यहोवाच्या संरक्षक खोऱ्यात राहा
“पूर्वी युद्धसमयी ज्या प्रकारे [परमेश्वराने] युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील.”—जख. १४:३.
१, २. लवकरच कोणते युद्ध होणार आहे, आणि या युद्धात देवाच्या सेवकांना काय करण्याची गरज नाही?
सन १९३८ मध्ये ३० ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील लाखो लोक रेडिओवरील एका लोकप्रिय कार्यक्रमादरम्यान एक नाटक ऐकत होते. त्या संध्याकाळी जे नाटक ऐकवले जात होते ते द वॉर ऑफ द वर्ल्ड्स नावाच्या विज्ञानविषयक कादंबरीतील काल्पनिक कथेवर आधारित होते. नाटकात बातमी सांगणाऱ्यांची भूमिका करणाऱ्या कलाकारांनी मंगळ ग्रहावरील जीव पृथ्वीवर आल्याची आणि मोठ्या प्रमाणावर नासधूस करत असल्याची घोषणा केली. रेडिओवरील हा कार्यक्रम एक नाटक असल्याची घोषणा आधीच करण्यात आली असली, तरी हा खरोखरचा हल्ला आहे असे नाटक ऐकणाऱ्या अनेक जणांना वाटले आणि ते घाबरले. काही जणांनी तर त्या काल्पनिक परग्रहवासियांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट पावलेदेखील उचलली.
२ लवकरच एक खरोखरचे मोठे युद्ध होणार आहे. पण, लोक या युद्धाचा सामना करण्यासाठी कोणतीही तयारी करताना दिसत नाहीत. या युद्धाविषयी एखाद्या विज्ञानविषयक कादंबरीत नव्हे, तर देवाच्या प्रेरित वचनात म्हणजे बायबलमध्ये पूर्वभाकीत करण्यात आले आहे. हे युद्ध हर्मगिदोनाचे युद्ध आहे—या दुष्ट जगाविरुद्ध देवाचे युद्ध. (प्रकटी. १६:१४-१६) या युद्धात, देवाच्या पृथ्वीवरील सेवकांना कोणत्याही परग्रहवासियांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लढण्याची गरज नाही. तरीसुद्धा, घडणाऱ्या अद्भुत घटना पाहून आणि देव कशा प्रकारे आपली शक्ती प्रदर्शित करतो ते पाहून देवाचे सेवक विस्मित होतील.
३. आपण कोणत्या भविष्यवाणीविषयी चर्चा करणार आहोत, आणि ही भविष्यवाणी आपल्याकरता महत्त्वाची का आहे?
३ जखऱ्या १४ व्या अध्यायात नमूद असलेल्या एका भविष्यवाणीचा हर्मगिदोनाच्या युद्धाशी थेट संबंध आहे. ही भविष्यवाणी जवळजवळ २,५०० वर्षांपूर्वी लिहिण्यात आली असली, तरी तिचा आज आपल्यावर प्रभाव पडतो. (रोम. १५:४) १९१४ मध्ये स्वर्गात मशीही राज्य स्थापन झाल्यावर देवाच्या लोकांसोबत काय घडले आणि निकट भविष्यात आणखी कोणत्या रोमांचक घटना घडणार आहेत याविषयीची माहिती या भविष्यवाणीत देण्यात आली आहे. विशेषतः, या भविष्यवाणीत “एक मोठे खोरे” निर्माण होण्याविषयी आणि “जिवंत पाण्याचे झरे” फुटून वाहण्याविषयी आपण वाचतो. (जख. १४:४, ८) यहोवाच्या उपासकांना संरक्षण पुरवण्यात या खोऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि जिवंत पाण्याच्या झऱ्यांचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो हे जेव्हा आपल्याला समजेल, तेव्हा हे पाणी पिणे किती आवश्यक आहे याची जाणीव आपल्याला होईल. इतकेच नव्हे, तर ते पाणी पिण्याची इच्छाही आपल्या मनात निर्माण होईल. तेव्हा, या भविष्यवाणीपासून फायदा प्राप्त करून घेण्यासाठी आपण त्याकडे बारीक लक्ष लावले पाहिजे.—२ पेत्र १:१९, २०.
यहोवाचा दिवस
४. (क) यहोवाचा दिवस केव्हा सुरू झाला? (ख) १९१४ च्या कितीतरी दशकांआधीपासून यहोवाचे उपासक कशाची घोषणा करत होते, आणि जागतिक पुढाऱ्यांनी याला कशी प्रतिक्रिया दाखवली?
