कधीही आशा सोडू नका!
तुम्ही बऱ्याच वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार असाल पण तुमच्या विवाहसोबत्यानेही तुमच्यासोबत मिळून यहोवाची उपासना करावी असे तुम्हाला मनापासून वाटते का?
किंवा तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्यामुळे निराश झाला आहात का, ज्याने सुरुवातीला तर आस्था दाखवली पण नंतर सत्य स्वीकारण्यास माघार घेतली?
नेहमी यहोवाला जडून राहणे महत्त्वाचे
तुम्ही नेहमी सत्याला व यहोवाला जडून राहिले पाहिजे. (अनु. १०:२०) जॉर्जिना या बहिणीने असेच केले. ती १९७० मध्ये यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागली तेव्हा तिचा पती किर्याकोस संतापला. त्याने तिचा बायबल अभ्यास थांबवण्याचा प्रयत्न केला, साक्षीदारांचे घरात येणे बंद केले, आणि त्यांची कोणतीही प्रकाशने सापडल्यास तो जॉर्जिनाकडून हिसकावून घ्यायचा.
जॉर्जिना जेव्हा सभांना उपस्थित राहू लागली तेव्हा किर्याकोस आणखीनच रागावला. एके दिवशी तो वाद घालण्यासाठी राज्य सभागृहात गेला. किर्याकोसला इंग्रजीपेक्षा ग्रीक भाषा चांगल्या प्रकारे बोलता येते हे लक्षात आल्यावर, एका बहिणीने दुसऱ्या मंडळीतल्या ग्रीक भाषा बोलणाऱ्या एका बांधवाला येऊन किर्याकोसशी बोलण्यास सांगितले. बांधवाच्या प्रेमळ वागण्यामुळे किर्याकोसचा राग निवळला. आणि काही महिन्यांसाठी ते सोबत मिळून बायबलचा अभ्याससुद्धा करू लागले. पण नंतर किर्याकोसने अभ्यास करण्याचे थांबवले.
यानंतर तीन वर्षे, जॉर्जिना विरोधाचा सामना करत राहिली. किर्याकोस म्हणाला की जर तिने बाप्तिस्मा घेतला तर तो तिला सोडून देईल. जॉर्जिनाच्या बाप्तिस्म्याच्या दिवशी तिने यहोवाला कळकळून प्रार्थना केली की किर्याकोसने तिला सोडून जाऊ नये. बंधुभगिनी तिला संमेलनाला घेऊन जाण्यास आले तेव्हा किर्याकोस त्यांना म्हणाला: “तुम्ही पुढे जा. आम्ही आमच्या गाडीनं तुमच्या मागंमागं येतो.” तो सकाळच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि त्याने आपल्या पत्नीला बाप्तिस्मा घेताना पाहिले!
यानंतर, किर्याकोसने जॉर्जिनाचा विरोध करण्याचे कमी केले आणि हळूहळू त्याने आपल्या जीवनात मोठे बदल केले. साक्षीदारांना भेटून सुमारे ४० वर्षे ओलांडल्यानंतर जॉर्जिनाने आपल्या पतीला बाप्तिस्मा घेताना पाहिले. कोणत्या गोष्टीमुळे किर्याकोसला बाप्तिस्मा घेण्यास मदत मिळाली? तो म्हणतो: “जॉर्जिनाने यहोवाची उपासना करण्यात कोणत्याही गोष्टीला मध्ये येऊ दिलं नाही ही गोष्ट मला खूप आवडली.” जॉर्जिना सांगते: “माझे पती माझा विरोध करत असले तरी मी माझ्या देवाची उपासना करण्याचं सोडणार नव्हते. किर्याकोसचा बाप्तिस्मा होईपर्यंत मी यहोवाला सतत प्रार्थना करत राहिले आणि मी कधीही आशा सोडली नाही.”
