारण ते देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या पुढील शब्दांशी सहमत आहेत: “हे इस्राएला, ऐक, यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे.” (अनु. ६:४, पं.र.भा.) येशूनेही हे विधान उद्धृत केले होते. कोणताही खरा ख्रिस्ती येशूच्या शब्दांवर शंका घेईल का?—मार्क १२:२९, पं.र.भा.

७. त्रैक्याची शिकवण मानणारी व्यक्‍ती यहोवा देवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेऊ शकत नाही असे का म्हणता येईल?

त्रैक्याचा सिद्धान्त येशूने त्याच्या अनुयायांना दिलेल्या आज्ञेच्या विरोधात आहे. येशूने म्हटले होते, “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.” (मत्त. २८:१९) एक खरा ख्रिस्ती आणि यहोवाचा साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेण्यासाठी, एका व्यक्‍तीने पित्याची म्हणजेच यहोवाची श्रेष्ठता, तसेच देवाचा पुत्र, येशू याची भूमिका व अधिकार मान्य केलाच पाहिजे. शिवाय, बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीने पवित्र आत्मा हा त्रैक्याचा भाग नसून, देवाची क्रियाशील शक्‍ती असल्याचेही मानले पाहिजे. (उत्प. १:२) त्रैक्याची शिकवण मानणारी व्यक्‍ती यहोवा देवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेऊ शकत नाही. आपल्या आध्यात्मिक वारशामुळे, देवाचा अनादर करणाऱ्‍या या त्रैक्याच्या शिकवणीपासून आपला बचाव झाला आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ असले पाहिजे!

भूतविद्येची घृणास्पद प्रथा आली कोठून?

८. बॅबिलोनी लोकांचा देवीदेवतांबद्दल व दुरात्म्यांबद्दल कसा दृष्टिकोन होता?

बॅबिलोनमधील धर्मांत खोट्या सिद्धान्तांना, तसेच देवीदेवता, दुरात्मे व भूतविद्या यांविषयीच्या शिकवणींना बराच वाव होता. दी इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया यात असे म्हटले आहे: “बॅबिलोनच्या धर्मांत देवीदेवतांच्या खालोखाल दुरात्म्यांनाही बरेच महत्त्व होते. या दुरात्म्यांजवळ मनुष्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधींनी पीडित करण्याचे सामर्थ्य होते. बहुतेक धार्मिक प्रथा दुरात्म्यांचा प्रतिकार करण्याच्या उद्देशानेच पाळल्या जायच्या आणि त्यांच्यापासून मनुष्यांचा बचाव करण्याची देवीदेवतांना प्रार्थनेद्वारे विनंती केली जायची.”

९. (क) बॅबिलोनच्या बंदिवासानंतर बरेच यहुदी कशा प्रकारे खोट्या धार्मिक कल्पनांना बळी पडले? (ख) जाणूनबुजून दुरात्म्यांच्या प्रभावाखाली येण्याच्या धोक्यांपासून आपला कशामुळे बचाव होतो?

बॅबिलोनच्या बंदिवासातून सुटका झाल्यानंतर बरेच यहुदी अशास्त्रीय धारणांना बळी पडले. यहुद्यांच्या जीवनात ग्रीक शिकवणींचा शिरकाव होऊ लागला तसतसे अनेक यहुदी दुरात्मिक प्रभावाला बळी पडले; कारण त्यांनी हा दृष्टिकोन स्वीकारला की दुरात्मे नेहमीच वाईट नसतात तर ते चांगलेही असू शकतात. पण आपला आध्यात्मिक वारसा आपल्याला जाणूनबुजून दुरात्म्यांच्या धोकादायक प्रभावाखाली येण्यापासून राखतो, कारण देवाने बॅबिलोनच्या भूतविद्येशी संबंधित चालीरीतींची निर्भर्त्सना केली होती हे आपल्याला माहीत आहे. (यश. ४७:१, १२-१५) आणि आपण भूतविद्येसंबंधी देवाच्या या दृष्टिकोनाचा स्वीकार करतो.—अनुवाद १८:१०-१२; प्रकटीकरण २१:८, वाचा.