४ जखऱ्याने १४ व्या अध्यायातील भविष्यवाणीच्या सुरुवातीला यहोवाच्या दिवसाचा उल्लेख केला. त्याने म्हटले: “परमेश्वराचा दिवस येत आहे.” (जखऱ्या १४:१, २ वाचा.) हा कोणता दिवस आहे? हा प्रभूचा दिवस आहे. या “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले” तेव्हा या दिवसाची सुरुवात झाली. (प्रकटी. १:१०; ११:१५) १९१४ मध्ये स्वर्गात मशीही राज्याची स्थापना झाली तेव्हा हा दिवस सुरू झाला. १९१४ च्या कितीतरी दशकांआधीपासून यहोवाच्या उपासकांनी राष्ट्रांमध्ये घोषित केले होते, की त्यावर्षी “परराष्ट्रीयांची सद्दी संपेल” आणि हे जग अशा एका काळात प्रवेश करेल जेव्हा कधीही नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात संकटे येतील. (लूक २१:२४) राष्ट्रांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? या समयोचित इशाऱ्याकडे लक्ष देण्याऐवजी, राजकीय व धार्मिक पुढाऱ्यांनी आवेशी अभिषिक्त सुवार्तिकांची थट्टा केली आणि त्यांचा छळ केला. असे करण्याद्वारे, या जागतिक पुढाऱ्यांनी खुद्द सर्वशक्तिमान देवाचीच थट्टा केली. कारण, राज्याचे अभिषिक्त राजदूत “स्वर्गीय” यरुशलेमचे—मशीही राज्याचे प्रतिनिधित्व करतात आणि ते या राज्याचा भाग आहेत.—इब्री १२:२२, २८.
५, ६. (क) पूर्वभाकीत केल्याप्रमाणे राष्ट्रांनी नगराविरुद्ध व त्यातील नागरिकांविरुद्ध कोणती पावले उचलली? (ख) “अवशिष्ट लोक” कोण होते?
५ राष्ट्रे काय करतील याविषयी जखऱ्याने पूर्वभाकीत केले होते. त्याने म्हटले: “ते नगर [जेरूसलेम] हस्तगत करितील.” येथे “नगर” जे म्हटले आहे ते देवाच्या मशीही राज्याला सूचित करते. त्या राज्याचे नागरिक म्हणजे अभिषिक्त शेषजन पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधित्व करतात. (फिलिप्पै. ३:२०) पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यान, यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाच्या प्रमुख सदस्यांना “हस्तगत” करण्यात आले, म्हणजे त्यांना अटक करण्यात आली, आणि अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील ॲटलँटा येथे असलेल्या तुरुंगात पाठवण्यात आले. शत्रूंनी अभिषिक्त ख्रिश्चनांवर व सचोटी राखणाऱ्या इतर निर्दोष लोकांवर अन्याय केला आणि त्यांना क्रूर वागणूक दिली; त्यांच्या प्रकाशनांवर बंदी घातली आणि त्यांचे प्रचार कार्य थांबवण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने, जणू त्या शत्रूंनी त्यांची “घरे” लुटली.
६ अतिशक्तिशाली शत्रूंनी देवाच्या लोकांचा छळ केला, त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवली व त्यांचा विरोध केला, तरी ते खऱ्या उपासनेला मिटवून टाकू शकले नाहीत. कारण, काही “अवशिष्ट लोक” म्हणजे अभिषिक्त शेषजन अद्यापही होते आणि त्यांनी विश्वासू राहून “नगरातून नाहीतसे” होण्यास नकार दिला.
७. यहोवाच्या अभिषिक्त साक्षीदारांनी मांडलेल्या उदाहरणामुळे आज सर्वच खऱ्या उपासकांना कोणते उत्तेजन मिळते?