नव्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्य
आणखी एका मार्गाने तुम्ही तुमच्या सोबत्याला सत्यात येण्यासाठी मदत करू शकता. तो म्हणजे स्वतःत ख्रिस्ती गुण उत्पन्न करणे. प्रेषित पेत्राने ख्रिस्ती पत्नींना असा सल्ला दिला: “स्त्रियांनो, तुम्हीही आपआपल्या पतीच्या अधीन असा; यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” (१ पेत्र ३:२) क्रिस्टीनने या सल्ल्याचे पालन केले. असे असले तरी तिला तिच्या पतीचे मन जिंकण्यासाठी पुष्कळ वर्षे लागली. २० वर्षांआधी जेव्हा ती एक साक्षीदार बनली तेव्हा तिचा पती जॉन याला त्याच्या जीवनात देवाची गरज भासली नाही. जॉनला स्वतःला कोणत्याही धर्मात गुंतवायचे नव्हते, पण क्रिस्टीनसाठी तिचा नवा विश्वास किती महत्त्वाचा आहे हे तो पाहू शकत होता. तो म्हणतो: “तिच्या नव्या विश्वासामुळं ती खूप आनंदी होती. तिनं स्वतःत खंबीरपणा व भरवशालायकपणा हे गुण उत्पन्न केले, आणि यामुळं मला बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना करण्यास मदत मिळाली.”
क्रिस्टीनने केव्हाही आपल्या पतीवर स्वतःचा धर्म लादण्याचा प्रयत्न केला नाही. जॉन म्हणतो: “सुरुवातीपासून क्रिस्टीनला याची जाणीव होती की माझ्यासमोर तिनं तिच्या धर्माचा विषय न काढलेलाच बरा आणि तिनं धीरानं मला माझ्या पद्धतीनं सत्य शिकू दिलं.” क्रिस्टीनला जेव्हाही टेहळणी बुरुज किंवा अवेक! मासिकांत जॉनला आवडणाऱ्या विषयांवरील लेख आढळायचे, जसे की विज्ञान आणि निसर्ग, तेव्हा ती ते लेख जॉनला दाखवायची आणि त्याला म्हणायची, “मला वाटतं तुला हे लेख वाचायला आवडतील.”
कालांतराने जॉन सेवानिवृत्त झाला आणि बागकाम करू लागला. जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी त्याच्याजवळ आता बराच वेळ होता. तो विचार करू लागला, ‘मानवांची निर्मिती आपोआपच झाली की त्यांना एका उद्देशासाठी निर्माण करण्यात आले?’ एके दिवशी जॉन एका बांधवाशी गप्पा मारत होता, तेव्हा त्या बांधवाने त्याला विचारले, “तुला बायबल अभ्यास करायला आवडेल का?” जॉन सांगतो: “आता मी देवावर विश्वास करू लागलो होतो म्हणून मी बायबल अभ्यास करण्याकरता तयार झालो.”
क्रिस्टीनने केव्हाही आशा सोडली नाही आणि खरोखरच ही किती महत्त्वाची गोष्ट होती! जॉनने सत्य स्वीकारावे अशी प्रार्थना २० वर्षे केल्यानंतर त्याचा बाप्तिस्मा झाला. आता ते दोघे मिळून आवेशाने यहोवाची सेवा करत आहेत. जॉन सांगतो: “खासकरून दोन गोष्टींमुळं मला बदल करण्याची प्रेरणा मिळाली. साक्षीदारांचा प्रेमळ व मनमिळाऊ स्वभाव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुमचा विवाहसोबती यहोवाचा साक्षीदार असतो तेव्हा तुम्हाला एकनिष्ठ, भरवशालायक व आत्मत्यागी असा साथीदार लाभतो.” १ पेत्र ३:२ यात दिलेला सल्ला क्रिस्टीनने आपल्या जीवनात लागू केला आणि याचा चांगला परिणाम घडून आला!
अनेक वर्षांनंतर बीजाला अंकुर फुटते
अशा बायबल विद्यार्थ्यांविषयी काय ज्यांनी सुरुवातीला आस्था दाखवली पण काही कारणांमुळे पुढे प्रगती केली नाही? शलमोन राजाने असे लिहिले: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.” (उप. ११:६) काही वेळा सत्याच्या बीजाला अंकुर फुटायला बरीच वर्षे लागू शकतात. पण कालांतराने एका व्यक्तीला देवाच्या जवळ येण्याच्या महत्त्वाची जाणीव होऊ शकते. (याको. ४:८) खरेच, एके दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसू शकतो!
ॲलिसचा विचार करा जी भारतातून इंग्लंडला आली होती. १९७४ मध्ये तिने बायबल अभ्यास करण्यास सुरुवात केली. तिला हिंदी भाषा बोलता येत होती पण तिला तिची इंग्रजी सुधारायची होती. ॲलिसचा अभ्यास काही वर्षांकरता सुरू राहिला, आणि काही वेळा ती इंग्रजी भाषेतील सभांनादेखील उपस्थित राहिली. तिला याची जाणीव होती की ती जे शिकत आहे ते सत्य आहे, पण तिने कधी याचा गांभीर्याने विचार केला नाही. शिवाय, तिला पैशांचे वेड होते आणि तिला पार्ट्यांना जायला खूप आवडायचे. कालांतराने ॲलिसने सत्य शिकण्याचे थांबवले.