१०. मोठ्या बाबेलच्या प्रथा व विश्‍वासांबाबत काय म्हणता येईल?

१० भूतविद्येची शिकवण ही केवळ बॅबिलोनी लोकच जोपासत होते असे नाही; तर, मोठ्या बाबेलचे समर्थक, अर्थात खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्यदेखील भूतविद्येशी संबंधित प्रथांना जोपासते. (प्रकटी. १८:२१-२४) दी इंटरप्रिटर्स डिक्शनरी ऑफ द बायबल म्हणते: “[मोठ्या] बाबेलमध्ये केवळ एकाच नव्हे, तर अनेक साम्राज्यांचा व संस्कृतींचा समावेश आहे. भौगोलिक अथवा ऐहिक सीमांमुळे नव्हे तर त्यांच्या प्रमुख मूर्तिपूजक कल्पना व प्रथांमुळे त्या बाबेलचा भाग बनतात.” (खंड १, पृ. ३३८) भूतविद्या, मूर्तिपूजा व इतर अयोग्य प्रथा जोपासणारी मोठी बाबेल आजही अस्तित्वात आहे, पण तिचे अस्तित्व आता फार काळ राहणार नाही.—प्रकटीकरण १८:१-५ वाचा.

११. भूतविद्येसंबंधी आपण कोणते इशारे प्रकाशित केले आहेत?

११ यहोवाने म्हटले: “तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकुनमुहूर्त पाहू नका.” (लेवी. १९:२६) एकोणिसाव्या शतकातील विचारधारेत भूतविद्या, जिला पिशाचवाददेखील म्हणण्यात आले आहे, तिने महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणूनच झायन्स वॉच टावरच्या मे १८८५ अंकात असे म्हटले होते: “मृतजन दुसऱ्‍या जगात किंवा दुसऱ्‍या रूपात जिवंत आहेत हा समज काही नवा नाही. प्राचीन धर्मांत ही धारणा अस्तित्वात होती आणि मुळात तिच्यातूनच सर्व दंतकथांचा उगम झाला.” मृतजन जिवंत लोकांशी संपर्क करू शकतात या अशास्त्रीय कल्पनेमुळेच, “‘दुरात्मे’ आपण मृत लोकांचे आत्मे आहोत असे भासवून लोकांची फसवणूक करतात. स्वतःचे खरे रूप लपवण्यासाठी त्यांना हा आयता मार्ग मिळाला आहे, आणि याद्वारे ते अनेकांच्या मनांवर व जीवनावर नियंत्रण करतात.” आपल्या अलीकडील प्रकाशनांप्रमाणेच, फार पूर्वी छापलेल्या व्हॉट से द स्क्रिप्चर्स अबाउट स्पिरिटिझम? नावाच्या एका पुस्तिकेतदेखील भूतविद्येच्या विरोधात अशाच प्रकारचे इशारे देण्यात आले होते.

मृतजन अधोलोकात यातना भोगत आहेत का?

१२. देवाच्या प्रेरणेने शलमोनाने मृतांच्या स्थितीविषयी काय म्हटले?

१२ “ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच” या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकतात. (२ योहा. १) शलमोनाच्या या शब्दांशी आपण नक्कीच सहमत आहोत: “मृत सिंहापेक्षा जिवंत श्‍वान बरा. आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही; . . . जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे [कबर] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍ती-प्रयुक्‍ती, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही.”—उप. ९:४, ५, १०.

१३. ग्रीक संस्कृतीचा व धर्माचा यहुद्यांवर कशा प्रकारे प्रभाव पडला?

१३ मृतांसंबंधीचे सत्य यहुद्यांना माहीत होते. पण, ग्रीसचे साम्राज्य ॲलेक्झँडरच्या चार सेनापतींनी आपसात वाटून घेतले तेव्हा त्यांनी ग्रीक धर्माच्या व संस्कृतीच्या माध्यमाने यहुदा व सिरियाला आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. परिणामस्वरूप, मानवी आत्मा अमर आहे आणि पाताळात एक यातनेचे ठिकाण आहे अशा प्रकारच्या खोट्या शिकवणी यहुद्यांनी स्वीकारल्या. पाताळात मृतांचे आत्मे यातना भोगत असतात या संकल्पनेला ग्रीक लोकांनी जन्म दिला नाही, कारण पूर्वी बॅबिलोनी लोक असे मानायचे की “अधोलोक हे अतिशय भयानक ठिकाण आहे आणि तेथे शक्‍तिशाली देवता व दुरात्मे लोकांना क्रूरपणे छळतात.” (द रिलिजन ऑफ बॅबिलोनिया ॲन्ड असिरिया) त्याअर्थी, आत्म्याच्या अमरत्वाची कल्पना मुळात बॅबिलोनी लोकांपासून सुरू झाली.