७ पहिल्या महायुद्धाच्या शेवटपर्यंत ही भविष्यवाणी पूर्ण झाली होती का? नाही. अभिषिक्त शेषजनांविरुद्ध आणि पृथ्वीवर जगण्याची आशा बाळगणाऱ्या त्यांच्या एकनिष्ठ साथीदारांविरुद्ध राष्ट्रांकडून आणखी हल्ले होणार होते. (प्रकटी. १२:१७) दुसरे जागतिक महायुद्ध याचा पुरावा आहे. देवाच्या विश्वासू अभिषिक्त साक्षीदारांनी राखलेल्या सचोटीमुळे आज देवाच्या सेवकांना कोणत्याही समस्येला धीराने तोंड देण्याचे उत्तेजन मिळते. या समस्यांत साक्षीदार नसलेल्या कुटुंबीयांकडून, कामाच्या ठिकाणी सहकर्मचाऱ्यांकडून, किंवा आपल्या विश्वासामुळे आपली थट्टा करणाऱ्या शाळासोबत्यांकडून होणारा विरोधही समाविष्ट आहे. (१ पेत्र १:६, ७) देवाचे खरे उपासक कोठेही राहत असले, तरी “विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत” न होता “एकचित्ताने स्थिर” राहण्यासाठी त्यांचा निर्धार पूर्वीपेक्षा आणखी दृढ झाला आहे. (फिलिप्पै. १:२७, २८) पण, ज्या जगात यहोवाच्या लोकांचा द्वेष केला जातो त्यात त्यांना सुरक्षा कोठे मिळू शकेल?—योहा. १५:१७-१९.
यहोवा “एक मोठे खोरे” निर्माण करतो
८. (क) बायबलमध्ये डोंगर कशास सूचित करू शकतात? (ख) जैतुनझाडांचा डोंगर कशास सूचित करतो?
८ जेरूसलेम, म्हणजे “नगर” लाक्षणिक रीत्या स्वर्गीय जेरूसलेमला सूचित करत असल्यामुळे, ‘यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेला जैतुनझाडांचा डोंगर’देखील लाक्षणिकच असला पाहिजे. हा डोंगर कशास सूचित करतो? तो कशा प्रकारे दुभागेल आणि त्याचे दोन डोंगर कशा प्रकारे बनतील? यहोवा त्या दोन डोंगरांना माझे डोंगर का म्हणतो? (जखऱ्या १४:३-५ वाचा.) बायबलमध्ये डोंगरांचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा ते राज्यांना किंवा सरकारांना सूचित करू शकतात. तसेच, देवाच्या डोंगरापासून आशीर्वाद आणि संरक्षण मिळते असे बायबलमध्ये अनेकदा म्हटले आहे. (स्तो. ७२:३; यश. २५:६, ७) तेव्हा, पृथ्वीवरील जेरूसलेमच्या पूर्वेला असलेल्या जैतुनझाडांच्या ज्या डोंगरावर देव उभा आहे, तो डोंगर यहोवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाला म्हणजे त्याच्या सर्वोच्च शासनाला सूचित करतो.
९. “जैतुनझाडांचा डोंगर” दुभागतो तो कोणत्या अर्थाने?
९ जैतुनझाडांच्या डोंगराचे दोन भाग झाले हे कशास सूचित करते? जेरूसलेमच्या पूर्वेस असलेला डोंगर दुभागला तो या अर्थाने, की यहोवा एका खास उद्देशासाठी आणखी एक शासन स्थापित करतो. हे दुसरे शासन मशीही राज्य आहे ज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे. म्हणूनच “जैतुनझाडांचा डोंगर” दुभागून निर्माण झालेल्या दोन डोंगरांना यहोवा माझे डोंगर म्हणतो. (जख. १४:४) दोन्ही डोंगर यहोवाचे आहेत.
१०. दोन डोंगरांच्या मध्ये असलेले “मोठे खोरे” कशास सूचित करते?
१० लाक्षणिक डोंगर दुभागून अर्धा उत्तरेकडे आणि अर्धा दक्षिणेकडे सरतो तेव्हा यहोवाचे पाय दोन्ही डोंगरांवर असतात. यहोवाच्या पायांखाली “एक मोठे खोरे” निर्माण होते. हे लाक्षणिक खोरे देवाकडून मिळणाऱ्या संरक्षणाला सूचित करते, ज्याद्वारे यहोवाच्या सेवकांना त्याच्या आणि त्याच्या पुत्राच्या राज्य शासनाखाली संरक्षण मिळते. यहोवा शुद्ध उपासनेला कधीही मिटू देणार नाही. जैतुनझाडांच्या डोंगराचे दोन भाग कधी बनले? १९१४ मध्ये परराष्ट्रीयांचा काळ संपुष्टात येऊन मशीही राज्य स्थापन झाले तेव्हा हे घडले. खऱ्या उपासकांनी या लाक्षणिक खोऱ्याकडे पळ काढायला केव्हा सुरुवात केली?