जवळजवळ ३० वर्षांनंतर, स्टेला जी ॲलिसचा बायबल अभ्यास घ्यायची, तिला ॲलिसकडून एक पत्र मिळाले. त्यात असे लिहिले होते: “हे ऐकून तुम्हाला नक्कीच खूप आनंद होईल की १९७४ साली तुम्ही जिच्यासोबत बायबल अभ्यास करायचा तिचा अलिकडील प्रांतीय अधिवेशनात बाप्तिस्मा झाला. तुम्ही माझ्या जीवनात एक खूप महत्त्वाची भूमिका बजावली. तुम्ही माझ्या अंतःकरणात सत्याचं बीज रुजवलं आणि तेव्हा जरी मी देवाला समर्पण करण्यासाठी तयार नव्हते, तरी सत्याचं बीज मी माझ्या अंतःकरणात जपून ठेवलं होतं.”
ॲलिसने सत्य का स्वीकारले? ॲलिस सांगते की १९९७ मध्ये तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती खूप निराश झाली. तिने देवाला प्रार्थना केली. याच्या दहा मिनिटांच्या आतच दोन पंजाबी बोलणारे साक्षीदार तिच्या घरी आले आणि त्यांनी तिला मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? ही पत्रिका वाचायला दिली. ॲलिसला वाटले की देवाने तिच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे, आणि म्हणून तिने यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. पण ती त्यांना कोठे शोधणार? तिला एक जुनी डायरी सापडली ज्यात स्टेलाने दिलेला पंजाबी भाषेतील मंडळीचा पत्ता तिने लिहून ठेवला होता. ॲलिस सभांना गेली आणि पंजाबी भाषा बोलणाऱ्या बंधुभगिनींनी तिचे प्रेमाने स्वागत केले. ॲलिस म्हणते, “त्यांनी ज्या प्रकारे माझं स्वागत केलं ते मी विसरू शकले नाही आणि याच गोष्टीमुळं मला निराशेतून बाहेर येण्यास मदत मिळाली.”
ती नियमितपणे सभांना उपस्थित राहू लागली आणि तिने पुन्हा बायबल अभ्यास करायला सुरुवात केली. ती पंजाबी भाषा चांगल्या प्रकारे बोलण्यास व वाचण्यास शिकली. २००३ मध्ये तिने बाप्तिस्मा घेतला. पत्राच्या शेवटी ॲलिसने असे म्हटले, “२९ वर्षांपूर्वी सत्याचं बीज माझ्या मनात पेरल्याबद्दल व माझ्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.”
“२९ वर्षांपूर्वी सत्याचं बीज माझ्या मनात पेरल्याबद्दल व माझ्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.”—ॲलिस
तुम्ही या अनुभवांवरून काय शिकू शकता? कदाचित तुमचा बायबल विद्यार्थी सत्य स्वीकारण्यास तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेत असेल; पण जर त्याला देवाला जाणून घ्यायची खरोखरच इच्छा असेल, तो प्रामाणिक व नम्र असेल तर यहोवा त्याला किंवा तिला सत्य समजण्यास व स्वीकारण्यास मदत करेल. येशूने जो दृष्टान्त दिला त्यात त्याने म्हटले: “बी रुजते व वाढते पण हे कसे होते हे त्याला [बी पेरणाऱ्याला] कळत नाही. जमीन आपोआप पीक देते; पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.” (मार्क ४:२७, २८) ही वाढ हळूहळू आणि “आपोआप” होते. मुळात ही वाढ कशी होते हे कोणीही सांगू शकत नाही. तर मग, सढळ हाताने पेरणी करा. कदाचित त्याच मापाने तुम्ही कापणीही करू शकाल.
आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व नेहमी लक्षात ठेवा. जॉर्जिना आणि क्रिस्टीन यांनी सतत यहोवाला प्रार्थना केली. नेहमी “प्रार्थनेत तत्पर” राहिल्याने आणि कधीही आशा न सोडल्याने, जलाशयावर सोडलेले “अन्न” बऱ्याच दिवसांनी तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल.—रोम. १२:१२; उप. ११:१.