१४. ईयोबाला व अब्राहामाला मृत्यू व पुनरुत्थानासंबंधी काय माहीत होते?

१४ ईयोब या नीतिमान पुरुषाजवळ पवित्र शास्त्रवचने नव्हती, तरीसुद्धा त्याला मृत्यूविषयीचे सत्य माहीत होते. तसेच, यहोवा हा एक प्रेमळ देव असून आपले पुनरुत्थान करण्यास तो उत्सुक असेल याचीदेखील ईयोबाला जाणीव होती. (ईयो. १४:१३-१५) अब्राहामाचाही पुनरुत्थानावर विश्‍वास होता. (इब्री लोकांस ११:१७-१९ वाचा.) साहजिकच देवाच्या या सेवकांचा, मानवी आत्मा अमर असतो या शिकवणीवर विश्‍वास नव्हता; कारण जो अमर आहे त्याचे पुनरुत्थान करणे अशक्य आहे. नक्कीच, मृतांची स्थिती काय असते हे समजून घेण्यासाठी आणि पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवण्यासाठी देवाच्या आत्म्यानेच ईयोबाला व अब्राहामाला साहाय्य केले. ही सत्येदेखील आज आपल्या आध्यात्मिक वारशाचा भाग बनली आहेत.

“खंडणी”—अत्यावश्‍यक

१५, १६. आपल्याला पाप व मृत्यूपासून कशा प्रकारे मुक्‍ती मिळाली आहे?

१५ आणखी एका कारणामुळे आपण देवाचे आभारी आहोत. आदामाद्वारे आलेल्या पाप व मृत्यूच्या वारशापासून सोडवण्यासाठी त्याने जी तरतूद केली आहे तिच्याविषयीचे सत्य त्याने आपल्याला प्रकट केले आहे. (रोम. ५:१२) आपल्याला माहीत आहे की येशू हा “सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्‍तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला.” (मार्क १०:४५) खरोखर, “ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्‍तीच्या” विषयी जाणून घेणे किती आनंददायक आहे!—रोम. ३:२२-२४.

१६ पहिल्या शतकातील यहुद्यांनी व विदेश्‍यांनी आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करून येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणे आवश्‍यक होते. त्याशिवाय, त्यांना पापांची क्षमा मिळणे शक्य नव्हते. आजही तीच परिस्थिती आहे. (योहा. ३:१६, ३६) एखादी व्यक्‍ती त्रैक्य व आत्म्याचे अमरत्व यांसारख्या खोट्या शिकवणींना सोडण्यास तयार नसेल, तर ती येशूच्या खंडणी बलिदानाचा फायदा घेऊ शकत नाही. पण आपण या बलिदानाचा फायदा घेऊ शकतो कारण आपल्याला देवाच्या प्रिय पुत्राविषयीचे सत्य माहीत आहे आणि “त्या पुत्राच्या ठायी, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्‍ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.”—कलस्सै. १:१३, १४.

देवाच्या नावाकरिता असलेले लोक या नात्याने वाटचाल करू या!

१७, १८. आपल्या इतिहासासंबंधी उपयुक्‍त माहिती आपल्याला कोठे मिळू शकते आणि ती जाणून घेतल्याने आपल्याला कोणता फायदा होतो?