खोऱ्याकडे पळ काढण्याची सुरुवात!
११, १२. (क) लाक्षणिक खोऱ्याकडे पळ काढणे कधी सुरू झाले? (ख) यहोवा आपल्या लोकांचे संरक्षण करतो हे कशावरून दिसून येते?
११ येशूने आपल्या अनुयायांना अशी ताकीद दिली: “माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (मत्त. २४:९) या जगाच्या शेवटल्या दिवसांदरम्यान म्हणजे १९१४ पासून हा द्वेष आणखीनच तीव्र बनला आहे. अभिषिक्त शेषजनांच्या शत्रूंनी पहिल्या महायुद्धादरम्यान त्यांच्यावर भयंकर हल्ले करूनही या विश्वासू समूहाचा नाश झाला नाही. १९१९ मध्ये त्यांना मोठ्या बाबेलच्या—खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले. (प्रकटी. ११:११, १२) * तेव्हाच, यहोवाच्या डोंगरांच्या खोऱ्याकडे पळ काढणे सुरू झाले.
१२ सन १९१९ पासून देवाच्या संरक्षणाचे खोरे जगभरातील खऱ्या उपासकांचे निरंतर संरक्षण करत आहे. मागील दशकांत जगातील अनेक भागांत यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यावर आणि त्यांच्या बायबल प्रकाशनांवर बंदी आणण्यात आली. काही देशांत अजूनही अशी बंधने आहेत. पण, राष्ट्रांनी खऱ्या उपासनेला मिटवून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते कधीही सफल होणार नाहीत! यहोवाचा शक्तिशाली बाहू त्याच्या लोकांचे संरक्षण करेल.—अनु. ११:२.
१३. आपण यहोवाच्या संरक्षक खोऱ्यात कसे राहू शकतो, आणि आज असे करणे कधी नव्हे इतके महत्त्वाचे का आहे?
१३ आपण जर यहोवाला एकनिष्ठ राहिलो आणि सत्यात खंबीरपणे उभे राहिलो, तर तो आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त त्यांची भूमिका पूर्ण करतील. आणि देव कोणालाही किंवा कशालाही आपल्याला त्याच्या “हातातून” हिसकावून घेऊ देणार नाही. (योहा. १०:२८, २९) यहोवा या सबंध विश्वाचा सार्वभौम अधिपती आहे हे मान्य करून आपण त्याच्या आज्ञांचे पालन केले आणि त्याच्या मशीही राज्याला एकनिष्ठ राहिलो, तर आपल्याला हवी ती मदत करण्यासाठी तो तयार आहे. यासाठी आज आपण त्याच्या संरक्षणाच्या खोऱ्यात राहणे अत्यावश्यक आहे. कारण, अतिजलदपणे जवळ येणाऱ्या मोठ्या संकटादरम्यान त्याच्या खोऱ्यात शरण घेण्याची आपल्याला आणखीनच जास्त गरज भासेल.
युद्धाचा समय जवळ आला आहे
१४, १५. शत्रूंविरुद्ध देव “युद्ध” करेल त्या दिवशी मोठ्या संरक्षक खोऱ्याच्या बाहेर असलेल्यांची परिस्थिती कशी असेल?
१४ या दुष्ट जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे, तसतसा सैतान यहोवाच्या सेवकांवरील हल्ले आणखीनच तीव्र करेल. त्यानंतर, आपल्या शत्रूंविरुद्ध “युद्ध” करण्याचा देवाचा समय येईल. सैतान देवाच्या सेवकांवर एक शेवटला हल्ला करेल. त्या दिवशी, या विश्वाचा सार्वभौम अधिपती एक महिमावान योद्धा या नात्याने पूर्वी कधी नव्हे इतक्या अद्भुत रीतीने “युद्ध” करेल.—जख. १४:३.
१५ देवाच्या युद्धाच्या त्या दिवशी, जे लोक मोठ्या संरक्षक खोऱ्याच्या बाहेर असतील त्यांची परिस्थिती कशी असेल? त्यांच्यावर देवाच्या स्वीकृतीचा मौल्यवान “प्रकाश” चमकणार नाही. भविष्यातील त्या युद्धाच्या दिवशी घोडे, खेचर, उंट आणि गाढव, म्हणजे राष्ट्रांची शस्त्रसामग्री प्रभावित होईल. अशी सर्व शस्त्रे निकामी होतील. त्यासोबतच, यहोवा मरीचाही उपयोग करेल. ही मरी खरोखरची असो अथवा नसो, पण त्यामुळे धमक्या देणाऱ्यांची तोंडे बंद होतील. त्या दिवशी, “त्यांचे डोळे . . . त्यांची जिव्हा सडेल.” याचा अर्थ, शत्रू गोंधळात पडून इकडे-तिकडे प्रहार करतील आणि त्यांचे उद्धट बोलणे कायमचे बंद होईल. (जख. १४:६, ७, १२, १५) पृथ्वीचा कोणताही भाग नाशापासून सुटणार नाही. युद्धात सैतानाच्या बाजूने लढणाऱ्या सैन्याची संख्या खूप मोठी असेल. (प्रकटी. १९:१९-२१) “त्या दिवशी परमेश्वराने संहारिलेले, पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील.”—यिर्म. २५:३२, ३३.
१६. देवाच्या युद्धाचा दिवस जवळ येत असल्यामुळे, आपण कोणत्या प्रश्नांवर मनन केले पाहिजे, आणि तेव्हा काय करणे गरजेचे असेल?
१६ युद्धामुळे लोकांना, नेहमीच दुःख-कष्ट, त्रास सहन करावा लागतो, विजेत्यांनासुद्धा. उदाहरणार्थ, अन्नटंचाई निर्माण होऊ शकते. साधनसंपत्ती गमावली जाऊ शकते. राहणीमानाचा दर्जा खालावू शकतो. वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ शकतात. अशी कठीण परिस्थिती आपल्यासमोर उपस्थित झाल्यास, आपली प्रतिक्रिया काय असेल? आपण घाबरणार का? दबावामुळे आपण आपल्या विश्वासाचा त्याग करणार का? आपण निराशेच्या गर्तेत बुडून जाणार का? मोठ्या संकटादरम्यान, यहोवाच्या तारण करणाऱ्या सामर्थ्यावरील आपला विश्वास टिकवून ठेवणे आणि यहोवाच्या संरक्षक खोऱ्यात टिकून राहणे खरोखर किती गरजेचे असेल!—हबक्कूक ३:१७, १८ वाचा.
“जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील”
१७, १८. (क) जिवंत पाणी काय आहे? (ख) पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र कशास सूचित करतात? (ग) भविष्याबद्दल तुम्ही कोणता दृढनिश्चय केला आहे?
१७ हर्मगिदोनानंतर, “जिवंत पाण्याचे झरे” मशीही राज्याच्या सिंहासनापासून सतत वाहत राहतील. हे जिवंत पाणी म्हणजे मानवांच्या सार्वकालिक जीवनासाठी यहोवाने केलेल्या तरतुदी. जखऱ्याच्या भविष्यवाणीतील पूर्व समुद्र हा मृत सागराला, आणि पश्चिम समुद्र भूमध्य सागराला सूचित करतो. या दोन्ही समुद्रांचा वापर लोकांच्या संदर्भात करण्यात आला आहे. मृत सागर, कबरांमध्ये असलेल्या लोकांना सूचित करतो. तर भूमध्य सागरात माशांचे व इतर प्राण्यांचे अस्तित्व असल्यामुळे, तो उचितपणे हर्मगिदोनातून बचावलेल्यांच्या मोठ्या लोकसमुदायाला सूचित करतो. (जखऱ्या १४:८, ९ वाचा; प्रकटी. ७:९-१५) अशा रीतीने, हे दोन्ही गट सार्वकालिक जीवन देणारे जिवंत पाणी, किंवा दुसऱ्या शब्दांत जीवनाच्या पाण्याच्या नदीतून पाणी पितील आणि त्याद्वारे त्यांची आदामामुळे आलेल्या मृत्यूदंडापासून सुटका होईल.—प्रकटी. २२:१, २.
१८ यहोवाच्या संरक्षणात आपण या दुष्ट जगाच्या अंतातून बचावून देवाच्या नीतिमान नवीन जगात प्रवेश करणार आहोत. म्हणून, जरी सर्व राष्ट्रे आपला द्वेष करत असले, तरी आपण देवाच्या राज्याची एकनिष्ठ प्रजा बनून राहण्याचा, आणि नेहमी यहोवाच्या संरक्षक खोऱ्यात राहण्याचा दृढनिश्चय करू या.