१७ आपण स्वीकारलेल्या खऱ्‍या शिकवणी, देवाचे सेवक या नात्याने आपले अनुभव, आणि आपण उपभोगत असलेले आध्यात्मिक व भौतिक आशीर्वाद यांविषयी आणखी बरेच काही सांगता येईल. आपल्या वार्षिक पुस्तकांत (इयरबुक) सबंध जगभरात चाललेल्या आपल्या कार्याविषयीचे रोमांचक अहवाल अनेक दशकांपासून प्रकाशित होत आहेत. फेथ इन ॲक्शन, भाग १ व २ या व्हिडियोपटांत, तसेच जेहोवाज विट्‌नेसेस प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्‌स किंग्डम या प्रकाशनात आपल्या इतिहासाचे वर्णन करण्यात आले आहे. शिवाय, आपल्या नियतकालिकांतही आपल्या प्रिय बंधुभगिनींचे हृदयस्पर्शी वैयक्‍तिक अनुभव आपल्याला वेळोवेळी वाचायला मिळतात.

१८ देवाने इजिप्तच्या दास्यातून इस्राएली लोकांची कशी सुटका केली याविषयी मनन केल्यामुळे त्यांना फायदा झाला. त्याच प्रकारे, यहोवाच्या संघटनेच्या इतिहासाविषयी जाणून घेणे आपल्या हिताचे आहे. (निर्ग. १२:२६, २७) देवाच्या अनेक अद्‌भुत पराक्रमांचा साक्षीदार असणाऱ्‍या वृद्ध मोशेने इस्राएलांना असे आर्जवले: “पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण; आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील; आपल्या वडील जनांस विचार ते तुला सांगतील.” (अनु. ३२:७) यहोवाची “प्रजा” व त्याच्या “कुरणातली मेंढरे” या नात्याने आपण सारे जण आनंदाने त्याची स्तुती करू या आणि त्याच्या पराक्रमांविषयी इतरांना सांगू या. (स्तो. ७९:१३) खरोखर, आपल्या इतिहासाचा अभ्यास करणे, त्यापासून शिकणे व त्यानुसार भविष्याकरता योजना आखणे आपल्याकरता फायदेकारक आहे.

१९. देवाकडील आध्यात्मिक प्रकाशाचा आनंद घेण्यासोबतच आपण काय केले पाहिजे?

१९ आपली स्थिती अंधारात चाचपडणाऱ्‍यांसारखी नाही, तर आपण देवाकडील आध्यात्मिक प्रकाशाचा आनंद घेत आहोत याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! (नीति. ४:१८, १९) तेव्हा, आपण देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करू या व आवेशाने इतरांना सत्याबद्दल सांगू या. आपण स्तोत्रकर्त्यासारखी मनोवृत्ती दाखवू या, ज्याने सार्वभौम प्रभू यहोवाची स्तुती करत असे म्हटले: “तुझ्या, केवळ तुझ्याच, नीतिमत्त्वाचे मी निवेदन करीन. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवीत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्‌भुत कृत्ये वर्णिली आहेत. मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांस तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.”—स्तो. ७१:१६-१८.

२०. कोणत्या वादविषयांची आपल्याला जाणीव आहे, आणि या वादविषयांबद्दल तुमच्या भावना काय आहेत?

२० यहोवाचे समर्पित लोक या नात्याने देवाच्या सार्वभौमत्वाविषयी व मानवांच्या सचोटीविषयी उद्‌भवलेल्या वादविषयांची आपल्याला जाणीव आहे. म्हणूनच, यहोवा हाच सबंध विश्‍वाचा सार्वभौम आहे आणि आपण केवळ त्याचीच मनोभावे उपासना केली पाहिजे हे निर्विवाद सत्य आपण घोषित करतो. (प्रकटी. ४:११) यहोवाचा पवित्र आत्मा आपल्यावर असल्यामुळे आपण दीन लोकांना सुवार्ता सांगतो, भग्न हृदयी जनांस पट्टी बांधतो आणि शोकग्रस्तांचे सांत्वन करतो. (यश. ६१:१, २) देवाच्या लोकांवर व सबंध मानवजातीवर आधिपत्य गाजवण्याचा सैतान कितीही व्यर्थ प्रयत्न करत असला, तरी आपण आपल्या आध्यात्मिक वारशाची कदर करतो; आणि सार्वभौम प्रभू यहोवाप्रती आपली सचोटी राखण्याचा आणि सदैव त्याचीच स्तुती करत राहण्याचा आपला पक्का निर्धार आहे.—स्तोत्र २६:११; ८६:१२ वाचा.